वैदिक गणित - ३

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

निखिलम् नवतश्चरम दशत:

'सगळे नवातुन, शेवटचा दहातुन' असा या सुत्राचा अर्थ आहे.
१०, १००, १००० ई. १० चे वेगवेगळे घात आहेत. १० च्या एकाच घाताजवळील दोन संख्यांचा जेंव्हा गुणाकार करायचा असतो तेंव्हा या सुत्राचा उपयोग होतो.

उदा.: ९७*९६
९७ मधील शेवटचा आकडा १० मधुन वजा केला (म्हणजे ७ चा १०-पूरक, अर्थात ३) आणि आधिचे आकडे नवातुन (येथे ९ चा ९-पूरक अर्थात ०).
त्याचप्रमाणे ९६ करता मिळतात ० (९ करता) व ४ (६ करता)

या संख्या ऋण खुणेसहीत आधीच्या संख्यांच्या पुढे लिहायच्य़ा (मुळ आकडे १०० पेक्षा मोठे असते तर ऋण चिन्ह गाळले असते कारण -(-)=+):

९७ -०३
९६ -०४

उत्तराचे २ भाग असतील - उजव्या भागात १० चा जो घात वापरत असु त्यात जितकी शुन्ये तितके आकडे असतील - आपल्या उदाहरणात २. तो भाग मिळवण्याकरता उजवीकडच्या छोट्या संख्यांचा गुणाकार करायचा: -३*-४=१२
डावीकडचा, पहिला भाग मिळवण्याकरता तिरकी बेरीज करायची ९७ - ४ = ९६ -३ =९३
कुठेही मोठा गुणाकार न करता मिळाले पूर्ण उत्तर: ९३१२
९७*९६=९३१२

दूसरे उदाहरण पाहु या:
८८*९८
८८ -१२ (शेवटचा १० मधुन, बाकीचे ९ मधुन)
९८ -०२
डावा भाग: ८८-२=९८-१२=८६ (२ पद्धत्तीनी करायची गरज नाही)
उजवा भाग: -१२*(-२)=२४
उत्तर: ८६२४
८८*९८=८६२४

(३) १०७*१०५
१०७ +७ (इथे निखिलम् वापरायची आवश्यकता नाही)
१०५ +५

डावा भाग: १०७+५ = ११२
उजवा: ७*५ = ३५
उत्तर: ११२३५

(४) १०३*१०२

१०३ +३
१०२ +२
डावा: १०३+२ =१०५
उजवा: ३*२=०६ (१०० माधे २ शुन्य म्हणुन ०६)
उत्तर: १०५०६

(५) ९७*१०२

९७ -३
१०२ +२

डावा: ९७+२=९९
उजवा: -३*२=-०६

उत्तर: ९९००-०६=९८९४

(६) १०१२*१००७

१०१२ +१२
१००७ +७

डावा: १०१२+७=१०१९
उजवा: १२*७ = ०८४ (आता ३ जागा)
उत्तर: १०१९०८४

छोट्या आकड्यांकरता हातचे घ्यावे लागणार:

(७) १३*१५

१३ +३
१५ +५

डावा: १३+५ =१८
उजवा: ३*५=१५ (पण १० माधे एकच शुन्य असल्याने १ हातचा)
उत्तर: १८०+१५=१९५
किंवा: डावा: १८+१=१९ व उजवा: ५ उत्तर: १९५

आता तुम्ही करुन पहा:
(१) ९३*९२
(२) १०७*९५
(३) ९९८८* ९९८५
(४) १०१०२*१००१३

१०,१००,१००० ई. पासुन संख्या दूर असतील तर ही पद्धत फार उपयोगी नाही.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

उजवा: १२*७ = ०९८ (आता ३ जागा)
उत्तर: १०१९०९८ >>>
उजवा: १२*७ = ०८४ (आता ३ जागा)
उत्तर: १०१९०८४. बाकी सर्व उत्तम आहे.

खुप छान लिहिताय. अतिशय उपयुक्त माहिती आमाच्य सारख्या साईट वर काम करणार्‍यांसाठी तर खुपच.

धन्यवाद कृपया लिहित रहा
आम्हि शिकत आहोत....( प्रतिसाद देत नसलो तरी. Happy )

छान!!!!!!!!!!!!! जरा लिंक्स देवुन सगळे भाग एकत्र ठेवला तर सोइचे होइल.... धन्यवाद...