मायबोली रसग्रहण स्पर्धा - गावझुला - ले. श्याम पेठकर

Submitted by क्रांति on 21 August, 2011 - 01:20

gaozula.jpg
गावझुला [दीर्घ ललितबंध]
लेखक : श्याम पेठकर
विजय प्रकाशन, नागपूर.
प्रथमावृत्ती १७-१०-२००९
किंमत :- २५० रुपये.

कुठलंही आखीवरेखीव, साचेबंद कथानक नाही, कसलेही ठसे मिरवणारी पात्रं नाहीत, नात्यातले ताणतणाव, वादविवाद नाहीत, ठराविक सीमांनी बांधलेली ठिकाणं नाहीत. केवळ एका बैराग्याच्या गावोगावच्या भ्रमंतीत साकारलेलं एक विलक्षण भावनाट्य म्हणजे गावझुला. ४३ लघुललितबंध मिळून झालेला हा एक दीर्घ ललितबंध. साप्ताहिक लोकप्रभामध्ये गावझुला या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखनाचा हा बंध. जरी प्रत्येक लघुललितबंधाला क्रमांक दिले आहेत, तरी प्रत्येक ललितबंध स्वतंत्र अनुभूती देणारा आहे.

ज्यांच्या पावलांचे ठसे अंतरी जपावे, त्यांच्या खुणा शोधत, मागोवा घेत जाण्याचा अयशस्वी का होईना, पण जरासा प्रयत्न करावा, आणि आपोआप सगळ्या बंद वाटा उलगडत जाव्यात, अशी काही बोटावर मोजण्याइतकी व्यक्तिमत्वं असतात, त्यातलंच एक त्या बैराग्याचं. रात्री धुरकटलेल्या कंदिलाच्या काचा सकाळी उजळत असता अवचित भेटलेल्या गुरूंच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत घरदार सोडून जगाच्या कल्याणा निघालेला हा कलावंताच्या लांब, निमुळत्या बोटांचा विलक्षण अवलिया, त्याला त्याच्या भ्रमंतीत भेटलेल्या व्यथा-वेदनांची लक्तरं आपल्या देहावरील चिंध्यांच्या झोळण्याला बांधत जातो. जिथं जातो, तिथं कुणीतरी आधीच मांडलेला दु:खाचा पसारा आवरत जातो, सुखाचे जोंधळे वाटेवरच्या पाखरांसाठी पेरत जातो. सुरेल गळ्याच्या आईच्या घुसमटून गेलेल्या गाण्याच्या शोधात तिचंच भाकरी देण्याचं व्रत स्वीकारून फिरत रहातो, ‘भंगलेल्या चित्रांच्या चौकटी, तारा तुटलेला तंबोरा अन् पाकळ्यांवर कोरलेली काही स्वप्नं’ मागं ठेवून!

गाव हा त्याचा जिव्हाळ्याचा बंध, भलेही तो कुठल्या गावाचा होऊन रहात नाही. गावक-यांनी गावाचं गावपण जपावं, मातीशी इमान राखावं, हे तो उक्तीतून नाही, तर कृतीतून सांगतो. ‘गावाचं महानगर होणं म्हणजे विकास नव्हे, ते गावाचं संपणं आहे, हे कळण्याइतपत चार शहाणी माणसं गावात असावी लागतात. गावाने आपली माती जपावी अन् आभाळाला यश द्यावं’ एवढी त्याची माफक अपेक्षा. या भ्रमंतीत कितीतरी गावं त्याच्या चरणधुळीनं पावन होतात, कुठल्याशा अघोरी, विचित्र, विक्षिप्त, अमानवी रुढी-परंपरांचा, अंधश्रद्धांचा अजगरी विळखा हिमतीनं दूर सारून याच्या पावलांचं तीर्थ घेण्यासाठी धावत येतात, पण तोवर हा दूर कुठे निघून गेलेला असतो, पुढचा गाव गाठायला. त्याला कसल्याच मायेत गुंतायचं नाहीय. ‘आपल्याला उमगले तेच सत्य या भासात जगण्यात गुरफटणं म्हणजेच माया’ हे जाणून तो गुंते सोडवीत नवनवी सत्ये शोधत पुढे निघून जातो.
त्याच्या वाटेत येणारी गावंही आगळीवेगळी. तसे तर गावांचे चेहरेमोहरे इथून तिथून सारखेच असतात, पण तरीही आपलं वेगळेपण प्रत्येक गाव जपत असतं. पुरूष गाळणा-या स्त्रियांचं गाव, मर्यादा हे ज्यांचं अस्त्र आणि मार्दव ही ज्यांची पूजा आहे, अशा स्त्रियांचं गाव, गावप्रमुखाच्या दु:खानं अस्वथ होणारं गाव, दगडांच्या देवाला दगडानंच पूजुन, त्याच्यापुढे जनावरांचे बळी देऊन त्यांच्या रक्तामांसाचा चिखल होऊन संपणारं गाव, नवसासाठी दगडाच्या मूर्तीला सोन्याचे डोळे लावून पार आंधळं झालेलं गाव, काही मुक्यानं सोसणारी तर काही वासनांच्या जंजाळात गुरफटून माणूसपण विसरलेली, नवस-सायास, अंधश्रद्धा, भ्रष्ट, अघोरी उपायांनी माणुसकीला काळिमा फासणारी गावं, त्यांत भेटणारे संत-महंत आणि शोधूनही न भेटणारी माणसं या भ्रमंतीत पावलोपावली दिसतात. हा बैरागी भुकेच्या क्षणी कधी मिळालेल्या तर कधी न मिळालेल्या भाकरीच्या बदल्यात, कुठलीही जाहिरात न करता, कुठलाही गाजावाजा न करता केवळ कृतीतून श्रमदानाचं महत्त्व दाखवून देतो. कसल्याही चमत्काराशिवाय, कशाचंही अवडंबर न माजवता माणसातील माणूसपण जागवत रहातो. आश्रम, सत्संग, उपदेश, यांच्याविनाही अध्यात्म जगतो.

त्याची गुरुभेट ही देखील विलक्षण! सुरुवातीला त्याला प्रत्यक्ष भेटलेले त्याचे गुरू पुढे मात्र त्याला वेगवेगळया रूपात अप्रत्यक्षरीत्या भेटत रहातात, कधी केवळ वाणीतून तर कधी विचारांतून. कधी तर केवळ त्यांच्या पाउलखुणा कुठेतरी जाणवतात. पण सदोदित गुरू मनात वास करत असतात त्याच्या.
तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपलाची वाद आपणांसी
असे ते गुरूंचे उपदेश असतात. तोही असंख्य प्रश्न विचारत रहातो, कधी आपली निरागसता हरवत नाही, तिला जपत रहातो, कारण गुरूंनी त्याला सांगितलं आहे, ‘शैशव राखतो तो शिष्य. शैशवातले निरागस प्रश्न संपले की शिष्यत्वही संपतं.’ कित्येकदा असंही वाटतं, की गुरू ही संकल्पना त्याच्या मनातलीच असावी.
माथा ठेवू कोण्या पायी? माझा गुरू माझे ठायी
असं काहीसं! ‘आई कळायला अन् गुरू अनुभवायला मोग-याचं काळीज लागतं.’ ही जाण जपणारा हा बैरागी आपल्या भ्रमंतीत कुठेही न गुंतता इतरांच्या आयुष्यातला गुंता सहजी सोडवून देतो. माणसाचे पाय जमिनीवर हवेत, ही नेहमीची संकल्पना त्याला मान्य नाही, तो म्हणतो, ‘जमिनीवर पाय नव्हे, हात हवेत. कर्तृत्व क्षयग्रस्त झालं की मग चमत्काराची अपेक्षा केली जाते. ज्याचे हात जमिनीवर असतात, त्याचं कर्तृत्वही बुलंद असतं.’ हा त्याचा विश्वास. ‘या जगातली सगळीच नाती शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधासाठी निर्माण झालेली असतात. मित्र हे एकमेव मनाचं मनाशी असलेलं नातं आहे.’ ही त्याची श्रद्धा. पुनर्जन्माची त्याची व्याख्या पुनर्जन्माच्या नेहमीच्या कल्पनेला छेद देणारी सरळ, साधी. ‘प्रत्येक श्वासाशी आपण मरतच असतो, पुढचा श्वास म्हणजे पुनर्जन्मच.’ हे असं सहज तत्वज्ञान मांडत जगणारा हा बैरागी शब्दांच्या जंजाळात अडकत नाही, कारण त्याच्या लेखी ‘शब्द म्हणजेही अखेर भावनांचा आकारच.’ म्हणून हा त्या शब्दब्रम्हाच्याही पलीकडला! शब्दांत वर्णिता न येणारा, पण या ललितबंधात निराकारातून साकार झालेला. अतिशय ओघवत्या भाषेत झुलणारा हा गावझुला वाचकाला, रसिकाला खिळवून ठेवतो. एक अनोखं गारूड आहे या कहाणीत, जे कल्पनेच्याही पलिकडच्या विश्वात घेऊन जातं आपल्याला. प्रत्येकाच्या मनात वसलेलं गाव, गावाकडची माती, तिथली नातीगोती, प्रथा, व्यथा सगळ्या आपल्या होऊन जातात आणि माणुसकीचा अलख जागवीत सृजनाची शिंपण करत गावोगाव फिरणा-या त्या अवलियाच्या मागे आपणही फिरत रहातो. चि. त्र्यं. खानोलकर, श्री. ना. पेंडसे, जी. ए. यांच्या साहित्यातली गावं, पात्रं जशी पिंगा घालत रहातात, अगदी तशीच या झुल्यातली निनावी पात्रं, अनोळखी गावं आपल्या स्वभाववैशिष्ट्यासह मनात रुंजी घालत झुलत आणि झुलवत रहातात.

या विलक्षण मनोव्यापाराचे चित्रण करणारे लेखक श्री. श्याम पेठकर यांच्याशी जेव्हा या पुस्तकासंबंधी चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या संबंधात ऐकलेली एक दंतकथा सांगितली, डेबू शेतात राखण करत असताना एक साधू त्याच्याकडे आला. डेबूनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी तो तिथेच ठिय्या मांडून बसला, त्यानं गरम गरम पानगे रांधून डेबूला खाऊ घातले आणि तो निघून गेला. पुढे दुस-या दिवशी डेबू काही कामानिमित्त गावाबाहेर गेला असता साधू गावात येऊन त्याची चौकशी करत होता, तर गावक-यांनी त्याला चोर-डाकू समजून हाकून लावला. डेबूला जेव्हा हे समजलं, तेव्हा तो त्या साधूच्या शोधात गाव सोडून निघून गेला. हाच डेबू म्हणजे संत गाडगेबाबा. या दंतकथेनं प्रेरित होऊन लेखकानं हे ललितबंध गुंफले. हे गाडगेबाबांचं चरित्र नाही, किंवा त्यांच्या चरित्रावर आधारित कहाणी नाही, हे बंध आहेत त्या व्यक्तिमत्वाचं अंतरंग उलगडण्याचा, त्याच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न.

आपल्याच मनातल्या द्वंद्वाची गाथा असावी तसे हे बंध एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणतात. ‘त्या भिंतीमधल्या खिडक्या मात्र सौभाग्यवती जख्ख म्हातारीसारख्या हसतमुख.’ ‘अपेक्षांचा पांगुळगाडा न लावता जे काम केलं जातं ती पूजा असते.’ ‘पावलं नेहमीच प्रश्नात अडकलेली असतात. म्हणून त्यांचा आकार प्रश्रचिन्हांसारखा असतो.’ अशी सहज भाषा, सुभाषितं असावीत, तशी प्रासादिक वाक्यरचना, ब्लर्बवरची म. म. देशपांडे यांची पावले ही अप्रतिम कविता, मुखपृष्ठावरचं मातीवर ठेवलेलं खापराचं वाडगं आणि बांबूच्या काठीचं रूपक ही या पुस्तकाची आणखी काही खास वैशिष्ट्ये. मनात आत खोलवर रुजत जाणारं, संग्रही असावंच असं एक अप्रतिम पुस्तक!

[अवतरण चिन्हांतली सगळी वाक्यं पुस्तकातली आहेत.]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.. छान लिहिलय. Happy

क्रांति, धागा सार्वजनिक करा. (संपादन वर जाऊन सगळ्यात खाली चेकबॉक्स असेल तो वापरून). बाहेर दिसत नाहीये हे.

क्रांति,

हे पुस्तकाचं रसग्रहण न वाटता साधूच्या आयुष्याचंच वाटतं! अभिनंदन!!

आ.न.
-गा.पै.

‘जमिनीवर पाय नव्हे, हात हवेत. कर्तृत्व क्षयग्रस्त झालं की मग चमत्काराची अपेक्षा केली जाते. ज्याचे हात जमिनीवर असतात, त्याचं कर्तृत्वही बुलंद असतं.’
‘अपेक्षांचा पांगुळगाडा न लावता जे काम केलं जातं ती पूजा असते.’
‘पावलं नेहमीच प्रश्नात अडकलेली असतात. म्हणून त्यांचा आकार प्रश्रचिन्हांसारखा असतो.’
‘गावाचं महानगर होणं म्हणजे विकास नव्हे, ते गावाचं संपणं आहे, हे कळण्याइतपत चार शहाणी माणसं गावात असावी लागतात. गावाने आपली माती जपावी अन् आभाळाला यश द्यावं’
>> क्या बात है!

मस्त. Happy

क्रांति ,हे रसग्रहण मला फार फार आवडल.पुस्तक छानच असणार ,प्रश्नच नाही पण तुझ्या लेखनाची शैलीही उत्तम .