बिनओळखीची ओळख- १

Submitted by ठमादेवी on 24 October, 2011 - 01:23

आपल्या आयुष्यात रोजच्या रोज काही ना काही निमित्तांनी माणसं येत असतात. त्यातली सगळीच काही आपल्या लक्षात राहत नाहीत. पण काही माणसं मात्र विसरता विसरली जात नाहीत. कुछ खास है, असं लक्षात राहतं. कधी कधी ती आपल्या आयुष्यावर एक ठसा उमटवतात, कधी वेगळंच काहीतरी शिकवून जातात... जे कदाचित आपल्याला कधीच कळलं नसतं. त्यातल्या काहींची नावं आपल्याला माहीत असतात, काहींची नसतात... अनेकांचा चेहराही आपण पाहिलेला नसतो, पाहिला असला तरी आपल्याला पुन्हा तो ओळखता येणार नसतो. मग ही बिननावाची, बिनचेहर्‍याची माणसं लक्षात का बरं राहतात? नुसती लक्षात राहत नाहीत तर रुतून बसतात. असं का बरं होत असावं? हे कोडं मला आजही उलगडलेलं नाही. तर अशाच काही माणसांची ओळख पटवण्याचा प्रयत्न मी करतेय...

सुट्टीच्या दिवशी चौपाटीला गेल्याशिवाय दिवस पार पडत नाही. काही दिवसांपूर्वी असाच एक चौपाटीचा दिवस उजाडला. आम्ही मायलेकी एका मित्राला सोबत घेऊन टॅक्सीत स्वार झालो. जाताना नेहमीच्या कळकट्ट, तोंडात पानाचा तोबरा भरलेल्या, घामाने थबथबलेल्या, भैयाने आम्हाला आमच्या इच्छित स्थळी नेऊन टाकलं. येताना मात्र आम्हाला एक मराठमोळा टॅक्सीवाला भेटला. हसरा चेहरा आणि वेलकम असा भाव असलेला हा टॅक्सीवाला कुणाचंही स्वागत करण्यासाठी उत्सुक असावा असाच वाटत होता.

टॅक्सीत बसल्यावर आम्ही मराठी आहोत हे त्याच्या लक्षात आलं. पुढे ग्रॅण्ट रोडजवळच्या नवजीवन सोसायटीजवळ आम्ही सिग्नलला थांबलो होतो. तेव्हा त्याने बोलायला सुरूवात केली. तिथपासून घरी पोहोचेपर्यंत तो बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो. त्याच्या साध्याच आयुष्याची, साध्याच स्वप्नांची गोष्ट... नवजीवन सोसायटीकडे हात दाखवून म्हणाला, मी इथे काम करत होतो. आत्ता वर्षभरापूर्वीच ही टॅक्सी घेतली आणि नोकरी सोडली. म्हटलं सगळे धंदे भैयांनीच का करायचे? आपल्यात असं काय कमी आहे म्हणून आपण व्यवसाय करायचा नाही? पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमधून इथे आलो, ते काय असंच जगायला? ते आपलं नशीब आजमावून बघतात तर आपण का नाही पाहायचं?

इथे मी ड्रायव्हरची नोकरी करायचो. आठेक हजार पगार होता. पण आठ हजारात काय भागतं हो? घराचं भाडं, संसार, बायको, दोन मुली, त्यांची शिक्षणं... कसं परवडणार होतं. टॅक्सी घ्यायचा विचार मागची सात-आठ वर्षं मनात होता. पण दरवेळी पैसे जमवायचो आणि काहीतरी निघायचं. मग टॅक्सी घ्यायचं स्वप्न तसंच राहायचं. मी सुट्टीच्या दिवशी भाड्याने टॅक्सी चालवायचो. पैसे कमी पडायचे म्हणून नाही तर स्वत:ची टॅक्सी घेतल्यावर हा धंदा कसा चालतो ते पाहायचं म्हणून. सगळे नियम, सगळं काही शिकून घेतलं. नीट प्लॅनिंग केलं आणि शेवटी टॅक्सी बुक केली. एक एजंट गाठला. त्याला दीड लाख रूपये द्यायचे होते. ते कुठून आणायचे? कसेबसे जमवले. शेवटी वीस हजार रूपये कमी पडत होते. भाच्याने एक शब्दही न विचारता ते अकाऊंटला जमा केले. टॅक्सी चार दिवस एजंटच्या दारात उभी होती. पूर्ण पैसे दिल्यावर हातात आली.

त्याआधी नोकरीत नोटीस दिलीच होती. नोकरी सोडली तेव्हा शेट लोक सोडत नव्हते. पण म्हटलं, तुम्ही पगारपण वाढवत नाही. मग कसं जमणार? नोकरी सोडताना भीती वाटत होती. म्हटलं, काही चुकत तर नाहीये ना? टॅक्सीचा धंदा चालला नाही तर कसं होणार? पण शेवटी मनाचा हिय्या केला आणि धंद्यात पडलो. आता मनाप्रमाणे टॅक्सी चालवतो. शेटलोकपण त्याच्या कुणाला आणायचं असेल तर मला सांगतात. आता मला खूप बरं वाटतंय. स्वतःचा व्यवसाय असण्यातला आनंदच काही वेगळा आहे. नाही म्हणायला टॅक्सीला खर्च आहे. वर्षातून एकदा लायसन्स नव्याने घ्यावं लागतं, त्याला चार-पाच हजार खर्च आहे. बाकी गॅस वगैरेसाठी खर्च होतो. पण बचतही बरीच उरते, तो टॅक्सीचं आर्थिक गणित उलगडून सांगतो. अर्थात त्यात त्रासही खूप आहे. रोज रात्री कमरेचा आटा ढिला होतो. पण समाधानापुढे त्याचं काहीही वाटत नाही.

नवीन टॅक्सी कुणाच्याही हातात द्यायला भीती वाटते. आता ही जरा जुनी झाली की मग तिच्यावर ड्रायव्हर ठेवणार आहे. हळूहळू दुसरी टॅक्सी घेईन. मला आता स्वातंत्र्याची सवय झालीय. सुट्टीत गावी जायचं झालं तरी टॅक्सी घेऊन जातो. गाड्यांसाठी वाट पाहा, तिकिटं शोधा, काहीही करावं लागत नाही. टॅक्सीचं छोटं स्वप्नं वाटेल कुणालाही, पण माझ्यासाठी ते मोठं आहे आणि ते पूर्ण करण्यातला आनंदही वेगळाच आहे...

हा छोटा-छोटा आनंद कुणाच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण ठरतो नाही? ही अशीच माणसं आपल्याला आहे त्या परिस्थिती लढायला शिकवतात. जगण्यातला आनंद लुटायला शिकवतात, नाही का?

गुलमोहर: 

किती छान लिहिलंस कोमल, अगदी भावलं मनाला.....
<<हा छोटा-छोटा आनंद कुणाच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण ठरतो नाही? ही अशीच माणसं आपल्याला आहे त्या परिस्थिती लढायला शिकवतात. जगण्यातला आनंद लुटायला शिकवतात, नाही का?>> कुठेतरी वाचलेलं - हॅपीनेस इज नॉट डेस्टिनेशन, इट्स जर्नी - हे वाक्य आठवलं....

मस्त

सही आहे. स्वप्नं पाहून ती पुर्ण करणार्‍यांचे असे अनुभव नेहमीच प्रेरणादायी ठरतात. 'बिनओळखीच्या ओळखीं'मधे असंच काहितरी हलकं फुलकं पण प्रभावी घेऊन आलीयेस ना?

मस्त Happy

आणखीही अशा काही बिनचेहर्‍याची, बिनओळखीची माणसं मी आणणार आहेच दिवाळीनंतर..>>

वाट पाहात आहे. आपल्या पारखी स्वभावाला व दैवाशी चालू असलेल्या मानवी लढ्यातील काही गुणवंतांना हेरून समाजासमोर आणण्याच्या दिलदार प्रवृत्तीला व जाणिवेला विनम्र सलाम! अधिकाधिक बिनओळखीचे व या झगड्यात प्रयत्नांच्या पुंजीशिवाय व दुर्दम्य इच्छाशक्तीशिवाय सोबत काहीही नसलेले चेहरे सातत्याने समाजाच्या समोर येत राहावेत व त्यातून स्फुर्तीदायक संदेश पोचत राहावेत अशी प्रार्थना!

-'बेफिकीर'!

हा लेख वाचून 'असाही टॅक्सीवाला असतो..! ' यावर आज माझा विश्वास बसला.

बाकी लेख उत्तम. आणखी बिनओळखीच्या माणसांच्या प्रतिक्षेत.

छान!

अवांतर :

मी अशाच एका कारचालकाची नोकरी करणार्‍या ते स्वतःच्या हिंमतीवर टॅक्सी विकत घेऊन ती चालवायचा व्यवसाय करणार्‍या, नंतर काही वर्षांनी दोन टॅक्सीज विकत घेऊन त्या चालवायला देणार्‍या एका मराठी माणसाला जवळून पाहिलंय. त्या टॅक्सीजच्या जोरावर त्यांचा सारा संसार उभा राहिला. फक्त दुर्दैवाने त्यांना दारू आणि रेसचा नाद जडला. दारूच्या अतिसेवनाने झालेल्या आजारातच त्यांचा अंत झाला व सारे कुटुंब उघड्यावर आले.

मस्त Happy

आणखीही अशा काही बिनचेहर्‍याची, बिनओळखीची माणसं मी आणणार आहेच दिवाळीनंतर... >>>>
वाचायला खूप च आवडेल.. Happy Happy

hammmmm malaahI 1 asaacha रिक्शावाला भेटला होता. .. लिहिन मग त्या बद्दल.

आणखीही अशा काही बिनचेहर्‍याची, बिनओळखीची माणसं मी आणणार आहेच दिवाळीनंतर... >>>>

फारच छान.

परंतु, अश्या व्यक्तींची फक्त ओळख करून न देता त्यांचे संपर्क वगैरे मिळाले तर आम्ही ही त्यांना थोडा हातभार लावु शकतो ( मित्रपरिवारांमध्ये त्यांचा संपर्क वितरीत करून) जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त मदतही होईल आणि आत्मविश्वासही वाढेल

परंतु, अश्या व्यक्तींची फक्त ओळख करून न देता त्यांचे संपर्क वगैरे मिळाले तर आम्ही ही त्यांना थोडा हातभार लावु शकतो ( मित्रपरिवारांमध्ये त्यांचा संपर्क वितरीत करून) जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त मदतही होईल आणि आत्मविश्वासही वाढेल >>> मलाही आवडेल. पण ही माणसं मला त्या त्या वेळी भेटलेली आहेत आणि अशा परिस्थितीत भेटलेली आहेत की मला त्यांचा नंबर घेण्याचंही सुचलेलं नाही. त्यावेळी त्यांच्याबद्दल मी काही लिहिन असं वाटलंही नव्हतं. काहीजण भेटले, नंबरही घेतले पण काळाच्या प्रवाहात कुठेतरी वाहून गेले. आता ते नाहीत तर किमान त्यांची जिद्द पोहोचावी म्हणून मी प्रयत्न करतेय. Happy