गणराज रंगी नाचतो - दाद

Submitted by संयोजक on 5 September, 2011 - 06:02

तिसर्‍यांदा मूषकानं आत-बाहेर केल्यावर, गौरी हातातलं टाकून उठली. कधी कधी मूषकानं मयुराला फारच त्रास दिला तर तो मागे लागतो त्याच्या.... पण मयुर तसा सहसा त्याच्या वाट्याला जात नाही. आपल्या वाहकासारखा तोसुद्धा थोडा गंभीरच.

आतून तालात पावलं टाकल्याचा आवाज आला. गौरीनं हळूच आत डोकावून बघितलं तर... बाल-गणेशाचं एका पायावर तोल सावरीत तांडव मुद्रा घेणं चाललं होतं. उत्तरीय घामाने अंगाला चिकटलं होतं, चेहरा लाल झाला होता, मस्तकावरची कुरळ घामानं ओली होऊन चेहर्‍याला महिरपून होती. महत्प्रयासाने आपल्या तुंदिल तनुचा भार गौर पावलांवर तोलीत, गणेशा नृत्याचे अविष्कार करीत होता...

हे बघून आत्यंतिक उत्साहित झालेला मूषक..... त्याला काय अन किती तुडतुड करू असं झालं होतं.
चाहूल लागताच गणराज गर्रकन वळले आणि तोल जाऊन पडलेही. गौरी धावली... उठून उभं रहात मोठ्या गंभीर चेहर्‍यानं गणेशानं गौरीला हातानेच थांबण्याची खूण केली. खाली मान घालून वळला आणि बाहेर निघूनही गेला.

गौरी तिथेच हताश होऊन उभी राहिली... विषण्ण मनानं पुन्हा कामाला लागली. कायम आनंदी, हसतमुख बाळाचं हे हिरमुसलं रूप तिला खूप खूप टोचलं.

'मी असा का?' हे जरी गणेशानं शब्दांत विचारलं नसलं तरी, त्याच्या नजरेत हा प्रश्न कायम दिसायचा. कधीतरी सांगावं लागणारच होतं. नेहमीसारखे महादेव त्यांच्या भूतगणांसह वारीला गेले होते. गेल्याच आठवड्यात शेवटी सांगितलंच तिनं गणेशाला.... त्याच्या जन्माची कहाणी.

महादेवांना काय म्हणायचं... अगदी एव्हढ्या तेव्हढ्या पूजा-अर्चनेनं लोभाऊन जाऊन भक्तांना वर म्हणून काहीही देण्यात मागे-पुढे न बघणार्‍या शिवांना मुलांच्या नजरेतलं प्रेम दिसलं नसेल? दोन्ही मुलांना कधी फार प्रेमानं जवळ बसवून घेतलंय, काही गुज-गोष्टी केल्यात देवांनी?

मुळात त्यांच्यासारखीच विरागी वृत्ती असलेल्या कार्तिकेयाला नाही काही ह्याचं... पण गणेशा?
शिवानीचं मातृत्वं खर्‍या अर्थानं पूर्णत्वाला नेलं ते बाळ गणेशानं. त्याच्या गुणांचं कौतुक, त्याचे हट्ट पुरवणं, त्याचं पडणं-झडणं, पहिला दात येणं, तुटणं... त्याच्यासाठी जागवलेल्या रात्री.... हे सगळं इतक्या तीव्रतेनं दादाच्या बाबतीत झालंच नाही. कार्तिकेय समस्तं स्त्रीजातीपासूनच तर दूरच... पण जणू आईपासूनसुद्धा कायम तसा सुटवंगच राहिला.

इतकं वेधून घेणारं अन वेढून टाकणारं बाळपण गणरायाचंच. तिलाच काय पण नाथांच्या भूतगणांमधे, त्यांच्या अडभंग मित्रंपरिवारातही गणेशाचे लाड होत. कुणीही आतून फुलून येतच, सामोरा यायचा, गणेशाला. कुणालाही आकर्षून घेणारं हे रुपडं... गौरी त्याला प्रेमानं, लाडानं गुणपती म्हणत असे.
सांगितलं तिनं शेवटी गणुबाळाला. बाहेरून कुठुनतरी कळण्यापेक्षा.... त्या नुस्त्या आठवणीनंच शिवानीच्या गळ्यात आवंढा आला... तगमग झाली.

अगदी मांडीवर घेऊन, जवळ बसवून घेऊन सांगितली सगळी कथा....

अगदी.... नाथांनी संतापाच्या भरात, बाळाचं शीर उडवलं इथवर सुद्धा डोळे विस्फारून ऐकून घेतलं बाळानं. मी मांडलेला आकांत ऐकताना, मी धरलेला हट्ट ऐकताना डोळ्यातून अपार माया झरली...
पण तातांना त्यापायी कष्ट पडले, अनेकानेक दिवसांनी घरी येणारी त्यांची पावलं पुन्हा एकदा जंगलात जाण्यासाठी वळली.... त्यांना वळवावी लागली....

''ह्यासाठीच का आई, तातांना मी फारसा आवडत नाही?...'' हा गणेशाचा बाळप्रश्न तिचं काळीज चिरून गेला...

''नव्हे नव्हे रे... फार कुणाला जवळ करणं त्यांचा स्वभावच नाही.. दादाला कधी बघितलंयस त्यांनी जवळ घेतलेलं...." आपल्याच बोलण्यावर आपलाच विश्वास बसत नसल्यासारखा होत गेला तिचा स्वर. गणेशाला ते पटलं नसल्याचं कळलंच तिला.

अबोल होत गेलं बाळ मग. आपल्याच कोषात त्याचं गुरफटून घेणं... अगदी मोदकांवरली वासनाही कमी झाली... तिला बघवेना.

दोनच आठवड्यांत शिवपुजेचा वार्षिक सोहळा आला होता. त्याला नाथांचं इथं असणं अपरिहार्यं होतंच. आता अगदी कधीही त्यांचं आगमन झालं असतं. तेव्हा बोलायचंच त्यांच्याशी. माझं चुकलं म्हणावं... त्यांच्या अनुपस्थितीत कुटुंबातला इतका मोठा काटा एकटीनं काढू गेले... त्यांनीच मनावर घेतलं तरच हा सल निघेल. ऐकतीलच ते माझं... मुलांवर जीव आहे त्यांचा... नाही येत एखाद्याला प्रगटपणे वात्सल्य दाखवता... जगासमोर मांडायला ते काय प्रदर्शन आहे... पण मुलांनाही शंका यावी, सलावं इतकंही अलिप्त, कोरडं असू नये बाई....

इतकी गुंतली ती विचारांच्या गर्तेत की, शिवपुजा सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजक दाराशी आलेले तिला कळलेच नाहीत. दादानं येऊन, आई आई... म्हणून हाका घातल्या तेव्हा कुठे तिची तंद्री भंगली.

शिवपूजेच्या सोहळ्याच्या दिवशी परिसरातल्या बाळगोपाळांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बाळ-गणेशानं नृत्यासाठी आपलं नाव दिल्याचं ऐकून तिला आश्चर्य तर वाटलंच पण खूप आनंदही झाला. बोलला नाही ह्यातलं काहीच तो आपल्याकडे... ह्याची रुखरुखही वाटलीच.

"अरे.... गणेशा... बाळा, हे आलेत बघ तुझ्या नृत्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगायला...." तिनं अगदी उल्हासात साद घातली. आतल्या कक्षामधून धीम्या पावलांनी गणेशा आला.

"गौरीतनयाचा अधिकार ध्यानी घेता... ह्याचं नर्तन सगळ्यात शेवटी असेल... चालेल नं आपल्याला?" संयोजकांनी शिवानीपुढे हात जोडीत विचारलं. तिनं गणरायाकडे वळून बघताच, आपले काळेभोर मोठ्ठे मोठ्ठे डोळे मिटून घेत त्यानं नुसतंच "ठीकय" म्हटलं आणि त्यांना वंदन करून निघून गेलाही.
नि:श्वास सोडीत तिनं हसून सावरून घेतलं कसंतरी.

शिवपूजेच्या अगदी आदल्याच दिवशी महादेवांचं आगमन झालं. ह्या खेपी आपल्याबरोबर साधू, महंतांचा जमावच्या जमाव घेऊन आले. त्यांच हवं-नको बघता, त्यांची उस्तवार करता करता शिवप्रियेच्या नाकी नऊ आले... नाथांशी आपल्या मनीचं हे शल्य बोलायला तिला क्षणमात्रही एकांतसा वेळ मिळाला नाही.

****************************************************************

शिवपूजेच्या दिवशी सकाळपासून गणेशा कुठं दिसलाच नाही. शेवटी प्रस्थान ठेवायची वेळ झाली... तिची घालमेल कार्तिकेयाच्या नजरेतून सुटली नव्हती.

''आई, मी बघतो गणेशाकडे... तू नीघ. काही लागलंच तर... तिथं येऊन सांगेन न तुला....", दादानं आपल्यापरीनं तिला नि:शंक करायचा प्रत्यत्नं केला. त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवून ती निघाली शेवटी.

शंख, भेरी, तुतारी.... ढोल, ताशा, घंटा ह्यांचा एकच नाद झाला..... महादेवांचा इशारा होताच नंदीनं आपलाकडं ल्यालेला शुभपाद पुढे टाकला, शिंग हलवून त्यानं आपला आनंद व्यक्तं केला... अन पाठीवरल्या दैवी ओझ्याला संभाळीत तो तालात झुलत चालू लागला.

अंगण ओलांडताना तिसर्‍यांदा गौरीनं मागे वळून बघितलं, तेव्हा कुठे दादाचा हात धरून चौकटीत उभा गणेशा दिसला तिला. आपली सारी माया नजरेतून त्यांच्यावर सांडीत तिनं मान वळवली.

शिवपुजेचा सोहळा संपन्न झाला. अन सायंकाळच्या मऊ सोनेरी उन्हांत रंगमंचावर विविध गान-नृत्याचे कार्यक्रम सुरू झाले. आपले विशाल नेत्र मिटून घेऊन महादेव ध्यानस्थच होते.

गौरीचं चित्तं लागेना. मधेच कधीतरी "आलेच हं... " म्हणून ती रंगमंचाच्या मागे गेली. तिथं बाळ गणेश एका चौरंगावर बसला होता. कार्तिकेय, गणेशानं आपल्यामते केलेल्या तयारीवर त्याच्यामते शेवटचा हात फिरवीत होता. तिची चाहूल लागताच दादा बाजूला झाला.

तिनं पुढे होऊन त्याचा कललेला बाळमुगुट सरळ केला अन त्याची मस्तकामागची गाठ जरा अधिक घट्ट केली. उत्तरीयाला कमरेभोवती एक वेढा देऊन तिनं शेल्यातून काढलं. शेल्याची गाठ घट्टं केल्यावर ते अधिक चापून-चोपून दिसू लागलं. गणेशानं हात नीट हलवता येतायत ना, ते पाहिलं. तिनं त्याचे बाजूबंद दंडावर वरती चढवले अन घट्ट केले. जरा जास्तच घट्ट झाल्याचा कण्ह त्याच्या तोंडून येताच थोडे सैलही केले... गळ्यातला मौक्तिक हाराचं पदक वळलं होतं..... ते सरळ केलं.

पायातल्या घागर्‍या जुन्याच अन बर्‍याच वजनदार होत्या... बाळाच्या पायांना पेलणं शक्यच नाही...
"... अरे, इतक्या जड घागर्‍यांनी कसं.." तिनं सुरूवात केली बोलायला पण गणेशानं "शूssss" म्हणून थांबवलं तिला. बाहेर कुणी शिवस्तुती गात होतं.... तिथवर आवाज गेला असता बोलण्याचा.

"... तातांच्याच.... जुन्याच आहेत..." असं तिच्या कानी कुजबुजला तो. डोळ्यांत येणारं धुकं आड सारीत तिनं सार्‍या सरंजामावरून नजर फिरवली. ते राजस रुपडं डोळे भरून मनात साठवून घेत ती वाकली अन त्याच्या मस्तकाचं हलकं चुंबन घेऊन निघण्यासाठी वळली.

एक चांदण्यासारखं हासू गणेशाच्या मुखावर प्रगटलं अन पटकन वाकून त्यानं आईच्या पायावर डोकं ठेवलं. तिनं भरलेल्या गळ्यानं आशीर्वचन म्हटलं.... अन गडबडीनं आपल्या डोळ्यांतल्या काजळाची एक तीट अगदी तुटलेल्या दाताजवळ लावली. आता दादा अन गणेशा दोघही मिस्किल हसत होते.

पुन्हा शिवानी देवांच्या डावीकडे येऊन बसली तेव्हा आधीची हुरहुर शमून आता गणेशाच्या नाचाची हुरहुर चालू झाली होती, तिच्या मनात. 'काय बसवलय कोण जाणे... कधी करीत होता तयारी... अगदी मलाही कळू न देता... इतका का दुरावा.. की, आम्हा माता-पित्यांना सुखदाश्चर्याचा धक्का द्यायचा होता... कोण जाणे... अशी कशी माता-पित्याच्या नकळत मोठी होतात मुलं...

'तो मोठा? मला न कळवताच मोठा होत राहिला... अगदी सवरू दिलं नाही... ह्या धाकुट्याचं तसं नाही.... गणेशाच्या बाळपणीचा क्षणक्षण जपायचाय मला... अन तरीही....'

कार्यक्रमाच्या संयोजकांनी गणेशाच्या नावाचा पुकारा केला..... "... शिवपूजेस्तवं आता गौरीतनुज बाळ गणपती नृत्य सादर करीत आहे"

समोरचा भरजरी पट वर उचला गेला अन भल्या थोरल्या मंचावर मध्यावर छोटा गणेशा दीड पायावर नर्तनाची मुद्रा घेऊन उभा दिसला.... गडबडीने त्याने महादेवांच्या अन शिवानीच्या दिशेनं वाकून नमस्कार केला अन पुन्हा गंभीर चेहर्‍यानं त्याच मुद्रेत उभा राहिला.

मृदुंगावर थाप पडली.... पहिल्याच आवर्तनात गणेशानं सुरेख गिरकी घेऊन सम दाखवली. आणि सभेत वाहव्वा उठली...

मग गज परण झालं, हीरन परण झालं... थोड्या अननुभवी पखवाज वादकालाही संभाळत गणेश कमालीचं अप्रतिम नाचत होता. गौरीच्या चेहर्‍यावर कौतुकाची लाही फुटत होती... इतक्यात...
हातावर टाळीचा ताल देत फुललेला श्वास अन स्वर संभाळीत गणेशा रंगमंचावर पुढे आला.... अन त्यानं परण म्हणायला सुरूवात केली...

ते ऐकून गौरीचा वरचा श्वास वरती राहिला अन खालचा खाली. ती डोळे विस्फारून बघू लागली, आपल्या कानांवर तिचा विश्वास बसेना...

महादेवांची तंद्री भंगली.... त्यांनी डोळे उघडले... नंदी सजग झाला...

बाळ गणेश अतिशय एकाग्रतेनं शिवतांडव परण म्हणत होता... पखवाजवादकाची लय पुढे-मागे होऊ लागली. सुहास्य मुद्रेनं एकटक पहात असलेल्या महादेवांनी क्षणात हातात आपला डमरू घेतला.
डमडम डडड..डमडम...

गणेशानं चमकून डोळे उघडले... साक्षात, शंभो आपल्य दिव्य साजावर तालाची साथ देत होते. त्यानं सावरून जमून आपलं म्हणणं पूर्णं केलं....

हे नऊ आवर्तनांचं शिवतांडवं परण... हे नाथांनी कुणालाही सांगितलेलं शिकवलेलं नाही... ह्याचे बोल कुणालाही ठाऊक नाहीत.... हे गणेशानं कसं आत्मसात केलं असेल.... समोर चालेल्या अद्भुताकडे बघता बघता, शिवांगी, एकीकडे विचारही करीत होती...

एव्हाना महादेवांच्या भूतगणांचा अध्यक्ष त्यांचा प्रिय कालभैरव... त्या नवोदित वादकाला बाजूला सारून स्वत: पखवाजावर बसला होता. त्यानं मारलेली थाप विजेच्या कडकडाटासारखी आसमंत ताडत गेली.

क्डांन्न धातिरिकिट तकतिरिकिटतक धाsss
धांक्डं धा तिरिकिट तांक्ड ता तिरिकिट...
डमडम ड्डमडडम डमडम ड्डमडडम

दोन आवर्तनं लय संभाळायला घेऊन तिसर्‍या आवर्तनात गणेशानं शिवतांडवाची पहिली पावलं टाकायला सुरूवात केली.... आवेशानं, आणि आत्मविश्वासानं त्यानं दाखवलेल्या मुद्रा, घेतलेली गिरकी.... हे सगळं सगळं मोहक होतं, वेधक होतं.

धिडंग तिटकता गदिगन... धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...
सत्तावीस गिरक्या... त्यातली प्रत्येक स्वत:भोवती अन नऊ अशा गिरक्यांत रंगमंचाला फेरी घालीत गोल....

आठव्या आवर्तनाची शेवटली गिरकी घेऊन गणेशा प्रेक्षकांसन्मुख झाला अन त्याच्या लक्षात आलं की तातांचं स्थान रिक्तं आहे.... सारी सभा तटस्थ होऊन रंगमंचाकडे बघतेय.... पुढं काहीही घडू नये असं वाटलं त्याला... पण काळ पुढे सरलाच... अन कालभैरवानं हात उचलला...

आपल्या शेवटच्या आवर्तनातल्या पखवाजाच्या पहिल्या बोलावर गणेशानं आपलं घागर्‍याल्यालं गोमटं पाऊल जमिनीवर आपटलं अन त्याच क्षणी पृथ्वी डोलली... क्षणिक झांज आल्यागत तिचा तोल गेल्यासारखं वाटलं.... अन... आश्चर्यचकित झालेल्या गणेशाचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना....
साक्षात शिवशंभो त्याच्याच मागे त्याच्याच मुद्रेत उभे होते... समस्तं देव-देवतांनी फुललेलं सभागृहं चित्रासारखं तटस्थ झालं होतं. काळ थांबल्यासारखा वाटतो न वाटतो, तोच महादेवांनी अन गणेशानं एकदमच पुढचा बोल नृत्याकारला... एकाचवेळी पुन्हा एकदा सारी सृष्टी थरारली.... पुन्हा एकदा धरती शहारली, डळमळली...

ह्यावेळी मात्रं शेषाची ध्यानमुद्रा भंगली.... तो सजग झाला... आपल्या बाळाच्या लीलेमधे सहज अन मनापासून सामील झालेल्या भूतनाथाचा आवेश त्याला खराखुरा जाणवला.... अन तो फणी सावरून बसला.... आता डोलणार्‍या पृथ्वीला दहाही फण्यांवर तोलून धरण्यासाठी सज्ज झाला...
हर्षित गणेशानं शिवशंभोसारखाच आवेश दर्शवीत अत्यंत उन्मादात पुढले बोल नाचायला सुरूवात केली.

मागे प्रत्यक्ष तात तेच भाव मुद्रांकित करतायत ह्याचं सुखद भान घेऊन बाळ गणेश नाचत होता. प्रत्येक हालचाल, शरीराचा प्रत्येक नृत्याकार, प्रत्येक भावमुद्रा... अगदी अगदी सारखी. गणेशाची सावली असल्यागत नृत्यमग्न महादेव की, त्याच्यावर पित्याच्या वात्सल्याची, स्नेहाची सावली धरून महादेव.... समोरच्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न... पण कुणालाच ह्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नाही...

आज ह्या दोन्हीचं उत्तर एकाच कृतीत देऊन शिवानं गौरीच्या मातृत्वाला नव्यानं अर्थ दिला होता. आपल्या लहानग्याच्या कौतुकात, बाळ-लीलेत सामील होण्याचा आपल्या विरागी, विरक्त नाथांचा हा अभिनिवेश.... वात्सल्याचं, प्रेमाचं हे रूप... हे प्रगटीकरण.... अपार सुखानं शिवानीची दिठी ओलावली.
धिडंग तिटकता गदिगन... धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...धा धागिन ता तागिन...
सत्तावीस गिरक्या.... महादेवांनी लहानग्याचं मनोगत जाणून त्या जागीच घेतल्या तर.... गणेशानं स्वत:भोवती फिरत महादेवांना तीन प्रदक्षिणा घातल्या.

शेवटी तडिताघातासारखा, काडकन समेवर आलेल्या कालभैरवानं पखवाजावरला हात उठवला तेव्हा गणेशानं तातांसमोर स्वत:ला घालून घेतलं होतं. देव-देवता एकच जयघोष करीत होते. घामाने थबथबलेल्या गौरीतनयाचा हात धरून शिवशंभो स्वस्थानी परतले. त्यांनी त्याला उचलून आपल्या मांडीवर बसवलं. बाजूलाच बसलेली, डोळे टिपणारी‍या गौरी गडबडीनं आपल्या पदरानं बाळाचं अंग पुसू लागली, वारा घालू लागली... थकलेल्या गणेशानं सहजं मागे आपल्या पित्याच्या छातीवर क्लांत होऊन मस्तक टेकलं आणि सहज सुखानं डोळे मिटले...

मनात म्हणाला.... भरून पावलो, तात... ह्यापरतं मागणं नाही...

गौरीनंदन अजूनही धापत होता. उष्णतेनं गौरकांतीला अरूणझळाळी चढली होती. त्याची काहिली, तगमग बघून देवांनी अजून एक अवचित केलं...

त्यांनी आपल्या माथीचा चंद्रं उतरवून बाळाच्या मस्तकी दिला... गणेशानं चमकून आपल्या पित्याकडे बघितलं... भालचंद्राला दिसलं की, हलाहल प्राशन करून पोळलेल्या, जळणार्‍या कंठाला कायम वेढून शैत्य देणारा नागराजही त्यांच्याच आज्ञेनं गणेशाच्या दिशेनं उतरतो आहे. भरलेल्या डोळ्यांनी तो त्यांच्या कुशीत शिरला. बाळ गणेशाच्या मस्तकाचं अवघ्राण करणारा स्निग्ध, स्नेहाळ शिव, ह्या दृश्याकडे डोळे भरून पहाणारी, एका हाताने कार्तिकेयाला वेढून उभी शिवानी...

एक संपूर्ण देव-कुटुंब... ह्यापरता अनुपम सोहळा ह्यापूर्वी झालाच नाही... शंख, कर्णे, तुतार्‍या, भेरी, ढोल, घंटा... अन ह्यावरही उच्च रवात गाजत असलेला शिव-कुटुंबाचा जयघोष... ह्या सगळ्या-सगळ्यातूनही सार्‍यांच्याच मनात गुंजले शिवाने उच्चारले पित्याचे आशीर्वचन...

बाळा, गौरीतनुजा, तुज... मंगलमूर्ती म्हणोत, ह्यापुढे तुझा मान अग्रपूजेचा... अगदी माझ्याही आधी...
सार्‍या अनिष्ट कल्पना, शंका-कुशंका ह्यांना निवारून सगळ्यांचे मार्ग निर्वेध, नि:ष्कंटक करणारा विघ्नहर्ता म्हणून तुला पुजतील... माझ्या सुता, माझ्या लाडक्या...
शिवपुत्र सुखिया झाला...

- दाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवळ अप्रतिम !! काही शब्दच सुचत नाहिये वर्णन करायला Happy

तांडव नृत्य डोळ्यांसमोर उभं राहिलं.

अफाट लिहीलंय..
इतके दिवस नाव बघुनही, निवांत वेळ असेल तेव्हाच वाचायचं म्हणत वाच्लं नव्हतं.. आजचा दिवस सार्थकी लागला!
केवळ अप्रतिम !

दाद,
प्रचंड सुंदर....!
शब्दयोजना आहेच सुरेख, पण खरे श्रेय मांडणीला!
त्यातून पुढचे श्रेय कल्पनेला.... Happy
'व्व्वाह' (मनापासून दाद!)

मराठीत परण..हिंदीत.....परन १ - परन १ संज्ञा पुं० मृदंग आदि बाजों को बजाते समय मुख्य बोलों के बीच बीच से बजाए जानेवाले बोलों के खंड!
गुगलवर सापडलेला अर्थ!

apratim likhan.

खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.
परण म्हणजे पखवाज (अधिकतर), किंवा तबल्यावरही वाजवला गेलेला बोलांचा समुहं.... जो बोलून मग वाजवतात.
विशेषतः निसर्गात, रोजच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांना बोलांमधे बांधून ती वाजवतात. ऐकताना ती घटना अनुभूत होते.
उदा. गजपरण. हत्तीची चाल, त्यावरल्या अंबारीत बसलेल्यांचं हलणं, डुलणं प्रतीत होईल असे बोल असतात.
हीरन परण - हरणाचं छोट्या उड्या मारीत जाणं, मधेच थांबून कानोसा घेणं, मग हल्ल्याची चाहूल लागली तर चौखूर उधळणं...
झाकीरनं गेंद परण वाजवलेलं ऐकलय मी Happy

हे माझं खूप आवडतं लिखाण. वर्षपूर्तीच्या निमित्ताने वर काढून ठेवतो. एका अविस्मरणीय अनुभवाबद्दल दाद यांना कसे धन्यवाद द्यावे तेच कळत नाही. Happy

खूपच सुंदर !!!!!!
आज पहिल्यांदाच वाचले..... धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद!!!!!!!!!!!!

दाद, तुम्हाला दाद कोणत्या शब्दांत द्यावी हेच कळेनासे झाले आहे! हे लि़खाण वाचता वाचता डोळे कधी भरुन आले ते कळलेच नाही - एकीकडे डोळे पुसतच वाचीत होते अन शेवटी हसू आणि आसू मिसळले. अत्यंत तरल, मृदु भावांना असे सुंदर शब्द देणे ही तुमचीच हातोटी बनलीय! मी पहिल्यांदाच वाचली ही कथा. कशी काय निसटली ही माझ्या वाचण्यातून माहित नाही - पण अतिशय आवडलीय - प्रिन्टाऊट काढून घेतलेय - आई बाबांना पण वाचायला देणार आहे. असेच लिहीत रहा हीच शुभेच्छा!

अमी

आधी ही वाचला..होता.. तेव्हाही अगदी भावना विवश होउन बहुतेक प्रतीसाद दिला नव्हता... आज ही तिच अवस्था झालेली आहे.
हे जे काही आहे ते थेट डोळ्यापुढे उभं राहतं.. काही तरी पवित्र, सुंदर, दैवी .. असं काहीसं.
असं वाटतं आपण.. थेट कैलासावर जाउन गौरीतनयाचं न्रुत्य बघतोय.. आणि देवधी देवाने साथ दिल्यावर एक अश्रु निखळ्तोच..

गौरीची तळमळ.. अन हूरहूर अगदी मस्त पकडलीय.. आइच्या भावना..:)

शुध लेखनासाठी माफी असावी. धडाधड येत गेलंय.

Pages