धमनी स्वच्छता उपचार

Submitted by नरेंद्र गोळे on 26 February, 2011 - 22:49

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. ह्या लेखात कुठल्याही उपायाची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. केवळ उपलब्ध पर्यायांची माहिती म्हणूनच ह्याकडे पाहावे. तरीही इथे हे नमूद करायला हवे की हे लिखाण निराधार नाही. बखरनुमा आहे. हे केवळ अनुभवातून/ वाचनातून आलेले शहाणपण आहे. या लेखात वर्णन केलेले धमनीस्वच्छता उपचार मी स्वतः घेतलेले नाहीत. त्यांची माहिती केवळ उपलब्ध पर्यायांपैकी एक म्हणून मिळवली होती. पुढे अनेक रुग्णांना हे उपचार घेतांना आणि बरे होतांनाही मी स्वतः बघितलेले आहे.

प्रस्तावना: धमनीकाठिण्य ह्या रोगाची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. ह्या लेखनाच्या आधारे 'सम्यक जीवनशैली परिवर्तनास' सामान्यजनांनी सिद्ध व्हावे, कर्मठपणे ते आचरावे आणि हृदयरोगच नव्हे तर इतरही अवनतीकारक रोगांना आपल्यापासून दूरच ठेवण्यात यश मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे. ह्या लेखनाचा आपल्या सार्‍यांच्याच आरोग्यस्थितीवर सकारात्मक, सत् प्रभाव पडू शकेल तेंव्हाच ते यशस्वी झाले असे समजता येईल.

धमनी स्वच्छता उपचार

सम्यक जीवनशैली परिवर्तनांचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आणि तो वसा, उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही ह्या निष्ठेने अंमलात आणण्यास सुरूवात केली की मग त्याचे प्रभाव शऱीरावर दिसू लागण्यासाठी किमान तीन ते चार सप्ताहांचा अवधी लागू शकतो. हृदयरोगाची अवस्था जर गंभीर असेल तर ह्या काळात त्यामुळे हृदयाघात, पक्षाघात, मूत्रपिंड बिघाड इत्यादींचा धोका कायमच असतो. त्या धोक्याची गंभीरता एमड़ी. कार्डिओलॉजिस्ट कडून तपासून घ्यावी व केवळ औषधाच्या बळावर धोका निवारता येण्यासारखा असेल तर औषधे तात्काळ सुरू करावी. धोका औषधांनी निवारता येण्यासारखा नसेल तर 'धमनी स्वच्छता उपचारां'चा पर्याय उपलब्ध असतो. तो पत्करावा. धोका त्यानेही निवारता येणारा नसेल आणि तीन प्रमुख हृदयधमन्यांपैकी एखादीतच, एखादाच गंभीर अडथळा असेल तर 'हृदयधमनी रुंदीकरणा'चा पर्याय उपलब्ध असतो. त्यानेही न निवारता येण्यासारखी जर धोक्याची अवस्था असेल तर 'हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया' हा अंतिम पर्याय पत्करावा लागतोच.

जेव्हा, डावी मुख्य (ही ५०% हृदयस्नायूस रक्त पुरवते), डावी पाठीमागे वळणारी (ही ३५% हृदयस्नायूस रक्तपुरवठा करते) आणि उजवी (ही १५% हृदयस्नायूस रक्त पुरवते) या तीन प्रमुख हृदयधमन्यांपैकी एकीत, विशेषतः डाव्या प्रमुख धमनीत ७०% पेक्षा जास्त अडथळा आढळून येतो, तेव्हा हृदयधमनी रुंदीकरणाचा सल्ला दिला जात असतो. मात्र यांपैकी कुठल्याही धमनीत ५०% पेक्षा कमी इतका अडथळा आढळून आल्यास शल्यचिकित्सेची आवश्यकता नसल्याचे सांगितले जाते.

कल्पना करा की मुख्य धमनीत जेव्हा ५०% अडथळा असेल, तेव्हा शरीरभर विस्तारलेले धमन्या-शीरांचे जाळे कमी-अधिक प्रमाणात अवरुद्ध झालेले असण्याचा संभव कितपत असतो? तो असतो भरपूर! किंबहुना सर्वच धमन्या कमी-अधिक प्रमाणात अवरुद्ध झालेल्याच असतात. अशावेळी अवरोध घटवण्याचा उपाय म्हणून धमन्यांतून रसायन फिरवून विषद्रव्ये गोळा करून बाहेर टाकता आली, तर नव-तारुण्य प्राप्त करता येऊ शकेल. ह्या संभावनेवर दुसर्‍या महायुद्धकाळात खूपच संशोधन झाले. हिटलरच्या काँसंट्रेशन कँपसमध्ये राहून, सुटून परत आलेल्या लोकांवर उपचार करत असता, अशा प्रकारच्या “ब्रिटिश-अँटी-लेविसाईट, ऊर्फ बी.ए.एल.” या द्रव्याचा शोध लागला. तेव्हापासून तथाकथित “धमनी-स्वच्छता-उपचारांच्या” संशोधनास सुरूवात झाली. आजही हे संशोधन बाल्यावस्थेतच आहे. तरीही एक पर्याय म्हणून झपाट्याने उदयास येत आहे.

सर्वात आधीचा, मनुष्यावरील संधारणा उपचारांचा दाखला दुसर्‍या महायुद्धातील आहे. तेव्हा ब्रिटिशांनी ब्रिटिश अन्टीलेवेसाईट (बी.ए.एल.) हे औषध, विषारी वायूवर उपाय म्हणून संधारणेसाठी वापरलेले होते. http://www.chm.bris.ac.uk/motm/bal/ या दुव्यावर त्याची माहिती सापडू शकेल.
बी.ए.एल. हे औषध वैद्यकीय समाज गेली ६० हून अधिक वर्षे वापरत आलेला आहे. सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा तो संधारक (चिलेटर/किलेटर, म्हणजेच शरीरातून अवजड धातू बाहेर काढण्याकरता वापरला जाणारा पदार्थ) आहे. आर्सेनिक, पारा, शिसे आणि सोने यांच्या विषबाधेवर उपचार म्हणून त्याचा वापर केला जातो. दुसर्‍या महायुद्धात त्याने, रासायनिक अस्त्र म्हणून वापरल्या गेलेल्या लेविसाईट या द्रव्यावरचा उपाय म्हणून, बजावलेली भूमिका विख्यात आहे. हल्ली कमी प्रमाणातील विषबाधेकरता इतर संधारक विकसित करण्यात आलेले असले तरीही, बी.ए.एल. निरनिराळ्या वैद्यकीय परिस्थितींमध्ये प्रमुख भूमिका बजावतच आहे. याच्या विकसनाची सुरस कथा तिथे मुळातच वाचावी अशी लिहिलेली आहे.

आपण इथे 'धमनी स्वच्छता उपचारां' (धस्वो-Arterial Clearance Therapy-ACT) चा पर्याय नक्की काय स्वरूपाचा आहे त्याची माहिती करून घेणार आहोत. http://www.drcranton.com/newhope.htm ह्या संकेतस्थळावर ह्याची बर्‍यापैकी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी काही सारभूत माहिती इथे देत आहे.

धमनी स्वच्छता उपचारांनाच संधारणा उपचार (Key-Lay-Tion Therapy - किलेशन थेरपी) असेही म्हणतात. शीरेतून करायचे संधारणा उपचार, हे सोपे, इथिलीन-डाय-अमाईन-टेट्रा-ऍसिटिक-ऍसिड (इ.डी.टी.ए.) वापरून केले जाणारे उपचार आहेत. ह्या उपचारांमुळे धमनीकाठीण्य आणि इतर वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांची प्रगती मंदावते. शरीरातील अनेक निरनिराळ्या भागांवर प्रभाव टाकणारी लक्षणे बहुधा सुधारतात. नक्की कशामुळे तसे घडून येते, त्याची नेमकी वैद्यकीय कारणे अजूनपर्यंत पूर्णपणे कळलेली नाहीत. हृदय, मेंदू, पाय आणि सर्वच शरीरास रक्तपुरवठा करणार्‍या अवरुद्ध धमन्यांतील रक्तप्रवाह वाढतो. ह्या उपायांनी हृदयाघात, पक्षाघात, पायातील वेदना आणि अचेतनता (गँगरिन) यांचा प्रतिबंध करता येतो. बहुतेकदा, संधारणा उपचारांनंतर, हृदयधमनीउल्लंघन आणि फुग्याद्वारे केलेल्या हृदयधमनीरुंदीकरणाची गरजच राहत नाही. प्रसिद्ध झालेले संशोधन असेही दर्शविते की संधारणा उपचार कर्करोग प्रतिबंधकही आहेत. मुक्त प्राणवायू-मूलकांमुळे होणार्‍या रोगांपासूनही ह्या उपचारांमुळे मुक्ती मिळते. तज्ञपरीक्षित नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले अनेक वैद्यकीय अभ्यास, लाभांचे ठोस पुरावे देतात. ही अनातिक्रमक उपचारपद्धत खूपच सुरक्षित आणि उल्लंघन शल्यक्रिया अथवा रूंदीकरण यांचे मानाने खूपच कमी खर्चाची असते.

संधारणा उपचार ही एक उपचारपद्धती आहे जिच्याद्वारे थोडेसे इथिलिन डायमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड (इ.डी.टी.ए.), रुग्णास शीरेतून सावकाश (अनेक तासांच्या कालावधीत) चढवितात. कालावधी, परवानापात्र डॉक्टरांच्या सल्ल्यावरून ठरवला जातो. आणि त्याच्याच निगराणीखाली उपचारही दिले जातात. इ.डी.टी.ए. धारक द्रव, रुग्णाच्या हातातील शीरेत घातलेल्या छोट्या सुईतून आत सोडले जाते. आत सोडलेले इ.डी.टी.ए. शरीरातील नको असलेल्या धातूंना चिकटते आणि त्यांना त्वरेने लघवीत घेऊन जाते. अवघड जागेतील पोषक धातू जसे की लोह; शिसे, पारा आणि अल्युमिनियम यांसारख्या विषारी मूलद्रव्यांसोबतच इ.डी.टी.ए. संधारणा उपचारांनी सहज हटविले जातात. आरोग्यास आवश्यक असणारी सामान्यत: आढळणारी खनिजे आणि विरळ मूलद्रव्ये शरीरासोबत घट्ट बांधलेली असतात; आणि योग्यप्रकारे संतुलित पुरक पोषणाद्वारे कायम राखता येतात.

संधारणा उपचार पद्धतीत प्रत्येक रुग्णाच्या आरोग्यस्थितीनुरूप २० ते ५० स्वतंत्र टोचण्यांद्वारे इलाज केला जातो. समुचित लाभ मिळण्यासाठी, सरासरी ३० वेळा उपचार घेणे, धमनीत अडथळे असण्याची लक्षणे असलेल्या रुग्णांना आवश्यक असते. काही रुग्णांना अनेक वर्षांच्या काळात १०० हून जास्त वेळा उपचार घ्यावे लागतात. तर काहींना प्रतिबंधक कार्यक्रमाचा भाग म्हणून केवळ २० टोचण्याच दिल्या जातात. प्रत्येक संधारणा उपचारास ३ ते ४ तास लागतात. आणि दर सप्ताहात रुग्णास १ ते ५ उपचार दिले जातात. परिणाम एकूण उपचारांवरच ठरतात. वेळापत्रक आणि वारंवारतेवर नाही. काही काळानंतर ह्या टोचण्यांमुळे मुक्त मूलकांच्या रोगाची प्रगती थांबते. धमनीकाठीण्य आणि इतर अनेक वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांच्या पाठीमागे मुक्त मूलकेच असतात. हानीकारक मुक्त मूलके घटवल्यास रोगग्रस्त धमन्या बर्‍या होऊन रक्तपुरवठा पूर्ववत होतो. संधारणा उपचार काळासोबत अनेक आवश्यक शारीरिक आणि चयापचयासंबंधी सखोल सुधारणा घडवितात. पेशींच्या अंतर्गत रसायनस्थिती सामान्य करून शरीराचे कॅल्शियम व कोलेस्टेरॉल नियमन पूर्ववत केले जाते. शरीरावर संधारणा उपचाराच्या अनेक वांछनीय क्रिया घडून येतात.

शरीरारातील प्रत्येक धमनीतील रक्तप्रवाहास संधारणा उपचार लाभकारक ठरतात. अगदी मोठ्यात मोठ्या धमनीपासून सूक्ष्म केशवाहिन्यांपर्यंत, ज्यांपैकी बव्हंशी वाहिन्या शल्यचिकित्सेच्या दृष्टीने खूपच लहान असतात, किंवा मेंदूत खोलवर असतात, जिथे शल्यक्रियेसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही. अनेक रूग्णांमध्ये, बारीक रक्तवाहिन्याच सर्वात जास्त रोगग्रस्त असतात, विशेषत: मधूमेह असतो तेव्हा. संधारणा उपचारांचे लाभ डोक्यापासून पायापर्यंत एकसाथ घडतात, ज्यांचे उल्लंघन शक्य असते अशा केवळ काही मोठ्या धमन्यांच्या छोट्या भागापर्यंतच नाही. बव्हंशी प्रकरणांमध्ये संधारणा उपचार बाह्यरुग्ण उपचार असतात, जे डॉक्टरच्या दवाखान्यातच करवून घेता येतात.

इतर उपचारांच्या मानाने संधारणा करवून घेणे हा एक वेगळाच अनुभव असतो. काहीही दु:ख नसते आणि बव्हंशी प्रकरणांमध्ये अस्वस्थताही फारच थोडी जाणवते. रुग्णांना आरामखुर्चीत बसवतात. उपचार घेत असतांना, इ.डी.टी.ए. धारक द्रव त्यांच्या शरीरांमधून वाहत असते तेव्हा, ते वाचू शकतात. डुलकी घेऊ शकतात. टी.व्ही. पाहू शकतात. विणकाम करू शकतात. गप्पा मारू शकतात. गरज पडल्यास रुग्ण, सभोवार चालूही शकतात. प्रसाधनगृहात जाऊ शकतात. इच्छेनुरूप खाऊपिऊही शकतात. दूरध्वनी करू शकतात. फक्त त्यांच्या शीरेतून आत शिरवलेली सुई बाहेर येणार नाही ह्याची काळजी मात्र घ्यावी लागते. काही रुग्ण त्यांचे व्यवसायही दूरध्वनी वा संगणकाद्वारे, संधारणा उपचार घेत असतांनाही चालवितात.

संधारण उपचार हे निर्विषारी आणि निर्धोक आहेत. विशेषत: इतर उपायांच्या तुलनेत. संधारणा उपचारांनंतर रुग्ण नेहमीप्रमाणे स्वत:च्या पायांनी, स्वत:च वाहन चालवत सहज घरी जातात. योग्यरीत्या दिले गेल्यास, उपचारित १०,००० रुग्णांमागे एखाद्याच रुग्णाला दखलपात्र उपप्रभावांचा धोका असतो. तुलनेत, थेट हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रियेमुळे उद्भवणारा एकूण मृत्यूदर १०० रुग्णांगणिक तीन रुग्ण असा असतो. व तो शुश्रुषालय आणि शस्त्रक्रिया करणार्‍या चमूवर अवलंबून बदलत असतो. शस्त्रक्रियेनंतर उद्भवणर्‍या गंभीर गुंतागुंतींचे प्रमाण खूपच जास्त असते. ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचणारे असते. ज्यात हृदयाघात, पक्षाघात, रक्तगुठळ्या, मानसिक अवनती, संसर्ग आणि दीर्घकालीन दु:ख यांचा समावेश होतो. संधारणा उपचार हे हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रियेपेक्षा कमीत कमी ३०० पट सुरक्षित आहेत.

क्वचित कधीतरी रुग्णाला शीरेत सुई टोचतात त्या जागी थोडेसे दु:ख जाणवू शकते. काहींना तात्पुरते सौम्य मळमळणे, चक्कर येणे किंवा डोके दुखणे अनुभवास येते. हे उपचाराचे तात्कालीन दुष्परिणाम असतात. पण बव्हंशी प्रकरणांमध्ये ही बारीकसारीक लक्षणे सहज निवळतात. संधारणा उपचार, ह्या प्रकारच्या उपचारांमध्ये तज्ञ असणार्‍या डॉक्टरने, योग्य रीतीने उपचार केले असता, इतर अनेक औषधोपचारांच्या मानाने सुरक्षित असतात. सांख्यिकीच्या दृष्टीकोनातून बोलायचे तर, हे उपचार, डॉक्टरकडे स्वयंचलित वाहन चालवत जाण्यापेक्षासुद्धा जास्त सुरक्षित असतात.

जर इ.डी.टी.ए. संधारणा उपचार खूप जलद अगर मोठ्या प्रमाणात दिले गेले तर त्याने धोकादायक उपप्रभाव उद्भवू शकतात. जसे कुठल्याही औषधाच्या अतिरिक्त मात्रेमुळे घडू शकतात तसेच. अनेक वर्षांपूर्वी गंभीर आणि प्राणघातक गुंतागुंतीही, अतिरिक्त इ.डी.टी.ए. मात्रेमुळे, जलद गतीने दिल्यामुळे आणि योग्य प्रयोगशाळेच्या निगराणीअभावी उद्भवल्याचे अहवाल आलेले आहेत. जर तुम्ही योग्य, प्रशिक्षित आणि अनुभवी इ.डी.टी.ए. वापरण्यातील तज्ञ डॉक्टर निवडाल तर संधारणा उपचारांतील धोके खूपच कमी पातळीवर राहतील.

जेव्हा असेही म्हटले गेले आहे की इ.डी.टी.ए. संधारणा उपचार तुमची मूत्रपिंडे बिघडवितात, तेव्हा नविनतम संशोधन (ज्यामध्ये ३८३ एकापाठोपाठच्या एक अशा रुग्णांमध्ये बद्धमूल अवनतीकारक रोगांकरीता केलेल्या संधारणा उपचारांच्या आधी आणि नंतर केल्या गेलेल्या मूत्रपिंड कार्य चाचणीचा समावेश आहे.) दर्शविते की सत्य याचे विपरितच आहे. सरासरीने, संधारणा उपचारांनंतर मूत्रपिंडकार्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते. क्वचित एखादा रुग्ण प्रमाणाबाहेर संवेदनाक्षम असतो. मात्र, संधारणा उपचार तज्ञ असलेले डॉक्टर मूत्रपिंडांवर अतिभार येणे टाळण्यासाठी मूत्रपिंडांच्या कार्याचे बारकाईने निरीक्षण करत असतात. मूत्रपिंडांचे कार्य जर सामान्य नसेल तर संधारणा उपचार जास्त सावकाश आणि कमी वेळा द्यायला हवेत. काही प्रकारच्या गंभीर मूत्रपिंड समस्या असलेल्या रुग्णांनी इ.डी.टी.ए. संधारणा उपचार घेऊ नयेत.

संधारणा उपचारांची आवर्तने सुरू करण्याआधी संपूर्ण वैद्यकीय इतिहास मिळविला जातो. आहार, पोषणपूर्ती आणि संतुलन ह्यांकरीता विश्लेषित केला जातो. त्यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल आणि शुश्रुषालय भरतीबाबतचे गोषवारे यांच्या प्रती मिळविल्या जातात. प्रत्यक्षात नखशिखांत संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. प्रचलित औषधोपचारांची संपूर्ण यादी नोंदवली जाते. ज्यामध्ये औषधांचे वेळापत्रक आणि प्रमाण यांचा समावेश असतो. कुठल्याही अतिसंवेदनाशीलतेची स्वतंत्र नोंद केली जाते. संधारणा उपचारांनी बिघडू शकेल अशी कुठलीही अवस्था नाही ह्याची खात्री करण्यासाठी केल्या जाणार्‍या अनेक तपासण्यांतर्गत रक्त आणि मूत्र नमुने मिळवले जातात. मूत्रपिंडाचे काळजीपूर्वक आकलन केले जाते. बहुधा एक विद्युत हृदयालेखही काढला जातो. वैद्यकीय लक्षणांनुरूप अनातिक्रमक चाचण्या, उपचारांपूर्वीची धमनींतील रक्तप्रवाहस्थिती जाणून घेण्यासाठी केल्या जातात. इतर वैद्यकीय तज्ञांसोबत विचारविनिमयही केला जातो.

माझे यापूर्वी मायबोलीवर प्रकाशित झालेले
"जीवनशैलीगत परिवर्तनां" शी संबंधित विषयांवरले लेख खालील दुव्यांवर वाचता येतील.

http://www.maayboli.com/node/23711 प्राणायाम करा सुखे
http://www.maayboli.com/node/23317 व्यायामी वळवा शरीरे
http://www.maayboli.com/node/23213 विहारा वेळ द्या जरा
http://www.maayboli.com/node/23109 आहाराने रोग हरा !
http://www.maayboli.com/node/23083 माझे हृदयधमनीरुंदीकरण
http://www.maayboli.com/node/23013 हृदयविकार का होतो?
http://www.maayboli.com/node/21579 एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय
http://www.maayboli.com/node/12231 हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके
http://www.maayboli.com/node/11009 आरोग्य आणि स्वस्थता यांचे निकष
http://www.maayboli.com/node/12061 हृदयधमनी रुंदीकरण
http://www.maayboli.com/node/10982 आंतरिक शक्तीचा शोध

http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका अनोख्या उपचारपद्धतीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेल्या एका लिंकमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील राजकारणामुळे ह्या उपचारपद्धतीबद्दल लोकांना जास्त कळूच दिले जात नाही असे वाचले. हे जर खरे असेल तर त्याइतकी दुर्दैवी गोष्ट नाही. अर्थात ह्याबद्दल पहिल्यांदाच वाचल्याने ( आणि डॉक्टरांकडून सुचवली जात नसल्याने ) त्याच्या सुरक्षिततेबद्दल, प्रभावीपणाबद्दल थोडा संभ्रम वाटला. आजकाल कॉलेस्टेरॉल जास्त येणे, त्यामुळे वाढणारा ह्रदयविकाराचा धोका हे खूप जास्त प्रमाणात दिसते. त्यामुळे ह्या पर्यायावर जास्तीतजास्त चर्चा झाली पाहिजे.

मा. नरेंद्रजी,

या विषयात आणखी एक उपाय सध्या फारच प्रसिध्द झाला आहे. याची चिकित्सा होणे गरजेचे आहे किंवा चिकित्सा झाली असल्यास ती लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे.

उपाय अतिशय साधा, अल्पखर्चिक, बिनधोक आणि खात्रीचा आहे.

५० ग्रॅम मेथ्या ( मेथी बी )
२० ग्रॅम ओवा
१० ग्रॅम काळे जिरे

वेगवेगळे तव्यावर थोडेसे भाजुन एकत्र मीक्सर वर बारिक करुन रात्री झोपताना १ चमचा गरम पाण्याबरोबर घेतल्यास धमनी स्वच्छता होते. ( आपापल्या तब्येती नुसार १ चमचा हे माप कमी केले तरी फायदे मिळतात हा अनुभव आहे. )

व्यायामाचा अभाव आणि अती पौष्टिक खाणे, बैठे काम या त्रयीने ग्रासलेल्या, सुखवस्तु लोकांना कोलस्टर वाढणे आणि परिणामी सर्व काही अश्या आजारातुन सुटका देण्यारे हे औषध आता सहज पणे आयुर्वेदीक औषधाच्या दुकानात उपलब्ध्द आहे.

गरज आहे हे औषध घेणार्‍या १००० लोकांचा अभ्यास करुन निष्कर्ष काढण्याची.

नितीनचंद्रजी,
प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

यासारखाच एक प्रकार दालचिनीबाबतही सांगितला/ केला जातो.
मायबोलीवरील डॉक्टर लोकांनी यावर समुचित भाष्य करावे!

गरज आहे हे औषध घेणार्‍या १००० लोकांचा अभ्यास करुन निष्कर्ष काढण्याची.<<.
मा.नितीनचंद्रजी,
आपण हे का करित नाही?
श्रीश्रीबालाजी तांबे आपले संशोधन नक्कीच सकाळमधे प्रसिद्ध करतील. (विनोदाचा प्रयत्न आहे. समजून घ्या.)
***
>.उपाय अतिशय साधा, अल्पखर्चिक, बिनधोक आणि खात्रीचा आहे.<<
डबलब्लाईंड कन्ट्रोल्ड व रिट्रोस्पेक्टिव्ह क्लिनिकल ट्रायल्स, अ‍ॅनिमल व ह्यूमन मॉडेल्समधे झाल्याशिवाय, आधीच हजारो रुग्णांवर तपासणी केल्याशिवाय, साधी जुलाबाची गोळी मार्केटात येत नाही. तरीही इतक्या छातीठोकपणे, कशालाही 'बिनधोक आणि खात्रीचा' आहे, असे म्हणणे, यालाच मी इब्लिसपणे 'बिनडोक व खात्रीने' आहे असे म्हणतो.
***
@गोळे सर.
तुमच्या संपूर्ण शुद्ध मराठी वापरण्याच्या चिकाटीला सलाम.

ईडीटीए हा युनिव्हर्सल चिलेटिंग एजंट म्हणून वापरात येतो. या रेणूसंबंधी आपण इतर माहिती शोधण्याचा यत्न केला आहे काय? (ईडीटीए व मूत्रपिंडाबद्दल आपण लिहिलेत ते संपूर्ण सत्य नाही असे म्हणतो.)
यत्न केला असल्यास त्याबद्दलची माहिती लेखा इतक्याच विस्तृतपणे देणार काय? तसे झाल्यास लेखनात संतुलन येईल.
***
तुम्ही दिलेल्या एका लिंकमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील राजकारणामुळे ह्या उपचारपद्धतीबद्दल लोकांना जास्त कळूच दिले जात नाही असे वाचले. हे जर खरे असेल तर त्याइतकी दुर्दैवी गोष्ट नाही.

हे वरील तिरपे केलेले अगो यांच्या प्रतिसादात वाचले.

मी येथे विनम्रपणे नमूद करू इच्छितो, की कोणतीही 'पियर रिव्ह्यूड' उपचारपद्धती, जी आधुनिक वैद्यकशास्त्राने स्वीकारार्ह ठरविण्याच्या स्थितीत आहे, ती अधिकाधिक आधुनिक वैद्यकाचे जाणकार वापरून पहातील व त्यातील अधिक उणे समजेल या उद्देशाने सर्वत्र प्रसारित केली जाते. खरजेच्या मलमापासून एडस् च्या लशीपर्यंत, तसेच नखुर्डे कापण्यापासून करोनरी बायपासपर्यंत, अशा सगळ्या पद्धती त्यात येतात. लपवाछपवी अन 'गुरूची विद्या' ही आधुनिक वैद्यकाची व्यवच्छेदक लक्षणे नव्हेत. उलट, मला एकादी नवी उपचारपद्धती गवसली तर मी दवंडी पिटून, चार परिसंवादांत टिमकी वाजवून त्याबद्दल सांगत फिरतो. हा माझा व माझ्या समव्यावसायिकांचा अनुभव आहे.

धन्यवाद!

व्यायामाचा अभाव आणि अती पौष्टिक खाणे, बैठे काम या त्रयीने ग्रासलेल्या, सुखवस्तु लोकांना कोलस्टर वाढणे आणि परिणामी सर्व काही अश्या आजारातुन सुटका देण्यारे हे औषध आता सहज पणे आयुर्वेदीक औषधाच्या दुकानात उपलब्ध्द आहे.<<

माफ करा,
कोलस्टर म्हणजे काय?

कठीण शब्दांचे अर्थः

धमनीकाठिण्य = अथेरोस्क्लेरोसिस atherosclerosis (धमनीकाठिण्य हा चांगला मराठी प्रतिशब्द आहे. हॅट्स ऑफ.)
सम्यक जीवनशैली परिवर्तन = Comprehensive Lifestyle Change
सकारात्मक = positive
एमड़ी. कार्डिओलॉजिस्ट = एम.डी. ही पदवी असलेला हृदयरोगतज्ञ (डी.एम. ही हृदयरोगतज्ज्ञाची पदवी)
'हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया' = Coronary-Artery Bypass Surgery. उल्लंघन हा 'बायपास' ला सोपा मराठी शब्द आहे. (उदा. सीमोल्लंघन = सीमेस बायपास करून जाणे.)
इ.इ.
अधिक कठीण शब्द विचारल्यास यथाशक्ती सांगेन. पुण्याहुण शिहंगडास जाताना खडकवासल्यास उजवी कडे 'केंद्रिय जल एवम विद्युत अनु'संधारण' केंद्र' दिसते. हे संधारण म्हणजे रीसर्च असे आहे. CWPRS. Central Water & Power Research Station' इथले संधारण समजले नाही. शब्दार्थांच्या बाफवर विचारून पहातो.

प्रोफेसर ऑफ डुआयलॉजी व इब्लिस महाशय,
आपणास प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद.
एरव्ही एवढा मोठा लेख असूनही प्रतिसादांविनाच तळाशी गेला होता.

इब्लिस, आपल्या टिकाऊ स्वारस्याखातर आपले पुन्हा एकदा आभार!

संधारणा उपचार हे नाव, इ.डी.टी.ए. नकोशा द्रव्यांना धरून बांधून बाहेर काढते त्या प्रक्रियेशी निगडित आहे.

नको त्या पदार्थांना धारण करून, हव्या त्या ठिकाणी (म्हणजे मूत्रपिंडाद्वारे बाहेर) पोहोचवणारे उपचार, म्हणून संधारणा उपचार!

मी डॉक्टर नाही. आपण आहात. तेव्हा आपणच तज्ञ-मत-प्रदर्शनास पात्र आहात, मी तर केवळ भारवाही. तिकडची (म्हणजे इंग्रजीतील) माहिती इकडे (म्हणजे मराठीत) आणली आहे. तिची वैधता तपासून पाहण्यात आपल्यासारख्यांचे प्रतिसादच मोलाचे ठरतील.

तरीही, आपले प्रतिसाद सर्वसामान्यांना सहज समजण्यासारखेच ठेवावेत ही विनंती!