साहित्यनिर्मीतीच्या दर्जात्मक पातळ्या व रसग्रहण

Submitted by बेफ़िकीर on 4 August, 2011 - 11:49

काही तज्ञांशी केलेल्या चर्चा, काही वाचन व काही ठोकताळे यावर विसंबून लिहीलेला लेख!
===========================================================

साहित्यनिर्मीतीसमोर ज्या दर्जात्मक स्पर्धांच्या कठोर अटी मानल्या गेलेल्या आहेत त्या:

१. मूळ निर्मीती - उपयुक्तता (यात ज्ञानवर्धक, मनोरंजक, स्फुर्तीदायक इत्यादी बाबी), समकालीन संस्कृती व समाजाची पुरेशी जाणीव असल्याची चिन्हे व नावीन्यता (यात शैली, संदर्भ इत्यादी बाबी) समाविष्ट धरल्या जातात. यातून असे म्हणायचे असते की निर्मीती किमान कोणत्यातरी कारणास उपयुक्त ठरावी, सध्याच्या जगाशी तिची नाळ असावी व निर्मीतीची शैली व त्यातील उल्लेख यात नावीन्य असावे.

२. समीक्षा - समीक्षा ही मूळ निर्मीतीपेक्षा कठोर अट मानली गेली आहे. म्हणजे समीक्षेस पात्र होणारे लेखन करणे ही ती अट! समीक्षा केवळ अनाकलनीय लेखनाचा अर्थ सांगण्यासाठी नसून अनेक अव्यक्त (हिडन) मते, ती मते निर्माण होण्याची सामाजिक (व इतर) कारणे, कारणांची व्याप्ती व त्यातून समाजासाठी एक उपयुक्त संदेश देण्यात समीक्षा महत्वाचा हातभार लावते. अनेकदा साहित्यनिर्मीती ही मर्यादीत दृष्टिकोनातून होते. व्यापक दृष्टिकोनातून झालेली साहित्यनिर्मीती दुर्मिळ असते व ती 'सरल' करायची झाल्यास एका पुस्तकाच्या जागी पंधरा ग्रंथ लिहीत बसावे लागतील. याच ठिकाणी समीक्षा काम करते. त्याचमुळे एकाच मूळ निर्मीतीच्या अनेकांनी समीक्षा केलेल्याही आढळतात. मूळ निर्मीतीने मूळ निर्मीती असण्याच्या अटी पार केल्यानंतर जर ती समीक्षेसही पात्र होत असली तर ती अतिशय श्रेष्ठ निर्मीती समजली जावी.

३. सौंदर्यशास्त्र - समीक्षेला स्वतःचे स्वयंभू अस्तित्व मात्र नाही. समीक्षेचे अधिपत्य सौंदर्यशास्त्राकडे आहे. थोडक्यात, सौंदर्यशास्त्र हे समीक्षेचे मालक असून तेच ठरवते की समीक्षेने काय करावे. मानवी जीवनात सुंदर व सुंदर नसलेल्या अशा अनेक बाबी ठळकपणे दिसतातच. जसे, हिंसा वाईट आहे. जन्माला घालणे सुंदर! झाडे तोडणे वाईट, रोप लावणे सुंदर! श्रावण सुंदर आहे, ग्रीष्म नाही. कुटुंबात प्रेम वाटणे सुंदर तर भाऊबंदकी किंवा वृद्धांना आधार न देणे वाईट! हे सौंदर्यशास्त्र आपल्या सर्वांना बहुतेकदा 'संस्कार व शिक्षण' यातून कळत असल्याने त्यात आपल्याला नवे काही वाटत नाही. पण हेच सौंदर्यशास्त्र समीक्षेला मार्गदर्शन करते की मूळ निर्मीतीला कोणत्या निकषांवर तपासायला हवे. सौंदर्यशास्त्र हे समाजाच्या जिवंतपणाचे व बहरलेपणाचे लक्षण असते व ते बदलणे जवळपास अशक्यच! जी मूळ साहित्य निर्मीती सौंदर्यशास्त्रानुसार पूर्ण मान्य होते ती समीक्षेच्याही पुढच्या पातळीला पोचते.

४. तत्वज्ञान - मात्र सौंदर्यशास्त्र निर्माण होण्यामागे तत्वज्ञानाचा हात आहे. तत्वज्ञान एका माणसाने किंवा प्रदेशाने किंवा पिढीने निर्माण केलेले नसून एकाचवेळेस जगात लाखो तत्ववेत्ते हयात असतात व त्यांच्या प्रभावानुसार ते घडत राहते. या अफाट विश्वास सृष्टीचे, मानवी अस्तित्वाचे कारण काय, भूमिका काय, जीवन कसे जगले जायला हवे, सध्या कसे जगले जात आहे, समानता कशी येईल इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधत राहणे या क्रियेतून तत्वज्ञान तयार होते असे मानतात. हे तत्वज्ञानच सौंदर्यशास्त्राला 'सुंदरता' म्हणजे काय याची 'सूचना' देते. निसर्गाने सगळीच माणसे हिटलर केली असती तर सृष्टी (मानवी) कदाचित संपलीही असती. आणि त्या लयाला जात असलेल्या मानवी अस्तित्वाचे सौंदर्यशास्त्र 'नष्ट करणे' याच निकषावर निर्माण झाले असते. मात्र गांधीही झाले, तुकारामही झाले, वास्वानीही झाले तसेच ओसामाही झाले आणि हिटलरही! तत्वज्ञान 'चांगुलपणा व माणसाची भूमिका' ठरवते व सर्व साहित्यनिर्मीती इतकेच नाही तर संपूर्ण कलाक्षेत्र, आणि इतकेच नाही तर सर्व राजकीय धोरणेही रिस्पेक्टिव्ह प्रभावशाली तत्वज्ञानानुसारच योग्य / अयोग्य ठरतात. तत्वज्ञानाच्या पातळीला आपल्याकडील संतांचे काव्य पोचलेले आहे. म्हणूनच ते श्रेष्ठ मानले गेलेले आहे. या पातळीला मूळ निर्मीती पोचल्यास समीक्षा व सौंदर्यशास्त्र 'एवढेसे तोंड' करून बसतात.

५. अध्यात्म - मानवी इतिहासात या पलीकडील काहीही ज्ञात नाही. किंवा, जे ज्ञात नाही त्याचमुळे ही सर्वात वरची पातळी निर्माण झालेली आहे. ही सर्वोच्च पातळी मानली जाते. 'का व कसे' या प्रश्नांची कोट्यावधीवेळा सरबत्ती करूनही जेव्हा उत्तरे मिळणे थांबते तेव्हा श्रद्धा जन्माला येते. एका अशा शक्तीबाबतची श्रद्धा, जी शक्तीही दिसत नाही. त्याच शक्तिने पाठवले आहे व तिच्याचकदे पुन्हा जायचे आहे ही साधारण समजूत यात धरली जाते. (प्रांत, धर्म, पंथ यानुसार काही तपशील बदलू शकतात). मानवाचीच नाही तर एकंदर सजीवांची असहाय्यता व अगतिकता व त्यामुळे निर्माण झालेली 'अदृष्य शक्तीवरील' श्रद्धा हा अध्यात्माचा पाया असून असे मानले जाते की या पातळीचा विचार मध्यवर्ती असलेली (खरे तर कोणतीही) साहित्यनिर्मीती ही सर्वश्रेष्ठ आहे. येथे तत्वज्ञानालाही हस्तक्षेपाचा अधिकार नाही. (बहुतांशी, या पातळीला 'काव्य'च निर्माण होते असेही मानतात).

रसग्रहण -

रसग्रहणाला या सर्व पातळ्यांपैकी फक्त सौंदर्यशास्त्रीय पातळीशी घेणेदेणे असावे असे म्हणतात. रस या शब्दातूनच गोडव्याची अनुभुती व्हावी. तेव्हा निर्मीतीमधील गोडवा, काव्य (काव्य या शब्दाचा येथे अर्थ कविता असा नाहीच) , रसरशीतपणा 'एक्स्ट्रॅक्ट' करून वाचकाला कळवणे हे रसग्रहणाचे काम आहे. तसेच, 'रस' निष्पन्न होत नसल्याचे सांगणेही! मात्र रसग्रहण हे मूळ निर्मीतीबाबत असूनही मूळ निर्मीतीपेक्षा चवीला मधुर असावे ही किमान अट मानली जाते. रसग्रहण करताना मूळ निर्मीतीची निवड हा निकष नसला तरीही सौंदर्यशास्त्राच्या निकषांनुसार निर्मीतीची निवड व्हावी यात गैर नाही. म्हणजे आगलावी पुस्तके, अमानवी व्यक्तीकरण असलेली पुस्तके, सौंदर्याशी (मानवी जीवनाच्या) कोणत्याही प्रकारे 'जाणीवपुर्वक' फारकत घेतलेली पुस्तके यात समाविष्ट होऊ नयेत अशी अपेक्षा मानली जाते. रसग्रहणाचे काम समीक्षा नसल्याने (आणि केवळ रसग्रहण असल्याने) आपोआपच 'मूळ निर्मीतीची निवड' समीक्षेपेक्षा मर्यादीत होतेच.

रसग्रहणाने केलेली टीकाही सौम्य, मधुर असावी. (अर्थात, योग्य निवड झाल्यानंतरच ही अपेक्षा पूर्ण होऊ शकेल.)

वाट्टेल त्या पुस्तकाचे रसग्रहण होऊ शकत नाही का या मतावर 'मग समीक्षक काय करणार' हे प्रतीमत तयार आहेच.

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

गो म कोण? Happy

माहीत नाहीत मला, सिरियसली विचारतोय. Happy

(अवांतर - तसंही, पहिलं वाक्य तेच लिहीलेलं आहे मी! ) Happy

गो. म. कुलकर्णी हे प्रसिद्ध समीक्षक आणि साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत, शिवाय समीक्षा, रसग्रहण यांच्या शास्त्राबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. 'रसग्रहण : कला व स्वरूप' हे त्यांचं पुस्तक काँटिनेंटल प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे.

गो. म. कुलकर्णी हे प्रसिद्ध समीक्षक आणि साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत, शिवाय समीक्षा, रसग्रहण यांच्या शास्त्राबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. 'रसग्रहण : कला व स्वरूप' हे त्यांचं पुस्तक काँटिनेंटल प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे.>>

ओके. Happy धन्यवाद, आता मिळवतो ते पुस्तक! Happy

( आय होप, माय क्वेश्चन वॉज नॉट टू अ‍ॅडॅमन्ट, अ‍ॅन्ड इफ सो, सॉरी) Happy

-'बेफिकीर'!

साहित्यनिर्मीतीसमोर ज्या दर्जात्मक स्पर्धांच्या कठोर अटी मानल्या गेलेल्या आहेत त्या:

>>>> या वाक्याचा अर्थ काय? मला हे वाक्य खरंच कळलं नाहीये. विशेषतः 'साहित्यनिर्मीतीसमोर ज्या दर्जात्मक स्पर्धांच्या' हा भाग.

यातील गोम मला माहीत नाही, पण चांगले लिहीले आहे. रसग्रहणाबद्दल अनुमोदन. मला स्वतःला तिसरा मुद्दा - सौंदर्यशास्त्राचा - पटत नाही. सौंदर्य म्हणजे सर्वमान्यता असे असल्यागत वाटते आणि ते तसे असु नये असे माझे मत आहे. हटके असलेल्या गोष्टींमुळे जी विविधता प्रदान होते त्यामुळे होणारी सौंदर्य निर्मीती आगळी असते, आवश्यक असते, वाखाणण्याजोगी असते.

बेफिकीर, शीर्षकात 'साहित्यमिर्मीती' असं झालं आहे. ते जरा बदलून बरोबर करा प्लीज.

<<<यातील गोम मला माहीत नाही, पण चांगले लिहीले आहे.>>>

'गोम'!

मी फसवून वगैरे काही केलेले नाही व तसे करतही नाही. मी सुरुवातीला हे वाक्य लिहीलेले आहे. Happy

काही तज्ञांशी केलेल्या चर्चा, काही वाचन व काही ठोकताळे यावर विसंबून लिहीलेला लेख!

Happy
==========================================

<<<<बेफिकीर, शीर्षकात चुकून साहित्यमिर्मीती>>>> धन्यवाद मामी, बदल केला आहे. Happy

<<<हटके असलेल्या गोष्टींमुळे जी विविधता प्रदान होते त्यामुळे होणारी सौंदर्य निर्मीती आगळी असते, आवश्यक असते, वाखाणण्याजोगी असते.>>>

नक्कीच! पण 'हटकेपणा' हा त्या त्या लेखकासाठी व त्या त्या वाचकासाठी 'हटकेपणा' असतो, सर्व जगासाठी असेल असे कसे म्हणता येईल? Happy

सौंदर्यशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे..सुंदरता मग ती शब्दातली असो, भावाशयात असो, ही ज्याची त्याची अनुभुती आहे.ती प्रत्येकाची निराळी असु शकते.किंवा असतेच.रसग्रहण करतांना कथा ,कविता किंवा इतर साहित्यातील सौंदर्याची अनुभुती नेमकी कुठे झाली हे विचार वाचकांपर्यंत पोहचवणे व ते पटवुन देणे हे रसग्रहणात हे अपेक्षित असावे हे माझे वैयक्तिक मत आहे.

सौंदर्यशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे..>>> नाही आहे असे लेखात म्हंटलेले नाही. मात्र, आता असे म्हणावेसे वाटत आहे की सर्वच गोष्टी एकमेकांशी संबंधीत असतात. Happy

(बाय द वे - सौंदर्यशास्त्रीय पातळीला मराठीत फक्त केशवसुत पोचले होते असे म्हणतात)

मातीचे, संस्कारांचे, मोहांचे अन भोगांचे
त्या लाख लाख पितरांचे, मी मिश्रण आहे केवळ!

-'बेफिकीर'!

काही गोष्टी पटल्या. धन्यवाद बेफिकीर.

आणि माफ करा पण हे तुमच्या इतर मतांमध्ये कधीच आढळून आले नाही. आतापर्यंत 'रंजनमूल्य' हे एकच मी मानतो असे काहीतरी लिहीत होता ना आपण?

काही गोष्टी पटल्या.>> धन्यवाद!

आणि माफ करा पण हे तुमच्या इतर मतांमध्ये कधीच आढळून आले नाही. आतापर्यंत 'रंजनमूल्य' हे एकच मी मानतो असे काहीतरी लिहीत होता ना आपण>>>

लेखन 'किमान' रंजक 'तरी' असावे असे मी म्हणायचो व म्हणत आहे. Happy

धन्यवाद! Happy

मला यातले काही कळत नाही, पण नेहेमीसारखे कुचेष्टेने विचारले असे समजू नका.

भाषा - भाषेचे सौंदर्य, शुद्धलेखन, बरोबर व्याकरण, योग्य शब्द वापरणे, उगाच इतर भाषांतले शब्द न घुसडणे हे महत्वाचे आहे का?
'http://www.maayboli.com/node/27815' (स्वारस्याची अभिव्यक्ती)
हा लेख वाचून, मराठी लेखनात मराठीच वापरावे हे महत्वाचे आहे का हा प्रश्न पडला.?

का सहित्य हे भाषा-निरपेक्ष असते?
धन्यवाद.

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हा लेख खरच माहितीपूर्ण वाटला .धन्यवाद.
का साहित्य हे भाषा -निरपेक्ष असते? साहित्य हे जगातल्या अन्य निर्मितीप्रमाणे निर्माण होत असते वा घडत असते .ते समाजाच्या जगण्याच्या साहित्याचे प्रतिबिंब असते अस आपल मला उगाचच वाटत .त्यामुळे साहित्याला कुठली अपेक्षा असते वा नसते हा प्रश्नच उद्भवत नाही.जगात जितक्या भाषा बोलल्या ,लिहिल्या ,वाचल्या जातात त्या सर्वांच प्रतिबिंब साहित्यात उमटणार .जोपर्यंत अनेक भाषा बोलल्या जाताहेत ,वापरल्या जाताहेत तोपर्यंत अनेक भाषातून साहित्य येत जाणार .जशी जशी अनेक भाषांची गरज कमी होणार तशी तशी प्रचलीत असलेल्या भाषातच साहित्य येत राहील .मग त्या प्रचलीत भाषात लयाला गेलेल्या भाषांचे शब्द ,संस्कार,लय यांच मिश्रणही असू शकत .हे योग्य की अयोग्य याचा विचार साहित्याचा दर्जा ठरवताना होत असावा किंवा व्हायला हवा ज्यायोगे योग्य त्या साहित्याचा समाजात पुन:पुन: अभ्यास होत राहील व उत्तम समाज घडेल .
जर मराठी भाषिकानी अन्य भाषांचे शब्द आपल्या रोजच्या व्यवहारात आणले तर साहित्यात ते प्रतिबिंबीत होणारच ,नाही झाले तर ते साहित्य वास्तवतेला धरून नसल्याने बेगडी म्हणून त्याज्य होईल .म्हणून आपल्या भाषेच्या साहित्य निर्मितीत १००% आपल्याच भाषेचा ठसा हवा असेल तर घरोघरी भाषिकानाच खबरदारी घ्यावी लागेल व हे जरा अवघडच वाटत.काळाच्या ओघाप्रमाणे भाषेचा पण एक ओघ असतो ,तो एकमेकात मिसळतो ,मिळालेल्या दिशेप्रमाणे वहात जातो आणि आपल्याला प्रचलीत स्वरूप स्विकारण्यावाचून पर्याय नसतो अस मला वाटत.

काहीतरी गफलत वाटते आहे. लेखाचा नक्की विषय काय आहे? 'दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठीचे निकष' की 'साहित्यावरील समीक्षेचे, परीक्षणाचे, रसग्रहणाचे निकष'? यांपैकी काहीही असले, तरी तो इतक्या मुद्द्यांची सरधोपट सरमिसळ करून थोडक्यात आवरण्यासारखा नाही.

यांपैकी पहिला विषय असेल, तर मग तो वरचा दुसरा मुद्दा- म्हणजे 'समीक्षा'- काय करतो आहे इथे? समीक्षेसाठी साहित्य लिहिणे म्हणजे काहीतरीच भंपक आहे. समीक्षा ही परावलंबी प्रक्रिया आहे. साहित्यावरचे 'बांडगुळ' म्हणा पाहिजे तर.

'सौंदर्यवाद' हा असाच एक दिशाभूल करणारा मुद्दा. जगण्याशी प्रामाणिक असलेल्या साहित्यात सुंदरता असतेच असते. समाजाचा, संस्कृतीचा आरसा धरणारे लेखन हे अस्सल मातीतले असते. म्हणूनच चिरंतन सुंदर ठरते. मग ते सौंदर्य कधी भीषण वास्तवाच्या रुपात समोर येते. कधी पिळ्वटून टाकणार्‍या दु:खाच्या रुपाने येते, कधी छोट्या छोट्या सच्च्या गोष्टीतल्या निखळ आनंदाच्या रुपात येते. उदाहरणार्थ भाऊ पाध्येंच्या 'वासूनाका'तल्या आणि वालावलकरांच्या 'बाकी शून्य'मधल्या कुठेतरी अंगावर येणार्‍या (काहींना भंपकही वाटलेल्या) वर्णना-प्रसंगात मला निखळ सौंदर्य जाणवले. कारण ते माझ्या आजूबाजूलाच कुठेतरी घडत असल्याइतके अस्सल वाटले. ही अस्सलताच साहित्य सुंदर वगैरे करते. साहित्यनिर्मितीत वेगळे काही 'सौंदर्यशास्त्र' असावे, गृहित धरावे, हे मला तरी हास्यास्पद वाटते.

तत्वज्ञान आणि अध्यात्म- या मुद्द्यांबदलही असेच. त्या त्या प्रांतातले, देशातले तत्वज्ञान, विचार, संस्कृती हे प्रामाणिक राहून केलेल्या लिखाणात आपोआप येते. चांगल्या साहित्याचे वेगळे असे म्हणून हे निकष मानावेत, असं काही मला वाटत नाही. स्वतःशी तादात्म्य पावून लिहिलेल्या साहित्यात जे काय येते त्याला अध्यात्म असे नाव देत असाल तर ओके. पण रुढार्थाने तत्वज्ञान आणि अध्यात्म यांच्यासोबत इतर अनेक गोष्टी उगाच विनाकारण येतील, असं वाटतं, म्हणून जे काय निकष असतील, त्यांना हे शब्द वापरण्याला विरोध.

बाकी 'रंजनमुल्य' हे मिनिमम इसेन्शियल वाटत नाही. रंजनाच्या व्याख्याही प्रत्येकाच्या वेगळ्या, तर त्याचा निकष कसा बनवणार? पण इतर काहीही नसले, तरी 'रंजनमुल्य' डोळ्यांसमोर ठेवून केलेले लेखनही महत्वाचे आहेच. अनंत जगण्याचे प्रश्न असलेल्या सर्वसामान्य लोकांत, समाजात वाचनसंस्कृती जितीजागती ठेवण्याचं मोठं काम असं साहित्य करतं.

बाकी रसग्रहण, समीक्षा, परीक्षण इत्यादींचा विषयच वेगळा. पाहिजे तर वेगळ्या ठिकाणी लिहायला हवे होते. साहित्यनिर्मितीच्या निकषांशी याचा संबंध नाही, असं मला वाटतं.

भाषेच्या मुद्द्याबद्दल छाया देसाईंना अनुमोदन.

खंडेराव, आपला प्रतिसाद वाचला. प्रवासात असल्याने सावकाश उत्तर देईन. Happy प्रतिसादाबद्दल आभार!

आपले अनेक मुद्दे पटले नाहीत. तूर्त इतकेच! Happy

येस नो प्रॉब्लेम. सावकाश उत्तर द्या. पण त्यानंतरही माझ्याकडे काहीच नसेल लिहिण्यासारखं बहुतेक. Proud

तुम्हाला बहुधा रसग्रहण, समीक्षा, परीक्षण यावरच लिहायचं होतं, पण थेट शीर्षकापासूनच मला गफलत वाटली. आणि शीर्षकातल्या 'साहित्यनिर्मीतीच्या दर्जात्मक पातळ्या' या भागाला अनुसरून पोस्ट लिहिली इतकंच. असो.

सर्वश्री धागाकर्ते बेफिकीर आणि प्रतिसादक छाया देसाई तसेच खंडेराव यांची या विषयाबाबतची मते वाचल्यावर सर्वप्रथम कोणती गोष्ट लक्षात येत असेल तर सहाही विकल्पात लेखनाच्या कसाविषयी प्रथम 'समीक्षे' ला उजवे दान देणे गरजेचे आहे. पारंपारिक समीक्षा जरी सौंदर्यशास्त्राच्या साहित्यिक चर्चेत अडकून पडली असली किंवा खांडेकर म्हणत तशी ती कलावादी असणे हा प्रमुख निष्कर्ष मानला तरीही लेखन हे जीवनाच्या सिद्धांतापासून दूर जावे असे कुणीही टीकाकार म्हणत नसत...आजही नसल्याने मग 'समीक्षे' ला सर्वप्रथम लेखकाने नजरेसमोर आणणे त्याच्याही आणि समाजाच्याही दृष्टीने हितकारक असते. अर्थात आजकालच्या जालीय भाषेत नेमाडपंथी युवा लेखक समीक्षेला 'फाट्यावर' मारू शकतोही, पण त्यामुळे समीक्षेचे महत्व कमी होते असे नाही.

'कोसला' दिवसापासून सर्व समीक्षकांना नदीच्या पल्याड फेकून देणारे भालचंद्रपंत 'हिंदू' च्या वेळेपर्यंत पार थंडावल्याचे त्यांच्या विविध मुलाखतीद्वारे दिसून आले होतेच. आजकाल तर ते स्वतःच समीक्षकाच्या डंगरीमध्ये असतात. त्या त्या कालखंडात त्यानीही समीक्षकांशी फारकत घेतल्यामुळे 'हिंदू' भरकटत गेली असे अनुमान कुणी काढले तर तीत तथ्य मानावे अशीच ती विस्कळीत कादंबरी झाली आहे. त्यामुळे 'सौंदर्यशास्त्रा'ची कुणी कितीही खिचाताणी केली तरी ललित वाङ्मयात त्याची महती मानली गेलीच आहे.

समीक्षेचे गुणगान गाताना हेही सांगणे महत्वाचे आहे की, समीक्षक सर्वप्रथम पट्टीचा 'वाचक' हवा. कारण तुम्ही जाणताच की खर्‍या अर्थाने वाचकच लेखकासाठी महत्वाचा असतो, मग तो रसग्रहणासाठी असो वा परीक्षणासाठी. वाचकाच्या मनातील जे अभिप्राय असतात त्याचा कानोसा घेऊन समीक्षक त्याच्यासमोर असलेल्या कलाकृतीची संभावना करीत असतो. याचा अर्थ असा नव्हे की, त्याला फक्त 'रंजनमूल्य' असलेले साहित्यच अपेक्षित आहे. टोकाच्या भूमिका घेऊन समोर आलेले किरण नगरकर असोत वा दिपु चित्रे आणि सारंग कंपनी असो, समीक्षक त्यांचेही विचार समाजापुढे आणतो म्हणून तर त्या त्या लेखकाच्या मनातील एका विशिष्ट स्थितीचे आंदोलन समर्पकपणे वाचकासमोर जाण्यास सहाय्यभूत ठरते. ['ललित' आणि 'सत्यकथा' याना दूर ठेवा असा आक्रोश करणारे तथाकथित बंडखोर लेखक स्वतःच्या साहित्यावर मात्र या दोन नियतकालिकात समीक्षण येणार असेल तर ते त्याला प्रसिद्धी देऊ नये, असे कधीही सांगत नसत.]

श्री.बेफिकीर यानी 'तत्वज्ञाना' ला इथे लेखनमाहात्म्यात का आणले याचा नक्की बोध मला त्या गटाबद्दल त्यानी जे लिहिले त्यावरून तरी झाला नाही. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे इतकेच म्हणू शकेन की कोणत्याही प्रकारच्या साहित्यकृतीमध्ये लेखक त्याचे स्वतःचे असे 'तत्वज्ञान' प्रकट करीतच असतो. किंबहुना 'बाय डीफॉल्ट' तत्वज्ञान हे लेखकच नव्हे तर चित्रकलेमध्ये चित्रकार आविष्कारीत करीत असत, तिथेही त्याचे स्वतःचे असे तत्वज्ञान असतेच. त्यासाठी तर त्यांचा अट्टाहास असतो. रेग्यांनी 'सावित्री' मध्ये वा मर्ढेकरांनी 'पिपात मेल्या उंदीरा' ला घेऊन कोणते तत्वज्ञान अधोरेखीत केले आहे हे सांगण्याची त्यांची जबाबदारी नव्हती, ते काम वाचक+समीक्षक करतातच.

"सध्या कसे जगले जात आहे, समानता कशी येईल इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधत राहणे या क्रियेतून तत्वज्ञान तयार होते असे मानतात. हे तत्वज्ञानच सौंदर्यशास्त्राला 'सुंदरता' म्हणजे काय याची 'सूचना' देते." ~ असे श्री.बेफिकीर मानतात. सौंदर्यशास्त्राला तत्वज्ञान सुंदरता देत असेल तर मग 'माईन काम्फ' मधील तत्वज्ञान या न्यायाने जगातील सर्वात सुंदर तत्वज्ञान मानले जाईल, अशी भीती वाटते.

मलाच काय पण खुद्द धागाकर्त्यालाही ही बाब मान्य असेलच की उत्तम वाङ्मयकृतीचे लक्षण असे की प्रत्येक आस्वादात ती वाचकाला समृद्ध करीत जाते व स्वतःही समृद्ध होत जाते. 'औदुंबर' कविता आज जरी समोर घेतली तर तिची समीक्षा, रसग्रहण करताना ना कुठल्या तत्वज्ञानाची ना ही कुठल्या अध्यात्माची वाचकाला गरज वाटते. आजकालचे अध्यात्म आणि त्याचे होत असलेले विकृतीकरण पाहाता, शुद्ध आणि निखळ वाङ्मय अध्यात्माच्या दृष्टीने न पाहिलेलेच बरे. होतकरू लेखकानेसुद्धा हा विकल्प नजरेआड केला तर तो फार मोकळेपणाने आपली अभिव्यक्ती वाचकासमोर आणू शकेल. [अर्थात हे व्यक्तिगत मत आहे.]

असो. खूप चांगला आणि विस्तृत सकस चर्चेस वाव देणारा हा विषय असल्याने त्या अनुषंगाने जितके जास्त प्रतिसाद येतील तितका याचा आनंद घेता येईल.

अशोक पाटील

माहीतीपुर्ण लेख , आवडला कारण भल्या भल्या ना ही सौंदर्यशास्त्र हा विषय च माहीत नाही
सौंदर्यशास्त्राचा २ वर्ष आभ्यास पुर्ण करणारा लक्ष्या.....पण आता ही हा विषय न समजाला जाणारा लक्ष्या .

बेफिकीर,

लेख म्हणून छान लिहीलं आहेत पण बरीच सरमिसळ होते आहे. क्र. १ त ५ चे मुद्दे व विश्लेषण हे साहित्यनिर्मीतीच्या "पातळ्या" चढत्या क्रमाने ठरवणारी वर्गवारी असेल तर (कारण क्र १ पेक्षा दुसरा अधिक श्रेष्ठ असे काहिसे लेखातून पुढे येत आहे) कुठल्याही निर्मीतीचा प्रवास हा अध्यात्माशी जावून संपायला हवा असे अनुमान निघते- जे मला वस्तूतः व्यावहारीक दृष्ट्या थोडे पचायला अवघड जाते आहे.
भगवद्गीता बहुजनांसाठी ज्ञानेश्वरी मध्ये सोप्या भाषेत आली पण खुद्द ज्ञानेश्वरीची पुढे समीक्षा वा विश्लेषण करणारे थोडेच आणि त्यातही "एक तरी ओवी अनुभवावी" या न्यायाला अनुसरून त्यावर भाष्य करणारे हाताच्या बोटा ईतके. अशा वेळी मूळ निर्मीतीची पातळी हाच एकूणात वाचकाच्या अनुभवसंपन्नतेवर अवलंबून असते तिथे क्र १ ते ५ पैकी तुम्ही कुठल्या पातळीवर असता याला अधिक महत्व असेल.
रसग्रहणाचेही तसेच वाटते.. सारांश लिहीणे, विस्तार करणे, तपासून पहाणे, आणि मतीतार्थ जाणून घेवून त्याचे वाचकासाठी प्रकटीकरण ही सर्व अंगे रसग्रहणाची असतील तर तो रस गोडच असावा हा नियम गैरलागू ठरतो. थोडक्यात मूळ साहित्याची काही किमान पातळी वाचकाच्या मनात ठरली असेल तर रसग्रहणही साधारण त्याच पातळीला अनुसरून होण्याची शक्यता अधिक आहे.
असो.
>>रसग्रहणाला या सर्व पातळ्यांपैकी फक्त सौंदर्यशास्त्रीय पातळीशी घेणेदेणे असावे असे म्हणतात.
असे कोण म्हणतय..? असा काही नियम आहे का...?
>>वाट्टेल त्या पुस्तकाचे रसग्रहण होऊ शकत नाही का या मतावर 'मग समीक्षक काय करणार' हे प्रतीमत तयार आहेच.
हे विधान देखिल पटत नाही.

लेख्/ललित्/कथा/काव्य इ. वाचताच लेखकाचा त्या त्या विषयावर मत मांडण्याचा अधिकार (अभ्यास), शैली व गांभिर्य याचा बोध वाचकाला लगेच होतो. या निकषांनुसार मला अशोक पाटलांचा प्रतिसाद विषयाचे अधिक ज्ञान देणारा वाटला. धन्यवाद अशोकजी!!!

अशोकराव व खंडेराव, काही वेळाने सविस्तर वाचेन आपले प्रतिसाद! Happy क्षमस्व, उशीर झाल्याबद्दल!

अशोकराव, वा! लेखापेक्षा तुमची प्रतिक्रिया जास्त बोलकी आहे. मला आवडली.

खंडेराव समिक्षा ही पश्चात असली तरी साहित्यासाठी उपयोगी असते, शिवाय कुठल्या प्रकारचे साहित्य, फिक्शन, नॉन फिक्शन ह्या वरून तिचे महत्त्व ठरतेच ठरते. नॉन फिक्शन समीक्षेत समीक्षक मुद्द्यांची योग्य ती चिरफाड करून लेखात, पुस्तकात काय चुकले, काय बरोबर हे परत मांडतो. त्यामुळे नॉन फिक्शन मध्ये समिक्षा ही बांडगुळ ठरत नाही असे मला वाटते. उलट पूर्वपक्ष व प्रतिपक्ष ह्यांचे म्हणने (लेखण) बहुआयामी वाचक विचारात घेतो. नव्हे समिक्षकांचा ते काम आहे.

माझे वाचन फार तोकडे आहे. Wink इतर मान्यवर ठरवत आहेत ते वाचेन म्हणतो.

खंडेराव, आपला प्रतिसाद व त्यावरील माझे उत्तरः Happy

========================================================

<<<काहीतरी गफलत वाटते आहे. लेखाचा नक्की विषय काय आहे?>>>

साहित्याच्या दर्जाचे जाणकारांच्या मते असलेले निकष व 'रसग्रहणाबाबत'ची त्यांची मते! यात साहित्याचा दर्जा व रसग्रहण हे दोन भिन्न विषय असून शीर्षकही तसेच आहे. 'दर्जात्मक पातळ्यांचा रसग्रहणाशी संबंध आहे' असे वाटणे जसे शक्य आहे तसेच 'नसल्याचेही' वाटणे शक्य असावे. Happy

=======================================================

<< यांपैकी काहीही असले, तरी तो इतक्या मुद्द्यांची सरधोपट सरमिसळ करून थोडक्यात आवरण्यासारखा नाही.>>>

लेखात 'हा विषय इतक्यात सहज आवरण्यासारखा आहे' असे म्हंटलेले नाही. विस्तृत चर्चा प्रतिसादांमध्येही होतेच आहे. साहित्यनिर्मीतीच्य दर्जांच्या जाणकारांच्या मते असलेल्या पातळ्या व रसग्रहणाबाबत त्यांची मते ही माहिती मात्र इतक्या कमी शब्दात मी तरी सांगू शकलो आहे. माझा असा दावा नाही की हे 'असे असे' सांगीतले की तो विषयच संपला.

=======================================================

<<<यांपैकी पहिला विषय असेल, तर मग तो वरचा दुसरा मुद्दा- म्हणजे 'समीक्षा'- काय करतो आहे इथे? समीक्षेसाठी साहित्य लिहिणे म्हणजे काहीतरीच भंपक आहे. समीक्षा ही परावलंबी प्रक्रिया आहे. साहित्यावरचे 'बांडगुळ' म्हणा पाहिजे तर.>>>

'तो विषय काय करतो आहे' असे प्राचार्यांनी वर्गात अचानक दिसलेल्या तिसर्‍याच शाळेतील मुलाला पाहून विचारावे तसे आपण विचारलेत याकडे दुर्लक्ष करतो. Happy समीक्षेसाठी साहित्य लिहावे असे लेखात म्हंटलेले नाही. कृपया जरूर वाटल्यास पुन्हा वाचावेत. समीक्षेस पात्र होणारे लेखन हे 'समीक्षेसही पात्र न झालेल्या निव्वळ मूळ निर्मीतीपेक्षा' श्रेष्ठ आहे असे ते विधान आहे. बाकी 'काहीतरीच भंपक' वगैरे शब्द दुर्लक्षित! Happy समीक्षा ही परावलंबी क्रिया आहे व साहित्यावरचे बांडगुळ आहे ही माझीही मते आहेत व मी ती अधिक तीव्रपणे नोंदवतही आलो आहे. मी समीक्षक किंवा समीक्षेला श्रेष्ठ मानत नसून 'मूळ लेखनापेक्षा समीक्षा व्हावी असे लेखन श्रेष्ठ समजले जावे' असे म्हणत आहे. (तसेही, जे मी म्हणत आहे ते मूलतः मी म्हंटलेले नसून तसा उल्लेखही केलेला आहेच.) समीक्षेस योग्य लेखनाला इतर सामान्य लेखनापेक्षा श्रेष्ठ समजले जावे असे मत मांडण्याचे कारण हे आहे की 'समकालीन संस्कृती व समाजजीवनावर प्रभावी भाष्य करण्याचे' त्या लेखनाचे पोटेन्शिअल अधिक असते. 'म्हणजेच तुम्ही समीक्षेला श्रेष्ठ समजता' असे म्हणण्याचे कारण नाही कारण मुळात समीक्षेलाही वरीलच सर्व दर्जात्मक निकष लागू होतातच. Happy
========================================

<<<'सौंदर्यवाद' हा असाच एक दिशाभूल करणारा मुद्दा.>>>

आपण एकदम जोरात मते ठोकत आहात हे पाहून बरे वाटले.

=======================================

<<<जगण्याशी प्रामाणिक असलेल्या साहित्यात सुंदरता असतेच असते. समाजाचा, संस्कृतीचा आरसा धरणारे लेखन हे अस्सल मातीतले असते. म्हणूनच चिरंतन सुंदर ठरते. मग ते सौंदर्य कधी भीषण वास्तवाच्या रुपात समोर येते. कधी पिळ्वटून टाकणार्‍या दु:खाच्या रुपाने येते, कधी छोट्या छोट्या सच्च्या गोष्टीतल्या निखळ आनंदाच्या रुपात येते. उदाहरणार्थ भाऊ पाध्येंच्या 'वासूनाका'तल्या आणि वालावलकरांच्या 'बाकी शून्य'मधल्या कुठेतरी अंगावर येणार्‍या (काहींना भंपकही वाटलेल्या) वर्णना-प्रसंगात मला निखळ सौंदर्य जाणवले. कारण ते माझ्या आजूबाजूलाच कुठेतरी घडत असल्याइतके अस्सल वाटले. ही अस्सलताच साहित्य सुंदर वगैरे करते. साहित्यनिर्मितीत वेगळे काही 'सौंदर्यशास्त्र' असावे, गृहित धरावे, हे मला तरी हास्यास्पद वाटते.>>>

तुम्हाला मुद्दा समजला नाही. आता उदाहरण दिल्यावर समजावा. Happy

समजा मी असा माणूस आहे की ज्याला राग आला की ज्याचा राग आलेला आहे त्याचा खून करावासा वाटतो. आणि ही प्रवृत्ती (समजा) माझ्यात अत्यंत तीव्र प्रमाणात आहे. मी जर एक पुस्तक लिहीले आणि त्यात समरथन केले की 'आत्मशांतीसाठी राग आल्यावर समोरच्याचा खून करावा', तर हे माझ्या जीवनाशी प्रामाणिक आहे ना? अस्सल आहे व माझ्या दृष्टीने सुंदरही आहेच ना? अशीच एक हजार पुस्तके एक हजार लोकांनी काढली तर ती त्यांच्या त्यांच्या दृष्टीने प्रामाणिक असणार ना? आणि काही लोकांना ती अमानवी, घृणास्पद वगैरे वाटणार ना? म्हणजे सापेक्षतावाद (नेहमीप्रमाणे) येणारच! मग योग्य काय मानायचे? सुंदर काय मानायचे? मग मानवता, शांतता व सुखसमाधान याच्या प्रचलीत व्याख्या (या प्रचलीत असण्यात लाखो पिढ्यांचे योगदान असते व ते संस्कार व शिकवण या रुपाने पिढ्यांतरीत होत राहते) यांचा आधार घेऊन एकाला सुंदर व दुसर्‍याला अशुभ म्हणावे लागणार ना? सौंदर्यशास्त्र हा कुणी परीक्षक आहे असे लेखात म्हंटलेले नसून उलट हे नोंदवलेले आहे की ते मुळातच प्रत्येकास संस्कार व शिक्षण यातून ज्ञात असते व ते समीक्षेपेक्षा अधिक श्रेष्ठ असण्याचे कारण हे की समीक्षा 'चुकीची' होऊ शकेल. म्हणजे - पुन्हा उदाहरण!

देखे क्या पाते है उश्शाक बुतोंसे ऐ फैज
इक बिरहमनने कहां है के ये साल अच्छा है - गालिब

(बघूयात, या वर्षी आशिकांना आपापल्या माशुकांकडून काय मिळते, एका ब्राह्मणाने म्हंटलेले आहे की हे वर्ष म्हणे चांगले आहे.)

समीक्षक काय काय म्हणू शकतील?

१. पुरुषाला स्त्री प्राप्ती सहज नसणे ही किती युगानुयुगांची बाब आहे. गालिबने फार मूलभूत मुद्दा मांडला. तोही मिश्कीलपणे!

२. काहीतरी रचायचा म्हणून शेर रचला इतकेच!

३. गालिबने यात हिंदू ब्राह्मणांच्या पत्रिका / कुंडली वगैरे पाहून भविष्य सांगण्याच्या स्वभावावर कठोर टीका केलेली आहे. याचाच अर्थ तो हिंदूद्वेष्टा होता.

आता या अर्थांपैकी कोणता योग्य / अधिक योग्य मानायचा? तर ज्याने धार्मिक तेढ वाढणार नाही त्यातील जो अधिक भावेल तो! हे सौंदर्यशास्त्र ठरवते असे जाणकारांचे म्हणणे!

=====================================

<<<तत्वज्ञान आणि अध्यात्म- या मुद्द्यांबदलही असेच. त्या त्या प्रांतातले, देशातले तत्वज्ञान, विचार, संस्कृती हे प्रामाणिक राहून केलेल्या लिखाणात आपोआप येते. चांगल्या साहित्याचे वेगळे असे म्हणून हे निकष मानावेत, असं काही मला वाटत नाही.>>>

आपण दुसर्‍यांदा 'प्रामाणिक' वगैरे लिहीलेत. कोणती पातळी नेमकी प्रामाणिक असते असे मानायचे? गझलकार स्वतःचे आयुष्य गझलेत ओवतो हे, यमक जुळवतो हे, की परचित्तप्रवेश करतो हे, की कल्पनाविलासही चालतो, की जे आजवर कुणीच म्हंटले नाही व त्यालाही म्हणायचे नव्हतेच तरी त्याच्याकडून म्हंटले गेले ते ? प्रामाणिक म्हणजे नेमके कोणते आणि कोणते नाही? मग त्यातही सापेक्षतावादच समाविष्ट असल्यास मानवी मनाच्या कल्पनाविलासाचे शेवटचे टोक म्हणून मानली गेलेली श्रद्धा हा बेस धरण्यात अयोग्य काय? पुन्हा उदाहरण देतो. तत्वज्ञान म्हणते की हिंसेने प्रश्न सुटत नाहीत तर वाढत जातात. आता विश्वात जर एक लाख ग्रहांवर माणसे असतील व त्यातील आपण सोडून बाकी सगळे फक्त हिंसाच करत असतील तर काय? त्यांना हिंसाच मान्य असेल व त्यांचे प्रश्न ते तसेच सोडवत असतील तर आपले तत्वज्ञान सर्वसमावेशक नाही. (असायची गरज काय हा प्रश्न अपेक्षित आहे व तत्वज्ञानाला सगळे प्रश्न सोडवता येत नाहीत म्हणून तसे म्हणावे लागते हे त्याचे उत्तर आहे.) मग सर्वच प्रश्नांची उत्तरे कशातून मिळणार? मग अध्याऋत धरले जाते की 'निर्मात्याच्या' अस्तित्वावर श्रद्धा ठेवून असावे व त्याच मार्गाने जीवन जगत राहावे. आपोआपच या मार्गात अहिंसा, समाधान, त्याग, तप. मानवता, प्रेम व उपासना हे घटक येतात जे मानवी जीवनासाठी श्रेष्ठ मानले गेलेले आहेत. साहित्याला काही वेगळा आधार आवश्यक नाही. मानवाहा जीवनाचा अभ्यास व त्यातून काढलेले निष्कर्ष व त्यातील एक श्रद्धा असते हे ज्ञान साहित्याला आपला गुरू नेमायला पुरेसे आहे. Happy

==============================================

<<<बाकी रसग्रहण, समीक्षा, परीक्षण इत्यादींचा विषयच वेगळा. पाहिजे तर वेगळ्या ठिकाणी लिहायला हवे होते. साहित्यनिर्मितीच्या निकषांशी याचा संबंध नाही, असं मला वाटतं.>>>

रसग्रहण हा विषय 'वेगळा' म्हणूनच नोंदवला आहे. समीक्षा हा विषय नसून ती लेखनाच्या दर्जाची पातळी म्हणून आलेला आहे. आपल्याला बहुधा असे वाटत असावे की मी 'समीक्षा' या घटकाबाबतच लिहीले. तसे नसून मी केवळ जाणकारांच्या मते 'लेखनाच्या दर्जात्मक पातळ्या' याबाबत लिहीले ज्यातील एक पातळी 'समीक्षेस पात्र' अशी आहे. 'परीक्षण' या विषयाबाबत मी काहीही लिहीलेले नाही.

आपल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा आभार! Happy

-'बेफिकीर'!

अशोकराव, आपला प्रतिसाद आत्ता पूर्ण वाचला. Happy माफ करा, पण प्रवास करून आल्यामुळे आता निद्रादेवीची प्रार्थना करत आहे. कृपया वेळ द्यावात.

आपल्या प्रतिसादाबद्दलः

१. अत्यंत संयत व जबाबदार!

२. तीन मुद्यांबाबत मला जे वाटते ते आपण जे म्हणाला आहात त्यापेक्षा थोडे भिन्न आहे. Happy

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

छाया देसाई, माझ्या प्रश्नाला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.
"जर मराठी भाषिकानी अन्य भाषांचे शब्द आपल्या रोजच्या व्यवहारात आणले तर साहित्यात ते प्रतिबिंबीत होणारच ,नाही झाले तर ते साहित्य वास्तवतेला धरून नसल्याने बेगडी म्हणून त्याज्य होईल"

हे पटले. वास्तवता हा मुद्दा अत्यंत महत्वाचा.
जशी प्रेमाला भाषा नसते तशी दु:ख, राग इ. भावनांनाहि भाषा नसते नि 'मूळ निर्मिती, सौंदर्य, तत्वज्ञान, अध्यात्म, समीक्षापात्रता, रसग्रहणपात्रता' इ. ना पण नसते.

साहित्य म्हणजे काय तर 'मूळ निर्मिती, सौंदर्य, तत्वज्ञान, अध्यात्म समीक्षापात्रता, रसग्रहणपात्रता' इ. क्वालिटीज असलेले असे भावनांचे चित्रण, एक्सप्रेशन. त्याची ब्यूटी कळायला, जरा हिंदी सिनेमातल्या हिरोंनी जास्त पॉप्युलर केलेली टपोरी भाषा वापरूनच लिहीले तर फारच बरे. म्हणजे नुसतेच मराठीच नाही तर इतरहि भाषिकांना आपले लिटरेचर एंजॉय करता येईल. शिवाय ते जितके जास्त पॉप्युलर होईल, तितक्या प्रमाणात अधिकाधिक लोक तसे लिहून काँपिटिशन वाढेल नि मग काय सर्व्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट!
('मूळ निर्मिती, सौंदर्य, तत्वज्ञान, अध्यात्म समीक्षापात्रता, रसग्रहणपात्रता' या सगळ्या बोजड शब्दांना काही इंग्रजी किंवा उर्दू नावे दिल्यास जास्त इझीली लेजिबल होईल नि जास्त समजेल. धन्यवाद.)

Pages