व्हेरिएशन ऑन अ थीम : फॉइलनी ट्राऊट

Submitted by मेधा on 26 January, 2011 - 13:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सहा ट्राउट - ड्रेस्ड म्हणतात किंवा बोन्ड अ‍ॅन्ड बटरफ्लाइड म्हणतात. अख्खा मासा, आतून साफ करून, खवले काढलेला मिळतो.

वाटण : खालील साहित्य अगदी थोडं पाणी घालून वाटावे. खोबरं सर्वात शेवटी घालावे. खोबरं अगदी बारीक होऊ नये पण बाकीचे पदार्थ बारीकक झाले पाहिजेत.

-१ कप ओलं, खोवलेलं खोबरं
-६-८ हिरव्या मिरच्या
-एक जुडी कोथिंबीर
-अर्धा इंच आलं
-एक टी स्पून जिरं
-३-४ पाकळ्या लसूण

हळद, तिखट, मीठ, मालवणी मसाला, तेल , आमचूर पावडर किंवा चिंचेची पावडर .
लिंबू
सगळे ट्राऊट नीट एका लेयरमधे मावतील एवढा ट्रे.

क्रमवार पाककृती: 

ट्राउट धुऊन, कोरडे करून त्याला आतून बाहेरुन हळद-तिखट-मालवणी मसाला-आमचूर-मीठ-थोडा लिंबाचा रस लावून मुरु द्यावे. फ्रीजमधे १०-१२ तास, किंवा बाहेर तासभर. ट्राउटला बाहेरुन तिरक्या, एकास एक पॅरलल अशा २-३ चिरा द्यावात दोन्ही साइडनी. त्यात सुद्धा हा मसाला नीट लागायला हवा.

ओव्हन ३५० ला गरम करायला लावावे. वाटणात मीठ व लिंबाचा रस घालून सारखे करून घ्यावे.
ट्राउटमधे वाटण भरून दोर्‍याने गुंडाळावे. नीट गच्च भरले गेले पाहिजे.
बेकिंग ट्रे मधे तळाला थोडे तेल पसरून घ्यावे. त्यावर ट्राउट ठेवून फॉइलने गच्च झाकावे. व ३५० वर २०-२५ मिनिटे बेक करावे. पाहिजे असल्यास शेवटची २-३ मिनिटे फॉइल काढून ब्रॉइल करु शकता.

दोरा कापून, लिंबाच्या चकत्या व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवावे.

वाढणी/प्रमाण: 
माणशी एक तरी ट्राउट
अधिक टिपा: 

६ ट्राउटच्या हिशोबाने लिहिलंय साहित्य. वाटण माशांच्या संख्येप्रमाणे कमी जास्त करावे.

माहितीचा स्रोत: 
पात्रानी माछ खाउन केलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्च, हो गं , मी नेहमी स्किनवालेच आणलेत. मस्त क्रंची होते स्किन थोडं ब्रॉइल केलं की !