द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ७

Submitted by बेफ़िकीर on 21 February, 2011 - 03:33

क्वीन मेरी चर्च!

तेरा तारीख उजाडली तरी कुणालाही समजत नव्हते की नक्की भानगड काय आहे? क्वीन मेरी चर्चच्या व्हिजिटच्या दिवशी आपण नक्की कसे सुटणार आहोत किंवा सुटू शकतो?

नुसतेच आपले चौघे सगळीक्डे लक्ष ठेवून होते. दिनचर्येची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली. मात्र आज चक्क यु़झ अ‍ॅन्ड थ्रो वाले रेझर्स मिळाले. आता हे रेझर्स निदान महिनाभर तरी वापरता येणार असे आकाशला वाटले पण कुणीतरी त्याला सांगीतले. दाढी करून झाल्यानंतर रेझर परत द्यावा लागतो. नाहीतर रेझरने मारामारी करण्यापर्यंतही कैद्यांची धाव जाते. काही का असेना, आपली आपली दाढी करून सगळे जरा बरे दिसू लागलेले होते.

नाश्त्याच्यावेळेस जरा उत्साही वातावरण होते कारण आज दुपारी काहीतरी सुग्रास खायला मिळणार होते. कैद्यांमध्ये आत्ताच थट्टामस्करी सुरू झालेली होती. कोणते पदार्थ असणार यावरून! अर्थात, जेलमध्ये नॉन व्हेज कधी सर्व्ह केले जात नव्हतेच! त्यामुळे शाकाहारी पदार्थांबाबतच चर्चा चालू होती. हे चौघे मात्र घडणार्‍या प्रत्येक घटनेकडे बारीक लक्ष ठेवून होते.

सक्तमजूरी आज एकच तास होती. त्यानंतर लगेच सगळ्या कैद्यांना आंघोळीला पिटाळण्यात आले. आज साबण आणि चांगले स्वच्छ पंचेही होते. एकेका कैद्याला चक्क दहा मिनिटे मिळालेली होती. आनंदाच्या कर्कश्श किंकाळ्या फोडत कैद्यांनी स्नान केले. नुसती धमाल वाटत होती प्रत्येकाला! कधी नव्हे तो संजय बाबू मनापासून आंघोळ करताना दिसला.

साडे अकराला सगळे रांगेने हॉलमध्ये आले. तेथे टेबल्स मांडलेली होती. दहा कैद्यांना वेगळे काढून वाढपी बनवलेले होते. सुग्रास अन्नाचा वासच असा काही येत होता की आज दुप्पट खाऊन घ्यायचे हे प्रत्येकानेच ठरवलेले होते. आकाशलाही जरा जास्तच भूक लागली. सगळे जेवायला बसले.

व्वाह! काय जेवण होते ते! तीन भाज्या, आमटी, सॅलड, चटणी, लोणचे, पोळ्या, पुलाव, दही आणि श्रीखंड! येरवडा मंगल कार्यालयच जणू! फक्त 'सावकाश होऊदेत हां' असा आग्रह नव्हता इतकेच! त्या ऐवजी 'खा भडव्या, बोट घशात घातलं तरी श्रीखंड लागायला पाहिजे' अशा सद्भावना होत्या.

तूप? कैद्यांना तूप?

आकाशने तूपाच्या धाराच घेतल्या पोळीवर!

मात्र इतके असूनही हेच समजत नव्हते की सुटायचा नेमका मार्ग काय आहे? सगळीकडे प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती. कोणतेही लूप होल दिसत नव्हते. आणि सर्वात मुख्य म्हणजे 'आपण आज सुटू शकतो' हे फक्त एक गृहीतक होते. कसे, कधी, सुटणार की नाही, हे सर्व अंधारातच!

पाचही जण एकमेकांकडे बघून सारखी आंखमिचौली करत होते. विश्वास केवळ आकाशवरच होता कारण मुहम्मद कादिर उर्फ राजासाब आपल्याला सामील नाही हे वाघने सिद्ध केल्यानंतर फक्त आकाशचेच असे म्हणणे होते की 'एम क्यू' म्हणजे क्वीन मेरी चर्च! आकाशवर विश्वास ठेवणे ही केवळ एक अंधश्रद्धा आहे हे जाणवत असूनही बिचार्‍यांनी (?) विश्वास ठेवलेलाच होता.

दुसरे म्हणजे, केवळ आज आपण सुटणार असे गृहीत धरून कोणताही मूर्ख प्रयत्न करायचा नाही हे प्रत्येकाला समजत होते. मिनीने आजच्या दिवसाला महत्व का दिलेले असावे हेच माहीत नव्हते. त्यामुळे, सहज संधी दिसली तरच हातपाय हालवायचे नाहीतर नेहमीप्रमाणेच दिनचर्या ठेवायची हे न कळायला ते वेडे नव्हते.

आणि संधी???? ... हं... बहुधा संधीच असावी ती... संधी दिसली..

हॉलमध्ये असलेल्या एका खिडकीतून लांबवर ती संधी दिसत होती. वाघलाच जाणवले ते! त्याने अंधुक आंखमिचौली करत सगळ्यांचेच लक्ष हळूहळू तिकडे वेधले.

चर्चमधून दोन मोठ्या गाड्या आलेल्या होत्या. एक होता ४०७ आणि एक मेटॅडोर! ४०७ मधून कैद्यांचे अन्न आलेले होते तर दुसर्‍या गाडीतून चर्चचा स्टाफ! यापैकी अन्नाचे डबे ४०७ मधून केव्हाच काढून झालेले होते आणि आत त्यात कैद्यांनी तयार केलेल्या भेटवस्तू ठेवल्या जात होत्या चर्चसाठी! कुणी खेळणी तर कुणी शोभेच्या वस्तू बनवलेल्या होत्या. कुणी पायपुसणी, मॅट्स तर कुणी वॉल पीस बनवलेले होते. अशा गोष्टींची प्रदर्शने भरायची. पण आज चर्चमधील स्टाफला भेट म्हणून अशा वस्तू ४०७ मध्ये भरण्यात येत होत्या. ४०७ आणि मेटॅडोरच्या मध्ये एक मोठी भिंत होती. ४०७ जेलच्या आतल्या आवारात तर मेटॅडोर गेटपासल्या भागात होती. दोन्हींच्या मध्ये असलेली भिंत बरीच उंच होती. आणि सुरक्षा व्यवस्था दोन्ही वाहनांवर होती. मेटॅडोर गेटपासून जवळच असल्यामुळे तिच्यावर अनेकांचे लक्ष होते. ४०७ वर मात्र एकच हवालदार लक्ष ठेवून होता. तपास इतकाच करायचा होता की४०७ मधे एखादा कैदी तर जाऊन बसत नाही ना! ४०७ चा ड्रायव्हर जेल बघायला आत आलेला होता. चार कैदी ४०७ मध्ये अनेक वस्तू भरत होते. या वस्तू भरून झाल्यानंतर मगाशी आणलेले जेवणाचे रिकामे डबेही भरायचे होतेच!

इकडे वाघने का लक्ष वेधले असावे हे आकाश आणि मुल्लाला समजलेच नाही. बाबूला मात्र काहीतरी जाणवले. त्याने फटाफट जेवण उरकायला सुरुवात केली. आकाश नुसताच लांब त्या गाडीकडे बघत होता.

पाचच मिनिटांत सगळ्यांनी जेवणे उरकली आणि हात धुवून ते त्या गाडीकडे सरकू लागले. अजूनही आकाश आणि मुल्लाला काहीही समजत नव्हते. या गाड्यांमधून आपली सुटका होणे अशक्य आहे हेच त्यांना वाटत होते.

आणि घोरी नावाच्या हवालदाराने हटकलेच.

घोरी - ए... ए... ए किधर जा रहा है... आ?? चल्ल... चल बरॅकमे..

आता काय करायचे? नसीमला कसे काय सुचले माहीत नाही.

नसीम - साहबने बोला है वहां मदद करनेको...

नसीमचा अभिनय तरी लाजवाब होता. घोरीने केन दाखवत 'जा' अशी खुण केली आणि पाचही जण सुस्कारा सोडून निघाले.

४०७ पाशी आले तेव्हा आधीच चार कैदी ते काम करतच होते. आता संजयबाबूकडे लीडरशीप आली. त्याला बहुतेक कैदी घाबरायचेच! तेथे असलेल्या हवालदारालाही न बिचकता बाबू म्हणाला..

"ए *****... फुटा इथून.. आम्हाला हालवायला सांगीतलेत डबे आता.. च्यायला जेवण सोडून राबतायत इथे..."

हवालदाराला 'कोण काम करणार आहे' याच्याशीकाहीही देणेघेणे नव्हते. त्याने 'चला, हे पाच जण तर हे पाच जण' अशी भूमिका घेतलेली पाहून आधीचे चार कैदी काढता पाय घेते झाले.

आता वाघ आणि मुल्ला अत्यंत त्वरेने वस्तू भरू लागले. तेवढ्यात डब्यांचा पहिला लॉट आलाही! हे एवढाल्ले मोठे डबे! पातेली मात्र जेलमधीलच वापरलेली होती. डब्यात एक माणूस सहज बसला असता. पण हवालदाराचे सरळ लक्षच होते. त्यामुळे 'आग्र्याहून सुटका' प्रमाणे 'येरवड्याहून सुटका' अशक्य आहे हे आकाशला त्याही परिस्थितीत मनात आले. लगेचच त्याने महाराजांची मनातल्या मनात माफीही मागून टाकली या चुकीच्या तुलनेबद्दल!

आता करायचे काय? ही खरंच संधी आहे की नाही? या हवालदाराला मिनीने फितवलेले असेल की काय? हे चेक करायची जबाबदारी अर्थातच बाबूची होती. तो सरळ ताना हवालदाराकडे गेला.

ताना - काय रे?? किती वर्षांनि न्हायलास??

बाबू - वीस एक दिवस झाले असतील..

ताना - सात सात मर्डर करून भडव्यांना श्रीखंड खायला मिळतंय..

बाबू लाचार हासला.

बाबू - विडी.. आहे का??

ताना - आत घालायचीय का?

बाबू - प्यायचीय..

ताना - तुझ्या बापानं जेल काढलंय का??

बाबू - काय साहेब.. एखाददिवस द्या की ओढून बिडी..

ताना - बाईल निजव की आणिक साहेबाकडं..

नेहमीप्रमाणेच क्षणभरासाठी बाबूच्या तोंडावर हिंस्त्र भाव निर्माण झाले. ते नोटीस केल्यामुळे हवालदाराने केन उगारलीच! चार पाच शिव्या हासडून झाल्यावर ताना म्हणाला..

ताना - नजर वर करायची नाय.. डोळे फोडून हातात देईल..

बाबू - रिक्वेस्ट करतोय.. मिनी भेटते का तुम्हाला कधी??

बाबू हे तपासत होता की 'याला मिनी भेटली असली तर नक्की काय योजना आहे ते समजेल'! हा प्रश्न विचारतानाही बाबूला शरमच वाटत होती, पण पर्याय नव्हता.

तानाला काय झाले काय माहीत? क्षणभर तो त्या कल्पनेने हुरळला असावा. बाबूकडे अविश्वासाने पाहात राहिला. त्याला वाटले बहुधा बाबू ऑफर करतोय स्वतःची बायको! पण त्याने ऑफर केली तरी तिला न्यायचं कुठं? घरात आपली लग्नाची बायको आहे ती आपल्याच केनने आपल्यालाच तुडवून काढेल. कारण सासरा माजी आमदार! ह्यांचाच रुबाब नवर्‍याहून जास्त! पण बाबूच्या बायकोचे स्वप्न काही त्याला त्या दोन तीन क्षणात जमीनीवर येऊ देईना! मात्र याचा परिणाम तिसराच झाला.

वाघ, मुल्ला, आकाश आणि नसीम यांच्याकडे त्याचे काही वेळ दुर्लक्षच झाले.

आणि त्या शॉर्ट कालावधीत जे नको ते होऊनही गेले.

ताना - साहेबाकडं धाडण्याऐवजी माझ्याकडं धाड...

बाबू - साहेब.. धाडेन.. पण.. काही संधी आहे का मला...

ताना - कसली रे??

बाबू - खुल्या जगात जगायची??

ताना - तुझ्यायला तुझ्या? एकदा बायको धाडणार आणि जेल फोडणार होय रे *****? आणि मी नोकरीवर पाणी सोडू होय?? च्यायला पाचशेर रुपये टाकले तर तुझ्या बायकोपेक्षा भारी माल मिळतोय बुधवारात.. *****.. चल्ल डबे भर..

बाबूचा संताप झालेला होता. पदरात काहीच पडलेले नव्हते. उलट नाही ते ऐकायला लागले होते. तो मुकाट आपल्या ग्रूपमध्ये आला. हवालदारही तिथे येऊन बाबूच्या बायकोबद्दल उलटसुलट बोलू लागला सर्वांदेखत!

आता मात्र बाबूचा उद्रेकच व्हायची वेळ आली. बाबूने संतापातिरेकाने तानाकडे पाहिले तसा ताना उठून तिथे आला आणि बाबूच्या पोटरीत साट्टकन केन हाणली. खालीच बसला बाबू! पाठोपाठ तानाने वाघ आणि आकाशलाही एकेक फटका दिला.

ताना - सांगीतलंय ना नजर वर करायची नाय?? आ??? भडव्या बायकोला निजवतोस पाहिजे तिथे.. आणि वर तोंड करून बघतोस होय??

बाबू फटके खातच होता. ते फटके आपल्याला बसू नयेत म्हणून बाकीचे धावत पुन्हा हॉलमध्ये आले. खिडकीतून पाहात राहिले. जवळपास पाच एक मिनिटांनी लंगडत खुरडत बाभी कसाबसा हॉलमध्ये आला. सगळे तरीही तिथेच उभे होते. श्वास रोखून! सगळ्यांची हृदये अक्षरशः थांबायची वेळ आलेली होती.

आणि दहा ते बारा मिनिटातंच मेटॅडोर आणि ४०७ तिथून हालताना दिसल्या आणि त्याच क्षणी मागून आवाजही आला राजासाबचा!

"अय.. चला.. चला बरॅकमध्ये.. जेवण बिवण झालं आता.. दोन घास गोडाचे मिळाले म्हणजे रिहा नाही झाले तुम्ही... चल्ल???"

राजासाबचा फटका बसू नये म्हणून लगबगीने तिथून हालतानाही सगळ्यांचेच लक्ष ४०७ कडे होते. ४०७ गेटपाशी पोचला तेव्हा मात्र यांना डोळे काढावेच लागले त्यावरून!

आणि एकमेकांचे घामेजलेले, घामाने अक्षरशः थ्बथबलेले पंजे हातात घेऊन सगळे निर्जीव झाल्याप्रमाणे कसेबसे चालत बरॅककडे आले. बाबू एकटाच विव्हळत होता, बाकीचे सगळे जणू निर्जीव!

बरॅकला लॉक लावतानाही हवालदाराने लक्ष दिले नाही. लॉक लावले तेव्हा ४०७ गेटपाशी पोचून नक्कीच तीन चार मिनिटे झालेली असावीत.

लॉक लावून हवालदार निघून गेला आणि बाबूच्या विव्हळण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून गज हातात घट्ट धरून वाघ, मुल्ला आणि आकाश दाराच्या दिशेने पाहात होते. अर्थात, आता दारच काय पण मगाचचा हॉलही दिसणे शक्य नव्हते. पण काह गडबड उडतीय का याकडे त्यांचे लक्ष होते.

आणि जवळपास पंधरा मिनिटे झाली तरी काहीच गडबड होईना तसा वाघ हादरलेल्या चेहर्‍याने मुल्लाकडे पाहात म्हणाला..

"छुटगया लगता है.. भोसडीका..."

बाबूला पहिल्यांदाच जाणवले. आपल्या विव्हळण्याकडे कुणाचे लक्षच नाहीये. त्याने मान वर करून वाघला विचारले...

"कौन ??? "

"............... नसीम..."

ताना हवालदाराचे लक्ष नसताना नसीम ४०७ च्या बॉटमला चिकटून ....

.... येरवडा कारागृहातून पलायन करू शकणारा.. एकमेव फाशीचा कैदी ठरलेला होता..

==============================================

'** फाटणे' या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेत होते चौघे!

प्रत्यक्ष!

कारण आता एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता. नसीम बरॅकमध्ये नाही याची बोंब तर आपणच मारायला पाहिजे. नाहीतर असे समजले जाईल की आपणच त्याला सुटायला मदत केली. आणि ही बोंब तर हवालदाराना बरॅकला लॉक लावले तेव्हाच मारायला पाहिजे होती. नसीम स्वतः सुटला तो सुटला, पण आपली गोची करून गेला.

आधी मुळात चौघांचा त्या घटनेवर विश्वासच बसू शकत नव्हता. चर्चचे ट्रक्स म्हणून चेकिंग झालेले नसेलही कदाचित, पण इतकी ढिसाळ व्यवस्था? की कुणी अगदी सहज खाली वाकून पाहिलेही नाही?

असं झालं कस??

नसीम सुटला????

कोण सुटला तर नसीम?? म्हणजे जो काही आठवड्यात लटकून मरणार होता तो सुटला.. आणि आपण इकडे प्लॅनवर प्लॅन बनवतोय तर आपण असेच!

विचित्र प्रकार झाला बरॅकमध्ये!

या सगळ्यात आकाशचाच दोष आहे असे गृहीत धरले सगळ्यांनी! दोष काय तर क्वीन मेरी चर्च याचा अर्थ एम क्यू असा नव्हताच तरीही तो त्याने गृहीत धरायला लावला!

वाघने उठून आकाशला धरून उभे केले. नसीम सुटल्याचा आनंद मानावा की आपले आता काही खरे नाही याचे दु:ख मानावे याच विचारात चौघे होते. मुळात नसीम सुटला आहे की पकडून त्याला पुन्हा चेंबरमध्ये नेले आहे आणि म्हणूनच बरॅकला लॉक लावताना हवालदाराला काहीही डाऊट आला नाही हेही समजत नव्हते. आणि अशातच 'आज कोणतीच संधी नसताना उगाचच आजची आशा दाखवली' याबाबत आकाशचा सगळ्यांना राग आलेला होता.

वाघने आकाशला धरून त्याच्या पोटात गुद्दा घातला. आत्ताच झालेले जेवण बाहेर पडते की काय असे आकाशला वाटले. त्यातच मुल्लाने एक लाथ घातली कंबरेत! एका भिंतीवर जोरात आपटून खाली पडला आकाश! बाबूला आत्ताच ताजा ताजा मार बसल्यामुळे त्याला आकाशला मारण्याची हिंमत जमा करता येत नव्हती. मात्र वाघ आणि मुल्लाने आकाशला आठ आठ, दहा दहा फटके लावलेच! आकाशच्या तोंडातून आवाजही येत नव्हता.

शेवटी राग शांत झाल्यावर दोघे खाली बसले आणि जवळपास दहा मिनिटांनी आकाश म्हणाला..

आकाश - ***** मला का मारलंत??

वाघ - क्वीन मेरी चर्च म्हणजे एम क्यू काय रे? आ??

आकाश - अक्कलशुन्य माणसा.. आधी नसीम बरॅकमध्ये नाही याची बोंब मार! नाहीतर सगळेच मार खाऊ!

वाघ - गप्प बस! नसीमला निदान बाहेर जाऊन अर्धा तास तरी होऊदेत! नाहीतर चर्चच्या गाडीतच त्याला पकडतील.

आकाश - मूर्खा.. त्याला पकडले काय आणि नाही काय! पकडले तरीही तो फाशीच जाणार आहे.. पण आपण बोंब मारली नाही ताबडतोब तर आपल्याला गुरासारखे मारतील..

तिघांनी एकमेकांकडे पाहिले. नसीमच्या ऐवजी आपल्याला का सुचले नाही असे सुटायला याचे वैषम्य मनात होतेच, त्यात आता नसीमबाबत 'वेळेवारी' बोंब मारली नाही याचा मार खायला लागणे शक्य होते. आता अचानक एकदम बोंब मारणेही योग्य नव्हते. आता आधी चौकशी करायला हवी होती कुणाकडेतरी की 'नसीमला काय आजपासून फाशीच्या बरॅकमध्ये नेला की काय' वगैरे!

खूप लांबवर दिसत असलेल्या एका हवालदाराला पाहून मुल्लाने मोठा आवाज करून हाका मारायला सुरुवात केली. असे आवाज याचा अर्थ बरॅकमधील इतरांना समजायचे की काहीतरी भयंकर चाललेले असावे. त्यामुळे आपोआपच इतर बरॅकमधील कैदीही ओरडू लागले. हवालदार धावत पोचायला जे काही अर्धे मिनीट लागले तेवढेच!

"काय झालं??"

"साहब.. नसीमको फासीके बरॅकमे रख्खा है क्या??"

"कौन नसीम??"

"यहा होता है वो.."

"तुम कितने लोग हो??"

"पाच..."

"अभी तो चारही हो???"

"वही तो.. वो फासीवाला था.. उसको उधर ले गये क्या ये पूछना था..."

"मेरेसे सवाल करनेवाला तू कौन बे?? आ?? मेरा बॉस है क्या??"

"नही नही... मतलब उसको वही ले गये है या कुछ गडबड हुई ये समझा नही इसलिये पूछा..."

"कैसी गडबड... कोई गडबड करेगा तो ये घुसेडदुंगा.. चल्ल अंदर बैठ.. फोकट चिल्लाते है स्साले.."

हवालदाराची ट्यूबच पेटली नाही. हे एक बरे झाले. आता कुणीही विचारले की नसीमची बोंब का नाही मारली तर या हवालदाराचे नांव सांगून सांगता येणार होते की याला आम्ही सांगीतले होते म्हणून! तोही नाही म्हणू शकला नसता कारण एका बरॅकमधील कैद्यांनी हे संवाद नीट ऐकलेले होते. या चौघांनी तर आपले काम केलेले होते, उलट ते काम करताना 'मला प्रश्न विचारतोस काय' अशी दरडावणीही हवालदाराने दिलेली असल्यामुळे हवालदाराचीच चंपी होणार होती.

आता मात्र सगळेच सुन्न होऊन बसले. अगदी बाबू आणि आकाशही! कारण एकच!

नसीम! मगाचच्या क्षणापर्यंत आपल्यात असलेला नसीम चक्क सुटला होता. आणि कुणालाही ते समजून घेण्याची शुद्धही नव्हती. हे असे सुटता येते?? मग आपणच का नाही सुटलो?? नसीम सुटला??

मनाव परिणाम व्हायची वेळ आली होती. मुल्लाने त्याच्या स्वभावाप्रमाणे सुरुवातीला भिंतीवर हात आपटून 'नसीम सुटला व येथून सुटणे शक्यही आहे' या बाबीचा आनंद व्यक्त केला. तसे करताना तो ओरडतही होता. मात्र त्याच क्षणी त्याला त्या कल्पनेतला फोलपणा जाणवला कारण संध्याकाळी आंघोळीनंतर जी हजेरी घेतली जाते त्यात नसीम नसल्याचे कळल्यावर सुरक्षा व्यवस्था तर टाईट होणारच होती पण या चौघांचे हाल होणार होते. तसा मात्र मुल्ला भेसूर रडू लागला. बाबू त्याला गप्प करायचा प्रयत्न करत होता तर वाघ हिंस्त्र नजरेने आकाशकडे पाहून शिव्या देऊ लागला होता. 'एक सुटला आणि आपण तसेच' या दोहोंच्या आनंदाचे आणि दु:खाचे मिश्रण त्या वागणूकीमध्ये होते.

आत्ताच येऊन गेलेल्या हवालदाराला 'हे चौघे आपली खेचतायत' असे वाटले असल्यामुळे मरण टळलेले होते.

आणि त्या दिवशी संध्याकाळचे खेळ झाल्यानंतर असलेली आंघोळच रद्द झाली. कारण सकाळी आंघोळ झालेली होती. कैदी असंतोष माजवू लागले तश्या त्यांना काठ्या बसू लागल्या. पण या गोंधळात हजेरीच झाली नाही.

हे चौघे आता मात्र हातघाईवर आले. नसीम बरॅकमध्ये नाही हे सांगणे आपले आद्य कर्तव्य आहे हे त्यांना जाणवू लागले.

ते सरळ ऑफीसकडे चालत जाऊ लागले. हटकले गेल्यावर वाघ म्हणाला..

"साब.. हमारे बरॅकमे एक प्रिझनर था जो दोपहरसे नही है.. घोडके हवालदारसाहबको हमने बताया मगर वो ध्यान नही दे रहे है.. हमे समझमे नही आ रहा है के वो प्रिझनर गया किधर????"

या थेट प्रश्नावर मात्र गांभीर्य पसरलेच!

ताबडतोब शोधाशोध सुरू झाली. कामे वाटून घेण्यात आली. तीन हवालदार बरॅक्स तपासू लागले. सहा हवालदार सक्तमजूरीचा प्लॉट आणि खेळण्याचे मैदान! चार हवालदार गेट आणि क्वार्टर्स! आत्तापर्यंत राजासाब आणि नवलेला बातमी लागली.

राजासाब थेट जेलमध्येच आला. या चौघांच्या बरॅकपाशी तिन्हीसांजेच्या मंदावणार्‍या प्रकाशात त्याच्या प्रचंड देहाची सावली जशी पडली तसे चौघेही हडबडून उठले. एका हवालदाराने बरॅक ओपन करताच शिव्यांची बरसात करत बरॅकमध्येच राजासाबने चौघांची हालत करायला सुरुवात केली. पाचच मिनिटात त्याला अमूल्य माह्ती मिळाली. घोडके हवालदाराला यांनी हा प्रकार झाल्याझाल्याच सांगितलेला होता. राजासाबने ताबडतोब घोडकेला सस्पेन्ड करण्याचे फर्मान काढले. या चौघांना बदडतच बरॅकच्या बाहेर काढून चौकशीसाठी असलेल्या एका खोलीकडे न्यायला सुरुवात केली. त्यातच...

.. त्यातच खराखुरा हैवान तेथे उपटला. नवले! खुद्द नवलेच आला! जेलमध्ये! राजासाबच्या सॅल्यूटकडे संपूर्ण दुर्लक्ष करत त्याने पहिल्यांदा चौघांना केनचा प्रसाद दिला. पाठोपाठ पठाणने एकेकाला चेंबरकडे न्यायला सुरुवात केली.

ओरडत, बोंबलत चौघे चेंबरच्या दिशेने जात होते. आज आपली काही खैर नाही हे वाघ आणि बाबूला समजून चुकलेले होते तर मुल्ला अभद्र सुरात रडत होता. आणि आकाशला हे माहीतच नव्हते की ही वाट चेंबरची आहे.

तोवर नवलेच्या ऑफीसमधून अनेक फोन गेले होते शासकीय अधिकार्‍यांना! नसीम जेलबाहेर गेल्याचे! अनेक फोन येऊही लागले होते. नवलेचाही बॉस असलेला मालपुरे स्वतःच जीप चालवत दैत्यासारखा जेलमध्ये येऊन उभा ठाकलेला होता. आता नवलेकडे दुय्यम भूमिका आलेली होती. मालपुरेचा चेहरा पाहूनच स्टाफच्या उरात धडकी भरलेली होती. नवलेही चळचळा कापू लागला होता.

इकडे राजासाबने नसीमचा फोटो फॅक्स करून किमान बत्तीस ठिकाणी कळवलेले होते की असा असा माणूस दिसताक्षणी एक तर झडप घाला किंवा सरळ गोळ्या घाला. एन्काउन्टरवर ऑब्जेक्शन घेणार्‍यांच्या आईची जय! पुढचे पुढे पाहू!

हा आदेश राजासाबने कुणालाही न विचारता दिलेला होता. मात्र मालपुरेने या आदेशावर व्हर्बल अ‍ॅप्रूव्हल दिले. पहिल्यांदा मालपुरेने काय केले असेल तर अख्ख्या स्टाफसमोर राजासाब आणि नवले या दोघांना अक्षरशः सोलून काढले. तोवर ड्युटी संपवून घरी गेलेला घोडके हवालदार चळाचळा कापत ऑफीसमध्ये दाखल झाला होता. त्याच्यापाठोपाठ बातमी लीक झाल्याने दोन रिपोर्टर्सही आले. त्यांना पाहून तर मालपुरेने शिव्यांची बरसातच केली. ते घाबरून गेटबाहेर जाऊन थांबले. इकडे घोडकेचा राजीनामा लिहून घेतला. पाठोपाठ बरॅकमधील चौघांना जीवघेणी मारहाण सुरू झाली. नसीम नेमका कसा पळाला हे विचारण्यासाठी! सर्वात कच्चा कैदी होता आकाश! तो काही मिनिटातच सत्य कथन करणार हे बाकीच्या तिघांनाही जाणवलेले होते.

स्टाफपैकी कुणीतरी मेरी क्वीन चर्चचा उल्लेख करताच मालपुरेने तीन हवालदार चर्चमध्ये धाडले. बंडगार्डन पोलिस चौकीवरचा यच्चयावत स्टाफ आता जेलमधून निघणार्‍या रस्त्याला पुढे जितके फाटे फुटत होते त्या प्रत्येक फाट्यावर डोळ्यात तेल घालून हिंडू लागला होता. इतक्यात मालपुरेला आमदाराचा फोन आला. आमदाराने मालपुरेच्या सात पिढ्यांचा उद्धार केला फोनवर! मालपुरेनेच फोन कट केला. मालपुरे आता तो राग स्टाफवर काढू लागला.

सगळीकडचे रिपोर्ट्स निल येऊ लागले. असा माणूसच पाहिलेला नाही असे प्रत्येक रिपोर्ट सांगू लागला. मालपुरेने नवलेकडे रिटन एक्सप्लनेशन मागीतले. नवलेने कागद लिहायलाही घेतला चरफडत! तोवर चर्चचा रिपोर्ट आला की एकाही डब्यात किंवा गाडीत कुणीही नसावे कारण डबे सगळे चेक केलेले होते व गाडीत कुणी असते तर ते समजलेच असते गेटवर!

हे होईपर्यंत जेलचा कोपरा अन कोपरा चेक करणार्‍या ग्रूपकडून इन्टरनल रिपोर्ट आला की जेलमध्ये तरी कुणीही कैदी लपलेला नाही.

सगळेच रिपोर्ट्स निल येत आहेत म्हंटल्यावर मालपुरे अधिकच चवताळला. त्याच्या हालचालींमधील आक्रमकता आता इतकी वाढली की स्टाफलाही मार खावा लागतो की काय असे वाटू लागले. त्यातच दोन स्थानिक नेते शहाणपणा करण्यासाठी आत आले आणि येताना त्यांनी बाहेर थांबलेल्या पत्रकारांनाही सोबत आणले. मालपुरेला ते कोण आहेत हे कळल्यावर त्याने आधी सौम्य भाषेत त्यांना जायची विनंती केली व 'आम्हाला आमचे काम करू द्यात' असेही सांगीतले. त्यावर त्यातील एक मद्दड परंतु उर्मट पुढारी काहीतरी बरळताच मालपुरेने अक्षरशः सर्वांदेखत त्याच्या थोबाडात भडकावून दिली. काय झाले हेच त्या माणसाला समजले नाही. तोवर मालपुरेने त्या दोघांना ढकलत कुणालातरी सांगितले की यांनाही संशयीत आरोपी म्हणून आत घ्या. आता उलटीच परिस्थिती उद्भवली. ते आले होते शहाणपणा करायला, आता माफी मागू लागले. आणि बाहेर सटकू लागले. रागरंग पाहून नवलेनेही एक दिली थोबाडात त्याच्या! ते दोघे बाहेर पळू लागले तसे चार हवालदारांनी त्यांना धरून आत आणले आणि स्थानबद्ध केले. ते सश्याप्रमाणे बिचकून बघत बसले सगळा प्रकार!

इकडे मालपुरेने स्टेटमेन्ट तयार करून घेतले आणि सह्या घेतल्या. स्वतःही सही केली.

एक फाशीचा कैदी फरार झाला आहे व त्याचा शोध चालू आहे तसेच तो कसा फरार झाला असावा यावरही प्रयत्न होत आहेत व फार तर ४८ तासात तो पुन्हा पकडला जाईल असे स्टेटमेन्ट करून त्याने ते स्वतःच्या बॉसला फॅक्स केले.

या सगळ्या भानगडीत बंडगार्डन चौकीवाल्यांनी चार आरोपी पकडून आणले. त्यातला एकही नसीम नाही हे नवलेने सांगितले. त्याचबरोबर त्यांना नसीमबाबत काही माहीतीही नव्हती हेही लक्षात आले. वैतागलेल्या मालपुरेने त्यांना दिले परत पाठवून!

विमानतळापासून रिपोर्ट आला. संशयीतरीत्या फिरत असलेल्या दोघांना पकडले आहे पण ते कुणीच नाहीत असे समजल्यामुळे सोडून दिलेले आहे. रेल्वे स्टेशन आणि बसस्टॅन्डचेही रिपोर्ट्स फालतूच निघाले.

मालपुरे आता स्वतः जेल शोधायला बाहेर पडला. सगळे दिवे लावण्यात आले. बरॅकमधून कर्कश्श किंकाळ्या ऐकू येत होत्या. मालपुरे बिबळ्याप्रमाने तर नवले चित्याप्रमाणे जेल तपासत चाललेले होते. तेवढ्यात ताना हवालदार उपटला आणि त्याने दुपारी जेवणानंतर बाबूबरोबर झालेला संवाद सांगितला. मालपुरेने पहिल्यांदा काय केले असेल तर तानाच्या कानाखाली वाजवली. पाठोपाठ चर्चमध्ये पुन्हा स्टाफ धाडला. त्यांचा रिपोर्ट आला की ४०७ भाड्याचा होता. ४०७ वाल्याला जेलमध्ये धरून आणले तेव्हा रात्रीचे नऊ वाजलेले होते. आमदारांचा पुन्हा फोन आला तो मालपुरेने घेतलाच नाही. स्थानिक नेत्यांना मात्र सूज्ञपणा करून सोडून दिले. आणखी एक नवीनच प्रकरण उद्भवायला नको होते त्याला!

४०७ वाल्याला अर्थातच काहीही माहीत नव्हते. मात्र चर्चमधून ट्रक खाली केल्यावर तो कुहे कुठे गेला याची साद्यंत हकीगत त्याने दिली. स्टाफ तिकडे सगळीकडे धावला.

आणि रात्री साडे दहाला पहिलावहिला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.

'या वर्णनाचा एक माणूस रिक्षेत बसून घाईघाईने चंदननगरकडे जाताना दिसला'

झालं! अक्षरशः व्हॅनमधून २० स्टाफ पाठवून मालपुरे स्वतः जीपमध्ये बसला व शेजारी नवले आणि मागे राजासाबला घेतले. चंदननगर अक्षरशः घुसळून काढत होते सगळे जण रात्री सव्वा बारापर्यंत!

आणि भलतेच घडले.

साडे बाराला जेलमधूनच मालपुरेच्या सेलफोनवर कॉल आला...

"सर... तो नसीम स्वत:च परत आलाय..."

आजवर कधी वाटले नसेल असे आश्चर्य वाटून गॅन्ग जेलमध्ये परत आली तेव्हा चेंबरमध्ये मार खाऊन लोळागोळा होऊन पडलेले बाबू, वाघ, मुल्ला आणि आकाश कसेबसे विव्हळत होते तर नसीम आता मार खात होता.

आकाश काहीतरी बोलणार हे समजल्यावर पटकन वाघने स्वतःच सांगितले होते की एखादवेळेस तो चर्चच्या अन्नाच्या डब्यांमधून गेला असावा कारण तो तिथे बराच वेळ काम करत होता. हे सांगितल्यामुळे मारहाण काहीशी थंडावली व आकाशलाही समजले की सत्य सांगायचे नाही आहे.

आता त्यांना होत असलेल्या मारहाणीत फारसा दम नव्हता कारण जेलच्या बाहेर नसीमला शोधणे ही आधीची प्रायॉरिटी ठरलेली होती. दोन अडीच तास ते चौघे कसेबसे तिथेच लटकलेले होते. मात्र नसीम मिळाला, मिळाला म्हणण्यापेक्षा स्वतःच जेलमध्ये आला हे समजल्यावर यांची सुटका झाली आणि त्या जागी आता नसीम लटकला.

आणि जेलमध्ये पुन्हा आल्यानंतर मालपुरेने स्वतःच्या हातांनी आणि पायांनी नसीमला तुडवले. केनही वापरली नाही. नसीमच्या किंकाळ्या जेलच्या भिंतींना तडे पाडून जात होत्या. स्टाफ मालपुरेच्या त्या रौद्र स्वरुपाकडे अवाक होऊन पाहात होता. हे चार लोळागोळा झालेले कैदी तर रडूच लागलेले होते. आकाशला तर ते दृष्य सहनही होत नव्हते. नसीम तसाच लटकलेल्या अवस्थेतच बेशुद्ध पडला. नाहीतरी फाशीचाच कैदी होता तो, मेला तरी काय? पण तसे नाही, फाशीच्या कैद्याला फाशीच द्यावी लागते. त्यामुळे बेशुद्ध झाल्यावर त्याला शुद्धीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.

तोवर मालपुरेने सर्वत्र फोन करून कैदी सापडल्याचे सांगितले. नवीन स्टेटमेन्ट्स तयार केली.

आणि इकडे नसीमने डिपार्टमेन्टला कसेबसे सांगितले.

"मै डिब्बेमेही बैठकर बाहर निकला साब... लेकिन जिधर जायेगा उधर मेरा ये कैदीका ड्रेस बीचमे आ रहा था.. फिर मैने कपडेही निकालकर फेक दिये.. लेकिन नंगा किधर घुमता?? फिर एक घरसे कपडे चोरी किये और भागने लगा.. उधर किसीने देखा था.. वो पीछा करने लगे... तो ऑटोमे बैठके भागा.. लेकिन किधर भागता?? अंधेरा होनेतक छिपगया.. लेकिन किसीना किसीको दिखही रहा था मै.. कुछ खाया नही.. पानीभी नही पिया.. फिर रात होगयी.. रास्तेपरसे पुलीस भटकरहेली थी.. हालत खराब होगयी थी मेरी.. मैने सोचा.. ऐसा मै कितना भटकेगा?? नही छुटसकता मै.. इसलिये... इसलिये खुद वापस आ गया साहब... मारो मत... मुझे जल्दसे जल्द फासी देदो... मरजाना चाहता हूं मै..."

दोन दिवस!

दोन दिवसांनी सगळ्यांची प्रकृती जराशी बरी झाल्यानंतर सगळे पुन्हा एकाच बरॅकमध्ये जमा झालेले होते. काय बोलावे हेच कुणाला कळत नव्हते. नसीमकडे तर पाहावतही नव्हते. कारण त्याला तीनच दिवसांनी फाशीच्या बरॅकमध्ये हालवून सातव्या दिवशी फाशी देऊन टाकणार होते. खास परवानगी काढून त्याची शिक्षा प्रिपोन करण्यात आलेली होती.

पाच जणांपैकी एकालाही काम करणे अजूनही शक्य नव्हते. सगळे फक्त नाश्ता आणि जेवणापुरतेच बाहेर पडू शकत होते. जेलमधली सुरक्षा व्यवस्था कमालीची वाढलेली होती. नसीम आणि या बरॅकवर डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जात होते.

आणि त्या रात्री कुजबुजतच मुल्ला नसीमला म्हणाला..

"च्युतिये.. मरनाही था तो बाहरही खुदखुषी करलेता.. वापस कायको आया तू??? "

नसीमच्या चेहर्‍याकडे पाहताना मात्र सगळेच नखशिखांत हादरले होते. कारण बाहेरील बल्बच्या अंधुक प्रकाशात ते नक्कीच जाणवत होते. की नसीम..

.... नसीम चक्क हासत होता... चक्क हासत...

"हसरहा है तू????????"

मुल्लाच्या या कुजबुजत्या प्रश्नावर तर नसीम तोंडभरून हासला....

"च्युतिया तो तू है मुल्ला.. मै मरनेवाला नही हूं... "

"....................मतलब???"

"एम क्यू... एम क्यू का मतलब है... मॅक्डोवेल क्वार्टर...."

बाबू तर ताडकन उभाच राहिला! हे याला कसे समजले???

बाकीचे नुसतेच हादरून पाहात असताना बाबूने विचारले..

"तेरेको कैसे मालूम बे??"

"जब तेरे पास मॅक्डोवेलकी क्वार्टर आयेगी... तो ठीकसे खोलना वो बोतल.. उसीमे चिठ्ठी रहेंगी.. "

"मतलब??? .. "

"मै तो वैसेभी छुटगयेला था... लेकिन सोचा.. तुम सब लोग अपनेही दोस्त हो... और इतना अच्छा प्लॅनभी है.. तो फिर अंदर जानेमे हर्जही क्या???"

"कौनसा प्लॅन????? ... किसका प्लॅन???"

"मिनीका... तेरी बिवीका..."

".... क्या मतलब????"

नसीमचे उत्तर ऐकून आनंदाने नाचावे की ओरडावे हे कळेना कुणाला...

"मै मिनीसे मिलके आया है बाबू...."

गुलमोहर: 

क्या बात है ..... आकाश तो आकाश अब नसीम भी ..... मजा येतेय, आता मात्र पुढच्या भागाची उत्सुकता लागलीय...

लवकर येऊ देत पुढचा भाग Happy

खरच कमाल वाटली नसीमची.....छान झाला हा भाग, आता पुढ्च्या भागाची उत्सुकता लागलीय.....

आणि माझ्या फक्त एकटीच्या सुचनेनुसार 'स्टार' चा वापर केलात, खरच आभारी आहे...
कारण एका वाचकाच्या सुचनेला ग्रुहीत धरुन तसे बदल करणारे लेखक फारच कमी असतील, त्यापैकी तुम्ही एक आहात. धन्यवाद......