आठवडी बाजार

Submitted by वर्षू. on 5 May, 2011 - 23:02

या आठवणी ही माझ्या भास्कर काकाच्या.. गतकाळाच्या या आठवणींत रमून जातांना त्याला वयाच्या ७८व्या वर्षी ,बालपणीचे दिवस पुन्हा अनुभवायला मिळत आहेत.
हे ललित ही त्यांच्याच शब्दांत..

आठवडी बाजार

मुलांना बाजारमास्तर घडविण्याचं कर्तव्य वडिलांचेच. म्हणून त्यांन घेऊन बाजाराला जायचं. जबलपूरला अशा अथांग-अफाट सागरा सारख्या मोठ्ठ्या आठवडी बाजारा्ला गुरंदी म्हणत.
मोठ्या भावाची, तो अमरावती-नागपूरला शिकायला असल्यामुळे सुटका झाली होती. बहिणींच्यामागे हा ताप नव्हता.
खटलं पण मोठंच होतं.बहिणी दोन मोठ्या, एक सर्वात लहान, माझ्या खाली दोन लहान भाऊ. शिवाय, आल्या-गेल्या पाहुण्यांची सतत वर्दळ असायचीच.वडिल गांवकाका म्हणून, आईला सगळे काकू म्हणायचे. तिच्या दिमतीला राबणार्‍या चाकरांची संख्या-- एक महाराज किंवा स्वैपाकीण, वर कामाला दुलारे नांवाचा गडी,एक बुढ्ढी नांवाची चोविस तास हजर मोलकरीण होती. आत पडवीत राहून स्वतःच जेवण स्वतंत्र करीत असे. वैशिष्ठ्य म्हणजे आतल्या अंगणात गोवर्‍यांवर गाकर भाजून घ्यायची पण वरण-भात आणि भाजी एरवी सर्वांसाठी तयार असलेली खायची. गाकर भाजल्याचा वास तेंव्हासारखा आजही आसमंतात भरलेला जाणवतो .ओकांच्या बंगल्याचा तळमजला भाड्याने घेतलेला होता. बाहेर मोठ्ठ पटांगण आंत सुद्धा पटांगण असा परकोटातला महालच. खोल्या म्हणाव्या तर -- मोठ्या आणि भरपूर; दोन पडव्या,दोन हॉल,दोन अभ्यासिका, देवघर,कोठीघर न्हाणीघर दोन सेप्टिक टॅंकचे संडास आणि त्या मागे सरपणासाठी जागा इतकी कि वर्षाचा चिरलेला लाकुडफाटा,कोळसा,लाकडाचा भूसा साठवलेला असायचा. वरच्या मजल्यावर मालक सहकुटुंब रहात नंतरच्या काळात एका बाजूला ओळीने असलेल्या खोल्या एका जोडप्याला दिलेल्या होत्या.नाना आयाचित आणि कुसुम ताई अतिशय प्रेमळ. एकत्र कुटुंबाच्या जिव्हाळ्याने रहात होते. नाना भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असून उत्तम चित्रकार होते. असो,.थोड विषयांतर झालं पण अटळ म्हणून.
.
आजकाल भाजी आणायची म्हटलं कि जवळपासच्या मॉलला जायचं. थोडक्या वेळात रॅक वरून हवी ती, हवी तेवढी घ्यायची आणि इलेक्ट्रोनिक काट्यावर वजन करून मिळालेले बिल चुकते करायचे अन करून मिळालेले बिल चुकते करायचे इतकं सोपं झालं आहे. आपण फसलो नाहीए-- वजनात किंवा भावात अशा समाधानात घरी परत यायचं.

आमच्या लहानपणी मॉल नव्ह्ते. विक्रेत्याशी हुज्जत घालायची, निवडून भाजी घ्यायची आणि बरोबर फुकटची मिर्ची-कोथिंबीरपण मिळवायची. एरवी सौद्याच समाधान नसायचंच. नाहीच पटलं तर दुसरं दुकान गाठायचं..अशा वेळी, दोघांच्या भिडलेल्या नजरा खूप काही सांगायच्या एकमेकांना -- " देख लेंगे - फिर मिलेंगे" असे संमिश्र भाव उमटायचे.
"ए रोठ्या ऊठ !" अशी दणकट आरोळी ऎकून झोपेतसुद्धा घाम फुटायचा. हाताच्या काठीच्या टोकाने आधी पांघरूण बाजूला आणि मग टोक सरळ पाठीत रुतायच. आईनी कितीहि विनवण्या केल्या तरी दर रविवार असाच उगवायचा.
खरं सांगायच तर शनिवारची झोप त्या धास्तीने उडालेलीच असायची. रात्रभर स्वप्न पडायची त्या बाजाराची !
मोठा भाऊ तर शिकायलाच परगावी म्हणून या तडाख्यातून सुटलेला. तस आमच खटलं मोठं आणि खवैय्यांच. इतक्या मंडळींसाठी आठ दिवसांची भाजी किती लागावी ह्याची कल्पना यावी. कांदे आणि बटाटेच प्रत्येकी आठ-दहा शेर; रोज दोन,तीन वेगवेगळ्या भाज्या, कोशिंबीरी, असायच्याच.
७-७.३० चा सुमार. घरात दोन मोठ्या बहिणी आणि एक सर्वात लहान पाठचे दोन भाऊ. सगळे उशीत तोंड झाकून मिष्किलपणे लोळत पडलेले. काका (वडील) अनेकदा बखोट्यालाच धरून झटक्याने उठवायचे. "चल झटपट तयार हो, चहा पिऊन सायकलवर नीघ. ५-७ मोठ्या पिशव्या घेऊन गुरंदीच्या तोंडाशी मला गाठ. आणि हो, सायकल स्टॅंडवर ठेऊ नकोस. माझ्या मागे-मागे घेतली भाजी पिशवीत ठेवायची आणि गर्दी गर्दीतून वाट काढायची,कुणाशीही वाद घालण्यात वेळ घालवायचा नाही. चल पटपट. भाजी घेऊन तू सरळ घरी ये. मला शाळेची मीटिंग आहे. कळलं? "

सुट्टीच्या दिवशी रेंगाळत चहा पीता येऊ नये या पेक्षा दुर्दैव ते काय ? घाईने उरकून, चहा ढोसायचा,रिकाम्या पिशव्या एकात-एक घालून सायकलच्या हॅंडलवर लटकवून टांग मारायची. जेमतेम एक मैल अंतर. पण पोहोचायला वेळ लागायचाच. वाटेत मित्र भेटायचे,काकांची चौकशी करणारे सुद्धा.वयस्कांशी बोलताना सायकलवर बसल्या-बसल्या नव्हे उतरून आदबीने बोलायला वेळ लागणारच. धिप्पाड अंगयष्टीचे काका दूरूनच दिसायचे. धोतर-बंगाली कुडता,डोक्याला काळी टोपी,उपरण,पायात भक्कम कोकणी वहाणा, मनगटाला चंदेरी पट्ट्याच गोल ठळक घड्याळ आणि हातात काठी. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतरचा भक्कमजाड फ्रेमचा चश्मा आणि त्यातून दिसणारे मिष्किल-भेदक मोठ्ठे डोळे गोर्‍यापान कांतीमुळे अधिकच उठून दिसायचे.
विक्रेत्यांसाठी एका मोठ्ठ्या मैदानात लांबलचक बांधील चबुतर्‍यांच्या असंख्य ओळी; दोन चबुतर्‍यां मधे ग्राहकांना वाट अशी बाजाराची मूळ आखणी. वेगवेगळ्या भागात लोखंड-पत्रा,फर्नीच्रर,औजार,कपडे अशा जुन्या वस्तूंची विक्री तर दुसर्‍यात धान्य बाजार.त्याला लागून भाजीपाला. नगरपालिका महान झाली तरीसुद्धा व्यवस्थेत नगण्यच बदल. वाढती लोकसंख्या,व्यस्त प्रमाणातले अतिक्रमण, दुर्गंध-सांडपाणी हे होतेच. सायकल आत न्यायला परवानगी नसली तरी नियम धाब्यावर ! पालिकेचे निरिक्षक टॅक्स वसूली निमित्ताने चिरिमिरी उकळायच्या कामात दक्ष !
जवळपासच्या खेडोपाड्यातून आणलेली भाजी घेऊन बसलेले -बाया-पुरूष जागा मिळेल तिथे.कोण कुठल्या ढीगातली विकतोय हे ओरडून विचारलं तरच कळणार. अतोनात गोंगाटात तेही दुरापास्त. मोकाट गुरंसुद्धा खाद्य शोधण्यासाठी स्वैर उधळायची. गोठ्यात पाळलेली, क्वचितच धष्ट्पुष्ट पाहण्यात होती. पण ही मोकाट- आयतं खाऊन अति पुष्ट आणि धिप्पाड. खोंड-गाई बेदरकार स्वभावाच्या. अचानक हुंकार फोडून, शिंग उगारून, ढोसाळून आक्रमण करण्यात पटाईत. त्या बुल फाईटच वर्णन करायला एखादा फ्रेंच लेखक सुद्धा कचरेल!
काका हातातल्या काठीने विक्रेत्याच लक्ष वेधून हाताच्या बोटांचा उपयोग करून भाव ठरवायचे आणि काठीच्या टोकानेच भाजी निवडायचे. घेतली कि योग्य त्या पिशवीत ठेवायचे. बर्‍याचदा सायकल सकट वाट काढताना इतरांशी चकमक व्हायची. थोडीशी बाचाबाची झाली कि वाट पण मिळायची. कुणीतरी हॅंडल ओढून-धक्का देऊन मोकळे. एखाद्या पिशवीचा बंदच तुटायचा. नशिबानी दोन्ही बंद कधीच तुटले नाही. तुटका शेजारच्या पिशवीच्या बंदाला बांधून आगे कूच करताना तारांबळ व्हायची. तास दीड तास कसरत करून तट्ट फुगलेल्या पिशव्या टांगून परतीचा प्रवास सुरू.
एकदा असाच, बाहेर येताना स्वस्त मिळालेला "मालेगांवचा" भले लठ्ठ मुळा लांबलचक पाल्यासकट सायकलच्या कॅरियरला होता. मागून अचानक हाणामारीचा कल्लोळ आला. बघितल तर धिप्पाड खोंड सर्वांना तुडवून माझ्याच मागे ! इंगळासारखे लाल डोळे, इंगळासारखे लाल डोळे, ताठ झुकलेली मान,ताठरलेल शरीर, उंच वक्राकार शेपूट आणि रोखलेली शिंगं. दोन्ही बाजूचे लोक हाठ-हाठ करत होते. वेडावलेल्या मानेचा आणि झटकलेल्या मागच्या पायांचा धाक त्यांना दूर ठेवत होता. एका भाजीवाल्याच्या दांडक्याचा धपकन आवाज आला. अजूनच जोमाने लाँग जंप घेऊन तो आला.
सायकलच्या अडथळ्याला जुमानेल असे वाटून मी तसा पवित्रा घेतला. कॅरियरचा मुळा पाल्यासकट घेऊन तो बाहेरच्या रस्त्यावर सुरक्षित उभा. डोळ्यात खाद्य मिळाल्याच समाधान होत कि माझ्या बद्दल कृतज्ञता होती हे अजून मला न सुटलेल कोडंच आहे.

गुलमोहर: 

.

"डोळ्यात खाद्य मिळाल्याच समाधान होत कि माझ्या बद्दल कृतज्ञता होती हे अजून मला न सुटलेल कोडंच आहे."
..... छान

चित्रदर्शी सुरेख वर्णन! आवडले. त्यात वातावरण डोळ्यांसमोर उभे करण्याची किमया आहे.

मला माझी, नागपुरातील "कॉटन मार्केट" मधून भाजी आणतांना होणारी प्रभातफेरी आठवली.
खोंडाचे वर्णन आठवून मनात भीतीची लहर धावली.

रच्याकन, भास्करकाका बरेच गोष्टीवेल्हाळ दिसतात. येऊ द्यात त्यांच्या आठवणी.

वा सुंदर वर्णन. वर्षू, या काळावर आणि त्याकाळच्या माळव्यावर, सलत सूर सनईचा, अशी एक मस्त कादंबरी आहे. ते सगळे वर्णन तूला त्या काळात घेऊन जाईल. मी भारतात गेलो, तर शोधीन.

चिमुरी,उल्हास जी,भाऊ,बेफिकिर,रैना,नरेंद्रजी,दिनेश दा,सावली.. खूप धन्यवाद.

काकांकडूनही सर्व वाचकांना धन्स. Happy

वर्षु नील - हे खूपच छान वाटले वाचायला. आणि मुख्य म्हणजेआपण ते प्रकाशात आणलेय
काकांच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारे कौतुक मला येथून दिसतेय. आपल्या माणसासाठी एवढी मेहनत घेणे म्हणजे सगळे मार्क मी आपणालाच देतोय
खूप छान नि कौतुकास्पद लिखाण .नि आपली मेहनत .

प्रकाश, काकांच कौतुक आणी मेहनत रे.. ते मी माबोकरांसाठी इथे उपलब्ध करून देतेय फक्त..त्यातही आनंद माझाच Happy

लहानपणी, ७ वी, ८ वी च्या शाळेच्या माझ्या मराठी च्या पुस्तकात बाजारावर एक धडा होता, तो आठवला. छान मांडणी. डोळयासमोर उभा राहिला बाजार.

छान लिहले ,
आगदी १०० % ललित . आपले सर्व लेख आगदी आटोपशिर व विषायानुरुप असतात .
( उगिच्च पल्हाळ लावत नाहीत )

लक्ष्या .

वा ! मस्त लिखाण.. इथे दिल्याबद्दल धन्यवाद Happy
मला आधी वाटलं चीनमधल्या आठवडी बाजाराचे (आणि विविध प्राण्यांचे) फोटो आहेत की काय Happy

स्वप्ना .. गाकर म्हंजे घट्ट कणकेच्या जाडसर ,गोल पोळ्या.. लाटणं वापरून अथवा तळव्यावर थापलेल्या,गोवरी च्या जाळावर तवा ठेवून,मग चुलीवर डायरेक्ट आगीवर खमंग भाजलेल्या

ललित आवडले. अगदीच आटोपशीर.
काकांनी त्यांच्या काकांचे वर्णन मस्तच केले आहे.

स्वप्ना
मी आत्ताच नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा या भारती ठाकूरांच्या पुस्तकात वाचले, गाकर म्हणजे चुलीवर शेकलेल्या कणकेच्या जाड छोट्या रोट्या.
सकाळी तुझा प्रश्न वाचला होता आणि मलाही हाच प्रश्न पडला होता आणि पुस्तकात अचानक अर्थ सापडला. Happy
वर्षु तुम्हीपण गाकरचा अर्थ लिहीलात पण मी तो आत्ताच वाचला.

अगं जबलपूरकडे हा शब्द प्रचलित आहे..अश्या जाड छोट्या रोट्यांकरता. या गाकरांबरोबर वांग्याचं भरीत, साधं वरण तूप घालून, खूप मस्त लागतं. Happy
आता चूल नाही म्हणून गॅस वर भाजून कामचलाऊ गाकर बनवते .

मस्त भट्टी जमलीय. मला एकदम माझ्या बालपणाची आठवण आली. शनिवार आठवडे बाजार असायचा आणि भाजी आणणे ही जबाबदारी माझ्यावर एकट्यावर - वय वर्षे फक्त १२. सायकल राईड मिळते - म्हणजे भाजी आणण्यासाठी म्हणून उत्साह! ताजी ताजी भाजी,विक्रेत्यांचा कोलाहाल्,घासाघीस - एका भागात भाजीवाले,दुसर्या पेठेत कुंभार्,तिसर्‍या गल्लीत बुरूड आणि लोहार संमिश्र सारे. परवाच मुद्दाम गावी गेलो तेव्हा केवळ शनिवार म्हणून चक्कर मारली,भाजी खरेद्ली तेव्हा सौ चक्रावली इतकी कशाला ? काय सांगणार तिला - तो आनंद ! एकदा बैठक मारून लिहितोच. आजही भाजी आणायची म्हटले की मी लहान मुलाच्या उत्साहाने पळतो सगळे चक्रावतात. मला आवडते.
पु.ले.शु.

Pages