तुम्हे याद हो के न याद हो - १९

Submitted by बेफ़िकीर on 30 August, 2011 - 03:26

एकदा पडलं प्रेमात की होतो हुषार माणूस!

डेक्कन ते गरवारेच्या वाटेवर उमेश एका झाडामागे उभा राहायचा. मैत्रिणींबरोबर कॉलेजला जाणार्‍या नितुला ते कळलेले होते. तेव्हापासून जाता येता ती त्या झाडाकडे बघायची. एकदा तो आहे की नाही हे तपासायला आणि एकदा प्रेम व्यक्त करण्यासाठी! मैत्रिणींना सुगावा लागू न देता हा प्रकार काही दिवस चालला पण एकदा दोन मैत्रिणींना उमेश दिसलाच! त्या दिवसापासून तेही बंद झाले.

प्रेम!

एका दृष्टिक्षेपावर आणि एका नजरेस पडण्यावर दिवस दिवस कुर्बान करणे, आज कोणता ड्रेस घातला आहे येथपासून ते आज किती वेळा नजरानजर झाली याचा हिशोब पाठ होणे! प्रत्येक लकब, सवय इतकी मनात भिनणे की आता हा किंवा ही कसा किंवा कशी वागेल त्याचा अंदाज येऊ लागणे! साध्या साध्या अदा आणि विभ्रम क्षणोक्षणी आठवणे!

जीवनाच्या ताजेपणाचा धबधबा सुरू झाला की आयुष्यभर पुरू शकतो.

कितीही कवींनी शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला तरी पार्‍यासारखे निसटणारे प्रेम व्यापून मात्र राहते आयुष्याला! त्या एकाच भावनेवर आणि भावनेसाठी तहानलेली माणसे कित्येक दशकांचे आयुष्य सोसत राहू शकतात.

घरचा प्रचंड विरोध, कडक नियम, नजरकैद आणि मनासारखे होऊच देणार नाहीत याची भीती मनाची तडफड तडफड करण्यास पुरेशी होती. सकाळी उठल्यापासून ते रात्री स्वप्नांनी मिटलेल्या पापण्यांबाहेर रांगा लावेपर्यंत दुसरा विचारच मनात नव्हता. आयुष्यातील इतर सर्व बाबी आता गौण ठरलेल्या होत्या. अभ्यास, कॉलेज आणि मैत्रिणी! हे सर्व घटक केवळ घरापासून शरीराने किंवा मनाने लांब जाण्यास सहाय्यकारक ठरणे इतकीच जबाबदारी घेत होते.

सगळ्या मैत्रिणींना गुंगारा देऊन आणि दोन पिरियड्स स्वतःच बंक करून निवेदिता आता गरवारे कॉलेजच्या पार पार नदीकडच्या बाजूला एकटी बसलेली होती. नदीला नदीचे स्वरूपच नव्हते. कसाबसा वाहणारा जणू एक नालाच! अनेक धरणे बांधून त्या नदीच्या प्रवाहीपणाला खीळ घालून तिच्या साठलेल्या पाण्याचे वाढलेल्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी शोषण होत होते. धरणांना अडखळून, साकळून आणि कशीबशी पुढे धाव घेऊन नदी एका नाल्याच्या स्वरुपात त्याच लोकसंख्येने केलेल्या कचर्‍याला आपल्यात सामावून घेत जमेल तशी वाहात होती. नदीला पाण्याचेच अस्तित्व असल्याने तिचे अश्रू जाणवण्याची शक्यताच नव्हती. पण प्रत्येक थेंब जणू आकांतच करत आहे असे नितुला वाटले.

या जगात जन्म घेणे हे जर माझे हेतूपुरस्पर केलेले काम नसेल तर जन्म घेतल्यानंतर कसे जगायचे यावर या जगाची एवढी बंधने का? एवढी धरणे का बांधतात माझ्या प्रवाहीपणाला?

उमेश राईलकर हे सर्वच दृष्टीने खरे तर योग्य स्थळ होते. जर ओळखच झाली नसती तर पुढेमागे कदाचित हेच स्थळ एक स्थळ म्हणून बघायलाही आई बाबांना काहीच वाटले नसते. उलट आनंदच झाला असता. म्हणजे नदीने कुठे पोचावे याबाबत माणसांचा निर्णय झालेला होता. मात्र कसे पोचावे याबाबतचे नियम कठोर होते. आज, या पातळीलाच उमेश राईलकर ही व्यक्ती इतकी जवळची होणे कुणालाच मान्य नव्हते.

नितुने बॅग बाजूला ठेवत दोन्ही गुडघ्यांवर कोपरे रेलली आणि नदीच्या अर्धमेल्या खळाळाकडे नजर लावून बसली.

तिचीच एक बट तिच्याच डोळ्यांवर ओघळली. आपले केस स्वच्छंदपणे उडणे या जगाला सुंदर वाटते. आपली नैसर्गीक सुंदर वागणूक मात्र स्वच्छंद! आजवर केलेल्या संस्कारांप्रमाणेच आपण वागलो. कधीही कोणालाही दुखावलेले नाही. सर्वांना योग्य तो सन्मान दिला. लाघवीपणा आपल्या वागण्यात ओतप्रोत भरलेला आहे. आई आणि बाबा यांच्यावर आपण जमेल तितके पण तुडुंब प्रेम करून त्यांनी जन्म दिलेल्या अपत्याचा त्यांना अभिमानच वाटेल असे वर्तन केलेले आहे. कधीही कोणत्याही इतर मुलाच्या बाबतीत असे झाले नाही. फक्त उमेशच्याच बाबतीत अगदी पहिल्याच दिवसापासून झाले. आपला स्वभाव स्वच्छंद नाही, जबाबदार आहे. अभ्यासातही आपण कधीच मागे पडलो नाहीत. असामान्य बुद्धिमत्ता नसली तरी ठीकठाक मार्क्स मिळवलेले आहेत. मैत्रिणींमध्ये आपण प्रिय आहोत.

मग हे सगळे असताना केवळ उमेशशी मैत्री होणे, उमेशवर जीव जडणे याला इतका विरोध कशासाठी? उलट राईलकरांशी बोलून ठेवता येत नाही का? आपल्याला विरोध करून काय साधणार आहे त्यांना? इतकी प्रकरणे झाली कि पर आपली आणि उमेशची आणि दोघांच्या घरच्यांचीही बदनामी झाली. आपण वीष काय खाल्ले! काय काय झाले! इतके झाल्यावर आपले लग्नच करून टाकले नाही हे काय कमी आहे म्हणा! इतके झाल्यावरही आपल्याला मैत्रिणींसोबत का होईना पण कॉलेजला सोडत आहेत हे काय कमी आहे! पण हे सगळे काय चाललेले आहे?

का असे होते की प्रत्येक क्षण उमेशचीच आठवण घेऊन येतो? का आपल्या मनावर त्याच्या स्मृतींची धुंद आहे? आपण त्याला विसरू का शकत नाही? विसरणे तर दूरच, आपण त्याला?एक दिवस पाहिले नाही तर बेचैन झाल्यासारखे का होते? लक्ष का लागत नाही? आपण त्याला भेटण्यासाठी चक्क एक पेपरच ठेवला आहे. तो आता या वर्षी द्यावा लागेल. निदान एटीकेटी आहे म्हणुन तितके तरी आपण करू शकलो. पण आपण तसे का केले?? काय मिळाले आपल्याला त्या कुडजेगावच्या सहलीतून? एक अविस्मरणीय सहवास? जो बेकायदेशीर होता? आणि त्यानंतर झालेले सगळे प्रकार? आपला एक पेपर न देताच आपण कुडजेगावला गेलो होतो ही घटना आई बाबांना कळल्यावर किती शरम वाटली असेल त्यांना आपली?

नितुच्या डोळ्यात ओलसरपणा आला. काही असले तरी तिला तिच्या आई वडिलांचा व त्यांच्या संस्कारांचा अभिमान होताच! केवळ एक दिवसाच्या बेकायदेशीर सहलीसाठि अख्खा एक पेपरच न देणे ह कदापीच मान्य करण्यासारखे नव्हते. तेही या वयात, जे केवळ शिकून मोठे होण्याचे वय होते.

वेणी पुढे ओढून घेत तिच्याशी चाळा करत निवेदिताने पुन्हा विचार सुरू केले.

प्रश्न खूप होते. सर्व प्रश्नांचे उत्तर एकच होते. नदीने स्वतःला हवे तसे नाही तर माणसांना हवे तसे वाहायचे असते. मग स्वतःचा एक साधा लहानसा ओढा झाला तरी चालेल. सर्वांचे अपराध पोटात घेऊन आणि तरीही सर्वांची तहान भागवत कुठेतरी जाऊन मोक्ष मिळवायचा असतो. स्वतःचे अस्तित्व नष्ट करून घेतानाही आनंदी भासायचे असते.

एकच उत्तर!

आई बाबांशी आता काहीही बोलण्यासारखी परिस्थिती राहिलेली नव्हती. उमेश राईलकरचे नांव निघणे तर दूरच, निवेदिताला तो आठवणारही नाही याची दक्षता घेतली जात होती पण ती अर्थातच असफल ठरत होती. दिशाहीनतेचा प्रवास सुरू झालेला होता. ज्यात कशावरच कोणाचे नियंत्रण नव्हते. नितुचे लग्न इतरत्र ठरण्यावर उमेशचे आणि उमेशच्या आयुष्यात काहीही होण्यावर नितुचे!

पण ही परिस्थिती निवेदिताला अमान्य होती. खूप विचार करून ती या निष्कर्षावर आलेली होती की तिचे उमेशवर प्रेम असण्यात गैर काहीही नाही आणि आत्ता शांत राहून तीन चार वर्षांनी त्याच्याशी लग्न करणे हा पर्याय आई वडिलांना न रुचण्याचे काही कारणच नाही. तेव्हा हा विषय विशिष्ट पद्धतीने हाताळायचा व त्यासाठि उमेशला विश्वासात घ्यावे लागेल. त्याला हे समजावून सांगावे लागेल की काही महिने आपण एकमेकांना पूर्ण विसरलो आहोत असे जगाला भासवणे महत्वाचे आहे. तरच आपल्यावर विश्वास बसेल आणि तरच आपण काहीतरी ठोस करू शकू.

उमेश!

उमेशला कुठे, कसे आणि कधी भेटता येईल? विचार करत आहोत तितके सोपे आहे का ते?

खट्टू होऊन निवेदिता उठली. आता ती वर्गात जाणारच नव्हती. ती सरळ घरी जाणार होती. वाटेतल्या झाडापाशी उमेश चोरून उभा असला तरीही असे वाटेत काहीही बोलणे शक्यच नव्हते. ही गोष्ट बोलण्यासाठी एक व्यवस्थित सिच्युएशन निर्माण करावी लागेल हे नितुला माहीत होते.

येती मे महिन्याची सुट्टी??? काय करायचे त्या सुट्टीत?? काही करता येईल?? निवेदिताचे विचार कर्वे रोडच्या वार्‍यापेक्षा वेगाने धावू लागले.
===========================================

खरच सिच्युएशन निर्माण करायला हवी होती. पण कशी आणि कधी करणार? आपले कशावरही नियंत्रण नाही ही जाणीव उमेशला पोखरत होती.

सांगोपांग विचार करून तो वेगळ्याच निर्णयाला पोचलेला होता. प्रकरण इतके कमाल पातळीला पोचलेले होते की खरोखर विष घेऊन नितुचे कदाचित काहीही झाले असते 'आत्महत्येला प्रवृत्त करणे' हा गुन्हा केवळ याच कारणासाठी उमेशवर लागू शकला नव्हता की तो प्रत्यक्ष घटनास्थळी नव्हता. त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याचा कोणताही पुरावा नव्हता. खरे तर दोन पुरावे होते! पण त्यातला एक महत्वाचा पुरावा म्हणजे रास्ते वाड्यातील माणसे जीव गेला तरी उमेशच्याच बाजूने बोलणार होती. दुसरा पुरावा म्हणजे अगदी पहिल्या भेटीत सिंहगडवर काढलेले फोटो हे उमेशने स्टुडिओतच ठेवलेले होते. स्टुडिओवाल्याने बातम्या वाचल्या असतील हे उमेशला समजत होते. पण तो अजून पोलिसात येण्याइतका धीट तरी झाला नसावा किंवा त्याला त्याचे महत्व तरी जाणवले नसावे किंवा तो त्याच्याकडचे ते फोटो विसरूनच गेला असावा हे उमेशचे आडाखे होते. अर्थात, आता इतका कालावधी झालेला होता आणि इतकी प्रकरणे झालेली होती की हे दोघे कधीतरी सिंहगडला ठरवुन दोघेच गेले होते आणि तेथे त्याने नितुचे फोटो काढले हे प्रकरण आता समजले तरी काही विशेष घडणार नव्हतेच!

उमेशच्या डोक्यात मात्र निराळेच विचार चालू होते. जे जसे चाललेले आहे ते तसे चालू देण्यात त्याला काडीचा इन्टरेस्ट नव्हता. त्याला ड्रायव्हिंग सीटवरच बसायचे होते. अनियंत्रीत पद्धतीने निवेदिताला प्राप्त करणे अशक्य आहे हे त्याला समजून चुकलेले होते. काहीतरी हमखास स्वरुपाचा तोडगा काढणे आवश्यक वाटत होते. एक तोडगा म्हणजे लग्नच करून टाकणे चोरून! पण ते जवळपास अशक्यच होते. कारण मुळात त्याला स्वतःलाच तशा परिस्थितीत त्याच्या घरच्यांनी स्वीकारले नसते तर निवेदिताला काय स्वीकारणार! नुसतेच पळून जाणे हा दुसरा उपाय होता. पण जायचे कुठे आणि नितुच्या वडिलांच्या स्टाफपासून वाचायचे कसे हा प्रश्न होता. तिसरा उपाय म्हणजे आई वडिलांना कन्व्हिन्स करून आपट्यांना भेटायला लावायचे आणि पुढे काही वर्षांनी या दोघांचे लग्न करू असे ठरवायला लावायचे. यावर त्याचे काहीच नियंत्रण नव्हते. चौथा उपाय म्हणजे .......

..... बाप रे... चौथा उपाय फार म्हणजे फार भयंकर होता...

नितुच्या बाबांनाच अद्दल घडवायची!

कोणी घडवायची? कधी, कुठे आणि कशी???

आणि मुळात का घडवायची??

का घडवायची या प्रश्नाचे उत्तर मात्र मन तडफेने देत होते...

'मला नितु हवी आहे आणि तिचे वडील तिल माझ्यापासून दूर करत आहेत म्हणुन त्यांना एकदाच अशी अद्दल घडवायची की त्यांनी घाबरून होकार द्यायला हवा'

कितीही वेळा झिडकारला तरी हा एकमेव उपाय आणि वेडा उपाय उमेशच्या मनात घर करू लागला होता...

.... अतिशय वेडा उपाय! अद्दल म्हणजे काय? मारहाण? धमक्या? चोरून त्रास देणे? काय करायचे? आपण असले काही करणार्‍यातले आहोत?? मुळीच नाही. मग आपटे घाबरणार कसे?

अरे पण हो! आजोबा? आजोबांसारख्या माणसाचा इतका जाहीर अपमान करणार्‍याला.....

.... एकदा अद्दल घडायलाच हवी...

कशी घडवायची ते नंतर पाहू... कुठे घडवायची ते नंतर पाहू...

.... कधी घडवायची.... ते मात्र... आत्ताच ठरवून टाकू...

सुट्टी! मे महिन्याची सुट्टी! दुसरा इलाजच नाही.

===========================================

"तुम्हीच काय, ज्या मुलामुळे आणि ज्या घरामुळे आपल्या बाळाने वीष खाल्ले आणि आपली बेअब्रू झाली त्यांना मीही कधीच माफ करणार नाही"

नितुची आई आपट्यांना सांगताना संतापलेल्या परंतु घुसमटलेल्या आवाजात बोलत होती. डेक्कनवर ते राहायला आले तेथे निवेदिताहे सगळे पराक्रम आजूबाजूच्यांना लगेचच समजले होते कारण नुकत्याच पेपरात ज्या बातम्या आल्या त्यातील सब इन्स्पेक्टर आपटे हेच नांव दारावर लागले होते आणि मुलीचेही नांव निवेदिताच होते.

अजून चार वर्षे बदली होणार नसल्याने पुणे सोडणे शक्यच नव्हते.

बेअब्रू होणे नित्याचेच झाले होते. आजूबाजूच्या बायका नितुच्या आईंशी बोलत वगैरे असल्या तरी त्यात एक हातराखलेपण वाटत होते. काहीसे अंतर ठेवल्यासारखे वाटत होते. निवेदिताशी तर तेथे कोणीच बोलत नव्हते. आणि तेथील तरुण मुले मुली तर या मुलीकडे पाहातही नव्हती. सक्त ताकीद होती त्या सर्वांना, 'निवेदिता आपटेशी' मैत्री वगैरे करायचा विचार करायचा नाही.

आपटे स्वतः खात्यातच असल्याने मात्र कुणी वावगे बोलत नव्हते इतकेच! बाकी सामाजिक आयुष्य हा प्रकार जवळपास संपुष्टातच आलेला होता. आणि त्याचाच सर्वाधिक त्रास नितु आणि तिच्या आईंना होत होता.

"मी त्याला सरळ करणार आहे... एकदाच... "

आपटे खिडकीतून बाहेर पाहताना शुन्यात पाहिल्यासारखे पाहात म्हणाले. त्यांचा तो ठेवणीतला आवाज नितुच्या आईला परिचीत होता. त्यांच्या मनात काघीतरी शिजते आहे हे त्यांना समजलेले होते.

"करा... खरच करा त्याला एकदाच सरळ... असे सरळ करा की आयुष्यात कुठल्या मुलीकडे पाहणार नाही... आणि हो... त्याच्या घरचे अगदी ताठ मानेने वावरतायत... तो म्हातारा तर म्हणे अजूनही चांगला हासत खेळत वागत आहे असे ऐकले आहे... यांच्या माना खाली गेल्या पाहिजेत... "

"त्यांनाही.............."

नितुच्या आईने आपट्यांकडे पाहिले आणि आपट्यांनी तिच्याकडे....

"त्यांनाही मुलगी आहेच की.... नुसती पेपरात बातमी छापून आणायला काय लागतंय????"

क्षणभर नितुच्या आईला तो विचार हीन वाटला. एका स्त्रीला कधीच असे वाटणार नाही की दुसर्‍या स्त्रीची अशी विनाकारण आणि कशात काही नसताना केवळ सूडबुद्धीने बेअब्रू व्हावी. पण दुसर्‍याच क्षणी त्यांना आठवला तो निवेदिताने वीष घेतल्यानंतरचा त्यांचा स्वतःचा आकांत! आयुष्यभर दम देण्यात घालवणार्‍या आपट्यांच्या मनातील जागे झालेले बापाचे प्रेम आणि गालांवर ओघळलेल्या सरी! पेपरमध्ये छापून आलेल्या मसालेदार परंतु आयुष्य नासवणार्‍या बातम्या! आणि त्याच क्षणी नितुच्या आईंना आपट्यांचा तो विचार पटू लागला. हळूहळू पटू लागला... आणि केवळ सहा सात सेकंदात.... त्या म्हणाल्याही...

"पण... हे... हे सगळे... कसे आणि कधी???.... कसे आणि कधी करणार???"

"आता... नितु .. नितुला पाठवून दे धुळ्याला... मावशीकडे.. ती गेली की इकडे करून टाकू काम..."

"म्हणजे... सुट्टीत??? मे महिन्यात???"

============================================

"झालं त्यात उम्याची चूक नाही इतकं तर पटतंय ना???"

विन्याने आप्पाला थेट प्रश्न विचारला तसा नुकतेच लग्न झाल्यामुळे सभ्य गृहस्थ होण्याची शपथ पाळू पाहणारा आप्पा गपचूप बसला.

"उम्याने काय काय सहन करायचे??? सांग ना मला.."

"विन्या... काही असले तरी हा काही उपाय नाही..."

"उपाय बिपाय गेले खड्यात.... मैत्री इज मैत्री"

"लेका आपल्यालाच पुन्हा धरतील... "

"आपल्याला कसे काय धरतील??आपण प्रत्यक्ष काहीच करणार नाही आहोत ना??"

इतका वेळ ऐकत असलेला राहुल आता मधे पडला.

"आप्पा... विन्या म्हणतो त्यात मला अर्थ वाटतो राव"

"तू गप रे"

राहुल्या थोडासा लहान असल्यामुळे अधूनमधून आप्पा त्याला गप करायचा. राहुलही गप्प बसायचा. आजही गप्पच बसला.

विन्या कसा काय गप्प बसेल?? त्याची स्वतःचीही एक प्रेमकथा होतीच की? त्याला उम्याचे मन समजत होते.

"आप्पा... ह्यात काय प्रॉब्लेम आहे ते सांग तर???"

"अरे बाप पोलिस आहे लेका तिचा... तुला काय आयुष्य म्हणजे डबडा ऐसपैस वाटले का?? शैला काहीही बोलते"

ही सगळी आयडिया शैलाताईने विन्याला सांगितलेली होती. लग्नापुर्वी जिला आप्पा वाड्यातील सर्वांसमक्ष 'ए शैले बावळट' अशी हाक मारायचा तिला तो आता व्यवस्थित 'शैला' म्हणू लागलेला होता.

हा बदल राहुल्याला आणि विन्याला खरे तर पचलेलाच नव्हता, पण आता खुद्द आप्पाच तसे म्हणत असल्याने पुर्वी ते जसे तिला 'तायडे चक्रम' वगैरे काहीही हाक मारायचे ते बंद करून आता व्यवस्थित 'शैलाताई' म्हणायला लागले होते.

या बदललेल्या परिस्थितीचा फायदा उपटून शैलाताईने एक चमत्कारीक योजना विन्याच्या गळी उतरवलेली होती आणि आत्ता तिघेही उमेशला काहीही न सांगता एका टपरीवर चहाचे कप रिकामे करत चर्चा करत होते.

"अजून काय पाहिजे??"

एका पोर्‍याने या अर्धा तास नुसतेच बसलेल्या तिघांना मालकाच्या आज्ञेवरून हा प्रश्न विचारल्यावर आप्पाने त्याला सांगितले.

"काय काय मिळतं?? चहा आणि बिड्यांशिवाय काही मिळतं का इथे?? आं?? बरं आम्ही उठावं असं म्हणायला इथे काय रांग लागलीय गिर्‍हाईकांची?? काळं कुत्रं फिरकलं नाहीये गेल्या तासात! जा कटिंग आण तीन!"

आप्पाच्या या पॅराग्राफवर खुद्द मालकही काही बोलत नाही हे पाहून पोरगं चहा आणायला धावलं!

"त्याच्यावर कशाला भडकतो तू??"

राहुल्याने आप्पाला जालिम सवाल केला.

"आप्पा, ऐक नीट जरा... आपला प्रत्यक्ष काहीही संबंध नाही.... आणि एकदा काम झाल्यावर प्रश्नच उरत नाही.."

विन्याने आग्रहच धरला तसे मग आप्पाने विचारले.

"किती किलोमीटर आहे तिथून??"

" दोनशे बावीस केवळ..... चार ते पाच तास"

"काय च्यायला कल्पना काढता राव तुम्ही एकेक.... डोकं फिरायची वेळ आलीय..."

"तू हे लक्षात घे आप्पा... की हे सगळे कुठल्याकुठे होणार आहे.. त्या नितडीचा बाप तिथे फिरकूही शकत नाही"

'नितडीचा बाप' या संज्ञेवर आप्पा आणि राहुल हासले तसा मग विन्याही हासला.

"हे सगळं बेकायदेशीर आहे विन्या"

"यात काहीही बेकायदेशीर नाही आहे, महाराजांनी सुरत लुटली ती स्वराज्य स्थापन करण्यासाठी, आपण सुरतेला जायचे ते उम्याचे सुराज्य स्थापन करण्यासाठी"

"तुला हा सगळा खेळ वाटतोय"

"मी तुझी साथ गृहीत धरू का नको धरू??"

या प्रश्नावर मात्र आप्पा गंभीर झाला. काही झुरके मारून झाले तेव्हा राहुल आणि विन्या आप्पाकडे प्रचंड गंभीरपणे बघत होते...

"मी आहे तुमच्या बरोबर"

आप्पाच्या या विधानावर हुरळून जाऊन विन्याने आणखी तीन कटिंग मागवले.

मग बर्‍याच मिनिटांनी राहुलने अजाण बालकासारखा प्रश्न विचारला विन्या...

"पण विन्या... लेका हे सगळं कधी करायचंय??? "

"सुट्टीत... मे महिना लागल्यावर.... "

=====================================================

६ मे, १९८६!

कडक उन्हाची दुपार! बारा वाजलेले!

निवेदिता आईबरोबर शिवाजीनगर बस स्टॅन्डवर होती. निवेदिता आत बसलेली आणि आई बाहेरून तिला सूचना देतीय!

ती बस सुटली त्यानंतर सहा तासांनी दुसरी बस होती... धुळ्यालाच!

त्या बसमध्ये रास्ते वाड्यातील तीन जण होते... आप्पा... विनीत गुजर... आणि राहुल...

ती बस सुटली तेव्हा आप्पा, विन्या आणि राहुलला कमिटमेन्ट दिलेली असूनही उमेश मध्यरात्रीच्या तिसर्‍या बससाठी शिवाजीनगरला आलाच नाही... कारण ... त्याच्या मनात फार फार वेगळे विचार होते...

... फक्त.... कुणाला म्हणजे कुणालाही... हेच माहीत नव्हते की...

आप्पा वगैरेंची संध्याकाळची बस सुटल्यानंतर .... त्याचवेळेच्या सुमारास...

........ संभाजी बागेत आपल्या मैत्रिणीसोबत एका गूढ कोपर्‍याकडे जाताना... त्या मैत्रिणीने आपल्याला फसवून येथे आणलेले आहे... आणि त्या कोपर्‍यात एक असा मुलगा उभा आहे... जो आपल्याला छेडत असतानाच...

...... सबइन्स्पेक्टर आपटेंची माणसे फोटो काढून उद्या पेपरमध्ये बातमी छापून देणार होती...

... की संभाजी बागेसारख्या सार्वजनिक ठिकाणी कॉलगर्ल्सचा सुळसुळाट....

हे... क्षमा अनंत राईलकर या निरागस मुलीलाही माहीत नव्हते...

==============================================================

-'बेफिकीर'!

.

गुलमोहर: 

अरे बापरे....आता पुढे काय्...त्या क्षमाला वाचवा कोणीतरी..मस्त झालाय हा भाग...

बिचारी क्षमा.....
आपटेचा प्लान फ्लोप व्हायला पाहिजे. उमेशचा काहीतरी भन्नाट प्लान पाहिजे.
आजचा भाग खुपच छान झाला..

मस्त लिहिता राव तुम्ही . . .

सटकली रे सटकली . . . .आपटेची खोपडी सटकली.
येवू दे रे येवू दे, उमेशची बारी येवू दे.

कडक
आयला डोस्क्याला शॉट लागलाय

आगावू सल्ला (फाट्यावर मारा हवंतर )
बेफि त्या गझला आणि कविता वेग्रे थोडें बाजूला ठेवून. हि कादंबरी पूर्ण करा आधी
फार उशीर होतोय प्रत्येक भाग यायला..
एकदा हि कादंबरी पूर्ण केलीत कि बिनधास्त मैफिल जमवा हवतर

shewat wachalya war tondatun fakt shiwich nigahli
kahi hi kara pan kshama la waachawa please

___/\___

कधी येणार पुढील भाग्...........................?
प्रति़क्षेत...........................................................

आता बस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.

अजुन होत्य क एक तास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स

निवेदाताच्या मनातील विचार-भावनांची सकारात्माक मांडलेली उलाढाल आवडली....

ती जरुरी होती... Happy

अभिनंदन!!!