ती गेली तेव्हा...

Submitted by हर्षल_चव्हाण on 26 May, 2011 - 10:17

--------------"दिवसभर तिचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर राहतो!!!" हे मी दररोज मनापासून ऑफिसला जाण्याचं कारण होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत; कामाची सुरूवात करण्याआधी, काम करतांना, मध्येच कंटाळा आला की, लंचला जातांना, लंचहून आल्यानंतर, पुन्हा एकदा कंटाळा आल्यानंतर, दुपारची कॉफी घेतांना आणि संध्याकाळी ती ऑफिसमधून निघतांना या प्रत्येकवेळी मी तिला पहायचो. माझ्याकडे पाहतांना तिच्या चेहर्‍यावर असलेले भाव मैत्रीचे की प्रेमाचे असतील याबद्दल मला कुतुहल वाटायचं खरं, पण माझ्या मनात असा काही विचार आला की माझी तिच्याकडे अगदी सहज, नजरेला नजर देऊन पाहण्याची हिम्मतच व्हायची नाही. ती मला आवडायची, हे "मी तिला सांगण्याआधीच माहीत असणार..." या टिपीकल; मुलांच्या मनात असणार्‍या गैरसमजामुळे मला वाटणारी भिती; मला कधीच तिच्याशी सहज नातं बांधू देऊ शकली नाही. पण ती मात्र अगदी कुणाशीही सहज एकरूप होऊन जायची. तिच्या सहवासात आपण पावसाच्या मंद सरींमध्ये अलगद भिजतोय, आणि तो ओलावाही हवाहवासा वाटतोय असंच वाटायचं. म्हणजे... माहीत नाही! पण मला तिच्यादेखत; तिच्याबद्दल काय वाटतंय हे मी कधीच लपवू शकत नव्हतो... सगळा माझाच मूर्खपणा!!!
--------------दररोज काहीतरी वेगळं व्हावं असं मला नेहमी वाटायचं. पण तिला द्यावसं वाटणारं वेगळेपण, माझ्याऐवजी तिला 'दुसरंच' कुणीतरी देऊन जायचं. तिला पोट दुखेपर्यंत हसवणं, मनसोक्त गप्पा मारणं, तिच्या आवडी-निवडी विचारणं, आणि तिनेही एकापाठोपाठ एक; तिच्या आयुष्यातल्या; कुणा जवळच्या मित्राला मनातलं सारं सांगत जाणं हे सारं काही माझ्यादेखत 'त्याच्याशी' व्हायचं. मी मात्र आपल्याला ह्याचा काही फरक पडत नाही, असा आविर्भाव आणून माझं माझं काम करत रहायचो. पण एक कान तिच्या बोलण्याकडे देऊनच! असला राग यायचा 'त्याचा'... पण काय करणार? आम्ही पडलो मुखदुर्बळ! आमचं बोलणंही; दहा मिनिटांच्या वक्तृत्वस्पर्धेत घडाघडा विषय मांडून मोकळा होणार्‍यांतलं किंवा तीन मिनिटांच्या उत्स्फूर्त स्पर्धेतलं बक्षीस जिंकण्यासाठी समोरच्याला भारी, महान वाटेल असं काहीतरी केलेल्या अगम्य बडबडीसारखं... पण सामान्य माणसाशी सहज जमवून घेता येणारं, त्याच्या पोटात शिरून त्याच्या जाणिवेला हाक देणारं, काळजातलं साठलेलं हलकं करणारं आणि त्याला आपलसं करणारं नव्हतं ना... त्यामुळे सगळी गोचीच व्हायची. अधुन-मधून एखादं चांगलं वाक्य सुचायचं. ते ऐकून "बापरे!!! असलं काहीतरी भारी बोलत जाऊ नकोस रे... मला काही कळत नाही." असं म्हणून एकाचवेळी कातील हसून आमचं काळीज छिन्नविछीन्न करणारे तिचे प्रतिसाद ऐकून मला हसावं की रडावं ते ही कळायचं नाही. मग पुन्हा आतल्या आत कुढत, स्वतःला ओरबाडत; पीछेहाट होणार्‍या सैन्याला; प्रतिस्पर्धी विजयी लक्ष्याकडे आगेकूच करतांना पाहून होणार्‍या अस्वस्थ जीवाच्या घालमेलीचं सगळं वातावरण मी पुन्हा पुन्हा अनुभवायचो.
--------------महिन्याभराच्या सहवासात मला जसे हे क्लेशदायक अनुभव आले, तसेच सुखकारकही. ह्या महिनाभरात माझी भीड चेपली होती. तिच्याशी तिला हव्या तशा, सहज गप्पा मारण्यापर्यंत (अगदी तासन् तास नाही पण 'तो' नसतांना मिनिटा दोन मिनिटांच्या... वाढत जाऊन पंधरा-वीस मिनिटांपर्यंतं) आमची मैत्री जुळली होती. मला तिच्याबद्दल कळालेली प्रत्येक गोष्ट ही तिने 'त्याच्या'शी गप्पा मारतांना केवळ मला समजावी म्हणून सांगितली होती हे ही हळुहळू माझ्या लक्षात आलं. कारण आमच्या दोघांत झालेल्या गप्पांना मला वरवर माहीत असलेल्या या सार्‍या सत्यांचा आशय-विषय, त्यांचा तिच्या आयुष्यावर असलेला प्रभाव, त्यांचे परीणाम यांची घट्ट वीण होती. एक सहज नातं ती माझ्याशी शेअर करत होती. बोलता बोलता गोष्टी एकमेकांच्या आयुष्याशी कुणी जोडलेलं आहे का? याची माहीती करून घेण्यापर्यंत यायच्या. त्यावेळी "हॅ... मला नाही असलं काही जमत." असं म्हणून ती मला उडवून लावायची. आणि मी "कुणीच नाही." असं सांगितल्यानंतर; "मिळेल की तुलाही कुणीतरी..." असं आश्वासनदायक उत्तरही द्यायची! त्यावेळी माझ्या धडधडत्या ऊराला थांबवून, तिच्या खुर्चीसमोर जाऊन एका गुडघ्यावर झुकून, तिचा हात आपल्या थरथरणार्‍या दोन्ही हातांत घेऊन, "माझं तुझ्यावर प्रेम आहे" हे चार शब्द बोलून हा सारा पाठशिवणीचा खेळ थांबवावा असं नेहमी वाटायचं मला. पण तोपर्यंत तिने तिच्या कम्प्यूटरकडे वळून माऊससोबत चाळा करायला सुरूवात केलेली असायची. आणि मी तिच्या चेहेर्‍याकडे पाहून मनातल्या मनात... "अरे बोल... मूर्खा बोल..." असं म्हणत थिजून जायचो. अचानक तिने माझ्याकडे पाहीलं की उगाच इकडे तिकडे नजर भिरभिरवत बसायचो. एखाद्या उंदरासारखं घाबरून बिळात लपायचं... आणि पुन्हा पुन्हा मनातलं तेच तेच द्वंद्व अनुभवायचं... हळुहळू मग ओसरायला लागायचा त्या विचारांचा पूर... नको वाटायला लागायचं ते धडधडणं, घाबरणं... शेवटी, 'नाही रे... तुझ्यात दम नाही...' असं म्हणून स्वतःलाच, 'हो, नाहीये माझ्यात दम...' म्हणून माघार घ्यायची. तोपर्यंत कुणीतरी त्या एकांतात टपकलेलं असायचं. ती तिच्या steady routine ला परतलेली असायची. आणि मी गोंधळलेला, बावळटासारखा बिथरलेला उठून वॉशरूमकडे पळायचो, तिथे स्वतःला समजवायचो, आणि 'पुढच्या वेळी नक्की... ठरलं.' असं म्हणून पुन्हा जागेवर परत यायचो.
--------------ती पुढची वेळ कधी येणार हे मलाही ठाऊक नव्हतं. पण ठरवून ती वेळ कधीच आली नसती एवढं मला नक्की माहीत होतं. दोन दिवस आधी 'ती' ऑफिसला आली नव्हती. का, ते मी 'त्याला' विचारलं नाही. कुणालातरी सांगतांना आपण ऐकूच ह्याची मला खात्री होती. पण तरीही दिवसभरात मला काही कळलं नाही. दुसर्‍या दिवशी मला एवढंच कळालं की, 'टेक्सास युनिव्हर्सिटीत' तिचं M.S. साठी सिलेक्शन झालं होतं. तरीही मला वाईट वगैरे वाटलं नाही. उलट तिच्या सिलेक्शनचा आनंदच वाटला. संध्याकाळी ऑफिस सुटेपर्यंत कामात फार लक्ष लागलं नव्हतंच. पण हळुहळू आत काहीतरी खुपायला लागलंय याची जाणीव झाली होती. कुणीतरी आपलं काहीतरी हिरावून घेतंय, आपलं काहीतरी हरवतंय असं वाटायला लागलं. संध्याकाळी निघतांना एक congrats चा मेसेज करावासा वाटला. पण मग पुन्हा नको वाटलं. आपल्याला काहीच माहीती नाही असं दाखवण्याची आणखी एक (मूर्खपणाची) संधी मिळाली होती... आणि अर्थातच हिंम्मतही नव्हती. त्यामुळे नाहीच केला. त्या रात्री झोप लागण्याच्या आगोदर सारखा तिचा नंबर डायल करून कट करण्याचा खेळ खेळत बसलो होतो. महीन्याभरात कसं अगदी काहीच नाही पासून खूप काही आमच्या दोघांत निर्माण झालं होतं. आणि मला ते माझ्याजवळ आहे याचा खूप अभिमान वाटत होता. पण हे तिच्यासमोर उघड करावं की नाही? तिला सांगावं की नाही? सांगितलं तर ती काय म्हणेल? आणि नाही आवडलं तिला तर? ह्या विचारांनी मी खूप अस्वस्थ झालो. हे सर्व इतक्या उशीरा का जमून आलं? आणि आल्यानंतर, तिला ते कळण्याच्या आतच तिची जाण्याची वेळ का आली? ह्या सार्‍याचं मला एकाचवेळी वाईटही वाटलं आणि रागही आला. पण मी काहीही करू शकत नव्हतो.
--------------तिसर्‍या दिवशी ती ऑफिसला आली. मी अस्वस्थच. पण तिच्या चेहेर्‍याकडे पाहून मला थोडं बरंही वाटलं. तिचे डोळे मात्र खूप रडल्यासारखे वाटत होते. मला आता तिच्याशी सारखं बोलावसं वाटत होतं. पण काही केल्या ती माझ्या वाट्याला येत नव्हती. सारखं कुणी ना कुणी तिला भेटायला, अभिनंदन करायला येत होतं. अणि कुणी नसतांना 'तो' होताच तिथे... कबाब में हड्डी! बर्‍याच वेळाने मग फक्त आता ती आणि मीच आहोत हे पाहून मी तिला "congrats!" म्हणून हात पुढे केला. ती फक्त "thanks" म्हणाली.
"मग, कधी निघायचंय अमेरीकेला?", मी.
"अजून महीनाभर आहे रे!", ती.
"हम्म्म... आणि ऑफिस कधीपासून बंद?", मी.
"उद्या..." असं म्हणून तिने मान वळवली.
"काय? उद्यापासूनच... अगं पण..." असं म्हणतांना मला लागलेला झटका तिला अपेक्षित होता की काय असं मला वाटलं, कारण तिने लगेच माझा हात हातात घेतला.
मग तीच पुढे म्हणाली, "हो... उद्याच. तसंही मला इथला फार कंटाळा आला होता. एवढे दिवस इथे होते, त्यात सारं काही खूप छान होतं. पण बाबांनीही आधीच सारं ठरवलं होतं, त्यामुळे काही इलाज नाही." माझा हात सोडून तिने मान वळवली आणि खिडकीच्या बाहेर पाहू लागली.
माझ्या पोटात अगदी कसनुसं झालं. तिने माझ्याकडे पहावं असं मला वाटत होतं, पण कदाचीत ह्यावेळी माझी वाचाच गेली असती अशी मला भिती वाटली. त्यामुळे मी फक्त तिच्याकडे पहात राहिलो. मग थोड्या वेळानं तिने तिचं आवडतं गाणं लावलं, अगदी हलक्या आवाजात... आम्ही दोघंच ऐकू शकू असं.
"जब किसीकी तरफ दिल झुकने लगे,
बात आकर जुबाँतक रुकने लगे,
आँखो-आँखोंमें इकरार होने लगे...
बोलदो अगर तुम्हें प्यार होने लगे... "
ह्या ओळींच्या वेळी तिने माझ्याकडे वळून पाहीलं. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या, माझ्या ओठांतुनही शब्द फुटेनासा... पण आत कुठेतरी त्या गाण्याने मला माझ्या खुर्चीतनं उठायला भाग पाडलं. अडखळत्या पायांनी मी तिच्याजवळ गेलो. एका गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेतला. ती माझ्या डोळ्यांत पहात होती.
आणि मी तिला म्हणालो, "मला कधीच वाटलं नव्हतं की मी तुला हे कधी सांगू शकेन. पण आज नाही सांगू शकलो तर पुन्हा कधीच मला ते जमणार नाही. प्रिया, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे गं, तू please माझ्या आयुष्यातून जाऊ नकोस. माझी कायम सोबत करशील?"
--------------ऑफिसमध्ये बसून दररोज एकमेकांना पाठवलेले "miss you so much... :-)" चे मेल वाचल्यानंतर
दिवस कसा जातो कळतही नाही. "दिवसभर तिचा चेहरा आता तिच्या मेलमार्फत माझ्या डोळ्यांसमोर राहतो!!!" हे मी दररोज मनापासून ऑफिसला जाण्याचं कारण आहे.

गुलमोहर: 

king_of_net, स्मित_, जाईजुई: प्रतिसादाबद्दल आभार Happy काही सुचना असल्यास लिहाव्यात.

माझ्या एका मित्राचे आत्मकथन वाचत आहे असे वाटले.. तो सुध्दा असेच काहीतरी बडबडायचा रोज ऑफीस मधुन रुम वर आला की..
अर्थात शेवटी ती निघुन गेलीच दुसर्या बरोबर Happy आणी तिचे पण नाव प्रिया होते Proud
पु.ले.शु.

@ harshalc, काहो एवढं हृदयद्रावक लिहिलं? वाईट वाटलं ना मला ते वाचून! मी हे लिहू तरी कसं, कि तुम्ही फार छान लिहिलंय ते!