तुम्हे याद हो के न याद हो - २२

Submitted by बेफ़िकीर on 27 September, 2011 - 06:27

वाड्यातील सगळे दिवे केव्हाच विझलेले होते. रात्रीचे पावणे बारा! उद्याच्या आशाअपेक्षांच्या क्षीण साठ्यांवर आजच्या खिन्नतेला परतवण्याचा अपयशी प्रयत्न करत सामान्य माणसे झोपी गेलेली होती. वाड्याबाहेर काही नेहमीचेच आवाज! एखादे कुत्रे भुंकले किंवा एखादी सायकल करकरत गेली.

वीस बावीस वर्षाच्या पालवणार्‍या मनाला कोमेजावे लागलेले होते. डोळ्यातून अश्रू काढण्याची समाजाची परवानगी नव्हती. त्यामुळे अश्रू उशीवर शिंपडावे लागत होते.

नजरानजर, हासणे, भेट, मुद्दाम घडवून आणालेल्या भेटी, स्पर्श, जवळीक, मने गुंतणे, शपथा, वचने, ओढ, विवशता आणि आयुष्यभराचे दु:ख!

सगळ्याच पातळ्या आता नकोशा वाटत होत्या कारण शेवटची पातळी विषारी होती.

उमेशने ते आई वडील आणि क्षमाला सांगितलेले नव्हते.

आडवे पडणे म्हणजे झोप लागणे थोडीच असते!

सतत नजर अर्धवट उघड्या पडद्यातून समोरच्या बंद घराच्या दारावर रेंगाळत होती. तिथे अजूनही एक हिरवा कापडी तुकडा तसाच लोंबत होता. कित्येक दिवस त्याच्यावर धुळीचे थर बसलेले होते. आपट्यांनी जागा सोडल्यामुळे त्या तुकड्याचा आणि त्याच्या रंगाचा सगळा अर्थच नष्ट झालेला होता.

अचानक डोक्यावर कसला तरी स्पर्श झाल्याने उमेश चरकला आणि उठून बसला.

आजोबा!

याही वयात आजोबांना त्याचे दु:ख नुसते समजलेलेच होते असे नाही तर त्यांनी उमेशच्या पाठीवरून हात फिरवून त्याला धीर द्यायलाही सुरुवात केली.

आजोबा हे नाते तसे अवघडच! खरे तर बापाचाही बाप! पण त्यात प्रेम अधिक असू शकते. मात्र अशा प्रसंगि आजोबा विश्वासातले वाटणे अतिशय दुर्मीळ! बहुतेकदा अशा वेळी आजोबा असेच सांगणार की हे सगळे आता डोक्यातून काढून टाक! पुढचे आयुष्य पडलेले आहे, नोकरी धर! पण उमेशचे आजोबा अबोलपणे त्याच्या पाठीवर हात फिरवत होते. कारण आज रात्री झोपायला आल्यावरच त्याचा चेहरा पाहून आजोबांनी चौकशी केली तेव्हा उमेशने आसवांनी आणि आवंढांनि ओलावलेल्या आणि जड झालेल्या आवाजात खाली बघत पुटपुटत आजोबांना सांगितले होते.

"औ... औरंगाबादला गेले... म्हणजे ... बदली करून घेतली... आज... आज शेवटचे भेटलो आम्ही"

===============================

आजची दुपार डोक्यातून जातच नव्हती.

दुपारी तीन वाजता कॉलेजच्या मागे नदीच्या बाजूला असलेल्या एकांतात भेटायचे ठरलेले होते.

पावणे तीनपासूनच उमेश तिथे उभा राहिलेला होता. आणि नितुला यायला सव्वा तीन झाले. सगळ्या मैत्रिणींना कटवून आणि कोणाच्याही नकळत यायचे यासाठी तिला प्रचंड प्रयास पडलेले होते.

त्या नजरानजरीचे वर्णन करणे शक्यच नाही.

लांबूनच एकमेकांकडे पाहताना हृदयाची धडधड बेसुमार वाढली होती. अधिक जवळीक शक्यही नव्हती. त्यामुळे उदासवाणी नितु चालत चालत उमेशसमोर चार फुटांवर येऊन उभी राहिली आणि खालीच बघत एका दगडावर बसली. तोही तिच्या शेजारी बसला. कित्येक सेकंद दोघे नुसतेच बसलेले होते.

इन सबको तुम छोडके कैसे कल सुबहा जाओगी
मेरे साथ इन्हे भी तो तुम याद बहोत आओगी

ओढणीशी चाळा करत धैर्याने नितुने उमेशकडे मान वळवली आणि ते जाणवून उमेशने तिच्याकडे! विचारण्यासारखे काही राहिलेलेच नव्हते.

"मिळाली चिठ्ठी?"

नितुचा हा प्रश्न अनावश्यक होता. त्याशिवाय उमेश इथे आलाच नसता. पण तिचा हा प्रश्न वेडगळपणाचा आहे असे म्हणून तिला चिडवण्याची ही वेळ नव्हती.

"हं"

पुन्हा स्तब्धता! दीर्घ अबोला! काय बोलायचे हेही समजत नव्हते. दुसर्‍याची समजूत घालावी की दुसर्‍यावर रागवावे? स्वतःची समजूत घालावी की ते काम दुसर्‍याला द्यावे?

खूप खूप वेळाने नितुच्या तोंडातून ते शब्द.... अतिशय जड झाल्यासारखे आणि घोगर्‍या आवाजात बाहेर पडले..

"मी ... ... चालले"

उमेश अजूनही स्तब्धच! काही सेकंदांनी नितुने स्वतःच्या गुडघ्यांमध्ये डोके खुपसले. गदगदत राहिली.

तिचे सांत्वन करण्याची उमेशचीही मनस्थिती नव्हतीच!

बर्‍याचे वेळाने नितु ओलावल्या स्वरात पुन्हा म्हणाली.

"आज... शेवटची भेट"

अधिकच गप्प झाला उमेश!

नितुने हळुच आपला एक हात त्याच्या गालांवर ठेवला. कसाबसा त्यालाप्रश्न विचारला तिने!

"विसरून जाणार नाहीस ना?"

आता काहीतरी बोलणे भागच होते उमेशला! पडेल चेहरा, उदास आसमंत आणि शेवटची भेट! पण तरी त्याला शब्द सुचले तरी नाहीत किंवा तोंडातून फुटले तरी नाहीत.

"बोल ना??... बोलणार नाही आहेस माझ्याशी???"

नितुच्या या प्रश्नावर मात्र उमेशने गर्रकन मान दुसरीकडे फिरवली.

"क... काय बोलू?... काय राहिलं आहे बोलायचं???"

उमेशने रडवेल्या स्वरात प्रश्न विचारला तसे नितुने त्याला आपल्याकडे वळवले. तो तिच्याकडे बघत नव्हता, ती मात्र त्याच्या चेहर्‍यावर आपली नजर सोपवून उदासपणे बघत म्हणाली.

"आज... हा .. हा अर्धा तास हीच आपली शेवटची भेट आहे... यानंतर आपण कधीही भेटू शकणार नाही... कधी एकमेकांशी बोलूही शकणार नाही.. दिस... दिसूही... दिसूही नाही शकणार... आपल्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत... कोणालाच आपल्या भावनांची कदर नाही... आपण एकमेकांवर जे प्रेम केलं... त्याची आठवण... आणि त्याची आठवण कायम राहावी म्हणून... आज हा अर्धा तास तरी... खूप खूप बोलू ना रे? ... सगळ्या गप्पा मारू... आज रडायचं नाही... आज हासायचं.. आपण आयुष्यात एकमेकांना भे.."

"जमणार नाही"

उमेशच्या तुटक विधानामुळे निवेदिता चरकून त्याच्याकडे बघत राहिली. आता उमेश बोलू लागला.

पण त्याचा स्वर आता रडवेलाच झाला होता.

"आज म... मला गप्पा मारणे नाही जमणार... तुझ्याकडे पाहणेही नाही जमणार... आज असेच बसू... नुसते हात हातात घेऊन.. निवेदिता... तीन.... तीन वर्षांनी पुन्हा बदली होते ना गं??"

"तीन वर्षात माझं लग्न झालेलं असेल"

ख्ट्ट्ट!

खाडकन चेहरा पडला उमेशचा!

"मा... झ्याशी.. नाही करणारेस लग्न??"

"...................... नाही... "

"म्हणजे... आयुष्यात... पुन्हा आपण दिसणारच नाही??"

"..... नाही"

"मग.... आलीस कशाला माझ्या आयुष्यात??"

"नव्हतेच आले... असं समज"

"तुझं... प्रेम नाही माझ्यावर तुझं??"

उदासपणे नकारार्थी मान हालवत निवेदिता जमीनीकडे बघत राहिली आणि उमेश तिच्याकडे! काही वेळाने मान फिरवून तो म्हणाला...

"खोटंही बोलता येतं वाटतं तुला..."

"मी खोटं बोलत नाही आहे.. "

"आजवर आपली... फक्त मैत्री होती??? माझी अन वर्षाची आहे तशी????"

".... होय... खरे तर... काहीच नव्हते आपल्यात..."

"मग त्या... कुडजेगावात आपण गेलो होतो तेव्हा मला तू म्हणाली होतीस की काय वाट्टेल ते झा..."

"नको त्या आठवणी काढू नकोस रे.."

"..... बरोबर आहे... या सगळ्या आता नको त्याच आठवणी होणार... "

"उमेश..... तुझ लग्नं झालं की विसरशील का रे मला???"

"माझं लग्नं?? मी कसा लग्न करेन??"

"करावच लागेल... माझ्यासाठी तरी... तू लग्न केलं नाहीस तर मला आयुष्यभर असं वाटेल की मी तुझ्याबाबतीत चुकले आणि त्या चुका सावरणे मला शक्य होते... "

"निवेदिता... त... तुला लग्न करावं लागणार आहे म्हणून... मला आग्रह करतीयस ना???"

"मला करावंच लागेल रे! कोणाशीही! एकदा कोणाशीतरी लग्न करायचंच म्हंटल्यावर तो कोण आहे याचा काही संबंधच नाही.... पण... पण मी लग्न केले आणि तू केले नाहीस तर... कशी जगेन मी??"

"म्हणजे... कोणाशीतरी लग्न करून... जगू शकशील तू???"

"असं वाटतं तुला ???"

"तुम्हाला... जायलाच हवं आहे का???"

निवेदिता उठली आणि थोडी नदीच्या बाजूला गेली. अजूनही ती जवळच असल्याने उमेशला तिचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते.

"खूप रडले मी! एकटीच! आईला खूप सांगून पाहिले! बाबांना हेही सांगून पाहिले की पुण्यात शिक्षण चांगलं आहे आणि मी उमेशला एकदाही भेटणार नाही... मी आणि आई इथेच राहतो... तर मला म्हणाले की माझ्या मुलीवरचा माझा विश्वास गेलेला आहे... आणि तुझ्याचसाठी मी बदली करून घेत आहे माझी... माझी काही आपोआप बदली झालेली नाही... उमेश... माझं म्हणणं आई बाबांपैकी कोणीच ऐकलं नाही रे"

पुन्हा स्तब्धता! काही वेळाने उमेश म्हणाला...

"आपण... आत्ताच लग्न केलं तर???"

"वेडा आहेस तू! वेडे विचार, वेड्या कल्पना!"

"... का??"

"कसं करायचं लग्न?? कोर्टात जाण्यासाठी साक्षीदार लागतात, माझे वडील पोलिसात आहेत, त्यांची भीती साक्षीदारांना वाटणारच.. देवळात लग्न केलं आणि तू मंगळसूत्र घातलंस तर दुसर्‍या तासाला ते कचर्‍यात फेकतील ते मंगळसूत्र... त्या लग्नाला ते लग्नच म्हणणार नाहीत... मला पळवून नेलंस तर अख्खं डिपार्टमेंट तुझ्या मागे लावतील.. कसं करायचं लग्न??"

"सा... साखरपुडा???"

"तुला वेड लागलं आहे.. तू मला भेटू नयेस म्हणून बदली करून घेत आहेत ते... "

"तुझी... बहुतेक... स्वतःचीच इच्छा दिसत नाही आहे.. "

"आणखीन एक वेडं वाक्य!... मला काल रात्री एक सेकंद झोप लागली नाही"

"मलाही नितु"

"उमेश... मला एक... मला एक शपथ हवी आहे... देतोस???"

"कसली???"

"आधी दिली म्हण..."

"नाही म्हणणार... कसली शपथ ते सांग... "

"उमेश... उद्या सकाळी सात वाजता माझी बस आहे शिवाजीनगरहून! संगम ब्रीजच्या सुरुवातीला तू रस्त्यापाशी उभा राहा... त्यानंतर.... त्यानंतर.... निवेदिता आपटे... हे नांव विसरून जायचं... आयुष्यभरासाठी... या जन्मासाठी... "

बोलतानाच तिला हुंदका आलेला असला तरीही तिला सावरण्यासाठी उमेश व्यवस्थित नव्हताच! पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून मात्र निवेदिता हमसाहमशी रडू लागली. आता उमेशने तिला धीर देऊन उठवले. गच्च मिठी मारली दोघांनी!

एक व्याख्या नसलेलं नातं! अर्धवट वयातलं! अशक्य होतं ते तोडणं! एकमेकांना आपल्यात पूर्ण सामावून घेण्याच्या प्रयत्नात ती मिठी अधिकच घट्ट होत चालली होती. निवेदिताने उमेशवर चुंबनांची बरसात केलेली होती.

"विसर... विसर मला... विसरशील ना???"

"एक... एक क्षणही नाही विसरणार नितु... एक क्षणही नाही... "

"मी वाईट आहे... मी तुला सोडून चालले आहे... "

"नाही... तुला जावं लागत आहे... "

"पण तरी विसर मला.... छान जग... मला विसर..."

"तू विसरशील???"

पुन्हा त्याच्या मिठीत शिरत निवेदिता धीर सुटल्याप्रमाणे रडू लागली.

"तू पुन्हा पुण्याला येशील ना??? "

"आता आयुष्यात एकमेकांना दिसायचे नाही आपण उमेश... "

"का पण??? का?????"

"पुन्हा मोह होईल.. आयुष्य बरबाद होईल.. "

"एकमेकांचे होणे ही बरबादी आहे???"

"माहीत नाही... पण आता भेटायचे नाही... कधीच.... कुठेच... "

"मीच येईन औरंगाबादला..."

"मूर्खपणा करू नकोस... "

"तुमचा तिथला पत्ता काय आहे??? "

" नाही सांगणार मी... "

"सांग नितु... मी तुला नुसता लांबून बघायला येत जाईन... नुसता लांबून बघायला.. "

"मलाच पत्ता माहीत नाही.. "

"तू खोटे बोलतीयस... "

"नाही... "

"सांग.. नाहीतर मी उद्या संगम ब्रीजपाशी नाही येणार.. "

"तुला यायचंच नाही आहे ना मला बघायला???"

"तुला बघायला येता यावं म्हणूनच औरंगाबादचा पत्ता विचारतोय... "

"नाही सांगणार मी... "

" मी शोधून काढेन... कोणत्यातरी कॉलेजला असशीलच की तू... "

"माझ्यासाठी औरंगाबादला आलास तर.. तर बघच तू... "

"का??"

"मी जीव देईन माझा... "

"का पण??? तुला नको आहे का मी???"

"हवा आहेस रे... फक्त तूच हवा आहेस... पण ते मला सहन नाही होणार... "

"शहर बदलून मने कशी बदलता येतील???"

"काळ गेला की अनेक आठवणी विसरता येतात असे म्हणतात... "

"मला विसरण्यासाठी चालली आहेस???"

"असा का छळतोस???"

"तू मला विसरू शकशील???"

"हो... "

"आत्ताच तर नाही म्हणाली होतीस... "

"चुकले मी बोलताना... मी विसरू शकेन तुला... "

खट्टकन मिठी सुटली उमेशची! परक्य मुलीकडे पाहावे तसे नितुकडे पाहात तो बाजूला झाला.

"काय झाले???? काय झाले तुला??? अरे मी कशी विसरेन तुला?? काहीतरी काय विचारतोयस तू?? शक्य आहे का मी तुला विसरणं?? माझ्या मनात तुझ्याशिवाय कोणीतरी येऊ शकेल का कधी?? कदाचित मी एखाद्या परक्याचा संसारही करेन जन्मभर... पण... तुझी हक्काची व्यक्ती म्हणूनच मी त्याच्याकडे राहीन... मी म्हणजे कुणी वेगळी नाही... मी म्हणजे तूच आहेस... तू म्ह.. सॉरी... तू मात्र.. "

"मी म्हणजे मात्र तू नाही... हो ना??"

"तुला मी माझा कशी म्हणू शकेन उमेश??? उद्या तुझी बायको येईल... ती तुझ्यावर इतके प्रेम करेल की तू मला पूर्णपणे विसरशील... तुम्ही एखादी नवी जागा घ्याल... वेगळे राहू लागाल.. एकमेकांसाठी जगाल.. मग मुले होतील.. मग आनंद रोज वाढायलाच लागेल... अशा वेळेस माझ्यासारखीची आठवण कशाला व्हायला हवी??? अभद्र आठवण! जिच्या आठवणीमुळे संसाराची बसलेली घडी विस्कटेल अशी आठवण! "

"आणि तू??? तू लग्न करून नवर्‍यावर प्रेम उधळवशील... तुला एक श्रीमंत नवरा मिळेल... जो तुझ्यावर जीव ओवाळेल... त्या श्रीमंत प्रेमात गुदमरशील आणि आपोआपच कायमची दुरावशील.. तुमचा संसार फुलेल... अशा संसारात... आपल्या जुन्या... प... पुण्यातल्या मित्राची... अभद्र... आठ..."

"नको बोलूस असे... मी नाही तुला विसरू शकणार... "

"मीही... "

"मला जायला हवे उमेश.. घरी पोचायला पाच मिनिटे उशीर झाला तरीही आई कॉलेजला यायला निघेल.. "

"शे... शेवटच्या भेटीलाही... शेवटची भेटही इतकी... लगेच.. संपवणारेस???"

उमेशच्या हातातून आपला हात सोडवून घेत निवेदिताने त्याच्याकडे पाठ केली.

"जा... आ... आणि पुन्हा पुण्यात येऊ नकोस... पुन्हा आयुष्यात मला दिसू नकोस... "

डोळ्यात पाणी घेऊन निवेदिता मागे वळली आणि उमेशला म्हणाली...

"लगेच झाले ना नकोशी??? "

स्तब्ध राहून उमेशने खाली नजर वळवली.

"उमेश... उद्या.. संगम ब्रीजपाशी येशील ना रे???"

मुलीसारखा रडला उमेश मुलीसारखा! आणि निवेदिता त्याहून!

औरंगाबादचा पत्ता खूप वेळा विचारला उमेशने! नाही तर नाहीच सांगितला तिने! मिठी सोडवत नव्हती. पण सोडायला लागणार नव्हती. आणि शेवटी तोही क्षण आला...

मिठीतून सुटून निवेदिता बाजूला झाली. रुमालाने चेहरा पुसला. बरीचशी सावरली. उमेश अजूनही तसाच होता.

उद्या सकाळी आठ वाजता संगम ब्रीजपाशी ती बसच्या खिडकीत दिसणे हे तिचे शेवटचे दर्शन होते. शेवटचे! अंतिम भेट!

आणि त्यानंतर....

... त्यानंतर सगळे संपणार होते...

त्या सगळ्या शपथा, ती सगळी वचने, ती सर्व ओढ आणि ते प्रेम... हृदयाच्या एका अदृष्य कप्प्यात जाऊन कायमचे स्वतःला बाहेरून कुलूप लावून घेणार होते.. बाहेर येणार नव्हते...

नंतरच्या प्रदीर्घ आयुष्यात तो कप्पा बंदच ठेवायचा होता. अर्थाला निरर्थकतेचे नांव लावून नष्ट करायचे होते. संसारात, व्यापात गुंतायचे होते. आई वडिलांच्या इच्छाअपेक्षा पूर्ण करायच्या होत्या. क्षमाच्या लग्नात नाचायचे होते. आप्पा, विन्या आणि राहुल्याशी मैत्री पुन्हा जमवून टिकवायची होती. नोकरी मिळवायची होती. सगळे विसरून जायचे होते. नवीन साथीदार बघून लग्न! आणि मग... हे हळुवार नाते, या अल्लड भावना... दाबून टाकायच्या होत्या.

हा एकच क्षण! जेव्हा तिच्यावर आपले आणि आपल्यावर तिचे नियंत्रण आहे, असा हा शेवटचा क्षण!

याच क्षणात... एकदाच... कडकडून भेटता येईल.... नंतर असा हक्कही राहणार नाही आणि परिस्थितीही...

दोघेही त्याच क्षणी तोच विचार करत होते... आणि... नजरानजर होताच.... भावनांची वादळे उधळवत एकमेकांना कडकडून मिठी मारली दोघांनी...

आसवांच्या प्रवाहात एकमेकांवरचा हक्क वाहून चाललेला होता... कोरड्या होत जाणार्‍या डोळ्यांमध्ये आता दुराव्याने स्थान बळकट केलेले होते... हा स्पर्श, ही ऊब, ही आवेगी ओढ, ही तडफड आता पुन्हा अनुभवता येणार नाही ही भावना प्रबळ होत चालली होती...

"हे... तुझ्यासाठी"

उमेशने स्टुडिओतून आणलेल्या तीन फोटोंपैकी एक नितुला दिला...

"माझी आठवण म्हणून... एवढा फोटो... ठेवशील ना??"

पुन्हा दोघे रडत रडत बिलगले.

हातातून हात, बोटातून बोटे आणि स्पर्शांतून स्पर्श विलग होताना एकदाच दोघांनी एकमेकांकडे पाहिले. निवेदिताने पाठ फिरवली तशी उमेशनेही! त्याला पाहायचेच नव्हते तिला जाताना आणि तिला त्याने पाहावे असे वाटतच नव्हते.

कभी हममे तुममेभी चाह थी, कभी हमसे तुमसेभी राह थी
कभी हमभी तुमसे थे आशनाँ, तुम्हे याद हो के न याद हो
=====================================

शबे फुरकतका जागा हूं फरिश्तो अब तो सोने दो
कभी फुरसतमे करलेना हिसाब आहिस्ता आहिस्ता

जुनैद अख्तरमियाँनी ऐकवलेल्या त्या गझलेतला हा शेर उमेशच्या फार लक्षात राहिलेला होता. पण तो अनुभवावा लागेल अशी त्याला यत्किंचितही कल्पना नव्हती.

हीच ती पहाट! जी कधी येईल असे वाटलेही नव्हते आणि रात्रीची पहाट कधी आणि कशी होते ते या पहाटेने शिकवलेले होते. रात्रभर जागा असलेल्या उमेशने हळूच रेडियमच्या घड्याळात पाहिले. साडे चार! काहीही करून साडे सात पासूनच संगम ब्रीजवर उभे राहायला हवे होते. न जाणो चुकून बस आधी वगैरेच गेली तर???

कालच मध्यरात्री आजोबांना सगळी कहाणी सांगून झाल्यावर आजोबा त्याला थोपटत निजून गेले होते. हा जागाच राहिलेला होता. याची मनस्थिती आजोबांशिवाय कोणालाही माहीत नव्हती. अगदी भांडणे झाल्यामुळे सख्या मित्रांनाही!

आणि मित्रांशी भांडणे झाल्यामुळेच आज विनीतची मोटरसायकल मिळणार नव्हती संगम ब्रीजवर जायला.

लगबगीने परंतु हताशपने उमेश उठला तसे आजोबाही जागे झाले आणि दहाच मिनिटात आई बाबाही!

"काय रे????"

बाबांनी विचारले तसा उमेश सटपटला आणि म्हणाला..

"डेक्कनवर पळायला जाणार आहेत मित्र... मलाही बोलावलंय.. "

आपट्यांची बदली झाल्याचे माहीतच नसल्याने बाबांना संशय आला की तो निवेदिताच्या घराकडेच चालला आहे..

"उमेश.. तू... त्या मुलीला भेटायला तर... जात नाही आहेस ना?? "

"छे हो??? काहीतरी काय... त्यांची तर.... त्यांची तर बदलीही झाली... "

एवढे वाक्य बोलून त्याने बेसीनवर खसाखसा तोंड धुतले. न जाणो आपण रडलेलो दिसायचो.

पण ते व्हायचे नव्हते.

कारण अचानक आजोबा प्रकटले बाहेरच्या खोलीत!

"अनंता... त्यांची कालच बदली झाली... तिलाच शेवटचे भेटायला तो चालला आहे... संगम ब्रीजपाशी... "

आजोबांचे वाक्य ऐकून बाबा आणि आई हादरलेच! आई तरातरा पुढे आली आणि उमेशला धरून म्हणाली...

"अजिबात जायचे नाही तिला भेटायला.. माझी शपथ आहे.. "

"मीही तेच म्हणतोय... "

आजोबांनी आता तर उमेशलाही धक्काच दिला. त्यांनी बाजू एकदम पालटली कशी तेच त्याला समजेना! एक तर उगाचच खरे ते आईबाबांना सांगून आयत्या वेळी घोळ घातलेला होता. चक्रावून आणि आणखीनच हताशपणे आजोबांकडे तो पाहात असतानाच क्षमाही जागी झाली.

"आजोबा... हे तुम्ही म्हणताय??? "

उमेशने खिन्नपणे आजोबांना विचारले.

"होय... तिला नुसते पाहायला संगम ब्रीजवर जायची गरज नाही... तिच्या आधीच्या एस टी ने औरंगाबादला जा... तिला तेथे दिसू नकोस... जरा तडफडूदेत तिला... माझा मित्र आहे तिथे अंबादास शिर्के म्हणून... त्याच्याकडे उतर... मात्र ती रिक्षेत बसून कुठे जाते ते एका रिक्षेतून बघून ठेव.. तिचा पत्ता समजायलाच हवा... आणि दुपारी सामसूम झाली की सरळ तिच्या घराच्या खिडकीसमोर उभा राहा... शिर्के औरंगाबादला असताना कुणाच्या बापाची हिम्मत नाही तुला हात लावायची.... प्रेम करायचे असले तर हिम्मत असावी लागते... मी हिम्मत दाखवली नसती तर माझे लग्नच झाले नसते आणि हा अनंता जन्मालाच आला नसता... आणि त्यामुळे तूही! तुझ्या धमन्यात या मल्हार राईलकरचे रक्त वाहते हे लक्षात ठेव... बुळ्यासारखे वागून जगात काहीही मिळत नाही... पोरगी आवडते ना तुला??? आणि तिलाही तू?? मग मागे कसला हटतोस पोरींसारखा... हे बिनधास्त पळवून आणायची तिला घरी... पण आत्ता नाही... आधी तिला हे समजुदेत की तू औरंगाबादलाही तिचा पिच्छा सोडलेला नाहीस..... आणि प्रेमात सगळे सहन करायची तयारी पाहिजे... आईचे प्रेम म्हणून आई जपून राहायला सांगते... बापाचे प्रेम म्हणून बाबा रोखून धरतात... पण आम्ही तुला जन्मभर पुरणार नाही आहोत... तिला पळवून आणलीस तर आयुष्यभर ती तुझ्यावर जान कुर्बान करेल.. उमेश... माझ्या घराण्यात जन्माला आला आहेस हे सिद्ध कर... त्या आपटेच्या नाकावर टिच्चून उभा राहा त्यांच्या घरासमोर... इतके हताश व्हायला पाहिजेत की स्वतःहून मुलगी द्यायला आले पाहिजेत... ये... हा मल्हार राईलकर तुला एक हजार रुपये देत आहे या प्रवासासाठी... आणि एका आठवड्याच्या आत पुण्यात आलास तर मला थोबाड दाखवू नकोस आठवडा संपेपर्यंत!"

क्षमाचा थिजलेला पुतळा झालेला होता. मात्र उमेशच्या वडिलांना आपल्या वडिलांचा स्वभाव माहीत असल्याने ते काहीच रिअ‍ॅक्ट करत नव्हते. उमेशच्या आईलाही ते माहीत असल्यामुळे ती चेहरा पाडून आणि हादरून नुसतीच बघत होती.

आणि आठ वाजून चौदा मिनिटांनी संगम ब्रीजपाशी उमेश न दिसल्यामुळे बसमध्ये चोरून रडणार्‍या निवेदिताला हे माहीत नव्हते ....

.... की....

एक तास आधीच पुण्याहून औरंगाबादला निघालेल्या बसमध्ये बसून उमेश आत्ता शिरूरच्या जवळ पोचलेलाही आहे......

गुलमोहर: 

सही!

सहि...आजोबा पुन्हा एकदा ढिन्च्याक...... हिंमत असेल तर प्रेम करा...आवडल्...आता अजुन वाट पहायला लावु नका...

हीच ती पहाट! जी कधी येईल असे वाटलेही नव्हते आणि रात्रीची पहाट कधी आणि कशी होते ते या पहाटेने शिकवलेले होते. >>> या वाक्यासाठीच केलेला मी वाचण्याचा अट्ट हास..!!

दुसर्‍या प्यार्‍यातील वर्णन अतिशय आवडले!!!

मग मागे कसला हटतोस पोरींसारखा... >>> भूषण कटककरांच्या कांदबरीत तरी हे शक्य नाही.. Happy

इतके हताश व्हायला पाहिजेत की स्वतःहून मुलगी द्यायला आले पाहिजेत... >>

आज्जोबा की जय!!

हे‍ असे आजोबा कुठे मिळतात. ते प्राप्त करुन घेण्या साठि कुठ्ले व्रत करावे लागते ते क्रुपया सविस्तर सांगा.:-)
हे बेफिकिर..या प्रश्नाचे उत्तर महित असुन जर तू (तूम्हि) दिले नाहि, तर तुझ्या डोक्याचि शंभर शकले ई.ई (वेताळ पंचविशी)

मस्त भाग. अवडला..

सुरवातीला हा भाग वाचताना कंटाळा आला,
पण, , , , , ,
जेव्हा आजोबा आले तेव्हा एक जोश संचारला.
आजोबा is Great.

पुढ्चा भाग उशिरा आला तर . . . . .सांगू शकत नाही काय करेन ...

छान भाग आहे... सलाम आजोबा... असे आजोबा सगळयांना मिळोत....
पण बेफिकीरजी, प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज....पुढचा भाग लवकर टाका... यावेळी खुप वाट पहावी लागली.