गुपित

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 January, 2009 - 01:11

का रुंदावली नकळत ती
प्रत्यंचा तव नयनांची
का आरक्त झाली सजणे
पाकळी तव अधरांची
हसुन उमलली कृष्णकळी
............मी गुपित जाणिले काही.

का रेंगाळली तव भाली
लट अवखळ केशांची
का थबकली उंबरठ्यावर
पावले तुझी रेशमांची
लाजेने भिजली मुग्धकळी
............मी गुपित जाणिले काही.

येणार आज कोणी
जाणीव ही सुखाची
डोळ्यात जी उमटली
खुण नव्या प्रीतीची
फुलून गेली स्वप्नकळी
............मी गुपित जाणिले काही.

उमजुन आज काही
धुंदावल्या फुलांनी
कथिले अलगद सखये
गुज तुझे मम कानी
आरक्त फुलली फुलकळी
............मी गुपित जाणिले काही.

विशाल.

गुलमोहर: 

विशाल ... शब्दात भावना उतरवण्याचे छान जमते रे तुला... 'गुपित' न सांगताही अधोरेखित झालंय... आवडली कविता..:-)

येणार आज कोणी
जाणीव ही सुखाची
डोळ्यात जी उमटली
खुण नव्या प्रीतीची
फुलून गेली फुलकळी
............मी गुपित जाणीले काही >>>> या कडव्यासाठी काही खास कारण आहे का? Happy या ओळी विशेष आवडल्यात...

पल्लवी

अतिशय सुंदर! हळुवार, नाजुक भाव काय नजाकतीने मांडलेत.
लगे रहो!

फारच सुंदर!!
रेषमांची च्या ऐवजी रेशमांची हवं का?

----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

खुप सुंदर, आवडली..
'प्रत्यंचा' म्हणजे काय ?

विशाल, मस्तच..!!
रेषमांची चं रेशमांची कर.. Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

प्रत्यंचा म्हणजे धनुष्याला असते ती दोरी( की दोरी खेचून बाण बसवणे Uhoh कारण धनुष्याला प्रत्यंचा लावली असे म्हणतात).

------------------------------
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | परि हरिकृपे त्याचा नाश आहे ||

सुंदर. खुपच छान.

धन्यवाद मंडळी , अपेक्षित बदल केला आहे.
अश्विनी, अगदी बरोबर. सहसा धनुष्याची दोरी त्या दंडाला गुंडाळलेली असते. तीर सोडण्याआधी ती बांधली जाते.
प्रत्यंचा लावणे हे युद्धाच्या प्रारंभाचे द्योतक आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

जुन्या आठवणी भारंभार येताहेत. चालू द्या.
......................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सुरेख उतरलीये रे....!!

अतिशय सुंदर!

हरीश

आवडली कविता.. गोड वाटते वाचायला.. Happy

छान

सुंदर.
उमजुन आज काही
धुंदावल्या फुलांनी
कथिले अलगद सखये
गुज तुझे मम कानी
आरक्त फुलली फुलकळी

खूप छान. आगमनाच्या अगोदरची अवर्णनीय हूरहूर चांगली वर्णिली आहे.

जाणीले - जाणिले पाहिजे का?

अलका, धन्यवाद.
चुक सुधारली आहे.
सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

ashwini_k, प्रत्यंचा म्हणजे दोरीच. ती खेचून बाण बसवणे नव्हे!

विशाल, नेहमीप्रमाणेच मस्त कविता.