तुम्हे याद हो के न याद हो - २४

Submitted by बेफ़िकीर on 30 September, 2011 - 10:32

डोके सुन्न झाले होते. जड, इतकेसे हालले तरी ठणकत होते. नजर तारवटलेली होती. लालभडक डोळे! जे काय खाल्ले, प्यायले ते घशाशी येऊ लागलेले होते. जरासुद्धा हालवत नव्हते. तीन फुटांच्या अंतरावर समोर बसलेला माणूस मैलावर बसल्यासारखा वाटत होता. असह्य होत होते ते वातावरण उमेशला! पण......

...... पण तिथून हालणे शक्यच नव्हते.

कारणे अनेक होती. जे ऐकले त्यावर विश्वास ठेवावा की जे आधीच माहीत होते त्यावर ते समजेनासे झालेले होते. शरीराची आत्ताची अवस्था अशी होती की कोणीतरी उचलून रूमवर नेऊन ठेवावे असे वाटत होते. त्यातच बाहेर गस्त सुरू झाल्याचे हा समोरचा माणूस सांगत होता. घड्याळात पाहिले तर पावणे बारा वाजलेले! तरीही आपण बारमध्येच कसे काय या प्रश्नाचे उत्तर हळूहळू मनात जाणवू लागले होते. हा बार औरंगाबादच्या अशा संवेदनशील विभागातला होता की जेथे मुस्लिम नागरिक खूपच अधिक होते. बारचे नांव दीपा असले तरी स्टाफची नांवे करीम, हुसैन अशी होती. आणि उघडच होते की आपल्या कृष्णकृत्यांनी पुणे गाजवून सोडणारा हा समोर बसलेला इसम औरंगाबादच्या या भागातील बारमध्ये बसलेला असला तर त्याला 'सर बार बंद हुवा है' हे वाक्य ऐकवायची कुणाच्या बापाची हिम्मत नव्हती.

मुहम्मद जुनैद अख्तर!

संभलके जा के अभी वक्त है संभलनेका!

पांढर्‍या शुभ्र मुस्लिम वेषात आणि दिसायलाच श्रीमंत दिसणारा जुनैद अख्तर अजूनही तसाच मोहक, लाघवी हासत होता. त्याचा तो विशिष्ट धार असलेला पण सतत ऐकावासा वाटणारा आवाज अजूनही तसाच होता. जसे मधे काही घडलेलेच नव्हते. त्याच्या साध्य चष्म्यावरूनही त्याची श्रीमंती लक्षात येत असल्याने तो इथे कसा काय हा प्रश्न मगाशीच मिटलेला होता. या बारमध्ये त्याला सुरक्षा मिळायची. आणि ती सुरक्षा मिळाल्याबद्दल तो या बारमालकाला आणि स्थानिक पोलिसांना श्रीमंत करत राहायचा. चक्क वर एक खोली होती त्याच्यासाठी! तो जवळपास असला की जाणवणारा एक उंची सुगंध आजही जाणवत होता. तो इतकी प्यायलेला असूनही त्याच्या बोलण्यात किंवा चेहर्‍यावर प्यायल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या.

हे सगळे ठीक होते, पण हा जुनैद अख्तर आपला पहिलावहिला आणि सर्वात मोठा शत्रू आहे हे मत उमेशला गेल्या दिड तासात आमूलाग्र बदलावे लागले होते.

त्या दिड तासातला एक तास जुनैद अख्तर अव्याहत बोलत होता आणि नंतरचा अर्धा तास दोघेही फक्त आपल्या ग्लासकडे पाहात बसलेले होते.

विचारांच्या वादळांचे आवेग असह्य होत होते. ऐकले त्यावर विश्वास बसू नये अशी इच्छा असूनही ठेवावाच लागत होता.

अख्तरमियाँनी लाघवी हासत, चमकदार डोळ्यांनीही स्मितहास्य करत आणि त्या विशिष्ट धारदार आवाजात सांगितलेली कहाणी चक्रावून टाकणारी होती.

केवळ आणि केवळ योगायोगाने ही भेट झाली हे उमेशला आत्ताही जाणवत होते. मोबाईल आणि संगणक नसलेले ते युग! मोबाईल आणि संगणक भारतात इतक्या प्रमाणावर येतील याची अंधुक कल्पनाही नसलेले ते युग! त्यामुळे ही भेट म्हणजे केवळ योगायोगच!

आणि अजूनही उमेश अख्तरमियाँनी सांगितलेलेच मुद्दे, त्या प्यायलेल्याही अवस्थेत, दहा वेळा मनात घोळवून तपासत होता.

अख्तर मियाँ वास्तविक चांगल्या उद्देशाने काम करत होते. मुस्लिम गरीब मुलांना शिक्षण मिळत नसल्याने अनेक परभाषिक पुस्तकांचे ते स्वतःच भाषांतर करून उर्दूत लिहून त्या मुलांना शिकवतही होते. तेही फुकट! प्रकार इतका वाढला होता की अनेक जण त्यांना नवनवीन पुस्तके आणून देत होते.

हळूहळु अख्तर मियाँच्या उपक्रमाला आयडेंटिटी प्राप्त होऊ लागली. देणग्या मिळू लागल्या. अधिकाधिक छोटी मुस्लिम मुले शिकायला यायला लागली. शिकायला यायला लागली म्हणजे त्यांच्याच वस्तीत जाऊन मियाँ आणि त्यांचा एक सहकारी मुलांना शिकवायचे. पण त्यालाही काही पालक सोडायचे नाहीत. पण हळूहळू पालकांना फायदा समजू लागला. आपल्या मुलाचे इतर समवयीन दोस्त अधिक हुषार बनत आहेत हे कळू लागले. इन फॅक्ट काही मुलांच्या दिसण्या वागण्यातही फरक पडू लागला. मुलांसाठी म्हणून येऊन बसणार्‍या आया, आजी आजोबा हेही लोक त्यातून थोडेफार नवीन ज्ञान मिळवू लागले. देणग्या मागायची वेळ जात चालली. देणग्या आपोआप मिळू लागल्या. त्यात मियाँ स्वतःचाही पैसा ओतत होतेच. त्यतच मुस्लिम बालकांसमवेत मित्र म्हणून काही हिंदू, ख्रिश्चन व बुद्ध बालकेही आपोआप शिकू लागली. ही शाळा नव्हती. पाठ्यपुस्तके घेऊन हे शिक्षण नव्हते. यात अक्षर ओळख होती तीही उर्दूचीच! आणि पुस्तके होती वेगवेगळ्या भाषेतील गाजलेली! काही गोष्टीम्ची, काही शिकवणींची !

परिणाम असा होत होता की लोककथेच्या वगैरे माध्यमातून मुस्लिम मुलांना परधर्मीय संस्कृतीही समजू लागली होती.

मुले आनंदाने शिकत होती. अर्थात, हे असे शिक्षण घेऊन काही परिक्षा द्यायचीच नव्हती.

मात्र करिअरसाठी या उपक्रमाचा काहीही फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर अख्तरमियाँनी एक ऑफिशियल लहानशी संस्था काढली व त्या संस्थेचे सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली. तिसरी पास, चवथी पास इत्यादी! आता मात्र उर्दू पाठ्यपुस्तकांची गरज भासू लागली. आणि त्यांची गरज इतकी वाढली की इतर परभाषिक व सिलॅबसशी संबंधीत नसलेल्या पुस्तकांना आता जागा मिळेनाशी झाली. मग देणग्यांचा ओघ थंडावू लागला. कारण उघड होते, की उर्दूच्या प्रसारासाठी पुण्यातील देणगीदारांना देणग्या द्यायच्याच नव्हत्या. मग इतर शहरातील मुस्लिम समाजात य अकल्पनेचा प्रसा करायचा असे ठरले. त्यासाठी औरंगाबाद हे सर्वाधिक पोटेन्शिअलचे शहर होतेच! त्यामुळे येथून पैशांचा ओघ सुरू झाला. मात्र आता मुलांचाच इन्टरेस्ट जाऊ लागला. कारण त्यांना सर्टिफिकेटमध्ये स्वारस्य नव्हते तर गोष्टि ऐकण्यात स्वारस्य होते. मग दोन्ही एकदम करायचे ठरले.

दखल घ्यावी इतपत स्वरूप जेव्हा या उपक्रमाला प्राप्त झाले तेव्हा मुस्लिम समाजातील लोकांना हा उपक्रम 'नेमका काय आहे' हे जाणवू लागले. काही प्रमाणात का होईना यात पैसा ओढला जात आहे, देणग्या मिळत आहेत आणि एवढे सगळे करून पुन्हा उपक्रम अतिशय चांगला आहे हे लक्षात येऊ लागले. मग त्याला साथ देण्यासाठी काही मुस्लिम युवक तयार झाले.

हाही प्रकार दोन वर्षे चालला.

माणसाच्या मेंदूला विश्रांती मिळाली किंवा स्थैर्य मिळाले की तो भलता विचार करू लागतो, तसेच झाले.

मुस्लिम युवकांपैकी काहींना हा उपक्रम आता फोल वाटू लागला. लष्कराच्या भाकर्‍या भाजणे वाटू लागले. त्यातील पैसा नीटसा आम्हाला मिळतच नाही ही भावना तयार झाली. उपक्रमामागची शुद्ध भावना नष्ट होऊन तिची जागा उपद्रवाच्या हेतूने घेतली. त्यातच त्यांच्या भावना मशिदीतून भडकावून देण्यात आल्या. मशिदीतल्या मुल्ला मौलवींच्या डोळ्यात हा उपक्रम अनेक वर्षे खुपत होताच. अल्लाहच्या मर्जीविना भलतेच तत्वज्ञान येथे शिकवले जात आहे व काफिर संस्कृतीचा प्रसार केला जात आहे ही भावना त्या मौलवींनी ह्या युवकांच्या मनात भरवली.

आता तिसराच प्रश्न निर्माण झाला. वाद झाले. भांडणे झाली. पण अख्तरमियाँ स्ट्रेट फॉरावर्ड माणूस! त्यांनी सांगितले की मी हा उपक्रम चालू ठेवणारच! काय करायचे ते करा! मग युवकांनी पैसे मागीतले केलेल्या कामाचे! अख्तरमियाँनि चक्क जमतील तेवढे दिलेही!

पण आता तिथून डच्चूच मिळालेल्या या युवकांना रोजगार मिळेना! मोकाट फिरणार्‍या या युवकांच्या डोक्यात हा उपक्रम व्यवस्थित चाललेला असल्याचे पाहून खुळ भरले.

आपल्या समाजात त्यांनी प्रसार करायला सुरुवात केली की अख्तरमियाँ काही भलतेच करत आहेत आणि लहान मुलांना आत्तापासूनच खुल्या जगाची, हिंदू संस्कृतीची ओढ वाटू लागली आहे.

परिणामतः उपक्रम बंद पाडण्याचा दबाव टाकण्यात आला. अनेक मुस्लिम त्यात सहभागी झाले. मग मियाँनी चक्क शासनाकडून एक परवानगी मिळवली. शासनाने परवानगी दिली, पण संरक्षण कोण देणार?

मग त्या उपक्रमात सहभागी झालेल्यांना त्रास देणे सुरू झाले. तोही प्रकार मियाँनी कसाबसा मोड्न काढला. त्याच दरम्यान त्यांचा परिचय सबइन्स्पेक्टर आपटे यांच्याशी झाला.

हा उपक्रम चालू ठेवणे म्हणजे अल्लाहचा अपमान आहे अशी भावना मनात धरलेल्यांनी मग सूडबुद्धीने एक प्लॅन केला. अख्तरमियाँशी गोड गोड बोलून उपक्रमाला साथ द्यायला सुरुवात केली.

'अंजुमन-ए-इस्लाम' हे त्याच प्लॅनचे एक 'बाळ' होते. अख्तरमियाँसाठी तर ही बाब 'जन्नत'हून कमी नव्हती. आपला समाजच आपल्या पाठीशी असल्यावर कोणाला भ्यायचे कारण उरले? मुळातच अल्पसंख्यांक असल्याने राजकीय नेत्यांचा एक 'वेगळा' सपोर्ट मिळणारच, त्यातच आपले सर्व लोक एक झाले हे पाहून मियाँ खुष झाले.

ह्याच दरम्यान उमेश आणि राहुल त्यांना जॉईन झाले आणि राहुलने पहिल्याच दिवशी नोकरी सोडलीही! मियाँनी मात्र कौतुकाने आपल्या समाजात सांगितले की दोन हिंदू युवकांनीही दखल घेऊन या उपक्रमाला सहाय्य करायचे ठरवले आहे बघा!

मात्र हे लोक गावोगावी जाऊन तिसराच प्रकार करत होते. पुण्याच्या आसपास दोनशे किलोमीटर परिसरात त्यांनी अत्यंत गुप्तपणे बातमी पसरवली होती की येत्या काही दिवसात होणार्‍या 'अंजुमन-ए-इस्लाम' च्या मोठ्या सभेत अत्यंत प्रक्षोभक भाषणे केली जाणार असून अल्पसंख्यांक असल्याच्या जोरावर ती चालूच राहणार आहेत. त्यात खुद्द जुनैद अख्तरसाब भाषण देणार आहेत. आणि त्यांचा हा उपक्रम ही 'काफिर' हिंदू समाजाची दिशाभूल असून त्यांचा खरा हेतू अत्यंत वेगळा व अल्लाच्याच हेतूचा आहे.

ह्या समाजाचे एक मात्र असते. सगळे एकत्र मात्र पटकन येतात अल्लाच्या नावाखाली! कारण येथे ते अल्पसंख्यांक असतात.

खरच सगळे एक झाले. गुप्तपणे का होईना, जुनैद अख्तरमियाँ हे नांव हिरो ठरले. गावोगावी लोकांनी पैसे एकत्र केले, काही गावठी शस्त्रेही जमवून ठेवली. एक दोनच दिवसात पुण्यात एक प्रक्षोभक भाषण आणि त्यानंतर एक मोठी दंगल होईल त्याचवेळेस आपापल्या गावीही आपण तेच करायचे हे चक्क ठरलेही!

मियाँच्या त्या मूर्ख सहकार्‍यांनी एक काळजी मात्र घेतली नाही. पुण्यातील दंगलीसाठी जे सहाय्य त्यांनी घेतलेले होते ते चक्क त्यांनी लिहून ठेवले होते.

आणि...............

.... आणि संध्याकाळी पाच साडेपाचला लोणावळ्यापाशी कुठेतरी बातमी फुटली...

तपासाची चक्रे भयानक वेगाने हालू लागली. सूत्र कुठून आणि कशी चालवली जात आहेत हे केवळ तीन तासात समजले.

आठ साडे आठला मियाँना पर्वतीपासच्या त्यांच्या त्या ऑफीसमध्ये अटकही झाली. मात तोवर उमेश आणि त्याच्या घरचे सगळेच अनभिज्ञ होते. पण दहा, सव्वा दहाच्या पुढे कधीतरी सगळीच कागदपत्रे प्राप्त झाली त्यात या मूर्ख लोकांनी केलेल्या नोंदी आढळल्या.

'उमेश राईलकर' हे नांव, एका म्हणजे एक्काही ठिकाणी अजिबात लिहिलेले नव्हते.

केस आपटेंच्या अखत्यारीतील नव्हती तरी त्यांनी धावाधाव केलीच, पण त्यावेळेस नेमके ते परगावी होते. तिथून पुण्याच्या वरिष्ठांना फोनाफोनी करून त्यांनी याकेसमधील काही सहभाग स्वतःच्या पदरात पाडून घेतला आणि हेरंब काकडेला रास्ते वाड्यात जायला सांगितले. वाड्यात हे महाभारत झाले तेव्हा स्वतः आपटेंनी त्याची संपूर्ण कल्पना होती हे नवलच! म्हणूनच हेरंबने निवेदिताची काहीही तक्रार लिहून घेतली नाही. मात्र त्यातच हेरंबला हेहि समजले की ती आज दुपारीच उमेशबरोबर फिरत होती. नंतर त्याला तिचीही तक्रार लिहून घेऊन आपटे साहेबांवर एक अंकुश निर्माण करावासा वाटला, पण त्याने तो मोह टाळला. काही झाले तरी ते वरिष्ठ होते.

पेपरात काय छापून द्यायचे याची संपूर्ण काळजी आपटेंच्या सहकार्‍यांनी आपटेंच्याच म्हणण्यानुसार घेतली.

आणि केवळ महिन्याच्या आत ......

.... आपटेंना आणि अनेक वरिष्ठ व कनिष्ठ अधिकार्‍यांना, तसेच एका न्यायाधीशांनाही.... त्या जमान्यातले रोख दोन लाख देऊन जुनैद अख्तरमियॉं कायद्याच्या कचाट्यातून कोणताही गवगवा न होता सुटले .... आणि... ज्या लोकांनी हे वाईट कृत्य करायचे ठरवले होते... त्यांना पकडल्याची शेखी मिरवत डिपार्टमेंट खुष राहिले.

आता किमान तीन वर्षे तरी मियाँ काहीही करू शकणार नव्हते. य धरतीशीच, या मायभूमीशीच बेईमान असल्याच्या आरोपातून माणूस इतका सहिसलामत सुटण्यामागे जणू मियाँची आजवरची पुण्याईच होती.

अनेक छोत्या छोट्या मुलांच्या स्मितहास्याची, अनेक पालकांच्या आणि मागास राहिलेल्या मुस्लिम स्त्रियांच्या दुवा मियाँच्यामागे होत्या. प्रकरण पेटवणे आणि विझवणे ही दोन्ही कामे डिपार्टमेंटने अत्यंत चलाखपणे केलेली होती. नेहमीचेच सूत्र त्यांनी वापरलेले होते, 'जग फार लवकर विसरून जाते'!

'उमेश राईलकर' हे नांव या सगळ्यात गोवणे हा आपटेंचा केवळ एक हेतूच नव्हता, तर ते त्यांना अक्षरशः तिशय सहजपणे जमलेले होते. आणि त्याहीपेक्षा सहजपणे एक आरोपीच, म्हणजे उमेश स्वतःच चौकीवरून पळून गेल्याचे कळताच त्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली होती.

उमेशला चढलेली असूनही तो दहादहा वेळा मियाँनी सांगितलेल्या कहाणीवर विचार करत होता. ग्लासकडे बघत! अगदी पहिल्यांदा त्याने तीन ते चार वेळा मियाँना 'तुम्ही चक्क खोटे बोलत आहात' असे सांगितले. मियाँनी अनेक उल्लेख आणि संदर्भ देत, ऑफीसमध्ये येत असलेल्या काहींपकी एक दोघांच्या वागण्याच्या, विशेषतःउमेश या हिंदू मुलाशी वागण्याच्या आठवणी देत त्याला काहीसा तरी विश्वास ठेवायला लावला. तरीही मान्य न करणार्‍या उमेशला त्यांनी शेवटी सरळ प्रश्न विचारला.

"भाई मै जेलमे ना होकर यहां आजाद घूमरहा हूं... ये हो कैसे सकताहै??? जरा तो सोचो, मै कैदमे क्यूं नही हूं? एक तो मैने सोच ना सकोगे इतनी रकम दी होगी पुलीस को, जो मेरे पास हैही नही ! मैने रकम तो दी, लेकिन ऐसे गुनाहमे नाम आयेगा तो क्या रकम देकरही छोडदेंगे?? मैने तो गुनाह कियाही नही मियाँ.. तभी तो आजाद करदिया.. और आज भी... वो सय्यद याद है ना सय्यद?? वो आज भी अंदर है?? मै बाहर हूं! मै कोई अल्लाह या भगवान तो नही के मुझे छोडदेंगे. इतना पैसाभी नही मेरे पास के ऐसे इल्जाम होनेके बावजूद बाहर आ सकुंगा?? मै आज भी खुलेआम रास्तेपर हुम सकता हूं, यहां पी सकता हूं! हां ये बात और है के यहाँ मै कुच सुकूनसे रह पा रहा हूं! इसलिये यहां छुपाछुपासा रहता हूं! लेकिन अगर कहोगे तो अभी पुलिस थानेके सामनेसे गुजरके दिखासकता हूं! और एक चीज सुनाओ मियाँ.. मुझे गुस्सा उस आदमीपर आता है जो काम नही करना चाहता.. जिस दिन तुमने छुट्टी मांगी, तुम्हे मेरे यहां काम शुरू करके तीन दिन भी नही हुवे होंगे... और तुम छुट्टी मांग रहे थे... इसलिये मुझे गुस्सा तो जरूर आया थ मगर वो तुम्हारी मुहोब्बत का मामला था तो मै चूप रह गया था... वर्ना उन चार पाच दिनोमें क्या तुम्हे एक बार भी महसूस हुवा के मै गलत आदमी हूं?? शराब तो तुम लोग इसी उमरमे पीने लग गये हो.. मै तो आमीर हूं... बुढा हूं.. मै पिऊ तो क्या गलत?? तुम पिओ तो गलत है! तो शराब ये तो कोई गलती नही कह सकते हो?? क्यूं?? तो गलत क्या था मुझमे?? मेरे पास जो भी लिटरेचर था तुम देखरहे थे.. कही भी ऐसा महसूस हुवा के मै हिंदूओंके खिलाफ कुछ कर रहा हूं??"

"... ... स... सर.. ये.. ये सबसे मुझे अब कोई लेनादेना नही है... "

"हां हां.. मै कहा कहरहा हूं के तुम मुझसे मिलो... गिर तो तुम रहे थे जो मैने संभाला... वर्ना मै तो मिलने आयाही नही था... ना मैने ये बताया था के मै औरंगाबादमे दीपा बारके उपर रहरहा हूं... कभी फुरसत मिले तो आजाना ऐसे?? कहां था?? अब मिले है तो खुषी तो दिलको होतीही है ना?? किस दौरसे गुजरे हम दोनो.. खैर मै तो बुढा हो रहा हुं.. मेरे सामने ना कोई मंजिल है ना कोई रास्ता बचा है एक बची हुईजिंदगी काटते रहनेके अलावा.. और ऐसेमे यकायक तुम सामने आओगे तो जी भर नाही जायेगा खुषीसे??? "

"वो.. तो ठीक है.. पण.. म... मी जाऊ... का.. जातो मी... "

उमेश उभा राहू लागला. काही का असेना, त्याला आता या माणसाशी काहीही देणेघेणे राहिलेले नव्हते.

उमेशला नीट उभे राहता येत नव्हते... ते पाहून मियाँ मिश्क्लपणे हासत म्हणाले...

"कहो तो... पहुंचा दू घरपर??"

"तुम्ही शहाणपणा करू नका हो... "

फारच उद्धट विधान होतं! पण जे सोसलं होतं एवढ्याश्या वयात उमेशने, त्या तुलनेत कमीच होतं! पण एक मात्र होतं, जे काही सोसलं होतं ते जुनैद अख्तरमियाँमुळेच सोसलं होतं की नाही हा आता खरोखर प्रश्नच बनलेला होता..

उमेशचे ते उद्धट विधान ऐकून काहीसे संतापलेले मियाँ उठून उभ राहिले. बिल पे करून ते उमेशकडे पाहात राहिले. उमेशच्या हेही लक्षात राहिले नव्हते की आपण पुन्हा बसलो होतो त्याचे बिल निदान आपण विचारायला तरी हवे होते. त्याला उभेही राहता येत नसल्यामुळे तो धरून धरून चालत होता. मियाँच्या वरच्या खोलीत जायला मागूनच जिना असल्याने त्यांना रस्त्यावर यायची गरजच नव्हती. दीपा बारमध्ये तशीही आत्ता ही दोनच गिर्‍हाईके होती कारण मियाँचा वट असल्याने अकरा वाजता त्यांना बाहेर जायला सांगितले जाणे अशक्य होते.

मात्र.... उमेशला रस्त्यावर जायचे होते, रस्ता क्रॉस करायचा होता आणि समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन आडवे व्हायचे होते.

पण ते सगळे तर जाऊचदेत, त्याला बारच्या आतून बंद असलेल्या दारापर्यंतही पोचता आले नाही. तो तिथेच खाली बसला जमीनीवर! मियाँ त्याच्यावर रागावले हे बारचालकांना कळलेले असल्याने त्यांनी आता सरळ त्याच्यावर खेकसायला सुरुवात केली.

"ए ... चल्ल... पीता है किसलिये इतना??? उमर क्या है तेरी??? आ??? चल चल... चल बाहर... "

"ठहरो... मै छोडके आता हूं उसको.. "

मियाँच्या म्हातार्‍या शरीरातही बरीच ताकद असावी.

त्याला धरून जाताना ते पुटपुटतच होते. 'ये मैकदा है, यहाँका निज़ाम उलटा है, जो लडखडा न सका पीके... हो गया है गुलाम, शराब जिसने बनायी उसे हमारा सलाम.... खुदा का शुक्र है वरना....'

त्यांच्याच मदतीने रस्ताही क्रॉस करून उमेश हॉटेलच्या रूमपर्यंत पोचलाही! आता मात्र थॅन्क्स वगैरे म्हणाला.. मियाँ काहीसे शांत झाले... आणि.. ते परत जायला निघाले..

"स... सॉ.. री सर"

अचानक त्यांना ऐकू आलेल्या या शब्दांनी नेहमीच्याच सस्मित मुद्रेने ते मागे वळले. म्हणाले..

"इश्क करते हो... इश्कके वास्ते यहाँतक पहुचते भी हो.. तो.. इतनी पीते क्यूं हो इस उमरमे????"

"...... "

"अं ????"

"प... पता नै.. पी गया... "

खदखदून हासत मियाँ म्हणाले...

"वैसे... दास्तान-ए-मुहोब्बत कहां तक पहुची है???"

"क.. काय???"

"कहां तक पहुची है मियाँ दास्तान??"

"तेही... नाही माहिती... "

आधीपेक्षाही जोरात हसत मियाँ उद्गारले..

"जुनूं... जुनूं... वैसे.. इकरार तो होही गया था.. अब क्या हो रहा है???"

"अं?? .. त्यांची बदली झाली ना इथे... "

"वो तो तुम बताहीचुके हो कुछ देर पहले.. पर अब हो क्या रहा है... ???"

गहिवरल्या स्वरात उमेशने उत्तर दिले.

"उसके घरवाले मानते नही.. "

पुन्हा हासत मियाँ म्हणाले..

"ये मुहोब्बत है, जरा सोच समझकर रोना
एक आसूं भी जो टूटा, तो सुनाई देगा"

शेराचा अर्थ समजल्यामुळे त्या अद्भुत आणि पाठमोरा होऊन चालणार्‍या माणसाकडे पाहात पाहात उमेश रूमच्या आत शिरला.....

...... तेव्हा.... प्रेमाची सगळी बाजीच पॉझिटिव्हली पालटल्यासारखे वाटले कारण...

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.... आप्पा, विन्या आणि राहुल्या... तिघेही रूममध्ये बसलेले होते...

=========================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

अरे वाह ये हुई ना बात............
पण हा भाग थोडा लहान वाटला.
पुढे ह्या प्रेम कहाणीच काय हे जाणण्यास अती उत्सुक्त.....................?
पु.ले.शु.

.... आप्पा, विन्या आणि राहुल्या... तिघेही रूममध्ये बसलेले होते...>> जुनैद ने सांगीतलेल्या त्याच्या कहाणी पेक्षा हा ट्विस्ट "ट्विस्ट" वाटला...

असली मैञी विकत मिळते का हो बेफीकिरजी..............................?

"ये मुहोब्बत है, जरा सोच समझकर रोना
एक आसूं भी जो टूटा, तो सुनाई देगा"

जबरदस्त...............

बेफिकिरजी तुमच सगळ लेखन वाचलं
फार छान लिहीता तुम्ही
तुमच्या सगळ्या कांदबऱ्‍या वाचल्या. अतिशय सुंदर.
तुमच्या लिखाणाची मी फँन झालेय.
या कादंबरीचा हाही भाग मस्त.
नितु आणि उमेश यांना प्लीज एकत्र आणा.

बेफिकिरजी तुमच सगळ लेखन वाचलं
फार छान लिहीता तुम्ही
तुमच्या सगळ्या कांदबऱ्‍या वाचल्या. अतिशय सुंदर.
तुमच्या लिखाणाची मी फँन झालेय. >> मीही...
या कादंबरीचा हाही भाग मस्त.
नितु आणि उमेश यांना प्लीज एकत्र आणा.
>>>१००% अनुमोदन...

बेफिकिरजी..

तुमच्या कल्पना शक्तिला सलाम... तुमच्या लिखाणाचा मी फँन झालओय...... नित् आन्हि उमेश ला कधि भेत्व्नार .... हहि भाग एकदम भन्नात....