रथसप्तमी मुक्काम परुळे...!

Submitted by हेम on 25 February, 2011 - 08:19

एका घरगुती समारंभासाठी गोव्यात जायचं ठरत असतांनाच बाबांनी हळूच एक पुष्टी जोडली- '..त्या समारंभाच्या दुसर्‍या दिवशी रथसप्तमी आहे. दरवर्षी परुळ्याला जायचं म्हणतोस, यंदा जमेल बघ..!' येस्स्स्स! ठरलं!! की, या वर्षी परुळ्याच्या श्रीदेव आदिनारायणाच्या रथसप्तमी उत्सवाला जाणे'च' आहे. पंचमी-षष्ठी-सप्तमी असा ३ दिवस दणक्यात चालणारा, भरपूर मनोरंजनाचे स्थानिक कार्यक्रम स्पर्धा- किर्तन- दशावतारी नाटक वगैरेंची रेलचेल असणारा हा उत्सव आता हळूहळू मोठं स्वरुप घेऊ लागला आहे. पूर्वी उत्सवादिवशी स्थानिक आणि काही मुंबईतून अशी शेकड्यांत जमणार्‍या मंडळींची संख्या आता उत्सवागणिक हजारोने होत आहे.
गोव्यातला कार्यक्रम आटोपून आम्ही त्याच रात्री मुक्कामी परुळ्याला आलो. कुडाळपासून साधारण १५ किमी. अंतरावर हे गांव आहे. बाबांचं बालपण याच गांवात आणि याच मंदिराजवळ गेलेलं.. आणि माझा जन्म इथला त्यामुळे माझं नाळकंही इथंच पुरलेलं!

गांवाचं लोकेशनही एकदम भन्नाट...मर्‍हाटीचा झेंडा ऑस्करपर्यंत नेणार्‍या 'श्वास' चित्रपटाचं चित्रिकरण याच गांवातलं! या चित्रपटाची सुरुवातीची नांवं येतात तेव्हा दर्शनी सुरु असलेलं गोफनृत्य या आदिनारायणाच्या मंदिरासमोरच चित्रित झालेलं. ...आणि तारकर्ली-भोगवे-निवतीसारखे सागरकिनारे एकदम जवळ..
.. गौड ब्राह्मणांपैकी धनंजय गोत्राच्या काही घराण्यांचं उपास्य दैवत असलेलं श्रीदेव आदिनारायण सूर्यमंदिर अंदाजे सातशे वर्षांपूर्वी बांधलं गेल्याचा तर्क आहे. याला निश्चित पुरावा नाही. सध्या जी मूर्ती आहे तीदेखील साधारणपणे अडीचशे वर्षे जुनी असावी. मंदिराबाहेर असलेल्या पिंपळपारावर पूर्वी पूजेत असलेल्या पण भग्न झाल्यामुळे विसर्जित केलेल्या २ मूर्ती व त्यांचे अवशेष ठेवलेले आहेत. सध्याच्या मूर्तीपेक्षाही या जुन्या मूर्तींवर असलेलं कोरीव काम खिळवून ठेवतं.

या मंदिराचं बांधकामही दणकट आहे. सभामंडपातील लांब व मोठ्या परीघाचे असलेले लाकडी वासे, बाहेरील मोठठठे खांब आणि एकदम हवेशीर असलेली आटोपशीर बाहेरची ओवरी इथून हलू देत नाही. लहानपणी या मंदिरात जाम खेळणं-कुदणं झालेलं असल्याने सारखं रेंगाळायला होत होतं. मंदिराच्या मागील बाजूंस उमा- महेश्वर मंदिर आहे.
उत्सवाच्या तिन्ही दिवशी मूर्तीची वेगवेगळ्या आसनांमध्ये बांधलेली अत्यंत देखणी पुष्पपूजा बघण्यासारखी असते. पण खरा सोहळा असतो तो सप्तमीदिवशी. पहाटे साडेचारला उठून- आवरून सोवळ्याने अभिषेकाला बसल्यावर द्विभूज असलेली संपूर्ण मूर्ती मनसोक्त न्याहाळता आली. मुकूट-कर्णभूषणे- गळ्यात हार- बाहूभूषणे- कंबरेला मेखला, दोन्ही हातांत कमलपुष्पे, पायाजवळ दोन्ही बाजूंना उषा- प्रत्युषा आणि त्याखाली सात अश्व असलेली पट्टी ... याशिवाय कोरीव गुडघे लक्ष वेधून घेत होते.
सकाळपासूनच दर्शनाला येणार्‍या मंडळींची रिघ लागू लागली. येणार्‍या प्रत्येकाच्या जेवणाची सोय देवस्थानाने केलेली होती. श्री. चंदुकाका मणेरीकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बनवलेलंसुग्रास जेवण जेवणारा पुढील वर्षी यासाठी तरी नक्कीच येणार हे जेवतं तोंडच सांगत होतं! संध्याकाळी मंदिरासमोरील जागेत सगळ्या स्त्रियांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम... रात्री मंगलाष्टकांच्या गजरात देवाची पालखी निघते तो कार्यक्रम..पालखीनंतर आरती.. श्री.मणेरीकरबुवांचं किर्तन आदी भरगच्च कार्यक्रमांनी दिवस भरलेला होता.

मंदिरासमोरील कार्यक्रम मंडप..

पालखीवेळी घराकडे आलो तोवर दशावतारी नाटक कलाकारांनी आख्खं अंगण काबीज केलेलं! सर्व कलाकारांचं वंदन स्विकारण्यास श्रीदेव गजाननही अधिष्ठीत झालेले होते.

दशावतारी कलावंत स्वतःचा मेकप स्वतःच करतात आणि तो करतांना त्यांच्या एकेक क्लृप्त्याही भारी बघण्यासारख्या असतात. अर्ध्या- पाऊण तासापूर्वीचा टकल्या- काळा इसम गोरीपान देखणी दुर्गादेवी म्हणून प्रवेशासाठी तयार होतो. शंकराचंही तसंच.... प्रत्येकाच्या स्वतःच्या स्वतंत्र पेटीतून कांय कांय निघत होतं? मेकपचा बेस असलेलं क्रीम, पावडरी, भडकपणा येण्यासाठी रंग, हार व इतर दागिन्यांपासून अगदी साड्या, शेले, मोत्यांच्या माळा ....आगागागा...!!! यांच्यावर एक स्वतंत्र लेखमालिका होऊ शकेल!

आणखी नवलाची गोष्ट म्हणजे हळू आवाजात कुजबुजत असलेला नि सामान्य पट्टीत बोलणारा कलाकार - प्रवेशानंतर ऐssssssय ही आरोळी ज्या वरच्या पट्टीत ठोकतो आणि त्याच पट्टीत न अडखळता संवाद म्हणतो तो फरक अनुभवण्यासारखा... रात्री २ वा. दशावतारी नाटक सुरु झालं तेव्हाही दिवसभराच्या दगदगीमुळे कमी असली तरी हौशी नि रसिकमंडळी हजर होतीच. साडेपाचला नाटक 'आवरलं'.... (छ्या: ! धयकाल्याचो नाटाक रात्री १० वाजेक आख्यान सुरु करतंत ते थेट पहाटे कोंबो आरवेपर्यात ....त्यामुळे आवरलं म्हटलं.) आता मीही आवरतो.

फुड्ल्या रथसप्तमीयेक जमलां तर जरा मंदिराथंय दिस काढा वायंच!! नायतर हल्ली कर्लीचो पूल झाल्यामुळे बर्मुडा घालूनशान कारने देवबागेक/ मालवनाक जानारे -'पिउन पडो नि दंडवत घडो' अशा या बेतान येतंत नि जाता जाता कांय पुन्य गांवतां कांय बघतंत....!

ता.क.: परुळ्याच्या गौरीशंकर मंदिरातही महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. हा लेख वाचून पुढच्या रथसप्तमीपर्यंत कुणाला धीर धरवत नसेल तर हे निमित्त पुरवतो.

गुलमोहर: 

या देवळाच्या खळ्यात आम्ही क्रिकेट खेळायचो. गोट्या खेळायचो. आणि गौरिशंकराचे देऊळ माझ्या आजोबांचे...
खूप मस्त वाटलं फोटो पाहून.. Happy

दरवर्षी मी जातो तेव्हा पावसाळा असतो.. आता पुन्हा कधीतरी सप्तमी / शिवरात्री बघून जायलाच हवं

फुड्ल्या रथसप्तमीयेक जमलां तर जरा मंदिराथंय दिस काढा वायंच!! नायतर हल्ली कर्लीचो पूल झाल्यामुळे बर्मुडा घालूनशान कारने देवबागेक/ मालवनाक जानारे -'पिउन पडो नि दंडवत घडो' अशा या बेतान येतंत नि जाता जाता कांय पुन्य गांवतां कांय बघतंत....! >> ह्या एकदम बेस्ट बोललात.. Happy

माझं पण हे "होम पीच" ! छानच बॅटींग केलीय तुम्ही हेमजी त्यावर !! वर्षातील माझी एक भेट आपसूकच वाढली तिथले फोटो पाहून व वर्णन वाचून. धन्यवाद.

मस्तच!!!
काहि वर्षापूर्वी मालवण-सागरीमार्ग-कर्ली नदीवरच्या पुलावरून-पाट परूळे, म्हापण मार्गे निवतीला केलेला प्रवास आणि मुक्काम आठवला.

देसाईकाका नि भाऊनूं , त्या खळ्यांत मीही क्रिकेट खेळलोय पण आता स्टेज बांधल्यामुळे ते पीच गेलंय...:(
लपाछपी खेळायला मंदिर जाम भारी!!