मीमराठी.नेट कविता स्पर्धा (प्रथम क्रमांक)

Submitted by अभय आर्वीकर on 21 April, 2011 - 05:25

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
.
गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------
१ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचा आज दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही कविता/गझल प्रथम क्रमांक विजेता ठरली आहे.
दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या एका शेतकरी माणसाची कविता/गझल पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
त्याबद्दल माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना, ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना, तसेच
माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना मी मन:पूर्वक अभिवादन करतो.

- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
मुटेजी,
परिस्थितीचं अगदी यथार्थ वर्णन !
पाणी गळ्यापर्यंत आल्याशिवाय, प्रत्यक्ष स्वत:वर बेतल्याशिवाय हालचाल न करण्याची सवय घातक ठरेल हेच खरं
Happy

मस्त, ज्ञानेशच्या 'कळावे तुला बारकावे कसे'ची आठवण झाली, मात्र आपली गझल वेगळीच पूर्णपणे! सामाजिक आशय !

मूड आवडला गंगाधरराव!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. Happy

...................................................

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, >>> हे समजले नाही.

तो शेर आरशाला उद्देशून आहे.
बहुधा याला अन्योक्ती म्हणत असावे.

आता आरशे सुद्धा एवढे नितिभ्रष्ट झालेत की, त्यांना नैतीकतेची चाड उरली नाही.
गुणवंताचे निरपेक्षपणे प्रतिबिंब दाखवायचे सोडून केवळ आपल्या सख्या-आप्तांचे सुमार रूपही गोंडसवाणे भासविण्याची भाटगीरी करायला लागले आहेत.
तर कधी धनद्रव्याच्या लालसेपोटी लांगुलचालन करायला लागले आहेत.
खरे तर, "आहे तसे प्रतिबिंब दाखवणे" हेच आरशाचे मुळ कार्य. पण नितिभ्रष्ट झाल्यामुळे निर्भिडपणे "खरे स्वरूप प्रतिबिंबीत" करण्याची आरशात हिंमतच उरली नाही.
असा काहीसा अर्थ.
त्याहीपुढे या शेराचे अधिक विश्लेषण करणे सहज शक्य आहे.

................................................

शिवाय ....बापु पेक्षा शाहु हा शब्द जास्त चांगला जमला असता असे वाटले

प्रगो,
कविता म्हणजे शब्दांचा खेळ असतो, असे मला वाटत नाही.

फुले-भीम-बापू,

यामध्ये
महात्मा फुले हे शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन गोर्‍या इंग्रजावर आसूड ओढणारे महामानव,
डॉ. भिमराव आंबेडकर म्हणजे उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचणारे महामानव.
महात्मा गांधी जनसामांन्यात स्वातंत्र्याची अभिरुची जागविणारे महामानव.

एकदम मुटे स्टाईल गझल....

सामजिक आशयाची

ज्ञानेश च्या 'बारकावे कुठे' ची आठवण अपरिहार्य आहे... खल्लास गझल आहे ती

१ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचा आज दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही कविता/गझल प्रथम क्रमांक विजेता ठरली आहे.
दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या एका शेतकरी माणसाची कविता/गझल पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
त्याबद्दल माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना, ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना, तसेच
माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना मी मन:पूर्वक अभिवादन करतो.

- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------

प्रथम क्रमांकाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !!! गझलेतून सामाजिक विषयाला हात घालण्याचं कसब अप्रतिम आहे. रचना मनापासून आवडली.

अवांतर : प्रथम क्रमांक नसता तरी या रचनेतला भिडणारा आशय, तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालं नसतं.

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

व्वा १ नंबर अगदी... Happy
जियो ...सुंदर रचना ... मुटे साहेब अभिनंदन ...आणी आभाळ भर शुभेच्छा

Pages