पहातोस काय मुजरा कर

Submitted by नितीनचंद्र on 10 May, 2011 - 01:33

आजच सकाळी चिंचवड ते पुणे द ग्रेट पी.एम्.पी.एम्.एल ह्या बस सर्व्हीसने प्रवास करताना बसच्या पुढ्च्या काचेवर एक पोस्टर आत उभे राहुन प्रवास करणार्‍यांना दिसेल अश्या पध्दतीने लावलेले दिसले.

पोस्टरवर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र होते आणि खाली संदेश होता "पहातोस काय मुजरा कर". मी मनोमन मुजरा केला कारण माझे दोन्ही हात बस पकडण्यात गुंतले होते.

माझा एक मित्र सातार्‍याचा आहे. त्याने मला सांगीतले की सातार्‍याचे लोक शिवाजी महाराजांचे उत्तर अधिकारी छ. उदयनराजे भोसलेंना मुजरा करतात. मला अभिमान आणि आश्चर्य वाटले. अभिमान अश्याचा की शिवाजी महाराजांनी जे घडवले त्यांचे लोकांना स्मरण आहे आणि आश्चर्य अशाचे वाटले आजही लोकांना मुजर्‍यासाठी झुकावेसे वाटते.

महाराष्ट्रातच काय सर्व सामान्य जनता कुणापुढेही झुकायला तयार आहे पण शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन प्रतिशिवाजी बनायला तयार नाही.

"बघतोस काय मुजरा कर" ही भाषा शिवाजी महाराजांना अभिप्रेत नसावी. कामच असे करावे की लोक स्वराज्याला आपले मानतील असे शिवाजी महाराजांना अपेक्षीत असावे.

महाराष्ट्रातला एक समाज सेवक उपोषणाला बसतो आणि पंतप्रधानांनी नेमलेल्या मंत्र्यांच्या कमिटीतीतुन दुसरा महाराष्ट्रातला जेष्ठ मंत्री त्या कमिटीच्या सदस्यत्वाचा राजिनामा देतो कारण तो स्वच्छ नाही यावर सर्वांचे एकमत आहे.

शेतकर्‍यांच्या गवताच्या काडिलाही हात लावु नका हे सांगणारे छ. शिवाजी महाराज जर राज्यकर्त्यांचे आदर्श नसतील तर त्यांचे फोटो, त्यांचे पुतळे हे काय फक्त मुजराकरणार्‍यांसाठी ?

राजे पुन्हा जन्माला या ? कशालाहो ? मढ्याच्या टाळुवरच लोणी खाणारे आपमतलबी राजकारणी आणि त्यांचा उदो उदो करणारे स्वार्थी कार्यकर्ते यांची यादवी पहायला ?

राजे, तुम्ही आत्ता जन्माला आलात तर परकियाशी लढायचे राहुद्या दुर सर्व आयुष्य असल्या स्वकियांशी लढण्यात खर्ची घालावे लागेल.

हे जर खर आहे तर आम्ही सामान्य माणस काय करणार आहोत ? हातावर हात ठेउन उसासे टाकणार आहोत की यदा यदाय धर्मस्य.. या उक्तीवर भरवसा ठेउन हे कधीतरी संभव आहे म्हणुन त्या क्षणाची वाट पहाणार आहोत ?

गुलमोहर: 

.

>>> त्याने मला सांगीतले की सातार्‍याचे लोक शिवाजी महाराजांचे उत्तर अधिकारी छ. उदयनराजे भोसलेंना मुजरा करतात. मला अभिमान आणि आश्चर्य वाटले.

हे मला चुकीचे वाटते. उदयन भोसले हा शिवाजी महाराजांच्या कुळातला असला तरी त्याचे "पराक्रम" जगजाहीर आहेत. राजेराजवाडे कायद्याने व तसेसुध्दा केव्हाच अस्तंगत झाले. परंतु अजूनही काही मंडळी जुन्या काळातच वावरत आहेत असे वाटते. कोल्हापूरच्या भोसले घराण्यातील व्यक्तींचा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (हे सध्याच्या काळातले), श्रीमंत युवराज संभाजीराजे असा उल्लेख करणे व वृत्तपत्रांनीही तसे छापणे ही मला गुलामगिरी वाटते. कायद्याने आता कोणीही राजा / सम्राट शिल्लक नाही. तरीदेखील एखाद्याचा उल्लेख, केवळ तो एकाद्या विशिष्ट कुळात जन्मलेला आहे म्हणून, महाराज / श्रीमंत / छत्रपती / युवराज असा करणे, त्याला लवून मुजरा करणे हे आपण अजून "आपले पोशिंदे राजे व आपण म्हणजे राजांच्या छत्राखालील प्रजा" या मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाहीत याचेच लक्षण आहे. ही माझी वैयक्तिक मते आहेत.

त्याने मला सांगीतले की सातार्‍याचे लोक शिवाजी महाराजांचे उत्तर अधिकारी छ. उदयनराजे भोसलेंना मुजरा करतात.>>>>>>> माझ्या माहितीप्रमाणे हा त्या व्यक्तीला मुजरा नसुन महाराजांच्या गादीला/सिंहासनाला मुजरा असतो...

"बघतोस काय मुजरा कर" ही भाषा शिवाजी महाराजांना अभिप्रेत नसावी. >>>> हे मात्र मान्य...

हे जर खर आहे तर आम्ही सामान्य माणस काय करणार आहोत ?>>>>>>>>> अगदी अनमोल प्रश्न...

मी छ. उदयनराजेंच्या गौरव करण्यासाठी काही लिहीले नाही. मराठी माणसांची मानसिकता वर्णन केली आहे. कृपया शिवाजी राज्यांच्या कोणत्याही वंशजाबाबत वाईट लिहु नका. या मानसिकतेची अनेक माणसे आज सर्वत्र आहेत. छत्रपतींच्या वंशात त्यांनी जन्म घेतला हा काय त्यांचा गुन्हा आहे ? आपण त्यांच्याकडे त्यांनी छ्त्रपतींसारख वागाव अशी अपेक्षा करतो ही आपली चुक आहे.

मास्तुरे आणि मंदारशी मी सहमत नाही. मला छ. उदयन राजे आणि छ. संभाजीराजे यांना लवुन मुजरा करण्यात वावग वाटणार नाही. माझ्या दृष्टीने हा मुजरा छ. शिवाजी महाराजांनाच असेल.

आपण त्यांच्याकडे त्यांनी छ्त्रपतींसारख वागाव अशी अपेक्षा करतो ही आपली चुक आहे.>>>>>>> राईट.... सहमत

आमचे मुख्यमंत्री वायफळ बडबड करणार्‍या एका बालीश मुलाचे जोडे उचलतात ( का तर त्याचे बाबा आज्जी ग्रेट होते म्हणुन ) ते चालते ...अन आम्ही आमच्या राजाला , श्रींच्या स्वराज्याला , सिंहासनाला मुजरा केला तर ती मानसिक गुलामगीरी .....
..... वा रे लोकशाही !!

पंत,

अहो, काही वर्षांपुर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर छ. प्रतापसिंह राजे भोसले यांनी छ्त्री धरल्याचा फोटो सुध्दा मी पाहिलाय. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत.

अहो, काही वर्षांपुर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर छ. प्रतापसिंह राजे भोसले यांनी छ्त्री धरल्याचा फोटो सुध्दा मी पाहिलाय.
>>>

ही गोष्ट मुळीच चुकीची नाही . आमच्या राजांनी उदारमनाने लोकशाही स्विकारली ...स्वतःपेक्षा समाजाने निवडलेलेल्या नेत्याला सन्मान दिला त्यचे हे प्रतिक आहे .... ( निजामासारखी हरीसिंगासारखी , राजपुत राजांसारखी नाटकं केली नाहीत ....) मऊ लागलं म्हणुन मुळासकट उपटुन टाकायचा प्रकार करताहेत सुडोसेक्युलर साले .
.
.
आजही १००० वर्षाचा इतिहास असलेल्या लंडनच्या लोकशाहीत राजाचा मान राखला जातो ....अन त्याने दिलेली नाईट्शिप "सर" पदवी आजही तुम्ही लोक अभिमानाने मिरवता हे विसरु नका !!

.

आजही १००० वर्षाचा इतिहास असलेल्या लंडनच्या लोकशाहीत राजाचा मान राखला जातो ....अन त्याने दिलेली नाईट्शिप "सर" पदवी आजही तुम्ही लोक अभिमानाने मिरवता हे विसरु नका !!

हे वाक्य वरच्या वाक्याशी जुळत नाही. लंडनच्या राणीचा अधिकार हा भारतातल्या राष्ट्रपतीच्या अधिकारासारखा आहे. किंबहुना काकणभर वरचाच.

युवराज चार्ल्स काही इंग्लडच्या पंतप्रधानांच्या डोक्यावर छ्त्री धरत नाहीत.

मला इतकच म्हणायचय की

१) मुख्यमंत्र्यांनी कोणाचेही जोडे उचलु नयेत किंबहुना छ्त्रपतींच्या वंशजांचे सुध्दा.
२) छ्त्रपतींच्या वंशजांनी मुख्यमंत्र्यांच्यावर छ्त्री धरु नये.

या दोन्हीही गोष्टी चुक आहेत.

>>> आमचे मुख्यमंत्री वायफळ बडबड करणार्‍या एका बालीश मुलाचे जोडे उचलतात ( का तर त्याचे बाबा आज्जी ग्रेट होते म्हणुन ) ते चालते ...अन आम्ही आमच्या राजाला , श्रींच्या स्वराज्याला , सिंहासनाला मुजरा केला तर ती मानसिक गुलामगीरी .....

जोडे उचलणे हीसुद्धा गुलामगिरीच आहे. ही कृती मुजर्‍याच्या कृतीएवढीच निषेधार्ह आहे. ती कृती फक्त काँग्रेस पक्षात अभिमानाची समजली जाते. इतरत्र नाही. उदय भोसलेसारख्याला लवून मुजरा करणे आणि तो मुजरा स्वराज्याला किंवा शिवाजी महाराजांना आहे असे समजणे ही माझ्या दृष्टीने गुलामगिरीच आहे.

एखादी व्यक्ती कशीही असली तरी ती व्यक्ती, निव्वळ योगायोगाने काही शतकांपूर्वी थोर असलेल्या एका विशिष्ट कुळात जन्माला आली आहे, म्हणून तिचे जोडे उचलणे, लवून मुजरा करणे, श्रीमंत/छत्रपती/युवराज असे संबोधणे ही गुलामगिरीचीच चिन्हे आहेत.

नक्की काय म्हणायचंय? लेख आणि प्रतिसाद भिन्न विचार प्रगट करतात.
>> कृपया शिवाजी राज्यांच्या कोणत्याही वंशजाबाबत वाईट लिहु नका.
का नाही?
>> आपण त्यांच्याकडे त्यांनी छ्त्रपतींसारख वागाव अशी अपेक्षा करतो ही आपली चुक आहे.
जशी त्यांनी छ्त्रपतींसारख वागाव ही तुमची अपेक्षा नाही तसे छ्त्रपतींसारख मान मिळावा ही त्यांचीपण अपेक्षा नसावी. बरोबर?
>> माझ्या दृष्टीने हा मुजरा छ. शिवाजी महाराजांनाच असेल.
कायपण...
कोणी कुठल्या घरात जन्म घेतला यावर त्याला कसं वागवायचं हे ठरवणं म्हणजे जातीयवादाचेच एक रूप आहे. स्वातंत्र-समता-बंधुता या लोकशाही तत्वांशी विरोधी जाणारे हे विचार आहेत. मोठेपण प्रत्येकाने स्वतः कमवावा लागतो. ती काय वडिलोपार्जित इस्टेट नाही.

शिवाजी महाराजांचे उत्तर अधिकारी छ. उदयनराजे भोसलेंना मुजरा करतात.

मास्तुरे.. उदयन भोसले हा शिवाजी महाराजांच्या कुळातला असला तरी >>>>>>>>

>> छत्रपती कसले हे तर क्षेत्रपति.. आता तर ते सुद्धा नाही राहिलेले. पहिले तर ते थेट राजांचे वारस नाहीत. तसे कोल्हापूर गाडीलाही राजांचा थेट वारस नाही. दोन्ही गाड्यांवर बसलेले लोक दत्तक.

सॅम,

आपल्याला काय म्हणायचय मला नीट समजल नाही.

छ. उदयनराजे भोसले आणि छ. संभाजीराजे यांनी कधी आम्हाला मुजरा केला जावा असा फतवा काढला नाही. आपण त्यांच्यात छ. शिवाजीराजे यांचा वारसा पहात आहोत.

इथे जातियवादाचा प्रश्नच नाही. मला वाटत शिवाजी महाराजांनी कोणत्याही कुळात जन्म घेतला असता तरी ते त्यांच्या कार्यामुळे आजच्या इतकेच पुजनीय असले असते.

मी एकदा माझ्या वडीलांना प्रश्न विचारला होता की किर्तनकाराला उत्तररंगा पुर्वी हार घालुन, पायाला हात लाऊन नमस्कार का करायचा ? किर्तनकार म्हणजे कोणी संतपदाला पोहोचलेले नाहीत. यावर माझे वडील हसुन म्हणाले नसतीलही, पण काही काळ आपल्याला भगवंताच्या लिला सांगुन भक्ती मार्गाचा उपदेश करणारे किर्तनकार थोर असतात त्याची ही कृतज्ञता. इथे किर्तनकाराचे कुळ हे भगवंताचे कुळ असते. वारकरी समाजात याचा अनुभव आणखी जास्त येईल.

पक्का भटक्या, भोसले कुळाच्या, सातारा आणि कोल्हापुर गादीच्या म्हणुन ज्या काही परंपरा आहेत त्याचे तर छ. उदयनराजे भोसले आणि छ. संभाजीराजे वारस आहेत ना ?

इंग्लंडचा उल्लेख आलाच म्हणुन लिहतो की तिथला वंश तरी कुठे शुध्द आहे ? पण तिथले लोक राजेघराण्याला आणि परंपरांना मानतात ना ?

वारसा मानला तर इतिहास टिकेल. कशावरुन रामाचा जन्म झाला असा प्रश्न विचारला जातो. कारण वारसाच शिल्लक नाही. याउलट श्रीलंकेत रावणाचा वारसा शिल्लक आहे असे म्हणतात.

यास्तव छ. उदयनराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख मला रुचला नाही.

कारण शाहू महाराज (सातारा १७०७) आणि संभाजी महाराज (कोल्हापूर १७१५) यांना पुत्रच नाही.
>>>> हे वाक्य मी मागे घेतोय... ह्या बाबीत अजून थोडी माहिती कळली की पुन्हा इथे कमेंट करीन.... धन्यवाद..

>> शिवाजी महाराजांनी कोणत्याही कुळात जन्म घेतला असता तरी ते त्यांच्या कार्यामुळे आजच्या इतकेच पुजनीय असले असते
अर्थातच. तेच तर मी म्हणतोय... माणुस कुठल्या घराण्यात जन्मला याने काय फरक पडतो? त्याच कार्य मोठ्ठ. 'शिवाजी महाराजांचे वंशज' हे कुणाला मान देण्यासाठी qualification ठरत नाही. त्यांचा वारसा (?) नाकारणं म्हणजे शिवाजी महाराजांचा विसर पडणं असंही नाही.
-इति-

राजे पुन्हा जन्माला या ? कशालाहो ? मढ्याच्या टाळुवरच लोणी खाणारे आपमतलबी राजकारणी आणि त्यांचा उदो उदो करणारे स्वार्थी कार्यकर्ते यांची यादवी पहायला ?>>> अगदी अगदी!!!! मस्तच लिहिलंयत नितीन... अगदी विचार करायला लावणारा लेख आहे.

सुयोग,

आपण ही लिंक का दिली आहे याचा उद्देश आपणासच माहित. हे माझे स्वतंत्र विचार आहेत कोणत्याही राजकिय पक्ष अथवा त्याला सलग्न अशा चळवळी यांच्याशी त्याचा काही संबंध नाही.

सामन्य माणुस आणि भ्रष्टाचारी नेते या संदर्भात " शेतकर्‍याचा काडीलाही हात लावु नये" हा शिवाजी महाराजांचा विचार यावरच हे स्फुट होत.

>>> मला वाटत शिवाजी महाराजांनी कोणत्याही कुळात जन्म घेतला असता तरी ते त्यांच्या कार्यामुळे आजच्या इतकेच पुजनीय असले असते.

नक्कीच

>>> भोसले कुळाच्या, सातारा आणि कोल्हापुर गादीच्या म्हणुन ज्या काही परंपरा आहेत त्याचे तर छ. उदयनराजे भोसले आणि छ. संभाजीराजे वारस आहेत ना ?

संभाजी भोसल्यांबद्दल माहिती नाही, परंतु उदयन भोसले नक्कीच त्या परंपरेला पात्र नाही. लेवे प्रकरण माहित असेलच. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा छायाचित्राला कृतज्ञतेने मुजरा करणार्‍याची भावना समजू शकते, परंतु, केवळ योगायोगाने त्यांच्या कुळात अनेक पिढ्यांनंतर जन्म झालेल्याला लवून मुजरा करण्यामागची भावना समजू शकत नाही.

माझा एक मित्र सातार्‍याचा आहे. त्याने मला सांगीतले की सातार्‍याचे लोक शिवाजी महाराजांचे उत्तर अधिकारी छ. उदयनराजे भोसलेंना मुजरा करतात. मला अभिमान आणि आश्चर्य वाटले. अभिमान अश्याचा की शिवाजी महाराजांनी जे घडवले त्यांचे लोकांना स्मरण आहे आणि आश्चर्य अशाचे वाटले आजही लोकांना मुजर्‍यासाठी झुकावेसे वाटते.>>> अगदी पटलं.
ही मनोवृत्ती आहे. मग त्यासाठी कोणत्याही रूपातला आय्कॉन आपल्याला चालतो. मग तो मंदिरातला राम असेल, दिल्लीतला कुणी नेता असेल किंवा मातोश्रीच्या आश्रय असेल. आपण स्वतंत्र आहोत, आपल्याला मत आहे, स्वतंत्र मेंदू आणि विचार करण्याची कुवत आहे हेच आपण विसरून गेलोय का? एखाद्याच्या प्रभावाखाली इतकं वाहवत जायचं की त्यात आपल्याला देव दिसावा? भारतीय समाजाचा हाच प्रॉब्लेम आहे. आपण खूप जास्त व्यक्तिपूजा करतो. पण त्या व्यक्तीने घालून दिलेले आदर्श, विचार विसरतो. तिकडे कधीकाळच्या इतिहासातल्या सीतामाईबद्दल काही बोलू नका असं म्हणणारे लोक इथे जित्याजागत्या स्त्रीचा अर्वाच्य भाषेत अपमान करायला कचरत नाहीत.

नितीन हीच मनोवृत्ती आजही आपल्या मानसिक गुलामगिरीची निदर्शक आहे असं नाही वाट्त?

हा धाग पुरेश्या चर्चेचा आहे हे पाहून आनंद झाला. अश धाग्यांमध्ये सुरुवातीला सुरुवातीलाच बोललेले बरे पडते. मग नंतर आरामात मजा बघता येते.

तर माझे बावळ्याचे आपले एक मत!

१. पाहतोस काय मुजरा कर हे शिवाजी महाराजांना अभिप्रेतच नसावे बाबत - ते वाक्य शिवाजी महाराज स्वतः बोलतच नसणार, ते कुठेही आले की इतर लोक बाकीच्यांना म्हणत असणार. आणि बाकीच्यांनी तसे म्हणण्याचे सबळ कारण आहे कारण ते महाराज आहेत व ज्याला हे माहीतच नाही त्याला ते सांगणे अत्यावश्यक आहे. मात्र आज या वाक्याला काहीही अर्थ राहिलेला नाही.

२. उदयनराजेंना मुजरा - हे वाचून मलाही आश्चर्यच वाटले. काही वर्षांपुर्वी मला एकदा स्वारगेट हून बारामतीला बाय बस जाताना शेजारी बसलेला एक गावंढळ म्हातारा म्हणाला:

"पुर्वी एक लहान मुलगा पुण्यात शिकायला आला व सोन्यामारुती चौकात एका खोलीत अनेक विद्यार्थ्यांबरोबर राहू लागला. त्याला दोन आण्यांची मिसळही परवडायची नाही. उपाशी राहून कसाबसा शिकायचा तो! आज मात्र त्याच्या पुढच्या हजार पिढ्या आरामात जगतील इतपत दौलत त्याच्याकडे आहे"

मी म्हणालो "कोण बुवा?"

तर म्हणे "शरद पवार"!

आता इतका पैसा असला तर मुजरेकरी असणारच म्हणा!

३. राजे तुम्ही परत या - मला तरी अजिबात असे वाटत नाही की राजांनी परत यावे. एक तर आज आहे लोकशाही! यात औरंगजेबीय किंवा आदिलशाहीय प्रवृत्ती असल्य तरीही त्यांचा समाचार सरकार घेते. दुसरे म्हणजे आज त्यांनी येऊन त्यांच्या वंशजांचे भ्रष्टाचार पाहिले असते तर ते व्यथीत झले असते. तेव्हा राजे परत न आलेले बरे!

शिवाजी नाव रस्त्याला, शिवाजी नाव चौकाला
अम्हाला फक्त शिवबासारखे वागायचे नाही

तुक्या तू जा विमानाने, अम्हाला राहुदे येथे
तुझ्या नावे करू दंगे, तुला सोसायचे नाही

जयंती रोज नेत्यांची, सदोदित ड्राय डे येथे
कशाला पाहिजे स्वातंत्र्य जेथे प्यायचे नाही

मला मध्यंतरी एक गृहस्थ म्हणाले की शिवाजी महाराजांकडे फक्त तीन जिल्हे होते, काही विशेष राज्य बिज्य नव्हते. मी म्हंटले तुम्ही कधी घर घेताय? आयुष्यभर भाड्याच्या खोलीत राहून कुणालाही काहीही बोलता काय?

राजे तुम्ही परत येऊ नका, आता तुमच्या स्वराज्यात सगळे जण भ्रष्ट आहेत!

असा एक बोर्ड करून घ्यावा म्हणतो! काय नितीनराव? कल्पना कशी वाटली??

-'बेफिकीर'!

नितीनजी,
अगदी अस्सल आणि खास लेख !
आजकाल इतिहासातल्या महापुरूषांच्या नावाचा वापर आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेणार्‍यांची गर्दी आणि त्यातुन निर्माण झालेली मुजोरगिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे
Happy

शेतकर्‍यांच्या गवताच्या काडिलाही हात लावु नका हे सांगणारे छ. शिवाजी महाराज जर राज्यकर्त्यांचे आदर्श नसतील तर त्यांचे फोटो, त्यांचे पुतळे हे काय फक्त मुजराकरणार्‍यांसाठी ?

पण सध्याचे राज्यकर्ते तर जर शेतकरी आपल्यापुढे या ना त्या (विधानसभा,लोकसभा) कारणाने झुकत नसतील (मुजरा करत नसतील) तर त्यांना खायला गवताची काडी सुद्धा शिल्लक ठेऊ नका असे वागताना दिसतात.
शेतकर्‍यांसमोर अनेक अडचणी निर्माण करायच्या,अडवणुक करायची,मग यांच्यासमोर झुकणारे आपोआप लाचार बनतील,आपल्या सरकारी व्यवस्थेचे आणि पक्षाचे गुलाम बनतील,त्यातुन यांची दुकानदारी चालु राहील आणि जर त्यातले काही स्वाभिमान बाळगणारे तर सरळ आत्महत्या करुन स्व:ताचा अंत करुन घेतील..
अशा प्रकारची शेतकर्‍यांची झालेली अवस्था शिवरायांना अपेक्षित होती का ? शिवाजी राजांचे गुण अंगी बाळगणं जास्त महत्वाच हे मात्र सध्याचे अनेक नेते सोयीस्कर विसरतात.
जाणते राजे म्हणवणारेच आजचे नेतेच शेतकर्‍यांवर वेळोवेळी नांगर फिरवण्याची धोरणं राबवताना दिसतात.

नितीनजी,
तुमची भेट होईल त्यावेळी मात्र मी तुमच्यापुढे (मुजरा न करता) नुसता बघत राहणार नाही हे मात्र नक्की !
Happy

Pages