सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29

येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे! Happy

आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!

तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.

सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल या सॅलड मधे अजून थोडं व्हेरिएशन. दाण्याऐवजी मोड आलेले मूग वाफवून घातले. कोबी बारीक चिरून घातला. चाट म., मिरपूड, दही वगैरे घालून थंड खाताना मौजा ही मौजा! Happy

रच्याकने,
पालक कुठे हि घालावी त्याला फार विशेष चव नसते. इथे अमेरिकेत तर नाहीच नाही

Sad
याच कारणासाठी तर नवरा पालक खात नाहिये ना!! "चरबट" लागतो इकडचा पालक असं मत आहे त्याचं. एरवी पुण्यात असेल तर भाजी, पराठा...सगळं चालतं!

भरत, कोशिंबिरीचा दाक्षिणात्य प्रकार वेगळा आहे.

सॅलड रॅप्स हाही एक छान प्रकार आहे.

कोबी/ लेट्यूसची आकाराने मोठी पाने बर्फाच्या पाण्यात कुरकुरीत करून घ्यायची. त्यांच्यात आपल्याला आवडते तसे मनपसंत सॅलडचे स्टफिंग भरायचे. उदा : स्वीटकॉर्न + टोमॅटो + किसलेले गाजर + पुदिना/कोथिंबीर + मीठ - साखर - लिंबाचा रस - मिरेपूड. (किंवा तुमच्या आवडीच्या कच्च्या / वाफवलेल्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये इ.) हे सर्व त्या पानावर सारणाप्रमाणे ठेवायचे आणि पानाची अलगद हाताने वळकटी करून त्याला टूथपिकने उभे खोचून बंद करायचे. किंवा सारण पानाच्या मधोमध ठेवून पानाच्या दोन्ही कडा एकावर एक ओव्हरलॅप होतील अशा आणून त्यांना टूथपिकने खोचायचे. हे रॅप्स गार करूनही खाता येतात. पण शक्यतो लगेच खाल्लेले चांगले, म्हणजे कोबी/ लेट्यूसचे पान मऊ पडण्याचा व सारण गळून पडायचा धोका उरत नाही! Proud
हा रंगीबेरंगी प्रकार दिसायला खूप मस्त आणि लवकर फस्त होणारा! त्यावर जर किसलेले चीज वगैरे घातले तर मग बोलायलाच नको!

असेच तुम्ही साध्या चपाती/ फुलक्याचे किंवा कॉर्नफ्लोअरपासून बनवलेल्या चपातीचेही सॅलड रॅप्स बनवू शकता. राईस पेपरचेही म्हणे असे रॅप्स बनवतात, पण मला त्याचा अनुभव नाही. मुलांच्या पोटात एकाच वेळी सॅलड्स व पोळी जाण्यासाठी हा प्रकार चांगला आहे. त्यात तुम्ही जर वेगवेगळ्या चटण्या, जसे खजुराची चटणी, पुदिन्याची चटणी, केचप इत्यादी वापरलेत तर त्या आंबटगोड चवीमुळेही मुले हा प्रकार आवडीने खातात. फक्त खाली धरायला एक प्लेट नक्की द्या, म्हणजे झाले! Happy

धन्स सायली! Happy

कालच मंजूडीची भरल्या टोमॅटोची कृती पुन्हा वाचली. अगदी तशाच धर्तीवर टोमॅटो बास्केट्स बनवता येतात.
लालबुंद, पिकलेले घट्ट असे मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन त्यांचे दोन भाग करायचे. आतील गर हलक्या हाताने खरवडून घ्यायचा व गराच्या जागी कोणतेही सॅलड/ कोशिंबीर घालायची. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर किंवा पुदिन्याची पानं वगैरेंनी सजवायचं. सॅलडमध्ये रंगीबेरंगीपणा येण्यासाठी टोमॅटोच्या आत भरलेल्या सॅलडमध्ये पिवळा, हिरवा, केशरी, पांढरा असे रंग असावेत. (मुळा, गाजर, मटार, घेवडा, स्वीट कॉर्न, कोबी, पालक, कांदा इ.)
जर टोमॅटो आकाराने लहान असतील तर त्यांचे दोन भाग न करता टोमॅटोच्या देठाच्या बाजूचा भाग अलगद सुरीने छेद देऊन झाकणासारखा बाजूला करायचा, आतील गर खरवडून त्यात सारण भरायचे व पुन्हा हवे असल्यास टोमॅटोचे कापलेले झाकण त्याच्यावर पुन्हा बसवायचे.
सर्व्हिंग प्लेटमध्ये खाली बारीक चिरलेल्या कोबी/ पालकचा थर देऊन त्यावर ह्या टोमॅटो बास्केट्स ठेवल्यावर खूप छान दिसतात.

बास्केट चाट साठी बाजारात तयार चाट बास्केट्स मिळतात. त्यातही सॅलड सर्व्ह करता येते.

व्वा..! मस्त....!
कोशींबिरी शिवाय जेवण नाही उतरत माझं....त्यात कच्च्या भाज्यांची कोशिंबिर सगळ्यात जास्त आवड्ता प्रकार.

वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरीं बद्द्ल माहीति एकीत्रित पणे पहायला मिळाली त्या बद्द्ल कुलकर्णीतै चे मनपुर्वक आभार... Happy

प्रज्ञा९, आज पालक वाली कोशिंबिर करुन बघितली आणि काय मस्त झालेली. तुम्ही म्हटल्याप्रमाणे एरवी पालक न खाण्यार्या नवर्याने पण आवडिने खाल्ली.
एक बदल केला मात्र - घरी मक्याचे दाणे नव्हते आणि आवडत पण नाहीत म्हणून फ्रो़झन मटार आणि गाजर घातले.
एक प्रश्न - पालक उकडुन घेतल्याने आणि त्यातल पाणि टाकुन दिल्याने त्यातली जीवनसत्व कमी होतील ना? मग तो नुसता अगदी किंचित पाण्यात मायक्रोव्हेव मध्ये गरम केला तर कस होईल?

अळूच्या देठांचे रायते

विजय गोखले या सेलेब्रिटी नटाने टीव्हीवर ही वेगळी वाटावी अशी पाकृ सांगितलेली. ढोबळपणे आठवेल तशी लिहीतोयः-

अळूचे देठ सोलून, पेराएवढे तुकडे करून माफक उकडून घ्यायचे. (ज्यांच्या घशाला अळू खवखवतो, त्यांनी उकडताना २ कोकमं घालायची.) उकडल्यावर त्यात फेटलेले दही, मीठ, किसलेले गाजर, किसलेलं बीट-रूट घालायचे. ( हवा असल्यास थोडसा चाट मसाला घालायचा.) नंतर त्यावर तूप-जिर्‍याची फोडणी देऊन नीट कालवून थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवायचे. जेवताना अळूच्या देठांचे गारेगार रायते तयार!

धन्यवाद!

चिन्नू Happy
हे अळूच्या देठांचं रायतं चवीला मस्त असतं! Happy आमच्याकडे होतं, पण करताना त्यात किसलेले गाजर, किसलेलं बीट-रूट हे कधी घातले नाही. असंही करुन पहायला हवं.

आपण अळूचे देठ फेकून देतो, पण त्याचे भरीत खरेच चांगले लागते. गोव्यात "वेठी" म्हणून पण एक प्रकार करतात. तिथेच आंबाडे या फळांचे एक कालवण करतात, पण त्याला "रायते" म्हणतात !!

बित्तु, अळूच्या देठचे रायते अशा पध्दतीने करायला हवे! त्याला देठी असेही म्हणतात ना?
दिनेशदा, कोकणात आंब्याचेही रायते बनवतात असं ऐकलं आहे, एकदा चाखले आहे. गोड, आंबट, तिखट अशी चव होती त्याची.

मराठी कुडी, गरम पाण्यात पालकाची पाने जरा वेळ झाकून ठेवली तरी चालते. जर तुम्ही पाण्याबरोबर पालकाची पाने उकळली/ उकडली तर ते पाणी फेकून द्यायची गरज नाही. भाजी/ आमटी/ सूप इत्यादीत वापरून टाकायचे ते पाणी.

खजूर हा पौष्टिक समजला जातो. सॅलडमध्ये तुम्ही ह्या बिनबियांच्या खजुराचा समावेशही करू शकता. तसेच खारकेचे तुकडेही सॅलडमध्ये पेरता येतात. अक्रोड, बदाम,मनुका, बेदाणे, जर्दाळू, सुके अंजीर यांचाही समावेश सॅलडचे सौंदर्य, स्वाद व पौष्टिकपणा अजून खुलवतो.

उन्हाळ्याच्या दिवसात भिजवलेले सब्जाचे किंवा तुळशीचे बी देखील सॅलडला वेगळा स्वाद देते. तसेच हे भिजवलेले बी फ्रूट सॅलडमध्येही वापरू शकता.

कैरीचे रायते:
कैर्‍या उकडून त्याचा गर काढून घ्यावा. त्यात गूळ, मेतकूट आणि मिठ घालावे. एखादी मिरची चुरडून लावावी (ऐच्छीक). आणि स्वर्गसुख अनुभवावे! Happy

माधवने कैर्‍या उकडून घ्यायचे लिहिले आहे, माझ्या आजोळी त्या भाजतात. चूल आयती पेटलेलीच असते (हो घरी गॅस असला तरी, भाकर्‍या चूलीवरच करतात ) शिवाय काही कैर्‍यांना चिक असतो, तो भाजल्याने जातो. एरवी या कैर्‍यांचे लोणचे कुणी खाणार नाही.

मिनोती, तुझी लेट्यूस रॅप्सची कृती मस्त आहे. मी आपलं देसी व्हर्शन करत असते त्यातलं. जे काही घरात उपलब्ध आहे ते सॅलड ड्रेसिंग आणि घरात असलेल्या भाज्या!
कैरीचा माधवने सांगितलेला प्रकारही इंटरेस्टिंग वाटतोय. कधी खाल्लेला नाही. दिनेशदा, कैर्‍या भाजल्यावर त्यांच्या स्वादात फरक पडत असेल ना? खास करून चुलीवर भाजल्या की चुलीचा खमंगपणाही त्यात उतरत असेल ना?

दक्षिण भारतातील काही देवळांमध्ये मिळणारा फळांचा प्रसाद अतिशय जबरी असतो चवीला! केळी, पपई, अननस, चिक्कू, सफरचंद यांचे काप/तुकडे, द्राक्षे, डाळिंबाचे दाणे, बरोबर ओल्या खोबर्‍याचे काप किंवा शहाळ्यातील मलई असे हे एकत्र मिश्रण असते. बर्‍याचदा केळं, पपई, चिक्कू इत्यादी जरा कुस्करले गेल्यामुळे त्यांचा अंगरस खोबर्‍यात मिसळून एक वेगळीच स्वादिष्ट चव येते त्याला. शिवाय वर अनेकदा तुळशीचे पान असते. पूजेतील हळद-कुंकू, कापूर, चंदनाचा सूक्ष्म गंध असतो. कधी गुलाबाची पाकळी, पूजेतील एखादे फूलही असते स्वाद वाढवायला. आणि हे सर्व पळसाच्या पानाच्या द्रोणात. एकदा तर असा प्रसाद मी शहाळ्याच्या भकलाच्या वाटीतून खाल्ला होता. फार सुंदर चव असते ही. असे ''फ्रूट सॅलड'' त्या देवळांव्यतिरिक्त किंवा प्रसादा व्यतिरिक्त मी इतर कोठे अजून तरी खाल्ले नाहीए.

शिमला मिरची वापरून कोशिंबीर करता येईल का? कच्ची नको, भाजून किंवा थोडी परतून वापरता येईल, अशी कृती सांगाल का?

जुन्या / नव्या माबोवरच्या ह्या काही कोशिंबीर/ सलाद रेसिपीज :

मेथी + कांदा पात कोशिंबीर : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93045.html?1134502960

अव्हाकाडो सॅलड : http://www.maayboli.com/node/18979

काकडीचं नाकार्ड : http://www.maayboli.com/node/16265

गाजर + कांदा पात कोशिंबीर : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103152.html?1135125856

कांदा टोमॅटोची गोडा मसाला घालून कोशिंबीर : http://www.maayboli.com/node/14610

बटाट्याचं रायतं : http://www.maayboli.com/node/12047

बटाटा मश्रूम सलाद : http://www.maayboli.com/node/11736

कोल्ड पास्ता सॅलड : http://www.maayboli.com/node/10734

मुळे मिरच्या : http://www.maayboli.com/node/10629

बटाट्याचं भरीत : http://www.maayboli.com/node/9394

पपनस ट्रीट : http://www.maayboli.com/node/3537

बीट केळ्याची कोशिंबीर : http://www.maayboli.com/node/3412

ब्रोकोली सलाड..

ब्रोकोलीचे १०-१५ तुरे
लाल/ काळे द्राक्ष किवा मनुके/किसमिस १ कप
बदाम काप
मेयोनीज किवा सावर क्रीम/दही १ मोठा चमचा
चवीला मीठ आणि मिरे पूड

हातानीच खालचे खोड काढून धुवून घ्यायचे,खाता येतील एवढे लहान भाग करायचे कापायची गरज नाही.. द्राक्ष उभे २/४ भाग करून टाकायचे..
बदाम काप, मीठ, मीर पूड घालून एकत्र करायचे.. सर्व्ह करायच्या आधी चिल्ड क्रीम किवा जे काही टाकायचे असेल ते टाकून सगळ्या ब्रोकोलीला लागेल इतपत मिक्स करायचे

कधी ब्रोकोली ला हात न लावणारी मी मजेने खायला लागले.. आधी सवय व्हायला खूप सारे द्राक्ष मनुके आणि बदाम टाकायचे आता गरज नाही Happy

लो कॅल सॅलड ड्रेसिंग : लाल पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करून घेणे. त्यात चवीप्रमाणे मीठ, मिरपूड, मोहरी पूड, किंचित साखर मिसळणे. ह्यात तुम्ही लेट्यूसची पाने, चिरलेला पालक, कांदा पात, कांद्याच्या चकत्या, किसलेला मुळा - गाजर, वाफवलेला घेवडा - स्वीटकॉर्न, वाफवलेली/ कच्ची मोड आलेली कडधान्ये इत्यादी यांपैकी जे आवडेल ते मिसळून त्याचे सॅलड बनवून खाऊ शकता.

अशाच प्रकारे फ्रूट सॅलड साठी खरबूज/ पपई/ आंबा इत्यादी फळांचे ड्रेसिंग करता येते. फळाचा गर मिक्सरमधून मऊसूत होईपर्यंत फिरवणे. त्यात चवीनुसार साखर, मीठ, जिरेपूड/ चाटमसाला/ मिरेपूड, मोहरी पूड इत्यादी घालणे. ड्रेसिंग फार घट्ट वाटले तर थोडे क्रीम / दूध घालता येते.

दिनेशदा, लिंबाच्या रसाला पर्याय आणि अजून स्वाद खुलवायचा असेल तर संत्र्याचा गर/ रसही वापरता येईल. Happy
एकमेकांना पूरक स्वाद/ चव असलेल्या फळांचे गरही वापरता येतील सॅलड ड्रेसिंग म्हणून!

रायत्यांच्या बाबतीत मागे मी एक छान टिप वाचली होती. पुदिना + नारळ + कोथिंबीर + हिरव्या मिरच्या यांची चटणी करायची. त्यात आंबटपणासाठी कैरी/ किसलेला आवळा घालायचा. आणि तेच सॅलड ड्रेसिंग म्हणून वापरायचे.

कुर्गमधे जरा कमी गोड असलेल्या (तोतापुरी वगैरे) असे रायते करतात. नेहमीची हिरवी चटणी आणि त्यात या आंब्याच्या फोडी. वरुन राई, कढीपत्त्याची फोडणी.

Pages