कुण्या वाटेनं बा गेली ती नार?

Submitted by आशूडी on 17 June, 2011 - 04:03

परवा एका पुस्तकात "मराठी लेखिकांच्या साहित्याला भाज्या आमट्यांचे वास असतात" असं एका 'टिपीकल लेखकाचं' 'टिपीकल लेखिकांबद्दल' मांडलेलं मत आणि त्यावर त्या पुस्तकाच्या लेखिकेने केलेला ऊहापोह वाचला. आणि नकळत माझ्याही डोक्यात चक्रं फिरायला लागली की, खरंच असं आहे? तो लेख जरी लेखिकांवर नेम धरुन होता तरीही, एकूणच साहित्यात दिसणारी स्त्री कशी आहे? मग ती लेखकाने रेखाटलेली असो वा लेखिकेने. मी आजवर वाचलेल्या साहित्यातलं स्त्रीचं रुप कसं आहे? पुस्तकांची पानं फडफड करत पार शाळेच्या दिवसात पोचले आणि तेव्हा वाचलेल्या स्त्रीप्रधान कथा कादंबर्‍या डोळ्यांपुढे फेर धरु लागल्या. आता नावंही आठवत नाहीत फारशी इतक्या त्या एकातून एक काढाव्या तशा होत्या. करंजीला मुरड घालता घालता मनाला मुरड घालायला शिकलेल्या नायिका. प्रेमभंग झालेल्या किंवा फसवल्या गेलेल्या किंवा अकाली वैधव्याची कुर्‍हाड कोसळल्यावर बेट्याला 'बापसे सवाई' करुन दाखवणार्‍या. गोर्‍यापान, काळ्याभोर डोळ्यांच्या, धनुष्याकृती भुवयांच्या, कपाळावर केसांची महिरप असणार्‍या,प्रेमात असताना झुळझुळीत फुलाफुलांच्या साड्या नेसणार्‍या,फुलदाणीसारखी मोहक शरीराकृती असणार्‍या. पाककलानिपुण आणि अभ्यासातही हुशार हे अध्याहृतच असायचं. शिवाय हस्तकलेत त्यांचा हात धरणारे कुणीच नाही. आणि मग जोडीदार गमावल्यावर या कशाचाच पुढे कुठेही पुसटसाही उल्लेख नसलेल्या. जणू कातच टाकलेल्या. तेव्हा मात्र अंबाडा, कॉटनच्या साड्या, बंद गळ्याचे ब्लाऊज इ. ओघाने आलेच. त्यांची नावंही पुढे घडणार्‍या सार्‍या इतिहासाला अनुसरुनच कथेतले त्यांचे आईवडील कसे काय ठेवायचे हे मला पडलेलं एक कोडंच. म्हणजे योगिनी, अहिल्या,जानकी वगैरे वगैरे. मग पुढे त्याला अनुसरुन एक तरी संवाद हवाच. वाचकाच्या लक्षात आणून देण्यासाठी. ऐतिहासिक पौराणिक कादंबर्‍यांमध्ये तर स्त्रीच्या नशीबी केवळ संघर्ष. सावित्रीपासून तारामतीपर्यंत आणि सीता, अहिल्या, द्रौपदीपासून ताराराणी, अहिल्यादेवी होळकर, झाशीच्या राणीपर्यंत. या सग़ळ्यातनं मी लवकर का बाहेर पडले त्याचं कारण आता हळूहळू उमगतंय.

मग पुढे विनोदी साहित्य वाचनात आलं. तिथे तर एखाद्या मुख्य विनोदी स्त्री पात्राभोवती सारे पुस्तक फिरतेय असे अपवादासाठीदेखील नाही! चिमणराव, गुंड्याभाऊ राहू द्या पण आपल्या बालसाहित्यातले फास्टर फेणे, गोट्या, बोक्या,लंपन यांच्या तोडीस तोड एखादं अजरामर झालेलं स्त्री पात्र आठवतंय? चिंटू आणि गोट्यासोबत मिनी आणि चिंगी आहेत पण त्या मराठी विनोदी चित्रपटात स्त्रियांची भूमिका असते तेवढ्याच. म्हणजे त्यांच्याजागी ऐनवेळी कुणीही उभं राहिलं तरी चालून जाईल इतक्या कामचलाऊ. स्त्रियांना विनोदबुध्दी नसते याची मूककबुलीच जणू. बालवयातल्या मुलींचा खट्याळपणा,त्यांचं भावविश्व हे साहित्यात तितकं निर्लेप उतरलंय? मुलींच्या केवळ स्वतःच्या अशा कितीतरी गमती जमती असतात. उपद्व्यापीपणा हा मुलामुलींचा लहानपणी स्थायीभावच असेल. पण मुलींचं भावविश्व आपल्याला दिसतं ते थेट 'कळीचं फूल होताना' सारख्या सदरात. ती छोटीशी कळी कशी आहे, तिच्या अंगी काय काय नाना कळा आहेत ते कुणीच सांगत नाहीत. एकदा फूल झालं की पुढची कॉलेजची वर्षं 'फुलपाखरासारखी'. त्यात फार गॅदरिंग, परीक्षा आणि चवीला एक दोन प्रेमप्रकरणांशिवाय काही विशेष घडलेलं वाचल्याचं आठवत नाही. मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा मात्र सतत सबमिशन्स, प्रोजेक्ट काँपिटिशन्स, राष्ट्रीय पातळीवरच्या खेळ, ऑलिंपियाडसारख्या स्पर्धा, पथनाट्य, शिक्षकांशी झालेले तात्विक मतभेद, वाद चर्चा,पिकनिक, ट्रेक्स, खाणं, पिणं, नाच गाणं, शॉपिंग, सिनेमे, कँपस, मास बंक, मोठ्या कार्यक्रमांसाठी स्वयंसेवा, कधी हलकंफुलकं रॅगिंग हे सारं आणि बरंच काही मुलांच्या खांद्याला खांदा लावून आम्हीही केलं होतं. बहुतेक मुलांना आकर्षक वाटणारी, तिच्याशी बोलायलाही झुरावं लागणारी आपली नेहमीची पुस्तकातली 'नायिका' होती, पण म्हणून बाकीच्या 'नसल्यातच जमा' नव्हत्या. आणि ती जशी प्रत्यक्ष काही न करता केवळ 'काँटॅक्टस्'वर प्रोजेक्टस, प्रॅक्टिकल्सवर 'कंप्लीट'चे शिक्के मारुन घ्यायची पण बॅडमिंटनची रॅकेट फिरवत बी.ए. फर्स्टक्लास फर्स्ट नाही यायची. तशी 'हिरोईन' कुठल्याच पुस्तकात नव्हती. अशा निम्न गोष्टींमुळे नायिकेची 'खलनायिका' झाली तर? पण आम्हाला मात्र ती आवडायची, आम्हीही धोरणीपणे तिच्याशी मैत्रीपूर्णच असायचो. कोण जाणे, आपल्यालाच उद्या हिची मदत लागायची! डिप्लोमसी म्हणायची तर म्हणा, शेवटी मार्कशीट महत्त्वाची, त्यामागची कथा वाचायला कुणाला वेळ आहे? साहित्यिकांना मात्र हे मान्य नसावं. 'बिनधास्त' सिनेमा पाहिला तेव्हा लक्षात आलं की अरेच्चा, खरोखरीच फक्त दोन मैत्रिणींची गाथा गाणारी चित्रपट काय,गाणी, कथाही आपल्याकडे नाहीत! तेव्हा 'शोले' येऊन वीसेक वर्षं तरी झाली होती. म्हणजे अशी दीर्घकाळ टिकणारी, जीवाला जीव देणारी मैत्री मुली करुच शकत नाहीत की काय? पण अशा मैत्रीची उदाहरणं तर मला माझ्याच घरात आई, काकू मावशीच्या मैत्रीणींतून दिसत होती. पुस्तकात मात्र नायिकेला 'जीवाभावाचा सखा' असेल, जो पुढे जाऊन अपघाताने का होईना तिचा साथीदार होतो. पण मैत्रिण मात्र 'धोक्याच्या' वर्षी सावध करुन, पुढे लग्न वगैरे करुन गेली की एकदम मंडईत वगैरे अचानकच जुजबी बोलायला, परिस्थितीची कल्पना यायलाच भेटणार. का बुवा? असो.

आला बंडखोरीचा जमाना. रुढी परंपरांना झुगारुन देऊन स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्याचे वारे वाहणारा काळ. एकेक पुस्तक म्हणजे त्यावेळी आदर्शाचा नवा नवा मेरु. आपले अगदी अस्सेच विचार आहेत, का म्हणून लग्न होऊन घरदार सोडून नवर्‍याच्या घरी नांदायचं? आपण म्हणजेच ही नायिका. जसजशी पुस्तकं वाचत गेले तसतसा या आदर्शांचा एक स्तंभालेखच बनत गेला. आता पुन्हा ती पुस्तकं वाचली की वाटतं, लग्नासारखी बंधनं झुगारुन देणं, आईवडीलांशी पटत नाही म्हणून मोठ्या शहरात एकटं राहणं, समाजसेवा करणं, मित्र म्हणून जवळचा वाटलेल्यांशी शारिरीक संबंध ठेवणं, मूल होऊ न देणं किंवा दत्तक घेणं इथवरच स्त्रियांची बंडखोरी पोचली आहे का? कार्यालयीन कामकाजात, रोजच्या आयुष्यात कित्येक वेळा मन बंड करुन उठतं, कधी तर कृती होऊनही जाते. हे एक बंडच आहे हे स्त्रियांना स्वतःलाच जाणवत नसेल, तर समाजाकडे त्रयस्थ दृष्टीच्या चष्म्यातून पाहणार्‍या लेखक मंडळींना ते कसे दिसणार? स्त्रियांनी नोकरी करण्याची लाट आली तेव्हा कौटुंबिक पातळीवर होणार्‍या बदलाची, सासू-सासरे-नवरा यांनी केलेल्या तडजोडींची साहित्याने दखल घेतलीही असेल. आता उच्च शिक्षण घेऊनही केवळ मुलांकडे बघण्यासाठी, संसार करण्यासाठी गलेलठ्ठ पगार नाकारुन स्वखुशीने गृहिणीपद भूषवणे हेही एक बंडच. दहा वर्षांपूर्वी 'स्वागतिके'च्या पदासाठी 'गोरीपान सुंदर तरुणी' अपेक्षित असायची तिथे आता, चारचौघींसारखीच, सावळी पण दक्ष, कार्यतत्पर मुलगी आपण पाहतो हा बदल लोकांच्या गळी उतरवायला तत्कालीन सौंदर्यकल्पनांविरुध्द सार्‍या जणींनी मिळून अघोषित बंडच केलं असावं! घरोघरी जाऊन कामं करणार्‍या बायकांचा एक मोठा समूह नोकरी करणार्‍या, न करणार्‍या स्त्रियांच्या कुटुंबव्यवस्थेचा कणा आहे हे सर्वमान्य आहे. एक दिवस बाई आली नाही, की दिनचर्या कोलमडते. तिचं महत्त्व पुस्तकात फक्त दारुड्या नवर्‍याने पीडीत झालेली आणि उदार मनाच्या, कळकळीच्या जाणीवेतून मालकीणीने वाचवलेली एवढंच. पाळणाघर चालवणार्‍या स्त्रियाही असाच दुसरा आधारस्तंभ. पुस्तकातून गायब. नवर्‍याच्या नोकरीनिमित्ताने परदेशीच स्थायिक व्हावं लागणार्‍या स्त्रिया, तिथे स्वत:ची नवी क्षितिजे, नव्या वाटा शोधतात. तिथे रुजून अंकुरही फुटतात. मात्र मुलं झाल्यावर त्यांना कोणत्या संस्कृतीनुसार वाढवायचं, मायदेशात राहणार्‍या आई वडील, सासू सासरे यांच्याबद्दल खूप करावंसं वाटतंय पण व्यवहार आणि भावना यात मनाची पडझड होतेय हे जाणवताना त्यांची अवस्था अर्जुनासारखी झाली असली तरी अशा परिस्थितीत काय करावं हे सांगणारा भगवद् गीतेसारखा ग्रंथ मात्र हाती नाही.

आजच्या स्त्रीचं असं गुंतागुंतीचं वास्तव पुस्तकांमध्ये का दिसून येत नाही? प्रत्यक्षात स्त्रियांनी वास्तवाचा 'स्वप्न आणि सत्य यांचा सुवर्णमध्य' असा जो स्वीकार केला आहे तिथे साहित्यातल्या नायिका मात्र स्वत:ची पारंपारिक, रुढीप्रिय किंवा पुरोगामी अशी कोणतीही एकच भूमिका ठरवण्यात का खर्ची पडत आहेत? मग हा प्रश्न 'लिखित माध्यमाचा' आहे का? लिखित साहित्य हे कालातीत ठरावं अशी धडपड त्या त्या काळातल्या स्त्रियांचे चित्रण करायला मारक ठरते आहे का? वर उल्लेखलेल्या पुस्तकात भेटणार्‍या स्त्री नायिका आज आपण अजिबात वास्तवदर्शी म्हणू शकत नाही. काळाच्या एका तुकड्याचं प्रतिनिधित्व त्या करतातच. मात्र आज ते क्वचितच वाचावंसं वाटेल, हे सत्यही नाकारता येणार नाही. म्हणूनच मग नंतर हे काळानुसार स्त्रीनायिका रंगवणं कमी होत गेलं का? पण त्यामुळे आज साहित्यात एकतर रुढार्थानं आदर्श ठरणारी नायिका किंवा बंडखोर वृत्तीची लढाऊ नायिका असे दोनच प्रकार हाती लागतात. 'माझ्यासारखी नायिका कुठेय?' हा आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या जवळपास प्रत्येक स्त्रीचा प्रश्न अनुत्तरित राहतो. आपण त्या दोघींमध्येही कुणाला पाहू शकत नाही. मग ते फक्त वेळ घालवणार्‍या वाचनापुरतंच मर्यादित राहतं. मनात घर करु शकत नाही. स्त्रीप्रधान पुस्तकांच्या मागणीबद्दल एकूणात दिसणार्‍या औदासिन्याचं मूळ हे असावं का? उदाहरणच घ्यायचं झालं, तर 'माहेरची साडी' चित्रपटाआधी किंवा नंतरही तसं पुस्तक निघालं असतं तर ते इतकं तुफान गाजलं असतं का? त्या चित्रपटाच्या यशाचं गमक काय तर घराघरातल्या स्त्रियाच काय तर पुरुषही तिथे कुठेतरी स्वतःला रिलेट करु शकले. आपल्याशी लांबून का होईना पण लागेबांधे राहिलेल्या ग्रामीण जीवनाचा तो आरसा होता. तीच गोष्ट 'सातच्या आत घरात' , 'फॅशन' सारख्या अगदी अलीकडच्या काळातल्या चित्रपटांची. लोकांना वास्तवदर्शन आवडतंय, पण ते त्या माध्यमात. याच संकल्पनांवरची पुस्तके वाचली तर आपल्या मनात पहिला उमटणारा विचार म्हणजे 'आपण काय शिकलो' ! कदाचित प्रत्येक गोष्ट वाचल्यावर 'तात्पर्य' शोधण्याची इसापनीती लेखकांना हे चित्र मांडण्यापासून रोखत असावी. हा फरक आहे 'वाचक' आणि 'प्रेक्षक' या भूमिकांचा. या सिनेमांचा प्रेक्षक दारिद्र्यरेषेखालील माणसांपासून उच्च परीटघडी गर्भश्रीमंतापर्यंत कुणीही असू शकतो. पण मराठी पुस्तकांचा वाचक म्हणजे बहुतेकदा पांढरपेशा मध्यमवर्गीय. वास्तवाला कल्पनेतही स्वीकारायला बिचकणारी दांभिकता जपणारा. वाचलेल्यातून सतत काहीतरी उच्च, आदर्श शोधणारा. स्त्रीचं आजूबाजूला दिसणारं रुप हे नेहमीच आदर्श नसेल ठरत, पण कधीकधी त्यावाचून गत्यंतरच नसेल तर? मग तिचं तसं वागणं पांढर्‍यावर काळ्यात उमटूच नये? स्त्रीला सतत त्यागमूर्ती, जिद्दीची, चिकाटीची, ध्येयासक्त, भावुक,जिव्हाळ्याचीच दाखवायची किंवा एकदमच रोखठोक, कठोर मनाची, रुक्ष, व्यवहारी तरी दाखवायची काय गरज आहे? लेखक राहूदे पण लेखिकांनासुध्दा स्त्री हे या सार्‍या गुणावगुणांचं सुरेख कोलाज आहे असं ठाशीवपणे का नाही मांडावसं वाटलं? मला वाटतं, सतत काही तरी संदेश-प्रेरणा घेण्याची वाचकांची गरजच लेखकांना स्त्रीचं रुप आहे तसं दाखवण्यापेक्षा, वाचकांना हवं तसं उभं करण्यास भाग पाडतेय. आहे ते तसंच काळ्यापांढर्‍यात लिहीण्याचं आणि वाचण्याचं जिगर लेखक आणि वाचक दोघांनीही ठेवण्याची गरज आहे. कला आणि साहित्य हे त्या त्या काळाच्या समाजजीवनाचा आरसा असतो म्हणतात. या काळातल्या स्त्रियांचं प्रतिबिंब जसंच्या तसं साहित्यात पडलं नाही तर पुढच्या पिढ्यांच्या इतिहासाचा एक मोठाच तुकडाच गायब झाल्याचं लक्षात येईल. ही पोकळी तेव्हा कधीच भरुन काढता येणार नाही. म्हणूनच वास्तवात पुस्तक आणि वाचक यांना जोडणारा हा दृष्टिकोन आता किंचित बदलण्याची गरज आहे. कदाचित, हातात पुस्तक आहे की आरसा असा संभ्रम पडावा अशी करामत घडेल! आठशे खिडक्या नऊशे दारांनी जाणार्‍या या नारीला गाठायला आता मात्र लेखणीने सरसावायलाच हवं!

गुलमोहर: 

आशूडी, अभिनंदन.....

छान विषय आणि लिखाणही ....मनाला भिडले आणि पटलेही ....

कला आणि साहित्य हे त्या त्या काळाच्या समाजजीवनाचा आरसा असतो म्हणतात. या काळातल्या स्त्रियांचं प्रतिबिंब जसंच्या तसं साहित्यात पडलं नाही तर पुढच्या पिढ्यांच्या इतिहासाचा एक मोठाच तुकडाच गायब झाल्याचं लक्षात येईल. ही पोकळी तेव्हा कधीच भरुन काढता येणार नाही. म्हणूनच वास्तवात पुस्तक आणि वाचक यांना जोडणारा हा दृष्टिकोन आता किंचित बदलण्याची गरज आहे..... १००% अनुमोदन

मग आता वाट नका बघु सुरवात तुम्हीच करा Happy Happy Happy

सुंदर लेख. शीर्षक चपखल.

>> या काळातल्या स्त्रियांचं प्रतिबिंब जसंच्या तसं साहित्यात पडलं नाही तर
या काळाचं एकंदरित प्रतिबिंबही साहित्यात पडते आहे की नाही अशी मला शंका आहे.

उत्तम लेख,
'शामची आई' ने केलेल्या नुकसानीचीही दखल घ्यायला हवी होतीस!!!
या काळाचं एकंदरित प्रतिबिंबही साहित्यात पडते आहे की नाही अशी मला शंका आहे.>>> अगदी अगदी. पूर्वसुरिंनी केलेले काम मोठे आहे यात शंका नाही पण त्याच्या निरपेक्ष विचार-कंटेंट आणि फॉर्म या दोहोत- होताना दिसत नाही.

मी आधीच्या लेखावर प्रतिसाद दिला होता माझ्या आठवणीप्रमाणे. तो लेख आता दिसत नाहीये.
लेख चांगलाच आहे, पण खूपच मोठे पॅराग्राफ्स आहेत. मांडलेला विचार योग्य.

मी ही आधीचा लेख वाचला होता. हिमगौरीने लिहिलेला. दिनेशदांची ती 'पॅरेग्राफची' प्रतिक्रियासुद्धा आठवते आहे. मग कुठे गेला तो लेख.

प्रत्यक्षात स्त्रियांनी वास्तवाचा 'स्वप्न आणि सत्य यांचा सुवर्णमध्य' असा जो स्वीकार केला आहे तिथे साहित्यातल्या नायिका मात्र स्वत:ची पारंपारिक, रुढीप्रिय किंवा पुरोगामी अशी कोणतीही एकच भूमिका ठरवण्यात का खर्ची पडत आहेत? >> Happy

मस्त मांडलं आहेस.. सुंदर! Happy

छान लिहिलंयस. इंग्रजी साहित्यात नॅन्सी ड्रू च्या पुस्तकांचा किती प्रभाव आहे हे या लेखातून कळेल http://www.nytimes.com/2009/05/31/weekinreview/31murphy.html?scp=7&sq=so...

लिट्ल वीमेन मधल्या चौघी बहिणी अन लिटल हाउस ऑन द प्रेअरी मधल्या लॉरा, मेरी अन कॅरी या सुद्धा अनेक पिढ्यांच्या मैत्रिणी आहेत.

महादेवी वर्मा यांच्या काही हिंदी गोष्टींमधे शाळकरी वयाची मुलं मुली आहेत पण फक्त मुलगी / किशोरी मध्यवर्ती व्यक्तिमत्व असलेली गोष्ट/ कादंबरी काही आठवत नाही Sad