माझे शाकाहार पुराण!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 15:43

मांसाहाराशी ओळख

मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.

माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो (म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर) हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.


मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच

जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.

आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना काही लोक पूर्ण शाकाहारी असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.

पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अ‍ॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मापासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो.

मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स? हाप्रकार नक्की काय आहे ते हळूहळू समजायला लागलं. पाश्चात्य देशांत व्हेजीटेरीअन किंवा व्हीगन बाय एथीक्स हेच लोक जास्त असतात. म्हणजे "Animals are my friends and I do not eat my friends" या George Bernard Shaw यांच्या उक्तीप्रमाणे चालणारे असतात ते व्हेजीटेरीअन किंवा व्हिगन बाय एथीक्स असतात. त्यांचा असा समज असतो की भारतात सर्व हिंदू लोक शाकाहारीच असतात म्हणजे व्हेजीटेरीअन बाय रीलीजन. पण यातील सत्यासत्यता आपल्याला माहीती आहे. म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेले पण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुत्रं दिसलं तरी घराच्या आतून त्याला हुसकवुन लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाभाग दिसतील तसेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारे पण मांसाहारी लोक सुद्धा दिसतात. त्यामुळे हा फरक पाश्चात्य देशांत एक फॅशनचा भाग आहे असंच वाटतं. असो.

शाकाहार की मांसाहार - काही वादाचे मुद्दे:

आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.

मधे एका विशेषांकात शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्‍याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.

जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. तसेच आधीच मेलेला प्राणी फक्त गिधाडं खातात....वाघ सिंहासारखे प्राणी आपलं भक्ष्य स्वतः मारतात आणि मग खातात. ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.

पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापापासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं. ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?

याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.

माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.

(निवेदनः हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे. चर्चेत आपली विरोधी मतं जरूर मांडावीत फक्त विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी.)

गुलमोहर: 

वेगळाच विचार प्रवाह मांडला. मला तर बरेच मुद्दे पटले. मी शाकाहारी आहे पण प्रत्येक पदार्थात अंडे आहे का शोध घेणे व्यावहारिक कसोटीवर टिकत नाही म्हणून आईस्क्रीम,पाव-केक अशे पदार्थ (अंड्याच भपकारा नसेल तर) खातो. परदेशात ईलाज नाही.

मला तरी हा लेख पूण्याच्या पाठोपाठ आणखी प्रतिसादांचं पूण्य कमवण्यासाठी टाकलेला वाटत होता. Wink

पण या लेखाची मांडणी छान आहे.

तुम्ही काय आणि का खाताय हे तुमचं तुम्हाला पटलंय ना मग पूरे. उगाच रिकाम्या चर्चा करून काय साध्य करायचे आहे?
यापूर्वी इथे आणि इथे अशी चर्चा झालेली आहे. तसेच जुन्या मायबोलीवरही आहेच.
असो.
पुढिल लेखनास शुभेच्छा.

पूर्वीची टवाळखोर प्रतिक्रिया बदलत आहे.आपल्याला काही मानसिक त्रास झाला असल्यास क्षमस्व!

@ saati, तुम्हाला जर असं वाटत असेल, >>> मला तरी हा लेख पूण्याच्या पाठोपाठ आणखी प्रतिसादांचं पूण्य कमवण्यासाठी टाकलेला वाटतोय.>>>> तर मग आपण या पुण्यात (पापात??) भर कशाला टाकताय? तरीही शुभेच्छांबद्धल आभार!
काय आहे मी मायबोलीवर तशी नविन आहे त्यामुळे जुने कोणते प्रतिसाद खेचक विषय झाले आहेत हे मला माहीती नाहीत. हे जर खोटं वाटत असेल तर माझ्या शतपावली या ब्लॉगवर हा लेख एक वर्षापूर्वी (दोन भागात) लिहीलेला असल्याचे आढळेल. माबोकरांनी तो वाचला असेलच असे नाही.
रेशीमगाठी या लेखावर जर प्रतिक्रीया द्यायची असेल तर ती इथे का? तिथे का नाही? कोणत्या लेखावर प्रतिक्रीया "पाडायच्या" हे माबोवरील वाचकच ठरवतात. (पुणं.... आणि रेशीमगाठी यावरील प्रतिक्रीयांवरून समजतंय). लोकांना दर्जेदार लेखा पेक्षा वाद-चर्चेत अधिक रस आहे हेच दिसून येते. यात लेखिकेचा काय दोष?
प्रत्येकवेळी जर विषय तोच असला तरी चर्चा आणि तिची दिशा ही चर्चा करणारी, लिहीणारी व्यक्ती कोण तसेच त्या व्यक्तीच्या दृष्टीकोनांवर अवलंबुन असते. जर लेखनासाठी विषय रीपीट करायचे नसते तर मग आत्तापर्यंत शेकडो रामायणे लिहून लोकांनी वाचली नसती. महाभारताच्या सुद्धा अनेक अवृत्त्या निघाल्या आणि रूढ झाल्या नसत्या. महाराष्ट्रात पुलं, कुसुमाग्रज यांव्यतिरीक्त लेखक आणि कवि झाले नसते.

शांतीसुधा,

खूपच छान लेख. मी देखील तुमच्यासारखाच जन्मापासून संपूर्ण शाकाहारी असल्यामुळे (अंडेसुध्दा निषिध्द. तसेच अंडे असलेले केकसारखे पदार्थही निषिध्द.) कदाचित हा लेख जास्तच आवडला. परदेशात ६-७ वर्षे वास्तव्य करूनसुध्दा मांसाहार करण्याची वेळ माझ्यावर आली नाही ही कदाचित माझी पूर्वपुण्याईच असावी. मांसाहाराविषयी मनात चीड आहे. त्यामुळे परदेशात आणि विमानप्रवासात काही वेळा २४ तास उपाशी राहण्याची वेळ आली, पण मांसाहार करावा अशी मनात इच्छा सुध्दा झाली नाही.

तुम्हि हा लेख का लिहिला आहे हेच मुळात मला कळले नाहि.

शेवटच्या परिछेदामध्ये (तुमच्या प्रत्येक लेखाचा शेवटचा परिछेद असा का असतो हा वेगळा विषय आहे...) तुम्हि लेखात बरेच काहि म्हणले आहे आणी वर असेहि म्हणत आहात की " असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे. " म्हणजे तुम्हि जो लेख लिहिला आहे त्यात तुम्हि हे पटवण्याचा प्रयत्न केलेला नाहि मात्र दुसर्या कोणी शाकाहारी माणसाने हेच मुद्दे मांडले किंवा मांसाहारी माणसाने उलटे मुद्दे मांदले तर ते मात्र निंदनीय ?

शांतीसुधा. मी पण शाकाहारी. पण ४ वर्षाचा असेपर्यंत सगळे (म्हणजे अंडी, मासे, मटण) खाल्ले पण नंतर जे सोडले ते सोडलेच. पण याबाबत कुणालाही खुलासा वगैरे द्यायची गरज वाटत नाही. माझी आवड, एवढेच कारण.
मी तर आणखी एक पायरी पुढे गेलोय. मी स्वतः नॉन व्हेज शिजवून (म्हणजे अगदी बीफ, पोर्क नाही) मित्रांना खिलवतो. पण स्वतः मात्र अंडेदेखील खात नाही.

@ चाणक्य, खरंतर मी हा लेख माझ्या ब्लॉगवर एक वर्षापूर्वी दोन भागात लिहीला होता. (ब्लॉगचं नाव शतपावली). त्यावेळी एका विशेषांका मध्ये एक लेख वाचनात आला होता आणि त्या लेखात लेखिकेने मी शाकाहारी का होते आणि माझ्या मित्राच्या आर्ग्युमेंटमुळे (भाज्यांमध्येपण जीव असतो इ. इ.) कशी मांसाहारी झाले असं ठासून सांगीतलं होतं. शेवटचा परीच्छेद हा त्याला उत्तर म्हणून लिहीलेला होता. मग माझ्या शाकाहार आणि मांसाहारा संदर्भातील आठवणी जाग्या झाल्या आणि हा लेख दोन भागांत लिहीला गेला. माबोवर असं काही बंधन नाही की पूर्व प्रकाशित (दुसरीकडे कुठे) इथे प्रकाशित करायचं नाही आणि असंही बंधन नाही की प्रत्येक लेख लिहीताना मी हा लेख अशा कारणासाठी लिहीत आहे हे स्पष्ट करावं. Happy
जर व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असेल तर लोकं असे लेखही अ‍ॅक्सेप्ट करतात......नाही कां?

लेख चांगलाय.

मला फक्त एकच गोष्ट काही शाकाहरींची पटत नाही( इथे नमूद केलेले शाकाहरी माणसे ही मला भेटलेली आहेत व एक दोनच नाही तर बहुतेकदा भेटलेली शाकाहरी माणसं)..

शाकाहरी माणसं दुसर्‍या मांसाहरी माणसाला मांस खाणे किती वाईट आहे व ते सोडून देणे चांगले असे सांगणार. व असे सांगणार्‍या शाकाहरींची संख्या तरी मला ज्यास्त भेटली पण एखादा मांसाहरी दुसर्‍या शाकाहरीला, तु मांस खाणे सुरु कर शाकाहार सोडून असे सांगताना 'कमीच' दिसलाय.
आम्ही मांस खातो म्हणजे पापच करतो असे अगदी दृष्टीकोन असतो. हे अनुभवावरून लिहिलय.

शेवटी काय, प्रत्येकाने आपली पसंद व मतं दुसर्‍यावर लादणं चुकीचेच आहे. ज्याला जे खायची सवय आहे ते खावं.

उद्या कोणी चारखंड का खाईना... ते गुरांचं अन्न आहे म्हणून ओरड नको. Proud

मास्तुरे आणि दिनेशदा, प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद!
@ मीरा १०, प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद. मला असं वाटतं तुम्ही प्रतिक्रीयेत जे म्हणता आहात ते मी लेखात शेवटी मांडलंच आहे. शेवटी प्रत्येकाने आपल्याला आवडेल आणि पचेल (तब्येतीला झेपेल ते) खाणं हे उत्तम.

माबोवर असं काही बंधन नाही की पूर्व प्रकाशित (दुसरीकडे कुठे) इथे प्रकाशित करायचं नाही आणि असंही बंधन नाही की प्रत्येक लेख लिहीताना मी हा लेख अशा कारणासाठी लिहीत आहे हे स्पष्ट करावं >>>>

माबोवर कसलेच बंधन नाहिये. पण तुम्हि स्वता:चे मुद्दे मांडुन दुसर्याला उपदेश करत आहात पण लेखाच्या शेवटी मात्र दुसरा कोणी असे मुद्दे मांडले असतील तर त्याला निंदनीय म्हणत आहात हे काहि समजले नाहि. तुम्हाला तुमचा लेख निंदनीय आहे असे म्हणायचे आहे का मग ?

@ चाणाक्य, तुमचा लेखाचा शेवट वाचून काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. >>>जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे. >>> वरील लेखात मी असं म्हणतच नाहीये की मी शाकाहारी आहे म्हणून जे कोणी मांसाहारी आहेत त्यांनी शाकाहारी बनलं पाहीजे. लेख जरा पूर्वग्रह न ठेवता वाचला तर बरं होईल. नाही वाचलात तरी वाचाच असा आग्रहही नाही. Happy

त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत.>>> मी तरी लोकांना शाकाहार करा असा नैतिक दबाव आणतानाच जास्त पाहिले आहे. शाकाहार करण्याने आपण आपोआप एका उच्च नैतिक पातळीला पोचतो हा अहंगंड अनेक शाकाहारी मंडळी का बागळगतात ते कळत नाही.
माणूस हा सर्वाहारी आहे हे अ‍ॅनॅटॉमिकल आणि इव्होल्युशनरी सत्य आणि सर्व माणसे शाकाहारी झाली तर त्यांना पृथ्वी पोसू शकत नाही पर्यावरणीय सत्य शाकाहारी तरी का दृष्टीआड करतात हे माहिती नाही.

सर्व संतमहात्मे तसेच गांधीजी, टॉलस्टॉय, विनोबा भावे इ. थोर पुरूष हे आयुष्यभर शाकाहारी होते. शाकाहार की मांसाहार याविषयी ज्यांच्या मनात संभ्रम असेल त्यांनी या व इतर थोर महात्म्यांच्या वर्तनावरून योग्य तो बोध घ्यावा.

मास्तुरे, तसा आहाराचा संबंध कशाशीच लावावा हे मला पटत नाही. इथे शरीररचना, स्वभाव, धर्म आदी मुद्दे मला गौण वाटतात. अन्नाची उपलब्धता आणि वैयक्तीक आवड या दोनच बाबी महत्वाच्या. शाकाहारींनी गर्व करावा वा मांसाहारींनी वाईट वाटुन घ्यावे, असे काही मला तरी दिसत नाही.
समजा एखाद्या ठिकाणी, शाकाहार उपलब्ब्धच नसेल, तर माझ्यासारखा कट्टर शाकाहारी तरी, किती काळ तग धरेल असे मनात येते. मी काही वर्षांपूर्वी बँकाँक ला गेलो होतो, तिथे जरा अशी परिस्थिती होती खरी. पण मी फळे खाऊन रहात असे. नायजेरियातला बदनाम पोर्ट हारकोर्टला भाज्या मिळायची मारामार होती. तरी तिथे मी २ वर्षे, बाणा न सोडता राहिलो. पण यात माझ्या हट्टाचा भाग जास्त आहे.

वरील लेखात मी असं म्हणतच नाहीये की मी शाकाहारी आहे म्हणून जे कोणी मांसाहारी आहेत त्यांनी शाकाहारी बनलं पाहीजे >>>

असे डायरेक्ट वाक्य म्हणले नाहि तरी तुमच्या लेखाचा अर्थ तोच निघतो. नाहितर मग हा लेख लिहिण्याचे प्रयोजनच काय ? बरे तुमचा लेख balanced हि नाहि की तुम्हि दोन्हि बाजुचे विश्लेषण केले आहे की तुमचे म्हणणे मान्य करावे. तुम्हि एकांगीच लेख लिहिला आहे. लेख जरा पूर्वग्रह न ठेवता लिहिला असता तर बरं झाले असते.

सर्व संतमहात्मे तसेच गांधीजी, टॉलस्टॉय, विनोबा भावे इ. थोर पुरूष हे आयुष्यभर शाकाहारी होते >>>

मास्तुरे तुम्हि आणी गांधीजींना थोर म्हणता ? कधीपासुन मास्तुरे ? Proud

>>>मी तरी लोकांना शाकाहार करा असा नैतिक दबाव आणतानाच जास्त पाहिले आहे. शाकाहार करण्याने आपण आपोआप एका उच्च नैतिक पातळीला पोचतो हा अहंगंड अनेक शाकाहारी मंडळी का बागळगतात ते कळत नाही.<<<<

मी पण हेच म्हणतेय. मलाही हाच अनुभव आहे एकदम. तेच म्हटलेय वरती मी सुद्धा.

वाट्टेल ते लिहिलय... ज्या ठिकाणी जे मिळतं ते लोकं खाणार.
>> माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून
एकिकडे म्हणायचं की मांसाहार करा पण तो इतरांवर लादू नका आणि दुसरीकडे मांसाहार कसा चूकीचा आहे ते सांगायचं... हा दुटप्पीपणा नवीन नाही.
>> या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.
हा समस्त मांसाहारी लोकांवर आरोप करत आहात तुम्ही. शाकाहारी लोकांचा कॉन्शसनेस उच्च पातळीवरच असतो!
>> डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे.
म्हणजे किडा/मुंगी तुम्हाला (खायला) चालेल? किटक भक्षणाचे फायदे इथे बघा.
आख्ख्या लेखात शाकाहाराच तोंड भरून कौतुक केल्यावर हे कसं लिहावं वाटलं?
>> यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही.
म्हणजे काय तर तुम्ही यावर काहीच विचार केलेलाच नाही. You 'happened' to be vegetarian, so you are defending it .... यापेक्षा वेगन बरे, त्यांनी विचार करून निर्णय घेतलेला असतो.
>> ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच
माणूस गरज नसताना बरच काही करतो... खेळ/कला/मायबोलीवर लेखन कशाची गरज आहे का?
>> दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे.
हो का, मग तुम्ही चांबडे वापरता का? ते कुठन येतं असं वाटतं? चांबडेच कशाला तुम्हाला कल्पनाही नसेल अशा गोष्टींमधे प्राण्यांचे भाग वापरले जातात (साबण, cosmetics etc.) अधिक माहितीसाठी हे बघा. मग तुमचा जागृत कॉन्शसनेस या गोष्टी वापरणं अनुमती देतो का?

प्रतिसाद थोडा कठोर वाटला असेल तरी मी त्याबद्दल काही करू शकत नाही. लेख वाचल्या वाचल्या (१० पर्यंत आकडे न मोजता) प्रतिसाद दिल्यामुळे असेल.

मी शाकाहारी असूनही लेख अजिबात पटला नाही. बॅलन्स्ड वाटत नाहीये.
दुसर्‍याच्या अन्नाला वाईट/ चुकीचे/ किळसवाणे म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही.

बादवे शाकाहारी असण्यात कसा काही दम नाही, शाकाहारी म्हणजे कुचेष्टेने तुपकट, पालापाचोळा, वरणभात तिच्यायला! अश्या अनेक शेलक्या विशेषणांचा अनेकदा सामना मी भरपूर केलेला आहे.
दोन्ही बाजूने लोक एकमेकांना नावे ठेवत कमी लेखत असतात तेव्हा कोण जास्त पापी याबद्दल वाद नकोत.

'ज्याला जे आवडते ते खावे / खाऊ द्यावे' हे इतके अवघड आहे का पचायला ?
आमच्या घरात मी शाकाहारी आहे व नवरा नाही, पण कधी कोणी एकमेकांना किंवा इतरांना त्यांच्या खाण्याच्या सवयींवरुन टोकल्याचे / कमी लेखल्याचे / बदलायला सांगितल्याचे आठवत नाही.
शाकाहारी किंवा मांसाहारी लोकांनी एकमेकांना चुकीचे समजायचे मला अजून कारण समजले नाहीये.

दिनेश, ही काय! तुम्ही स्वतः जरी मांस खात नसाल पण मित्रांना खाऊ घालणे ह्यात कितपत प्राण्यांच्या जीवाचा विचार आला.

मी अगदी कट्टरातला कट्टर शाकाहारी आहे. पण माझे तत्व एकचं आहे की जेंव्हा मनुष्य जातीला त्याच्या आजूबाजूला शाकाहारी पदार्थ उपजिविका करण्यासाठी आहेत तेंव्हा त्याला मांस खाण्याची गरज तरी काय?

झाडांना जीव असतो मात्र झाडांमधे Nervous System नसते त्यामुळे जशा यातना प्राणिमात्रांना होतात तशा यातना झाडांना होत नाही. झाडाची एक फांदी कलम करुन परत झाड लावता येते तसे एखाद्या प्राण्याचा पाय कापून परत तो सजीव करता येत नाही!

शिवाय ज्या प्रकारे प्राण्यांची कत्तल होते ती कत्तल बघून आपण मनुष्यप्राणी किती क्रूर आहोत असे वारंवार जाणवत रहाते.

मांसाहारी व्यक्ति शाकाहारी व्यक्तिवर कसा घोर अन्याय करते यावर लेखात जरा जास्तच जोर दिला आहे.....

वेळ आल्यास शाकाहार्‍यांना साप-विंचुही खावे लागतात आणि मांसाहर्‍यांना गवतही चरावे लागते.
मग तुम्ही आजन्म शाकाहारी असा की नका असु.

कोणतेही अन्न हे 'पुर्णब्रह्म' आहे. कृपया अन्नाला नावे ठेवु नये.

झाडांना जीव असतो मात्र झाडांमधे Nervous System नसते त्यामुळे जशा यातना प्राणिमात्रांना होतात तशा यातना झाडांना होत नाही. झाडाची एक फांदी कलम करुन परत झाड लावता येते तसे एखाद्या प्राण्याचा पाय कापून परत तो सजीव करता येत नाही!

>> १०१% अमान्य.

शिवाय ज्या प्रकारे प्राण्यांची कत्तल होते ती कत्तल बघून आपण मनुष्यप्राणी किती क्रूर आहोत असे वारंवार जाणवत रहाते.
>> बि हा प्राकृतिचा नियम आहे. निसर्गाचा समतोल असाच राखला जातो. सुरुवातीपासुन नैसर्गिक रित्या जन्मलेल्या प्राण्यांची संख्या आता काय असती असा विचार करा. अर्थात ज्या प्राण्यांची संख्या भरमसाठ वाढत जाते...तेच शकाहारी प्राणि.

मुळात मांस हे मनुष्यासाठी तरी अन्न नाही आहे. निसर्गाने आपले अवयव देखील मांस ग्रहण करण्यासाठी घडविलेले नाहीत. तुम्ही जीवशास्त्र जाणून बघा. कळेल की आपली मानवी रचना मांस खाण्यास किती अशक्त आहे.

आणि चातक, निसर्गा हा नैसर्गिकरित्या बरोबर निसर्गाचा समतोल राखतो. आपण मनुष्य जनावरांना मारुन उलट त्याच्या कार्यात अडथडा आणतो आहे.

@ लेखावर एकांगी असण्याची टीका करणारे सगळे, माझ्या लेखाचं शीर्षक मुळात "माझे शाकाहार पुराण" असं असल्याने हे उघड आहे की मी शाकाहारावर अधिक लिहीणार. शाकाहार आणि मांसाहार यातील वादाचे मुद्दे हा लेखाचा एक भाग आहे. टीकाकार वाचकांनी पुन्हा पूर्वग्रह दूषीत पद्धतीने प्रतिसाद लिहायला सुरूवात केली आहे.

एका प्रतिसादाचं उत्तर म्हणून वर मी एक प्रतिसाद दिला आहे की शेवटचा परीच्छेद हा अधिकाधिक एका आर्ग्युमेंटला उत्तर म्हणून होता आणि त्या आर्ग्युमेंटमध्ये शाकाहारी व्यक्ती "भाज्यांमधील आवाज ऐकायला येत नाहीत म्हणून मी भाज्या खाते आणि त्यामुळे जर कापलेल्या प्राण्यांचे आवाज ऐकू येत नसतील तर त्यांचं मांस खायला हरकत नाही असं काहीसं म्हणून मांसाहारी बनली. " असं लिहीलेलं होतं. त्याला प्रतिसाद म्हणून ते लिहीलेलं आहे. त्याचा उल्लेखही मी लेखात केला आहे.

टीकाकारांनी टीका करायला माझी काहीच हरकत नाही पण जरा लेख नीट वाचून केली तर बरं होईल. उदा: मी असंही लिहीलं आहे
"पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे."

"माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत."

कोणतंही अन्न पूर्णब्रह्म आहे हे माहीती आहे म्हणूनच वरील लेखात कुठेही अन्नाला नावं ठेवलेली नाहीयेत. मी स्वतः मांसाहारी लोकांकडून मांसाहारच कसा चांगला हेच ऐकलं आहे. मी स्वतः कधीच कोणत्याही मांसाहारी व्यक्तीला मांसाहार वाईट आहे असं सांगायला आणि शाकाहार कसा चांगला आहे हे पटवुन द्यायला जात नाही. त्यामुळे मला फक्त एकाच बाजूचे मुद्दे माहीती आहेत. आणि जे मुद्दे मला माहिती आहेत त्याच मुद्द्यांचं खंडन "बॅलन्स्ड" प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे सुद्धा लिहीलं आहे की जर कोणाला हे खंडन पटत नसेल तर त्यांनी उलट युक्तीवाद करावेत. पण इथे तर लोक मी जे लिहीलेलंच नाहीये त्यावरच युक्तीवाद करून तुम्ही हे असं म्हणायला नको होतं इ.इ. चालू केलं आहे. यावरून पुन्हा हेच सिद्ध होतंय की माबोवर काही लोक हे वादाची खुमखुमी असलेले आहेत. त्यांना वाटलं की एखाद्या लेखात वाद घालायचाच की कोणतेही मुद्दे घालून सुरू होतात. खरंच गंमत आहे.

शांतीसुधा, तू छानंच लिहिल आहे. इथे उगाचं लोक अर्थाचे अनर्थ करतात. नको त्या दिशेने त्यांचे विवेचन जाते. त्यांच्याकडे कानाडोळा कर.

धन्यवाद बी! आता कानाडोळाच करणार आहे पण एकदा तरी उगाचच केलेल्या आरोपांचं खंडन केलेलं बरं. म्हणून वरील प्रतिक्रीया दिली.

लेख आवडला , शांतीसुधा चांगलं लिहिताय , इथे वाद उकरुन काढणार्‍यांची काही कमतरता नाही , त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता लिहित रहा.

कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. >>

इथे लेखिकेने सांगीतले आहे की? मला तरी लेखीकेची माँसाहाराची कशी ओळख झाली, शाकाहारामुळे येणार्‍या काही अडचणी (परदेशात) असाच काहीसा सूर दिसला, कुठे अगदी, माँसाहारी म्हणजे वाईट आणि मीच शहाणी असा सुर दिसत नाही.

अर्थात श्री लिहितो तसा इथे कशातही वाद उकरुन काढणार्‍यांची काहीच कमतरता नाही. अजून एक वाद . ..

Pages