व्यसन

Submitted by मंदार-जोशी on 3 May, 2011 - 00:28

एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.

"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.

"तीनशे साठ."

"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."

"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."

"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."

"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो."
ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.

लेखाचं नाव बघितल्यानंतर हा संवाद वाचून कदाचित तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाही, हा संवाद एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा किंवा परमिट रूमबाहेरचा नाही (अर्थात तिथे उधारी चालत असावी असं मला तरी वाटत नाही - अनुभव नाही), किंवा किराणामालाच्या थकलेल्या बिलांबाबतही नाही. हा संवाद आहे एका सायबर कॅफे बाहेरचा. शेजारी एका दवाखान्यात आलो असता कानावर पडलेला. सहज रिसेपशनिस्टला विचारलं तर हे असले प्रेमळ(!) संवाद रोजचेच आहेत असं समजलं. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थीदशेतील मुलांचे आणि सायबर कॅफेच्या गल्ल्यावर बसलेल्यांचे. "अहो काय सांगू, अनेक वेळा समजावून झालं, पेशंट आहेत त्रास होतो, काहीही परिणाम नाही".

असेल अपवादात्मक ठिकाण म्हणून फार विचार केला नाही. असंच एकदा प्रिंटाआउट काढायला अन्य एका सायबर कॅफे मध्ये जावं लागलं. तिथे शालेय गणवेशातली अनेक मुलं दिसली. ही मुलं करताहेत तरी काय पहावं म्हणून एकाच्या नकळत सहज डोकावलो तर कसलासा ऑनलाईन युद्धाचा गेम तो खेळत होता. शेजारीच त्याचा मित्र त्याला कसं खेळायचं याचं मार्गदर्शन करताना दिसला. माझं काम झाल्यावर सायबर कॅफेच्या मालकाला विचारलं, "काय हो, दोघांना कसं काय बसून देता तुम्ही एका पी.सी. वर?"

"अहो शेट, लय भारी गिर्‍हाईकं आहेत ही. रोज येत्यात. बराच वेळ बसत्यात, लई खेळत्यात. बक्कळ कमाई यांच्यामुळं", मालक उत्तरले.

निराशेने मान हलवून बाहेर पडलो, तर मागोमाग वरच्यासारखाच संवाद कानावर पडला. उधारी बाकी असल्याचा. फक्त ह्या वेळी रक्कम कमी होती.

मित्रमंडळी आणि अन्य काही सायबर कॅफेचे मालक यांच्याशी चर्चा करता समजलं की ही परिस्थिती धक्कादायकरित्या सर्वसामान्य आहे. कोपर्‍याकोपर्‍यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उघडलेले सायबर कॅफे यांमुळे घरी इंटरनेटची जोडणी नसलेले किंवा इतर काही कारणांमुळे घरी गेमींग न करू शकणारे यांची चांगलीच सोय झाली आहे. शिवाय नजिकच्या भूतकाळात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.

vyasan01_cafe.jpgvyasan02.jpg

समुपदेशन करणारे अनेक तज्ञ म्हणतात की इंटरनेट सहज उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ऑनलाईन खेळ यांचे अतिशय वेगाने लागू शकणारे व्यसन ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. वैयत्तिक/प्रत्यक्ष आयुष्यात छटाकभर सत्ताही नसलेल्यांकडे ऑनलाईन खेळात मोठ्या सैन्याचे अधिपत्य किंवा एका शहराचे नेतृत्व येऊ शकते. इंग्रजीत असलेल्या ''Power corrupts, and absolute power corrupts absolutely' या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ही नशा ऑनलाईन असली, तरी ही सत्ता मनाचा झपाट्याने ताबा घेते, आणि मग शाळा, शिकवणीची फी, खाऊचे पैसे इत्यादीतला एक मोठा हिस्सा या खेळांवर खर्च होऊ लागतो.

माझा एक प्रोग्रामर मित्र ऑनलाईन खेळ बनवतो. त्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली. ऑनलाईन खेळ बनवणारे मानसशास्त्राचा उत्तमरित्या उपयोग करुन घेतात. प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याचे किंवा मानसिक कणखरतेची कसोटी प्रसंग पाहणारे प्रसंग आले की अशा ऑनलाईन खेळांच्या नादी लागलेल्या लोकांना खेळातल्या विजयाचे प्रसंग आठवून त्यांची पाऊले आपोआप गेमिंगकडे वळतात. मानसशास्त्रात हा प्रकार 'क्लासिकल कंडिशनिंग' या नावाने ओळखला जातो.

हे खेळ काही वेळ खेळून सोडून देण्यासारखे निश्चित नाहीत. ते खेळायचे असतील तर बराच वेळ द्यावा लागतो. खेळात एखाद्या जागी माघार घ्यावी लागणं आणि एखाद्या प्रसंगी जिंकणं यात अशा प्रकारे समतोल साधला जातो की खेळणार्‍यापुढे जिंकण्याचं गाजर सतत नाचवलं गेल्याने त्याला पुढे खेळत राहण्याशिवाय पर्याय नसतो. खेळताना आपण नक्की कधी जिंकणार हे सांगता येत नाही. विजय हा अगदी पुढच्या क्षणाला मिळू शकतो, पुढच्या तासात तुम्ही जिंकू शकता, किंवा जिंकायला अगदी दिवसभरही लागू शकतो. पण बराच वेळ हरतोय म्हणून आपण खेळ खेळणं थांबवलं तर तो जिंकण्याचा क्षण गमावू ह्या भीतीने खेळणारे अमर्याद काळ खेळतच राहतात. सतत अनेक तास असे खेळ खेळल्याने ताणामुळे काहींनी आपला जीव गमावल्याचीही उदाहरणं आहेत.

किशोरावस्थेत असलेल्या मुलांत या व्यसनाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव असला तरी लहान मुलेही याला अपवाद नाहीत. माझ्या एका मित्राची प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी त्यांच्या घरातल्या संगणकावर बार्बी हा खेळ खेळते. त्याबद्दल हटकलं असता चिडचिडी होते आणि हट्टीपणा करते. जी मुले बंदुका, तोफा आणि तत्सम गोष्टी असणारे खेळ खेळतात त्यांना राग लवकर येतो आणि अशी मुले हिंसक होण्याची शक्यता असतेच असते.

vyasan03.jpg

ही बाब आता फक्त ऑनलाईन खेळांपुरती मर्यादित नाही तर अश्लील मजकूर, चित्रे आणि चलतचित्रे असलेली संकेतस्थळे, चॅटींग आणि सोशल नेटवर्किंग यांनीही या व्यसनाचा मोठा भाग व्यापला आहे. आंतरजालीय जुगार, समभाग खरेदी-विक्री, पोर्नोग्राफी, आणि सेक्स चॅट हे या ई-व्यसनाचे काही घटक.

इंटरनेट उर्फ आंतरजालाचे व्यसन ह्या गोष्टीने आता इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. संस्थेत या नवीन व्याधीवर उपचार घेणार्‍यांमधे बहुतांश शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आहेत. उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच 'सायबर रिलेशनशिप अ‍ॅडिक्शन' हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष, वाचन-लेखन-मनन आणि मैदानी खेळ खेळण्यास अनुत्सुक असणे यासारख्या बाबींकडे घरातल्या मोठ्यांचे एक तर वेळेवर लक्ष जात नाही, किंवा अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. शेवटी सहामाही/वार्षिक परीक्षेत दिवे लागल्यावर प्रगती पुस्तकात दिसणारी अधोगती हा पालकांसाठी एक मोठा धक्का असतो. मग सुरवातीला आपली मुलं संगणक लिलया हाताळतात हा अभिमान गळून पडतो आणि पालकांच्या जीवाला नवीन घोर लागतो. इतर व्यसनग्रस्तांप्रामाणेच आपल्याला व्यसन आहे हेच मुळात या मुलांच्या गावी नसते. मुक्तांगण संस्थेतले समुपदेशक अशा मुलांना हीच गोष्ट आधी पटवून देतात.

उपचारांच्या दुसर्‍या टप्प्यात मग त्यांच्या भावी प्रगती बाबत बोलून त्यांना प्रोत्साहित केले जाते. समुपदेशनाबरोबरच ध्यानधारणा, वाचनास उद्युक्त करणे, वेगवेगळे मैदानी आणि घरगुती खेळ खेळायला लावणे, अशा विविध प्रकारे 'बरे' केले जाते. अडनिडं वय आणि या आजाराचे विचित्र स्वरूप यामुळे या मुलांना ई-व्यसनमुक्त करण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि लागणारा वेळ हा अर्थातच इतर व्यसनाधीन लोकांपेक्षा अधिक असतो. मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन केलं जातं. कारण फक्त मुलांचंच नव्हे तर संपूर्ण घराचं सौख्य आणि शांती अशा गोष्टींमुळे हिरावली जाते. मुलं संगणक वापरत असताना त्यांना विचित्र वाटणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला पालकांना दिला जातो.

सद्ध्या मुक्तांगणमधे ई-व्यसनांवर उपचार घेणार्‍यांमधे मुलं आणि तरुणांचे प्रमाण जास्त असलं तरी भविष्यात संस्थेत उपचारासाठी दाखल होणार्‍यांमधे मोठ्यांची संख्या वाढू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक नुकसान, दैनंदिन वेळेचा अपव्यय याबरोबरच ऑफिसमधल्या कामावर परिणाम होणे याही गोष्टी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. यापायी अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्याचीही उदारहणे आहेत. समविचारी लोकांशी संपर्कात राहणे आणि स्वतःला रचनात्मक पद्धतीने व्यक्त करणे या उद्देशाने आपण अनेक सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो आणि इतर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या मेंदूत प्रवेश करतात. आंतरजाल हे साधन आहे, साध्य नव्हे याचा वेगाने विसर पडतो.

मी आत्ता ज्या आस्थापनात काम करतो तिथे एकेकाळी कर्मचार्‍यांना आंतरजाल मुक्तपणे उपलब्ध होतं. जीमेल, याहू, ऑर्कुट, फेसबुक, विविध चॅट संकेतस्थळे, युट्युब आणि इतर सगळ्या संकेतस्थळांवर दिवसातल्या कुठल्याही वेळी सगळयांचा मुक्त वावर असायचा. पण प्रमाणाबाहेर वापर वाढला आणि कामावर परिणाम होऊ लागला तसा हा वेळ नियमबद्ध करुन फक्त दिवसातला अर्धा तास असा केला गेला. आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो. अनेक आस्थापनांत हाच वेळ एक तास असला तरी एका वेळी फक्त दहा मिनिटं अशा प्रकारे तो वापरावा लागतो. याचाच अर्थ आंतरजालाचा वापर कसा आणि किती करावा यासंबंधात मोठ्यांनीही आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

इतर काही नाही म्हणून करमणुकीसाठी आंतरजालावर फेरफटका मारायचा याला काही अर्थ नाही. आंतरजाल की करमणुकीची जागा आहे हा समज निखालस चुकीचा आहे. कारण आंतरजाल हे टीव्ही सारखं इडीअट बॉक्स नव्हे. नेटवर बसल्यावर सतत माणसाचा मेंदू जागृत असतो, त्याला आराम मिळत नाही. सतत 'अ‍ॅलर्ट' रहावं लागत असल्याने मग थकवा येणं हे ओघाने आलंच.

vyasan04.jpg

मुळात आपल्याला आंतरजालाचे व्यसन लागले आहे ह्याची जाणीव होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एखादे महत्वाचे काम करण्यासाठी आपण लॉग-इन केले, आणि काही क्षणांच्या कामासाठी आलेलो असताना आपण अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन आहोत असे लक्षात आले आहे का कधी? आंतरजालावर सोशल नेटवर्किंगमधे किंवा इतर गोष्टींमधे गुंतल्याने ऑफिसची काही अर्थातच महत्वाची असलेली पण बिनतातडीची कामे पुढे ढकलायची सवय लागली आहे का? वैयत्तिक आयुष्यातले वैफल्य किंवा ते निर्माण करणार्‍या समस्या सहन होत नसल्याने त्यापासून पळण्यासाठी तुम्ही आंतरजालावर येता का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर "हो" असले तरी सावध व्हा. एखाद्या संस्थेत जाऊन ई-व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभागी व्हायला कमीपणा वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हेच सूत्र इथेही उपयोगी पडते. एकदा निग्रह करा, मग वास्तवाशी सामना करणे ही बाब ई-व्यसनांच्या विस्तवाशी खेळ करण्यापेक्षा नक्कीच सोपे वाटू लागेल.

मग करताय ना निश्चय?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

सर्व छायाचित्रे: स्वतः काढायला आवडली असती पण सायबर कॅफेत परवानगी मिळाली नाही त्यामुळे नाईलाजास्तव आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 

मला वाचनाचे "पिसें" लहानपणापासून आहे.. नि त्यामुळे माबोचेही आहे.. काय करावे?

कोणाचे तरी छान लिखाण आले की मनाचा ब्रेक वै. काही रहात नाही Sad काय करावे?

गेम्सचे पिसें सुटावे म्हणून मी त्यातल्या मोस्ट डिलेड अ‍ॅक्टीव्हीटी सूरू करते.. म्हणजे ३ दिवसांनी येणारी पिके.. इमारती वै... मग हळू हळू गेम मागे पडतो.. सध्या सिटीविलेवर हा प्रयोग सुरू केलाय.. पण पूर्ण दुर्लक्ष करता यावे ह्यावर काय उपाय?

<<< आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो.>>> ये बात कुछ हजम नही हुवी

ही गोष्ट १००% खरी आहे. आधी आमच्या कंपनीत ( मॅस्टेक) मध्ये २४ तास ईंटरनेट वापरता येत होते. पण अती वापर वाढल्यावर सर्व्हर वर सुद्दा अतिरिक्त ताण यायला लागला आणि ऊत्पादनक्षमता घटली.

त्यामुळे व्यवस्थापनाने दिवसभरात फक्त ३० मिनीटे, तेही सलग फक्त ५-१० मिनीटे, एव्हढेच सर्फिंग करता येते होते आणि अजुनही हीच परिस्थिती आहे.

यावर South Park मालिकेचा एक भाग आला होता. Happy

इंटरनेटचे व्यसन त्याचा वापर करणार्‍या जवळपास प्रत्येकाला आहे फक्त मुलांनाच नाही (पालकांना पण आहेच) कोणी फेसबुक, कोणी गेम्स, कोणी सतत इमेल चेक करणे, तर कोणी मायबोली, कोणी अजून काही अशी कुठेना कुठे नियमित हजेरी लावतातच आणि ते नियमित करता आले नाही तर अस्वस्थ होणारे आहेतच.

चांगला लेख मंदार. ह्या विषयावर आधीही वाचले होते, मुक्तांगणच्या ह्या कार्यक्रमाविषयी नव्याने समजले. धन्यवाद. Happy

अतिशय उपयुक्त लेख आहे. ईंटरनेट ने जश्या अनेक सुविधा उप्लब्ध करुन दिल्या जसे बँकींग, न्युज, फायनान्स ई. त्याच प्रमाणे अनेक वेळ व डोकं-खाऊ सेवा दिल्या जसे गेम्स, माक्रोब्लॉगींग, सो.नेटवर्कींग, फोरम्स.
या सर्व गोष्टींचा योग्य वापर, वेळेचे योग्य नियमन करण्याची नितांत गरज आहे.

प्रत्येक भारत-वारीत, "मी एक महिना ईंटरनेट शिवाय जगू शकतो" याचा अनुभव येतो, पण ईंटरनेट मिळताच जैसे थे. तरी माझे गेम्स वगैरे एकदम बंद झाले. सध्या फक्त मायबोली आणि मराठी वर्तमान पत्रे ही दोनच व्यसने आहेत.

चांगला लेख ,
पालकांनी आपल्या मुलांकडे जास्त दिलं पाहिजे , ते कुठं जातात , काय करतात , कोणाबरोबर फिरतात , किती खर्च करतात, तरच मुलांवर कंट्रोल करनं शक्य आहे.

मंदार,
खूप महत्वाचा लेख. निवडक दहात.
फेबुवर पण लिंक दिलीये या लेखाची तुझ्या परवानगीशिवाय Happy

(फेबुचं तितकं व्यसन नाहिये, पण माबोचं व्यसन लागलंय त्याला काय करायचं?
एक उपाय आहे, ऑफशोअरला परत यायचं. तिकडे माबोवर बंदी आहे.. Happy )

शिवाय नजिकच्या भूतकाळात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.
मंदार,
पुर्ण अनुमोदन !
सध्याच्या पिढीच्या मानसिकतेवर विचार कारणारा, खुप महत्वाचा विषय मांडल्याबद्दल अभिनंदन !

या असल्या अनेक प्रकारच्या शेकडो गेम्स, त्यातही काही हिंसक असणार्‍या गोष्टी या मुलांना काय शिकवणार आहेत ? किती पालक लोक कैफेत जाणार्‍या अशा मुलांना मैदानावरचे खेळ खेळण्यासाठी आग्रह करतात हा तर एक वेगळा प्रश्न आहे.
काही खेळातुन मुलांच्या बुद्धीचा विकासही होत असेल, पण यातुन मुलांमध्ये विनाकारण चिडचिड, हिंसकता, आक्रमकता,राग देखील वाढत आहे अस मला वाटतं
Happy

मंद्या हा असा लेख तुझ्याकडुनच अपेक्षीत होता. अगदी परफेक्ट लिहलंयस.
आजकालच्या तरुण पिढीला मैदानी खेळच माहीत नसतात, आणि माहीत असले तर खेळायला मैदानच उपलब्ध नसतात. मग हाच एक पर्याय उरतो. मी तर कधी कधी रात्र्-रात्र १२-१४ तास ऑनलाईन चेस खेळत बसायचो. काही दिवसांनी डोळ्यांना त्रास होउ लागला, झोप नाही, वेळेवर जेवण नाही, दुसरे काही काम नाही, फक्त चहा आणि चेस बस्स. मग जॉबला लागल्या पासुन इंटरेस्ट कमी झाला (आहे).

एका १०-११ वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला उपस्थित रहाण्याचा योग आला होता. तेथे त्या मुलाच्या वयोगटातील सर्व मुलांच्या बोलण्यात एकच विषय होता तो म्हणजे माझ्याकडे किती व्हिडीओ गेम्स आहेत आणी तुझ्याकडे किती आहेत. पीएसपी, निंटेन्डो, प्लेस्टेशन वगैरे नावे त्यांच्या बोलण्यातुन कळली. Sad
आश्चर्य ह्या गोष्टीचे वाटले की खुप मुलांच्या आया अभिमानाने सांगत होत्या की माझ्या मुलाला सोसायटीत ईतर मुलांबरोबर खेळायला आवडत नाही आणि तो मोकळ्या वेळेत फक्त व्हिडीओ गेम्स खेळतो.
सायबर कॅफेत व्हिडीओ गेम्स किंवा ऑनलाईन गेम्स खेळताना दिसणारी मुले हे विजीबल आहे पण अशी किती मुले असतील की जी घरात बसुन कित्येक तास वाया घालवतात. आणी आई वडील ज्यांना नोकरीसाठी पुर्ण दिवस घराबाहेर घालवावा लागतो ते मग असा विचार करत असावेत की मुलगा कशात तरी गुंतुन राहतोय ना मग झाले तर.
कुठे तरी असे ही वाचण्यात आले होते की ज्या मुलांना लहानपणापासुन व्हिडीओ गेम्स चे व्यसन म्हणा किंवा चटक म्हणा लागलेले असते, ती मुले नंतर एकलकोंडी होतात, त्यांना लोकात पटकन मिक्स होता येत नाही. आणी वर अनिल७६ ने म्हणल्याप्रमाणे "काही खेळातुन मुलांच्या बुद्धीचा विकासही होत असेल, पण यातुन मुलांमध्ये विनाकारण चिडचिड, हिंसकता, आक्रमकता,राग देखील वाढत आहे अस मला वाटतं"

क्लास लिहिला आहेस लेख मित्रा. सुंदर विषय निवडलास.
मोकळ्या हवेत खेळणं, मुक्त बागडणं, खेळतांना ढोपरं फोडून घेणं हे या पिढीला माहीतीच नाही रे. काय करणार आपण तरी. सायबर कॅफे मधे खेळता खेळता अचानक? समोर उघडण्यार्‍या पॉर्न साईट्स पाहून यांची मनं विचलीत नाही झालीत तरंच नवल काय ते. यातूनच मग पुढे सायबर क्रिमिनल्स उभ राहतात.

एक प्रकारची नशा लागते माणसाला, ज्याची पाळंमुळं ही त्यांच्या बालवयातंच रूजली गेलेली असतात. आताचं हे जग, जनरेशन लक्षात घेता कधी कधी स्वताच्या पोरांची काळजी वाटते रे. की काय असेल यांच भवितव्य. आपण कीतीही लक्ष ठेवू, संस्कार करू पण, उंबरठ्याबाहेर??? तिथे तर आपण नसणारंच ना.

आयुष्यात मागे वळून पाहिलं की खरोखर आपल्या जन्मदात्यांचे ऋण आठवतात. नशीब त्यांनी आपल्याला चांगले संस्कार दिले अन् आपणही कुठे वाममार्गाला वाहावत गेलो नाही.
पण ही आत्ताची पिढी पाहता एकंच वाट्टं.
परमेश्वरा, सांभाळ रे लेकरांना..

अतिशय खोलवर रूजलेला विषय. पण अवांतराबद्दल क्षमस्व..

गिरिकंद, गेल्या विकेंडला मला आलेला अनुभव-
१ वर्ष वयाच्या मुलाचा वाढदिवस. जमलेली लहान मुले १ ते ३ या वयोगटातली. जेवायच्या वेळी सगळ्या आयांनी आपापली आय पॅड, टॅबलेट, लॅपटॉप वगैरे मुलासमोर उघडली आणि मुलाला भरवायला सुरुवात केली. मख्ख चेहर्‍याने आया भरवत होत्या आणि समोरच्या स्क्रीनवरची नजर न हटवता मुलं खात होती. मुल आणि आई या मध्ये कसलाही संवाद, साधा आय कॉन्टॅक्टही नव्हता. जिच्या घरी पार्टी होती त्या गृहिणीने ' तिच्या कडचा स्पेअर लॅपटॉप कुणाला हवाय का? संकोच बाळ्गू नका' असे अगत्याने सांगितले. आता अशा प्रकारे वाढणारी मुले उद्या सतत टिव्ही, काँप्युटरला चिकटून बसली तर त्यात त्यांची काय चूक ?

व्हिडीओ गेम्स चे व्यसन म्हणा किंवा चटक म्हणा लागलेले असते, ती मुले नंतर एकलकोंडी होतात, त्यांना लोकात पटकन मिक्स होता येत नाही.
गिरी,स्वाती२,
माझा गेल्या महिन्यातला असाच एक अनुभव ...
एका वाढदिवसाच्या निमित्ताने (दुसर्‍या दिवशी) गेलो, मराठी /कानडी बोलणार कुटुंब,घरी बाकीचे नातेवाईक,भावाची मुले होती, त्यात एक ५ वर्षाचा एक मुलगा,तो आणि घरचे सगळे कोल्हापुरला राहायला, कॉन्वेंट मध्ये शिकणारा, मी त्याला मरात्।इत नाव विचारलं तर तो काहीच बोलला नाही, पुन्हा माझ्या मुलांनी दादा म्हणुन नाव विचारल, तरी तो नुसता बघत होता, आणि मी त्याला जवळ घेऊन बोलवता केला तर त्यांनी ,घरी मराठी बोलायच नाही,फक्त इंग्रजी अस शाळेतल्या बाईनी सांगीतल्याच सांगीतल,घरच्यानी देखील हेच सांगीतल असेल, पण फक्त यालाच शिक्षण म्हणता येइल का??

उत्तम लेख .इथे तर पहिलीच्या मुलाला सुद्धा व्यवस्थीत कॉम्प्युटर ऑपरेट करता यावा अशी सुव्यवस्था शाळेतच असते .अनेक वेळा मनात येत की हे खरच इतक गरजेच आहे का ?मला वाटत महाविद्दालयापासूनच मुलाना कॉम्प्युटरची तोंडोळख व्हावी .लहान मुल व्यसनी होऊन कस चालेल?
मोठ्यानीसुद्धा दिवसातला थोडाच वेळ ऑनलाईन रहाव अशी स्वतःलाच शिस्त लाऊन घ्यायला हवी .

लहान मुल व्यसनी होऊन कस चालेल?
मोठ्यानीसुद्धा दिवसातला थोडाच वेळ ऑनलाईन रहाव अशी स्वतःलाच शिस्त लाऊन घ्यायला हवी
खरच,खुप महत्वाची ,विचार करायला लावणारी वाक्ये वाटली ही !

माबो/फेबु या व्यसनांचं काय करायचं? >>>

फेबुचं व्यसन घातकच ! माबोकडे मात्र त्या नजरेने पाहायचं नाय बर्का सांगुन ठिवतो Wink

मंदार क्याफेवर २ जण बसु शकतात. त्याती कीत्येक किशोरवयीन आहेत अगदी मुले, मुली सुध्दा. बर्‍याच वेळा मी नेट बंद असल्यास नेट क्याफेवर जाण्याची गरज पडते तेव्हा ही मुले असतातच. त्यांना हे व्यसन जडलेले आहेच. पण पालकही दुर्लक्ष करतात.

नोव्हेंबर मधली बातमी आजच सापडली

http://72.78.249.107/esakal/20101111/4975182729766942855.htm

इंटरनेटच्या माध्यमातून 'लाइव्ह' आत्महत्या

वृत्तसंस्था
Thursday, November 11, 2010 AT 09:05 AM (IST)
Tags: tokio, japan, internet, suicide, crime, international
टोकियो - बॉलिवूडचा हिंदी चित्रपट "पीपली लाईव्ह'मध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या केली आहे, मात्र जपानमध्ये एका युवकाने इंटरनेटच्या माध्यमातून आत्महत्या करणार असल्याचे घोषित करून, आत्महत्या केली आहे. ही घटना जपानमधील सेंदाई शहरात मंगळवारी (ता. ९) घडल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले.

सांकई शिंबून या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षाच्या युवकाने नोकरी गेल्यामुळे राहत्या घरात आत्महत्या केली आहे. काही दिवसांपासून तो इंटरनेटच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात होता. मात्र, नोकरी मिळविण्यात तो अपयशी ठरला होता. सोमवारी रात्री त्याने एका संकेतस्थळावर "लाइव्ह' आत्महत्या करणार असल्याचे घोषित केले होते. ही माहिती वाचून अनेकांनी त्या संकेतस्थळावर प्रतिक्रिया लिहिल्या होत्या. त्यामध्ये काहींनी आत्महत्या करू नकोस, तर काहींनी लगेच आत्महत्या कर म्हणून लिहिले होते.

सोमवारी सकाळी साडेपाच वाजता त्याने इंटरनेट समोर ("लाइव्ह') गळफास घेऊन आत्महत्या केली.

चान्गला लेख! हा प्रश्न ज्वलन्त बनू पहातोय हे निश्चित!

>>>>मला वाचनाचे "पिसें" लहानपणापासून आहे.. नि त्यामुळे माबोचेही आहे.. क>>>>>पण पूर्ण दुर्लक्ष करता यावे ह्यावर काय उपाय?<<<<

जाईजुई,
या व लेखात वर्णन केलेल्या फेजमधुन मी गेलेलो आहे. पण यावर उपाय एकच, तो म्हणजे, बाह्य पन्चेद्रियान्ना जाणवणार्‍या गोष्टी बाह्य साधनान्चा वापर करुन त्याद्वार जाणवुन घेऊन त्यावर "प्रतिक्रियात्मक" जगण्याचे सोडून देणे, व जे काय करायचे ते माझे मी माझे हातपाय हलवुन प्रत्यक्षात करायचे, स्क्रीनवरील खेळान्च्या भ्रामक दुनियेत वावरायचे नाही, दुसर्‍यान्च्या प्रतिसाद/उपेक्षा/कौतुक (आणि हो, अनुल्लेखही Proud ), कशाचीच अपेक्षा न ठेवता, जी जी काही कृती करता येईल, ती ती स्वतः करत रहाणे. अन मग अगदी छोटी छोटी कामे देखिल मन रमवुन नेतात. माझ्यापुरते मी घरातील असन्ख्य छोट्या छोट्या दैनन्दिन कामान्चा वापर करुन घेतला आहे, मग कधी फरशी पुसायला काढा-केरवारे करा, चौरन्ग बनवा, क्राफ्ट करा, मोकळी गच्ची आहे तर दहाविसकिलोच्या हिशोबाने वाळवणे घाला, अगदी काय वाट्टेल ती कामे, पण करत रहायची-एकामागोमाग.
मध्यन्तरी अवकाळी पाऊस पडला, घरी पोचलो होतो, अन्गणाबाहेरुन रस्त्याच्या कडेने झुळूझुळू पाणि वहात होते. क्षणार्धात चमकलो मी, आठवले की अरे अशा वहात्या पाण्याकडे बघत भान हरपायचे आपले, त्यात सोडलेल्या कागदी नावा, पुढे कुठे जात असतील, काय होत असेल, आपणच त्या नावेत असलो तर.. या व अशा विचारात गुन्गुन जायचो आपण, अन आता नजरेसमोर निसर्गाने येवढे ओहोळ साक्षात तयार ठेवले असताना माझ्या मनाला राहुदेच, नजरेलाही ते जाणवु नयेत येवढा मुर्दाड मी कशाने बनलोय? वाढत्या वयामुळे? की मनच "रेडीमेड" विकतच्या सुखाच्या, विकतच्या रेडीमेड विचारांच्या मागे लागल्याने?
मला वाटते की उपाय ज्याच्यात्याच्यापाशीच आहे, गरज आहे ती निश्चयाने तसे वागायची.

Pages