पैंजण

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 January, 2009 - 03:10

बंगल्याच्या कंपाऊंडलगत असलेल्या झाडावरूनच तिघांनी बंगल्याचा अंदाज घेतला. रात्रीच्या गडद अंधारात बंगल्याची आकृती नक्कीच भेसूर वाटली असती पण आकाशातल्या चंद्र तार्‍यांच्या अस्तित्वाने ती भेसूरता फ़ारच कमी झालेली. बंगल्याच्या आतही किंचीतसा उजेड जाणवत होता. नाईटबल्ब लावल्यासारखा. ते तिघे बंगल्याच्या मागच्या बाजूस होते. तो एकमजली बंगला आटोपशीर होता. चहूबाजूस बरीच जागा रिकामी होती. बंगल्यापासून कंपाऊंडपर्यंत वाढलेल्या झाडाझुडूपांमुळे बंगल्यात कोणाचाही जास्त वावर नसावा ह्याची सहज जाणिव होत होती.
"तुला खात्री हाय तितं कोण्बी रात नाय ? " एक दबक्या आवाजात फ़ुसफ़ुसला.
"एकदम पक्की खबर आहे." फ़ांदीवरील पकड घट्ट करत दुसरा बोलला.
"मंग मार की उडी." त्याचं वाक्य संपण्यापुर्वी दुसर्‍याने कंपाऊडच्या आत उडी मारली. मागोमाग त्या दोघांनी त्याचे अनुकरण केले. तिघेही आता बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये होते. बंगला तेथून साधारण शंभर पावलांवर होता.
"च्यामारी, वार्‍याचा चतकोरबी नाय. धावून धावून घामच्या धारा लागल्याती." बाहीने घाम पुसत एक बोलला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुसरा बंगल्याच्या दिशेने धावू लागला. त्याच्यामागोमाग त्यांनीही सुरूवात केली. काही क्षणातच ते बंगल्याच्या मागच्या भिंतीजवळ होते. भिंतीला हात टेकवून तिघेही धापा टाकू लागले. एकजण भिंतीला पाठ टेकवून सरकत खाली बसला देखील.

बंगला जुना वळणाचा दिसत होता. दगडांचा खडबडीतपणा हातांना जाणवत होता. साधारण पाच मिनिटे स्वत:चा श्वास सावरण्यातच गेली. रातकिड्यांच्या किरकिरण्याव्यतिरिक्त दुसरा कसलाही आवाज नव्हता.
"आख्ख्या जल्मात एवढा पळालो नव्हतो." बसलेल्याचा आवाज ती भयाण शांतता चिरून गेला.
"सर्जा, पळाला नसतास तर बसला असता, दहा बाय दहाच्या खुराड्यात, मच्छर मारत." पहिल्याने त्याच्या स्टाईलमध्ये जोक मारून किंचीत हसून दुसर्‍याकडे बघितलं. दुसरा मात्र भोवतालचा अदमास घेत होता.
"चला, वर जाऊया." दुसरा त्यांच्याकडे वळला.
"भाल्या, बस्की गड्या पाच मिन्टं. इतं कोण धावतयं आता आपल्यामागं ?" पहिला त्रासावलेल्या स्वरात बोलला."आन, वर कुठनं जायचं म्हणतोस ?" भाल्याने निर्देश केला व त्या दिशेला चालू लागला. त्यांनी पाहीलं. ड्रेनेजचा पाईप वरच्या मजल्याच्या बालकनीशी लगट साधून होता. एकमेकांकडे पाहून ते निमूट त्याच्या मागे चालु लागले. भाल्या सराईतपणे वर चढला.
"सर्जा, जमल का ? " पहिला बोलला.
"बजा, हे कधी केलं नाय बघ." सर्जा आपली अडचण सांगून मोकळा झाला.
"भाल्याला बघ, कसा माकडासारखा चढला का नाय ?" बज्या बालकनीत पोहोचलेल्या भाल्याकडे पहात बोलला.
"त्याला काय त्याचं ? जलमभर तेच केलय. याचं घर फ़ोड, त्याचं घर फ़ोड." सर्जाने भाल्याच्या सराईतपणाच कारण विशद केलं.
"च्यामारी, ते बी खरचं. चल खांद्यार चढ माज्या." बजा वाकला आणि तेवढ्यात वरून भाल्याने आवाज दिला,"चला लवकर."
चटदिशी बजाच्या खांद्यावर स्वार होऊन सर्जा वर चढला. मगोमाग बजाही. आता तिघेही बालकनीत होते.
"दार आतून बंद आहे." भाल्याने एवढ्यावेळात केलेल्या तपासाचं फ़लित सांगितलं.
"मंग ..?" बजा प्रश्नांकीत. पुन्हा भाल्याच्या निर्देशाकडे दोघांनी पाहीलं. बालकनीपासुन तीन फ़ुटाच्या अंतरावर एक खिडकी उघडी होती.
"भंकस करतो काय ? " बजा भाल्याकडे वळला.
"नाही." दुसयाच क्षणी भाल्या रेलिंगवर चढला. रेलिंगवरून तो खालच्या अर्ध्या फ़ुट रुंदीच्या दगडी पट्टीवर पाय ठेवून उभा राहीला. एका हाताने रेलिंग घट्ट धरून त्याने दुसरा हात खिडकीच्या दिशेने झोकला. दोन इंचाचा फ़क्त प्रश्न होता. बजा पुढे सरला. त्याने हात दिला. त्याच्या हाताच्या आधाराने त्याने भिंतीला शरीर चिटकवलं. पालीसारखं पुढे सरत त्याने खिडकी पकडली. बजाने सुस्कारा सोडला. भाल्याने खिडकीतून शिरून आवाज दिला. "या आता."
"येडा हाय का भाल्या ? जेलमदनं पळालो ते काय हात पाय तोडून घ्यायला ? " सर्जाचा स्पष्ट नकार.
"भाल्या, टकूरं चालव की गड्या. आता हा दरवाजा खोल की आतनं" बजा बोलला आणि भाल्याला आपला मुर्खपणा उमगला. तो दरवाज्याच्या दिशेने वळला. त्याचवेळेस खोलीतला उग्र हिरवट दर्प त्याला जाणवला. पायाला साचलेली धूळ जाणवली. खोलीत एका मोडकळलेल्या लाकडी कपाट व कोळीष्टकाव्यतिरिक्त काहीच नव्हतं. तो शेजारच्या खोलीत शिरला. त्या खोलीत नावालाही सामान नव्हतं हे जाणवलं त्याला. त्याने येऊन बालकनीचा दरवाजा खोलला. तिघेही आता बंगल्यात होते.

"च्यामारी एक्दम ओस पडलाय. साधी खुर्चीबी नाय एवढ्या मोठ्या खोलीत." बजा न राहवून बोलला.
"बाजुच्या खोलीत एक कपाट आहे... मोडलेलं" भाल्याने त्याला अधिक माहीती पुरवली.
"एवढ्या मोठ्या बंगल्यात सामान नाय ? बंगल्याचा मालक पार धुपला का काय ?" सर्जाने नसते तर्क लावायला सुरूवात केली.
"भाल्या, इतचं झोपुया गड्या." बज्याने आळस देत सल्ला दिला.
"नको. खाली जाऊया." भाल्या दरवाज्याच्या दिशेने निघाला.
तिघे आता दरवाज्यापुढच्या पॆसेजमध्ये होते. बाहेरील चांदण्याचा प्रकाश आणि आतले तीन-चार दिवे त्यांना पुरेसे होते. अंधुकसा का असेना पण अवतीभवतीचे जाणवण्यापुरता तरी उजेड होता. नकळत ते बंगला न्याहाळू लागले. बंगला जुन्या वळणाचाच होता. जुन्या हिंदी चित्रपटात असावा असा. गोलाकार पॅसेज, दोन्ही बाजूने खाली उतरणारे जिने, दगड व संगमरवरचा वापर करून केलेल्या ऐसपैस खोल्या. सर्वात शेवटी अजून दाराजवळ उभा असलेला सर्जा तेवढ्यात दचकला व मागे वळला.
"कायरं, काय झाल? " बजाला त्याचं दचकणं जाणवलं.
"त्यो आवाज ऐकला, बज्या ?" सर्जाच्या आवाजात भीती डोकावलेली.
"कसलारं ?" बज्या त्याच्या आवाजाने थोडा टेन्स. पुढे चाललेला भाल्याही मागे वळला.
"पैंजणाचा आवाज." सर्जाच्या आवाजात हल्कासा कंप.
"घाबरला का काय तू ? कान वाजाया लागले तुजे. आता गाणं बी ऐकू येईल तुला गड्या" बज्याने थट्टेच्या सुरात त्याच्या खांद्यावर थोपटले.

तिघे आता पुढे सरले. डावीकडच्या जिन्याने ते खाली उतरायला लागले. दोन्ही जिन्याच्या मध्यावर आल्यावर मात्र ते जागीच खिळले. एका छोट्याशा बल्बच्या प्रकाशात समोर एक भलेमोठे तैलचित्र होते. एका सुंदर स्त्रीचं. पाय दुमडून बसलेल्या त्या स्त्रीचा चेहरा वळून जणू काही तिला पाहणार्‍यांकडे पहात होता व तिने गुढघ्यांच्या जवळपास आपल्या साडी किंचीत वर दोन्ही हातांनी धरली होती. तिच्या त्या नजरेत एक वेगळीच चमक होती. एखाद्या कलानिपूण नर्तकीच्या डोळ्यात असावी तशी. फ़ार जिवंत वाटत होते तिचे ते डोळे. चित्रात इतका सजीवपणा होता की आता ती बोलेल की काय असं वाटलं भाल्याला.
"भाल्या " बजाच्या हाकेवर चित्रात गुंगलेला भाल्या दचकला.
"एक्दम जितं वाटतयं गड्या. मला वाटलं आता बोलते की काय ?" बजा चित्रावरची नजर न हलवता बोलला आणि नकळत भाल्या शहारला. चित्रावरून फ़िरणारी भाल्याची व बज्याची नजर एकाचवेळेस सर्जाकडे वळली. तो भारावल्यासारखा त्या पायातील सुंदर पैंजणांकडे पहात होता. त्या अंधूक प्रकाशातही त्याच्या डोळ्यात तरळलेली भीती त्यांना स्पष्ट दिसत होती. कोण्त्याही क्षणी तो घाबरून ओरडेल असं वाटल दोघांना. त्याच्या चेहयावरील होणारा सुक्ष्म बदल त्या अंधूक वातावरणात त्या दोघांना संपुर्ण जाणवले नसले तरी त्याचं शरीर गार पडल्यासारखं वाटू लागल त्यांना.

"सर्जा.... सर्जा..." दोघांनीही त्याला गदागदा हलवलं. भानावर येणार्‍या सर्जाने त्यांच्याकडे अनोळखी नजरेने पाहीलं. त्याच्या त्या नजरेने दचकले दोघेही. बज्याने त्याच्या खांद्याला घट्ट धरून त्याला पुन्हा हलवला. संपुर्ण. अंतर्बाह्य. झोपेतून जागं व्हावं, तसं काहीसं केलं त्याने.
"सर्जा, काय झालं ? " बजाला त्याची ती मघासची नजर अस्वस्थ करून गेलेली. वाचा नसल्यासारखं त्याने बजाकडे पाहील व त्या दोघांना 'पैंजण' दाखवण्यासाठी त्याचा हात त्याच्या नकळत वर गेला.
"चल." पुढे काही न बोलता दोघे त्याला खाली घेऊन गेले. त्याची भयकंपित नजर मात्र त्या चित्रावर होती.

तेथुन हॉलच्या दर्शनी भागात उतरायला दहा-बारा सामायिक पायर्‍या होत्या. खाली सगळा परिसर रिकामाच होता. वरच्या मानाने खालचा भाग जरा व्यवस्थित वाटत होता.
"भाल्या, कोण्तरी हाय इतं. ही जागा बर्‍यापेकी साफ़ दिसतेय बघ." बज्या सगळीकडे नजर फ़िरवता फ़िरवता बोलला.
"मघाशी मी बोललो ना, दिवसाचा एक गडी असतो इकडे. पण दिवसाच. रात्री नाही." भाल्याला त्याच्या माहीतीबद्दल खात्री होती. वळुन-वळुन फ़ोटोकडे बघणाया सर्जाला बज्याने स्वत:च्या दिशेने फ़िरवलं.
"सर्जा, तिकडं बघायचं नाय." बज्याने त्याला बजावलं आणि नंदीबैलासारखी सर्ज्याने मान हलवली. त्याला घेऊन तो तिथेच थांबला व तोपर्यंत भाल्याने तेथला जुजबी दौरा करायला सुरूवात केली.
"च्यामारी हा काय आरामात फ़िरतोय, जसा याच्याच बापाचा बंगला हाय." बज्याला भाल्याच्या सराईत हालचाली विस्मयकारक वाटत होत्या. तो जरा नजरेआड होताच बज्या सर्ज्याकडे वळला.
"सर्ज्या, तीन मैन्यापुर्वी भाल्या मला पळून जायचं बोल्ला."
"मलाबी." सर्जाने प्रतिसाद दिला.
"पण तुज्याबद्दल कंदी बोल्ला नाय गडी मला." बज्याने केव्हापासून डोक्यात घोळणारा प्रश्न त्याच्याबद्दलच्या अविश्वासासकट विचारला.
"मलाबी." सर्जाचा पुन्हा प्रतिसाद पण त्याच्याही स्वरात अविश्वास.
"च्यामारी, याच्या डोसक्यात होतं तरी काय ? मला काल रात्च्याला कळलं, जवा तु आमच्याबरुबर धावलास तवा. याला लपवायची काय गरज व्हती ?" बज्याच्या डोक्यात आता शंका थैमान घालू लागली.
"तुला खरचं ठाव नव्हतं, बज्या." सर्जाला अजून त्याच्या शब्दावर विश्वास नव्हता.
"खंडोबाची आन गड्या. खोट्टं नाय बोलत." बज्यानं गळा चिमटीत पकडला. भाल्याची चाहूल लागताच सर्जा पुढे काहीच बोलला नाही.
"बज्या, त्या खोलीत अंथरूण पांघरूण आहे. एका माणसाचचं आहे पण आजच्या रात्रीसाठी बस आपल्याला." भाल्याने त्याच्या यशस्वी दौर्‍यातून हाती जे गवसलं ते सांगितलं.
"भाल्या, सर्जाबद्दल आदी का नाय सांगितलं ? " बज्याने सरळ मुद्द्यालाच हात घातला.
"त्याने काय फ़रक पडतोय, चला झोपुया." भाल्या वळला.
"भाल्या, एक्दा का किडा डोसक्यात शिरला की मग आपलं काय खरं नसतं बघ. तवा........." बज्याच्या स्वरात उघड धमकी होती. भाल्या मंद हसला. दोघांना ते जाणवलं.
"बज्या, पळून जायला मला फ़क्त एका माणसाची गरज होती. पण जेलमध्ये ऐनवेळेला गस्त वाढली आणि मला एक माणूस वाढवावा लागला. या कानाची गोष्ट त्या कानाला होऊ नये म्हणून दोघांच्या गोष्टीत तिसरा आहे, हे मी बोललो नाही. त्यामुळे तुम्ही दोघे आपापल्या जाग्यावर जबाबदारीने वागलात आणि मोहीम फ़त्ते झाली. मला यावेळेस कोणतीही चुक करायची नव्हती. " भाल्याने स्पष्टीकरण दिलं खरं पण त्यामुळे त्या दोघांच समाधान झालं नाही हे ही त्याला जाणवलं.
"धा हजार देतो बोलला व्हता तू, त्याच काय ?" बज्याचा पुढचा सवाल आणि सर्जा एकदम ओरडला,"मलाबी देणार व्हता."
"आता एवढ्या रात्री पैसे घेऊन कुठे जाणार आहात ? सकाळचा सुर्य तरी बघु दिसतो का ?" भाल्यच्या बोलण्यात मिश्किलपणा होता.
"हे माज्या प्रश्नाचं उत्तर नाय, भाल्या." बज्या विनोदाच्या मुडमध्ये नव्हता.
"दोघांना हवं ते मिळेल. माल या बंगल्यातच आहे." भाल्या शांतपणे बोलला.
"या बंगल्यात ? " दोघे जवळजवळ किंचाळलेच.
"शुश्श्श्श्श ....हळू...भिंतीना कान असतात." भाल्याने तोंडावर बोट ठेवलं.
"म्हंजे तु पैलाबी आलाय इकडं ?" सर्जाने पटकन मनातली शंका बोलून दाखवली.
"नाही. माझा साथीदार आला होता. त्यानेच माल या बंगल्यात ठेवलाय. आमची दोन वर्षाची कमाई आहे ती. सकाळ झाली की शोधू आणि चालू पडू. तुमचे प्रश्न संपले असतील तर आता झोपायला जाऊया. खूप दमलोय मी." तो वळला.
"च्यामारी, आम्ही काय घोडागाडीतून झोपून आलोय काय ?" बज्या पुन्हा वैतागला.
"तरी किती असतील रं भाल्या " सर्जाच्या डोक्यात पैशांचा विचार पिंगा घालत होता.
"जेवढे आहेत तेवढे चौघांसाठी पुरेसे आहेत." भाल्या पुढे चालता-चालता त्याच्याकडे वळला.
"च्यामारी, हा चवथा कोण ? " बज्याचा प्रश्न.
"माझा साथीदार. शिवाय आता दहा हजार नाही, प्रत्येकाला यात समान वाटा मिळेल कारण जेलमधून यावेळेस पळू शकलो नसतो तर मात्र या पैशांचं मला तोंडही पहाता आलं नसतं." भाल्याने खोलीचा दरवाजा ढकलला.
"खरं बोलतोय गड्या तू? " बज्याला त्याच्या कानावर विश्वास नव्हता बसत.
"तुझ्या खंडोबाची आन." भाल्या खोलीत शिरला व मागोमाग बज्याही. आत जाता-जाता सर्ज्याने त्या फ़ोटोकडे दारातून नजर टाकलीच. ती त्याच्याकडे पहातच होती.

थोड्याच वेळात पैशाच्या पडणार्‍या पावसाची गोड स्वप्ने पहात अंथरूणावर पडल्या पडल्या तिघांनी एकमेकांच्या घोरण्यात सुर मिसळला. साधारण तासाभरानंतर सर्जाला अचानक कसल्याशा आवाजानं जाग आली. तो उठून बसला. भाल्या जाग्यावर नव्हता.
"बज्या, उठ..... उठ." सर्जाने बज्याला गदागदा हलवलं.
"झोपकीरं गुमान." बज्याला स्वप्नातून बाहेर यायचं नव्हतं.
"बज्या, उठ..... उठ." यावेळेस सर्जाने पुर्ण जोर लावून त्याला ढकलले. बज्या धडपडत उठला.
"काय झाल च्यामारी ?" बज्याचा आळसटलेला सुर.
"भाल्या कुठाय ?" सर्जाने त्याला झोपेतून उठवून एक वेडगळ प्रश्न विचारला.
"मला काय माईत. मला काय सांगून गेलाय. ह्या बेण्याच्या डोसक्यात गडबड हाय. साल्यानं नस्त्या कामाला लावलयं." बज्या वैतागून उभा राहीला. वार्‍याची एक मंद झूळूक त्याला स्पर्शून गेली. नकळत तो सुखावला.
"सर्जा, लय येळानं वारा आला. गार वाटलं आता." दोन्ही हात पसरून त्याने ती झूळूक अंगावर घेतली आणि लख्ख ट्युब पेटावी तसा तो पटकन सर्जाकडे वळला.
"आपण खिडकी उघडी कवा उघडलीरं सर्जा?" बज्याने मेंदूवर जोर देत विचारलं.
"काय आठवत नाय." सर्ज्याचे दोन्ही हात या बाबतीत वर आणि बज्या खिडकीकडे वळला. बाहेरच्या अंधारात तो न्याहाळत असतानाच....
"तितं काय बघ्तुयास, भाल्याला शोधायचा का नाय ? " सर्जाने त्याला मुळ मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न केला.
"काय करायचयं ? असला तर परत येल नसला तर नाय. असल्या पैशावर थुंकतो आपण" बज्याच्या बोलण्यात बेफ़िकीरी जाणवली सर्ज्याला.

अचानक एक अस्पष्ट आवाज कानी आला.
"पैंजण" दोघांच्या तोंडून एकच शब्द आला. दोघांनी आवाजाचा कानोसा घेतला. आता आवाज स्पष्ट होता. तो नक्कीच पैंजणांचा आवाज होता. कपाळावरच्या थेंबांची दोघांना जाणिव झाली.
"चल. बघूया." बज्याने मनाचा हिय्या केला.
"नको. इतं ठिक हाय. " सर्जाचे पाऊल पुढे सरकत नव्हते.
"चल मर्दा, हा सगळा त्या भाल्याचा डाव हाय. साल्याचं काम झालया नव्हं, पैका द्यायचा नसेल म्हणून ही भंकसबाजी करतोय." बज्या त्वेषाने दरवाज्यापर्यंत पोहोचला आणि तोच दार उघडलं गेलं. भाल्या आत आला. दोघांना उठलेले पाहून चमकला.
"काय झालं ?"
"कुठं व्हतास ?" बज्याच्या स्वरात संतापाची तिडीक होती.
"पोटात गडबडलं म्हणून गेलेलो. इथे आत पाणी नाही. तुला एवढं चिडायला काय झालं ? जाताना तुला सांगून जायाला पाहिजे होतं काय ?" भाल्याचा स्वर शेवटी चढलाच आणि तेवढ्यात पुन्हा तो पैंजणांचा आवाज. भाल्या गर्रकन वळला.
"कोण ?" भाल्याच्या तोंडून नकळत हाक निघाली.
"कोण हाय भाल्या ? " बजाच्या आवाजातून भाल्याबद्दलचा अविश्वास डोकावत होता.
"मला काय माहीत. हा बंगला गेली २० वर्षे कोणीच वापरत नाही." भाल्याने माहीती दिली.
"का ?" सर्जाचा कंपित आवाज.
"या बंगल्याचा मालक परदेशात आहे. त्याची बायको आणि मुलगी, त्या दोघींचा हा बंगला आवडता. खूप हौस या वाड्यात राहायची. अधून मधून यायच्या इथे. एकदा अशाच त्या इथे येत होत्या तेव्हा त्यांच्या गाडीला ट्रकनं उडवलं. खेळ तिथेच खल्लास. मालकाने बंगल्याचं नावच टाकलं. पनवती मानतो या बंगल्याला तो. बंगल्यातलं सगळ होतं नव्हतं ते चोरट्यांनी आणि गावकर्‍यांनी पसार केलं. बापजाद्यांचा बंगला म्हणजे शेवटची निशाणी म्हणून तो कोणाला विकतही नाही. नावापुरता एक गडी ठेवलाय बंगल्याची राखण करायला. तेवढा एकच काय या बंगल्याचा माणसांशी संबंध. बाकी आता इकडे कुत्रपण फ़िरकत नाही." भाल्याने सगळी ऐकीव माहीती भडाभडा सांगितली.
"पण लोकं का फ़िरकत नाय इकडं ? " बजाच्या आवाजाला आता भितीची झालर होती.
"मायलेक इथे वावरतात म्हणे. सगळ्या बाता आहेत लोकांच्या. जेवढी माणसं तेवढ्या कथा. कोणी कोणावर विश्वास ठेवायचा ?" भाल्या एवढं बोलून दरवाज्याकडे वळला.
"तुला माहीत व्ह्तं मग कशापाई आणलसं आमाला इतं ? " सर्जाच्या बोलण्यातुन भितीसोबत आता चीड होती.
"या फ़क्त बाता आहेत. बाकी काही नाही." भाल्याच्या वाक्याच्या शेवटी पुन्हा तोच पैंजणाचा आवाज आणि यावेळेस आवाज फ़ारच स्पष्ट होता.
"भाल्या, या बाता हायेत मग वर काय तुजी आय नाचतेय ?" बज्याच्या हात दाराकडे असलेल्या भाल्याच्या खांद्यावर पडला. भाल्या त्याचक्षणी वळला.
"बज्या, तोंड सांभाळून. जे काय असेल ते बाहेर जाऊन बघूया." खांद्यावरचा बज्याचा हात झटकणाया भाल्याच्या थंड आवाजात जरब होती.
"आरं बघायचं काय त्यात ? समदा तुजा आन तुज्या त्या दोस्ताचा खेळ हाय. येडा समजतो काय आमाला ?" बजा आता काही ऐकून घ्यायला तयार नव्हता.
"बज्या, या आवाजात माझा काही संबंध नाही." भाल्या आता डोकं शक्य तेवढं शांत ठेवून उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
"ठिक हाय. ठेवला इश्वास. चल बघू कोन तिच्यामारी ........" बज्या सरसावला. "चल रं सर्जा" बज्या सर्जाकडे वळला. सर्जा थरथरत होता. चेहर्‍यावर तीच भिती.
"मी नाय. माजी बायको असलं तितं." सर्जाच्या आवाजातील भिती आता त्याच्या सर्वांगात पोहोचलेली. दोघेही त्याच्याकडे धावले.
"सर्जा, काय बरळतोस ?" भाल्याने त्याचे खांदे धरून त्याला हलवले.
"ती मला माराया आलीया. तिला बदला घ्यायचाय माजा. ती मारल आता मला. मला जिता नाय सोडायाची ती. तिचं पैंजण म्या काढून घेतलं. तिला लय नाद, पैंजण घालून गावभर फ़िरायचा. अख्ख्या गावाला नादाला लावलेलं तिनं तिच्या पैंजणांच्या तालावर. लय समजावली तिला. पण ऐकलं नाय तिनं. घातली कुराड एक दिवस." सर्जा आता त्या दोघांच्या समोर राहीलाच नव्हता. त्याच्यासमोर होतं कुर्‍हाडीचा घाव बसल्यावर तडफ़डणारं त्याच्या बायकोचं शरीर. तिच्या त्या हातपाय झाडण्याबरोबर वाजत होते तिचे पैंजण आणि त्या नादाने भंडावलेल्या त्याच्या डोक्याने दुसरा-तिसरा घाव घातला तो सरळ त्या पायांवर. तडफ़ड चालूच होती पण पैंजण थंडावलेले. रक्ताने माखलेले पैंजण घेऊन सर्जा तसाच बसून राहीलेला.
"सर्जा " त्यातला त्यात आवाज वाढवून बजानं सर्जाच्या कानाखाली जाळ काढला. भुतकाळात गडप झालेला सर्जा भानावर आला. क्षणभर तीच अनोळखी नजर.
"सर्जा, ऐक, ती तुझी बायको नाही. समजलं, ती तुझी बायको नाही. दुसरं कोणीतरी आहे. तु इथे थांब. आम्ही बघतो त्याला." भाल्या समजावणीच्या सुरात बोलला.
"मला मारल ती. मला मरायचं नाय. मला एकला सोडून जावू नका." सर्जा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच.
"च्यामारी " वैतागलेल्या बजाने स्वत:चं डोकं धरलं. त्याची नजर कोपर्‍यातल्या जाडजूड दांड्यावर गेली. त्याने तो दांडा उचलून सर्जाच्या हातात दिला.
"हे घे. इतं उभा रा. पैंजणवाली आली की घाल तिच्या टाळक्यात." बजा प्रमाणाबाहेर चिडला होता. भाल्यावर, सर्जावर, त्या पैंजणवालीवर आणि स्वत:वर. भाल्या दरवाज्याकडे वळला व मागोमाग बजा देखील. बजाने वळून सर्जाकडे पाहीलं. हातात दांडा घट्ट धरून त्याची नजर सगळीकडे भिरभिरत होती.
"येडावलाय." बजा स्वत:शीच बोलला. दोघे आता दाराबाहेर होते. पुन्हा पैंजणाचा आवाज. यावेळेस त्या रिकाम्या बंगल्यात घुमत गेला. दोघांनी वर पाहील. आवाज नक्कीच वरून आलेला. त्याचवेळेस आतून सर्जाने हवेत जोराने दांडा फ़िरवल्याचं त्यांना जाणवलं.
"बज्या, तु डावीकडे बघ. मी उजवीकडे जातो." भाल्या बोलून वळला.
"नाय, मी उजवीकडं आणि तू डावीकडं." बज्याला अजुन विश्वास ठेवायचा नव्हता.
"ठिक हाय. काही दिसलं की आवाज द्यायचा." भाल्या डावीकडे वळला. पावलांचा शक्यतो आवाज न करता दोघे दोन्ही बाजूने जिन्यावर चढू लागले. समोरच शांत बसून ती त्या दोघांकडे पहात होती. त्यांनी तिच्यावर नजर टाकायचं टाळलं.

पैंजणाचा आवाज जरी घुमत असला तरी कुणाची चाहूल अशी लागत नव्हती. जिना चढताच भाल्याने आपल्या डाव्या हाताचा पहीला दरवाजा ढकलला. पण आत जाण्यापुर्वी त्याने वाकून उजव्या पायाला बांधलेला चाकु बाहेर काढला. दरवाज्याचा आवाज तिथल्या शांततेला चिरत गेला आणि त्यामागोमाग पैंजणाचा आवाजही. आयुष्यभरात अगणित घरफ़ोड्या करणारा भाल्या रिकाम्या घराचा दरवाजा उघडताना किंचीत थरथरला. सगळं बळ एकवटून त्याने पाऊल आत टाकलं. पावलांना फ़रशीवरच्या धूळीचा थर जाणवला. कोंदलेपणाचा एक दर्प त्याच्या नाकात शिरला आणि त्याने नाक दाबलं. खिडकीतून डोकावणार्‍या चंद्रप्रकाशात त्याने डोळे फ़ाडून संपुर्ण खोलीत नजर फ़िरवली. ही खोलीही रिकामीच होती. फ़क्त धुळीचं आणि कोळीष्टकांच राज्य होतं. दोन पावलं तो पुढे सरला आणि उंदीर त्याच्या पायावरून तुरतुरत खोलीबाहेर गेला. त्याने दचकून पाय झटकले. चाकुवरचा हात घट्ट झाला. धूळीत पावलांचे ठसे आहेत का तेही त्याने त्या अंधूक प्रकाशात पाहीलं. कुणाचीही चाहूल त्या खोलीत नव्हती. तसा त्याला थोडा धीर आला. पण नाक दाबून जास्त वेळ तिथे थांबण्यात त्याला अर्थ दिसेना. तो पुन्हा बाहेर आला. त्याचवेळेस समोरील दारातून बजा बाहेर आला. त्याने नकारार्थी मान हलवली तशी भाल्यानेही मान हलवली. त्याचवेळेस खाली काहीतरी पडल्याचा आवाज झाला. दोघांनीही वरून खाली वाकून पाहील. त्या अंधूक उजेडात काहीच दिसत नव्हत. दोघे पुन्हा खोल्यांकडे वळले. एकेक करून सगळ्या खोल्या झाल्या पण कोणाचाही मागमुस लागेना.

हातातला दांडा घट्ट धरून सर्जा बडबड करत होता. "माज्याजवळ येऊ नको. मारून टाकीन तुला."
बाहेरच्या चंद्रप्रकाशाने भिंतीवर निर्माण केलेल्या झाडाझुडूपांच्या चित्रविचित्र सावल्या त्याच्या भितीत भर घालत होत्या. त्यात तो एकटेपणा आता त्याच्या सहनशक्तीच्या पलिकडे होता. दोघांना जाऊन बराच वेळ झाला होता. पैंजणांचा आवाज अधूनमधून येतच होता. ती पैंजणे त्याला वारंवार भुतकाळात नेत होती. शेवटी धीर करून तो दरवाज्याकडे सरला. दार किलकिलं करून त्याने बाहेर पाहीलं. अंधाराशिवाय दुसरं काहीच दिसेना त्याला. काठीने दरवाजा बाजुला करत तो बाहेर आला. बंगल्याच्या दर्शनी भागात पोहोचला तो. मागे पैंजणाचा आवाज घुमला आणि तो मागे वळला. ती चित्रातून त्याच्याकडेच पहात होती. तो तिच्या दिशेने चालू लागला. तिच्या चेहर्‍यावरची त्याची नजर आता तिच्या पैंजणावर स्थिरावली. तेवढ्यात कसली तरी चाहूल लागली. पैंजणाचा आवाज तितक्यात घुमला. पण कोणी दिसलचं नाही. काहीतरी नक्कीच होतं. काय असावं ते ? तो त्या दिशेला धावला. चाहुल जिन्याच्या पाठच्या भागात होती. तो त्या दिशेला गेला. अंधारात त्याने अंदाजाने दांडा फ़िरवला. नेमकं काय झाल ते त्यालाही कळलं नाही. काहीतरी झपकन त्यांच्या तोंडावर आदळलं आणि तो तिथेच कोसळला.

शेवटी ज्या बालकनीतून ते आत आले त्या खोलीच्या बाहेर दोघे पोहोचले. भाल्याला आठवलं की मघाशी आपण या खोलीतून निघालो तेव्हा इथे पायांना धूळ जाणवली नव्हती. खोली इतर खोल्यांच्या मानाने फ़ारच स्वच्छ होती. अस का ? प्रश्न त्याच्या डोक्यात घोंगावू लागला आणि तेव्हा बजाला भाल्याच्या हातातला फ़क्त लखलखता सुरा दिसत होता. पैंजणाचा आवाज अधूनमधून घुमतच होता. त्या दोघांना तो नेमका त्याच खोलीच्या बाहेर जास्त स्पष्ट जाणवला देखील.
"बजा, नक्की इथेच आहे काहीतरी घोळ. आवाज इथेच येतोय. तू जातो का मी जावू ? " भाल्याने बजाला लाखमोलाचा प्रश्न टाकला. बजा हो की नाही यात अडकला. त्याची नजर त्या सुर्‍यावरच होती. त्याचवेळेस खालून काहीतरी धडपडल्याचा आवाज आला आणि तुटपूंजा प्रकाश देणारे दिवे गेले. पुन्हा पैंजणांचा तोच आवाज.
"म्या खाली बघतो. तु आत जा." बज्या त्याला आत पिटाळून जिन्याच्या दिशेने धावला. आता सगळा कारभार अंदाजपंचे होता. त्या मिट्ट अंधारात फ़क्त आधार होता समोरच्या गवाक्षातून येणाया चंद्रप्रकाशाचाच. बज्या जिना उतरू लागला. खाली कुणाची तरी चाहूल लागत होती. पण कोण ? सर्जा असावा असा विचार त्याच्या डोक्यात तरळला. आवाज देण्यासाठी त्याने तोंड उघडलं पण समोरच्याला सावध करण्याची त्याची इच्छा होईना. दबक्या पावलांनी तो सर्जाला सोडलं होतं त्या खोलीकडे पोहोचला. त्याने दरवाजा ढकलला आणि आत पाहीलं. सर्जा आत नव्हता. बज्याला धोक्याची जाणिव झाली. तो वळला त्याचवेळेस काहीतरी अंधारात हललं. डोळे अंधारात रोखून बजा पुढे सरला. काहीतरी वारा कापत येतय एवढच त्याला जाणवलं आणि ओरडण्याची संधीही मिळाली नाही. अनेक प्रश्न सोबत घेऊन तो फ़ुटलेल्या कवटीसह जमिनीवर आडवा झाला आणि वर खोलीत मोडकळलेल्या कपाटाच्या दिशेने जाणारा भाल्या थबकला. बाहेर काहीतरी घडलं हे त्याला जाणवलं. तो 'धप्प' असा आवाज त्याने नीट ऐकला. त्याचवेळेस पैंजणाचा आवाज तिथे घुमला. भाल्या आवाजाच्या दिशेने वळला आणि बाहेरून जिन्यावर धावणाया पावलांचा आवाज येऊ लागला. भाल्या बाहेर धावला आणि हातातल्या सुर्‍यावरची पकड त्याने पुन्हा घट्ट केली.

दरवाज्यातून आधी त्याने आपला सुर्‍याचा हात बाहेर काढला. हेतू हाच की समोरच्याला त्याची शस्त्रसज्जता कळावी. बाहेरचा पावलांचा आवाज थांबला. भाल्या बाहेर आला. समोरच्या अंधारात काहीतरी हललं. खोलीतून पैंजणाचा आवाज घुमला आणि घाबरून भाल्या दुसर्‍या जिन्याच्या दिशेने धावला. ती सावली त्याच्यामागे धावली. भाल्या त्यानी आश्रय घेतलेल्या खोलीच्या दिशेने धावला आणि पाय अडकून तोंडावर आपटला. पैंजणाचा आवाज आता सारखा घुमत होता. त्याच्या पाठी धावणारी सावली पुन्हा मागे वळली ह्याचं त्याला भानही नव्हतं. आपण कुणाच्या तरी अंगावर पडलोय हे त्याच्या लक्षात आलं. शहारून गेला तो. हातातून निसटलेला सुरा उचलण्याचे भान त्याला राहीले नाही. उठण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातांना एक तरल पदार्थाचा स्पर्श झाला. ते रक्त आहे हे त्याच्या संवेदनाना अंधारातही जाणवलं. तो धडपडत रांगत उठला व पुन्हा समोरच्या जिन्याकडे धावला. पैंजणाच्या आवाजासोबत जिन्यावर त्याच्या धावण्याचा आवाज घुमला. अंधारात जिना चढून तो पुढे सरणार तोच वारा कापत त्याच्याकडे काहीतरी झेपावलं आणि तो कोसळला. मारणारा बेभान होता. भाल्याचे प्राण केव्हाच गेले होते पण तो मात्र मारतच होता आणि पैंजणांचे आवाज घुमतच होते.

भेदरलेला म्हातारा रायबा चौकीत शिरला आणि नेमका सरंजामेना धडकला.
"तिच्या.............." सरंजामेंनी म्हातार्‍याचं स्वागत केलं.
"काय म्हातारबुवा, भुत बघीतलं काय ? " सरंजामेनी स्वत:ला सावरत, ख्रुर्चीत बसता बसता म्हातार्‍याला प्रश्न केला.
"मुडदा" म्हातारा थरथरला.
"मुडदा ? कुठं ? " सरंजामे खुर्चीत बसल्या बरोबर परत उठले.
"आप्पासाहेबांच्या बंगल्यावर" म्हातारा अजून थरथरत होता.
"माने, गाडी काढा." सरंजामेंनी हुकूम सोडला आणि टेबलावरची कॅप उचलून निघाले.

"नेमीसारखा म्या बंगल्यावर गेलो. दरवाजा उघडून बघतो तर काय जिन्याजवळ मुडदा पडलेला. डोस्क्याचा पार भुस्काट केलाय कोणीतरी." रायबा सरंजामेना जे पाहीलं ते सांगत होता."बघीतलं आणि तसाच तडक धावलो तुमच्याकडं."
जीप दारात थांबली. सरंजामे आतल्या दिशेला धावले. जिन्याजवळच प्रेत पडलेले होते. डोक्याजवळ रक्ताचं थारोळं. अंगावर कैद्यांचे कपडे होते. त्या लाल रंगात स्पष्ट दिसत होता कैदी नंबर २१६.
"माने, काल रात्री तीन कैदी आधारवाडीतून फ़रार झाल्याची बातमी आली होती. त्यात हा नंबर होता ना ?" सरंजामेनी मानेना विचारलं.
"जी साहेब." मानेने होकारार्थी मान हलवली.
"वार डोक्यात केलाय सरळ." सरंजामें स्वत:शीच बोलले. त्यांची नजर रक्तात उमटलेल्या हाताच्या व पायांच्या ठस्यावर पडली. पुढे दोन अस्पष्ट ठसे जिन्याच्या दिशेला गेलेले. सरंजामे पुढे सरले. जिन्याचा कठड्याला व पायरीवर रक्ताचे सुकलेले डाग होते. ते वरच्या दिशेला निघाले.
"माने, तुम्ही खाली सगळीकडे चेक करा. मी वर बघतो." पुढची पायरी चढता-चढता त्यांनी मानेंना सुचना केली. झपाट्याने ते वर पोहोचले. समोरच आणखी एक कैदी पडलेला. रक्तबंबाळ अवस्थेत. मारणार्‍याने त्याचा पार चेंदामेंदा केलेला. त्या रक्ताळलेल्या कपड्यात त्यांनी महत्प्रयासाने नंबर वाचला." ३०५." पुढे रक्ताचे काही ठसे व थेंब मधल्या खोलीपर्यंत गेलेले. सरंजामे प्रेताला न्याहाळत असताना माने वर आले.
"साहेब, खाली अजून काही नाही."
"इथे आहे माने." सरंजामे त्यांच्याकडे वळले. त्या प्रेताकडे पहात-पहाता मानेंनी सुरूवात केली.
"फ़क्त त्या जिन्याच्या मागे एक मेलेला उंदीर आणि रिकामे डबे पडलेत. एका डब्याच्या काठाला रक्ताचे डाग आहेत." मानेंनी आंखोदेखा हाल सांगितला.
मानेंच्या चकीत मुद्रेकडे न पहात सरंजामे ठशांकडे पाहू लागले. रक्ताळलेल्या पायांचे अस्पष्ट ठसे. सरंजामे खोलीकडे वळले. दरवाजा उघडताच सरंजामेंचे लक्ष आता समोर पडलेल्या तिसर्‍या कैद्याकडे गेले. रक्ताने माखलेला हा कैदी पालथा पडलेला होता. त्याच्या हाताजवळच रक्तरंजित दांडा पडलेला.
"साहेब, तिसरा मुडदा ?" माने लागोपाठ तीन मुडदे बघून शहारले.
"जिवंत आहे तो माने. " सरंजामेंनी जवळ जाऊन अंदाज घेतला. त्याची कुस बदलली.
"सर्जा" सरंजामेच्या तोंडुन तिसर्‍याची ओळख ऐकून माने पुन्हा चकीत.
"तुम्ही ओळखता याला साहेब ?" मानेनी साहेबांकडेच चौकशी सुरू केली.
"तीन वर्षापुर्वी मीच याला पकडला होता. बायकोच्या खुनाच्या आरोपाखाली. देखणी बायको या रांगड्याच्या नशीबाला आली. तिला नटण्यामुरडण्याचा जाम शौक. तमाशातल्या बाईसारखा. पायात पैंजण बांधून भिंगरीसारखी नाचायची आणि गाव लोटायचा तिला बघायला. या येड्याला तिचं वागणं कधी कळलचं नाही. नुसता संशय. घातली एक दिवस कुर्‍हाड. पण तेव्हापासून संशयाएवजी बायकोचं भुत मानगुटीवर बसलं. पैंजणाचा आवाज ऐकला की गडी वेडा व्हायचा. मग आपला कोण आणि परका कोण ? सगळ्यांमधे फ़क्त बायकोच दिसायची त्याला. मग मात्र ज्याचं नशीब बलवत्तर तोच जगायचा. पण इथे पैं..............." वार्‍याची झुळूक आली आणि वातावरणात पैंजणाचा आवाज घुमला. सरंजामेनी चटदिशी आवाजाच्या दिशेला पाहीलं. वर एक सुंदर विन्ड चिम लोंबत होतं. रक्ताळलेलं.

"ताईसाहेबांनी सवताच्या हातानं बनवलं होतं हे. त्यांच्या आवडत्या पैंजणांचं. त्यांना पैंजणाचा लय नाद. या आवाजावर वेड्या व्हायच्या त्या आणि मग नाचायच्या. इथली खुप ओढ त्यास्नी. म्हनायच्या, रायबाकाका, इथल्या वार्‍यात, पानात, झाडात, फ़ुलात, पाण्यात एक सुंदर संगीत हाय. तसं माज्या खोलीतबी पायजे. बाईसाहेब त्यांना गाणं आणि नाच शिकवायच्या. सगळीकडे कायम संगीत असायला पाहीजे म्हनायाच्या बाईसाहेब. आता इतं लाईट कवा बी येत्यात आणि जातात. म्हणून मंग त्यांनी हे लावल. वारा आला की कसं छान वाजतया. अक्षी पैंजणावानी. पण इतं कोणबी रात नाय. त्यात हे वाजलं की लय भ्या वाटतं. म्हणून म्या हा दरवाजा बंदच ठेवतो. ह्या लोकांनी उघडला आसलं दरवाजा."
सरंजामेनी विन्डचिमवरील नजर सर्जावर फ़िरवली.
" उचला याला." सरंजामेनी मानेंना इशारा केला. रायबा व माने पुढे आले. त्यांनी दोन्ही बाजुने हात धरून सर्जाला उभा केला. त्याचा भार झेलून ते दाराकडे निघाले. तेवढ्यात वार्‍याची मंद झूळूक आली आणि पैंजणाचा आवाज घुमला. सर्जाने त्याचवेळेस डोळे उघडले. वार्‍याच्या वेगाबरोबर पैंजणांचा आवाज घुमत गेला आणि................................................... .

समाप्त

गुलमोहर: 

मला आधी चाफ्याची कथा वाटली. भारी आहे, वाचताना भिती वाटत होती.

मस्त कथा आहे.अजुन रन्गवता आलि अस्ति.

व्वा ! काय छान जमवलयसा !! आयला म्या तर॑ पार भ्यालो राव. एक इचारु का? तुमास्नी भ्या नाही वाटत का? असच एखाद॑ पैन्जण तुमच्या आयुश्यात आल॑ तर॑...............

रवी.

याला म्हणतात भयकथा... घाम फुटवला बाबा. आणि...... काय झालं रे पुढे?

कथा चांगलि आहे...

फक्त एक समजल नाहि....
जर हे कैदी जेल मधुन पळाले होते आणि जर पोलिस त्यांचा पाठलाग करत होते तर चाकु कसा आला त्यांच्याकडे?

किंग...
आजकाल तुरुंगात टी.व्ही. सुद्धा मिळतो. तुमच्याकडे पैसे असतील तर गन देखील मिळते, चाकुचं काय घेवुन बसला आहात.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

कथा आवडली. छान जमवली आहे.. Happy
विशेषत: जुना वाडा, त्यातल्या खोल्या आणि त्यातील हालचालींचे वर्णन जिवंत केले आहेत अगदी.
भयकथांत दाखवतात तसा, अमावस्येचा वगैरे, आणखीनच मिच्च अंधार दाखवून जास्त घाबरवता आले असते. पण तो मोह टाळून चंद्रप्रकाशाचा परिणामकारक उपयोग करून घेतला, ते आवडलं.. Happy

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

झक्कास... पैजण मस्त... खल्लास.. शेवट पर्यंत पकड घट्ट ... मस्तच!!!

अरे! ही राहिलीच होती वाचायची.........
काय सॉल्लिड लिहीली आहे.. अन वातवरण निर्मिती वगैरेही एकदम चपखल.. मजा आया दोस्त.

खूप आवडली कथा, एकदम मस्त!

आज वाचली... फर्स्टक्लास!!!!! ते अंधारातले वर्णन वाचताना असे वाटले मी पण अंधारात ठेचकाळत चालत आहे, इतके जमले आहे.

Pages