अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

princeston anamolies research institute ह्या संस्थेने केलेल्या संशोधनात मनशक्तीवर काही प्रमाणात विश्वास ठेवावा लागतो

श्री चककच, नमस्कार,
क्रुपया "मनशक्ती" म्हणजे नेमके काय हे स्पष्टीकरणासहीत सांगाल का..?

की, आपल्याला "मनशक्ति" म्हणजे "अमानविय शक्ती" (अननोन) असं म्हणायचं आहे. Happy

माझ्या मित्राच्या वडलाचा (ते सैन्यात होते) हा अनुभव -
माझ्या मित्राची बदली काश्मिर मध्ये झाली आणि तो राहायला सहकुटुंब आला. त्याचे लहान मुल फक्त ३ महिन्याचे होते. एक जुने घर तात्पुरते भाड्याने घेतले आणि तो कामावर रुजु झाला.
घरात बायको आणि लहान मुल एकटे. पहिल्या दिवशी एका खोलीत बाळाला ठेवुन ती कामाला लागली आणि बाळ जोर्जोरात रडायला लागले. काही केल्या शांत होईना. दुपार पर्यन्त बाळाला ताप चढला. ती दुसर्या खोलीत त्याला घेवुन गेली कि ते शांत होई. दोन तीन दिवस असेच गेले. डॉक्टरांन कडे घेवुन गेले तरी ताप काही कमी झाला नाहि. आठ दिवस झाले, बाळाची तब्तेत फारच खालावली. शेवटी एका वैदुला घेवुन आले. सगळी परिस्थिती त्याला समजावल्या वर त्याने कुठल्या तरी बुवान्ना बोलावले. बर हे सगळे त्या मित्राला अजिबात पटत नव्हते. बुवानी सांगितले कि ज्या भिंति कडे बाळ बघुन रडते ती फोडा. हो नाही करता करता मालकांनी परवानगी दिली. भिंत फोड्ताना भिंतीत हाडांचा सापळा मिळाला.
खुप चौकशी केल्यावर कळाले कि मालकांचे जे पुर्वज होते, त्यांच्यातील एका मुलीचे गुजर (काश्मिर मधालि जमात, डोंगरावर राह्तात) जमातितल्या एका मुलाबरोबर प्रेम होते. घरात पटले नाहि म्हणुन तिला मारुन टाकले आणि भिंतीत पुरले. त्याच भिंती कडे बघुन ते बाळ रडायचे.

माझा पण भुतांवर विश्वास असा नाही पण कधी कधी काही काही ठिकाणी अस्वस्थ वाटत.
माझ्या लग्नाच्या पाचव्या दिवशी मी कलकत्याला शिफ्ट झाले. तिथे एका बंगल्याच्या तळ मजल्याच्या टु रुम किचन ची जागा आम्ही भाड्यांनी घेतली होती आणि घर मालक वरच्या मजल्या वर राहायचा.
ज्या दिवशी मी घरात पाय ठेवला त्याच दिवशी मला कस तरीच वाटल, तर नवरा म्हणाला घर मोकळ आणि मोठ आहे ना त्यामुळे अस वाटत असेल. मी पण जाउ दे म्हनुन घर सजवल, देवाचे पुजा केली.पंधरा दिवसांनी नवर्‍याची सुट्टी संपल्या वर जशी मी एकटी रहायला लागले तशी जास्त अस्वस्थ वाटायला लागल. आजारी पडायला लागले. दिवस भर मला घरात भिती वाटयची घरातल्या एका खोलीत तर मला एवढी भिति वाटायची की मी तिथे कचरा काढायला पण जात नसे. त्या घरात रहायला नको वाटयला लागल.
शेवटी मीच घर मालकाला सांगितल की ह्या घरात मला अस्वस्थ वाटत म्ह्णुन तर तेंव्हा त्याच्याशी बोलताना कळालं की त्या ठिकाणी त्याच आधी छोटसं हॉसपिटल होत म्ह्णुन. हे कळाल्या वर मी लगेच घर शिफ्ट केल.

वा, भारी आहे हा धागा Happy

थोडे योगदान Wink (टीप - या सगळ्या गोष्टी ऐकीव आहेत, खरे-खोटे माहित नाही)
सातार्‍याजवळ भुतं दिसण्याची हमखास जागा म्हणजे बोगदा, कास (डाकबंगला)व सज्जनगडपासुन पुढे बामणोली, वासोटा, ठोसेघर साईड. Light 1 Proud

१ - कास (डाकबंगला) किस्सा - येथे रात्री सहजच २-३ मित्र रहायला म्हणुन गेले. बंगला तसा पडीकच आहे, ह्यांनी मस्त शेकोटी वगैरे पेटवली आणलेल्या नॉन्-व्हेजवर ताव मारत होते तेव्हढ्यात १ जण त्यांना जॉईन झाला. त्यालाही ऑफर झाले व सगळे जेऊन तिथेच झोपी गेले. सकाळी परत निघताना नव्या जॉईनीने त्यांना एक डबा घरपोच करा सातारलाच चालले आहाततर म्हणुन दिला. हे लोक जेंव्हा त्याच्या घरी गेले तेंव्हा समजले कि तो जवळपास वर्षापुर्वी कास साईडच्या जंगलातच मेला आहे. ही गोष्ट सातारचा लोकल पेपरमध्येपण छापुन आली होती, मिठमसाला लाऊन.

२ - अजिंक्यतारा - लहानपणी अशा गोष्टी ऐकायला मिळायच्या कि दर अमावस्येला किल्ल्यावर वेताळाची पालखी निघते. खालुन सातारा गावातुन डोंगरावर मशाली नाचताना दिसतात.

३ - वासोटा - येथील जंगल फार घनदाट आहे व वासोटा गडावर जायला सरकारी लाँच आहे (सं. ५:३० ला शेवटची परत येण्यासाठी) या जंगलातपण लोकांना बरेच विचित्र अनुभव आलेत.

स्वता:ला आलेला अनुभव असा..
१२ वी मधे असताना मी आणी माझा एक मित्र बाळ्या दोघांनी लेक्चर बुडवुन गावाबाहेर टाईमपास करायला जायचे ठरवले..
गावाच्या बाहेर आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी आहे.. आणी हा भाग पुर्ण डोंगर दर्यांचा आहे
त्या दिवशी आम्हाला ऊगीच हुक्की आली म्हणून मुकुंदराज च्या साईड ला टाईमपास करत फिरत होतो..
सायकलवर .. वेळ दुपारचे १.
मुकुंदराज पर्यंत जायचे असेल तर काही भागच डोंगराळ आहे.. पण तिकडुन परत खुपच दुर्गम असा दरी डोंगराचा भाग सुरु होतो.. तिकडे जायला नागमोडी वळणाचा घाट आहे आणी घाटाच्या पायथ्यालगत बुट्टेनाथ व नागनाथ यांचे मंदीर आहे. त्या दिवशी खुपच जास्त वेळ होता म्हणून मी आणी माझा मित्र त्या मंदीरा मधे टाईम पास करुन आलो..
परत ३ वाजले होते.. म्हणुन मी मित्राला म्हणाले.. असेच ह्या रस्त्याने पुढे जाऊयात.. पुढे ७ कि.मी. वर एक गाव आहे तिकडे चहा पाणी करुन परत येऊ... तसेच २० मिनीट खुप मोठे चढ ऊतार करत सायकल चालवली.. आता कुठे सपाट भाग सुरु झाला असेल साधारण १ कि.मी. सायकल चालवल्यावर.. तरी गाव यायचे काही लक्षण दिसत नव्हते..
तसेच पुढे चालत गेलो तर रस्त्यात एक आजी ७०-७५ वर्षाच्या भेटल्या त्यांना विचारले गाव किती दुर आहे..
"ईकड कशाला आलाव तुम्ही शाळा बुडवुन.. घरी जाऊन ४ पुस्तक वाचा की.. त्या आई बापाचे पैसा कशाला वाया घालवताय.. वै.. आणी नंतर म्हणाली गाव आजुन ४ कोस हाय.. पण म्या म्हणते वापस जावा"..
झाले.. माझ्या मित्रानी म्हणटले आजुन तरी सायकल चालवायची हिंम्म्त होत नाही .. म्हणुन सायकल परत वळवली.. आणी फक्त एकदा म्हातारी ला बघावे म्हणुन मागे पाहिले तर आजीबाई गायब झाल्या होत्या.. Sad .. आणी कुठे लपल्या म्हणाव तर सगळा सपाट भाग होता.. पुर्ण १ कि.मी. पुढे आणी मागे Uhoh
दोघांचाही स्वता: च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता काय पाहिले/झाले ते आणी त्यामुळे पुरते घाबरुन गेलो.. भितीमुळे चढ ऊतारचा नागमोडी घाट अगदी १५ मि. पार केला एरवी सायकलवर ४०मी. तरी लागतात.
तेंव्हा पासुन त्या भागात पुन्हा कधी गेलो नाही..

माझा भुतखेतावर विश्वास ठेवण्यासारखा काही स्वता:जवळ पुरावा तर नाही, पण हा एक अनुभव
आहे, मिरजमध्ये कॉलेजला असतानाचा, त्यावेळी परिक्षेपुर्वी ३-४ महिने एका रुममध्ये मी एका मित्राबरोबर भाड्यानी राहत होतो (१बीएच्के कम नविन घर) आजुबाजुला रिकामी शेती वजा मैदान होत, त्यामुळे दिवसा तर खुप शांत वाटायचं, मित्र नसला कि कधी कधी एकटा असायचो,मला कधी कधी काही आवाज ऐकु आल्याचा भास मात्र व्हायचा,शक्यतो रात्रीदेखील स्त्रीच्या चालण्याचा,बांगड्यांचा.पण दिसल मात्र काही नाही.याचा कधी विचारही केला नाही, कुणाला बोललो देखील नाही.
........काही महिन्यांनी समजलं कि मालकांनी या नविन घरात राहायला आल्यावर असेच काही भुताखेतासारखे विचित्र अनुभव आले म्हणुन तिथे न राहण्याचा निर्णय घेतला होता, आणि विद्यार्थ्यांना भाड्याने द्यायला चालु केल होत.

फार्फार वर्षांपूर्वीची गोष्ट. मी केवळ ऐकलेली आहे आणि या कथेतील बर्‍याच व्यक्ती मानवयोनी पार करून गेल्यामुळे आता काही व्हेरीफिकेशन शक्य नाही.

आमचे एक नातेवाईक कुटुंब पूर्वी दहिसरला रहात असत. त्यावेळी दहिसर म्हणजे अगदी तुरळक वस्ती असलेलं. यांचा भलामोठा बंगला एका बाजूला आणि आजूबाजूला जंगल. तर त्यांच्या घराच्या एका खोलीतून रोज रात्री जेवणाचा घमघमाट यायचा. हे लोकं कोणी त्या खोलीत जायचेच नाहीत. पण म्हणे त्यांना कधी फारशी भितीही वाटली नाही आणि काही त्रासही झाला नाही.

बहुधा कोणी एंटरप्रायझिंग भूत हॉटेल चालवत असणार! Happy

तर त्यांच्या घराच्या एका खोलीतून रोज रात्री जेवणाचा घमघमाट यायचा. हे लोकं कोणी त्या खोलीत जायचेच नाहीत.
>> कहर आहे.. येवढा छान वास येऊन नाही जायचं म्हणजे काय! अजिब्बात पटलं नाही ...

.

तर त्यांच्या घराच्या एका खोलीतून रोज रात्री जेवणाचा घमघमाट यायचा. हे लोकं कोणी त्या खोलीत जायचेच नाहीत.>> मामी, काही आतंकवादी कार्रवाया याच ठकाणाहुन होत असतात. आतंकवादी अश्या ठिकाणी आपले बस्तान जमवतात. "एकदा फेरी मारली पाहीजे होती".

बहुधा कोणी एंटरप्रायझिंग भूत हॉटेल चालवत असणार! >> बहुतेक तिथं भुतांच हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज असाव...मेनु: कापलेल्या हाताची कोशींबीर, भेजा फ्राय विथ मेंदु भुर्जी, रगत-शरबत

सातारला, आर्यांग्ल हॉस्पिटलसमोर तळे आहे, तेथे बर्‍याच जणांनी आत्महत्या केल्यामुळे रात्रीच्या सुमारास तळ्याकाठी त्यांची भुतं दिसतात अस्सं म्हणातात...तसंच हॉस्पिटलपासुन जलमंदीर ते अनंत ईंग्लिश स्कुल जे बोळकांडे जाते तिकडे ही भुतं रेंट्ने, कॉटबेसीस, ई. करुन वस्ती करुन आहेत...बघा गाठभेट होतीये का त्या साईडला कधी गेला तर Wink

आमच्या शेजार्‍यांचा एक अनुभव

आमचा घर कोकणात. घराला जोडून मोठा गोठा आहे. आमची घर खुप जवळ जवळ आहेत. आम्ही एकमेकांशी खिडकीतून बोलतो.
त्या शेजार्‍यांच्या घरामागे पडिक विहिर आहे. आता ती पुर्ण बुजली. विहीरी शेजारी एक आंब्याच झाड होत.
त्यावेळी ते शेजारचे काका (त्यांच वय १४ - १५ वर्ष असेल) रोज पहाटे त्या आंब्याच्या झाडाचे आंबे जमा करायला जायचे. एकदा त्यांना त्यांच्या बाजूच्या घरातील मुलगी (आम्ही तीला आत्या म्हणतो) आंबे जमा करताना दिसली. तेव्हा ते तिच्याशी काहिच बोलले नाहीत, ती सुद्या काही बोलली नाही. नतंर ते घरी आले, पुन्हा झोपले. सकाळी त्याना ती मुलगी भेटली तेव्हा त्यांनी तिला विचारल "काय गो कलग्या (कल्याणी) किती आंबे निवडलस?" त्या वर तीने सांगितल कि ती आंबे जमा करायला गेलीच नव्हती.

दर्शना यांच्या घटनेशी अनुरुप असा प्रत्यक्ष घडलेला किस्सा,

माझे चुलत काका गावी (रत्नागीरी) भल्या पहाटे ५-६ वाजता रानमेवा गोळा करायला जायचे. एकदा भल्या मोठ्या झाडाखाली आंबे गोळा करत असताना अचानक त्यांना आवाज आला "काय रे रव्या आंबं जमवतोय..." धुसर अंधार असल्यामुळे त्यांना फ्क्त आक्रुती दिसली पण काकांनी आवाज ओळखला त्यांच्याच शेजारच्यांचा होता. काकांचे उत्तर: होय.. मुंबैहुन पावने आलेत ना....!
मग शेजारी ही आंबे गोळाकरुन टोपलीत भरु लागले. टोपली आंब्यांनी भरली तसे काका निघाले पाठोपाठ शेजारी. घरा जवळ पोहचे पर्यंत मागुन येणारा शेजार्‍यांचा आवाज नाहीसा झाला. काकांना वाटले गेले असतील पुन्हा कुठेतरी भरकटायला.

घरी आले आणि आमच्या समोरंच डोक्यावरुन टोपली खाली उतरवली बघतात तर काय...? टोपलीत आंब्यां एवजी धोंडे.... सगळे धोंडे,.. दगडी.,.....टोपली दगडांनी भरलेली. शेजार्‍याला जाउन विचारणा केली तर ते म्हणाले मला या बाबत काहीच माहीत नाही.....आणी मी सकाळपासुन रानात गेलोच नाही...!

काका समजले, काय झालं ते आणि मलाही समजावलं. तो जो कोण होता त्याला गावात 'गिर्‍या" म्हणतात. तो कोणतेही रुप घेतो आवाज बदलतो. आणि लोकांची दिशाभुल करतो. "चकवा" देतो.

असे प्रकार गावात घडतच असतात, गाववाल्यांना सवयच झाली आहे :अओ:.
मात्र एखाद्या विशिष्ट ठीकाणी विशिष्ट वेळेस जाणे "निषिध्द" मानले जाते.

मागच्या वर्षी युरोपात असताना, प्राग ला गेलो होतो. त्या ट्रिप मध्ये आधीच खुप उत्सुकता होती कारण प्राग जरा काळी जादु, भुते खेते सुप्रसिद्ध आहे. तीथे घोस्ट राईड नावाची टुर पण असते रोज रात्री!! आमच्या सोबत जी जोडी होती ते जरासे घाबरट होते... आणि मी ही तशी बरिच पळपुटी अशी.. त्यातल्या त्यात माझा नवराच धीट आहे. आणि त्याआधी आमच्यापैकी कोणालाच असे अमानवीय अनुभव आलेले नसल्याने आम्ही बिंधास्त होतो...
ज्या रात्री पोहोचलो त्याच वेळेस अम्हाला कळाले की एअर पोर्ट ते होटेल हा प्रवास... आधी १ तास बस, मग ४५ मिनिटे ट्राम ने करावा लागणार आहे. मग आम्ही मानसिक तयारि केली आणि बस मध्ये चढलो.. तेव्हा वाजले होते ९.३०. त्यापुढे बस मधुन उतरुन पायपीट करत ट्रामचा स्टॉप शोधला... मग ट्राम ची वाट पाहिली अर्धा तास... ऑक्टोबर असल्याने मस्त थंडी होती. रस्त्यावर कोणी चिटपाखरु पण नव्हतं.. त्यामुळे नवरा गाईडचं काम करत होता... स्टेशन्ची नावं कुठे चढायचं कुठे उतरायचं.. कोणत्या डिरेक्शनची ट्राम पकडायची वगैरे तोच बघत होता.. आम्ही चांगलेच थकलेले होतो... शेवटी ट्राम मिळाली.. स्टेशनची नावं बघत कुठे उतरायचं त्या कडे आम्ही लक्ष ठेऊन होतो.. आणि अचानक एका स्टेशनला माझा नवरा म्हणाला चला चला उतरा... आम्ही लगेच उतरलो... आणि लक्शात आले कि एक स्टॉप अलीकडेच उतरलो होतो... तसेच पाय ओढत ओढत निघालो... ट्रामलाईन फॉलो करत करत निघालो होतो... आणि एक ऑव्हरब्रीज आला.. मी, माझा नवरा चालण्याचा स्टॅमिना जास्त असल्याने लीड करत होतो.. त्या ब्रीजच्या खालुन जाताना अचानक जोरात हसण्याचा आवाज आला.. मी लगेच वळुन पाहिले.. आणि ती मैत्रीण खुपच चिडली... म्हणे कि अग अशा ब्रीजच्या खालुन जाताना कधीच काही झालं तरी वळुन नाही पाहायचं ... मी जाम टरकले... पण हसण्यावारी नेत आम्ही हॉटेल मध्ये पोहोचलो...
हॉटेल तरी मस्त होतं... ती रात्र जाम दमलेलो असल्याने काही जाणवलं नाही... दुसर्‍या दिवशी साईट सीइन्ग केलं... खासीयत म्हणजे आम्ही एक चर्च पाहिलं... त्यामध्ये पुर्ण डेकोरेशन मानवी हाडांपासुन केलेलं होत.. (आता जास्ती एतिहास सांगत बसत नाही इथं ...) पण त्या जागेवर असं काहीही भयाण जाणवलं नाही ..
पण त्या रात्री मला झोपच येत नव्हती... लाइट घालवले.. आणि त्या क्षणापासुन मला रुमच्या छताला दोन सावल्या भिरभिरत आहेत असं जाणवत होत... मी खुपच घाबरले होते.. बराच वेळ मला वाटत होतं कि लाईट घालवला की आपल्या डोळ्याना अंधाराची सवय होईपर्यंत ते काळे ठिपके वगैरे दिसतात तसं होत असेल... पण बराच वेळ त्य सावल्या वर वरच फिरत होत्या... मी इतकी घाबरले होते कि नवर्‍याला उठवण्याची पण हिम्मत होत नव्हती कि कुस बदलण्याची...!! शेवटी एक सावली छतावर आणि एक नवर्‍याच्या पलीकडुन आली... आणि माझं अवसानचं गळालं.... मी रडायलाच लागले... नवर्‍याला उठवले... आणि सांगितले... तेव्हा त्याने काहितरी समजुत काढली आणि आम्ही लाईट सुरु ठेऊन झोपलो... म्हणजे मी अख्खी रात्र जागुन काढली... नवर्‍याचा खरं तर विश्वास बसला नव्हता... मला भास झाला असावा म्हणुन त्यानी काही फारसं गांभिर्यानी घेतलं नाही... दुसरा दिवसही आम्ही दिवसभर बाहेर फिरुन आलो... झोपताना झोप डिस्टर्ब होऊ नये म्हणुन लाईट बंद केले... आणि तोच खेळ परत सुरु झाला... आणि आज त्या सावल्या बर्‍याच खाली विहरत होत्या... आणि आज माझ्या नवर्‍यानेही त्या पाहिल्या... झालं माझी अवस्था म्हणजे कालच्या दिवसापेक्षा बिकट झाली.. Uhoh माझा नवरा खुपच धीट आहे त्यामुळे मला त्याचा खुप आधार वाटला... तो म्हणाला की आपण काही वाईट केलेले नाही मग घाबरायचं कशाला आपल्याला त्या काही नाही करणार... कदाचित आपणच त्याना डिस्टर्ब केलं असेल... कळजी नको करुस.. रामरक्षा म्हण आपोआप झोप येइल... उद्या आपण दुसरं हॉटेल बघु... आणि ती रात्र कशिबशी आम्ही त्या हॉटेल मध्ये काढली...
आदल्या रात्रीचा अनुभव मला वाटलं होतं खरच काहीतरी भास झाला असेल मला... पण तोच अनुभव नवर्‍याला आल्यमुळे खुपच धास्तावले होते... पण त्या अनुभवानंतर माझी भुताखेतांची, अंधाराची किंवा एकटं राहण्याची भिती ९०% कमी झाली आहे.. म्हणजे त्या अनुभवानंतर मी घाबरुन आजारे पडेन अशी धास्ती नवर्‍याला वाटली होती.... पण उलट परिणाम झाला... Proud हाच एकमेव विचित्र असा अनुभव मला आलेला... आता ते खरच काही "अमानवीय होतं" की अजुन काही देव जाणे...

आमच्या गावातून म्हणजे मसुरे ते मालवणला जायला ३ वेगवेगळे मार्ग आहेत. मालवणच्या लोकांना कदाचीत माहीत असेल.
१ मसुरे - कांदळगाव - मालवण
२ मसुरे - आंगणेवाडी - मालवण
३ मसुरे - बागायत - मालवण
या पैकी मसुरे - आंगणेवाडी - मालवण हा मार्ग कमी अंतराचा आहे. मसुरे देउळवाडा (मसुरे गावात १२ वाड्या आहेत, ही त्या पैकी १) दत्त मंदिर ते आंगणेवाडी मार्गाला दत्ताची घाटी बोलतात.

माझ्या बाबांचे एक मित्र राज्य परिवहन मंडळामध्ये (S.T) कंडक्टर आहेत. ते मालवणला नोकरीनिमीत्त राहतात. त्यांच घर आमच्या गावी आहे. सुट्टि दिवशी ते दिवसभर गावात आसायचे आणि रात्री उशीरा बाइकवरुन मसुरे - आंगणेवाडी - मालवण मार्गे जायचे.

एकदा जात असताना दत्त घाटी जवळ त्यांना एका म्हतार्‍या माणसाने थाबविले त्याच्या सोबत एक लहान मुलगा होता. त्यांना मालवणला जायचे होते. त्या काकांनी गाडी थांबवली, त्या मुलाला मध्ये बसवले आणि आजोबा शेवटी बसले. तो मुलगा काकांना घट्ट पकदुन बसला. आणि ते आजोबा काकांशी बोलत होते. मालवण येण्यापुर्वी आडारीचा पुल लागतो तिथे एक कोलंबी प्रकल्प आहे आणि त्या आधीचा रस्ता उतरणीचा आहे. त्या उतारापर्यन्त ते आजोबा काकांशी बोलत होते आणि अचानक काकांना त्यांचा आवाज यायच बदं झाला. त्यांना वाटल वार्‍यामुळे त्यांना एकायला येत नसेल. त्यांना त्या मुलाची पकड जाणवत होती. त्या आजोबांना कुठे उतरायच हे विचरायला त्यांनी कोलंबी प्रकल्पाच्या उजेडात गाडी थांबवली आणि मागे बघीतल

मागे कोणच नव्हत...........!!!!!!!!!!!!१

मी आणि माझे अजून ५-६ मित्र असे ७-८ जण बाईकवरून अलिबागला जात होतो. शनि-रवि असल्याने शनिवारी ऑफिसवरूनच निघालो अंदाजे ११.३० - १२.०० ला. अलिबागचा घाट चढत असतांना मधेच विकीच्या (एक मित्र) मागे बसलेला माझा मित्र अजय म्हणाला की अरे ते बघ काहीतरी गेलं आपल्या बाजूने. तो जास्त घाबरू नये म्हणून विकीने त्याला हेड्सेट दिला ऐकायला. तरीपण याचं चालूच मधेमधे. वैतागून विकी म्हणाला की बेडूक वगैरे असेल रे तू गप झोप.
अलिबागला पोचल्यावर तो म्हणाला की अजय, जे तुला जाणवलं ते आम्हा सगळ्यांना जाणवलं होतं. तो प्रकार म्हणजे बेडूक नव्हता तर खरोखर एक प्रतिक्रुती आम्हा ५ बाईक्स्मधून धावत होती (एका-मागोमाग एक असे होतो). मागून यायचं, डाविकडून पुढे मग क्रॉस करून उजवीकडे आणि मग एकदम पुढे गेल्यावर गायब. तू घाबरू नयेस म्हणून सांगितलं नाही.

या प्रकाराने अजय चांगलाच बिथरला होता. मग रविवारी दिवसाचा प्रवास केला परतीचा...

अंदाजे १५ वर्षापुर्वी ची गोष्ट. भास कि सत्य कोणास ठाऊक.

आम्ही सर्व मित्र कर्जत ला गेलो होतो शनीवार - रविवार असे ट्रिप होते, शनिवारी उशीराच निघालो दादर हुन लोकल पकडली, आम्ही १०-१५ जण होतो सगळे तरुण आणि एक म्हातारा होता.
कर्जत स्टेशन ला उतरल्यावर रिसोर्ट बुकिंग करायला सांगितलेल्या मित्रांने सांगितले कि बुकिंग केलीच नाहिये, सर्वांनी त्याचं उध्दार केलं आणि स्टेशन च्या बाहेर चालु लागलो, चालता चालता १०-१५ मिन्टानी आम्हाला एक पडिक घर दिसलं, तुटके खिडक्या, दरवाजा नसलेले ते घर होतं, आम्ही तिथे थांबलो आणि जरा नाश्टा करुन असं ठरलं कि चालत चालत हायवे गाठुया आणि एक आडोश्याला बसुन पार्टी करुया. पाउण तास चाल्ल्यानंतर आम्ही कर्जत पुणे हायवे कि बायपास वर आलो, रात्री चे १२ वाजले असतील, हायवे वर जरा पुढे आल्यवर आम्हाला एक मोकळी जागा मिळाली, वडाच्या झाडाखाली बसुन आमची पार्टी चालु झाली, मस्त पार्टी रंगली होती नंतर गप्पा टप्पा भुता खेतां वर चालु झाली, आम्ही २-३ सोडुन सगळे टाईट होते, मस्त एक एक कथा रंगवत होते आणि भुतांच्या नावांनी शिमगा चालु होती, एकांनी अरे मी पाय नसलेले भुत बघितलंय, तर दुसर्यांनी मुंडकं नसलेलं भुत बघितलंय तर तिसर्‍यांनी सफेड साडी मधली हडळ बघितलंय, ऑल दॅट युझ्युअल स्टफ्फ. म्हातार्‍या कडे तर भुत कथां ची स्टॉक होती.

आमचे गप्पा चालुच होते, रात्री चे २ वाजले असतील, एका मित्राला हायवे रोड वर काही तरी सफेद रंगाचं मुव्हमेंट दिसत आहे करुन सांगत होता आम्ही दुर्लक्ष केलं त्याच्या कडे तर तो खरं बोलतोय असं सांगितला, आम्ही त्याला सांगितलो तुल आता चढलिय तु बस गप्प आता, १५ मिनीटानंतर दुसर्या एक मित्राने सांगितले कि त्याला ही असंच काही तरी दिसतंय, तेव्हा पण आम्ही बाकिचे सर्व मित्र सांगितले कि काय रे तुम्ही दोघे हे सगळं ठरवुन करताय ना, तेव्हा ते दोघे नाही नाही असे म्हणाले, तरीही आम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष केलं. मग १५ मिनिटांनी जेव्हा आमच्यातला एक न पीलेल्या मित्रांनी जेव्हा तेच सांगितले कि त्यांनी हायवे वर सुसाट वेगाने काही तर सफेद रंगाचे जाताना पाहिले अ‍ॅन्ड दॅट वॉस डेफिनेटली नॉट अ कार, तेव्हा सगळ्यांची टरकली. आम्ही एकटे दोघे (न प्यायलेले) हायवे वर आलो तर काही तरी ३-४ विचित्र आकार दिसले अ‍ॅन्ड दॅट वॉस ट्रॅन्स्पेरेंट. हायवे वर मिट्ट काळोख होतं, मित्राने त्या आकारांवर टॉर्च चा प्रकाश मारला तर ते आकार फार सुसाट वेगाने अदॄश्य झालेत, दोघांनी येऊन सर्व हकिकत सर्वांना सांगितलेत, आमच्यात एक घाबरट मुलगा होता तो तर रडकुंडी ला आलेला.३.०० - ३.१५ वाजले असतील, काहीच क़ळेना काय करावं, सर्वांनी ठरवलं ते जागा सोडु परत चालत जाऊ आणि थोड अंतर चाल्ल्यावर एक टेंपो दिसली, आम्ही सर्व १०-१५ जणांनी मिळुन रस्त्याच्या मध्ये उभे राहुन टेंपो थांबवली, तर टेंपो ड्रायवर आणि क्लिनर घाबरला, आम्ही त्यांना समजावलो आणि सर्व जण टेंपो मध्ये पाठी बसलो आणि निघालो.

मी, माझा नवरा दोघेही official कामासाठी दिल्ली जवळ असलेल्या नोएडा ला गेलो होतो. आम्हाला एका रो हाऊस मध्ये थांबवल होत. खाली हॉल आणि किचन आणि एक बेडरूम आणि वर दोन बेडरूम ,का कुणास ठाऊक मला घरात गेल्या गेल्या अप्रसन्न वाटल, एक निराशेची लाट मनाला झाकोळुन गेली , मी तस नवर्‍याला सांगितल ही, पण त्याने नेहमी प्रमाणे उड्वुन लावल. दिवसभर कामात गेला ,जाम दमलो होतो. खालच्याच बेडरूम मध्ये झोपलो. अचानक ३ -३.३० वाजता मला जाग आली .कोणीतरी हायहिल्स चे sandles घालुन जिना चढ उतार करतय अस वाटल .आवाजाने मला जाग आली. मी कान देऊन आवाज ऐकला, नंतर आवाज बंद झाला.मी विचार केला, आवाज शेजारुन येत असेल आणि झोपण्याचा प्रयत्न केला तर मला जाणवल कोणीतरी माझ्या उशाशी उभ आहे, मी ह्यांना हलवुन उठवल ,ह्यांनी दिवा लावला .काहीच नव्हत ,पण मला अगदी जाणवल होत, दुसर्‍या दिवशी रात्री पुन्हा तोच प्रकार, पुन्हा तोच आवाज ,पुन्हा तोच भास . तिसर्‍या दिवशी मी गाढ झोपेत होते आणि अचानक कोणाच्या तरी खुप जवळुन श्वास घेण्याने एकदम जाग आली मागे पाहिले तर एकदम काहीतरी हालल्यासारखा भास झाला. ह्यावेळेस मात्र हा भास नवर्‍याला ही झाला होता आणि तो ही जागाच होता
नशीब सकाळी दिल्ली ला जायच होत आभास होता कि आणखी काही माहित नाही पण जे होत ते भितीदायक होत

माझा नेहेमीचा किस्सा..... साधारण वर्षसहा महिन्यात होतोच! अचानक डोळ्यांसमोर विविध रंग दिसू लागतात. फ़ोकस पॉइन्ट काहीच दिसत नाही पण सभोवतालचे अस्पष्टसे दिसत राहते आणि विविध रंगांचा किंवा आकारांचा थयथयाट चालू राहतो. ही स्थिती साधारण ५-१० मिनिटे असते.. मग हळूहळू पुन्हा सुरळित होते.

हे लिहिण्याचे कारण म्हणजे मेन्दूला बर्‍याच गोष्टींचे आकलन हे केमिकल इम्पल्स मुळे होत असते. हे सन्देश आपल्या विविह ज्ञानेन्द्रियान्कडून मेन्दूपर्यन्त पोहचवले जातात. पण कधीकधी काही कारणांमुळे मेन्दूला चुकीचे सन्देश मिळू शकतात. त्यामुळे बरेच भास होतात.

माझ्या बाबतितला किस्सा हा 'क्लासिकल मायग्रेनचा' प्रकार आहे.

केनयातल्या टिव्हीवर असले भुताटकीचे प्रकार दाखवतच असतात. (मी बघत नाही) आजच एक मित्र सांगत होता म्हणे. नवर्‍याला दिवंगत बायको येऊन सांगत होती, कि मेहुणीशीच लगन कर, नाहीतर...
त्याने खरेच लग्न केल्यावर हे प्रकार थांबले.

नवलाची बाब, म्हणजे दिवंगत बायको, हे एका अजगरणीच्या रुपात येऊन सांगत असे.

असो, या लोकात खूप विश्वास आहे, असल्या गोष्टींवर, त्याला ते जूजू म्हणतात. पण त्यांच्या मते, आपला म्हणजे भारतीयांचा जूजू जास्त पावरबाज असतो..

श्री भुंगा, गिरीराज यांची व्यथा मी स्पष्टकरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.

अचानक डोळ्यांसमोर विविध रंग दिसू लागतात. >> असे डोळ्यांच्या कार्यप्रणाली मध्ये झालेलेल्या अनियमितते मुळे होते. हा त्रास काही व्यक्तिं बाबतच पहावयास मिळतो. जेव्हा ही व्यकि खुप थकलेली, प्रचंड तहानेने व्याकुळ, अत्यंत विचार मग्न कींवा मानसिक तनावा खाली वावरत असते. त्या वेळेस द्रुष्य दिसण्याची वेळ, आणि त्याची माहीती "मेंदु" पर्यंत पोहचण्याची वेळ यात तफावत होते आणि डोळ्यां समोर विचित्रंच द्रुष्य दिसुलागते कधि तो अंधार असतो तर कधि ते फक्त वेगवेगळे रंग.

काही व्यक्तिंना काही विशिष्ट रंग दिसत नाहीत. अशी व्यक्ति 'लाल रंगाला शेंदरी रंग किंवा पिवळ्या रंगाला पोपटी रंग आहे, असे म्हणुन हट्ट करु शकते. Happy

तर गिरीराज, आपला अनुभव हा "दैविक भास" नसुन हा "भास" काही क्षणांकरता शारिरात होणारे काही "सामान्यअसामन्य बदल" घडवुन आणतात. ( जे तुम्हाला ज्ञात आहेच)

धन्यवाद..!

घुबड पहाणे शुभ का अशुभ

मी मामाकडे सिंहगडरोडला पाहीलेल. अगदी पहाटे जाग आली. ख्डकीतून पाहील तर तो गूढ पक्षी माझ्याकडेच पहातोय अस वाटल अगदी आम्ही एकमेकाना निरखतोय अस जाणवल.

सकाळी मामी रागावली कोणी सांगितलेल कौतुकाने त्याच्या डोळ्यात डोळे घालायला वाईट असत ते. मी ही गोष्ट थट्टेवारी नेली.

पण लोकहो लवकरच काही कारणाने मला मामाच घर दुरावल. पुण्यातली नोकरी गेली आणि सगळ चंबुगबाळ आवरून कल्याणात परतलो.

पुन्हा काही वर्षाने परत त्याच्याकडे जायचा योग आला तेव्हा मामी ने आवर्जुन सांगितल की आता दिसल तर कृपया दुर्लक्ष कर.

श्री गुगु,
घुबड पहाणे शुभ का अशुभ>>> घुबड हा पक्षि अगदीच गरीब आणि "शांत स्वभावाचा" आहे. माझ्या मते शुभ अशुभात याचं काहीच देणे घेणे नाही. हा बुवाबाज लोकांनी पसरवलेला गैरसमज आहे.

पण लोकहो लवकरच काही कारणाने मला मामाच घर दुरावल. पुण्यातली नोकरी गेली>>> हा निव्वळ योगायोग आहे, घडलेल्या घटनांची कारणे शोधा नक्कीच मिळतील.

तरीही समाधान नसल्यास "मामीचा सल्ला" अवलंबण्यात काहीच हरकत नाही. Happy

काय भन्नाट किस्से आहेत सगळ्यांचे...एकसे एक...
सगळ्यांचे एक अमानवीय गटग करायला पाहिजे Happy

चातक अनुमोदन..
मी अनेकदा घुबड पाहिले आहे..कधीही मला वाईट अनुभव आलेला नाही. उलट मला वाटतं इंग्लंडमध्ये घुबड दिसणे हे शुभ समजतात

घुबड पहाणे शुभ का अशुभ
-----------------------------
घुबडानेही त्याच्या "पक्षी-मायबोली"वर पोस्ट केले असेल "माणसाच्या डोळ्यात पाहणे शुभ का अशुभ" आणि त्या दिवशी त्याला उंदीर कमी मिळाले असतील तर त्याच्याही आईने सांगितले असेल आता "माणुस" दिसला की दुर्लक्ष कर! Happy

तुम्ही त्या बिचार्‍याला पाहिले नसते तरी जे व्हायचे ते झालेच असते. निव्वळ योगायोग मानावा.

Pages