मला खात्री आहे.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 July, 2011 - 06:08

"मला खात्री आहे..., देव जेव्हा नशिब वाटत होता तेव्हा मी नक्कीच कुठल्यातरी टेंडरचं कॉस्टींग काढत असणार......................!"

"ए सुकु... चल ना कुठेतरी जावु या विकेंडला. जाम कंटाळा आलाय रे. कित्येक महिन्यात आपण कुठे गेलोच नाही आहोत. चल दोन दिवस कुठेतरी शांत ठिकाणी जावून निवांतपणे राहू या!"

"ठिक आहे, पण तुला रजा मिळेल का शनिवारची? नाहीतर नेहमीप्रमाणे तुझा बॉस आपल्या प्लानींगवर पाणी फिरवणार. (खरेतर गेल्या तीन वर्षात असे फक्त एकदाच घडले होते, कारण मुळातच मी फक्त दोनदा तिला बाहेर घेवुन गेलो होतो फिरायला)"

मी पुस्तकातून डोके न काढताच शैलीला विचारले.

"अरे असे काय करतोयस? तुला कालच नाही का सांगितलं या शनीवारी मला सुट्टी आहे म्हणून?"

शैलीच्या स्वरात सॉल्लीड नाराजी होती. अलिकडे माझं असंच होतं लक्षातच राहात नाही कामाच्या धबडग्यात. ती रोजची टेंडर्स, मग कॉस्टींग काढणं, सप्लायर्सशी बोलणं, त्यानंतर त्यांच्याकडून रेट्स घेवून प्रपोजल तयार करणं. मग त्यात बॉसने शंभर सुधारणा सुचवून ते पुन्हा नव्याने बनवायला सांगणं. जाम वैताग येतो हो. सगळं विसरायला होतं आणि मग शैली वैतागते. "घरच्या कामाकडेच बरं तुझं दुर्लक्ष होतं?" म्हणून करवादते.

अरे हो, ते राहीलंच...

मी सुकुमार, सुकुमार अनिरुद्ध बापट. ओरिएंटल केमिकल्स लि. मध्ये 'काँट्रॅक्ट्स मॅनेजर' म्हणून काम करतो. राहायला विरार, ऑफीस दादर. त्यामुळे रोजची लोकलची धक्काबुक्की आमच्या पाचवीलाच पुजलेली. शैली माझी सुविद्य पत्नी. सुविद्य एवढ्यासाठी की आपल्याजवळ असलेल्या प्रचंड (तिच्या मते) विद्वत्तेच्या जोरावर मला सारखे सल्ले देणं (तिच्या मते मी एक नंबरचा बावळट आहे) हा ती तीचा मुलभुत अधिकार समजते म्हणून. विशेषतः माझ्या काटकसरीला कंजुषपणा समजून तीने दिलेले सल्ले प्रचंड त्रास देतात हो. बाय द वे शैली (पुर्वाश्रमीची शैली देशपांडे आणि आता शैली बापट) एका फ़ार्मास्युटीकल कंपनीत तिथल्या डायरेक्टरची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करते. तिला सुट्टी मिळणे म्हणजे खुपच अवघड गोष्ट असते. (अशी नोकरी असणारी बायको प्रत्येक पुरुषाला मिळो) त्यामुळे मी सुखी प्राणी आहे. पण यावेळी नेमकी तिला कशाची तरी सुट्टी मिळाली होती या शनिवारी आणि आता मॅडम माझ्या मागे लागल्या होत्य कुठे तरी बाहेर जावू फिरायला म्हणुन. किमान ८-१० हजारांचा बांबू !! पण यावेळी कारणे सांगायला जागाच नव्हती. हो नाही, हो नाही करत मी डोके चालवले आणि माथेरानचे सौंदर्य एकदा तिच्या डोक्यात ठसवण्यात यशस्वी झालो. (मागच्या वेळेस तिला केळव्याला नेवुन आणले होते. त्यामुळे आता यावेळी कुठेतरी लांब जावू अशी भुणभूण तिने लावली होती)

ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळीच आम्ही माथेरानला जायला निघालो. खरेतर मी शनीवारी सकाळी जायच्या मताचा होतो. (उगीचच शुक्रवारच्या एका रात्रीसाठी पुर्ण भाडे भरायचे?) पण सुट्टीचा एक क्षणही दवडायची शैलीची इच्छा नसल्याने झक मारत आदल्या (शुक्रवार) रात्रीपासुनचे बुकींग केले होते. रवीवारी दुपारी परत फिरायचे.....

यावेळेस शैलीने हट्टच केल्यामुळे ट्रेनने जायचे कॅन्सल करुन मी माझी गाडी काढली होती. माझ्या १८५७ च्या जमान्यातली (?) एक जुनी फियाट आहे. शैली सारखी मागे लागते ही गाडी जुनी झालेय आता आपण नवी घेवु म्हणुन. पण मला ते पटत नाही. विनाकारण खर्च का करायचा? भलेही शैली गाडीच्या कर्जाचा हप्ता तिच्या पगारातून द्यायला तयार असेल पण म्हणुन उगीचच एवढा मोठा खर्च करायचा? तेही ऑलरेडी आपल्याकडे एक गाडी असताना? खरेतर गाडी घ्यायची अजिबात इच्छा नव्हती माझी. एवढ्या लोकलट्रेन्स पुरवल्या आहेत ना सरकारने. पण शैलीचा हट्ट.., काय करणार. घेतली गाडी. (पैसे शैलीच्या भावानेच दिले होते. मी नंतर हळु-हळु फेडणार आहे म्हटलं!कुणाचं कर्ज डोक्यावर ठेवायला मला नाही आवडत. पण सुशील ऐकतच नाही म्हणतो ताईला लग्नाची भेट म्हणुन दिलीय मी गाडी! लग्नाची भेट... सेकंड हॅंड ? )

आता ... , मान्य आहे माझी फियाट जराशी जुनी आहे. म्हणजे गाडीच्या आधीच्या मालकाने त्याच्या बॉसकडून विकत घेतली होती ७ वर्षांपुर्वी. त्याच्या बॉसने बहुदा ३-४ वर्षेच वापरली होती फक्त. मी गेली दोन वर्षे वापरतोय गाडी. आता मला सांगा एवढी नवी गाडी उगीचच का विकून टाकायची? ठिक आहे दर दोन आठवड्यांनी तिला बंद पडायची हुक्की येते. पण म्हणून बदलून टाकायची लगेच्च्च्च्च्च ! काही बांधीलकी नावाची गोष्ट आहे की नाही साली?

असो.., तर आम्ही दोघे माझी गाडी घेवून माथेरानला जायला निघालो. नुकतीच सर्व्हीसींग करुन घेतलेली असल्याने यावेळेस मात्र गाडी अगदी टकाटक होती. पहिल्या झटक्यात स्टार्ट झाली......

आधीच ठरवल्याप्रमाणे शैलीने कुठल्यातरी हॉटेलचे बुकींग करून ठेवले होते. असल्या कामात ती एक्स्पर्ट आहे. (खरेतर त्याबाबतीत तिचा माझ्यावर अजीबात विश्वास नाही. मागे एकदा तिने माझ्यावर ते काम सोपवले होते आणि शेवटी आम्ही एका लॉजवर उतरलो होतो.) परमेश्वराचे माझ्याशी काय वाकडे आहे कुणास ठाऊक? आता हेच बघा ना. सलग दोन दिवस सुट्टी लागुन आलेली. मी किती मनोभावे प्रार्थना केली होती देवाची.

"बाबारे यावेळी माथेरानमधली सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल असु देत."

पण त्याने नाहीच ऐकले माझे. शैलीने बुकींग मिळवले होते @ ३६०० रुपये पर डे? माझा जिव तिळ तिळ तुटला होता. अरे मान्य आहे पगार भरपूर आहे पण म्हणून काय ही अशी उधळपट्टी करायची. आता तसं सगळे कटींग होवून पासष्ठ हजार येतात माझ्या हातात आणि शैलीचे जवळपास ३२ , म्हणजे लाखाच्या घरात मासिक प्राप्ती आहे आमची. पण म्हणुन एवढी उधळपट्टी. मला नाही आवडत पैसा खर्च करायला विनाकारण? ३ वर्षापूर्वी लग्नात घेतलेले बुट मी अजुन वापरतोय. सुट परवाच आल्टर करुन घेतलाय. तुम्हाला खोटे वाटेल पण मी दोन महिन्यातून एकदा कटींग करतो फक्त. त्यासाठी अजुनही मी माझ्या जुन्या घरापासल्या सलुनमध्येच जातो. (जुनं गिर्‍हाईक या कारणाखाली त्याच्याशी बार्गेन करता येतं ना! तेवढीच बचत !!) असो.......

गाडीने कसलाही त्रास न देता माथेरानचा घाट पार पाडला आणि माझा जीव भांड्यात पडला. (नाहीतर पुन्हा रिपेअरींगचा खर्च?) हे मात्र मला प्रचंड आवडलं बर्का माथेरानच्या लोकांचं. गावात गाड्यांना अजिबात परमिशन नाही. केवढं मोठं प्रदुषण होतं (आणि सात दुणे चौदा किलोमीटरचं पेट्रोलही वाचतं!) शैली लागली होती मागे आपण घोडा ठरवु या जायला म्हणुन. पण मी माथेरानच्या दैवी निसर्गाचं सौंदर्य तिला अगदी ठामपणे समजावून सांगितलं आणि ती वरपर्यंत चालत यायला तयार झाली. तरी नशिब आमच्या हॉटेल पॅकेजमध्ये नाष्टा, दोन्ही वेळचं जेवण, चहा याचाही समावेश होता. हॉटेल बघीतल्यावर मात्र मी सॉलीड खुश झालो. आमची रुम दरीच्या बाजुलाच होती. (खरे तर आम्हाला दुसरीच रुम दिली होती आधी सांगुन. पण मी भांडून ही रुम घेतली, पुन्हा त्याच दरात. व्हॅल्लीसाईड म्हणुन लगेच १०० रुपये वाढवायला बघत होता तो मॅनेजर. बच्चमजी, गाठ बापटाशी आहे म्हटलं!)

मस्त नजारा होता. लांबपर्यंत पसरलेल्या डोंगररांगा, पावसाळ्याचा सिझन असल्याने सगळीकडे हिरवेगार गालीचे पसरलेले. आता दोन दिवस इथे मजेत आराम करायचा. आम्ही फ्रेश होवून कपडे बदलले आणि रिसेप्शनला फोन करुन चहा मागवला. तेवढ्यात शैलीने फरमाईश केली.

"उद्या मात्र घोडा ठरवायचा रे. मला नाही होणार इतकं चालणं. किती लांब आहेत सगळे पॉईंट इथले."

मी मनातल्या मनात हिशोब जुळवायला लागलो.

एका घोड्याला १५०० रुपये दिवसाचे. (बाप रे...!) मी काय, अजुनही धडधाकट आहे. चालु शकतो हवा तेवढा. एकच घोडा घेवुया. तोही लांबचे पॉईंट्स पाहण्यापुरता. जवळचे पॉईंटस काय चालतही बघता येतील.........

*********************************************************************************************************************

रवीवार : सकाळी साडे नऊ - दहाची वेळ
स्थळ : माथेरान पोलीस चौकी

इन्स्पेक्टर राणे नुकतेच चौकीत येवुन पोचले होते. कॉन्स्टेबलने मागवलेल्या मस्त गरमागरम चहाचे घुटके घेत कुठलीतरी फाईल चाळणे सुरू होते. तेवढ्यात फोन खणखणला.....

"नमस्कार, माथेरान पोलीस चौकी, हवालदार सानप बोलतोय." समोर उभ्या असलेल्या हवालदार सानपांनी फोन उचलला...

"नमस्कार सानपसाहेब, मी कोरगावकर बोलतोय. हॉटेल सागरचा मॅनेजर. राणेसाहेब आहेत का?"

"नमस्कार कोरगावकर साहेब. राणे साहेब आहेत ना. चहा घेताहेत देवु का?" राणेंनी मान वर करुन सानपांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहीले.

"कोरगावकर आहे, सागर हॉटेलचा मॅनेजर. तुमच्याशी बोलायचे म्हणतोय." फोनच्या माऊथपीसवर हात ठेवुन सानपांनी हलक्या आवाजात राणेंना सांगितले. तसा राणेंनी हात पुढे केला.

"बघू, काय म्हणतोय?"

तसा माथेरानमधल्या सगळ्याच हॉटेल्सच्या कर्मचार्‍यांबरोबर सानपांचा नेहमीच संपर्क येत असे. (कशासाठी तेवढे विचारु नका!) त्यामुळे कोरगावकरांशीही त्यांची चांगली ओळख होतीच.

"नमस्कार कोरगावकर साहेब. बोला राणे बोलतोय. सकाळ-सकाळ आमची कशी काय आठवण काढलीत?"

"साहेब, इथे मोठा घोटाळा झालाय. तुम्ही लवकर या हॉटेलवर..."

कोरगावकरांचा आवाज प्रचंड घाबरल्यासारखा वाटत होता.

"काय झालं कोरगावकर जरा स्पष्ट सांगाल का?" राणे आता सावरून बसले.

"राणे साहेब, अहो इथे रुम नंबर १३ काल एक नवरा-बायको उतरले आहेत. म्हणजे नक्की काहीच कळायला मार्ग नाही. शुक्रवारी रात्री दोघांनी चेक इन केलं होतं. काल दिवसभर माथेरानमध्ये साईट सीईंग केलं त्यांनी. रात्री साडे नऊच्या दरम्यान रुमवरच जेवण मागवलं. आज सकाळीही एका घोडेवाल्याला बोलवलं होतं त्यांनी. तो साडे आठलाच हजर झाला. बराच वेळ झाला तरी दोघेही येइनात. रुममधला फोनही कुणी उचलेना. म्हणुन बॉय त्यांना बोलवायला गेला. तर दारही उघडायला तयार नाही. शेवटी आम्ही दरवाजाच्या फटीतून पाहीले तर आत दोघेही अतिशय अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले आहेत. बहुदा जिवंत नसावेत दोघेही! म्हणुन लगेच तुम्हाला फोन केला. साहेब, प्लीज काहीतरी करा. आमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. उभा सिझन तोंडावर आलाय आणि नमनालाच ही भयानक घटना घडलीय. "

कोरगावकर प्रचंड अस्वस्थ वाटत होते.

"तूम्ही काळजी करु नका कोरगावकर, मी पोचतोच दहा मिनीटात. बाय द वे नावं काय म्हणालात त्या दोघांची."

"अं..अं हो... मिस्टर अँड मिसेस सुकुमार बापट!"

"ह्म्म्म्म ?" राणेंच्या कपाळावरच्या आठ्या अजुन गडद झाल्या.

"सानप, चला हॉटेल सागरला. टीम घ्या आपली बरोबर....!"

"टीम?" सानपांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटले तसे राणे हसायला लागले.

"अहो जे कोणी असतील त्यांना घ्या. एखादा पंचनामा करायचा झाला की जी चार टाळकी आपण बरोबर घेतो ती घ्या आणि निघा. माझा अनुभव सांगतो त्यावरुन बहुदा दोन मुडदे वाट पाहताहेत आपली."

"च्यामारी, यांनापण इथेच येवुन मरायचे होते का? शेवटचं वर्ष आहे नोकरीतलं. सुखाने जाईल म्हणलं पण आपल्या नशिबात हेच दिसतय." सानप करवादले.

थोड्याच वेळात राणेंची सगळी टीम , फोटोग्राफरसहीत हॉटेल सागरवर येवुन पोहोचली. कोरगावकर दारातच उभे होते. राणेंना बघताच ते लगबगीने पुढे आले.

"राणेसाहेब, शक्यतो सगळं शांतपणे होवु द्या. बाकीच्या ग्राहकांना कमीत कमी त्रास होइल असं पाहा."

राणे हसले. "मी प्रयत्न करेन कोरगावकर!" पण थोडा फार त्रास हा होणारच. बाकी एक काम करा मी सांगेपर्यंत हॉटेलमधला कुठलाही पर्यटक चेक आऊट करता कामा नये. मला गेल्या गुरुवारपासुन हॉटेलमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे डिटेल्स हवेत. Each and every person! लगेचच आणि तुमचा सगळा स्टाफ मला दहा मिनीटात इथे हजर हवाय. मी पाच मिनीटात घटनास्थळाला भेट देवून आलोच. काय रुम नंबर म्हणालात तुम्ही १३, बरोब्बर? पण ते दोघे जिवंत आहेत की मृत?"

"नक्की सांगता येणार नाही साहेब, पण बहुदा मृत असावेत. आम्ही अजुनही दरवाजा तोडलेला नाहीये. तुमचीच वाट पाहात होतो."

कोरगावकरांना उत्तर देण्याचीही संधी न देता राणे फटाफट घटनास्थळाकडे जायला निघाले. ही त्याची कामाची पद्धतच होती. बचाव हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच मुळी. आक्रमण..., शत्रुला मग तो कसलाही असो, कुठलाही असो कसलीही संधी न देता त्यावर तुटून पडायचे हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशस्वी कारकिर्दीचे गमक होते. ते ताबडतोब रुम नंबर १३ कडे रवाना झाले. रुमच्या बाहेर एक वेटर उभा होता. त्याला त्यांनी इशार्‍यानेच खाली जावुन थांबायला सांगितले. रुममध्ये शिरण्याच्या आधी त्यांनी आजुबाजुचे निरीक्षण केले. रुम नंबर १३ ही तिसर्‍या मजल्यावर होती. हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर मजल्यावर एकुण सहा रुम होत्या. मध्यभागी एकुण दोन लिफ्ट आणि एका बाजुने वर आलेला जिना. जिन्याच्या डाव्या बाजुने एकुण चार खोल्या तर उजव्या बाजुला दोन खोल्यांच्या मधोमध दोन लिफ्ट अशी व्यवस्था होती. हॉटेल एकुण तळमजला + ४ मजले असे एकुण पाचमजली म्हणता येइल अशी वास्तु होती. चौथ्या मजल्यावर मात्र दोनच रुम होत्या. ज्या आधिक प्रशस्त आणि आरामदायक असाव्यात. बहुदा जास्त पैसे खर्चायची तयारी असणार्‍यांसाठी ती सोय होती.

"ह्म्म्म, सगळ इन्टॅक्ट आहे अगदी!" स्वतःच्याच डोक्यावर एक हळुवार टपली मारत राणे रुम नंबर १३ मध्ये शिरले.

१३ नंबरच्या रुममध्ये राणेंनी प्रवेश केला तेव्हा त्यांच्या टीमने आधीच रुमचा ताबा घेतलेला होता. हवालदार सानप आणि त्यांची टीम कामाला लागली होती. फ़ोटोग्राफर आपले काम करत होते.

एक प्रेत बहुदा बेडवर आणि दुसरे बेडशेजारच्या आरामखुर्चीत पडलेले होते. आता दोन्ही प्रेतांवर पांढरी चादर पांघरण्यात आली होती.

"सानप, काय सिच्युएशन आहे?"

हातातल्या केनने टी-पॉयवर पडलेला शर्ट थोडासा उचलून धरत राणेंनी विचारले. सानप अतिशय अनुभवी होते. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कितीतरी खुनाच्या केसेसवर त्यांनी वरीष्ठांच्या बरोबरीने काम केलेले होते. आज मात्र सानप थोडे गंभीर दिसत होते.

"साहेब, तुमचे म्हणणे खरे ठरले. दोघेही खल्लास आहेत. सॉल्लीड लोचा आहे. किचकट आहे. केस त्रास देणार नक्कीच!"

राणेंनी मान वर करून प्रश्नार्थक नजरेने सानपांकडे बघीतले. सानप जेव्हा इतके गंभीर होतात तेव्हा नक्कीच बाब त्रास देणारी असते हे माहीत होते त्यांना. इथे माथेरानमध्ये तसे फारसे गुन्हे घडत नाहीत. झाले तर किरकोळ मारामार्‍या, पाकेटमारी किंवा लॉजमालकांच्या विरोधात कस्टमर्सने केलेल्या फसवणुकीच्या किरकोळ तक्रारी असे स्वरुप असते. गेल्या दोन वर्षात प्रथमच अशी घटना घडली होती आणि तोही एक साथ दोन-दोन मृत्युंची!

"सानप?"

"हो साहेब, सगळी रुम चाळुन काढली. दोन प्रेते पडली आहेत. पण मृत्युचे कारण म्हणता येइल अशी एकही गोष्ट नाही. प्रेतांच्या एकंदर स्थितीवरून विषप्रयोग झालेला नाही याचा अंदाज बांधता येतोय. दोघांनी आत्महत्या केलीय म्हणावे तर तसंही दिसत नाहीये. कारण आत्महत्येचं एकही साधन जवळपास दिसत नाहीये. रुममध्ये साधी सुईदेखील सापडली नाही. रुमला एकच खिडकी आहे दरीकडे उघडणारी. पण तीदेखिल आतुन बंद आहे. दरवाजा आतून बंद आहे. त्यामुळे बाहेरुन कुणी आत आले असल्याची शक्यता नाही."

"बाथरुम चेक केलेत?"

"केलं. अटॅच्ड आहे. तिथेही खिडकी नाही. सगळं जागच्या जागी आहे. तरीही एक गोष्ट संभ्रमात टाकते आहे." सानप बोलत होते.

"कसला संभ्रम सानप?" राणेंनी विचारले.

"तूम्ही प्रेतं बघा साहेब, तुमच्या लगेचच लक्षात येइल."

सानपांनी पुढे सरत एका प्रेताच्या चेहर्‍यावरची चादर बाजुला केली. एका अतिशय सुंदर तरुणीचा चेहरा होता तो. जिवंतपणी ही तरुणी खरोखर सौंदर्यवती असावी. चेहर्‍यावर ओघळलेल्या केसांच्या फ्लिक्स तिच्या सौंदर्यात एक विलक्षण मादकपणा आणत होत्या. लांबसडक केस, चाफेकळीसारखे नाक आणि.......

तिचे डोळे...

तिचे डोळे मात्र विस्फारलेले होते. त्या डोळ्यात समोर वाघ पाहील्यासारखी मुर्तीमंत भीती होती. जणुकाही मृत्युपूर्वी तीने काहीतरी भीतीदायक असे बघीतले असावे.

"साहेब, पोस्ट मार्टेमनंतर काय ते कळेलच. पण माझा अनुभव सांगतो, कसलातरी भयानक धक्का बसल्याने तिचे हृदय बंद पडले आहे. पण गंमत म्हणजे हार्ट अटॅकची कुठलीही लक्षणे शरीरावर नाहीयेत."

सानप पुढच्या प्रेतावरची चादर दूर करता करता म्हणाले.

इथेही तीच परिस्थिती होती. साधारण बत्तीशीचा असेल तो.

"हा तिचा नवरा होता?"

राणेंनी तोंड वाकडे करत विचारले.

डोक्याला टक्कल पडायला लागलेले, काळसर वर्ण. पुढे आलेले दात........! इतक्या सुंदर तरुणीचा नवरा हा, असला असेल यावर विश्वास ठेवणे जड जात होते राणेंना.

"नशिबवान होता साला!" राणे स्वतःशीच पुटपुटले.

"काय म्हणालात साहेब?" सानपांनी विचारले तसे राणेंनी सावरुन घेतले.

"नाही, नाही..काही नाही. प्रेतं पोस्टमार्टेमला पाठवून द्या. त्यानंतरच तपासाची दिशा ठरवता येइल. तोपर्यंत मी हॉटेलच्या स्टाफशी आणि इतर कस्टमर्सबरोबर बोलतो. बघू काही माहिती मिळते का ते?"

राणे पुन्हा रुमच्या दाराकडे जायला वळले. त्यांच्या लक्षात आलं की हॉटेलचा मॅनेजर दारातच उभा होता. त्याचे लक्ष त्या तरुणाच्या प्रेताकडे लागलेले आणि डोळे विस्फारलेले...

"साहेब..., हा तो नाही ! म्हणजे हे मिस्टर बापट नाहीत, हा कुणीतरी दुसराच माणुस आहे. मिस्टर बापट कमालीचे देखणे आहेत म्हणजे होते म्हणजे ....."

मॅनेजर सॉलीड गोंधळला होता. राणे चमकले, तसेच गर्रकन पुन्हा मागे वळले आणि आरामखुर्चीकडे आले. त्या प्रेताकडे पुन्हा एकदा पाहताना यावेळेस मात्र त्यांना ते जाणवलं. त्यांनी काहीतरी पाहीलं होतं. आरामखुर्चीचा आपण बसतो तो तळ आणि हात टेकवायची लाकडी पट्टी या दोन्हीच्या मध्ये एक कागदाचा बोळा अडकलेला होता. राणेंनी उत्साहाने तो बोळा सोडवून घेतला....

बहुतेक एखाद्या जुन्या वर्तमानपत्राचा तुकडा होता तो. त्यावर लालसर शाईने (की रक्ताने) वेड्या वाकड्या अक्षरात लिहीले होते...

"तो परत आलाय...., मला खात्री आहे!"

क्रमशः

गुलमोहर: 

विशाल राव कथा कितीही भागांची होउदेत. कितीही उत्कंठा वर्धक होऊदेत पण ही उत्कंठा खुनी कोण याचीच असु देत. पुढिल भाग कधी येणार याची नको. पट पट लिहा पुढचे भाग.

बाकी नारायण धारप, गुरुनाथ नाईक,बाबा कदम यांच्या नंतर कोण हा प्रश्न आता उरला नाही.

जबरी रे भाउ. मी क्रमशः वाचुन ठरविले की शेवटचा भाग येउ दे मगच वाचु. उत्सुकता सहन होत नाही मला अताशा. (पण असे कधी होते का?) जबरदस्त
आता भराभर भाग येउदे पुढचे.....

मला पण खात्रीच आहे ... विशाल पुढचा भाग काय लिहित नाही.
असो .. चेन्नैला आहेस ना ... मस्त पैकी पोन्गल खा. स्टर्लिंग रोड वर चांगले मिळते. Happy

Pages