पुनवेचा चांदवा

Submitted by sanika11 on 8 February, 2009 - 21:43

आकाशी हसतोय पुनवेचा चांदवा,
सख्या मला आता झोपाळी झुलवा

चाफ्याच्या सुगंधासवे नदीचा गारवा;
देहामनात घुमतोय प्रितीचा पारवा,
नाजुक या कळीला मायेने खुलवा;
सख्या मला आता झोपाळी झुलवा

शुभ्र प्रकाशात सावळी नितळ काया;
वसंतातील मी, नका दौडवू क्षण वाया,
शांत एकांतात रातराणीला भुलवा;
सख्या मला आता झोपाळी झुलवा

सोडून द्या समोरचा मद्याचा प्याला;
तुमच्याविना जीव कासावीस झाला,
मोकळ्या नभी या चांदणीला फुलवा;
सख्या मला आता झोपाळी झुलवा

प्रेम आवेगाने तुम्ही मला सजवा,
कुशीच्या उबेत हळू मला जोजवा,
आकाशी हसतोय पुनवेचा चांदवा;
सख्या मला आता झोपाळी झुलवा

गुलमोहर: 

सानिका,

कवितेची कल्पना, शब्द, भावना छान आहेत. पण तरीही थोडी बदलली तर कसे?

"आकाशी हसतोय | पुनवेचा चांदवा,
सख्या मला आता | झोपाळी झुलवा

चाफ्याच्या सुगंध | नदीचा गारवा;
मनात घुमतोय | प्रीतीचा पारवा,
नाजुक कळीला | मायेने खुलवा;
सख्या मला आता | झोपाळी झुलवा

पांढर्‍या प्रकाशी | नितळ ही काया;
वसंतात मी, | जाऊ नये वाया,
शांत एकांती | रातराणी भुलवा;
सख्या मला आता | झोपाळी झुलवा

फेका तो समोरचा | मद्याचा प्याला;
जीव माझा तुझ्याविन् | कासाविस झाला,
मोकळ्या नभी या | चांदणीला फुलवा;
सख्या मला आता | झोपाळी झुलवा

प्रेम आवेगाने | तुम्ही मला सजवा,
कुशीच्या उबेत | हळू मला जोजवा,
आकाशी हसतोय | पुनवेचा चांदवा;
सख्या मला आता | झोपाळी झुलवा"

मात्रा न मोजता फक्त लय ध्यानात घेऊन मी उपरोक्त बदल सुचवला आहे. कसा वाटतो ते वाचकांनी ठरवावे.

शरद

शरद छान .
सानिका छान कविता .

काश, आप लडकी होते ..... Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

छान