माझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं

Submitted by मामी on 3 December, 2010 - 06:39

गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.

एकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे? हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्‍याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."

आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......

सकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय? दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. "वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली? किती उशीर होतो!" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा "मॅडम, आम्ही काय करणार? ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार? मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास?" अन गेला तो.

दुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे?... म्हणजे?? .... माझा पहिला विबासं झाला की काय? अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते! अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.

घरातली कामं झटपट आवरून, नवर्‍याला ऑफिसला पाठवून, दुसर्‍या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी कशा आहात? सत्यनारायणाचा कृपा वर्षाव झाला कां?

पंत - अनेक लोकं विबासं ठेवतात, बहुतकांना त्यांचे वैवाहीक जिवन अजुन समृद्ध झाल्याचाच अनुभव आलेला आहे असा तज्ञांचा दावा आहे. आता प्रत्येक गोष्टिला अपवाद असणारच, पण म्हणुन विबासं च्या पवित्र नात्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? अशाने भावी विबासं कसे जडतील? हे निसर्गाच्या विरुद्ध आहे.

मामी,
काही म्हणा,पण इथे सारख 'विबासं' हा शब्द वाचायला मिळाल्यामुळे मनाला गुद्गुल्या तर खुप झाल्या,होत आहेत.
त्यामुळे मी पण आता या 'विबासं' जवळ आलोय असच काहीसं वाटु लागलयं....:हाहा:
तुमचे आभार !
Happy

बाबु, सध्या साडेसाती चालू असल्याने विबासं जमण्यात असंख्य अडचणी येत आहेत. कोणा ज्योतिषाचा सल्ला घेऊन उपाय करायला हवा. Proud

या धाग्यावर भाग घेतलेल्या प्रत्येकाला सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणणे, हनुमानचालिसा जपणे आणि हरिद्वार, काशी, मक्का , मदिना अशा पापक्षालन पर्यटनास जाण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे..

- हुकूमावरून

Pages