श्रावण......

Submitted by किश्या on 1 August, 2011 - 01:32

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

१ तारखेला श्रावण सुरु झाला. श्रावणातला पहिला सोमवार आला. सोमवारी सकाळी सकाळी उठलो, खरं तर ऑफीसला जायचा खुप कंटाळा आला होता पण काही पर्याय नव्हता. तसंच कसं तरी आवरुन ऑफीस गाठलं. रुटीन प्रमाणे ईमेल चेक करुन झाल्या, मायबोली वर फेरफटका मारुन झाला, काम जास्त नव्हते म्हणुन जास्त बोअर होत होत. विचार करता करता मन उगाचच बालपणीच्या आठवणीत हरवले.

अजुनही आठवते पाचवीत असल्यापासून मी श्रावणात सोमवारी उपवास करायला लागलो. श्रावणी सोमवारी शाळेला सुध्धा अर्धा दिवस सुट्टी असायची. माझी शाळा म्हणजे घर आणि शाळेत १० फुटाच रस्ता फक्त. प्रत्येक सोमवारी शाळा सकाळी ८:३० ला भरायची आणि १२:०० सुटायची.

आमच्या घरी दिवस तसा फार लवकर सुरु व्हायचा. कदाचीत एखाद्या सकाळी सकाळ पासुनच पावसाची रिपरीप सुरु झालेली असायची. मी माझ्या कॉटवरुन खिडकीच्या बाहेर पाहील्यावर सुंदर पावसाच्या धारा दिसायच्या. खिडकी बाहेरच्या लिंबाच्या झाडाच्या पाणांवर पावसाचे थेंब अलगद ओघळलेले असायचे. विजेच्या तारांवर पाण्याची थेंबे ओघळताना दिसायची, जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात असलेले पाणी त्या वेळेस खूपच सुंदर दिसायचे आणि पलीकडल्या तिरावर ऊसाच्या शेतात असलेल्या मोरांचा आवाज सुंदर वाटायचा. तो गाईचा वासराला भेटण्याकरता काढलेला हंबरडा अजुनही कानात आहे. मी आपला खाटेवरुन हे सगळ डोळ्यात साठवुन घेत घेत पांघरुन आधिकच घट्ट लपेटुन घ्यायचो कारण त्या नदी किनार्यावरुन मस्त थंड हवा सुटलेली असायची आणि पत्रावर, झाडावर पडणारे पावसाचे थेंब कानात साठवुन घेण्याचा प्रयत्न करायचो. मग कधी तरी आळस झटकून उठावं लागायचं. अंघोळ वगैरे करुन मी तयार होईपर्यंत आई आमच्यासाठी सकाळीच भुक लागेल म्हणून काही तरी करुन ठेवायची. मग असायची शाळा, बहुतेक वेळेस अश्या पावसात प्रार्थना जरा घाईतच उरकली जायची.

शाळा संपल्यावर घरी जाऊन गरम गरम उसळ (शाबुदाण्याची खिचडी) खायला खुप मजा यायची आणि हा आनंद दुप्पट असायचा कारण नंतर शाळा नसायची. मग सोमावारी बाबा (अजोबांना) वाटले तर ते गावातील सोमेश्वराच्या मंदिरात रुद्र आवर्तने करायला जायचे. माझी मुंज झाली नव्हती तरीही मी बाबांच्या मागे लागून लागून त्याच्यासोबत मंदिरात जायला निघायचो. मंदिर साधारण १० मिनीटाच्या अंतरावर असेल. पण जाताना खुप मजा यायची. चिखलातून चालताना जी मजा येते ती इथे वर्णन नाही करता येणार. मग चालता चालता एखाद्या ठिकाणी चिखल हेरुन ठेवायचा, कारण पोळाही जवळच आलेला असायचा आणि त्यावेळे बैल करायचे वेध लागलेले असायचे. मंदिरात जाईपर्यंत हाच उद्योग. मंदिरात गेल्यावर मंद दिवा तेवत असायचा गावातले सगळे लोक दर्शनासाठी आलेले असायचे. आणि गावातील जवळपास सगळ्यांचे अभिषेक चालू असायचे. मंदिराच्या बाहेर त्या मंत्रोच्चाराचा जो आवाज असायचा त्यामुळे वातावरण एकदम भारलेले असायचे. आम्ही आपलं सोवळ नेसुन बाहेर चिंचा (उरलेल्या आणि किडलेल्या ) पाडण्यात मग्न असायचो. बर त्या वेळेस दगड जास्त उंच जातही नसायचा कारण सोवळ नेसलेल असायचा उगाच सुटायला नको म्हणुन सगळा कार्यक्रम अंग (सोवळं) सांभाळूनच चालायचा. आजोबांचा अभीषेक झाला की मी आधी त्यांचा हातातली फुलारी घ्यायला पळायचो कारण त्यात पंचामॄत (दही ,मध, दुध, साखर,साजुक तुप) असायचे. फक्त आजीला चमचाभर ठेऊन बाकीचे सगळे पिऊन टाकायचो. ते मला अजुनही खुप आवडते म्हणा. घरी आलो की परत फराळ. हे सगळे करेपर्यंत चार वाजलेले असायचे. आईची स्वंयपाकाची तयारी सुरु झालेली असायची आणी आमची जेवणाची :).

दोन चार दिवसांनी नागपंचमी आलेली असायची. आदल्या दिवशी रात्री आई भिंतीवर नागोबाचे चित्र काढायची. सोबतीला मी असायचोच जसे जमेल तसे रेघोट्या मारायच्या. ते झाले की आई कौतुकाने जवळ घेऊन म्हणायची 'माझा मन्या गं बाई किती गोड चित्र काढतो' . मग दुसर्‍या दिवशी सुरु व्हायची ती झाडाची शोधाशोध कारण झोका बांधायला हक्काची जागा पाहिजेना!! माझा झोका फिक्स असायचा त्या लिंबाच्या झाडाला. नागपंचमीच्या दिवशी तर खुप मज्जा यायची. कारण आम्ही गावातला एकुन एक झोका खेळायला जायचो, आणि कोणी नाही म्हणत नाही गावात कारण तशी म्हणच आहे कि पंचमीचे कमीत कमी पाच तरी झोके खेळायला हवेत मग आम्ही तिघे अभय, रघु आणि मी गावातील प्रत्येक झोक्यावर झोके खेळाताना ज्याचा झोका असेल त्याच्या सोबत स्पर्धा लावयचो ती अशी की ज्याचा झोका सगळ्यात जास्त उंच जाईल तो जिंकला. अक्षरश: हाताला आणि पायाला फोड आलेलेले असतानाही आमचा उत्साह कमी होत नसे. ह्या सगळ्यात माझाच झोका मला जास्त प्रिय असायचा कारण तिथे आमच्या शाळेतल्या सगळ्या मुली यायच्या. Wink

खेळुन येईपर्यंत आईचा स्वंयपाक झालेला असायचा. पुरणपोळी वर ताव मारुन डोळ्यावर झापड आलेली असायची पण आजीचे टुमणे मागे लागलेले असायचे कथा वाच कथा वाच. आता मी नाहीये गावाकडे पण आजीला नवीन वाचस्पती सापडला आहे, ती म्हणजे आमची वहिनी. कसेतरी वाचुन दुपारी एकच झोप काढुन परत झोके खेळायला आम्ही पळायचो.

परत आता वेध लागायचे ते पोळा (बैलांचा सण)

एखादे दिवशी बाबांसोबत माजलगावला जाऊन पोळ्यासाठी सगळ सामान घेऊन यायचे ते म्हणजे सुत, वारणीस, गोंडे करण्यासाठी लोकर, एक दोन घेरे (सुत कातायला ते लागायचे.) मग घरी आल्यावर बाबांच्या माघारी थोडेसे सुत घ्यायचे आणि एक चिखलाचा घेर्या घेऊन उगाचच शेतातल्या गड्यांसाखे फिरवायचे. कारण आमचे गडी आमच्या बैंलासाठी सुत कातायचे आणि आम्ही आमच्या चिखलाच्या बैलांसाठी. कारण आम्हीही बसल्या बसल्या खेळायला बैल करायचो. मला कधीच चिखलाचे बैल करायला जमले नाहीत. चपटे खेबडे नाही तर फेगडे बैल व्हायचे. माझ्या पेक्षा अभय फार छान बैल करायचा. तो मला जर माझ्या बैलांमळे चिडवत असेल तर मी त्याला म्हणायचो की माझे जपाणी बैल आहेत. पोळ्याच्या आदल्या दिवशी रात्री मग बैलाचा खांदेमळणी चालू व्हायची खांदेमळणी म्हणजे बैलांच्या मानावर बर्षभर काम करुन घटे पडलेले असतात त्यामुळे रात्री त्यांच्या खांद्याना लोणी आणि तुप लावून मळायचे असतात आणि सोनं ही त्यांच्या खांद्याला लावायचे असते. आता मी लहान असल्यामुळे सगळयात पहिला मान मला मिळायचा, अजुनही मिळतो. दर पोळ्याला आमचा गड्याचा फोन येतो मालक येता का पोळ्याला म्हणुन असो. लोणी लावून झाले की मग त्यांच्या काणात जेवायचे आमंत्रण द्यावे लागते. ते असे की उद्या आमच्या घरी जेवायला आहे उद्या तर न रुसता जेवायला या. पोळ्याच्या दिवशी तर काय मज्जा यायची. आमचे गडी सकाळीच आलेले असायचे. आणि कार्यक्रम असायचा बैल धुवायला न्यायचा. आता आम्ही लहान असल्यामुळे गडी आमच्या हातात बैल द्यायचे नाहीत म्हणुन आम्ही आपले गाईची वासरे घ्यायचोत बैलांसोबत.

मग त्यांच्या अंघोळी सोबत मी ही पोहुन घ्यायचो. मग घरी आल्यावर सगळ्या बैलांना तेल, गुळ, पाणी, मीठ पाजायचे. मग दुपारी तर फक्त नाश्ता असायचा. कारण संद्याकाळी सगळ्यांना जेवायला असायचे घरी म्हणजे सगळे गडी त्यांची फॅमीली. मग सगळ्या गड्यांच्या घरचे म्हणजे त्या काकू येउन स्वंयपाकच्या तयारीला लागायचे. कारण त्या दिवशी सगळ्या माणसांसोबत सगळे बैल, गाई वासरे, ह्यांना जेवायला असायचे. तुम्हीच विचार करा की ७० गाई आणि १६ बैल, १५ ते २० वासरे किती स्वंयपाक लागत असेल ते.

हे सगळ होईपर्यंत दुपारी आम्ही बैलांना सजवायला लागत असु त्यांना वारणीस लाव, झुली चढव, फुगे लाव हे चालु असायचे मग संद्याकाळी पाटलाचा बैल मिरवुन झाला की आमचे बैल निघायचे. मग पुर्ण गावाला वेढा मारुन मग मारुतीला ५ वेढे मारुन बैल घरी आणले जायचे. मग घरी आल्या आल्या त्याचे पाय धुवायचे, मग सगळे बैल पुजेला थांबायचे मधे एका बाजेवर सगळे शेतीचे साहित्य, औत, सोल, पेरणीची खोळ असायची आणि त्या बाजुला बैल तर दुसर्या बाजुला मी त्यांची पुजा करायला. पुजा झाली की मग सगळे सामान उचलुन गडी खांद्यावर घेउन बैलांना घेऊन त्याबाजेला ५ फेर्या मारतो आणि तोंडांने म्हणतो.

"चाऊर चाऊर चांगभला, पाऊस आला चाल घरा."

नंतर बैलांचे जेवण,आणि त्या दरम्यान एखाद बैल रुसतो म्हणेजे जेवत नाही तर मग त्याला मनवावे लागते.

वेध लागतात ते नंतर गौरी गणपतीचे..

अजुनही घरी गणपती विकत न आणता चिखलाचा तयार करतात. त्यांचा दहा दिवस आणि मधे महालक्ष्मीचे ४ दिवस. खुप मजा येते. अशा सणांना.

आता काय पुण्यात श्रावण महीना आलेला कळत नाही ना पोळा ना नागपंचमी... काही जाणवतच नाही हो. फक्त कॅलेंडर वर दिसते कि हो आज पोळा आहे आज नागपंचमी आहे. आजकालच्या मुलांना हे सण असे साजरे करायचे असतात हे तरी माहित आहे की नाही काय माहीत?? खरच त्याबाबतीत मी माझे बालपण खुप छान गेले. आज काल काय ते व्हिडीओ गेम कॉम्प्युटर गेम.

ह्म्म्म्म्म गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी हेच खरं....

नशीब अजुन माझी नाळ गावाशी जोडलेली आहे आणि गावाकडची माया कधीच कमी होणार नाही....

गुलमोहर: 

छान किश्या
पण खरं सांगू, वैयक्तिक मत आहे माझं, पुण्यात अजूनही अशा सणांना उधाण असते उत्साहाचे..
हा, गावाकडची पद्धत आणि इकडची ह्यात फारा फरक आता, पण तरीही.. नटून सजून थाटात सण साजरे होताना मी पाहते, म्हणून लिहीले!

बाकी, तू सणांच वैशिष्ठ्य छानच शब्दबंध केलं आहेस! Happy

नॉस्ताल्जिया Happy

बागेश्रीने बरोबर लिहिलंय. पुण्यात इतर शहरांच्या तूलनेने (म्हणजे मुंबई) अजूनही उत्साहात सण साजरे होतात.

गावाशी माझा कधी काहीच संबंध नव्हता, त्यामुळे खुप माहिती मिळाली. सुरेख लिहिलं आहे. खुप आवडलं. Wish माझा पण एक गाव असता.

मस्त रे किश्या.
७० गाई ??

तू सांगितलेले अगदि जसेच्या तसे आमच्या कडे होते.
ते "चाऊर चाऊर चांगभला, पाऊस आला चाल घरा." म्हणतान मज्जा यायची.
समोरचा गडी "चाऊर चाऊर चांगभला" म्हणयचा आणि त्याच्या मागे ताट्/परात लाटण्याने बडवून मागचा "पाऊस आला चाल घरा" म्हणायचा.

खरच किश्यादा कित्ती मस्त वर्णन केल आहे तुम्ही श्रावणातील सणांचे. काश माझा जन्म सुधा एखाद्या गावात झाला असता......किवा माझ्या parents ना तुमच्या सारखं एखाद गाव असत......हम म म म्हणजे ही मज्जा मी मिस केली आहे तर.

अतिशय सुंदर लेखन किशोर. तुझं लिखाण वाचतांना नेहमीच गावच्या मातीचा गंध तुझ्या लिखाणातून जाणवतो. ती जी नाळ जोडली गेली आहे ना तुझी, ती तशीच जप. आम्हा शहरी भटक्यांना कुठं रे हे असलं अनुभवायला मिळणार. तुझ्या लेखातून जे उमटतं, त्यावरंच आमचं समाधान.

असो, जास्त लिहीत नाही. असाच लिहित जा.
पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्च्छा..

क.लो.अ
अमोघ शिंगोर्णीकर

अजुनही घरी गणपती विकत न आणता चिखलाचा तयार करतात.

>>>>>>>>>>>>

शाडूची माती म्हणायचय का तुला किश्या?????? गणपती शक्यतो गावाला "शाडुच्या मातीचा करतात". विसर्जन झाल्यावर नदीत बुडी मारून तीच शाडू परत आणायची आणि त्याचे वेगवेगळे आकार बनवायचे हा लहान मुलांचा खेळच असतो.

बाकी, लेख छान रे.

माझ्या गावी अजूनही बेंदूर, नागपंचमी हे सण पारंपारीक पद्धतीने साजरे होतात......

बैलांना पुरणपोळी, त्यावर तुपाची धार... असं गोडधोड जेवण असतं... त्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती देतात.... वर्षभर शेतात राबणारया बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे हा....

शाडूची माती म्हणायचय का तुला किश्या?????? गणपती शक्यतो गावाला "शाडुच्या मातीचा करतात". विसर्जन झाल्यावर नदीत बुडी मारून तीच शाडू परत आणायची आणि त्याचे वेगवेगळे आकार बनवायचे हा लहान मुलांचा खेळच असतो. >>
शाडु माती नाही रे भुंग्या आमच्या कडे मिळत आमच्या कडे चिकन माती( शेतातली एकदम काळी माती) मिळते..
हा आता जर याला तुम्ही शाडु माती म्हणत असाल तर माहीत नाही
जी की पाण्यात टाकली की लगेच विरघळते....

किश्या एक नंबर रे......

च्याला कसलं हळुवार मांडल आहेस रे , अक्खा काळ डोळ्यांसमोर उभा राहिला .
श्रावणाची मजाच लई भारी.
आमच्यासारख्या उपनगरात कोंबड्यांच्या खुराड्यात राहिल्यागत लोकांना हि मजा विरळीच

खुप मस्त किश्या!!! मी सुद्धा कधीच अशी मजा अनुभवलेली नाही... शहरातलं जीवन आणि गावातलं जीवन यात हाच तर फरक आहे! म्हणूनच मला खेड्यांचं आणि त्यातल्या जीवनाचं फार आकर्षण आहे... किती मस्त लिहिलंयस किश्या.... फार आवडलं. Happy

अतिशय सुंदर लेख किश्या... शब्द न शब्द खरा कुठेही भपकेपणा नाही.
छान वाटले वाचून Happy
<<नशीब अजुन माझी नाळ गावाशी जोडलेली आहे आणि गावाकडची माया कधीच कमी होणार नाही....>> छान, खरच कमी नको होऊ दे Happy

अशाच गौरी गणपतीच्या आणि ईतर सणांच्या आठवणी येऊ देत की.. Happy

किशाभाऊ तुमच्या गावी श्रावणाची जाऊन आले, तुमच्या सोबत... छान वाटलं हे वर्णन वाचून. पुण्यात काही गंमत नाही म्हणताय... इथे सिडनीत काहीच नाही Sad
इतकच काय पण माझं लहानपण मुंबईत गेलय. तिथेही ह्यातलं काही खास नव्हतं.
लिहीत चला असच, तुमच्या मातीतलं, तुमच्या मनातलं, तुमच्या भाषेतलं...

किश्या ... एक सांग .. तुला एवढे आठवते कसे रे ?
पण सकाळी सकाळी खिडकी बाहेर गोदा म्हणजे मस्तच रे ! Happy
मला फक्त धुकं आठवते . Proud

धन्स निळुभाऊ
दाद >>खरच हो पुण्यात खरच काही सण वार कळत नाहित हेच बघा ना रविवारी पोळा आहे
माझा जिव तुटतो आहे गावाकडे जाण्यासाठी....माझ्या सर्जा राज्या ला भेटण्यासाठी पण काय करावं जाता येत नाही जॉब मुळे.. Sad

तुमच बालपण सगळ मुंबईत गेल आहे हो त्यामुळे खरच असल्या सणांची मजा तुम्हाला माहीत नाही...
Happy

धन्स प्रतीसादाबद्दल