सुंदर माझं घर : कल्पना आणि सूचना

Submitted by मितान on 24 February, 2011 - 08:20

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्‍याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्‍या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्‍यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्‍या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्‍या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.

कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !

पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.

दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्‍याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.

हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !

उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.

मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्‍याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...

निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्‍यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.

तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.

पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....

ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.

तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्‍या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐकागो सख्यांनो माझा फार विचित्र प्रॉब्लेम झालाय...काल माझ्याकडे आमच्या कॉलनीतला एक मुलगा माझ्या मुलाबरोबर खेळायला आला होता. त्याला शू इतकी घाईची लागली की त्याने सरळ आमच्या लेदरच्या सोफ्यावर करून टाकली...मी निरमा/ फिनेल सगळ्याने पुसून घेतले पण वास जाता जात नाहिये. मला वाटते कडेच्या गॅपमधून खाली ओघळ गेले असणार आधीच माझे घ्राणेंद्रिय फारच तीक्ष्ण...!! आता काय करू? काहिच सुचेनासम झालय...प्लीज हेल्प मी ....

स्वप्ना, आधी हेयर ड्रायर ने कोल्ड सेटिंग वर वाळवुन सोफा घे. मग थोडी टाल्कम पावडर टाकुन ठेव गॅप्स मधे.. नंतर डॅम्प कपड्याने पुसुन टाक. एव्हढ्याने झाले नाहीच तर शक्य असेल तर कडक उन्हात नेऊन ठेवा सोफा...

पण लेदर सोफा उन्हात ठेवला तर चालेल? सोफा वरून पूर्ण वाळलेला आहे गं..जो वास येतोय ना त्यावरून असं वाटतंय की गॅप्समधून दुर्गंध येतीय. तुझा टाल्कम पावडरचा प्रयोग करते आत्ताच.

थोडावेळ उन्हात ठेवायला हरकत नाही. लेदर ट्रीट केलल असेल ना? आणि सोफा बाहेरुन ड्राय दिसला तरी आत ओल राहु शकतो तेव्हा ड्रायर ने वाळवुन बघ.

तो शु चा वास अगदी डोक्यात बसतो... Sad

तो शु चा वास अगदी डोक्यात बसतो... अरेरे<< हो गं मी आत्ता केले ड्रायरने ड्राय बराच वास कमी झालाय ...धन्स गं

मला एक विचारायचं आहे....ब्लँकेट्स आणि बॅगा ठेवण्याची काय व्यवस्था असू शकते?

सीमा, अगं आमच्या गावात टार्गेट नाहिये नाहितर मेथड खरच चांगले आहे.
भारतातही १ कप व्हिनेगर आणि ३ कप पाणी हे मिश्रण फरशी पुसायला वापरावे. मी इथे किचन, बाथरूम, लॉन्ड्रीरुम फ्लोअर साठी असे वापरते. मी इथे जे स्विफ्टरचे ड्राय मॉम मिळते त्यात मायक्रोफायबर क्लॉथ अडकवून पोछा करते.
अंजली, टॉय ऑर्गनायझर महग वाटत असेल तर डॉलर स्टोअर मधून छोटे चौकोनी बिन्स आण. ते स्टॅक करुन ठेवता येतात. आणि मुलं मोठी झाली की त्याच्यात इतर गोष्टी ठेवता येतात.

मानुषीच्या प्रश्नासाठी मला पण उत्तर हवंय.
आमचं घर छोटंसंच आहे, स्टोरेजसाठी घरात १ डबल बेड आणि एक ४*६ चा बेड आहे. पण घरात येणारे-जाणारे सारखेच असतात त्यामूळे आमच्याकडे आमच्या तिघांव्यतिरिक्त किमान २ दिरांचे वुलन्स कपडे, कमी थंडीसाठी ५-६ ब्लँकेट्स. जास्त थंडीच्या काळासाठी मोठ्या ६ किलो कापसाच्या ४ रजया आणि अश्याच २ मोठ्या डबल बेडच्या रजया असं सगळं आहे.
मी दर वर्षी हिवाळा संपल्यावर सगळ्या रजया बेडबॉक्स मध्ये घालते. सगळे हिवाळी कपडे आणि वुलन्स सुटकेसेस मध्ये ठेवते. एक छोटी स्टोअर रुम आहे त्यात एका रॅकमध्ये सुटकेसेस ठेवते. तिथे खूप धुळ येत असल्याने. वरून जुन्या ओढण्या वैगरे टाकलेल्या असतात. आणि एक पडदा लावलेला आहे रॅकला.

पण तरी कुठेही गावाला वैगरे जायचं असलं, की या सुटकेसमधलं सामान त्या बॅगेत असं अ‍ॅडजस्ट करत बसावं लागतं. बेडबॉक्स आणि सुटकेसेस दर महिन्या- दोन महिन्यांना आवराव्या लागतात.
आमच्या गावाकडे मोठ्या मोठ्या लोखंडी . स्टीलच्या पेट्या आहेत (अगदी आपल्या कणग्यांच्या साइझच्या) रजया आणि ब्लँकेट्स ठेवायला. माझ्याकडे जागा असती ना तर तश्या एका पेटीत माझ्या सगळ्या रजया वैगरे आलं असतं. Happy

मानुषी, रिकाम्या बॅगांबद्दल विचारत असशील तर आम्ही अपार्ट्मेंट मधे राहायचो तेव्हा ब्लॅंकेट रिकाम्या बॅगेत ठेवायची.बॅगा आडव्या राहायच्या मुलाच्या क्लोजेट फ्लोअर वर. ट्रंक स्टाईल काही असेल तर त्यात ब्लँकेट भरुन तेच कॉफी टेबल म्हणुनही वापरता येते. किंवा बेडच्या पायथ्याशी ठेवायचे.

अल्पना, पोर्टेबल रॅक्स / शेल्फ सारखे अ‍ॅल्युमिनियम मधील पोटमाळ्यासारखे वापरता येण्याजोगे मोठे लांब रूंद रॅक्सही विकत मिळतात. लोखंडी पट्ट्यांनी असेंबल केलेले असे रॅक्स आम्हाला पुण्यात बाजीराव रोडला आशीर्वाद फर्निचरचा कारखाना आहे तिथे दिसले होते आणि तसे नंतर एक-दोघांकडे पाहिलेही होते. खोलीत एका बाजूला छताला लागून फिक्स केलेले. अ‍ॅल्युमिनियम ऐवजी इतर मटेरियलही वापरू शकता. त्यात आपले जास्तीचे सामान/ बॅगा इत्यादी मावू शकते. अर्थात पोटमाळ्यामुळे रूमचा आकार व वावराची जागा कमी होऊ शकते. जर जाळीच्या डिझाईनचे, कमी वजनाचे परंतु सामानाचे वजन व्यवस्थित पेलू शकणारे रॅक्स वापरले व त्यांना रूमच्या भिंती/ छताच्या रंगात रंगविले तर कदाचित जागेचा आणि जास्तीच्या सामानाचा असे दोन्ही प्रश्न सुटू शकतील.

टीप : ह्या रॅक्सना दरवाजे जनरली नसतात. भूकंप किंवा तत्सम आपत्तीत अशा रॅक्समधील सामान गडगडत खाली येण्याचा किंवा ते रॅकसकट खाली येण्याचा धोका नाकारता येत नाही.

आजच वाचून काढला हा धागा. झकासच आहे.

घरातली सगळीच लोकं जेव्हा बिझी असतात, हाताशी कायमच अपुरा वेळ असतो, घरात आवड-हौस-गरज-व्यसन म्हणून वाढवून ठेवलेले पसारे असतात. ते आवरत बसण्याइतका रोजचा वेळ आणायचा कुठून याचा रोज उठून प्रश्न पडत असतो. कामवाल्या बाईच्या मर्यादा स्पष्ट दिसतात त्यामुळे त्यांच्याकडून जास्त मदतीची अपेक्षाच करता येत नसते, घरातल्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, गरजा या पाळाव्याच लागतात. त्यात शॉर्टकट आरोग्याच्या दृष्टीने भारी पडू शकतो. अशा प्रत्येक वेळी स्वच्छतेचे लहानपणापासून झालेले, आईच्या घरात अनुभवलेले वगैरे संस्कार जसेच्या तसे पाळण्याचा प्रयत्न किती आवाक्याबाहेरचा, दमवून टाकणारा ठरतो याचा अनुभव मला आहे. आधी मुळात माझाच पसारा घरात सर्वात जास्त असतो असं नवरा मुली म्हणतात त्यामुळे पसारा आवरा लगेच हा दम देता येत नाही. मलाच तो भारी पडू शकतो (पुस्तकं, कपडे आणि पर्सेस-बॅग्ज यांच्या शॉपिंगचं माझं वेड आणि माझी आवरशक्ती यांचं प्रमाण व्यस्त आहे.). मला रोजच्या रोज घर आवरुन ठेवणं, ते आवरलेलं नाही याचा स्ट्रेस घेणं जमत नाही आणि मला ते शक्यही नाही. पण ते गरजेच असतं कारण नंतर आपल्यालाच त्रास होतो हे मात्र खरं. त्यावर उपाय शोधण्याचे माझे प्रयत्न सतत चालू असतात. फारसे यशस्वी होत नाहीत. (टेन्शन्स कमी करण्यासाठी किंवा डीस्ट्रेस होण्यासाठी घरातली आवरा आवरी हा एक हमखास उपाय आहे तो मला जमतो.)
घेतलेली वस्तू जागच्या जागी ठेवणे हा इतका साधा नियमही घरातल्या कुणालाच पाळणं जमत नाही तिथे बाकी सिस्टीम्म्स काय डोंबल पाळल्या जाणार. मी खूप ट्रायल-एरर्स पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टीम्स घरात आणायचा प्रयत्न केला होता पण सरते शेवटी फक्त एक पंचसूत्री तेवढी अमलात आणणं कन्सिस्टन्टली गेली काही वर्षं जमतय असं वाटलं.

१)जमेल तसं,जमेल त्याने घर आवरुन ठेवायचं-
बॉक्सेस, (कलात्मक :प) छोट्या टोपल्या वगैरे घरात जागोजागी ठेवाव्या. हाताशी लागेल तो बारीकसारीक पसारा (पिना,आयकार्ड्स,सुट्टे पैसे, नेलकटर्स, कात्र्या, बटणं, सीडीज, पेनं वगैरे त्यात टाकायचा. कधी कधी सेलफोन्सही जातात त्यात Proud ) बर्‍याच कायमच्या गायब होऊ शकतील अशा गोष्टी त्यात ऐनवेळी सापडतात. शोधाशोधीचे श्रम वाचतात.

२)क्लटर दर आठवड्याला जमतच त्यामुळे ते दर आठवड्याला कमी करायचं.-
रद्दी, रिकाम्या शाम्पू,नेलपेन्ट्सच्या, रिमूव्हरच्या बाटल्या, निरुपयोगी झालेले डबे, पिना, तुटकी जंक ज्वेलरी, घड्याळे, आयपॉडच्या हेडफोन्सच्या वायरी, पर्समधला कचरा, जुनी बिलं, मासिकं असं त्यात काय वाट्टेल ते असू शकतं.

३)बेसिक हायजिनला घरात सर्वात जास्त महत्व द्यायचं आणि त्यात कोणी हयगय केली तर त्याची गय करायची नाही.-
भाज्या, फळं स्वच्छ धुवूनच वापरणे, लोणची,दही ह्यात चमचे तसेच न ठेवणे, सिंक,बेसिन्,टॉयलेट्स चकचकीत ठेवणे (घरातल्यांना दिवस ठरवून द्यायचे), फ्रीझमधे २ दिवसाच्यावर कोणताही शिजवलेला पदार्थ न ठेवणे, गॅसची शेगडी, ओटा वेळोवेळी पुसणे (झुरळ-मुंग्या होत नाहीत), किचन टॉवेल्सचा वापर अन्य कोणत्याही कारणासाठी न करणे (जास्त झालेला फेव्हिकॉल, रंग पुसण्यापासून ते सांडलेला चहा आईला न कळता पटकन पुसण्यापर्यंत कशासाठीही वापर होऊ शकतो), पाण्याच्या बाटल्या,बुचे, ग्लासेस यांची स्वच्छता इतपत बेसिक. मोलकरीण दांड्या मारणारी असली तरी चालेल पण तिच्या कामाच्या स्वच्छतेच्या पातळीशी तडजोड करु नये.

४)कामाचे कागदपत्र सांभाळून ठेवणे-
यासाठी फोल्डर्स,पाकिटे,पाऊच त्यावर लेबले लावून एका फारशी हाताळणी नसलेल्या कप्प्यात ठेवून देणे.

५) आवश्यक वस्तुंची ग्रोसरी, भाजीपाला-फळं वेळच्यावेळी भरुन ठेवणं.-
जास्त साठा अजिबातच करायचा नाही. त्यासाठी वाण्याची दुकानं असतात. फोन केला की सामान लगेच आणून देणार्‍या, गहू दळून कणीक आणून देणार्‍या वाण्याला हाताशी धरावं. एक मोठा प्लास्टिकचा पारदर्शक डबा बिस्किटांची, अ‍ॅसॉर्टेड स्नॅक्सची अर्धवट पाकिटं एकत्रित ठेवण्यासाठी असावा. तसेच एक मोठा पारदर्शक प्लास्टिकचा डबा फ्रीझमधे कडधान्यं वगैरे ठेवायला असावा.

ही पंचसूत्री मी काटेकोरपणे पाळते, पाळायला लावते घरातल्यांना. पुस्तकं, माझ्या लिहिण्याचा पसारा, मुलींचे बेडरुममधले कपडे, त्यांच्या अभ्यासाच्या नोट्स, पुस्तकं रोजच्यारोज आवरणं हे बाटलीतल्या राक्षसाच्याही आवाक्याबाहेरचं काम आहे. मग आमच्याकडे कोणी आवर्जून बोलावलेले पाहुणे असले तरच एक्स्ट्रा पसारे वगैरे आवरले जातात. त्यातही ज्याचे पाहुणे (म्हणजे मुलींचे मित्र-मैत्रिणी, नवर्‍याचे मित्र, माझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक वगैरे) त्याने जास्त पसारा आवरायचा Proud

पंचसुत्री मस्त!
त्यातही ज्याचे पाहुणे (म्हणजे मुलींचे मित्र-मैत्रिणी, नवर्‍याचे मित्र, माझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक वगैरे) त्याने जास्त पसारा आवरायचा>>>> जबरी! आवड्या! Happy

Happy

मी शक्यतो संपूर्ण कपाट कधीच आवरायला काढत नाही. ज्या कप्प्यात अतिशय क्लटर निर्माण झालेला असतो तो वेळ झाला की आवरायचा. यामुळे कंटाळा येत नाही. कपड्यांचा, पुस्तकांचा कप्पा असेल तर जास्तीत जास्त अर्धा तासात आवरून होतो. माझा ऑफिस ड्रॉवर (ऑफिस घरातच एका रूममधे आहे) असेल तर डोक्यावरून पाणी एक तास लागतो.
आवरा आवरी करण्याचा कंटाळा यायला लागायच्या आत उरकून जातं. शिफ्टिंग, दिवाळी किंवा तत्समच काहीतरी कारण असल्याशिवाय मी सलग १ तासाच्या वर आवराआवरी करू शकत नाही. माझा थ्रेशोल्ड तिथे आहे. आज पूर्ण दिवस आवराआवरीचा असं ठरवूनही मला जमत नाही.
सलग शिफ्टिंग केल्याने एक दो फेक दो इतकं सॉलिड अमलात आणलेलं आहे की कधीतरी लागेल म्हणून जमलेलं सामान मी शिवलेल्या कपड्यांच्यातले स्क्रॅप मटेरियल सोडले तर फारसं काहीच नाहीये.

कपाटातले नेहेमी वापरात नसलेले कपडे उदा. साड्या, ऋतु नुसार वापरायचे कपडे इत्यादीना बरेच दिवस न वापरल्यामुळे कूबट् वास् येतो आणि मग ते स्वछ असतील तरीहि घालायची इच्छा होत नाही. असे कपडे फ़्रेश् राहावे म्हणून काय करता येईल्?
बाकी हा धागा खरोखरच खूप उपयोगी आहे.

शर्मिला छान पोस्ट Happy

जास्त झालेला फेव्हिकॉल, रंग पुसण्यापासून ते सांडलेला चहा आईला न कळता पटकन पुसण्यापर्यंत कशासाठीही वापर होऊ शकतो<< अगदी अगदी Lol परवाच झालय हे आमच्याकडे .. "माम्मा, दुदु सांडल ते मी पुसलं".. "कशाला?" ... "किचनच्या ग्रीन टॉवेले ला" Uhoh Lol

आता मी अजुन एक टॉवेल ठेवलाय खास लेकीसाठी ... कार्टुन प्रिंटवाला.. त्यालाच पुसायच अस सांगितलय.... बघु कितपत जमतय Happy

स्पेस सेव्हर बॅग्ज खुप उपयोगी पडतात. स्पेशली थंडीचे जाडजुड कपडे. एक्स्ट्रा ब्लँकेट्स वगैरे साठी Happy

मी देशात जाताना आणि तिकडुन परत येताना कपडे अश्या बॅग्ज मधे घालुन मग सुटकेस मधे ठेवते.. जागा कमी अडते आणि सामान जास्त भरता येते Happy

स्पेस सेव्हर बॅग्ज मिळाल्या नाहित तर हे करुन बघता येइल - मोठ्या गार्बेज बॅग्ज (ड्बल घ्यायची) मधे सामान भरायचे आणि व्हॅक्युम क्लिनर ने आतली जमेल तेव्हढी हवा सक करुन घ्यायची. वरतुन पिशवीला गाठ मारायची किंवा दोरी बांधायची. छोट्या पिशव्या असतिल तर नुसते हाताने दाबुन सुद्धा जमेल तेव्हढी हवा काढुन टाकता येइल. अश्या चपट्या कपडे भरलेल्या पिशव्या मोठ्या बॉक्स मधे किंवा सुटकेसेस मधे ठेवता येतिल. एका सुटकेसे मधे जास्त सामान मावेल.

@आर्च, तु दिलेली लिंक सही आहे.. पण ती वॉटर ट्रिक आहे गं, स्पेस सेव्हर बॅग नाहिये Happy

सानिका, सिडर ब्लॉक्स ठेवायचे किंवा ड्राय फुलांचे सॅचे (sachet) मिळतात कपड्यात ठेवायला. छान वास तर रहातोच. पण सिडर ब्लॉक्समुळे कपड्यांचा मॉथ्स वगैरेपासून्पण बचाव होतो.

घर लावताना नक्कीच या टिप्स वापरणार मी आता! पुणे मुंबई मधे
गारबेज डिस्पोजल आणि डीशवॉशर मिळतात का आणि कुठे याची कोणी माहिती सांगु शकेल का?
उसगावातल्या या दोन गोष्टी नक्की भारतात असायला पाहीजेत ..
खुप उपयोग होतो त्यांचा..

आर्च Happy

हिमंगी, देशात डिशवॉशर्स आता खुप कॉमन झाले आहेत.. सगळ्या शहरात मिळतात..

गार्बेज डिस्पोजल - सिंक इरेटर्स नाही मिळत आणि देशात वापरु ही नयेत असं मला वाटतं.. जिथली ड्रेनेज्/स्युअरेज सिस्टीम हे कोप करु शकेल किंवा जिथे तशी व्यवस्था असेल तरच तिकडे ठीक असे इरेटर्स वापरणे....

मी मुलुंडच्या शॉपर्स स्टॉप मधे पाहिलं होतं गार्बेज डिस्पोजल सिस्टीम विकायला ठेवलेली. पण ही २००८ ची गोष्ट आहे. ह्या स्पेस सेव्हर बॅग्स रीयूज करता येतात का? स्प्रिंग क्लीनिंग सुरू केलंय. रीयूज करता येत असेल तर विकत घेईन म्हणते.

रीयूज करता येत असेल तर विकत घेईन म्हणते. >> नक्की घे. हे म्हणजे मोठ्याल्या झिपलॉक बॅगसारख्या असतात.

प्राडी, या बॅग्ज रीयुजेबल असतात.

मी मुलुंडच्या शॉपर्स स्टॉप मधे पाहिलं होतं गार्बेज डिस्पोजल सिस्टीम विकायला ठेवलेली<< हो का? बघायला पाहिजे देशात गेले की.

मी माझ्या एका आर्किटेक्ट क्लासमेटला जो देशात प्रॅक्टिस करतो त्याला मागे विचारले होते तर तेव्हा त्याने मला सांगितले की काही लोक या सिस्टीम्स इंपोर्ट करतात आणि घरात लावा म्हणुन सांगतात. पण आपल्याकडच्या ड्रेनेज सिस्टीम्स आधीच ओव्हर्लोडेड असतात आणि हा चोथा शेवटी तळाला साचुन साचुन पाईप्स चोक होण्याची शक्यताच जास्त असते कारण रेग्युलर मेंटेनन्स नसतो. तेव्हा ह्या न वापरलेल्याच चांगल्या Happy आता यात काही बदल झाला असेल तर माहित नाही... यंदा आले की चौकशी करेन Happy

सिस्टीम्स विकायला आहेत पण लाजो म्हणते तसं इथली बाकीची सिस्टीम त्याला योग्य नाहीये.

डिशवॉशर्स परदेशात ठिकेत जिथे भांड्याला कामवाल्या बाया (किंवा गडी) मिळत नाहीत. इथे मला खरंच गरज वाटत नाही.
म्हणजे आधी सगळ्या डिशेस बेसिक तरी साफ करा, ग्रिट चिकटलं असेल तर काढा, मग लोड करा आणि झाल्यावर सगळी भांडी जागच्याजागी लावून ठेवा एवढी सगळी कटकट आपली आपण करत बसणं आणि रोजची भांडी आपणच करणं यात फारसा फरक मला तरी वाटत नाही.
त्यात इथली किचन्स एवढुश्शी असतात, अजून एक डिशवॉशरचं लोढणं कुठे ठेवायचं?
रोजच्यारोज डिशवॉशर चालवायचा म्हणजे बिल किती येईल विजेचं? डिशवॉशर चालवायच्या वेळी पाणी असेल का नळाला?
रोजच्यारोज चालवायचा नसेल तर इथल्या हवामानाला तो लोड होईतो खरकटी भांडी किती वेळ ठेवायची?
आपल्याकडे घरांमधे अजून तरी बहुतांशी भांडी, ताटं स्टीलचीच असतात. कुकर, कढई अल्युमिनियमची असू शकते किंवा तेही आता स्टीलचेच असते. आणि डिशवॉशरचा उपयोग तर काचेच्या भांड्यांसाठी जास्त होतो असं मला वाटतं.
तस्मात डिशवॉशर हा भारतातल्या किचनसाठी अजिबात गरजेचा मला तरी वाटत नाही.

ए छान चर्चा आहे ग. बरेच दा स्वच्छता घरात पाणी किती आहे त्यावरही अवलंबून असते. काल मी गावाला गेलेली. सोसायटीतले आमच्याकडे पाणी कमीच सोडतात. दोघीच म्हणून. त्यात काल आलेच नाही. आज सकाळी आजीबात काही आवरायचा उत्साह नाही पण एक पाव्हणे नेमके सकाळी ब्रेकफास्ट लाच आले. तेव्हा असेच बिनपाण्याने आवरले घर. क्या करते? घरातल्या करणार्‍या लोकांच्या तब्येती पण लक्षात घ्याव्या. वयस्कर लोकांच्यात जरा गुडघे दुखी वगैरे मुळे कमी स्वच्छता आढळू शकते. मी पण घर अर्ध्या वगैरे तासात आवरते. पहिले सर्व पसारा आवरणे, मग केर व मग ओल्या कपड्याने पुसून घेणे. डस्टिंग जरूरी अनुसार. किचन पण नेहमी आवरलेले व स्वच्छ ठेवायचा प्रयत्न असतो. पाणीच नसले कि मात्र काही इलाज नाही. माझी ड्राविग रूम आता कुत्रे वापरतात व घरी पार्ट्या वगैरे करणे बंद झाले आहे त्यामुळे मुलीच्या मैत्रीणी यायच्या असल्याकी नीट लावून ठेवते. एरवी असेच आपले.

शिफ्टिंग, दिवाळी किंवा तत्समच काहीतरी कारण असल्याशिवाय मी सलग १ तासाच्या वर आवराआवरी करू शकत नाही. माझा थ्रेशोल्ड तिथे आहे. आज पूर्ण दिवस आवराआवरीचा असं ठरवूनही मला जमत नाही.<<< अगदी अगदी नी माझेही तसेच आहे. मी फार फार तर एकाचे दोन तास आवराआवरी करू शकेन त्यापुढे नमस्ते टाटा बाय बाय... ज्याला बघवत नाही त्याने आवराआवर करावी असा मी आदेशच सोडते....(नवर्‍याला) किसी भी बात की हद होती है यार!!

Pages