झीं झीं झीं झिच्यकं झिच्यक्

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

घरी जुन्या संगणकाच्या पडद्याचे सुरक्षाकवच पडून होते. तेव्हा म्हटले ही गंमत करून बघूया.

एक पाऊण फुटाची पी.व्ही.सी. नळी आणि रिकामी हिंगाची डबी घेतली.

त्या काचेची बाजूची चौकट काढून टाकली.

तिला काच-खाटकाकडे नेले आणि तिचे साधारण अडीच सेंटीमीटर रूंद आणि वीस सेंटीमीटर लांबीच्या तीन पट्ट्या कापून काढल्या.

त्याबरोबरच त्याच्याकडून या पीव्हीसी नळीच्या तोंडावर बसेल अशी एका साध्या पारदर्शक काचेची वर्तुळाकार चकतीही कापून घेतली.

त्या तीन पट्ट्यांचा समभूज त्रिकोण तयार होईल अशा तर्‍हेने जुडी करून तिच्या दोन्ही टोकांना चिकटपट्टी लावून टाकली.

डबीच्या गळ्याखाली कापून तिचे तोंड वेगळे केले.

पीव्हीसी नळीच्या एका टोकाला साधारण पाव सेंटीमीटर अंतरावर एक खाच पाडली.

या खाचेत पुढच्या चित्रात तर्जनीने दाखवलेली डबीच्या तोंडाची आतल्या बाजूची कडा अडकेल असे डबीचे तोंड सरकवून बसवले.

आता खालील चित्रात लाल ठिपक्यांनी दाखवलेय तेथे एक अरुंदशी गोल पन्हाळी तयार होईल.

ती पन्हाळी फेव्हीकॉलने काळजीपूर्वक नळीच्या कडांपर्यंत भरून काढली आणि काचेची वर्तुळाकार चकती त्यात बसवली.

ते एक लेखणीदाणीत वाळायला ठेऊन दिले.

कपड्यांवर सजावटीसाठी वापरतात ते रंगीत खडे/मणी, तुटलेल्या काचेच्या रंगीबेरंगी बांगड्या, त्यांचे तुकडे करण्यासाठी एक पक्कड, कात्री, धागा, दुमडल्यावर१५x१५ सेंमी होईल असा प्लास्टीकचा पारदर्शक कागद, जाडी आणि दोन्ही बाजूंना चिकटपणा असणारी चिकटपट्टी इ. साहित्य घेतले. ( बायकोला मस्का मारला. Wink )

बांगड्यांचे बारीक बारीक तुकडे केले. ते रंगीत खड्यांत मिसळले.

फेव्हीकॉल वाळल्यानंतर पीव्हीसी नळीला बाहेरून रंगीबेरंगी आवरण लावून टाकले.

आता नळकांड्याच्या टोकाशी लावलेल्या डबीच्या भागाच्या आत बसेल असे एक कंकणाकृती कडे तयार करण्यासाठी उरलेल्या डबीपासून एक पट्टी कापून काढली आणि खाली दाखवल्याप्रमाणे तिला टाचणी टोचून घेतली. बाहेरून त्याला थोड्या अंतरांवर जाड चिकटपट्टीचे तीन तुकडे चिकटवले.

हे कंकणाकृती कडे आधी बसवलेल्या डबीच्या भागात बसवले. रंगीबेरंगी ऐवज डबीच्या तोंडात टाकला आणि तोंड प्लास्टीकच्या कागदाने बंद करून धाग्याने बांधून टाकले.

काचेची जुडी नळकांड्यात थोडीशी सैल बसत होती. म्हणून तिच्याभोवती दोन्ही टोकांना जाड, दोन्हीबाजूंना चिकटपणा असलेल्या चिकटपट्टीचा एकेक वेढा दिला. ( त्या चिकटपट्टीवरचे आवरण काढले नाही - पिवळे दिसतेय ते. म्हणजे दोन चिकट बाजूंपैकी एकीचाच उपयोग केला आहे.) काचेच्या पट्ट्यांची त्रिकोणाकृती जुडी दुसर्‍या बाजूने नळकांड्यात हळूच सोडली आणि झाले शोभायंत्र तयार!

नळीच्या उघड्या बाजूने आत बघायचे आणि नळी हळूहळू गोल फिरवायची. मग तुम्हाला दिसतील क्षणाक्षणाला बदलणार्‍या एकापेक्षा एक सरस सुंदर अशा आकृत्या. एकापेक्षा दुसरी निराळी! कंटाळा आल्यावर चांगला विरंगुळा.

विषय: 
प्रकार: 

जीडी, सुपर्ब!!!!!!
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. Happy
रच्याकने, दूरदर्शनवर पूर्वी "गजरा" नावाची मालिका यायची त्याच्या सुरूवातीलाही असंच दाखवायचे. Happy

सह्ही... आम्हीपण लहानपणी बनवले होते.

रच्याकने, दूरदर्शनवर पूर्वी "गजरा" नावाची मालिका यायची त्याच्या सुरूवातीलाही असंच दाखवायचे. >>>> अगदी. मलाही तेच आठवले एकदम. Happy

कॅलिडिस्कोपच्या आतील काचांचे मनमोहक आकारही मस्त टिपले आहेस. Happy

अ प्र ती म!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जहबहरहदस्तह!

गजानन, सुरेखच.
लहानपणी तासंतास या कॅलिडोस्कोप बनवण्यात घालवले आहेत. प्रत्येक पॅटर्न वेगळा
दिसायचा. मग ते बाजारात पण मिळू लागले. परत गायब झाले.
गेल्या आठवड्यात, ठमेने तो लेकीसाठी घेतला, तर मला मुद्दाम फ़ोन करुन सांगितले.

Pages