सावट - ६

Submitted by बेफ़िकीर on 16 May, 2011 - 06:46

तमाम पब्लिकने खडबडून जागे होऊन मावशींच्या गेस्ट हाऊसची आता दखल घेतली. घटनाक्रम चकीतच करणारा नाही तर चरकवणारा होता.

मनीषा काकडेचा गंभीर मृत्यू, पाठोपाठ काका थोरात मरणे व त्यातच त्याचे प्रेत उठून बसणे आणि गायब होणे, गेस्ट हाऊसमध्ये काहीतरी गोलमाल आहे याची कल्पनाही नसताना तिसर्‍याच दिवशी पहाटे आपटे आजोबांची आत्महत्या आणि त्यानंतर चक्क पोलिस पाटील झुंबर गोरे यांचा मृत्यू गुत्यापाशी होऊनही बाजी आणि रामोशी शपथेवर सांगतायत की झुंबर गोरे आणि बाजी व रामोशी असे तिघे काल रात्री गेस्ट हाऊसवर तपासणीसाठी गेलेले होते व तेथे त्यांना मनीषा काकडे आणि आपटे आजोबा दिसले!

कशातही काहीही नसताना अचानक ते गेस्ट हाऊस अत्यंत हिडीस कारणासाठी प्रसिद्ध झालेले होते. आणि आजवर तेथील मावशी व इतर सदस्यांशी व्यवस्थित संबंध असलेल्यांनी आता ते नांवच टाकलेले होते.

रामोशी व बाजी यांनी तेथे लुटालुटीचा प्रयत्न केला हे सांगणार कोण तर गेस्ट हाऊसवरचे सदस्य! आणि त्यांच्याशी गावातले शेंबडे पोरही बोलत नव्हते. बाहेर पाय टाकला की लोकांच्या नजराच अशा होत्या जणू गेस्ट हाऊसमधील प्रत्येक माणूस एक भूतच आहे.

झुंबर गोरेच्या मृत्यूचा काही झाले तरी गेस्ट हाऊसशी संबंधच लावला जाऊ शकत नव्हता कारण बाजी आणि रामोशी यांच्यापेक्षा गुत्तावाला नामू वेगळेच बोलत होता. तो म्हणत होता पोलिस पाटील गुत्यावर नेहमीच प्यायचे आणि अती प्यायचे. कालही प्यायले आणि बाहेर पडले. मला वाटले की ते गेलेले असतील. पण गुत्ता बंद करून निघालो तेव्हा ते वाटेत मरून पडलेले आढळले.

या प्रकरणात नामूचा गुत्ता बेकायदेशीर असल्याने तो परस्परच बंद पडला होता.

पार नाशिकपासून चौकशी सुरू झाली होती कारण पब्लिकचा दबाव वाढू लागला होता. काका थोरातचे प्रेत कुठे गेले हा प्रश्नच आधी पोलिस खात्याला छळत होता. त्याचे प्रेत नाही सापडले तर भूत या संकल्पनेवर पोलिस खात्याचाही विश्वास आहे अशी इमेज झाली असती जी होऊ नये यासाठी खाते अक्षरशः राबू लागले होते. उजाड माळ, झाडीचे प्रदेश, टेकाडे आणि आसपासचा प्रदेश सर्व तुडवले जात होते. काका थोरातची बॉडी गायब होऊन आता दोन दिवस झालेले होते आणि अजूनही प्रेत मिळत नाही हे पाहून दबाव प्रचंड वाढला होता. आजपासून तर लोक स्वतःच रस्त्यावर गस्त घालणार होते.

पोलिस खात्याला मात्र काहीच उत्तर देता येत नव्हते. काका थोरातचे प्रेत गेले कुठे? आपटे आजोबांसारख्या माणसाने अचानक आत्महत्या कशी काय केली? गेस्ट हाऊसमधील प्रत्येकाची आजपासून इतकी भयंकर चौकशी होणार होती की त्याची या सहा जणांना कल्पनाही नव्हती.

त्यातच पोलिस पाटीलच पिऊन उलथला म्हंटल्यावर हादरल्याच यंत्रणा!

आजवर दिवे गावात अशी गर्दी झालेली नव्हती. अगदी काका थोरात गेला त्याही दिवशी अशी गर्दी झालेली नव्हती. गेले तीन दिवस सातत्याने होत असलेली गर्दी लक्षात घेऊन पंचक्रोशीतले अनेक फेरीवाले, भजीपाववाले आपली गाडी घेऊन सरळ दिव्यातच आले होते. प्रकरण गंभीर असले तरी माणसाला चहा नाश्ता लागणारच अशी त्यांची अटकळ!

आणि आत्ता हमरस्त्यावर एक मोठा जमाव जमलेला होता. शासनातील तीन अधिकारी आणि दोन पोलिस अधिकारी यांच्यासमोर घोषणा द्याव्यात असा विचार होता त्या लोकांचा! पण चर्चेतून मार्ग निघेल असे ठसवण्यात येत होते. प्रकरण उगाच आहे त्यापेक्षा वाढवू नये असेही काही जणांना वाटत होते.

दिव्यात आणि सावेळ्यात पोलिसांची बर्‍यापैकी गस्त होती.

शेवटी जमावाच्या भावना लक्षात घेऊन अडसुळ नावाच्या एका अधिकार्‍याने सर्वांना जाहीर भाषण दिले.

"मित्रांनो.. दिवे गावासारख्या शांत आणि निरुपद्रवी ठिकाणी गेले चार दिवस काय चाललेले आहे हे खरे तर कुणाच्याच समजण्याच्या आवाक्यात नाही.. आमच्या नाशिकला याची सातत्याने चर्चा होत आहे.. आणि त्याचाच परिणाम म्हणून हे प्रकार पूर्णपणे बंद करण्यासाठी आम्ही पाच जण जातीने येथे आलेलो आहोत..

पहिल्यांदा ग्रामस्थांना माझे आवाहन आहे की कितीही भयानक प्रकार झालेले असले तरी यात एखाद्या अमानवी शक्तीचा हात आहे वगैरे कल्पना मनातून काढून टाका व कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरणार नाहीत याची दक्षता घ्या.. जबाबदारी तुमचीही आहेच.. फक्त एकटे शासन काहीच करू शकत नाहीत...अफवांमुळे शासनाची शक्ती नको त्या जागी खर्च होत राहील आणि खरे गुन्हेगार तोवर दूर गेलेले असतील..

भूत, समंध, हडळ हे प्रकार मुळीच अस्तित्वात नसतात.. मानवाला अनेक गोष्टी समजत नाहीत निसर्गाला.. म्हणून मग तो असले प्रकार खपवतो.. जगात कोणताही गुन्हा आजवर भुताने केल्याची एकाही कायदेपीठात नोंद नाही.. सर्व गुन्हे मानवानेच केलेले आहेत..

एक लक्षात घ्या की समाजातील खलप्रवृत्तीच्या माणसांमुळे खून, दरोडे हे गुन्हे होतच असतात.. पोलिस खाते गुन्हे थांबवण्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्यांना दिव्यदृष्टी नसते... उद्या एखादा गुन्हा होणार आहे हे आधी कुणालाच कळणे शक्य नसते.. याचमुळे पोलिस खाते आणि तपास हे गुन्हेगाराच्या एक पाऊल मागे असतात.. मात्र नागरिकांची साथ, साक्षी पुरावे, योग्य ती माहिती मिळणे यावर त्यांचा भर असतो व त्याच सहाय्याने ते गुन्हेगार पकडतात...

दिवे गावात आजवर शांतता नांदल्यामुळे आपल्या ग्रामस्थांची अशी मानसिकताच नाही की येथे असे प्रकारही होतील.. त्यामुळेच आपण सगळे हादरलेलो आहोत.. गाव ढवळून निघालेले आहे.. पण नीट विचार केला तर असे जाणवेल की मनीषा काकडे या स्त्रीचा मृत्यू हा केवळ एक अपघात होता.. आपटे या वृद्धाचा मृत्यू ही एक आत्महत्या होती... या दोन बाबी लागोपाठ घडल्याने आपण त्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहात आहोत.. त्यातच खात्याला काळिमा फासणारी एक बाब घडली ती म्हणजे पोलिस पाटील झुंबर गोरे यांचा अती मद्यपानामुळे मृत्यू ओढवला..

अती मद्यपानच काय तर मुळात असे गुत्ते चालवणे हेच बेकायदेशीर आहे.. पण दुर्दैवाने कायद्यांची अमलबजावणी होत नाही व त्यामुळे व्य्सनाधीनतेचे बळी दिसतात.. झुंबर गोरे ही अशीच एक केस आहे..

नाशिकसारख्या शहरात रोज आत्महत्या, खून आणि विषबाधा किंवा मद्यपानाने बळी पडतात.. पण दिवे हे गाव लहान असल्यामुळे व घटना एकापाठोपाठ एक घडल्यामुळे आपण बिथरलेलो आहोत हे लक्षात घ्या.. यात कुण्या भुताचा हात नाही.. कारण तसे असते तर आपटे आजोबांनी चिठ्ठी लिहीलीच नसती.. मनीषा काकडेच्या माहेरच्यांनी तरी व्याह्यांवर केस केली असती की नाही?? तीही केली नाही.. पंचनाम्यातून असे समजले की झुंबर गोरेच्या शरीरात अल्कोहोलचे जे प्रमाण होते आणि ज्या दर्जाची दारू तो प्यायलेला होता.. कोणताही माणूस मेलाच असता..

मला एक सांगा.. आजवर झुंबर गोरे पोलिस पाटील असूनही बेकायदेशीर गुत्यावर दारू पितो ही तक्रार एकदाही कशी काय केली नाहीत तुम्ही?? आणि आज तो पिऊन मेला तेव्हा म्हणताय भुताने मारले..

राहता राहिला प्रश्न काका थोरात या गृहस्थाचे प्रेत गायब होण्याचा! एक तरी अशी घटना तुम्हाला आठवते का की ज्यात प्रेत उठून निघाले आणि गायब झाले.. ???

प्रेत कुठेही जात नाही.. जातो तो जिवंत माणूस.. काका थोरात मेलेलाच नाही.. तो पळून गेलेला आहे.. कारण त्याने कसला तरी गुन्हा केलेला आहे आणि पकडले जाऊ नये म्हणून तो पळालेला आहे.. त्याच्या वर्णनाचा एक माणूस सटाण्याकडे जाताना आजच सकाळी दिसलेला आहे.. सर्वत्र ती माहिती पुरवण्यात आलेली आहे.. तो मेला आहे असे समजून त्याला ग्रामस्थ अग्नी द्यायला निघाले होते.. पण तो जिवंत होता.. त्याला शुद्ध आल्यावर तो घाबरून उठून बसला आणि पळापळ झाली.. काका थोरात मेल्याचे सर्टिफिकेट एखाद्या डॉक्टरने दिले होते काय?? या प्रश्नाचे उत्तर द्या.. की ग्रामस्थांनीच ठरवले की काका थोरात आता मेलेला दिसतो.. तेव्हा त्याला जाळून टाका.. अरे वा?? म्हणजे बेकायदेशीर कृत्य कोण करत होते?? तुम्ही की भूत??

आता शेवटचा प्रश्न म्हणजे गेस्ट हाऊसवर भूत आहे.. हे कधी कळले म्हणे गावाला? तर आपटे आजोबा वारले तेव्हा.. आणि त्या आधी ते गेस्ट हाऊस किती वर्षे आहे गावात? तर गेली अनेक वर्षे! म्हणजे गेल्या दोन दिवसातच भूतही भाड्याने राहायला लागले असे म्हणायचे तर! आ???? इतकी वर्षे गावात व्यवस्थित वागणारे लोक एका दिवसात तुमच्यासाठी भूत बनले?? आपटे आजोबा गेस्ट हाऊसवर गेले होते हे मान्य आहे.. पण ते जर तुमच्या घरी सहज आलेले असते गेस्ट हाऊस ऐवजी.. आणि दुसर्‍या दिवशी जर मेलेले आढळले असते... तर काय तुम्हाला भूत मानायचे लोकांनी?? की तुम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करायची??

तपासणी चालू आहे आणि होणारही आहे..गेस्ट हाऊसवर आजोबा गेलेले होते हे खरे आहे... दुसर्‍यांदा रात्री गेले असा गेस्ट हाऊसमधील सदस्यांचा जबाबही आहे.. पण तसे ते जाताना इतर कुणाला दिसले नाहीत.. त्यांनी रात्री तेथे जाऊन कोणतीही पूजा केली असावी असे चिन्ह तपासात दिसले नाही.. एवढे सगळे करूनही आपण मान्य केले की गेस्ट हाऊसवरील कुणी आपटे आजोबांचा खून केला तर निश्चीत कुणी केला म्हणे?? काय कारण खुनाचे?? आपणच त्यांना चाळीस हजार द्यायचे आणि आपणच पुन्हा खून करायचा असे कुणी करेल का? बरं केला तर केला, नदीपाशी पहाटेच का म्हणे केला? आपटे आजोबांकडून ती चिठ्ठी लिहून घेताना आजोबांनी बोंब कशी काय नाही मारली?? ते गेस्ट हाऊसवर गेलेले असतानाच त्यांना का नाही मारले?? संशयाच्या सुईचे टोक गेस्ट हाऊसवर आहेच.. पण खरे तर प्रकार असा आहे की हे गुन्हे मानवी आहेत आणि ते कुणीही केलेले असू शकतात.. मला सांगा... भूताला जर आपटे आजोबांना मारायचे असेल तर ते त्यांच्या राहत्या घरातच नाही का मारणार? गेस्ट हाऊसमध्ये आजोबा आले तरी नाही मारले, अगदी त्यांच्या घरी जाऊन भुताने स्वत:च चिठ्ठीही लिहीली, आणि वर पुन्हा पहाटेच्या रामप्रहरापर्यत न घाबरता थांबून त्यांना नदीच्या काठी जाळले.. भूत इतके योजनापुर्वक खून करेल का??

माझ्या बांधवांनो.. सरकार तुमच्या पाठीशी आहे.. गावात घडत असलेली कोणतीही क्षुल्लक घटना आम्हाला जरूर कळवा... आज पासून दिवे आणि सावेळे गावात मिळून आम्ही पन्नास पोलिसांचे एक दल ठेवत आहोत सुरक्षेसाठी.. आणि चौकशी सगळ्यांचीच होणार आहे... गेस्ट हाऊसचीही! मात्र कृपया भूत वगैरे अफवा पसरवून गुन्हेगारांची मदत करू नका.. आमचे सहाय्य करा..

आणि एवढे करून भूत दिसलेच तर त्याला सांगा अडसुळ साहेबांनी चहा घ्यायला बोलावलंय म्हणाव"

शेवटच्या वाक्यातून खसखस पिकवून अडसुळसाहेबांनी ग्रामस्थांचा ताण काहीसा कमी केला. त्याचबरोबर त्यांनी धीरही दिलाच होता त्यांना! लोक पांगत नसले तरी आता विखरू लागले.

आणि आलेल्या अधिकार्‍यांपैकी एक टोळके तपासासाठी गेस्ट हाऊसकडे निघाले...

==========================================

गेस्ट हाऊसवर सगळ्यांचा निर्णय झालेलाच होता.

वास्तू बाधीत आहे. दोन ते तीन दिवसांपासूनच काही अगम्य प्रकार घडत आहेत. नमाचे येणे हे त्यामागचे कारण असेल की काय यावर विचार करणे आपल्या क्षमतेत नाही. अजित आता बाधलेला आहे हे सरळ दिसत आहे. त्याच्यासाठी डॉक्टर बोलावणे याला काही अर्थ नाही. तो त्या पलीकडचा आहे.

तेव्हा आपण आपले येथून निघायचे.

मावशींनी तर हे ठरवले होते की आहे तसे गेस्ट हाऊसवर पाणी सोडायचे. पाहिजे कशाला असली वास्तू? आपण इतकी वर्षे जगणारच नाही असे सांगणारे आपटे आजोबा स्वतःच गेले. कशावरही आपले नियंत्रण नाही. अर्चनाला काहीही भयानक गोष्टी दिसल्या. आपटे आजोबांची पूजा आणि अजितचे रूप म्हणजे आणखीनच भयंकर!

त्यामुळेच आत्ता सतीश आणि अर्चनाने सगळे सामान पॅक केलेले होते. संध्याकाळचे सादे सहा झालेले होते. संधीप्रकाश पसरलेला होता. मनू तिथून जायचे म्हणून रडत होता ओक्साबोक्शी! नमाला वाईट वाटत होते. नॅचरली! ती आली अन हे प्रकार सुरू झाले असे कनेक्शन लावणे सहज होते कुणाहीसाठी! मावशींच्या डोळ्यांची धार मात्र थांबत नव्हती. सतीश आणि अर्चना त्यांना धीर देत होते. सतीशला दिव्यातच एक जागा माहीत होती तेथे तो जाणार होता. तेथे दोन खोल्या होत्या आणि घरमालक म्हणजे एक वृद्ध गृहस्थ होते ज्यांचा भूताखेतावर विश्वासच नव्हता. त्यांनी सतीशला जागा द्यायला मान्यता दिली होती. नमा तर सरळ नाशिकलाच निघून जाणार होती. मावशी स्वतःही नाशिकलाच जाणार होत्या. पण त्यांना तिकडे तरी कुणाकडे जायचे असाच प्रश्न छळत होता. म्हणून त्या प्रयत्न करत होत्या की दिव्यात किंवा सावेळ्यात काही सोय होते का याची! त्यामुळे अर्चनाने विचारले होते त्यांना की दुसरी जागा मिळेपर्यंत आमच्याबरोबर राहता का म्हणून! पण आजवर ज्यांच्याकडून भाडे घेऊन स्वतःच्या घरात मालकाप्रमाणे राहिलो त्यांच्याकडे आता काहीसे आश्रितासारखे राहणे मावशींना अयोग्य वाटत होते. तसेच, त्या काही गरीब वगैरे नव्हत्या. प्रश्न फक्त नि:संशयपणे मावशींवर विश्वास ठेवून त्यांना जागा देऊ करणारा मिळण्याचाच होता. एकदा असा माणूस मिळाला की मावशी सरळ तेथे शिफ्ट होणार होत्या. पण संशयाच्या गर्तेत सापडलेल्या गेस्ट हाऊसची मालकीण या परिचयामुळे मावशींना अनेक चौकश्या करूनही निराशाच पदरी पडत होती.

आणि तपासणी चालू आहे या कारणासाठी सगळे स्थानबद्ध झाल्याप्रमाणे झाले. बोळात सगळेच बसून होते. शासकीय अधिकार्‍यांनी आणि पोलिसांनि परवानगि दिल्याशिवाय दिवे गाव सोडता येणार नव्हते आता! कुणीही केव्हाही तपासणीसाठी आणि चौकशीसाठी येऊन जात होते. त्यांच्या सतराशे साठ प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत होती. त्यांचे प्रश्न आणि उत्तरे ऐकून केलेले रिमार्क्स बोचरे, अपमानकारक आणि झापणारे होते. त्याचा आणखीनच मनस्ताप होत होता. आणि हेच सगळे होत असताना अजित कामत मात्र स्वतःच्या खोलीतून बाहेरही येत नव्हता. कुणालाही हे समजत नव्हते की'या खोलीत आणखीन एक जण राहतो' असे आलेल्या प्रत्येक चौकशी अधिकार्‍याला सांगितले तरी तो त्या खोलीकडे लक्षच कसा काय देत नव्हता??

अजितबाबत प्रत्येकाच्याच मनात संमिश्र भावना होत्या. तो झपाटलेला आहे हे कळतच होतं! आपटे आजोबांची पूजा त्यानेच उधळून लावलेली असणार हे मनोमन पटू लागलेलं होतं! मात्र झुंबर, बाजी आणि रामोशी यांना त्याने का झापावे हे काही समजत नव्हते. तो आपल्या भल्यासाठी कार्यरत आहे की वाईटासाठी यावर निर्णय करणे अवघड असल्यामुळे तो वाईटच असणार हे गृहीत प्रत्येकाने धरलेले होते. आणि आश्चर्य म्हणजे अजित कामत गेले सहा तास खोलीच्या बाहेरच आलेला नव्हता.

आणि अडसुळ आणि कंपनी, म्हणजे आणखीन दोन अधिकारी गेस्ट हाऊसच्या दारात आले. त्यांना पाहून सतीश आणि मावशी उठून उभ्या राहिल्या. तमाम गावाला 'गेस्ट हाऊसमध्ये भूत नाही आहे' हे पटवून देणारा अडसुळ आणि ते दोन अधिकारी प्रत्यक्षात येथले एक घोट पाणीही प्यायला तयार नव्हते.

अडसुळ - बसा बसा बसा... मी अडसुळ.. हे लोहार आणि हे आमचे मानेसाहेब.. हेच तपासणी करणार आहेत.. हे प्रमुख आहेत... यांच्या प्रत्येक प्रश्नाला खरे खरे उत्तर द्या.. तुम्हाला होत असलेला त्रास आणि मनस्ताप या दोन्हींची आम्हाला कल्पना आहे.. मात्र कायद्यानुसार कर्तव्य करावेच लागणार आहे आम्हाला.. तेव्हा... आता मानेसाहेब विचारतील त्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर द्या.. आधी परिचय द्या आपापला..

सतीशने सर्वांच्या वतीने प्रत्येकाची ओळख करून दिली.

माने - अजून कोण कोण आहे इथे??

सतीश - अजित कामत म्हणून एक आहे.. या खोलीत आहे..

माने - त्यांना बाहेर बोलवा??

सतीश - ते येतच नाही आहेत बाहेर.... खरे तर.. आम्हाला जरा.. म्हणजे.. आता मित्रच आहे माझा तो.. पण.. आम्हाला सगळ्यांनाच ती शंका येतीय..

माने - बोला बोला...

सतीश - की.. त्यालाच काहीतरी .. म्हणजे झालंय.. असं.. झपाटल्यासारखं..

माने - पहिलं म्हणजे भूत ही गोष्ट मनातून काढून टाका.. बोलवा त्याला बाहेर... मारा हाक..

सतीशने अजितला हाका मारायला सुरुवात केली. खरे तर गेस्ट हाऊसवर राहणार्‍या प्रत्येकाला असेच वाटत होते की अजितने दार उघडूच नये. कारण त्याचे कसे दर्शन होईल याचीच धास्ती वाटत होती. त्यापेक्षा तो न दिसलेलाच बरा असे ते मानत होते.

जवळपास पाच सहा हाका झाल्या तशा मग अडसुळ आणि लोहार यांनीही हाका मारायला सुरुवात केली. त्यातच प्रमुख दाराबाहेर काही माणसांचा घोळका नुसताच कुतुहलाने जमलेला सगळ्यांना दिसला तसे सतीशने जाऊन दार आतून बंद करून घेतले.

माने मात्र कूल होते. त्यांना अजितची काही भीती नव्हतीच, उलट या ग्रूपमधील सर्वात महत्वाची व्यक्ती ते असल्यामुळे ते त्याच नशेत होते.

ते इकडे तिकडे बघत मावशींना गेस्ट हाऊस बद्दल विचारत होते. जागा कुणाची, कधी बांधले, वगैरे!

लोहारने आता अजितच्या दारावर आवाज करायला सुरुवात केली. पाठोपाठ हाकाही! सतीश आणि मावशींना खूप बरे वाटत होते की काही अधिकार्‍यांच्या देखरेखीत अजितला बाहेर यावेच लागणार आहे आणि एकदाचे सगळ्यांना हे समजणार आहे की गेस्ट हाऊसवर काहीच प्रॉब्लेम नसून अजित हा एकमेव प्रॉब्लेम आहे.

आणि त्याच वेळेस ते घडले.

लोहार आणि सतीश अजितच्या दारावर थापा मारून त्याच्या नावाने हाका मारतायत! अर्चना आणि नमा दहशत पसरल्याप्रमाणे घाबरून बसल्यायत! मावशी हादरून पण कुतुहलाने अजितच्या दाराकडे बघतायत! आणि अडसुळ एकदा अजितच्या दाराकडे आणि एकदा मानेसाहेबांकडे! त्याचवेळेस वातावरणातील ताण कमी करण्यासाठी खेळत असलेल्या आणि पाठमोर्‍या मनूला मानेसाहेबांनी हाक मारली..

"काय रे बाळ.. नांव काय तुझं?? गोळी हवी???"

आणि जे घडले ते पाहून खाली जमीनीवर बसलेले माने ताडकन उठून उभे राहिले... डोळे फाडून ते बघत होते... त्यांच्या त्या अचानक घाबरण्याच्या अ‍ॅक्शनने सगळ्याच बायका किंचाळत उभ्या राहिल्या.. बाकीच्यांना काय झालेले होते ते माहीतच नव्हते... पण ज्या अर्थी माने घाबरले त्या अर्थी तसेच काहीतरी असणार इतके कळत होते... आणि अडसुळही उभा राहून मानेंकडे धक्का बसून पाहात होता... सतीश आणि लोहारला तर मानेंकडे बघायलाही कसेसेच वाटत होते...

कारण... उभे राहिलेल्या मानेंची तपकीरी ट्राऊझर.. चक्क... ओली होताना सगळ्यांनाच दिसत होती...

काय बघितले होते मानेंनी????

मनूला त्यांनी प्रश्न विचारला तेव्हाही सगळ्यांचेच लक्ष अजितच्याच दाराकडे होते...

फक्त... मनू मात्र मानेंना पाठमोरा होता... आणि 'माझे नांव मनू आहे' हे सांगायला.... त्याला वळावे लागलेच नव्हते...

१८० डिग्रीजमध्ये मान फिरवून त्याने मानेंकडे पाहिले होते... मात्र... तो चेहरा त्याचा नव्हता... मनूचा चेहराच नव्हता तो.. तो चेहरा होता...

... स्वतः मानेंचाच... !!!!!!!

दोन्ही हात पोटाखाली दाबत माने लिटरली बोळातून दार उघडून पळत दाराच्या बाहेर पडले...

आणि पाठोपाठ घामाने नखशिखांत भिजलेले लोहार आणि अडसुळही! बाहेरच्या जमावाचे एकत्रित मन ढवळले गेले.. अक्षरशः ढवळले गेले...

बाहेर प्रचंड धावाधाव झाली.. सतीश आणि अर्चनाही धावत दारापर्यंत पोचलेले होते... पण तेवढ्यात पळता पळता एकाने मागे पाहात एक मोठा दगड त्यांच्या दिशेने भिरकावला..

आणि गेस्ट हाऊसवरच्या एक अन एक व्यक्तीच्या लक्षात आले...

.... हे गेस्ट हाऊस सोडून जाणे कदापीही शक्य नाही..... इट्स ओव्हर..

यातून बाहेर पडणे नाही...

मुळात मानेंना दिसले काय हेच कुणाला माहीत नव्हते.. त्यामुळे दहशत वाटून पुन्हा बोळात घाबरून कसेबसे बसलेल्या या सगळ्यांना ही कल्पना नव्हती... की केवळ पंधराव्या मिनिटाला माने, अडसुळ आणि लोहार हे आल्या गाडीतून नाशिकच्या रस्त्याला लागलेले होते...

मनू मात्र हसत हसत मावशींना म्हणत होता...

"आज्जी.. त्या काकांना शू झाली ना गं???"

त्याला थोपटताना अर्चनाला कल्पनाच नव्हती की... तिच्या हातात तिचे जे बाळ आहे त्याने मगाशी काय भयंकर प्रताप केला आहे...

दिवे गावात आता स्पष्ट प्रतिक्रिया दिली जात होती... गेस्ट हाऊसवर हल्लाही करायचा नाही... मात्र त्यातल्या कुणालाही बाहेर पायही टाकून द्यायचा नाही.. आतल्या आत ते सगळे मेले तरी चालेल.. अगदी ते लहान मूलही... आणि कोणत्याही सरकारी अधिकार्‍यावर विश्वास ठेवायचा नाही... गेस्ट हाऊसच्या आजूबाजूला फिरकायचेही नाही..

आणि त्याच क्षणी... ते झाले... प्रत्येकाला जाणवले... अगदी मनूलाही... तो क्षणातच आईला बिलगला..

कुत्रे रडावे तसा अभद्र आवाज ऐकू आला... त्यानंतरच लगेच एखाद्या बाईने संसार भरात आलेला असताना नवरा मेल्यावर आक्रोश करेल तसा आक्रोश करावा असा आवाज...

एक थंड हवेची लहर... जवळून कुणीतरी चक्क जीवाच्या भीतीने धावत गेल्याची जाणीव... त्या व्यक्तीचा वाराही अंगावरून गेल्यासारखी जाणीव... त्या व्यक्तीचा बोबडी वळलेला आणि जीवाची भीती असलेला आवाज..

एक जीवघेणा वार होणार आहे हे जाणवल्यानंतर माणूस ओरडावा तशी एक किंकाळी... संधीप्रकाशाची तीव्रता कमी कमी होत जाणारी... गावातून येणारे खरे आवाज आता ऐकू येत नव्हते.... मधेच आपटे आजोबांचा क्षीण होत जाणारा करूण आवाज... "अरे वाचवा रे... जाळतायत... जाळतायत मलाSSSSS...".. मधेच अर्चनाच्याच आवाजात मावशींना दिलेली जोरदार हाक... "मावशीSSSSSSS.. माळ्यावरून हात चाललाय... तुटकाSSSSSS"... ती हाक विरतीय तोवरच... अर्चनाला हाताची भीती वाटल्याचा अघोरी आणि अभद्र आनंद वाटल्याप्रमाणे एक शिसारी येईल असे क्रूर हास्य... अगदी खदखदून... त्यातच कुणाच्यातरी पोटात कुणीतरी एखादे धारदार पाते खुपसावे असा सप्प... खस्स असा आवाज.. एक घुसमटलेली किंकाळी.... जणू ते दृष्य पाहणार्‍या एका स्त्रीने भिंतीवर डोके आपटत हंबरडा फोडावा तसा आवाज.. आता दिसत काहीच नव्हते.... कुणालाच.. अचानक लांबून खूप गावकर्‍यांचे किंकाळ्या आणि आरोळ्या फोडत जवळ येणारे आवाज... त्यात हल्ला करण्याचा हेतू स्पष्ट होत असलेला... "आलं... आलं" असे जीवाच्या आकांताने ओरडत कुणीतरी खूप पळापळ करतंय... त्यातच सतीशच्याच आवाजातील एक भयानक किंकाळी.. प्रेतयात्रा चालली असावी तसा अतिशय गंभीर आवाज पावलांचा... अचानक आजूबाजूने अनेकांचे हासण्याचे भयंकर आवाज... कुणालातरी फरफटवलं जातंय याचा नाद...

खाSSSSSSड!

खाडकन अजितचे दार उघडले... दारात अत्यंत मलूलपणे तो उभा होता... कसेबसेच त्याने इतक्या बळाने दार उघडलेले असावे....

कारण तो तसाच खाली पडला.. उन्मळून पडल्याप्रमाणे..

आता कुणालाच कसल्याच जाणीव होत नव्हत्या... कारण केवळ आणि केवळ अजित दिसत होता...

कसाबसा धीर धरून सतीशने त्याही परिस्थितीत खाली पडलेल्या अजितपासून दोन पावले मागेच सरकत भीतीने काळा ठिक्कर पडलेल्या चेहर्‍याने अजितला विचारले...

"दार... का उघड.. त नव्हतास... रे???"

जमीनीवर खाली पडलेल्या अजितने कसेबसे वर बघितले.. सगळ्यांकडेच क्षण क्षण बघून शेवटी त्याची नजर सतीशवर स्थिरावली... आणि कधीच न ऐकलेल्या आवाजात एक विचित्र अभद्र स्मितहास्य ओठांवर ठेवत अजित म्हणाला...

"सहन.. सहनच होत नव्हता मला तो... शेवटी... कसाबसा खलास केला त्याला मी... "

गेले चार दिवस जे काही चाललेले होते त्यानंतर हे वाक्य अजिबातच धक्कादायक नसले तरीही त्या अंधारलेल्या वातावरणात त्या विचित्र आवाजातले आणि अभद्र हसून कसेबसे उच्चारलेले ते वाक्य प्रत्येकालच मनातून खरे तर कोलमडवूनच गेले... पण.. तरीही सतीशने पूर्ण हबकलेल्या चेहर्‍याने विचारले..

"कु... णाला???"

अजितची खाली घरंगळलेली मान पुन्हा वर झाली... त्यावर मगाचपेक्षाही भयंकर हास्य होते... डोळ्यांमध्ये प्रेतासारखी निर्जीवता होती... आणि त्याने ज्याला खलास केले त्याचे नांव उच्चारले...

"अजित.... अजित कामत"

गुलमोहर: 

कथेला नवीनच कलाटणी.......
बेफिकीरजी, प्रसंग छान उभे केले आहेत.

फेन्टेस्टिक! उत्तम जम बसलाय कथेचा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत! अक्षरश: अधाशासारखा फडशा पडतो प्रत्येक भागाचा - मग एकदा असे वाचून झाल्यावर दोन तीनदा सावकाश भाग वाचायचा. मामीची आजची कथा "बन्टीचे आई बाबा" अगदीच नि:शब्द करणारी असली तरी ह्या कथेच्या पुढच्या भागेच्या प्रतीक्षेत दिवसातून दहादा तरी फेरी मायबोलीवर होतेच.

अमी

एक जीवघेणा वार होणार आहे हे जाणवल्यानंतर माणूस ओरडावा तशी एक किंकाळी... संधीप्रकाशाची तीव्रता कमी कमी होत जाणारी... गावातून येणारे खरे आवाज आता ऐकू येत नव्हते.... मधेच आपटे आजोबांचा क्षीण होत जाणारा करूण आवाज... "अरे वाचवा रे... जाळतायत... जाळतायत मलाSSSSS...".. मधेच अर्चनाच्याच आवाजात मावशींना दिलेली जोरदार हाक... "मावशीSSSSSSS.. माळ्यावरून हात चाललाय... तुटकाSSSSSS"... ती हाक विरतीय तोवरच... अर्चनाला हाताची भीती वाटल्याचा अघोरी आणि अभद्र आनंद वाटल्याप्रमाणे एक शिसारी येईल असे क्रूर हास्य... अगदी खदखदून... त्यातच कुणाच्यातरी पोटात कुणीतरी एखादे धारदार पाते खुपसावे असा सप्प... खस्स असा आवाज.. एक घुसमटलेली किंकाळी.... जणू ते दृष्य पाहणार्‍या एका स्त्रीने भिंतीवर डोके आपटत हंबरडा फोडावा तसा आवाज.. आता दिसत काहीच नव्हते.... कुणालाच.. अचानक लांबून खूप गावकर्‍यांचे किंकाळ्या आणि आरोळ्या फोडत जवळ येणारे आवाज... त्यात हल्ला करण्याचा हेतू स्पष्ट होत असलेला... "आलं... आलं" असे जीवाच्या आकांताने ओरडत कुणीतरी खूप पळापळ करतंय... त्यातच सतीशच्याच आवाजातील एक भयानक किंकाळी.. प्रेतयात्रा चालली असावी तसा अतिशय गंभीर आवाज पावलांचा... अचानक आजूबाजूने अनेकांचे हासण्याचे भयंकर आवाज... कुणालातरी फरफटवलं जातंय याचा नाद... >>>> अत्यंत 'किळसवाणी' आणि '७ जन्म अभद्र' अशी स्मशानी वातावरण निर्मिति करण्यात १००% यश आले आहे भुषणराव. positivo1.gif

धन्यवाद!*

बेफिकीरजी मी आपल्या लिखाणाचा दिवाणाच झालो आहे... Happy

इथ पर्यंत की, या कादंबरीने येथे प्रतिसादासाठी खाते उघड्ण्यास 'प्रवृत्त' झालो.

छान चालली आहे.

बेफिकीरजी मी आपल्या लिखाणाचा दिवाणाच झालो आहे...

इथ पर्यंत की, या कादंबरीने येथे प्रतिसादासाठी खाते उघड्ण्यास 'प्रवृत्त' झालो.

छान चालली आहे.
... खरच मी ही त्यासाठीच खाते उघडलेय.--unbeleivably creative and best writing.. don't have words to express .. Bravo!!!!!

तुमचि हि कथा खुपच वेगवान व मस्त चालु आहे.
बेफिकीरजी मी आपल्या लिखाणाचा दिवाणाच झालो आहे.. तो तुमच्या सोलापुर पासुन......
पु.ले. शु.

एकच नंबर.................................................
नविन भाग लवकर येउ देत.

बेफिकीरजी मी आपल्या लिखाणाचा दिवाणाच झालो आहे...

इथ पर्यंत की, या कादंबरीने येथे प्रतिसादासाठी खाते उघड्ण्यास 'प्रवृत्त' झालो.

>> अगदी , एरवी रोमातुन वाचनारे आमच्या सारखे किती तरी असतील. मि फक्त अपल्या लिखानामुळे मायबोली ची reguler वाचक झाले. असेच लिहित रहा...

सावट - व्यसन लागल. रोज थोड्या थोड्या वेळाने येउन पहातेय, नवीन भाग आला का ?

नविन भाग लवकर येउ देत.

सर्व प्रेमळ प्रोत्साहकांचा आभारी आहे.

इन्द्रधनु | - धन्यवाद! हा भाग आवडला का?

सावरी | अनेक धन्यवाद!

DeepSea | - प्रोत्साहनाबद्दल खूप आभार!

svalekar | - थॅन्क्स !

गुगु | - आभारी आहे, प्रोत्साहन असेच ठेवावेत.

पल्लवी८६ | - धन्यवाद, होय, अजित कामत मेला ही कलाटणी आहेच! पण ती एकदमच सुचली.

मित | - लहानच भाग होता मित, जमेल तसे लिहीत आहे. आभार आपले!

rrs | - धन्यवाद आर आर एस राव!

सुरश | - खरी दोषी व्यक्ती वेगळीच आहे सुरश! बहुतेक आठव्या भागात लिहीन त्याबाबत! धन्यवाद!

peacelily2025 | - कसचं कसचं! आभारी आहे.

चातक |
एक जीवघेणा वार होणार आहे हे जाणवल्यानंतर माणूस ओरडावा तशी एक किंकाळी... संधीप्रकाशाची तीव्रता कमी कमी होत जाणारी... गावातून येणारे खरे आवाज आता ऐकू येत नव्हते.... मधेच आपटे आजोबांचा क्षीण होत जाणारा करूण आवाज... "अरे वाचवा रे... जाळतायत... जाळतायत मलाSSSSS...".. मधेच अर्चनाच्याच आवाजात मावशींना दिलेली जोरदार हाक... "मावशीSSSSSSS.. माळ्यावरून हात चाललाय... तुटकाSSSSSS"... ती हाक विरतीय तोवरच... अर्चनाला हाताची भीती वाटल्याचा अघोरी आणि अभद्र आनंद वाटल्याप्रमाणे एक शिसारी येईल असे क्रूर हास्य... अगदी खदखदून... त्यातच कुणाच्यातरी पोटात कुणीतरी एखादे धारदार पाते खुपसावे असा सप्प... खस्स असा आवाज.. एक घुसमटलेली किंकाळी.... जणू ते दृष्य पाहणार्‍या एका स्त्रीने भिंतीवर डोके आपटत हंबरडा फोडावा तसा आवाज.. आता दिसत काहीच नव्हते.... कुणालाच.. अचानक लांबून खूप गावकर्‍यांचे किंकाळ्या आणि आरोळ्या फोडत जवळ येणारे आवाज... त्यात हल्ला करण्याचा हेतू स्पष्ट होत असलेला... "आलं... आलं" असे जीवाच्या आकांताने ओरडत कुणीतरी खूप पळापळ करतंय... त्यातच सतीशच्याच आवाजातील एक भयानक किंकाळी.. प्रेतयात्रा चालली असावी तसा अतिशय गंभीर आवाज पावलांचा... अचानक आजूबाजूने अनेकांचे हासण्याचे भयंकर आवाज... कुणालातरी फरफटवलं जातंय याचा नाद... >>>> अत्यंत 'किळसवाणी' आणि '७ जन्म अभद्र' अशी स्मशानी वातावरण निर्मिति करण्यात १००% यश आले आहे भुषणराव.

धन्यवाद!*>>>

काही वेळा मी आपल्याच प्रतिसादासाठि लिहितो असे मलाच वाटत असते. आभारी आहे.

सानी !
मस्त!!!! भन्नाट!!! चाबुक!!!!!!!!!!! >> धन्यवाद!

सुरवंट | 16 May, 2011 - 10:31
बेफिकीरजी मी आपल्या लिखाणाचा दिवाणाच झालो आहे...

इथ पर्यंत की, या कादंबरीने येथे प्रतिसादासाठी खाते उघड्ण्यास 'प्रवृत्त' झालो.

छान चालली आहे.>> खूप आभार, मी जुना नाही तरीही स्वागत! उगाच लाजवू नयेत अशी विनंती!

रीना |
नाद खुला बेफिकिर्जी.....>>> Happy आभारी आहे.

chanchal |
सही चालु आहे. नविन भाग लवकर येउ देत.>> आज दिल्लीहून साहेब आल्यामुळे आज लिहिता आला नाही भाग! मनापासून आभार आपले!

सावज |

... खरच मी ही त्यासाठीच खाते उघडलेय.--unbeleivably creative and best writing.. don't have words to express .. Bravo!!!!!>>> प्रोत्साहनासाठी अनेक आभार सावजजी!

महेश मते |
तुमचि हि कथा खुपच वेगवान व मस्त चालु आहे.
बेफिकीरजी मी आपल्या लिखाणाचा दिवाणाच झालो आहे.. तो तुमच्या सोलापुर पासुन......
पु.ले. शु.>>> खूप आभारी आहे महेशराव!

वर्षू नील |
आला..आला..सहावा भाग आला
(भीतीमुळे >)खिळवून ठेवणारं कथानक!!!>>> Happy धन्यवाद वर्षू!

तृष्णा |
आज सातवा झक्कास भागाच्या अपेक्षेत आहे.............?
पुर्ण करणार ना ?>> आज नाही लिहिता येणार तृष्णा, तरी प्रयत्न करतच आहे, पण उशीर व्हावा. धन्यवाद!

राजनंदिनि |
एकच नंबर.................................................
नविन भाग लवकर येउ देत.>> धन्यवाद राजनंदिनि!

vminal |
सातवा भाग आज पुर्ण करणार ना ?>>> बहुतेक! धन्यवाद!

रोहित ..एक मावळा |
मस्तच ... ज्याम भारी>> रोहितराव, तुमचा प्रतिसाद आल्याशिवाय काही बरे वाटत नाही.

खूप आभारी आहे.

स्मित_ | 17 May, 2011 - 06:47 नवीन

अगदी , एरवी रोमातुन वाचनारे आमच्या सारखे किती तरी असतील. मि फक्त अपल्या लिखानामुळे मायबोली ची reguler वाचक झाले. असेच लिहित रहा...

सावट - व्यसन लागल. रोज थोड्या थोड्या वेळाने येउन पहातेय, नवीन भाग आला का ?

नविन भाग लवकर येउ देत.>>> नक्कीच स्मित! Happy आपल्या प्रतिसादाने बळ मिळाले. बाकी माझे लेखन काही इतके गौरवशाली असते असे नाही, पण माणूस बहुधा जेव्हा स्वतःच्या लेखनात बुडतो तेव्हा ते इतरांना वाचावेसे वाटत असावे.

सर्वांचा आभारी आहे.

-'बेफिकीर'!

Pages