ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध

Submitted by sudhirkale42 on 11 May, 2011 - 06:19

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध
१ मे २०११ रोजी (आपल्या २ मे रोजी) अखेरीस ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण या घटनेमुळे पाकिस्तानच्या अमेरिकेबरोबरच्या दगाबाज वागणुकीवरील, अविश्वासार्हतेवरील (खोट्या-खोट्या) रहस्यावरचा ’बुरखा’ शेवटी उचलला गेला ही एक चांगली घटना घडली!

मागे एका लेखात लिहिल्याप्रमाणे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच परस्पर-विश्वासाच्या किंवा परस्परांबद्दलच्या आदरभावनेच्या पायावर कधीच आधारलेले नव्हते. तर तो फक्त 'सोयीसाठी लावलेला म्होतूर'च होता! पाकिस्तानी दुतोंडीपणा केवळ अमेरिका किंवा भारताबरोबरच्या संबंधाबाबतच होता असे नाहीं तर तो त्यांच्या स्वतःच्या प्रजेबरोबरच्या बाबतीतही होता. याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे पाकच्या पंतप्रधान युसुफ राजा गिलानींचे ’ड्रोन’ विमानांच्या वझीरिस्तानमधील हल्ल्यांबाबतचे अलीकडील विधान. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत सभासदांनी उठवलेल्या गदारोळाला उत्तर देताना त्यांनी 'आम्ही अमेरिकेला हे हल्ले बंद करायला ठणकावून सांगितले आहे' असे विधान केले पण दुसर्‍या बाजूला अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना व मुत्सद्द्यांना सांगितले कीं ती फक्त 'बोलाचीच कढी' असून प्रत्यक्षात ते अशी बंदी घालणार नाहींत व द्रोणाचार्यांचे (’ड्रोन’ला मी तर ’द्रोणाचार्य’च म्हणतो) हल्ले त्यांनी चालूच ठेवावे.

पाकिस्तानचा हा दुटप्पीपणा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकात लेखकद्वय लेव्ही आणि स्कॉट-क्लार्क यांनी याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. (हे पुस्तक प्रत्येक अमेरिकन, पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकाने जरूर वाचावे.) अगदी अयूब खान हे राष्ट्राध्यक्ष आणि जुल्फिकार अली भुत्तो परराष्ट्रमंत्री असताना (ते पुढे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षही झाले) पाकिस्तानने अमेरिकेची दोस्ती चालू असतानाच चीनशीही चुंबा-चुंबी चालू केली होती. पाकिस्तानने त्यावेळी सीटो (SEATO) आणि सेंटो (CENTO) या लष्करी संघटनांचे सभासदत्व स्वीकारलेले होते. असे असूनही अमेरिकेची पाकिस्तानशी असलेली मैत्री ’जिवश्च-कंठश्च’ कधीच नव्हती. त्याचे कारणही पाकच्या दुटप्पीपणाबद्दल अमेरिकेला असलेला संशय हेच होते. भारताने सुरुवातीपासूनच कुणाच्याही लष्करी संघटनेचे सभासदत्व न घ्यायचे ठरविलेले होते-ना अमेरिकेचे व ना सोवियेत संघराज्याचे. त्यामुळे भारताबरोबरच्या संबंधाबाबत अमेरिका नेहमीच बुचकळ्यात पडलेली असायची.कारण भारत धड त्यांच्या कळपातही जात नव्हता आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याइतका नगण्यही नव्हता! याचा परिणाम अमेरिकेच्या पाकिस्तानच्या मैत्रीवर होणे स्वाभाविकच होते व तसेच झाले. भारताविरुद्धच्या युद्धात वापरण्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे व दारूगोळा मिळविण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेशी मैत्री हवी होती. पण अमेरिका पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक मदत देत होती ती साम्यवादींशी (communism शी) लढण्यासाठी. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे भारताविरुद्ध वापरायला अमेरिकेची बंदी असायची. अशा तर्‍हेने या मैत्रीत सुरुवातीपासूनच दोघांची तोंडे दोन दिशांना होती! आणि काळाबरोबर या दोन देशांमधील तणाव वाढतच गेला होता.

१९७१ सालचा बांगलादेशच्या निर्मितीच्या युद्धातील शर्मनाक पराभव पाकिस्तानला जिव्हारी लागला होता. आणि या युद्धात झालेल्या पराभवाबद्दल पाकिस्तानने अमेरिकेला योग्य वेळी मदत न केल्यावरून जबाबदार धरले. (तसे पहाता या युद्धात चीननेही पाकिस्तानला मदत केली नव्हती.) इंदिराजींच्या नेतृत्वाखाली भारताने हे युद्ध इतक्या झटपट आणि निर्णायपणे संपविले कीं कुणालाही विचार किंवा कृती करायला वेळच मिळाला नाहीं. पण या पराभवामुळे अमेरिका व पाकिस्तान यांच्यातल्या मैत्रीत एक पाचर ठोकली गेली व ती पाचर आजही या दोन देशांतील संबंधांना एका ठरावीक पातळीपेक्षा जास्त जवळ येऊ देत नाहीं!

भारताने १९७४ साली "पोखरण-१"ची अण्वस्त्रचांचणी केली त्यामुळे पाकिस्तानला-व विशेषत: भुत्तोंना-धक्काच बसला! त्यांनी लगेच अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतीय अण्वस्त्रांपासून संरक्षण मिळावे अशी गळ घातली. पण आपल्या शत्रुत्वाला भिऊन म्हणा किंवा आपल्याशी त्यावेळी शत्रुत्व पत्करायची अमेरिकेची तयारी नव्हती म्हणून् म्हणा, पण अमेरिकेने पाकिस्तानची ही विनंती मान्य केली नाहीं. हेन्री किसिंजर यांनी "भारताने अण्वस्त्र चांचणी केली ही वस्तुस्थिती पाकिस्तानने "fait accompli" म्हणून स्वीकारावी असा मानभावी सल्ला दिला. त्यावर भुत्तोंनी सांगितले कीं भारताने अणूबॉम्ब बनविला तर आम्ही (पाकिस्तानी जनता) पाने-गवत खाऊ, भुकेले राहू पण आम्हीही आमचा अणूबाँब बनवूच. आमच्यापुढे दुसरा कुठलाही पर्यायच नाहीं. भारताच्या अण्वस्त्राला आमचेही अण्वस्त्रानेच उत्तर असेल" ("If India builds the bomb, we will eat grass or leaves, even go hungry, but we will get one of our own. We have no alternative ... atom bomb for atom bomb.") यापुढे अमेरिकेवर विसंबणे बरोबर नाहीं म्हणून भुत्तोंनी चीनशी दृढ संबंध प्रस्थापित केले आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीत चीनचा सहभाग मोठाच होता! डॉ. खान यांनी विघटनशील अतिशुद्धीकृत युरेनियम युरोप व अमेरिकेच्या सहाय्याने बनविण्यात यश मिळविले असले तरी अणूबॉम्बची संरचना (design) त्यांना चीनकडूनच मिळाली होती! भुत्तोंनी आपल्या मृत्युपूर्व शेवटच्या निवेदनात म्हटले आहे कीं चीनशी संबंध जोडण्याचे त्यांनी केलेले कार्य त्यांच्या कारकीर्दीतील मोठे कार्य होते!

भुत्तोना फाशी दिल्यावर झियांना सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी वाळीतच टाकले होते, पण सर्वच पाकिस्तानी हुकुमशहा सुदैवी आहेत. ते अतीशय अडचणीत असतांना अशी एकादी घटना घडते कीं या हुकुमशहांना वाळीत टाकणे तर सोडाच पण उलट पाकिस्तानला मस्का लावायची पाळी पाश्चात्यांवर येत आलेली आहे. सोवियेत महासंघाने अफ़गाणिस्तानवर आक्रमण केल्यावर झियांचे ’सुगी’चे दिवस आले. रेगननी पैसा आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानात ओतली आणि रातोरात वाळीत टाकलेले हुकुमशहा झिया हे रेगन यांच्या मांडीला मांडी लावून व्हाईट हाऊसमध्ये पुख्खा झोडून आले. पण दुटप्पीपणा चालू ठेवून झियांनी चीनबरोबरचे पाकिस्तानचे संबंध मात्र वाढवून आणखी दृढ केले. चीनच्या ’संयुक्त राष्ट्र संघटने’तल्या प्रवेशाच्या वेळी पाकिस्तानने तैवान ऐवजी चीनला अमेरिकेच्या मनाविरुद्ध समर्थन देणारी मध्यपूर्वेतील राष्ट्रांची फळी उभारून अमेरिकेविरुद्ध चीनला उघडपणे मोठीच मदत केली होती व ते उपकार चीनने आजपर्यंत लक्षात ठेवले आहेत. याचेच पारितोषिक म्हणून पाकिस्तानच्या अणूबॉम्ब निर्मितीत चीनने खूपच मदत केली.

धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत पुन्हा एकदा वाळीत टाकल्या गेलेल्या मुशर्रफना अल कायदाने केलेल्या ९/११ हल्ल्यानंतर जीवदान मिळाले आणि ते "दहशतवादाविरुद्धच्या युद्धा"चा खंदा पुरस्कर्ता व त्या युद्धातला अमेरिकेचे सच्चा साथीदार आणि बिनीचा शिलेदार म्हणून समजले जाऊ लागले. पण इथेही दुटप्पीपणा चालूच होता. मुशर्रफच्या "कुदेता"नंतरच्या खूपशा अत्युच्च नेमणुकीत अल कायदा व कडव्या इस्लामी लोकांचा सुळसुळाट होता. मुशर्रफ यांच्या काळात अण्वस्त्र तंत्रज्ञानाच्या विक्रीला जणू एकाद्या "मॉल"चे, 'वॉल-मार्ट'चे स्वरूप आले व विक्रीचे काम जोरात सुरू झाले व ते तंत्रज्ञानही इराण, उ. कोरिया, लिबिया व इराक या अमेरिकेच्या कट्टर शत्रूंना देण्यात आले. पण अखेरीस ते अमेरिकेच्या लक्षात आले व त्यांनी जाब विचारताच मुशर्रफने डॉ. खानना 'बळीचा बकरा' बनविले व आपल्या पापांचा कबूली जबाब द्यायला लावले व देशाची माफी मागायला लावली.

ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बर्‍याच प्रमाणात या संबंधांत अंतराय येऊ लागला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच "जगातील सर्वात धोकादायक जागा" असा पाकिस्तानचा उल्लेख ओबामांनी खूप वेळा केला व पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मुशर्रफ यांनी मारले नाहीं तर "अमेरिका आपली फौज पाठवून त्यांना मारेल" असेही वचन दिले होते. (अलीकडेच ओसामांना मारून त्यांनी ते खरेही करून दाखविले.) निवडून आल्यानंतरच्या पहिल्याच १०० दिवसांनंतरच्या वृत्तपत्रपरिषदेतही त्यांना एका वार्ताहाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते कीं पाकिस्तानच्या हातातील अण्वस्त्रे सध्या तरी सुरक्षित असून नजीकच्या भविष्यकाळात पाकिस्तानचे सरकार कोसळून तालीबानचे किंवा अल कायदाचे सरकार राज्यावर बसेल अशी शक्यता अजीबात नाहीं. पण तिथले मुलकी सरकार फारच ठिसूळ (very fragile) असून त्या सरकारकडे शाळा, आरोग्य, कायद्याचे राज्य न्यायसंस्था यासारख्या मूलभूत गरजाही भागविण्याची क्षमता नाहीं म्हणून! (पूर्ण मुलाखत http://blogs.wsj.com/washwire/2009/04/30/transcript-of-obamas-100th-day-... किंवा http://www.huffingtonpost.com/2009/04/29/obama-100-days-press-conf_n_193... या दुव्यांवर वाचता येईल)

ओबामांना सुरुवातीला पाकिस्तानची मदत नाइलाजास्तव चालू ठेवावी लागली असली तरी एक तर्‍हेचे audit करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली होती. (हे audit 'सार्वभौमित्वा'सारख्या 'उदात्त' कारणांसाठी पाकिस्तानला नको होते!) त्याच वेळी ही मदत देत असताना पाकिस्तानला "दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जोर हवा" असा तगादाही ओबामांनी लावला होता. त्यानुसार पाकिस्तानला 'स्वात' खोर्‍यात लष्कर पाठवून मोहीम आखावी लागली त्यात अनेक दहशतवादी (व प्रजाजनही) मारले गेले. पण हा जाच पाकिस्तानला पसंत नव्हता.

पाकिस्तानात पूर आल्यावरही अमेरिकेची मदत भरघोस नव्हती, याबद्दल पाकिस्तानने तक्रार केल्यावर "तुमचे श्रीमंत नागरिक कर देत नाहींत ते आधी वसूल करा" असा दबावही आणला.

ड्रोन हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या एका पाकिस्तानी नातेवाईकाने CIA खटला भरला व त्या बाबत पाकिस्तानातल्या CIA च्या Station Chief चे (जोनाथन बँक्स) नाव पाकिस्तानी अधिकार्‍यांनी गेल्या डिसेंबरमध्ये फोडून एक नवा पेच निर्माण केला व त्यामुळे बँक्सना परत जावे लागले. त्यांच्या जागी आलेल्या नव्या Station Chief चे नावही फोडण्यात आल्याचे वृत्त आहे.

पकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिघडत चालले आहेत. व या देशांच्या गुप्तहेर व लष्करी संघटना कशा दूर जात आहेत व एकमेकांचे कसे वाभाडे काढत आहेत याचे वर्णन करणारा एक सुरेख लेख पाकिस्तानच्या डॉन मध्ये छापून आलेला आहे तो http://tinyurl.com/4ydkwfl या दुव्यावर वाचायला मिळेल. रेमंड डेव्हिस प्रकरणापासून तर हे संबंध आणखीच बिघडले व लगेच ज. कयानींनी अमेरिकेला आपले "सल्लागार" (हेर) २५-४०% टक्के कमी करायला सांगितले आहे.

आता बिन लादेन पाकिस्तानात अगदी राजधानीपासून ५०-६० किमी अंतरावरील एका गढीवजा घरातच सापडला. जगातल्या दहा सर्वोत्कृष्ठ गुप्तहेरखात्यातल्या १ नंबरच्या गुप्तहेरखात्याला आपल्या नाकाखाली काय चालले आहे हे माहीत नव्हते यावर कुणाचाच विश्वास नाहीं. त्यामुळे बिन लादेन हे लष्कर व ISI च्या 'संरक्षणा'खाली त्यांच्याच एका सुरक्षित घरात रहात होता असे आरोप पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांतही होत आहेत! या अविश्वासामुळे ओसामांना ठार करण्याच्या मोहिमेची कांहींच माहिती पाकिस्तान सरकारला अमेरिकेकडून दिली गेली नव्हती. नौदलाच्या "सील"च्या या तुकडीने हेलीकॉप्टर्समधून येऊन ओसामांना ठार केले. ही हेलीकॉप्टर्स पाकिस्तानच्या राडारलाही न दिसता आत आली, चाळीस मिनिटे कार्यरत होती व बिन लादेन यांना व बरोबरच्या इतर कांहीं पुरुषांना ठार करून, स्त्रियांना व मुलांना तसेच सोडून तिथले सर्व दस्तावेज, संगणक, संगणकाच्या हार्ड डिस्क्स, फ्लॅश डिस्क्स वगैरे पुरावेवजा सर्व साहित्य घेऊन परत पाकिस्तानबाहेर गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारला त्याबद्दल सांगण्यात आले. याच्या मिरच्याही सरकार, लषकर व ISI च्या नाकाला चांगल्याच झोंबल्या आहेत!.

पाकिस्तानातील डॉन एक्सप्रेस ट्रिब्यून सारख्या वृत्तपत्रांत खूप टीकात्मक लेख प्रसिद्ध झाले. नुसती संपादकीयच नव्हेत तर अनेक स्तंभलेखकांनीही पाकिस्ता सरकारची आणि लष्कर/ISIचीही रेवडी उडविली आहे. त्यापैकी कांहीं दुवे शेवटी दिलेले आहेत.
आता अमेरिकेचे सांसद उघड-उघड पाकिस्तानची मदत थांबविण्याबद्दल आग्रह धरू लागले आहेत. त्यावर कुरघोडी करण्यासाठी लगेच काल पाकिस्तानी संसदेपुढे भाषण करताना गिलानींनी चीनची "Pakistan's All-Weather Friend" अशी भलावण करून अमेरिकेला चीनचे बुजगावणे दाखविण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्यामुळे यापुढे काय होणार याकडे सर्व जगाचे डोळे लागले आहेत.
अन्य दुवे:
The Emperors’ Clothes हा Cyril Almeida यांनी लिहिलेला लेख सर्वोत्तम आहे!
http://tinyurl.com/6zrwq2b (The curious case of Osama bin Laden-Hoodbhoy)
http://tinyurl.com/3ghxu8g (Imran Khan in “The Independent”)
http://www.smashinglists.com/10-best-intelligence-agencies-in-the-world/ (10 best intelligence agencies in the world)
http://www.pakalertpress.com/2010/07/31/10-best-intelligence-agencies-in... (10 best intelligence agencies in the world)
http://www.dirjournal.com/info/the-worlds-best-intelligence-agencies/ (10 best intelligence agencies in the world)
http://tinyurl.com/3yvtzq6 (David Cameron in Bangalore 28th July 2010)
http://tinyurl.com/3d5gj4u (Davis Miliband in Washington DC 30th April 2011)

Abbottabad Raid-Pakistan upset about being kept in the dark (by Kamran Yousaf-Express Tribune-4th May 2011)
http://tinyurl.com/3mp7jtt

Pakistan’s military and elite are holding it back: US analyst -The Express Tribune
http://tribune.com.pk/story/34519/pakistans-military-and-elite-are-holdi...

The best intelligence agency in the world ‘ISI’ (Siasi Pakistan-4 Aug 2010)
http://tinyurl.com/3m28t42
The Emperors’ Clothes A must-read article by Cyril Almeida in DAWN dt. 6th May 2011
http://tinyurl.com/3l76flh किंवा http://www.dawn.com/2011/05/06/the-emperors-clothes.html

DAWN editorial "Osama bin Laden" 3rd May 2011
http://www.dawn.com/2011/05/03/osama-bin-laden.html

जकार्ता पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेले माझे पत्रः
http://tinyurl.com/6axbcfg

कराचीच्या महंमद असीम या वाचकाचे सुरेख पत्र या दुव्यावर वाचा: http://tinyurl.com/3ee5u3y

माझे जकार्तातील मित्र श्री राम बहुखंडी यांचे पत्रही जरूर वाचा: http://tinyurl.com/69n7exb

गुलमोहर: 

जसे क्रिकेट चे मॅच्स फिक्स असतात, तसेच Shootout @ Abotabad was also / might have been fixed well in advance. Who knows, बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध हे एक दिखावा ही असु शकतो.

छान माहिती.

एक शंका - ओसामाचा उल्लेख सगळीकडे आदरार्थी केलायत की टायपो आहे?

पाकिस्तानबद्दल कुणीही कांहींही कधीही नक्की सांगू शकत नाहीं!<<< Rofl

नवीन शिन्मा येणार आहे :-

Shootout @ Abotabadd : The Return of Gen. XXXX

Proud

आशिया अशांत ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तान हाताशी धरणं भाग आहे. हे सगळं 'मी मारतो, तू रडल्यासारखं कर' अशातलं आहे.

आशिया अशांत ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तान हाताशी धरणं भाग आहे<<< मला असं वाटते हे परिस्थिती अफगाणिस्तान च्या युध्दा पुर्वीचे आहे, पोस्ट अफगाणिस्तान वॉर, they are already having a base there.

छान लेख Happy
[>>>> ड्रोन हल्ल्यात मरण पावलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाने त्याबद्दल पाकिस्तानातल्या CIA च्या Station Chief चे (जोनाथन बँक्स) नाव गेल्या <<<
या वाक्यात काही सुधारणा हवी आहे का? ]

ह्म्म्म.. आमच्याइथे पाकिस्तान चं जिओ चॅनल येतं. यावर दाखवले गेलेले काही ऑपोझिशन पार्टी मेंबर्सचे, काही वृत्तपत्रांचे संपादक, इमरान खान सारखे पोलिटिशिअन्स, काही विचारकांचे इन्टरव्यूज लाईव दाखवलेत त्यांमधून पाकिस्तान च्या सत्तारूढ पार्टीवर ,ते भरपूर टीका करत होते.
पाकिस्तान सध्या कात्रीत सापडलाय बरोब्बर.. जनता ,इतर टेररिस्ट ग्रुप्स सर्वच नाराज आहेत .
जनतेमधे त्यांना फसवले गेल्याची भावना पसरलीये.. या सर्वावर ताण म्हणजे सरकार आपण त्या गावचेच नाही असे दाखवत असल्यामुळे एक प्रकारचं डिप्रेशन आलंय लोकांना.
हे सर्व होताना अमेरिका ,पाकिस्तानबद्दलचं धोरण मात्र स्पष्टपणे बोलून दाखवत नाहीये.. कारण
अमेरिकेला आज ही नाटो चे ट्रक अफगाणिस्तानमधे ,व्हाया पाकिस्तानच घेऊन जायचे आहेत ना.. म्हणून अधून मधून पाक विरूद्ध कांगावा करताना दिसतात ..

>>> एक शंका - ओसामाचा उल्लेख सगळीकडे आदरार्थी केलायत की टायपो आहे? <<<
कुठे? आहे तो उल्लेख "ओबामांचा" आहे, नॉट ओसामा! Wink नामसाद्धर्म्यामुळे गोन्धळ झाला असेल.

अलीकडेच ओसामांना मारून त्यांनी ते खरेही करून दाखविले.
त्यामुळे बिन लादेन हे लष्कर
या अविश्वासामुळे ओसामांना ठार
नौदलाच्या "सील"च्या या तुकडीने हेलीकॉप्टर्समधून येऊन ओसामांना ठार केले
>>>>बर्‍याच ठिकाणी दिसलं म्हणून विचारलं फक्त....टायपोच असेल अशी खात्री आहे.

चांगला लेख, लिंक्सही इन्टरेस्टिन्ग दिसतायत, अजून त्यातले काही वाचले नाही.
यावर "...पण काही बिघडत नाही" अशी आख्खी गजल लिहिता येईल. Happy

US has no ‘definitive’ evidence that Pakistan knew of bin Laden’s whereabouts

असं होय!

चांगला लेख, लिंक्सही पहातो. माझ्या मते - अमेरिकेला पाकिस्तान अन् चीनची युती परवडणार नाही. भारतालाही त्याचा त्रासच होईल. लोकांचे, लोकांसाठी असे - लोकनियुक्त सरकार, उद्योगभिमूख शिक्षणच पाकला ह्या सगळ्यातून वर यायला मदत करू शकेल. त्या दृष्टीने आपण शक्य होईल ती मदतच करायला हवी!

काळे साहेब मला तुमचा jakarta post पेक्शा हा लेख खूप जास्त आवडला. सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आहे तुम्ही. मी बरेच लेख वाचत आहे या विषयावर पण "या घटनेचा भारत अमेरिका संबंधांवर कसा फरक पडेल" या वर अजून काही सविस्तर वाचण्यात नाही आल. आपण फक्त "आम्ही तुम्हाला सांगितल होतं" अस म्हणून गप्प बसणार आहोत क?

"या घटनेचा भारत अमेरिका संबंधांवर कसा फरक पडेल"

याबाबत मला पण उत्सुकता आहे. तुम्ही बरेच काही काही वाचता, तुमच्या मताला मी मानतो.

ओसामांचा उल्लेख आदराने केला तर कुठे बिघडते? Mr. Kasab असा उल्लेख BBC वर मी वाचलेला आहे.

पाक हे संपुर्ण जगाचे अवघड जागी अवजड दुखणे झालेले आहे... अमेरिकेने मदती बाबत पाठ फिरवली तर मग चिन (जोडीला अरबराष्ट्रे) तयार आहेच...

अमेरिका त्यांच्या बाबत निव्वळ हतबल आहे. कालच जॉन केरी सबळ पुरावा नसल्याने पाकला benefit of doubt द्यायला हवा व मदत तोडू नाही असे सांगितले. अमेरिका थोडी आदळ आपट करेल पण त्याने दुरगामी मैत्री संबंधांवर काहीच परिणाम होणार नाही.

भारताने बारिक लक्ष जरुर ठेवावे... पण त्यांचे संबंध खराब होत आहे म्हणुन आनंद मानण्या सारखी परिस्थिती नक्कीच नाही.

लेख छान आहे. आढावा पण छान घेतला गेलाय.
दुटप्पीपणाबद्दल फक्त पाकिस्तानलाच दोष कसा देता येईल ? अमेरिकेचं धोरण दुटप्पी नाही असं सुचवायचं आहे का ?
भारतात तरी जनतेला सरकारच्या धोरणांची पूर्ण माहीती असते असं आपण ठामपणे म्हणू शकतो का ?
भारत चीन युद्धात कित्येक वर्षे आपण ते युद्ध हरलो आहे हे जनतेला सांगितलं गेलं नव्हतं ( यामागचा हेतू अर्थातच जनतेचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याबाबतचा आहे.) अर्थातच भारतिय जनता तेव्हा तितकीशी प्रगल्भ नव्हती. पण दस्तुरखुद्द अमेरिकेनेही व्हितनाममधील दारूण पराभव कित्येक वर्षं जाहीर केला नव्हता.

काळेसाहेब, लेख चांगला आहे पण अपुरा वाटला. म्हणजे जे माहित आहे तेच परत वाचल्या सारखे वाटले. अजुन थोड्या केस स्टडीज वाचायला आवडल्या असत्या. आपण अभ्यासू आहात त्यामुळे आपले नाव पाहिले की नवीन काही खाद्य मिळेल असे झाले आहे, त्यामुळे असावे. लिंक माहितीपूर्ण आहेत.

मला तर ह्या सर्व प्रसंगात,
" मी (अमेरीका) मारल्याचे नाटक करतो, तर तू(पाकिस्तान) रडल्याचे नाटक कर .."'
असा खेळ वाटतोय अमेरीकेचा व पाकिस्तानचा, दुसरे काही नाही.

मला नाही वाटत पाकीस्तानबाबत विचार करताना अमेरिका असा विचार करत असेल की भारत काय म्हणेल? फक्त भारतालाच वाटते की जगातले लोक आपला विचार करतात!

पाकीस्तानी लॉबी अरब नि मुसलमान देशांकडून पैसे घेऊन अमेरिकन राजकारण्यांना भक्कम लाच देतात म्हणून पाकीस्तानला पाठिंबा.

अमेरिकेला निती, सद्भाव, अहिंसा, शांतता, लोक काय म्हणतात इ. चे अजिबात कौतुक नाही. फक्त पैसा पाहिजे.

भारत देश हा अमेरिकन उद्योजकांना फक्त पैसे मिळवण्याची संधि वाटते. कारण सॉफ्टवेअर जरी भारताने लिहीले तरी पैसे अमेरिकनांच्याच पदरात पडतात. भारताला उष्ट्या शिळ्या भाकरीचे तुकडे. अमेरिकनांचे म्हणाल तर जे भारतीय अमेरिकन होऊन अमेरिकेची सेवा करतात त्याच भारतीयांनी काही म्हंटले तर ते ऐकतात, कारण ते पक्षांना पैशाची मदत करतात, मते देतात. अनेक भारतीय सरकारात वरच्या जागी आहेत कारण ते अमेरिकन झाले आहेत.

भारताने तसे करण्याची आवश्यकता नाही. सध्या मिळेल त्या मार्गाने आर्थिक व सैन्य बळ मिळवून स्वतःच्या धमकीवर महान राष्ट्र बनण्याची भारताची लायकी आहे. अमेरिकेची लाळ घोटण्याची आवश्यकता नाही. स्वतंत्र राहून, केवळ उद्योगधंद्याबद्दल संबंध ठेवावेत. असेहि अमेरिकनांनाना त्यांच्या दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारताने कितीतरी पुरावे दिले आहेत, पण अमेरिका त्याकडे दुर्लक्ष करते.

सगळ्या अरब देशांचे पैसे अमेरिकेत. मनात येईल तेंव्हा अमेरिका लिबियाचे, इराकचे, पैसे फ्रीज करू शकते.अमेरिका म्हणजे ८००० पौंड गोरिला, किंवा ८००० पौंड हत्ती. जे मनात येइल ते करणार, बेधडक खोटे, बोलणार, कुणाची हिंमत नाही. वाट्टेल तिथे जाणार, वाट्टेल ते करणार, आता अगदी गदाफी विरुद्ध सुद्धा राष्ट्रसंघाच्या मानवता वादी का कुठल्याश्या समितीने अमेरिकेचा निषेध केला आहे! इराकवर हल्ला करण्यापूर्वी सुद्धा बर्‍याच देशांनी निषेध केला? बाकी भारत, भारतीय, पुष्कळ काही काही बोलत असतात कुठे ऐकले का तुम्ही त्यावर अमेरिकेची काही प्रतिक्रिया?

झक्की तुमची पोस्ट आवडली पण हा भाग नाही पटला.

ऐकले का तुम्ही त्यावर अमेरिकेची काही प्रतिक्रिया?>> भारतीयांबद्दल नाही पण भारताबद्दल अमेरिका कधी कधी बरळत असते. मध्ये एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव The Limits of Influence: America's Role in Kashmir मला ते अर्धे झाल्यावर वाचवले नाही! आपण एक सामान्य माणूस म्हणून प्रतिक्रिया देतो व त्याला राजकारणात काही अर्थ नाही, पण जेंव्हा खूप उच्चस्तरावरील लोक प्रतिक्रिया देतात तेंव्हा त्या वाचायला गंमत वाटते, ह्या पुस्तकातील काही प्रतिक्रिया तश्याच आहेत. हे पुस्तकच नाही तर असे अनेक लेख वेळोवेळी वाचले आहेत.

थोडा ऑफसेंटर पण तुमच्या मुद्द्याकडे नेणारा एक मुद्दा ..

कारगील युद्धाच्या वेळी पाकडे अमेरिकन लोकांकडे मदत मागायला आले होते, अर्थात क्लिंटननी डायरेक्ट मदत केली नसली तरी शेरीफ सोबत संधी केली होती. (त्या वर्षी जुन की जुलै महिन्यात) त्यानुसार पुढे असे पसरले गेले होते की २००४ मध्ये परत त्यांना F 16 मिळणार होते. २००४ मध्ये न मिळता ते पुढे डिले होऊन नंतर मिळाले. सगळी गंमत! अर्थात अमेरिकेने प्रत्यक्ष येऊन त्या युद्धात (जसे पाक म्हणत होते तसे) मदत केली नाही हे ही तितकेच खरे कारण मग ते भारत पाक युद्ध राहिले नसते.

अमेरिकेची लाळ घोटण्याची आवश्यकता नाही. स्वतंत्र राहून, केवळ उद्योगधंद्याबद्दल संबंध ठेवावेत. >> असेच झाले तर बरे होईल. Happy

काश्मीर हा खरे तर भारत नि पाकीस्तान या दोन देशातला खाजगी प्रश्न. नेहेरूंनी उगाचच संयुक्त राष्ट्रसंघात नेऊन त्याला आंतरराष्ट्रीय बनवले. जणू नावडत्या मुलाला घराबाहेर हाकलावे, तसे एकदा संयुक्त राष्ट्रसंघाकडे काश्मीर पोचवून आजतागायत साठ वर्षाहून अधिक वर्षे तो प्रश्न सोडवण्यासाठी काही केले नाही. ६५ नो ७१ मधे पाकीस्तानला दणक्या मार दिला होता. तेंव्हाच या प्रश्नाचा निकाल लावता आला असता. पण नावडता ना, त्याची काळजी कोण करेल?

मग आता काय, रस्त्यावर आलेल्याला कुणीहि काहीहि बोलावे. किती अमेरिकनांना किंवा इतरांना काश्मीरचा इतिहास, विशेषतः १९४७ साली काय घडले हे माहित आहे? मूर्ख लोक म्हणतात तिथे मुसलमान लोक रहातात तर काश्मीर हिंदू भारतात कसे येईल?? आणि खुद्द ओबामा (फार हुषार आहे म्हणे तो!!) चीनला सांगतो की या भागात शांतता राखण्यासाठी काश्मीरच्या प्रश्नात लक्ष घालावे!

अमेरिकन्स तर इतके हलकट की पुरेसे पैसे दिले तर ते काश्मीरला पाक व चीनमधे विभागून देतील!! तिकडे नाही का जबरदस्ती इस्राएल स्थापन केले नि इतके वर्ष पोसले, तसेच. आणि आशा आहे की भारतीयांना लाचखाउ म्हणत असले (उगीचच. घेतात थोडी लाच, पण अमेरिकनांसारखी नाही!) तरी ते लोक कितीहि पैसे दिले तरी हे मान्य करणार नाहीत!!

माझे जकार्ता पोस्ट'मधील पत्र या खालील नव्या दुव्यावर वाचू शकाल. पत्राखाली असलेला Mark Ulyseas या बालीची राजधानी 'देनपासार' येथे रहाणार्‍या गृहस्थांचा प्रतिसादही जरूर वाचा!
http://tinyurl.com/6axbcfg
सुधीर काळे

माझं मत

ओसामा, ओबामा, गिलानी, इराक, इराण, सिरीया बिरीया

गेले "तेल" लावत.

भारतात बहुसंख्य लोकांचे रोजचे उत्पन्न वीस रूपयांपेक्षा कमी आहे ही वस्तुस्थिती आता मान्य झालेली आहे. अमर्त्य सेनांनी शायनिंग इंडियाच्या फुग्याला टाचणी लावलीच आहे ( त्यांचं मत स्विकारा न स्विकारा , फरक पडत नाही ).

या पार्श्वभूमीवर आपल्या शासनाच्या तज्ञ समितीने दारिद्र्य रेषा कोनत्या निकषांवर बनवायची याचा एक ताजा अहवाल दिला आहे. आजच्या सकाळच्या अंकात चांगला अग्रलेख लिहीला आहे. जो मनुष्य रोज अठरा रूपये खर्चू शक्तो तो गरीब नाही असा हा अहवाल आहे....या समितीला दारिद्र्यनिर्मूलनाचे एखादे नोबेल द्यायला हवंय.
राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर न्याय कुणाकडे मागायचा ?

थोडक्यात घरचं झालं थोडं आणि ओबामाने धाडलं घोडं अशी गत बहुसंख्य भारतियांची आहे. पोटापाण्याचे प्रश्न सुटले तर घालूयात लक्ष आंतरराष्ट्रीय प्रश्नांत ...

Pages