श्रीगणेशजयंतीनिमित्त- 'वातापिगणपतिं भजेSहम्

Submitted by चैतन्य दीक्षित on 6 February, 2011 - 21:17

हंसध्वनी- एक प्रसन्न असा 'ओडव-ओडव' राग. (ओडव-ओडव म्हणजे ज्याच्या आरोहात आणि अवरोहात प्रत्येकी पाच स्वर येतात असा राग) अतिशय साधा, पण तितकाच प्रसन्न राग- हंसध्वनी!

हंसध्वनी हा 'बिलावल' थाटातला राग. बिलावल थाट म्हणजे सगळे स्वर शुद्ध.
असं म्हणतात, की बिलावल गात चालणार्‍या त्यागराजाचा पाय एका प्रेताला लागला, आणि ते प्रेत जिवंत झाले. (त्यागराज- कर्नाटक शास्त्रीय संगीताचा आधारस्तंभ.) ह्यावरून बिलावल (कर्नाटक पद्धतीतले बिलावलचे नाव 'बिलहरी') रागाला 'संजीवन राग' असे नाव पडले. त्याच संजीवन रागाच्या पठडीतला, आणि खरोखरच संजीवनीप्रमाणे असलेला हा राग- हंसध्वनी.

ह्या रागाची रचना मुथुस्वामी दीक्षितार् (खरे तर 'दीक्षित' एवढेच नाव, पण तमिळ पद्धतीनुसार दीक्षितार्) ह्यांचे वडील 'रामस्वामी दीक्षितार्' यांनी केली असे म्हणतात. पण रामस्वामीनी, हंसध्वनी रागात गणेशाचे स्तवन करणारी एकही रचना केली नाही. ती कसर मुथुस्वामी दीक्षितार् ह्यांनी भरून काढली ती त्यांच्या 'वातापि गणपतिं भजेSहम्' ह्या रचनेने. ही अजरामर रचना कर्नाटक शास्त्रीय संगीतातच नव्हे, तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातही तितकीच लोकप्रिय आहे. ह्याच रचनेच्या शेवटच्या ओळीत 'हरादिगुरुगुहतोषितबिम्बम्, हंसध्वनिभूषितहेरम्बम्' असे शब्द आल्यामुळे हंसध्वनी हा गणेशाचा आवडता राग ठरला. अर्थात् हंसध्वनी रागाच्या अतिशय प्रसन्न चलनामुळे, मोददात्या गणेशाला आवडणारा राग म्हणजे हंसध्वनी हे तर्कशुद्धही आहेच.

'वातापि गणपतिं' ही रचना इतकी सिद्ध आणि प्रसिद्ध आहे, की ह्याच रचनेवर आधारित हिंदी आणि मराठी रचनाही तशाच प्रसिद्ध झाल्या. हिंदी: 'जा तोसे मै ना बोलू कन्हैय्या' आणि मराठी: 'दाता तू गणपती गजानन'.

ही रचना 'सिद्ध' आहे, ती त्यातल्या संस्कृतामुळे. प्रत्येक शब्द अगदी पैलू पाडलेल्या हिर्‍यासारखा मौल्यवान्! ह्यातल्या सुरुवातीच्या 'वातापिगणपति' ह्या शब्दाचा थोडक्यात इतिहास असा-

चालुक्यांचा पराभव करणार्‍या 'सिरुतोंदर' (ह्याचे मूळ नाव 'परंज्योती' असे होते असे म्हणतात) ह्या पल्लवांच्या प्रधान-अमात्याने वातापि (आत्ताचे बदामी) इथून गणेशाची मूर्ती 'थिरुवरुर' इथे नेली.
वातापीहून आणलेला म्हणून 'वातापिगणपती' असे त्या मूर्तीचे नाव पडले. मुथुस्वामी दीक्षित हेही थिरुवरुरचेच. थिरुवरुर इथे असलेल्या बर्‍याच देवळातील मुख्य देव आणि परिवारदेवतांवर मुथुस्वामींनी अनेक रागांमध्ये संस्कृत रचना लिहिल्या. त्यातलीच ही 'वातापिगणपतिं भजेSहम् '.
आणि रचना केवळ गणेशाचे स्तवन करणारी आहे असे नाही तर 'वातापी' चा इतिहासही सांगणारी आहे. असे म्हणतात की अगस्ति ऋषींनी वातापी नगरीत गणेशाची आराधना केली होती. ही गोष्ट 'पुरा कुम्भसम्भवमुनिवर-प्रपूजितम्' ह्या शब्दातून सांगितली आहे. त्यातही अगस्ति ऋषींसाठी वापरलेला 'कुम्भसम्भव' हा शब्द किंवा आदितालात चपखलपणे बसणारा 'निजवामकरविधृतेक्षुदण्डम्' ह्या सारखे शब्द मुथुस्वामींच्या संस्कृतपांडित्याचा आणि पुराणादींविषयीच्या ज्ञानाचा पुरावा देतात. बरं, केवळ संस्कृतदृष्ट्या ही रचना महान आहे असं नाही. रागदॄष्ट्य़ा 'हंसध्वनी' रागाचे सारच ह्या रचनेत आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 'वीतरागिणं विनतयोगिनम, विश्वकारणं विघ्नवारणं' किंवा 'कराम्बुजपाशबीजापूरं कलुषविदूरं भूताकारं' ह्यातले स्वरांचे खटके काय, किंवा 'मूलाधारक्षेत्रस्थितं' हा एकच शब्द आदितालात बसताना येणारी स्वररचना काय सगळंच सिद्धहस्त!

ही रचना गाणारा कुणीही गायक, वातापिगणपतीला आणि मुथुस्वामींनाही मनातल्या मनात 'साष्टांग' नमस्कार घातल्याशिवाय गात नसेल हे नक्की. हंसध्वनीने भूषित असा हेरम्ब आपल्या सगळ्यांचे पालन करो आणि हंसध्वनी रागाप्रमाणेच प्रसन्नवदनाने आशीर्वाद देऊन आपणा सर्वांनाही प्रसन्न करो आणि कायम प्रसन्न ठेवो हीच वातापिगणपतीच्या चरणी प्रार्थना!

- चैतन्य

गुलमोहर: 

धन्स मन-कवडा,
इथे अस्मादिकांनी बासरीवर वाजवलेली ही कृती ऐकता येईल.

पुनश्च धन्यवाद!

-चैतन्य

सुंदर ओळख. गेली जवळजवळ ३५ वर्षे हि रचना ऐकतोय. याच रागातल्या, लागी लगन पति के संग, बलमा न जा घर सौतनके पण खूप आवडतात. हल्ली नवीन रचना काही कानावर पडत नाहीत.
नाट्यसंगीतात पण कुठे ऐकल्याचे आठवत नाही हा राग.

चैतन्य,

हंसध्वनीसारखाच कर्नाटकी संगीतातून हिंदूस्तानी संगीतात विराजमान झालेला 'चारूकेशी' आहे त्याच्याबद्दल लिही एकदा विस्ताराने...

"बनरा बनी आयोरी बनरी को ब्याहन्न" ही द्रुत बंदीश खास आहे त्यातली...आपण भेटलो की मी ऐकवेन Happy

सर्वांचे मनापासून आभार.

@दिनेशदा- स्वप्नील बांदोडकरने गायलेलं- तव तेज या तिमिरात दे आता, नवचेतना विश्वास दे आता- हे बहुतेक हंसध्वनीत आहे. (नक्की नाही माहिती, पण किमान सुरुवात तरी तशी वाटते.)
नाट्यसंगीतात- झाले युवतिमना दारुण रण- हे हंसध्वनीतच आहे.
- जयो(अवग्रह्)स्तुते चा मुखडाही हंसध्वनीतच आहे.
हृदयनाथांनी संगीत दिलेलं- करम की गति न्यारी- हेही हंसध्वनीत आहे.
लै जा रे बदरा संदेसवा- ऐकलंय का तुम्ही? तेही छान आहे.
माझा सगळ्यात आवडता राग आहे हा Happy

@विजय,
चारुकेशीबद्दल ऐकून होतो, पण जास्त माहिती नाही.
हंसध्वनी मी शिकलो तेव्हा गुरुजींकडून मुथुस्वामींबद्दल थोडी माहिती मिळाली ती आणि इंटरनेटवरची माहिती या आधारे हा लेख लिहिला.
चारुकेशी या नावातच आमची विकेट उडते हो Happy (सुंदर केस असलेली- बहुदा रागिणी असावी ही)
-हे सुरांनो चंद्र व्हा हे चारुकेशीतच आहे ना?

-चैतन्य.

अरे वा, स्वप्नीलचे सोडले तर सगळी ऐकली होती कि.
संतो करम कि गती न्यारी
बडे बडे नयन दिये मिरगन को
बन बन फिरत बिखारी (?)

और नदी की जल निर्मल की
समुंदर कर दिनी खारी

उज्वल वरन दि बगलन को
कोयल कर दिनी काली

राज दियत हो तूम मूरख को
पंडीत बने भिखारी..

याचेच मराठी रुपांतर रामदास कामत यांनी गायले आहे. ते पण कदाचित याच रागात असेल. (जीवन गति हि न्यारी )
थोडेसे विषयांतर, स्व इंदिरा गांधी गेल्यावर, स्व शोभा गुर्टु यांनी हि रचना दूरदर्शनवर गायली होती. त्यांनी जाणूनबूजून "राज दियत हो.." या ओळी गायचे टाळले होते.

चैतन्य,

'हे सुरांनो' नसावे चारूकेशीत Happy

काही हिंदी गाणी
१. आज दिल पे कोई जोर चलता नही - मिलन
२. छोड दे सारी दुनिया किसी के लिये - सरस्वतीचंद्र
३. बैया ना धरो - दस्तक
४. मेघा रे मेघा रे - प्यासा सावन

इ.इ.

सुरेख लेख मित्रा !!

(बडे बडे नयन दिये मिरगन को
बन बन फिरत बिखारी >>> हे " बिखारी" नसावे ...उं घारी असे असावे कदाचित ..( म्हणजे मृगाला जो की जमिनीवर चालतो त्या ला मोठ्ठे डोळे दिलेस अन घार जी की आकाशात उडते तिला छोटे डोळे दिलेस अन ती बन बन भटकत आहे ...) )

@ चिन्नु, स्वाती,
धन्यवाद.
@दिनेशदा,
"करम की गति न्यारी"बद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद.
@विजय,
मला नक्की माहिती नाही- पण सत्यशील देशपांडेंची मध्यलय त्रितालातली चारुकेशीतली एक चीज ऐकताना कायम हे सुरांनो (अक्खं गाणं नाही पण गाण्याचा काही भाग) त्याचा भास होतो.
किमान चांदण्यांचे कोश माझ्या- या ओळीत तर होतोच होतो..

येस्स्स्..पंत यू आर राइट.
बन बन फिरतऊ घारी (असंच मलाही ऐकू येतं ते कडवं)
त्या गाण्यातलं जलतरंग पण किती छान आहे ना?

छान

क्या बात है चैतन्यजी......
कालच तू बासरीवर वाजवलेला हंसध्वनी ऐकला - अप्रतिमच रे.... केवळ फिदा....
तिथेच (तू नळी) आसपास पं हरिजींनी वाजवलेला हंसध्वनी पण..... खल्लासच झालो - किती वेळ कानात वाजतच राहिलेला......

बन बन फिरत बिघारी , असे असावे बहुतेक

बिघारी म्हणजे बेघर , घर नसल्याने वणवण फिरते

कर्नाटकी बिलहरी राग म्हणजे नॉर्थचा भूप कल्याण / शुद्ध कल्याण ना ?

रसिक बलमा हे भूप कल्याणात आहे
आवारा भवरे जो होले होले गाये हे बिलहरीत आहे म्हणे

ह्या दोन्ही गाण्यातली स्वरांची साम्यस्थळे दाखवली तर 11 रु बक्षीस देण्यात येईल
Proud

वरचा संदर्भ थोडा चुकलाय

कर्नाटकी मोहन कल्याणी म्हणजे उत्तर भारतीय भूपकल्याण उर्फ शुद्ध कल्याण , यात मध्यम तीव्र असतो , रसिक बलमा यात आहे

बिलहरीतपण तेच स्वर असतात , फक्त मध्यम शुद्ध आहे, उत्तर भारतीय असा कोणता राग माहीत नाही. साऊथवाले बिलहरी भरपूर वापरतात , आवारा भवरे , कान्हा सोजा जरा ( बाहुबली 2) यात आहे.