अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>स्वप्ना, अग बरे झाले तु पुढे धावत गेलीस आणि त्यांना परत दिसलीस.. नाही तर एका मडमीण भुताने आमची पाठ धरली असा किस्सा त्या गावात पसरला असता

Proud "मडमीण" सोडून बाकी मात्र बरोबर हा.

नानबा, वरी नॉट, हम है ना. आता एक आजोबांच्या आठवणीतला किस्सा. ह्याचे साक्षीदार आई आणि आजीही आहेत. झालं असं की एक गोरा साहेब, बहुतेक युरोपियन असावा, असाच काही कामासाठी आजोबांचं पोस्टींग होतं तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आला होता. ऑफिसमधलं काम झाल्यावर त्याची सोय रात्रीसाठी डाकबंगल्यामध्ये केली होती (डाकबंगला म्हटलं की मला रामसेचा पिक्चरच आठवतो!). एक नोकर होता तो त्याची जेवायची सोय करून रात्री गावातल्या आपल्या घरात निघून जाणार होता.

तर आजोबांच्या घरी रात्रीचं जेवण झालं आणि मंडळी झोपायला जाणार एव्हढ्यात दरवाज्यावर जोरजोरात थापा बसल्या. आजोबांच्या नावाने कोणीतरी ओरडत होतं. आजोबा दार उघडायला गेले तर आजी त्यांना उघडू देईना. तिचा आपला एकच धोशा - 'हाकार्‍या' (हा पण एक भुताचा प्रकार असतो म्हणे, ओळखीच्या माणसाचा आवाज काढून हाक मारतो आणि लोकांना घराबाहेर नेतो - इति आई!) असेल, तुम्ही बाहेर जाऊ नका. शेवटी आजोबा वैतागले. 'अग हाकार्‍या काय इंग्लीशमध्ये हाक मारणार आहे का मला?" ह्यावर आजी (आयुष्यात बहुधा पहिल्यांदा आणि शेवटची) निरुत्तर झाली.

आजोबांनी दरवाजा उघ्डला तर तो युरोपियन माणूस जवळजवळ घरात आत येऊन पडलाच. आणि अवतार तरी कसा, हाफ पॅन्ट घातलेली, वर उघडाबंब. नुस्ता घामाघूम झालेला. आजीला तर हसावं का आश्चर्यचकित व्हावं तेच कळेना. त्याला तर बोलताच येत नव्हतं. शेवटी पाणी प्यायला दिल्यावर काही वेळाने त्याच्या तोंडातून शब्द फुटला.

झाल्ं होतं असं की जेवण झाल्यावर तो आपल्या खोलीत झोपला होता. मध्येच रात्री माणसांच्या, प्लेटी-काटे-चमच्यांच्या आवाजाने त्याला जाग आली. बहुतेक डाकबंगल्यामध्ये आणि कोणी लोक आले असतील म्हणून पहायला गेला. तर बाहेरच्या हॉलमध्ये मिट्ट अंधार पण मोठाल्या खिडक्यातून येणार्‍या चंद्रप्रकाशात त्याला प्लेटी-काटे-चमचे नुस्तेच हवेत उडताना दिसले. माणसं बोलण्याचा आवाज येत होता पण डोळे फाडफाडूनसुध्दा ह्याला माणसं दिसलीच नाहीत. जो घाबरला तो आहे त्याच वेषात मागचा दरवाजा उघडून धूम पळत सुटला. जंगलाच्या रस्त्याने धावत धावत आजोबांच्या घरी पोचला.

त्या रात्री त्याची झोपायची सोय आजोबांनी आपल्या घरात केली. दुसर्‍या दिवशी तो नोकर घाबर्‍याघाबर्‍या आजोबांकडे आला की साहेब बंगल्यात दिसत नाहीत. Happy आजोबांनी रात्रीची कहाणी सांगितली त्यावर तो नोकर म्हणाला की रात्री बंगल्यात आणखी कोणीही गेलं नव्हतं. पण त्यानेही तिथे एकदा हा प्रकार पाहिलाय त्यामुळे तो रात्रीचा तिथे कधीच थांबत नाही. त्या युरोपियन माणसाने दुसर्‍या दिवशी तिथून मुक्काम हलवलाच. देव जाणे दुसर्‍या गावात त्याची सोय कुठे झाली. कारण जवळजवळ सगळ्याच डाकबंगल्यांची अशी ख्याती असे त्या काळात.

आमच्या गावच्या घराबद्दल सांगितली जाणारी एक दंतकथा मी एका लघुकथेत गुंफ़ली होती. इथे पाहा http://www.maayboli.com/node/11020 . मला प्रत्यक्ष कधी तो अनुभव आलेला नाही. पण माझे काका, वडील, आई यांनी तो अनुभव घेतलेला आहे.

.

(रच्याकने. इथे थोड्या वेळापुर्वी रमणबाबा आले होते, ६४ देशात फूले पाठवणारे !!!)<<<
हो हो ते गगो वर आले होते आणि एकदमच अदृश्य झालेत. त्यांचे प्रोफाईल बघण्याचे परवांगी नव्हती.

>>रच्याकने. इथे थोड्या वेळापुर्वी रमणबाबा आले होते, ६४ देशात फूले पाठवणारे !!!

माफ करा, पण हे रमणबाबा कोण?

.

हा आहे काय प्रकार? दिनेशदा, प्लीज खुलासा करून सांगता का? मला खरंच काही माहिती नाही. Sad

अगं स्वप्ना रमण म्हणून एक आयडी आला होता. काही बीबींवर त्याने सेन्ड फ्लॉवर्स टू अमुक ढमूक टाईप मेसेजेस टाकले. स्पॅम टाईप होतं. म्हणून गमतीत म्हणताहेत दिनेश तसं.

HH खूप धन्स! मला हे माहित नव्हतं. मी काही वेळाने गुगलून पाहिलं असतं Proud

कोण बुवा हे रमणबाबा? ६४ आकड्यापर्यंत कोणी झेप घेतली? एरव्ही माबोवर केवळ २४ चा बोलाबाला असतो. हे कोणी तरी उत्तुंग व्यक्तीमत्व दिसतंय. Happy

दिनेशदा, तुम्ही म्हणताय तसं अमानवीय म्हणजे केवळ भुतांचे अनुभव नसतात. माझ्या आईच्या बाबतीत घडलेला प्रसंग.

आई कॉलेजात / नोकरी करत असावी. घरची सर्व मंडळी (३ भाऊ, २ बहिणी आणि आई-वडील) जेजुरीला दर्शनाला गेले होते. मुख्य देऊळ बघून झाल्यावर कडे-पठारावरच्या देवळाकडे निघाले. भर दुपारची वेळ. कडेपठार अगदी सरळसोट वाट आहे. पूर्ण रस्ता दिसतो. चढणीची पण आहे वाटतं. (मी कधी गेले नाहीये). तर हे सगळे जात असताना विरुध्द दिशेने येणार्‍या प्रत्येकास विचारत होते की अजून किती अंतर आहे वगैरे. तेवढ्यात अचानक एक भारी नऊवारी साडी नेसलेली, मळवट भरलेली आणि सोन्याने नखशिखांत मढलेली बाई समोरून आली. तर आई सांगते की तिला बघून कोणाची वाचाच फुटेना तिला विचारायला. आईला तर थोडी भितीही वाटली. ती यांच्या अंगावरून पुढे गेली आणि लगेच सगळ्यांना जाणवले की, भर दुपारी एवढे दागिने घालून कोण ही बाई जातेय? म्हणून मागे पाहिले. पूर्ण रस्ता दिसत होता पण ती बाई दृष्टीस पडली नाही.

याला अमानवीय म्हणायचे का? - आणि मग अमानवीय म्हणजे वाईटच का चांगले पण?

माझ्या जवळच्या व्यक्तीला आलेला अनुभव,

साल - १९९८, हॉस्पीटलाईझ्ड असताना बी.पी. कमी झाल्याने ही व्यक्ती कोमा मधे गेली, जवळ जवळ १२-१५ तासांनी शुद्धीवर आल्यानंतर आम्ही कोणीच नाहि सांगीतले की ते कोमा मधे होते असे. २-३ दिवसांनी त्यांना बरे वाटले तेव्हा त्यांनीच विषय काढला, ... त्या दिवशी काय झाले होते. कोणी ताकास तुर लागु देईना. शेवटी त्यांनीच सांगीतले की त्यांना त्या दिवशी कोणीतरि बोलवत होते, लांब, दुरवर अंधार होता, व त्या २ व्यक्ती त्यांना त्यांच्या बरोबर यायला सांगत होत्या. पण मागुन १ आवाज येई , शांत / गंभीर असा व सुचना करी की जाऊ नकोस, जसा जसा तो आवाज जवळ येई, तशा त्या व्यक्ती लांब जात.

त्यांनी सांगीतलेला हा अनुभव त्यावेळी त्यांना येत होता जेव्हा डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत होते. यात त्यांना चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या प्रव्रुत्तींचा अनुभव आला.

.

परवा एफएमवर चाललेली चर्चा. वांद्रे वरळी सी लिंकवर एकाच स्पॉटवर २५ अपघात झालेत आणि लोक दगावलेत. एका कोळ्याचा इंटर्व्ह्यू घेतला तर तो म्हणतो की , त्याच जागेवर हा ब्रीज नसताना बोटी उलटायच्या, तिथे विचित्र अनुभव यायचे. तो रस्ता टाळून कोळी आपल्या होड्या न्यायचे.

आता काय खरे मानायचे???

भुंगा आणि इतर कुणीतरी सांगितलेलं एनर्जी (ऊर्जा) हे पटतं. सकारात्मक उर्जा आणि नकारात्मक उर्जा. मग ती उर्जा कुठल्या रूपात आपल्यासमोर येईल (manifestation in what form) हे सांगता येत नाही.

सकारात्मक उर्जा आणि नकारात्मक उर्जा. >>> मंदार, तुला हे वाटतं तितकं सोप्प नाहीय.
ही तिसरीच दुनिया आहे. सकारात्मक उर्जा आणि नकारात्मक उर्जा यांच्या वातवरणात, सहवासात आपण वर्तमानात जगत आहोत. मानवीय अवस्थेतच या उर्जा आपल्या समोर आहेत.
उदा.तु मला कारणविनाकरण माझ्या कामात मला मदत करतोस तर, मी ही बदल्यात तुला अडचणीच्या वेळी कामास येतो, तर ही झाली तुझी 'सकारात्मक उर्जा'. समजा, कोणत्याही कारणास्तव तु 'माझा जिव घेण्याचा प्रयत्न केलास' तर त्याच्या मोबदल्याची कल्पना तर तुला असेलच, तर ही झाली 'नकारात्मक उर्जा'.

पण "अमानविय" ही अवस्थाच तिसरी आहे, हे 'जगच' वेगळे आहे मंद्या. तु याला 'उर्जेची' संज्ञा दिलीस तर याची मापके सुध्द्दा निघतील कारण, आपण कोणत्याही उर्जेला मापु शकतो. म्हणजे तु सांगणार आहेस का की, अमका भुत किती वेळ दिसेल..?, कोणाला दिसेल..? त्याचे अस्तित्व कितीवेळ असेल..? त्याचा अमंल हिवाळ्यात असेल की उन्हाळ्यात..?

नाही... उर्जा नाही मंदार, या तिसर्‍या अवस्थेला केवळ अनहोनी, अमंगल, "अमानविय"च म्हणु शकतो आपण....

आणखी लिहायचं आहे पण वेळ नाहीय नंतर बघु.
पट्लं नाही पट्लं तर कळव रे... मी काय?...वेडा 'चातक'. Happy

@दिनेशदा, स्वप्ना_राज, HH

मी काही ६४ देशात फुले वगैरे पाठवण्याचे मेसेजस नाही टाकले कुठल्याच बीबी वर...काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.. Sad अकाउंटचा ताबा अमानवीय स्पिरीटने घेतला की काय Sad माझ्या पाउलखुणा मधेहि दिसत नाहीत असले मेसेज..असले उद्योग करायला वेळ नाही हो मला Angry

आणि बाबा नका हो करू मला, माता / देवी चालेल... Happy

बाकी राहिला प्रकार सर्वाना दर्शन देण्याचा.... तर तुमचि साधना कमी पडतिये बहुतेक.. वर दिनेषदा सांगतच होते त्याना खूप सहज देव दर्शन होत म्हणे..माझ दर्शनही त्याना म्हणूनच झाल असाव Biggrin

@mhamaikar
गगोवर आले होते पण कुणी काही बोललेच नाही.. म्हणून परत नाही गेले तिथे... इथले कस्टम्स अजुन माहीत नाहीयेत मला.. Sad अकाउंट जुने असले तरी कधी लोग इन करून लिहायचे कष्ट नाही घेतले.. आता घेतिये तर लोकानि अमानवीय करून टाकले मला..

मोनालिपी नी सांगितला तसाच अनुभव मी माझ्या पणजोबांच्या बाबतीत ऐकलेला..
पणजी-आज्जी खूप तरुण असतानाची गोष्ट
दुपारची वेळ - ती कामं उरकून पडलेली.. तर अर्धवट झोपेत तिला दोन माणसं दिसली.. त्यांच्यात आपापसात कसलीतरी चर्चा चाललेली..
त्यातला एकजण म्हणाला "आज हा नाही - आज त्या मारुतीच्या देवळातला. हा पुढच्या शनिवारी"
त्या दिवशी मारुतीच्या देवळातला माणूस गेला. पुढच्या शनिवारी माझे पणजोबा... Sad

माझ्या काकाच्या जायच्या वेळेस मी घेतलेला अनुभव..
आम्ही सगळे नातेवाईक गावात भेटलो. संध्याकाळी अचानक त्याच्या डोळ्यात बघताना मला वाटलं की काहीतरी राँग आहे.. काही खरं नाही.. जे काही आहे ते फारसं चांगलं नाही..
दुसर्‍या दिवशी आम्ही सगळे एकत्र पुण्याला आलो - काका-काकू तिथून मुंबईला गेले.
मी तोपर्यंत कुणालाच काही बोलले नव्हते. पुण्यात ताईच्या घरी मी आईला मला काय वाटलं ते सांगितलं (टच वूड करून)..
सोमवारी सकाळी फोन आला की काका झोपेत गेला Sad

जायच्या आधी डोळ्याचा रंग/त्यातले भाव बदलतात असं मला वाटतं.. ह्याला शास्त्रिय कारणंही असू शकतात.. मला माहित नाहित!

शास्त्रिय बेस नाहिये, मला अनुभवही नाहिये (अनुभव आला तरी सांगता येणार नाही :)), पण असं ऐकलं आहे की:
जाणार्‍या माणसाला सूर्य जास्त प्रखर दिसतो .. आणि त्याचे (गेलेले) जवळचे नातेवाईक तिथे जमा होतात!

.

अरे अमानवीय धाग्यावर आता "मानवीय" चर्चा सुरू झाली..... Uhoh

सगळी भुतं घाबरलेली दिसतायत.

आजोबांनी प्रत्यक्ष अनुभवलेला किस्सा ...
माझ्या आजोबांना शेजारच्या गावातील (अंतर ३ किमी) असलेले एक जवळचे नातेवाईक (वय-९० च्या आसपास) वारल्याची वार्ता कुणाकडुन तरी सकाळी मिळाली,त्याकाळी (सन. सा. १९६५) कोणतही वाहन,बस अर्थातच नव्हती, ते मग लगेच सायकलनी तिकडे पोहोचले, तिकडे सगळे गावातले, पै-पाहुणे,जवळचे लोक तर गोळा झालेले होतेच, घरात बायकांचा आठवणी सांगण्याचा,गुणगान करण्याचा कार्यक्रम तर जोरात चालु होता, सगळीकडे बातमी पोहोचवण्यात आली होतीच, आता घरासमोर शेवटची तयारी चालुच होती.
आजोबा गेल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन दर्शन घेतलं,आणि त्यांनी जवळ जाऊन एकदा नाडी पाहिली,त्यांना थोडी शंका आली, म्हणुन त्यांनी आपल्या गावच्या एका डॉक्टरना एकदा दाखवलेलं बरं असा आग्रह केला,काहीनी वेड्यात काढलं,विरोधही केला पण आजोबांसमोर (तब्येतीसमोर?) साहजिकच कमी पडला,तो डॉक्टर (डॉ.रानडे) त्या भागात तरी खुप गुणकारी होता. मग एका बैलगाडीने ताबडतोब त्या (वारलेल्या?) आजोबांना आपल्या गावी आणुन त्या डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी मग त्यांनी लगेच सलाईन/ऑषध सोडलं..
आणि विशेष म्हणजे ते आजोबा बरे होऊन पुढे २ वर्षे खणखणीत जगले.
Happy

माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट आहे ही--
लग्नानंतर ५ वर्षांनी मला रोज वापरायला सोन्याचं छोटं मंगळसुत्र घ्यायच होत. आम्ही दोघे सोनाराकडे गेलो. मला शोकेश मधलं एक मंगळसुत्र खुप आवडलं. मी सांगीतल, मला दुसरं बनवुन नको हेच हवं. मला ऑफिस मधुन घरी आल्यावर दागिने काढुन ठेवायची सवय आहे. मंगळसुत्र घातलं की माझा नुरच बदलुन जायचा . मी सगळ्यांशी विनाकारण भांडायचे, एकदातर मी नवर्‍याशी रस्त्यातच भांडले. तो तर बिचारा पुरता भांबाबुन गेला. गेली ५ वर्ष सगळ्यांशी सामंजस्याने वागणारी मी अचानक का बदलले?
संध्याकाळी घरी आल्यावर( दागिने काढल्यावर नॉरमल....) सा. बा. पण हवालदिल...
२-३ महिन्यांनी नवर्‍यानेच हा बदल शोधुन काढला. आणि अजुन मोठं मंगळसुत्र घेण्याच्या बहाण्याने , जुनं मंगळसुत्र परत दिले. येतील ते पैसे हिशोबही न करता घेतले.
मग सोनाराकडे चोकशी केल्यावर कळलं , कि ते कोणितरी गहाण ठेवलेलं मंगळसुत्र होतं. फारच वाईट अनुभव होता. सा .बा तर अजुन चिडवतात, की मंगळसुत्र घ्यातल्यावर तुझ्या मानेवर कोण गं बसत होतं?

साक्षी१ अनुमोदन, हे दागिने (अपघातात गेलेल्यांचे चोरलेले दागिने / चोरीचे दागिने ) असू शकतात. थोडक्यात म्हणजे वापरलेल्या वस्तूंचे वाईट अनुभव येउ शकतात.

साक्षी१,
म्हणुन तर कर्ज असलेलं, वादात सापडलेल घर,जुनी गाडी देखील नीट चोकशी करुनच घ्यावी म्हणतात.

Pages