आळंदी देवाची

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 June, 2011 - 07:32

महाराष्ट्रातल्या तमाम वारकर्‍यांची पावले आज पंढरपूरच्या दिशेने वळलेली आहेत. पावसाचा जोर जरी म्हणावा तसा नसला तरी वारकर्‍यांचा जोश मात्र नेहमीप्रमाणेच मुसळधार आहे. मिडियाच्या कृपेने घर बसल्या सगळी क्षणचित्रे पहायला मिळताहेत. वारीला न जाता वारीचा आनंद लुटता येतोय. घाटातली अभुतपुर्व गर्दी, रिंगण सोहळा, दिंडी.... वारी पहाणे हाही एक अविस्मरणीय सोहळाच.

मी आजवर कधी वारीला गेलो नाही. पुढे कधी योग येईल याची कल्पना नाही. पण आळंदीत जायचं मात्र फार पुर्वी नक्की झाल होतं. शेवटी एकदाचा तो योग आला. २९ जुन २०११ ला. तेही ऐन वारीच्या दिवसात. तसा या दिवसात आळंदीत बर्‍यापैकी शुकशुकाटच असेल अशी कल्पना होती आणि ती खरी ठरली सुद्धा. फारशी चहलपहल जाणवली नाहीच. पण ठरल्याप्रमाणे एकदाचे पोहोचलो आळंदीत.

खर तर आळंदीच्या या माझ्या वारीमागे महत्त्वाचं कारण होत आणि याचा उगम झाला ६ जानेवारी २०११ ला जेव्हा मी 'मराठी पाऊल पडते पुढे' च्या ऑडीशनसाठी पुण्यात होतो. आळंदीच्या 'अमृतनाथ स्वामी महाराज संस्था' या संस्थेच्या वतीने काही वारकरी ऑडीशनला आले होते. पांढरे सदरे, धोतर, डोक्यावर गांधीटोपी, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळाला गंध... असा सर्वांचा वेष. ते नेमकं काय सादर करणार आहेत याचं कुतूहल होतं. टाळ मृदुंगाच्या स्वरात त्यांनी दिंडीतील 'पाऊली' हा प्रकार सादर केला. फारच साधा, सुंदर पण थक्क करणारा असा त्यांचा तो प्रयोग. मनाला प्रचंड भावला.

पुण्यात सुरु झालेला हा त्यांचा प्रवास कर्जतच्या एन. डी. स्टुडीयोपर्यंत पोहोचला. चार एपिसोड मध्ये त्यांनी दिंडीतील 'पाऊली' सादर केल्या. शेवटच्या भागात तर पोतराज होऊन किर्तन सादर केलं. या दरम्यानच्या काळात या सर्वांशी चांगलीच गट्टी जमली होती. रिहर्सलच्या दरम्यान किंवा शुटनंतर गप्पा रंगायच्या. माझ्यासाठी तो माझ्या कामाचाच भाग होता. सुत्रधार म्हणून त्या माहीतीचा जितेंद्रला उपयोग होत असे. वारकरी संप्रदायाचा इतिहास, वारकर्‍यांचा प्रवास, त्यांच्या अडचणी वगैरे...वगैरे. बरेच किस्से, कथा त्यांच्याकडून ऐकल्या होत्या. त्यातल्या काहींचा शुट दरम्यान वापर ही झाला. पण एडिटींग टेबलवर मात्र अनेकदा त्यांना कात्री लागली.

एकदा गप्पांच्या ओघात श्री. पुरुषोत्तम महाराज (जे आता वारसा हक्काने संस्थेचे कार्यवाह आहेत.) यांनी एक किस्सा सांगितला. त्यांचा एक खास मित्र जो लहानपणापासून त्यांच्याबरोबर होता. दोघे एकत्र वाढले, खेळले, शिकले. पुढे पुरुषोत्तम महाराज धार्मिक शिक्षणाकडे वळले. ('अमृतनाथ स्वामी महाराज संस्था' या संस्थेची मुहुर्तमेढ त्यांच्या वाडवडिलांनी रोवलेली. वारसा घरात होताच. शिवाय पुढे तेच उत्तराधिकारी होणार होते.) त्यांचा मित्र आयटी क्षेत्राकडे. मध्ये पुलाखालून बरचं पाणी लोटलं. एव्हाना पुरुषोत्तम महाराज किर्तनाचे, समाज प्रबोधनाचे कार्य करू लागलेले. एके दिवशी त्यांची व त्यांच्या त्या बालमित्राची भेट झाली. त्यांचा मित्र म्हणाला,"उगाच तू या नसत्या फंदात पडलास. मला बघ, मी आयटीत आहे. आज सत्तर हजार पगार घेतोय आणि तू किर्तन करत फिरतोयस." यावर पुरुषोत्तम महाराज म्हणाले," पण मित्रा, तुझ्यासारखे सत्तर हजार घेणारे किर्तनात नेहमी माझ्या पाया पडत असतात.' (मला तेव्हा दिवारमधल्या शशी कपूर व अमिताभच्या सीनची आठवण झाली. तद्दन फिल्मी सवयी. इलाज नाही.) हा किस्सा लक्षात राहीला. यानंतर मग गप्पातून वारकरी संप्रदायाचे धार्मिक शिक्षण, किर्तनकारांची जडणघडण, त्यांची शालेय आणि त्यानंतरची वाटचाल... एक ना अनेक विषय असत गप्पांसाठी. इथेच वारकरी संप्रदायाच्या धार्मिक शिक्षणाबद्दल कुतूहल निर्माण झालं. कारण कळलेल्या अनेक बाबी नक्कीच विचार करण्याजोग्या होत्या.

पुढे त्यांचा कार्यक्रमातला सहभाग संपला. त्यांनी आळंदीला येण्याचे निमंत्रण दिले पण कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे मी काही आळंदीला पोहोचला नाही. पण कार्यक्रमाचे कॉ-ऑर्डीनेटर श्री. अंकुश भगत यांनी गेले काही दिवस आळंदीला जाण्याचा पाठपुरावा केला. तशी ही आळंदीतली पहिलीच फेरी. चाचपणीची. आमच्या भाषेत लोकेशन हंटींग.

नेमाने वारीला जाणारे वारकरी हा कायम शहरी कुतूहलाचा विषय राहीलाय. पण असं असताना वारकरी शिक्षणाबद्दल ओढ निर्माण होण्याचं कारण काय ? हा प्रश्न पडला असेलच. आज आळंदीत धार्मिक शिक्षण देणार्‍या अनेक संस्था आहेत. काही मान्यताप्राप्त तर काही अनधिकृत. हे साहजिकच आहे म्हणा. आता ती देवाची आळंदी असली म्हणून काय झालं ? तिथे जर चौधरी याची मटण खानावळ असेल तर हे ही ओघानेच आलं. नाही का ? असो.

आपला विषय अधिकृत शिक्षणसंस्थाचा आहे. यातल्या काही शिक्षणसंस्था विनामुल्य धार्मिक शिक्षण देतात. यात जशी विद्यार्थ्यांना फी नाही तसाच शिक्षकांनाही पगार नाही. वर्गही किंचित वेगळे. फळा आहेच, शिक्षकांसाठी बैठक व विद्यार्थ्यांसाठी अंथरलेल्या चटया. सगळेच वारीला गेलेले असल्याने शाळा बंद.
ज्याला शाळा म्हणता येईल अशी ही एक संस्था.

IMG_1402a.JPGIMG_1401a.JPG

चार वर्षांचा अभ्यासक्रम. यात चाचणीपरिक्षा, सहामाही, वार्षिक परिक्षा हे आहेच. चार वर्षाच्या अभ्यासानंतर अंतिम चाचणीत विद्यार्श्याला काही श्लोक किंवा ओव्या दिल्या जातात आणि ४५ मिनिटात त्याला निरुपण सादर करायला लागते. जो उत्तम सादरीकरण करेल तो पास. अशी पाच जणांची निवड होते. म्हणजे वाटतो तितका हा प्रकार नक्कीच सोपा नाही. देणगीधारकांच्या माध्यमातून शाळेचे खर्च भागतात.

शाळेत दिसलेली कृष्णकमळाची वेल.

IMG_1396a.JPG

सिद्धबेट.... माऊलींना गावाने वाळीत टाकल्यावर माऊली जिथे राहात ती जागा. आजही वाळीत टाकल्यासारखी. इथे जायला पायवाट आहे. एक दुसरी डांबरी वाटही आहे. पण पहाताक्षणी हा भाग दुर्लक्षित वाटावा असाच आहे.

हे सिद्धबेटातील निव्वळ शेड असलेलं देऊळ...

IMG_1410b.JPG

माऊलींच इथे वास्तव्य होतं व इतर इतिहास इथे फलकांवर लिहीलाय.

IMG_1412b.JPG

हा पाठीमागे असलेला अजानवृक्षांचा गोतावळा.

IMG_1404b_0.JPG

ही इथल्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययनाची जागा. इथेही माऊलीच्या देवळाप्रमाणे अजानवृक्षाची पाने तोडण्यास बंदी आहे.

सिद्धबेटाच्या वाटेवर साधारण पाच कोट रुपये खर्च करून देऊळ उभं केलं जातेय. त्यामुळे पुढे मागे कदाचित तिथे वाट होईल सुद्धा. नाहीतर देऊळ जितकं महागडं तेवढाच भक्तांचा राबता जास्त... अशी वहिवाट होण्याची शक्यता आहेच.

इंद्रायणीच्या काठावरून घेतलेला अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या देवळाचा हा कळसाचा भाग.

IMG_1429a.JPG

सिद्धबेटावर असलेले ही आणखी एक वारकरी संप्रदायाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी संस्था.

IMG_1415a.JPGIMG_1417a.JPG

आणि ही शेजारीच असलेली इवलीशी घरे...

IMG_1406b.JPG

या शाळेतले विद्यार्थी इथे राहतात. एका खोपटात साधारण दोन विद्यार्थी असतात. खोपटाला टाळे पाहून मला उगाच आश्चर्य वाटल. इथे चोरी होईल असं काही असेल का ? त्यावर उत्तर आल की ग्रंथसंपदा असते. त्यांची काळजी घ्यायला हवीच. उसाचा पाला वापरून खोपटाची शाकारणी होते. प्रत्येक ऋतूत आतल्या माणसाची काळजी घेण्यास सिद्ध असलेले हे इवलेसे खोपट. तशी इथे अनेक मोफत धर्मशाळातून त्यांची राहण्याची सोय होते. पण हा काहींनी माऊलींच्या राहण्याच्या जागेत स्वतःपुरता उभारलेला निवारा.

शाळेतले विद्यार्थी पंचक्रोशीतल्या गावात माधुकरी मागायला जातात. त्यांचे गट असतात. रोज एकाची माधुकरी आणण्याची पाळी. मग ती चालत असो वा सायकलवर. माधुकरी देणारी घरेही ठरलेलीच. त्या माधुकरीवर विद्यार्थ्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न सुटतो. आजच्या काळातही ही जुनी परंपरा अजून चालू आहे याचं खरच आश्चर्य वाटते. ज्या पद्धतीने महागाईचा आगडोंब उसळतोय त्यामुळे अजून किती काळ चालेल ? हा उगाच मनात डोकावून गेलेला एक आगाऊ आगंतूक प्रश्न.

विद्यार्थी वारीला गेल्याने मनातले अनेक प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहीले. पुढच्या फेरीत मात्र उत्तरे मिळवीनच.

मोफत शिक्षण देणार्‍या या संस्थाशिवाय फी घेऊन शिक्षण देणार्‍या संस्थाही आहेत. त्यातलीच पुरुषोत्तम महाराजांची संस्था. वर्षाला दहा हजार फी. येथे मुलांची राहण्याची व जेवणाची सोय आहेच. शिवाय शालेय शिक्षणाबरोबर त्यांना धार्मिक शिक्षण देखील दिले जाते. मुलं बीड, नगर, यवतमाळ, वर्धा अशी अनेक ठिकाणाहून आलेली. ही सगळी आठवी नववीपर्यंतची मुले. पालक अधुनमधून मुलांना येऊन भेटतात. महाराष्ट्राच्या गावागावातून इथे विद्यार्थी येतात. काही शिकून माघारी जातात तर काही इथेच स्थायिक होतात.

शाळेतून आल्या आल्या मुलं जेवायलाच बसली.

IMG_1440a.JPG

अनेकांना भेटायचं होतं. विद्यार्थ्यांना, त्यांच्या गुरुंना, पालकांना, किर्तनकारांना.... फक्त माझी भेटीची वेळ चुकली. अनेक प्रश्न मनात होते. माधुकरीमुळे जेवणाचा किंवा धर्मशाळेमुळे राहण्याचा खर्च सुटला. पण विद्यार्थ्यांच्या इतर खर्चाच काय ? त्या शिक्षकांच्या प्रपंचाची सोय कशी होत असेल ? वारकरी शिक्षणासाठी मुलांना एवढ्या लांब पाठवणार्‍या पालकांची नेमकी मनोभुमिका काय असेल ? मुळात यावर इथल्या विद्यार्थ्यांच काय मत आहे ? त्यांना आवड आहे की पालकांच्या आवडीमुळे ते इथे आलेत ? एक ना अनेक प्रश्न. यांची उत्तरे मिळवायला पुन्हा आळंदीला जाणार आहेच.

नागपुरातून आळंदीत शिक्षणासाठी आलेल्या एका महाराजांच्या बंगल्यावर मी गेलो होतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी इथे शिक्षण घेतलं. पण आज त्यांचा आळंदीत तीन मजली बंगला आहे. दोन तासाच्या प्रवचनाचे २५००० आणि सात दिवसाच्या पारायणाचे अडीच लाख... हा मानधनाचा आकडा. महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांच्या त्यांच्यासोबत बैठक असते. त्यांच बंगल्यात वास्तव्यफार कमी. महाराज ब्रम्हचारी आहेत. कायम कार्यक्रमासाठी फिरतीवर. आळंदीत शिक्षणासाठी आलेल्या मुलांची विनामुल्य सोय बंगल्यावर होते.

इथल्या स्थानिकांबरोबर मस्त गप्पा झाल्या. अडिचशे किमीची आळंदी ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करणारे देवस्थानाचे जेष्ठ चोपदार श्री. रंधवे यांची भेट झाली. अजूनही माऊली आणि माऊलीच्या संदर्भात म्हटल्या जाणार्‍या अनेक कथा तिथे पुन्हा एकदा ऐकण्यात आल्या. माऊलीच्या देवळातली समाधीची जागा, एकनाथमहाराजांनी जेथून सुक्ष्मरुपाने जाऊन माउलींच्या गळ्यास लागलेली अजानवृक्षाची मुळे बाजूस सारून त्यांची ज्ञानेश्वरी जगासमोर आणली ती जागा, माऊलीच्या मंदिरास लागून असलेले शंकराचे देवस्थान..... तेवढ्या परिघातच अनेक गोष्टी आणि कथा. उदा. आकाशमार्गे भगवान शंकर पार्वतीमातेबरोबर फिरत असताना ते या जागी उतरले आणि मग भगवान शंकर त्या जागेवर लोळू लागले. पार्वतीमातेने त्याचे प्रयोजन विचारताच भगवान म्हणाले, काही काळाने इथे भगवान विष्णू एका सिद्धपुरुषाचा अवतार घेणार आहेत. ही जागा फार पवित्र आहे. मला इथेच राहायचे आहे..... इत्यादी. खरतर मी फार देवभोळा नसलो तरी एखाद्याच्या श्रद्धेचा मान राखण्याची जाणिव असल्याने अनेक कथा शांतचित्ताने ऐकून घेतल्या. त्या कथांपेक्षा त्या कथा सांगणार्‍याच्या डोळ्यातली अपार श्रद्धा जास्त भावली. आपण माऊलीच्या गावात राहतो हा अभिमान त्यांच्या देहबोलीतून सहज जाणवत होता.

वारकरी संप्रदायाचा योग्य प्रसार, शिक्षणपद्धती, त्यासाठी आजवर केले गेलेले सायास, आळंदीतील संस्था, तेथील गुरू, येथे निर्माण झालेले किर्तनकार... अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐन बाजारातील पुस्तकपेठ गाठली खरी.

IMG_1418a.JPG

पण वारी, वारकरी यांच्या पलिकडे पुस्तके मिळाली नाही. यातच उद्घव ठाकरे यांच्या 'पहावा विठ्ठल' यातल्या श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका विधानामुळे निर्माण झालेला रोष मात्र ऐकावयास मिळाला. 'तुकाराम महाराज विमानाने सदेह वैकुंठाला गेले या भाकडकथांबर लोकांनी विश्वास ठेवू नये.' हे त्या प्रस्तावनेतील विधान. वारीनंतर यावर गदारोळ होणार याची ग्रामस्थांना खात्री. कोण करेल ? का करेल ? हा काही माझ्या आळंदी वारीचा हेतू नसल्याने मी तो विषय टाळला.

IMG_1424a.JPG

पुस्तकांच्या दुकानात लेखकाचा फोटो हवा असा पुरुषोत्तम महाराजांचा आग्रह झाल्याने काढलेला फोटो. सोबत महाराष्ट्रातील लोककला कलाकारांचे कॉ-ऑर्डीनेटर श्री. अंकुश भगत.

आळंदीतून परतत असताना 'पुन्हा येण्याचा' शब्द देऊन निघालोय. वारी संपल्यावर माझ्या अनुत्तरीत प्रश्नांसाठी पुन्हा आळंदीत जाईन. हा आळंदीतला शेवटचा फेरफटका

इंद्रायणीच्या काठावरील हा मोठा पडदा. यावर धार्मिक प्रक्षेपणे दाखवली जातात.
|| विश्वशांती केंद्र ||
संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञान तीर्थ

IMG_1428a.JPG

वारीमुळे काठावर असलेला शुकशुकाट

IMG_1431a.JPG

क्रमश:

गुलमोहर: 

वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणार्या संस्था तिथे आहेत हे अजिबात माहित नव्ह्ते. नंतर मग ही मुले उपजिविकेसाठी फक्त प्रवचन करतात कि भि़क्षुकी पण करतात ? पुढील लेखाच्या प्रति़क्षेत.

सहीच.. !! खरच हे सर्व प्रश्न पडलेत.. लवकर तुल परत तेथे जायला मिळो अन उत्तरे मिळुन आमच्याही माहितीत भर पडो..
एकनाथमहाराजांनी जेथून सुक्ष्मरुपाने जाऊन माउलींच्या गळ्यास लागलेली अजानवृक्षाची मुळे बाजूस सारून त्यांची ज्ञानेश्वरी जगासमोर आणली ती जागा, >> या बद्दल अधिक माहिती वाचायला अवडेल.. !!

एकनाथमहाराजांनी जेथून सुक्ष्मरुपाने जाऊन माउलींच्या गळ्यास लागलेली अजानवृक्षाची मुळे बाजूस सारून त्यांची ज्ञानेश्वरी जगासमोर आणली ती जागा, >> प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशि जाण्याच्या तुमच्या स्वभावामुळे हि व पुढेहि अशिच छान माहिति मिळेल ह्याबद्द्ल खात्रि आहे.

ज्ञानेश्वर माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय !

इतकी बदललंय श्री माऊली तिर्थक्षेत्र. काही महिन्यांपुर्वी एम.आय्.टी चे विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विश्वनाथ कराड यांचे व्याख्यान ऐकले होते. त्यांनतर तुमच्या लेखातून हि आळंदीची नव्याने ओळख होते आहे. Happy आळंदीची यात्रा म्हणजे कार्तिकी एकादशी ना? घाटावरच्या भाविकांची खूप मोठी गर्दी असते असे ऐकले होते. Happy

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

सिध्दबेटावरच्या वै. जयरामबुवा भोसलेंना भेटण्याचा योग १९९० साली आला होता. त्यांनी आपली शेतजमीन आणि घर वारकरी शिक्षण संस्थेला दिले होते.

इथे फी नव्हती. जयरामबुवांच्या घरात विद्यार्थि रहात. काही विद्य्यार्थी शेतीमधेच झोपडि बांधुन पण राहिले होते. जयरामबुवांनी वारकरी शाळेला दिलेल्या शेतीत काम करुन संस्थेमधले विद्यार्थी स्वतःच्या उपजिवीके इतके मिळवत. जयरामबुवा भोसले स्वतः बहिणीच्या घरी जेवत.

मी भेट दिली तेव्हा या संस्थेत १०० च्या वर विद्यार्थी होते.

एका दुरदर्शनवर गाजलेल्या किर्तनकाराच्या संस्थेला त्याच वेळेला टाळ लागलेल होत. ते स्वतः मुंबईला शुटिंगसाठी गेल्याच समजल होत.

सुरेख लेख व प्र्.चि.मुळे आळंदीदर्शन घडलं. धन्यवाद.
हल्ली आळंदीत खूपच सुधारणा झालीय. इंद्रायणी स्वच्छ ठेवण्याची नियमित व्यवस्था झाली, तर माऊलीच्या भेटीचा आनंद दुणावेल.

मला देवाच्या आळंदीला जाऊन बरीच वर्षे झाली. हा परिसर बघितला आहे. छान वाटलं.
ती "भिंत" पण आहे अजून तिथे. पण त्या काळातच लोकांनी तिचे दगड काढून न्यायला सुरवात केल्याने, ती परत बांधावी लागली.
इथे प्रत्येक वास्तूच्या नावात, आवर्जून आळंदी देवाची.. असा उल्लेख आहे.