नॉर्वे भ्रमंती - ५ (फ्लाम)

Submitted by स्वानंद on 5 June, 2011 - 13:44

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ४ (बर्गन)

सकाळी आठला ट्रेनने बर्गन सोडले. "बर्गन ट्रेन"चा प्रवास म्हणजे डोळे उघडे ठेवून पाहिलेले स्वप्न. ट्रेन हळुहळु डोंगर चढत होती. एका बजूला उंच पहाड, आणि दुस-या बाजूने जमीनीच्या चिंचोळ्या भागातून आत घुसलेले समुद्राचे पाणी. त्याच्या पलिकडे पुन्हा उंच उंच पहाड, आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबात आपले सौंदर्य न्याहाळणारी पांढुरकी हिमशिखरे.

(बर्गन ट्रेन मधून)

या मार्गावरुन जाताना अम्ही निम्मा वेळ बोगद्यातच होतो. एकदम बोगदा संपायचा, समोरचा नजारा डोळ्यात साठवेपर्यंत अम्ही दुस-या बोगद्यात गेलेलो असायचो. यात फोटो काढायला कुठली सवड? मी थोडा वेळ प्रयत्न केला पण धड फोटोही येत नव्हता आनि फोटोच्या धांदलीत काही पहायलाही मिळत नव्हते. शेवती मी कंटाळून कॅमेरा मित्राकडे देऊन टकला, आणि खिडकीतून बाहेरचे सौंदर्य पाहू लगलो.

मनात सहज विचार आला, कोकणातून घाटावर यायला जेव्हा रेल्वे निघेल तेव्हा ती अशीच असेल. एका बाजुला डोंगर दुसरीकडे दरी, पावसाळ्यात डोंगर कड्यांवरुन फेसाळणारे धबधबे. मी नॉर्वेमध्ये नाहीच, सह्याद्री मध्येच अहे असे वाटू लागले.

(एका कड्यावर..)

बर्गन ट्रेन अम्ही वॉस या गावी सोडली. तिथून बसने गुडवँगन या गावी निघालो. प्रवास ३०-४० मिनीटांचा असेल. दोन्ही बाजूना छान हिरवे गवत उगवले होते. बर्फाचे सरोवरांवरील राज्य संपू लागले होते. कोठे कोठे पेरणी सुरु होती. शेताच्या कडेने एकेकटी घरे दिसत होती. या छोट्या प्रवासातही बोगदे होते, धबधबे तर दोन्ही बाजूनी झेपावत होते.

(सरोवर)

आम्ही गुडवॅंगनला पोचलो. एकदम ’बेष्ट’ जागा आहे ही. तिथे मोजकीच घरे होती. काही हॉटेल, दुकाने आणि बोटींसाठी छोटा धक्का. चारही बाजू डोंगरांनी वेढलेल्या, डोंगरही साधेसुधे नाही तर १००० मीटर उंच. इतके की शिखरे बर्फाने झाकलेली. एका बाजूने ’फियॉर्ड’चे पाणी त्याला मिळणारी एक नदी. ती ओलांडण्यासाठी लहान लहान पूल.

(गुडवॅंगन)

"इतक्या चिंचोळ्या पाण्यात बोटी चालत असतील?" आम्ही असा विचार करत होतो तोच समोरच्या बेचक्यातून एक बोट बंदराकडे येताना दिसली.

(बोट)

आम्ही बोटीवर चढलो. सगळ्यात वरच्या डेकवर बसायला भरपूर खुर्च्या होत्या. मंद वारा सुटला होता. आणि जशी बोट सुरु झाली तसा तो झोंबू लागला. बोटीबरोबर सीगल उडत होते.

(सीगल)

आम्ही पुढचे दोन तास निर्सगाचा अद्भुत अविष्कार बघणार होतो. "फ्लाम"ला जोडणारी ही फियॉर्ड अतिशय सुंदर आहे. कुठे कुठे ही फियॉर्ड फक्त २५० मीटर रुंद आहे. हिच्या दोन्ही बाजूनी उंच पर्वत. इतके की काही ठिकाणी यांची उंची १८०० मीटर एवढी आहे. पाण्याची खोलीही काही ठिकाणी १००० मीटरपेक्षा जास्त आहे. वाटेत छोटी छोटी गावे आहेत. बरीचशी बाहेरील जगाला फक्त जलमार्गाने जोडलेली आहेत.

(फियॉर्डमधील एक गाव)

यातल्याच एका गावी आमची बोट थांबली दोन मोठी माणसे आणि ३ लहान मुले बोटीवर चढली. त्यातल्या एक माणूस डेकवर आला आणि जणू आमची आधीपासूनच ओळख आहे अशा थाटात आमच्याशी बोलू लागला. तो जर्मन होता. भारताबद्दल त्याला माहिती होती. तो मुलांसोबत खास सुट्टीसाठी या शांत गावी रहायला आला होता. पण त्याच्या मुलांकडे पाहून ती जागा शांत राहिली असेल असे मुळीच वाटले नाही. कारट्यांनी नुसता उच्छाद मांडला होता. डेकवरच्या सगळ्या खुर्च्या एकत्र करुन त्याची त्यांनी चळत रचली होती. त्यांच्यातला सगळ्यात शांत मुलगा त्याची बाहुली घेऊन त्या चळतीच्या सगळ्यात उंच टोकावर बसला होता. आणि उरलेली दोघे वर खाली करत होते. दंगा तर इतका की शेवटी बोटीचा कॅप्टन बाहेर आला. मग आपण जसे दंगा करणा-या मुलांना भीती दाखवायला सांगू तसे त्याने त्यांना लटके दरडावले, "मी पोलीस आहे, तुम्ही दंगा थांबवला नाहीत तर कोंडून ठेवेन." त्यांची भाषा कळत नसूनही त्यांचा संवाद मात्र थेट आम्हाला कळला. माणसे वरुन वेगळी दिसली तरी आतून मात्र सारखीच असतात हे पाहून गंमत वाटली.

समोरची चित्रे क्षणाक्षणाला बदलत होती. वर्णनापलिकडे सुंदर होत होती.

(फ्लाम फियॉर्ड)

दुपारी २ वाजता आम्ही ’फ्लाम’ला पोचलो जमर्न काका आणि चिल्ल्यापिल्ल्यांना बाय बाय केले. ’फ्लाम’ एक खूप छोटे गाव आहे. खेडेच. तिथे रेल्वेचा प्लॅटफॉर्म, बोटीचा धक्का आणि मुख्य रस्ता सारे एकच आहे. पर्वतांनी वेढलेल्या या गावाला निसर्गाचे अनमोल वरदान मिळाले आहे. आमच्याकडे ३ तास वेळ होता. आम्ही गावाभोवतीने फेरफटका मारायचे ठरवले. या गावाभोवतीच्या डोंगरांधून फिरण्यासाठी छान रस्ते केलेले आहेत. त्याचे नकाशेही मिळतात. ते घेऊन आम्ही वाट पकडली. मखमाली हिरवळ, छोटी छोटी घरे, दूरवरचे पांढुरके डोंगर, झुळझुळती नदी, तिला येऊन मिळणारे ओढे.

(फ्लाम)

गावात मोजकीच घरे होती. थोडकी शेती आणि जोडीला पशुपालन असा एकंदरीत गावक-यांचा व्यवसाय दिसत होता. आम्हाला बरेच प्राणी पहायला मिळाले. मेंढ्या, गाई, त्यांची राखण करणारी कुत्री. शेवटी आम्ही फ्लामच्या जुन्या चर्चपाशी जाऊन पोचलो. हे चर्च बरेच जुने आहे. १३-१४व्या शतकातील. त्याचे दार लावलेले होते. आम्ही दार उघडून आत गेलो. जेमतेम २०-२५ माणसे बसू शकतील एवढी जागा, मध्यभागी येशूची प्रतिमा, भिंतीवर चित्रविचित्र आकृत्या होत्या. आतले वातावरण एकदम शांत होते. थोडावेळ बसून आम्ही तिथून परतलो.

(फ्लामचे चर्च)

(गाई)

आता "फ्लाम ट्रेन"ने फ्लाम ते मिरदाल हा प्रवास करायचा होता. हा लोहमार्ग जगातील सगळ्यात तीव्र चढाच्या लोहमार्गापैकी एक आहे. फ्लाम समुद्रसपाटीपासून २ मीटर उंचीवर तर मिरदाल ८६८ मीटर उंचीवर. दोन्ही गावे जोडणारा हा मार्ग केवळ १९ किलोमीटर लांब आहे. हा बांधायला नॉर्वेजियन लोकांना सुमारे ४० वर्षे लागली. या मार्गावरील सर्व बोगदे हाताने खणलेले आहेत. एका बोगद्यात तर ही ट्रेन १८० अंशांमध्ये वळते. वाटेत एक उंच धबधबा लागतो. तो पहायला तिथे ट्रेन काही वेळ थांबते.

(मिरदालचा रस्ता)

(शोफोसन धबधबा)

जसजशी ट्रेन उंचावर जाऊ लागली तशी हिरवळ गेली, पुन्हा हिम दिसू लागले. मिरदालला उतरलो तेव्हा तर खूपच थंडी जाणवू लागली. मिरदालला परत बर्गन वरुन ऑस्लोला जाणारी ट्रेन पकडली. ट्रेन वेगाने धावत होती. बाहेरचे हिम ऑस्लोच्या हिवाळ्याची आठवण करुन देत होते. आम्ही गेल्या ४ दिवसांची उजळणी करत होतो. पुन्हा पुन्हा. 'यापेक्षा अजून काही सुंदर असते जगामध्ये?' मी मलाच विचारत होतो. 'नाही' मनाने उत्तर दिले. "मग परत कधी?" बाहेरुन त्याने आवाज दिला.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच .. किती सुंदर प्रदेश!

पुर्वी मिताननेही नॉर्वे आणि अ‍ॅक्चुअली फ्लाम बद्दलच लिहीलं होतं का? वाचून आणि फोटो बघून आधी वाचलंय, बघितलंय असं सारखं वाटत होतं ..

फोटों वरुन हा देश किती सुन्दर आहे हे कळतच आहे, पण त्या जोडीला इतकं छान वर्णन असल्यामुळे , ह्या देशाचे सौंदर्य अजूनच खुलतय. मला तर त्या तळ्या काठ्च्या रंगीत घरां मधे रहायला खुप आवडेल.
तिथे राहणारे लोकं खरचं भाग्यवान, कारण इतक सृष्टी सौंदर्य रोज नजरेस पडतं आणी अनुभवायला मिळालं म्हणुन तुम्ही पण, आणी वाचायला मिळालं म्हणून आम्ही पण.

सुंदरच. हि मालिका संपली त्याचे मात्र वाईट वाटले !
कोकण रेल्वेबद्दल लिहिलेय ते खरे आहे. हा संपुर्ण मार्ग गावाच्या बाहेरुन जात असल्याने अनोखे सौंदर्य दिसत राहते. हा प्रवास दिवसा आणि पावसाळ्यातच करायला हवा.

जबरीच !! छान वर्णन आणि फोटो.. मागे मितानने लिहिलेले लेख पण मस्त होते..
त्या गाई कसल्या भारी आहेत.. Happy

सुपर्ब!!!!!!

Fjords चे फोटो अफलातुन आवडले. Happy

हि मालिका संपली त्याचे मात्र वाईट वाटले !>>>>दिनेशदांना अनुमोदन.