तुम्हे याद हो के न याद हो - २३

Submitted by बेफ़िकीर on 28 September, 2011 - 10:43

नालायक! .... हलकट आहे! प्रेमच नाही, सगळं खोटं निघालं! मीच मूर्ख! आणि बावळट आहे मी! कुणावर जीव उधळावा हेही कळत नाही. मूर्ख विसरून गेला का काय! का थांबून वैतागून गेला? आठ वाजता बस संगम ब्रीजपाशी येणार असे सांगितले होते ना? मग अगदी सव्वा आठपर्यंतही थांबता येत नाही?

सगळं संपलेलं आहे. काहीही अर्थ उरलेला नाही. आता केवळ मन मारून जगत राहायचं! आईबाबा म्हणतील तसंच केलेलं बरं! नाहीतरी ह्याला काही किंमत नाहीच आहे आपली! काल पन्नासवेळा घोकून घेतलं की उद्या तिथे उभा राहा. पण मला तरी काय अगदी इतकं वाटतंय? तिथे क्षणभर उभा राहून तो तरी काय मिळवणार होता आणि मी तरी काय! प्रवास! आता याक्षणापासून मरेपर्यंतचे आयुष्य म्हणजे फक्त प्रवास! कुणाचेतरी व्हायचे, कुणाचेतरी झाल्यासारखे वागत राहायचे, चेहर्‍यावर हास्य ठेवायचं, संसारात रमायचं आणि मरून जायचं एक दिवस! एकच प्रेम करतात सगळे! मीही एकच केलं होतं! असे काय रे देवा सगळे उधळून लावलेस??

पुणं हळूहळू मागे मागे चाललंय! बस पुढे पुढे! एक यंत्र! बस म्हणजे एक यंत्र आणि मी म्हणजेही एक यंत्रच! एक यंत्र दुसर्‍याला नेईल तिथे दुसर्‍या यंत्राने जायचे इतकेच! बंडगार्डनही मागे पडले. एखादवेळेस या चौकात उभा असेल का? सरप्राईझ म्हणून?? त्याला नेहमीच आपली थट्टा करायला आवडायची. आजही करेल का थट्टा?

???? अंहं! इथेही नव्हता! आलाच नाही तो! संबंधच संपला आता! आता मनात त्याचा विचारही येऊ द्यायचा नाही. आठवण काढायचीच नाही. वेगळ्या आयुष्यात रमायचं आता, आता पुण्यात यायचंच नाही, आता औरंगाबादच कायम!

===========================

नगरला थांबलीय बस! केव्हाची! पण खाली उतरता येत नाही आहे! चुकून मी उतरलो अन तिची बस मागून आली आणि तिने बघितले तर? तिच्या आईने बघितले तर गेली उडत! पण नितुने बघता कामा नये इतक्यातच! आजोबा काय म्हणाले होते? 'जरा तडफडूदेत तिला'! खरच आहे! मुली अगदी कोरड्या ठण्ण मनाने निरोप बिरोप घेतात. सोसायचे काय फक्त आम्हीच होय? ह्यांना होऊदेत की जरा त्रास! बसली असेल मी संगम ब्रीजवर दिसलो नाही म्हणून रडत! रड म्हणाव रड! पण आपल्यालाही वाईट वाटतं ती रडली की! निघाली बाबा एकदाची गाडी! नितुची बस पोचली असेल रांजणगावपर्यंत!

आप्पा, विन्या आणि राहुल्याला तर माहीतही नाही आहे की इतके प्रकार झाले आहेत. समजल्यावर काय करतील ते? मैत्री सोडली आहे सगळ्यांनी आपल्याशी! कारण आपले नितुवर प्रेम आहे, याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले आहेत. पण मग आपलं प्रेम वाईट की मित्र वाईट?

एकदा तो नालायक जुनैद अख्तर भेटला पाहिजे, अक्षरशः भोसकावेसे वाटते त्याला! कुठल्याकुठे गेले आपले आयुष्य त्याच्यामुळे! पणदर्‍याला स्टॅन्डवर काय राहिलो आपण! पैसे काय चोरले! काहीही करावे लागले. पळूनही गेलो चौकीतून! आपण सुटलो कसे हेच समजत नाही.

तारकपूर!

लागली एकदाची बस औरगाबादच्या रस्त्याला! किती वाजलेत? साडे नऊ! म्हणजे नितुची बस नगरला साडे दहा पर्यंत पोचणार बहुधा! म्हणजे एक वाजेस्तोवर औरंगाबादला पोचेल ती! आणि आपण बारालाच पोचू! मस्त स्टॅन्डवर जेवू, चहा वगैरे घेऊ आणि थां..... अरे??? असे कसे स्टॅन्डवर थांबता येईल आपल्याला? तो घार्‍या डोळ्यांचा गुरखा असेल ना उभा तिथे बायकोला घ्यायला आलेला! लपून बसावे लागेल बहुधा!

आजोबांनी स्फुर्ती दिली म्हणून, नाहीतर आपल्यात काही इतकी हिम्मत नव्हती!

===============================

त्या पुढे बसलेल्या मुलाचे केस अगदी उमेशसारखे आहेत... आणि त्या पलीकडच्या माणसाने घातलेला पिवळा शर्ट आहे तसाच उमेशचाही एक आहे... किती गोड दिसतो त्यात तो... पण... कोण उमेश??? आता स्वतला असेच विचारत राहायचे... कोण उमेश राईलकर?? मी तरी ओळखत नाही! हे हुंदके किती लपवायचे? सतरा वेळा आईने विचारले रडतीयस का म्हणून! आणि सतराशे वेळा आपण नाही म्हणालो... पण हे असे खोटे किती वेळ बोलता येईल?? कसे असेल ते औरंगाबाद? आता दिसेलच म्हणा... फार तर अजून अर्धा तास... बाबा स्टॅन्डवर आलेलेच असतील.. संपला एक कालखंड... प्रेमाचा गुलाबी कालखंड.... आयुष्यातील सर्वात सुखद कालखंड संपला... पुणं राहिलं कुठल्याकुठे... आपण आलो इथे... आता आयुष्यात मजा कधीच येणार नाही.... पण.. जे काय येईल त्यालाच ... आनंद म्हणावे लागेल... त्यालाच सुख मानावे लागेल ... त्यात मन रमवा..... वे... अरे??? ओह... औरंगाबाद आलं??? छानच आहे की तसं... झालं... निवेदिता आपटे... आता पुणं विसरायचं... आता नवीन आयुष्य.. नवीन मित्रमैत्रिणी... नवीन शहर... नवीन कॉलेज... नवीन घर.... आणि... आता त्या जुन्या जखमांना विसरून जायचं... कधीही खपली निघू द्यायची नाही...

===================================

तिचा बाप आलाय साला केव्हाचाच... बरं झालं आपण बूकस्टॉलच्या मागेच उभे होतो ते... केव्हाही इथे येईल लेकाचा.. बाहेरच जाऊन उभं राहिलो तर??? नाहीतरी रिक्षेनेच जाणार असतील की जिथे जायचं तिथे ?? की या टवळ्याने पोलिसांची जीप वगैरे आणलीय? आजोबांनी हा अंबादास शिर्के कोण मित्र काढला?? कधी ऐकलाच नव्हता.. त्यांच्याकडे जायचं , जरा फ्रेश व्हायचं आणि निघायचं.. नितुच्या घरासमोर उभे राहायला.... च्यायला इकडेच येतोय सारखा... चला.. बाहेरच जाऊन उभं राहूयात.. पाच दहा मिनिटांत येईलच बस! नाहीतर असे व्हायचे की आपण बाहेर जायला निघालो आणि नेमकी समोर बस आली.. आणि तिने इथेच पाहिले... म्हणजे सगळाच घोळ!

==================================

"काय कमालीचे ऊन आहे हो इथे?"

रिक्षेत बसतानाच नितुची आई नितुच्या बाबांना म्हणाली आणि बाबांनी हसून मान डोलावली. निवेदिताशी इतक्यातच बोलायला लागणे काहीसे चूक ठरू शकेल हे त्यांनाही समजत होते. तिला जरा वेळ द्यायलाच हवा होता... वयाने लहान आहे... नुकताच एक आघात झालेला आहे मनावर... तिची चूक असली तरीही ती आपलीच मुलगी आहे.. लहान आहे... तिला जरा सांभाळून घ्यायलाच हवे.. या अशा प्रेमांना पुढच्या आयुष्यात काहीही अर्थ नसतो हे तिला अजून कळायला वेळ आहे... तोवर तिला जपायला हवे..

"किती लांब आहे घर??"

आईच्या दुसर्‍या प्रश्नावर बाबा म्हणाले.... "पाच मिनिटांवर.. "

रिक्षेवाला सराईतपणे चाललेला होता... रिक्षेत साहेब बसले आहेत याचे भान ठेवून!

एका कडेला नितु बसलेली होती... औरंगाबादच्या उन्हाळी रस्त्यांवरचा रूक्षपणा तिच्या मनात उतरू शकत नव्हता कारण तिच्या मनातील रुक्षपणा त्याहीपेक्षा अधिक होता.. तोच उलट रस्त्यावर उतरत होता... डांबरी रस्त्यांवरून उन्हाच्या झळा रिफ्लेक्ट होऊन डोळ्यांना होरपळून काढत होत्या.. रिक्षा चाललेली असल्याने काही झुळुका येत होत्या इतकेच! औरंगाबाद! एक चांगले शहर! मात्र स्वतःचे शहर सोडून येथे कायमचे यावे लागले ही बोच होतीच तिच्या मनात!

=================================

हे घर???????????

हे आपले घर??

कल्पनाही केली नव्हती अशी! कुठे पुण्यातल्या त्या दोन खोल्या आणि कुठे हे दोन मजले! अप्रतीम घर आहे. कोझी, टुमदार! इतकं मोठं घर कसं मिळालं बाबांना?? जागेचे भाव कमी आहेत म्हणून की काय? अंगण, फुले, खाली हॉल, स्वयंपाकघर, दोन बेडरूम्स, दोन बाथरूम्स... जिना... जिन्यामागे देवघर... जिन्यावर गेलं की... गेस्ट रूम, त्यात स्टडीची सर्व सुविधा.. हे घर कसं मिळालं असेल बाबांना??... किती असेल भाडं??... वर पुन्हा गच्ची... हे घर आपल्याला आइ उमेशला मिळून मिळालं असतं तर?... कित्ती सुंदर वाटलं असतं.. स्वप्न खोटं ठरलं... ही वरची रूम मला देणारेत... एक प्रकारे बरंच झालं म्हणा... खाली ह्यांच्यात येऊन करायचंय काय?? खोटा खोटा धीर देणार आणि आपले निरिक्षण करत बसणार... ही कशी वागतीय... हिच्यात काही सुधारणा झाली की नाही?... ही त्याला आता विसरल्यासारखी वाटते की नाही???... वरंच बसून राहूयात... आपला आपला अभ्यास करायचा नाहीतर काहीतरी वाचत बसायचं... गच्चीत कुंड्या ठेवून कसलीत्री रोपं लावू आणि वेळ घालवत जाऊ... आजूबाजूला तर फारसं कुणी समवयीन असेल असं वाटत नाही.. शेजारी एक हॉस्पीटल आणि या गल्लीत सगळे मोहमेडियन्स... संवेदनशील भागातच ट्रान्स्फर झालीय म्हणा बाबांची... चांगली आहे खोली.. असेल दहा बाय बाराची... एकटीला काय करायचीय मोठी?? इथे आपलं सगळं अभ्यासाचं राहील... इथे इतर पुस्तकं वगैरे... या कपाटात कपडे वगैरे.. आरसा एवढासाच आहे... बाथरूम खालीच आहे.. पण या खोल्ला एक लहानशी गॅलरीही आहे की?? हं.. इथून ही गल्लीच दिस्ते नुसती.. कसे असतात हे लोक... मिशी ठेवत नाहीत आणि दाढी मात्र असते.. दिसायलाच वेगळे दिसतात आपल्या लोकांपेक्षा... गॅलरी त्या गल्लीत उघडण्यापेक्षा ह्या खिडकीसारखी रस्त्याकडे उघडली असती तर?? ह्या खिडकीतून र............स्ता... क....कि... ती..

====================================

खाड!

निवेदिताने खाडकन खिडकी बंद केली आणि अक्षरशः गळून गेल्यासारखी पलंगावर कोसळली. जे दिसले होते ते अविश्वसनीय होते... भोवळ आणणारे दृष्य!

उमेश?????

उमेश इथे कसा आला?? की भास झाला? सरळ रस्त्यावर झाडाला टेकून उभा राहून आपल्या खिडकीकडे पाहून हासतोय???

खिडकी किलकिली करून तिने पुन्हा खाली पाहिले.

....... हो...

खरच उमेश आला होता... खरच उभा होता तिथे...

आपण तर पत्ता सांगितलेला नव्हता... मग हा आला कसा?? कधी आला?? आपल्याला येऊन तर अर्धा तासही झालेला नाही... हा कधी आला?? आणि आ... आता काय होईल?? बाबांना तो दिसला तर??? आणि मुख्य म्हणजे... एकदा त्याला घर कळाल्यावर तो कधीही पुण्याहून इथे येऊ शकेल....

म्हणजे.. परत तीच वादळे... परत तेच गहन प्रश्न... परत तीच भांडणे... अशांतता...

का असं करतो हा??? एका शब्दानेही म्हणाला नाही की मी उद्या तिकडेच येणार आहे... जणू काही मूळचा औरंगाबादचाच असल्याप्रमाणे खाली उभा राहिलाय..

आणि आता काय होईल?

तेच सगळे! तो इतक्यातच बाबांना दिसेल, मग ते त्याला पकडतील. हे तर पुणंही नाही, त्याच्या घरचे धावून यायला! मग बाबा कसला तरी आरोप लावतील. मुलीला छेडले नाहीतर फूस दाखवली वगैरे! मग अटक, कोठडी, खटला, आधीच्या प्रकरणाच्या संदर्भात तपास, पुन्हा बदनामी... त्याची, त्याच्या घरच्यांची, आपल्या घरच्यांची... आणि... आपली!

हे सगळे काय चालले आहे? तो असा कसा काय आलेला आहे? इतके होऊन त्याला भीती कशी काय नाही?

तो आईबाबांना दिसला तर म्हणतील की आपणच पत्ता सांगून ठेवला होता असे! म्हणजे आपलीही धडगत नाही.

ही कोणती पातळी आहे प्रेमाची?

जेथे भीतीलाही स्थान नाही.

आपण तरी खाली जाऊन आईबाबांना सांगायलाच पाहिजे की आपण काहीही सांगितले नसतानाही तो अचानक आपल्या मागोमाग येथे येऊन पोचला आहे आणि समोर उभा आहे, पण तरीही त्याला काही करू नका.

पण आपलं हे म्हणणं त्यांना मान्य होईल का?

पण दुसरा पर्याय काय आहे? आपण सरळ सरळ खोटे ठरण्याऐवजी निदान खरे ठरणे तरी चांगले! पुढचे पुढे बघता येईल. हा स्वार्थी विचार आहे का? नाही, हा आपल्या आणि उमेशच्या दोघांच्या भल्याचा विचार आहे.

ताबडतोब खाली जाऊन आईला सांगाय.....

====================================

"नितुSSSSSSSSSSSS... ताबडतोब खाली ये"

आईचा कानठळ्या फोडणारा आवाज घरात घुमला तशी निवेदिता जिन्यावरून आणि बाबा आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत धावत आले.

"काय झालं?????"

धसका घेऊन बाबांनी विचारले. पण आई तीक्ष्ण नजरेने नितुकडे पाहात होती.

"तो इथे कसा आला????"

या प्रश्नावर कसे सांगायचे की मी त्यालाच पाहून तुला सांगायला खाली उतरत होते? कारण रागाचा पारा इतका चढलेला होता की आता वेगळाच स्टॅन्ड घ्यावासा वाटू लागला होता.

"तो इथे आलाय??????"

नितुने दचकल्यासारखा आविर्भाव करेपर्यंत आपटे दारात धावलेलेही होते. काही सेकंद झपाटल्यासारखे ते घराभोवती आणि रस्त्याच्या काही भागावर फिरून पुन्हा घरात आले.

"कुठे दिसला तुला??? मला तर नाही दिसला??"

"चक्क रस्त्यावर उभा राहून घराकडे बघत होता... "

आपटे पुन्हा सुसाट बाहेर गेले. याही दोघी घराच्या फाटकाबाहेर उभ्या राहून दक्षपणे सर्वत्र बघत राहिल्या. आपटे स्कूटर काढून सरळ चौकीवर गेले. निवेदिताच्या छातीत आता धडधडूच लागलेले होते. भयानक काहीही होऊ नये इतकीच प्रार्थना ती करत होती. उमेश दिसला याचा आनंद इतका होता की शब्दात सांगता येत नव्हता. आणि त्याचवेळेस तो दिसल्याने जी भीती वाटत होती ती आनंद नष्ट करणारी होती. हतबुद्ध होऊन दोघी घरी आल्याआल्या आईने नितुच्या अक्षरशः थोबाडात दिली. रडणार्‍या नितुची अजिबात कीव येत नव्हती तिच्या आईला! आणि मग आईने सुरू केला प्रश्नांचा सपाटा! इतका तीव्र सपाटा होता की नितुला खरे बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. तिने सरळ सांगून टाकले की कालच ती त्याला शेवटचे भेटली आणि यानंतर पुन्हा कधीही भेटायचे नाही हे दोघांचेही ठरले. मी त्याला घराचा पत्ता अजिबात म्हणजे अजिबात दिलेला नाही. तो बहुधा आपल्या बसच्या मागच्या बसमधून किंवा आधीच्या बसमधून येऊन आपला पाठलाग करून येथे पोचलेला असावा. बाबांना सांग की त्याला काहीही करू नका. तो आपोआप निघून जाईल आणि पुन्हा कधीही येणार नाही. मी त्याच्याकडे ढुंकून बघत नाही आहे हे लक्षात आले की आपोआप जाईल तो!

पण आईचे समाधान होत नव्हते. प्रचंड त्रागा व्यक्त करत होती ती! नितुचे अक्षरशः वाभाडे काढत होती. त्यांचा नितुवर तीळमात्र विश्वास राहिलेला नव्हता कारण भूतकाळात प्रकारच तसे झालेले होते.

मात्र....... त्याच वेळेस.... चौकीवर पोचून हवालदारांचे सरप्राईझ्ड चेहर्‍याने केलेले सॅल्यूट स्वीकारणार्‍या आपटेंना त्यांच्याच एका सहकार्‍याने निरोप दिला...

"साहेब फोन आला होता तुम्हाला....."

मुळातच भडकलेले आपटे औरंगाबादच्या तमाम ठाण्यांना मुलाचे वर्णन कळवून अटक करायची रिक्वेस्ट करणार होते. त्यातच हा सहकारी घाईघाईत निरोप सांगत आहे हे पाहून भयंकर वैतागून त्यांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.

"माजी आमदार अंबादास शिर्क्यांचा... "

अंबादास शिर्के या बड्या धेंडाचा आपल्याला का फोन यावा हे आपटेंना समजेना...

"का???? .... काय म्हणाले ते???"

"त्यांनी सांगितलेला निरोप मला अजिबात समजला नाही सर... "

"म्हणजे?? म्हणाले काय ते???"

"ते म्हणाले.. कायदा प्रेमापेक्षा मोठा नाही... आणि म्हणे मी कायम प्रेमाच्या बाजूने असतो... "

हातात उचललेला रिसीव्हर हातातून गळून पडला आपटेंच्या.. अतिशय हताश आणि भयचकीत नजरेने ते सहकार्‍याकडे पाहात होते...

.... कोणत्याही ठाण्याला फोन करण्यात काहीही अर्थ उरलेला नाही.... हे त्यांना केवळ क्षणार्धात समजलेले होते. ..

स्वतःच्या राहत्या शहरात, पुण्यात, आपटेंकडून हार पत्करणार्‍या उमेश राईलकरने...... खुद्द औरंगाबादेत त्यांच्या नाकावर टिच्चून पहिला विजय मिळवलेला होता...

==========================

आपले आजोबा इतके महान असतील याची काडीचीही कल्पना नव्हती उमेशला! अंबादास शिर्क्यांच्या प्रासादतूल्य बंगल्यात त्याच्यावर प्रेमाच वर्षावच झाला होता असे नाही, तर उमेशच्याच विनंतीनुसार बंगल्याऐवजी त्याला एस टी स्टॅन्डजवळच्या सन्मान हॉटेलमध्ये एक रूमही घेऊन देण्यात आलेली होती.

आज दुपारी पावणे दोन, दोनच्या सुमारास नितुच्या खिडकीसमोर उभे राहण्याआधीच तो पटकन शिर्क्यांना भेटून आला होता आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे साद्यंत हकीगत त्यांना ऐकवली होती. स्वतःचे अजस्त्र पोट गदागदा हालवत शिर्के आजोबा दणदणाटी हासले होते. घरातल्या बायका एकमेकींकडे बघत खुसखुसल्या होत्या आणि नोकरचाकर मान खाली घालून स्मितहास्य करत होते. राजे शिर्के सामान्य प्रस्थ नव्हते. औरंगाबादला विधानसभेत दशकभर रिप्रेझेंट करणार्‍या राजे शिर्केंना औरंगाबादेतील एकेक माणूस सलाम करायचा. हा महान मानव आपल्या आजोबांचा इतका चांगला मित्र कसा हेच उमेशला समजेना! आणि हा जर मित्र आहे तर आत्तापर्यंत झालेल्या प्रकारात आजोबांनी ह्यांची मदत का घेतली नसेल या प्रश्नाचे उत्तर मात्र राजे शिर्क्यांनी न विचारताच दिले.

"मल्हार म्हणजे मल्हारच! तू औरंगाबादला आला आहेस म्हणून तरी मला हे सगळे कळवले त्याने तुझ्या मार्फत! नाहीतर गळ्याशी येऊनही कुणाची मदत मागणार नाही. आखाड्यात उतरला की एक माझ्याशिवाय कोणीही त्याच्यापुढे टिकायचा नाही. अजूनही त्याने काय किंवा मी काय, पंचविशिच्या तरण्याचे जरी मनगट पकडले तरी सोडवून घेता यायचे नाही. आमच्या अनेक कुस्त्या झाल्या, पण त्या सगळ्या तालमीतच! मात्र ती एकच कुस्ती! ती एकच कुस्ती आठवते. उस्तादांनी कोल्हापूरच्या बबन पहिलवानाशी झुंजायला मल्हारचे नाव पुढे केले होते. मी त्याच तोलामोलाचा असल्याने मी वैतागून सरळ मल्हारसमोरच उस्तादांना विचारले की मी का जाऊ नको? अतिशय प्रतिष्ठेची कुस्ती होती अशातला भाग नाही, पण आमच्या दोघांच्या दृष्टीने मोठीच होती. मल्हार एक सेकंदही न विचार करता म्हणाला.. उस्ताद... अंबादासला जाऊदेत.. आणि बबन पहिलवानाशी झुंजताना मी पाठ टेकली खरी... पण नंतर विजेत्याला बोलायला लावतात तेव्हा बबन पहिलवान प्रामाणिकपणे म्हणाला.. अंबादाससारखा प्रतिस्पर्धी पाहिला नाही... म्हणाला तरी बरे झाले मल्हार राईलकर नव्हता... मी मल्हारला मिठी मारली... आमची मैत्रीच और होती... आणखी एक जण होता आमच्यात.. त्याचं नाव कोकाटे... तो आमच्याइतका मुरलेला नसला तरी चांगला भिडायचा... पण मैत्री मात्र अतूट होती आमची.... कोकाटे गेला.. एका बाईवर प्रेम बसलं होतं... तिच लग्न झालेलं होतं... तिने याची तक्रार केली... याला पकडला... मीच सोडवला.. पण त्याचा जगण्यातला इन्टरेस्टच गेला होता... आत्महत्या केली त्याने... तेव्हापासून मी ठरवले आहे.. प्रेम करणार्‍या जोडीला वेगळे करायचेही नाही आणि कुणाला वेगळे करूही द्यायचे नाही... सुनबाई... आमच्या नातवाला जेवायला घाला... बामणाचा आहे... मांसमच्छी वाढाल नाहीतर... तुझं नाव उमेश ना रे?? जा हातपाय तोंड धू आणि जेवायला बस... आपण पाहू पुढचं... "

मात्र न जेवताच उमेशने सांगितले की तिचे घर कुठे आहे हे शोधून काढण्यासाठी त्याला लगेच जावे लागेल. त्यावरही खदाखदा हासत राजेंनी जायला परवानगी दिली आणि दुपारी पुन्हा जेवायला यायला सांगितले...

आणि आपण नितुच्या खिडकीसमोरून हालल्यानंतर पुढे काय झाले याची किंचितही कल्पना नसलेला उमेश आता हॉटेलच्या रूमवर पडून खिडकीतून बाहेरचे दृष्य बघत बसला होता.

इथेच आठ दिवस राहायचे??? त्याने एकदा खोलीकडे नजर टाकली. शिर्क्यांकडचे जेवण म्हणजे लग्नातल्या जेवणासारखे झाले होते. आणि स्वतः राजे जेवायला बसले तेव्हा त्यांचा आहार पाहून उमेशला स्वतःच्या तब्येतीची कीवच आली. पण आत्ता मात्र त्याच्या मनात तिसराच विचार मूळ धरत होता.

कोणालाच काहीच माहीत नाही. औरंगाबादला आपल्याला कोणी ओळखत नाही. करण्यासारखा काहीही उद्योग नाही. आणि समोर रस्त्यावर खाली... दीपा! दीपा परमिट रूम आहे. टाकायची का थोडी???

निर्णय घेण्यातच अंधार पडला आणि साडे सात वाजता पावले ठरवल्याप्रमाणे बारकडे वळली. उगाचच पिणार होता तो! अक्षरशः उगाचच! काहीच उद्योग नाही तर मग करायचे काय? उद्या पुन्हा नितुच्या घरासमोर बसून तिला धक्का द्यायचा आहेच! आज रात्री काय करत बसायचे?? त्यापेक्षा टाकावेत दोन तीन पेग!

दीपा परमीट रूम म्हणजे आनंदच होता सगळा!

दारू आणि सिगारेटचा दर्प खच्चून भरलेला! कोण कोणाशी काय बोलतंय ते समजणार नाही इतका कलकलाट! प्रत्येक टेबलावर कोणी ना कोणी कोणाशी तरी प्रचंड त्वेषाने बोलून सिद्ध करतंय की 'आपण हे असे आहोत आणि आपण हे तसे आहोत'! समोरचा बिल द्यावे लागू नये म्हणून मुंडी हालवत आहे. एकाच टेबलावर एकमेकांशी काहीही संबंध नसलेले मात्र फक्त दारू हा एकमेव दुवा असलेले लोकही बसलेले आहेत. वेटर्स जोरजोरात ओरडून ऑर्डर्स आत पोचत्या करत आहेत. त्यातच कोणीतरी ओकतोय तर कोणीतरी लघ्वीला जातोय. कोंबड्या आणि बकर्‍यांच्या शरीराचे अवशेष प्रत्येक टेबलवर! इतका अंधार की आपण काय खातोय हे खाणार्‍यालाही समजू नये!

वेटर हजर झाला...

"रोमानोव्ह... "

"निप??"

"अं????... हां ठीक आहे.."

"सोडा, लिम्का???"

"नाही... पाणीच... "

"आईस???"

"आईस द्या थोडा.. "

"सिगारेट बिगारेट मंगवाना है??"

"अं??? .. अ... एक.. हाफ पाकीट विल्स द्या विल्स... "

"और चिकन बिकन कुछ.. "

"नाही नाही... "

राज्यांकडचे जेवणच अजून उतरलेले नव्हते.

अनेक अनेक दिवसांनी समोर पेग भरलेला होता... एकच मोठा घोट घेऊन उमेशने संवेदनाना जुन्या आठवणी करून दिल्या.... आणि अर्ध्या तासात अडीच पेग झालेही...

बाथरूमला लागली होती...

उठताना शेजारच्याला धक्का लागला तसे त्याने डोळे वटारून पाहिले.. नवख्या प्रदेशात टर्रेबाजी नको म्हणून उम्या सरळ सॉरी म्हणाला.. आणि उठता उठता...

गच्चकन खाली बसला... कारण काउंटरपाशी ती व्यक्ती त्याला दिसली होती.. साध्या वेषात.. सब इन्स्पेक्टर आपटे !

काउंटरवरच्या मॅनेजरला सांगत होते...

"ग्यारा बजे बंद करनेका... एक मिनिट आगे चलाया बार तो घुसेडदुंगा.. "

मॅनेजर नम्रपणे मान डोलावत असतानाच आपटे ताडताड निघून गेले.. संवेदनशील भागात बार लवकर बंद करणे योग्यच होते.. हादरलेला उमेश बराच वेळ तसाच बसून राहिला.. जवळपास पंधरा मिनिटे तो बसून होता घाबरल्यामुळे.. मात्र या पंधरा मिनिटात नकळतपणे उरलेला एक पेग संपून अजून नाईन्टी मागवली गेली होती आणि त्यातलेही काही घुटके झालेले होते पिऊन!

आता मात्र बाथरूमला जायलाच हवे होते... शेजारच्याला पुन्हा धक्का बसतो की काय याचा विधिनिषेधही न बाळगता उमेश बाथरूमकडे चालत गेला... आणि चालतानाच त्याला जाणवले..

आपल्याला डेंजरस चढलेली आहे.. राजे शिर्क्यांचा सपोर्ट, आजोबांचे प्रोत्साहन, खिशात पैसा असणे, हॉटेलची स्वतंत्र रूम मिळालेली असणे आणि... निवेदिता याच गावात असणे या सर्वाचा आनंदच इतका झाला आहे की आपण क्वॉन्टिटीकडे लक्षच दिले नाही.. आणि आता.... आता झोक जातायत..

एका बारला धरून काही क्षण उभा राहून तोल सावरणार्‍या उमेशला तितक्यातच मागून कोणीतरी पुढे ढकलले... ढकलणारा वैतागून म्हणाला...

"रास्तेमे क्या खडा है यार... "

हे शब्द कानात जाऊन त्यांचा अर्थ समजेपर्यंत ढकलला गेलेला उमेश...

..... तोल जाऊन पडायला लागताच....

सावरला गेला... कितीतरी क्षण त्याला हे समजायला लागले की आपण पडत होतो आणि अजूनही पडू शकतो... या माणसाने धरले म्हणून आपण नीट उभे आहोत... थॅन्क्स म्हणायला त्या माणसाचा चेहरा पाहिला...

... आणि धमन्यांमधून रक्ताचे आणि संतापाचे पाट वाहायला लागले.. रक्त उसळ्या मारू लागले... डोळ्यांमधून अंगार बरसू लागला.. सुडाने हृदय फाटायची वेळ आली...

... आणि तेवढ्यातच... तेवढ्यातच त्या मोहक चेहर्‍याच्या तेजस्वी डोळ्यांमधून आणि शुभ्र दंतपंक्तींमधून एक लाघवी स्मितहास्य ओघळले... आणि ते अजून ओघळतेच आहे तोवर... तो शेरही कित्येक दिवसांनी त्याच आवाजात ऐकू आलाही...

"संभलभी जा....... संभलभी जा के अभी वक्त है संभलनेका... "

उमेशला स्वतःसमोर बसवून... जुनैद अख्तरमियाँ रोमानोव्ह व्होडकाची आणखी एक निप मागवत होते...

=================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

आरे व्वा भाई क्या टर्न दिया
क्या भाय क्या ये सभ
सह्याद्रि घाट मे लिखा
क्या एक टर्न गया
दुसरा आया
कभि निचे उतर् रहे हो
कभि शिधा चला रहे हो
कभि टेढा चला रहे हो
ओ भाई क्या कर रहे हो
बहोत आछा लिख रहे हो
सलाम भाय आपको
त्रिवार सलाम

धन्यवाद नवीन भाग लवकर टाकल्याबद्दल
आरे व्वा भाई क्या टर्न दिया
.....................................
त्रिवार सलाम....+१

हे काय घडतयं.?
जे काही होउ देत पण प्लिझ ह्यावेळी तरी उमेशला नितु मिळु दे हीच request.
पु.ले.शु. लवकर.

जायला..आता हा जुनैद अख्तरमियाँ कुठुन टपकला?
पण मजा आली....लवकर भाग टाकल्याबद्दल धन्यवाद!

मस्त, झक्कास!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!