व्हॉट अ‍ॅन आयडीया..!

Submitted by A M I T on 20 April, 2011 - 01:30

माझा मोबाईल पुन्हा वाजला.
आतापर्यंत तिसर्‍यांदा दुर्लक्षित केलेला बायकोचा चौथा कॉल मी रिसीव्ह केला.
"हॅलो." आवाजात जमेल तितका शिष्टपणा आणत मी. बे"शिष्ट"पणा आयमीन बेशिस्तपणा माझ्या बायकोला खपत नाही.
"काय हो..! कुठे आहात? आणि फोन का उचलत नाही? मघापासून कितीवेळा मी ट्राय करतेय." बोलायची संधी मिळताच तिने संधीचं सोनं केलं.
आता आली ना पंचाईत..! मी मनातच उत्तराची जुळवाजुळव सुरू केली.
"अगं काही नाही. फोन ना सायलेंटवर होता आणि निघता निघता बॉसने काम दिलं, म्हणून थोडासा ओव्हरटाईम करतोय."
वास्तविक या क्षणाला मी आमच्याच ऑफीसातल्या कामिनीसोबत कॉफी शॉपमध्ये कॉफी ढोसत होतो.
"आता तू म्हणत असशील तर..." मी ब्रम्हास्त्र सोडलं.
"नको नको. करा तुम्ही ओव्हरटाईम. या महीन्यात फ्रीज घ्यायचाय आपल्याला." तिने माचिसची काडी मोडावी इतक्या सहजतेने माझं ब्रम्हास्त्र मोडलं.
आता मात्र "गार" पडायची पाळी माझ्यावर आली. या "ओव्हरटाईम"च्या नादात उगाच मी माझ्या बायकोचा नवरा म्हणवून घ्यायचा "टाईम ओव्हर" व्हायचा.
मोबाईलवर इनकमिंग जरी फ्री असलं तरी त्यावर खोटं बोलणं मला असं महागात पडलं.

मोबाईलवर खोटं बोलून समोरच्याला टोप्या घालणारे महारथी मी बरेच पाहीलेत.
"अगं पण आता तर मी काश्मिरला आहे. मी तुला पुढल्याच महीन्यात भेटू शकेन. सॉरी हं..!" हे वाक्य "घाटकोपरच्या एका रोडवर" उभं राहून बोलणारा इसम मी पाहीलाय.

आता या टोप्या फक्त तुम्हीच दूसर्‍याला घालू शकता हा गोड गैरसमज मनातून काढून टाका. कधी कधी अशी टोपी आपल्याही माथी घातली जाते.

मागे एकदा माझ्या एका मित्राने माझ्याकडून काही रूपये उसने घेतले होते. (उसने हा त्याचाच शब्द.) मी ही उदार मनाने त्याला पैशांची मदत केली खरी...

त्याने पैसे परत करण्याच्या ठरवलेल्या तारखेच्या तब्बल आठवडाभरानंतर मी त्याला कॉल केला. पण "दे दणादण" या हिंदी चित्रपटातल्या

क्या पैसा पैसा करती है
क्यों पैसे पे तू मरती है

या गाण्याच्या कॉलरट्यूनशिवाय मला काहीच ऐकू आलं नाही.
"साल्याने कॉलरट्यूनपण एकदम प्रसंगावधान राखून सेट केलीय." मी मनात त्याची अशा शब्दांत स्तुती केली.
त्यानंतर मी काही दिवस त्याला कॉल करत राहीलो. त्याने सेट केलेली कॉलरट्यून माझे कान सुखावण्याचं आणि डोकं मात्र दूखावण्याचं काम करत राहीली.
आता मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो की, त्याने माझे पैसे परत करण्याचा विचार "रहित" केला असावा. पण मी कोण आहे? हे त्याला अजून "माहित" नसावं बहूधा.
मी सतत कॉल करून त्याला भंडावून सोडण्याचा निर्णय घेतला.
एकदा रस्त्याने जात असताना मी त्याला कॉल केला. कॉल रिसीव्ह केला गेला पण "द नंबर यू आर ट्रायिंग इज अ‍ॅट प्रेझेंट आऊट ऑफ धीस युनिव्हर्स." असा बायकी आवाजातला संदेश मला ऐकू आला.
"आऊट ऑफ धीस युनिव्हर्स..!! च्यायला खपला की कै..?" मी अर्थात मनात.
मी ओळखलं, तो आवाज त्याचाच होता. कारण फोनवरील व्यस्त, बंद, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर या आणि अशा सुचना देणार्‍या बाईचा आवाज कित्ती "लाडीक" असतो.
मी रागावून पुन्हा कॉल केला.
"आप कतार में है. कृपया लाईन पर बने रहे, या थोडी देर बाद कोशिश करे. धन्यवाद." त्याने पुन्हा कॉल रिसीव्ह करून पुन्हा बायकी आवाजात असा संदेश दिला.
"कतार में..! साल्या एक लाथ मारली ना तर खर्‍याखुर्‍या कत्तारला जावून पडशील." मी वैतागून मोठ्या आवाजात म्हणालो.
टूक.....टूक.....टूक.... त्याने समोरून फोन ठेवला.
आता माझ्या या वाक्याचा अर्थ रस्त्याने चालणार्‍या एका म्हातार्‍या गृहस्थाने निराळाच घेतला की त्यात त्याचा खोचकपणा होता.. कुणास ठावूक?
तो मला म्हणाला,"मला जरा एक हळू लाथ माराल का?"
"का?" मी.
"नाही. मला शेजारच्याच गावात जायचयं.." यावर तो पान-तंबाखूने माखलेले दात दाखवून हसला.
मला मात्र ती लाथ मारण्याची कृती अमलात आणण्याचा मोह झाला होता. मी तो आवरला.

माझा एक मित्रही (हा कधी उसने पैसे घेत नाही.) असाच स्वत:च्या विनोदावर स्वत:च हसतो.
एकदा आम्ही दोघं रस्त्याने चाललो होतो. याच्या मागे एक कुत्रा लागला. आम्ही बराच अंतर चाललो तरी कुत्रा याची पाठ सोडेना.
"अरे माझा सिमकार्ड तर बी.एस.एन.एल. चा आहे ना..! मग हा "हच" चा नेटवर्क का पकडतोय मला?" या त्याने केलेल्या विनोदावर तो यथेच्छ "हच"ला आयमीन हसला.

हल्ली मोबाईल एक गरजच बनलीय.

मोबाईलचं चार्जर तर लोकं पेन मागितल्यासारखं मागतात.
याचे दोन किस्से..

पहीला किस्सा...
मी लहान असताना माझे चुलत काका आमच्या घरी आल्यावर मला विचारीत,"काय रे.. बाबा आहेत का?"
परवा ते असेच आमच्या घरी आले होते. आल्या आल्या त्यांनी मला विचारले,"बारीक पिनवाला चार्जर आहे का रे?"

दूसरा किस्सा...
एकदा मी एका हॉटेलात गेलो. भिंतीलगतचं एक टेबल बघून खुर्चीवर बसलो. हॉटेलात फारशी गर्दी नव्हती. वेटरला डोश्याची ऑर्डर देवून मी हॉटेल न्याहाळू लागलो. तोच खांद्याला बॅग लटकावलेला एक गृहस्थ हॉटेलात प्रवेशला. हॉटेलातली इतर टेबले निरखित त्याने माझ्या टेबलकडे पाहीले आणि तो मिशीतल्या मिशीत हसला. तडक येवून माझ्या समोरच्या खुर्चीत बसला.
मी विचार करू लागलो, याने इतर टेबले सोडून माझंच टेबल का निवडलं? याला माझ्याशी गप्पा तर मारायच्या नाहीत ना? की याला त्याची एखादी लग्नोत्सूक मुलगी संपवायची आहे? (हो. म्हणजे अजूनही मी उमदा तरूण दिसतो हो.)
माझा डोसा आला.
त्या गृहस्थाने चहा ऑर्डर केला आणि बॅगेतून चार्जर काढून भिंतीला असलेल्या सॉकेटमध्ये घालून त्याने आपला मोबाईल चार्जसाठी लावला. माझा चेहरा डोश्यासारखा पांढरा पडला. त्याचा चहा आला.
माझा डोसा खावून झाला तरी त्याचा चहा संपला नव्हता.... संपणारही नव्हता...
साहजिकच... बॅटरी फुल्ल होईपर्यंत तो चहाचा आस्वाद घेणार होता.

व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी..!

अवांतर : गर्लफ्रेंड नामक नकली "माला"पासून फसल्या गेलेल्या प्रियकारांच्या मन जागृतीसाठी मला आलेला एक समस..

जर तुमच्या गर्लफ्रेंडने तुम्हाला एस.एम.एस. पाठवला. तर असा विचार करू नका की, तिने तुम्हाला किती रोमॅन्टीक एस.एम.एस. पाठवलाय.
तर असा विचार करा की, तिला हा एस.एम.एस. कुणी पाठवला असेल?

"जागो आशिक जागो"

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

Lol Lol Lol

Pages