तुझ्या वाचून

Submitted by -शाम on 19 July, 2011 - 00:42

माझ्या काळ्या आईसाठी येई घेऊन तू धारा
तुझ्या वाचून पावसा जन्म माझा रे अधुरा..||

उडे धूळ आभाळात
कशी कवळून धरू
माय पडते उघडी
बघे उदास लेकरू
डोळा सपान पाहतो रंग हिरवा गहिरा..|| तुझ्या..

वनवनती पाखरे
सुन्या सुन्या शिवारात
टाहो रानात गुरांचा
बाळ रडते घरात
मुक्या जीवांच्या मुखात कोण भरविल चारा|| तुझ्या..

झोपडीतल्या आईची
छाती भरु दे दुधानं
ठावं नाही तान्हुल्याला
तुझं असं येणं जाणं
माऊलीच्या कुशीतून आज आलाया बाहेरा|| तुझ्या..

तुझ्या सोबतीनं देवा
पिकवीन ही जमीन
घाम गाळून फेडीन
उभ्या जगताचं रिन
भाव भाबड्या मनाचा घेई वळकून सारा..|| तुझ्या..
.......................................................शाम

गुलमोहर: