ज्याचा त्याचा पाऊस..

Submitted by के अंजली on 12 June, 2011 - 22:50

पाऊस पडतो..
कुठेही,कसाही, कधीही पडतो..

गवताच्या पातीवर
डोंगराच्या छातीवर
वाट पाहून आसुसलेल्या
काळ्याभोर मातीवर..

ताडांवर माडांवर
हिरव्यागार झाडांवर
वठलेल्या खोडांवर
जुन्या जाणत्या वाड्यांवर..

फुलांवर मुलांवर
उंच उंच झुल्यांवर
लांब लांब शेपटीसारख्या
चमचमणार्‍या रुळांवर..

नदी नाले ओढे तळी
फेसाळत्या सागरावर
कमरेवरती हिंदकळणार्‍या
भल्यामोठ्या घागरीवर..

पाऊस पडतो

डोळ्यांतल्या पाण्यावर
मनातल्या गाण्यांवर
उगाचच लटक्या लटक्या
नाजूक नाजूक बहाण्यांवर..

तिच्या वेणीवर
त्याच्या बटांवर
प्रेमाच्या अगणितश्या
रम्य रंगीत छटांवर..

पाऊस आमच्यावरही पडतो
पाऊस तुमच्यावरही पडतो
पाऊस असा ज्याच्या त्याच्या
जगण्यावरही पडतो..

पाऊस पडतो...
पाऊस पडतो..
पाऊस पडतो..

गुलमोहर: 

छान Happy

मयुरेश,अनामिका,भ्रमर,अनिल,सहेलि,निवडुंग,वर्षाराणी,बेफिकिर,अमोल,हबा आणि गिरीश..
खूप धन्यवाद... Happy

यंदाचा पाऊस तुम्हां सर्वांना आनंदाचा जावो....!

हॅप्पी मान्सून Happy