तू, मी, चंद्र - त्रिवेणी..

Submitted by मी मुक्ता.. on 19 January, 2011 - 23:17

स्वतःच्या मनात दाटलेल्या अमावस्येला
लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास

माझ्या नजरेत उतरलेला चंद्र...
**********************************

जग नसतं दीपलं पण
वाट दाखवण्यापुरतं चांदणं नक्की होतं

माझ्या चंद्रमौळी आकाशात...
**********************************

भैरवी बरीच रेंगाळली होती,
तरी तू आला नाहिस..

गालावर सुकून गेलं चंद्रपाणी..
**********************************

डोळे गच्च मिटुन
सगळी कवाडं बंद करुन बसले

तरी श्वासात दरवळत होताच चंद्र...
**********************************

चंद्राळलेलं आभाळ नाही मिळालं तुला
पण तोवर माझ्यात रुजला होता

तुझा चंद्राचा हट्ट...
**********************************

निघुन जातात तुझ्यासारख्याच
नि:शब्द शांततेत

हल्ली चाहुली उठवत नाहीत चंदेरी वादळं...

गुलमोहर: 

गालावर सुकून गेलं चंद्रपाणी..
जियो!!

त्रिवेणीमध्ये ओळी अतिशय बांधलेल्या असाव्यात असं कुठेतरी वाचलंय...
ते जर खरं मानलं, (आणि मानायला हरकत नाही, कारण तीन ओळींत सगळं सांगायचं, तर तेवढं बांधीव हवं), तर मला तसं connection कमी वाटलं...

आनंदयात्री.. अगदी अगदी... मलाही तसच वाटलं. शेवटची एक वाटली शेवटच्या ओळीत पंच बसतोय अशी पण खात्री नाहीये.. Sad त्रिवेणी करुन पहायच्या होत्या आणि म्हटलं इथे जाणकार आहेतच मदत, मार्गदर्शन करायला. म्हणुन प्रयत्न केला. Happy काही सुधारणा सुचत असल्यास नक्की सांगा.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. Happy

धन्यवाद भुंगा.. Happy

एकेक सुंदर Happy तुम्ही खरंच वाहत्या धारेप्रमाणे लिहीता Happy त्यातून जे सूर ऐकायला येऊन; जाणकाराची तृप्तता आणि सामान्य रसिकाच्या आनंदाची परीपूर्णता व्हावी, असेच वाटते.
तुमच्या प्रतिभेला सलाम Happy

चंद्राळलेलं आभाळ नाही मिळालं तुला
पण तोवर माझ्यात रुजला होता

तुझा चंद्राचा हट्ट...

>> खूप काही देऊन गेल्यात ह्या ओळी....