अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक दिवस हा धागा वाचतो आहे, मला आलेला एक अनुभव अत्यंत इललॉजिकल आहे पण खरा आहे.
पाचगणीला पहिलावहिल्या जॉबला संध्याकाळी ७ला पोचलो. टॅक्सीवाल्याने चुकीच्या कँपसवर सोडले आणि तो पळून गेला. माझ्याजवळ प्रचंड सामान, उचलून नेणे महामुश्किल, मदत मागावी तर ओळखीचे कोणी नाही सभोवताली अंधार. मी थकलेला आणि काळजीत.
अशात मागून खेडेगावातली दोन शाळकरी पोरं आली त्याच्यातल्या एकाकडे सायकल होती, मी विनंतीसाठी तोंड उघडताच त्यांनी माझी बोचकी सायकलीवर टाकली आणि दुसर्‍या कँपसपर्यंत आणून सोडले. वाटेत ती दोघे एकमेकाशीच बोलत होती जणू मी तिथे नाहीच आहे. मी सामान उतरवून तिथल्या सिक्युरिटीवाल्याकडे चौकशी करुन त्यांना धन्यवाद द्यायला वळलो....तर ते दोघेही गायब होते....

ह्यावरून एक गोष्ट आठवली. खूप धुवांधार पाऊस पडत असतो. एक माणूस एका सुनसान रस्त्यावर वळणावर एकटाच उभा असतो - लिफ्ट मिळेल का ह्याची वाट पहात. त्या रस्त्यावर गाड्या फारश्या येत नसतात आणि ज्या येतात त्या थांबत नाहीत. शेवटी दुरून एक गाडी येताना दिसते. हा माणूस हात दाखवतो. गाडी जवळ थांबताच तो पटकन दरवाजा उघडून आत बसतो. पाणी वगैरे झटकून झाल्यावर ड्रायव्हरला थॅक्स म्हणावं म्हणून तो बघतो तर काय! ड्रायव्हरची जागा रिकामी असते. स्टिअरिंग व्हील नुस्तंच फिरत असतं. त्याची बोबडी वळते. काही क्षण तो नुस्ताच बसून राहतो. आणि मग एका वळणावर गाडीतून उडी मारतो.

रस्त्याने धावत धावत जाताना त्याला एक चहाची टपरी दिसते. हुश्श! म्हणून तो तिथे जातो. चहाचे घोट घेता घेता त्याला अचानक दुरून तीच गाडी येताना दिसते. तो विलक्षण घाबरतो. गाडी टपरीजवळ येऊन थांबते आणि अचानक त्याच्या बाजूने २ माणसं पुढे येतात. ह्या माणसाला तिथे बसलेला पाहून त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात "काय राव, बंद पडलेल्या गाडीत उडी मारून बसलात. आम्ही दोघे ढकलून ढकलून बेजार झालेलो. निदान उतरून मदत करायची तर मधेच उडी मारून गायब झालात!" Happy

गोष्ट बर्‍याच वर्षांपूर्वी वाचली होती त्यामुळे तपशीलात चूक झाली असेल. लॉजिकली विचार केला तर बर्‍याच त्रुटीही आहेत. पण प्रथम वाचली तेव्हा मजा वाटली होती.

ऐश्वर्या, किती छान लिहितेस. आम्हाला तुझे अनुभव वाचायला खुप आवडतील. रोज आईला गृहपाठच देत जा पन्नासेक पानं टाइपण्याचा. तुझ्या सुट्टीतला आईचा अभ्यास. Happy

स्वप्ना... मीही पहिल्यांदा तुझ्यासारखीच चक्रावले. Happy

नागोया (जपान) मधल्या आमच्या हॉस्टेलच्या कॉमन किचनमध्ये
आपल्या खांद्यावरून आपण काय करतोय असं कुणीतरी बघतंय, किंवा असंच आपल्या मागे फेर्‍या मारतंय असे भास व्हायचे. जाम टरकायची.
त्यामुळे मी किचनमध्ये कुणी दुसरं बरोबर असेल तेव्हाच स्वैपाक उरकून घ्यायचो.

१०वीत असताना आम्ही मित्रांनी पण प्लँचेट केला होता फक्त ग्लासाऐवजी रुपयाचे नाणे वापरले होते. परीक्षा संपल्यावर सुट्टीत हे उद्योग केलेले. १०वीचा निकाल काय लागेल? पुढे नोकरी मिळेल का,इ., इ. प्रश्न विचारलेले.

पहिल्यांदा जागेचा शोध घेत फोरत होतो कि कुठे प्लँचेट केले तर लवकर भुत, आत्मा येईल. त्यासाठी वेगवेगळ्या ओसाड मैदाने, कबरस्तान, वडांची झाडे इ. पालथे घातले. पण यश कुठेच मिळाले नाही.

शेवटी एका मित्राच्या घरी (त्याचे आई-वडील) बाहेर गेले असताना प्लॅन ठरला Happy

एका पाटावर खडुने ०-९ नंबर, A-Z, आणि येस, नो तसच मेणाबती आणि नाणे ठेवायला खुणा केल्या. त्यानंतर कुणाला बोलवायचे यावर बरेच वाद झाले. हिटलरचे नाव घेताच शंका आल्या कि तो परत नाही गेला तर वाट लागेल. म्हणुन सगळ्यात शेवटी गांधीजींचे नाव ठरले.

यानंतर मेन प्रोसेस चालु झाली. पाटावर मेणबत्ती लाऊन, सगळे लाईट बंद करुन प्रत्येकाने उजव्या हाताचे एक बोट नाण्यावर हलकेच ठेऊन मनातल्या मनात "गांधीजी या" असे मनापासुन (? Happy ) बोलायचे ठरवले. साधारणतः १ ते १.५ मिनीट झाले कि आत्मा येतो असे अनुभवी मित्र म्हणाला.

मिनीटभर धावा केल्यावर मेन जाणकार मित्राने सगळ्यांना डोळे उघडायला सांगितले. गांधीजी आला असाल तर नाणे येसवर जाउदे असे म्हणाला.

आणि काय आश्चर्य नाणे हळुहळु येसवर गेले. नंतर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जवळपास गांधीजींना ३० मि. भंजाळुन सोडले. सरतेशेवटी आभारप्रदर्शन करुन गांधीजींना परत जावा म्हणले.

अशा रीतीने प्लँचेट यशस्वी झाले. Happy

****पण जाणकाराने नंतर बिंग फोडले कि सगळ्यांचे बोट अलगदपणे नाण्यावर होते त्याचा फायदा आणि अंधारात कुणाला नीटशी कल्पना येत नसल्याने तोच नाणे हळुहळु पुश करत होता Happy

अमेरिकेत खासकरुन टेक्सास राज्यवासियांचा भुतांवर फार विश्वास आहे. इथे प्लँचेटप्रमाणेच मेडियमशिप अथवा मेडियम ट्रानमिशन चालते.

http://en.wikipedia.org/wiki/Mediumship

आत्मे बोलवण्यात येक्सपर्ट असा एकजण म्हणे ईतर जाणकार तसेच नवशिक्यांना घेऊन मेडियमशिप चा डेमो देतो. काही चर्चमध्ये नॉमिनल फीस घेऊन मेडियमशिप चे सेशन होत असतात (अंदाजे $२५ फीज). त्यात आत्मे बोलवायचे विविध प्रकार तसेच त्यांच्याशी संवाद साधायची कला शिकवतात.

तसेच अ‍ॅस्ट्रल/स्पिरीट गाईड नावाचीही कंसेप्ट आहे. याबद्दल नुस्ती ऐकलेली माहिती अशी कि, बराच वेळ मेडिटेशन केले कि हे स्पिरीट गाईड दिसु शकतात. त्यांना स्पेसिफिक आकार नसतो आपण आउटलाईनवरुन त्यांना जज करु शकतो.

सौदिंडीयन स्त्री-भूताला 'अम्मा'नवीय म्हणतात का?>>>

नुकत्याच लग्न झालेल्या एखाद्या सौदिंडियनाला विचारायला हवे :):D:D:D

असो, एक अनुभव,
रत्नागिरीजवळच्या एका छोट्या गावात माझ्या ताईच्या सासूचं माहेर.
त्या आणि त्यांची आत्या एकदा स्वैपाकघरात चुलीवर काही स्वैपाक करत होत्या,
आणि अचानक स्वैपाकघराच्या छोट्या खिडकीतून एक म्हातारी डोकावली.
(आधीही कुणी तरी पोस्ट केलंय त्याप्रमाणे ती जोखीण का काय ती होती म्हणे)

आणि त्याच घरातला दुसरा अनुभव म्हणजे,
माझ्या ताईचा मोठा दीर लहान होता (मोठा दीर लहान :)) तेव्हा, म्हणजे तान्हं बाळ होता तेव्हा
त्याला कॉटवर झोपवून, खाली पडू नये म्हणूण बाजूने लोड वगैरे लावून बाकीची मंडळी सोप्यावर गप्पा मारत बसली. बाळ माजघरात.
आणि थोड्या वेळाने बाळाच्या आईचं लक्ष गेलं, तर बाळ कॉटवर नव्हताच, कॉटच्या खाली होता !!
पण पडला असेल म्हणावं, तर लावलेला लोड तसाच होता. आणि पडला असता तर रडला असता.
तेही झालं नाही. सगळे टरकले होते जाम !

हैदराबादच्या EUFL हॉस्टेल मधलीच गोष्ट

रॅगिंगचा प्रकार समजुन C2 मधे काहीतरी आहे हे सिनीअर्सच सांगण मनावर घेतल नाही. माझ्या आधी तिथे रहाणारा मृगेश रात्री रूमवर थांबत नसे दिवसाच परतायचा. एका मित्राने सांगितल की त्याने तिथे पुजा करून घेतलेय त्याचे वडील बाहेरची बाधा उतरवायच काम करायचे त्याचा त्याला इथे त्रास व्हायचा.

आणि एके रात्री
साधारण अडीच तीनच्या सुमारास मला जाग आली. अस वाटल की कोणीतरी माझ्या बेड जवळ उभ आहे तो स्पर्श मला जाणवला आणि माझ्यावर डोकावून बघतय.
जाम फाटलेली.ओरडलो तर हॉस्टेल जमा होईल आणि अजुन घाबरवून सोडतिल.
मग मनातल्या मनात म्हटल जे कोणी असाल त्याने मागचा गणपती आणि बेडजवळच्या रामाला भेटाव नी मग मला खुशाल न्याहाळाव.
लगेच झोप लागली.

दुस-या दिवशी लक्षात आल की टेबल बेडजवळ होत त्याचा स्पर्श हो ऊन भिती वाटली असेल.

पुढे कधीतरी मल तिथला एक मित्र भेटला. खोदून खोदून विचारल्यावर त्याने सांगितल की मृगेशला दिसायच की एक म्हातारा रोखून बघतोय.

माझा अनुभव तोच तर होता.

.

>>सौदिंडीयन स्त्री-भूताला 'अम्मा'नवीय म्हणतात का?

मामी, करुणानिधीला विचारायला हवं. ३-३ बायकांचा एक्सिपिरियन्स आहे त्याचा ('ये जो है जिंदगी' मध्ये सतीश शाह 'थर्टी इयर्सका एक्सिपिरियन्स है' म्हणत असतो त्या चालीवर) Proud

काल रात्री आईने अजून एक किस्सा सांगितला. झालं काय की रात्री हॉलमध्ये सारखा तंबाखूचा वास येत होता. तो घराबाहेरून येतोय ह्याचा काही वेळाने शोध लागलाच. पण त्यावरून आईला आठवण झाली. आजोबांचा एक सहकारी होता. त्याचं कॉलेजात असताना एका मुलीवर प्रेम होतं. पण घरून दबाव आल्यामुळे त्याला त्याच्या मामेबहिणीबरोबर लग्न करावं लागलं. ह्याचं लग्न झाल्यावर त्या कॉलेजमधल्या मुलीने आत्महत्या केली. काही दिवसांनी ह्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी एका परफ्यूमचा सुगंध येऊ लागला. आजूबाजूच्या दुसर्‍या कोणालाही हा सुगंध येत नसे. प्रथम त्याने दुर्लक्ष केलं मग एके दिवशी त्याची ट्यूब पेटली की त्याची ती प्रेयसी होती ती हा परफ्यूम लावायची.

कोणीतरी त्याला एका भगताची माहिती दिली. तो भगत नुस्त्या चेहेर्‍यावरून कोणाला खरंच बाधा झाली आहे का नुस्ताच मानसिक आजार आहे हे ताडायचा आणि स्पष्ट सांगायचा. हा तिथे गेल्यावर भगताने त्याला त्याच्या प्रेयसीबद्दल, तिच्या आत्महत्येबद्दल सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की तिचा आत्मा ह्याच्या अवतीभवती आहे. हा सॉल्लिड घाबरला. काही उपाय आहे का वगैरे विचारलं. तर तो भगत म्हणाला की त्याला त्रास द्यायचा त्या आत्म्याचा मुळीच उद्देश नाही. फक्त त्याच्या आसपास रहाता यावं हीच तिच्या आत्म्याची इच्छा होती. मग असे उपाय करून तिला कशाला चिडवायचं. ह्याचा मृत्यू झाला की तिला मुक्ती मिळेल. मग हा तिथून निघून आला. ही गोष्ट ऐकून मला "मेरा साया" तल्या "तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा" ची आठवण झाली.

पुढे काय झालं देव जाणे!

स्वप्ना Sad
भगताने योग्य तेच सांगितले, सगळेच आत्मे काही त्रास द्यायला टपलेले नसतात.

खरंय ग. पण सदोदित कोणीतरी आपल्या सभोवती आहे ही काही सुखद भावना नाहिये. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी मी आणि आईबाबा माझी पत्रिका घेऊन एका ज्योतिषाकडे गेलो होतो. त्याने आम्हाला चांगली १५ मिनिटं बसवून ठेवलं आणि मग आला. मग म्हणतो कसा की दरवाज्यात एक माणूस उभा आहे आणि मला सांगत होता की ह्यांना भविष्य सांगू नका. हे ऐकून आमची टरकली की असं भविष्यात आहे तरी काय? आणि हा माणूस कोण?

मग अशी सेन्सेशनल सुरुवात केल्यावर पत्रिकेत सेन्सेशनल काही नव्हतं का त्याने सांगितलं नाही देवच जाणे. Happy पण सांगायचा मुद्दा हा की त्याने नंतर आम्हाला सांगितलं की माझ्या मागे एक कोणी शक्ती आहे जी माझं वाईट होऊ देणार नाही. प्रथम मी ह्याचा अर्थ लिटरली घेतला आणि २ दिवस उगाचच कोणीतरी आपल्यासोबत आहे असं वाटायचं. Creepy एकदम. मग लक्षात आलं की असेलच अशी शक्ती तरी सोबत म्हणजे २४ तास नव्हे. Happy तसंही माझ्यासोबत २४ तास रहायची हिंमत कोणात असेल असं वाटत नाहिये Proud रच्याकने, तेव्हापासून ज्योतिष आणि ज्योतिषी ह्यावरचा विश्वास उडाला तो उडालाच.

रच्याकने, तेव्हापासून ज्योतिष आणि ज्योतिषी ह्यावरचा विश्वास उडाला तो उडालाच.

त्या ज्योतिषावर विश्वास नको ठेऊस, कदाचित त्याने भाव मारण्यासाठी असे सांगितले असेल, पण ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास का उडावा? त्यातली कोणी ज्ञानी व्यक्ती भेटून तिने वर्तवलेले खोटे होईपर्यंत तरी उडवु नकोस विश्वास... Happy

पण सदोदित कोणीतरी आपल्या सभोवती आहे ही काही सुखद भावना नाहिये.
खरे असावे... नाहीतर जिवंतपणी जी व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते ती व्यक्ती मृत झाल्यावर आपल्या आजुबाजुला दिसायला लागली तर माणसे एवढी अस्वस्थ होणार नाहीत. हिंदी चित्रपटातुन असे काही पाहिले की मला कायम प्रश्न पडतो की आपल्या प्रेमाच्या माणसांना, आता ती केवळ भुत झालीत म्हणुन एवढे का घाबरायचे? उलट दुर जाऊनहीआता कायमची जवळ आलीत म्हणुन जरा बरे वाटायला हवे.

जुन्या घरी रहात असतानाची गोष्ट

ताईला सकाळी वाटल कोणीतरी खुप प्रेमाने डोक्यावरून हात फिरवतय.
अचानक लक्षात आल की आईचा ओव्हरटाईम ती तर सकाळी सहालाच गेली आपणाचे दार लावल मग टरकली.
धाडकन दार उघडून बाहेर आली. वाड्यात एक बर असायच की जाग असते लोकना लगेच हाक मारता येते.
शेजा-यांशी गप्पा मारत बसली मग जरा बर वाटल.

आम्ही म्हटल बाबा असतिल .... पण तरीही भूतच ना इति ताई

एवढ्या प्रतिक्रिया आलेल्या पाहून आपला लेख वाचला...छान लिहिला आहे...पण सगळ्यांना वेड्यात काढले... कारण लेखात `डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती' असा उल्लेख करता आणि लेख मात्र नोव्हेंबरच्या २७ ला प्रकाशित करता.....बाकी छान

हा अनुभव माझ्या मित्राचा आहे.
तो एका software company मध्ये आहे. लोकेशन आहे कल्याणीनगर पुणे.
त्याला नेहमीप्रमाणे नाईट्शीफ्ट होती. तो आणी त्याचे 2 मित्र ७व्या मजल्यावर जिथे toilet आहे तिकडे गेले. त्या वेळी मजल्यावर दुसरे कोणीच नव्हते. wash basin ला हाथ धुताना त्याना सर्व toilet मधुन पाणी सोडल्याचा आवाज आला. toilet चे दार उघडल कि आवाज बन्द झाले. मग सगळ्या ट्यूबलाईट चालु बन्द होऊ लागल्या. तसे हे तिघे पळत सुटले.
आणखी एका ग्रुपला असाच अनुभव आला.
मग कम्पनीने तो फ्लोअर बन्द केला हे मित्राने सागितले.

एवढ्या प्रतिक्रिया आलेल्या पाहून आपला लेख वाचला...छान लिहिला आहे...पण सगळ्यांना वेड्यात काढले... कारण लेखात `डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती' असा उल्लेख करता आणि लेख मात्र नोव्हेंबरच्या २७ ला प्रकाशित करता.....बाकी छान>>>> तेच तर अमानवीय आहे काय राव बस्स क्या?

माझ्या शाळेतले काही अनुभव...

१. आम्च्या शाळेत मालुताई ही एक मेट्रन-कम्-टिचर होती जी आयटीही शिकवायची. ती एकाच वेळी दोन-दोन ठिकाणी दिसलेली ब-याच जणांनी अनुभवलेले. एकदा हाऊसवाऊज स्पर्धेच्या वेळेस एका ताईच्या मनगटाला दुखापत झाली. ती पहिल्या डॉर्ममध्ये गेली जिथे मालुताई होती. मालुताईने मिनि-प्लास्टर केले. प्लास्टर झाल्यावर ताई व मालुताई परत ग्राऊंडवर निघाल्या. मध्येच मालुताई म्हणाली,'मी मेसमध्ये जाते, तु ग्राऊंडवर जा, थोड्या वेळाने पाणी लागेल तिथे, तर मी पाण्याचे जग घेऊन येते.' ताई एकटीच पुढे गेली. तर खालच्या टेनिसच्या ग्राऊंडवर तिला मालुताई अजुन एका मेट्रनसोबत बोलताना दिसली. ताईने तिच्याकडे जाऊन म्हटले,'मी मघाशी तुम्हला थँकयु म्हणायचे विसरले' तर मालुताईला कळेना, थॅ़क्यु कसले ते. ती म्हणाली, मी तर कधीपासुन इथेच बसलेय, सोबतची मेट्रनही तेच म्हणाली. कॉम्पिटिशनच्या वेळेस डोर्ममध्ये कोणीच नसते. अगदी फ्रॅक्चर झालेली मुलगीची आपल्या हाऊसला चिअर करण्यासाठी ग्राऊंडवर असते. ताईने 'मला मालुताईने प्लेस्टर केले असा भास झाला बहुतेक' असे म्हणुन विषय मिटवला. पण तिला भास वगैरे काही झाला नव्हता. तिला मालुताईनेच प्लॅस्टर केले होते आणि अजुन कोणीही डॉर्म मध्ये तेव्हा नव्हते.

२. अजुन एका वेळी एक ताई मैत्रिणींबरोबर दुस-या डॉर्ममध्ये उशीरापर्यंत अभ्यास करत बसलेली. ती तिथुन निघाली तेव्हा मालुताईने आतुन डोर्मला कुलुप लावुन घेतले. ताई धावत स्वतःच्या डोर्ममध्ये गेली, धावत कारण तिच्या डोर्मची मेट्रन जरा स्ट्रिक्ट होती. तिच्या डोर्मचा दरवाजा उघडाच होता. तिने आत जाऊन मेट्रनरुमचा दरवाजा उघडला, मेट्रनला सांगायला की मी आले, आता दरवाजाला आतुन कुलुप लावा म्हणुन तर आत तिच्या मेट्रनच्या डोक्यात मेंदी घालत मालुताई बसली होती.

मालुताईच्या बाबतीत असे किस्से खुप झाले, पहिल्यांदा मुली तिला सांगायच्या की तुला आम्ही तिकडे पण पाहिले आणि आता इकडे पण हे कसे.. पण नंतर घाबरुन मुली असा काही अनुभव आला की गप्पच बसायचा. शेवटी मालुताईने शाळाच सोडली.

शाळा सोडुन गेलेल्या मेट्रन्स व टिचर नंतर अनेकवेळा येऊन आम्हाला भेटुन गेलेले आहेत. पण मालुताई कधीच आली नाही. शिवाय हे टिचर वगैरे एकमेकांच्या काँटक्ट मध्येही असतात, पण मालुताई कुठे गडप झाली ते कोणाला कधी कळलेच नाही. ती ना कधी शाळेत आली, ना तिने कोणाशी कसलाही संबंध ठेवला.

आपण Philadelphia Experiment असे गुगलून बघितलेत तर मालुताईंच्या बाबतीत काय झाले असावे याचा अंदाज येईल.

Happy

निवांत पाटील आणि सुदरशानकुलथे यांच्या अमानविय निरिक्षणाबद्दल त्यांचे अभिनंदन....
एक खुलासा - एकतर मी असे कुठेही म्हणलेले नाही की हा आत्ताचा ट्रेक आहे. हा ट्रेक मी कॉलेजमध्ये असताना म्हणजेच किमान एक आठ-दहा वर्षांपूर्वीचा आहे. मला मी कधी गेलो होतो, कसा गेलो होतो याचे तपशील देण्याची गरज वाटली नाही.
पण आता राव इथे लोक एकदम वेड्यात काढायला लागलेत म्हणून लिहावे लागले.

झरबेरा, तुमच्या मालुताईचा किस्सा एकदम सॉलिड आहे! मी 'भाग्यलक्ष्मी' सिरियलचे काही एपिसोडस पाहिले होते... त्यात एक देवी अशीच तिच्या आवडत्या भक्तीणीची मदत करण्यासाठी वेगवेगळ्या रुपात यायची.... तेंव्हा फार गंमत वाटली होती. असं खर्‍या आयुष्यातही होत असेल असं वाटलं नव्हतं.... काय एक एक किस्से वाचायला मिळतायत... कमाल आहे बुवा!

मी लवकरच एक 'किस्सा' इथे देण्याच्या तयारीत आहे..!
तो पर्यंत आपण वाचण्याची तयारी करुन ठेवा..!

Pages