स्वरभास्करास श्रद्धांजली

Submitted by pkarandikar50 on 24 January, 2011 - 08:01

स्वरभास्कर कै. पं. भीमसेन जोशींना कर्नाटक राज्य शासनातर्फे 'कर्नाटक-रत्न' पुरस्कार अर्पण करण्याचा छोटेखानी समारंभ पंडीतजींच्या पुण्याच्या राहत्या घरी पार पडला, कारण पंडीतजींच्या प्रकृती- अस्वास्थ्यामुळे तो कार्यक्रम बेंगळुरुला सोडाच परंतु पुण्यातल्याही एखाद्द्या सभागृहात साजरा करणं शक्य नव्हतं. त्याप्रसंगी उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं होतं. व्हील-चेयरवर बसूनच पंडीतजींनी पुरस्कार स्वीकारला आणि त्यांनी कानडीतून आपल्या भावना अगदी थोडक्या शब्दात व्यक्त केल्या कारण बोलण्याचे श्रमही त्यांना सोसत नव्हते. कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्याचे चे उप-मुख्यमंत्री आले होते.त्यांनी आपल्या भाषणात यीट्स च्या एका कवितेचा उल्लेख करून त्या कवितेचा गोषवारा असा सांगीतला :

स्वीट दो वेअर / द मेलडीज यु सन्ग
स्वीटर स्टिल वेअर / द वन्स, अनसन्ग…

आता यापुढे कदाचित अण्णांच्याकडून अनेक 'मेलडीज' ह्या 'अनसंग' राहण्याची शक्यता असल्याचा सखेद संदर्भ त्या कवितेला होता. कार्यक्रमानंतर मी घरी परतलो परंतु अण्णांची विकलांग स्थिती आणि 'ती' कविता यांचा विषय किती तरी वेळ मनात घोळत राहिला. त्या काव्यपंक्तींचा भावानुवाद मी असा केला:

गायिल्यास किती तू आर्त विराण्या,
गोडी त्यान्ची अपूर्व अवीट होती.

दीर्घ वळणावर एका, येताच थबकूनी,
वेधलीस तू भैरवी, क्लान्त डोळे मिटुनी.

नीरवाने आत गाभारा अवघा भरला,
निरांजनाची ज्योत नाजूक, थरथरली.

सरली वाट, निखळले पाश शेवटले,
दिव्य स्वरस्पर्शाने, सोने त्यांचे झाले.

बंध सारे विस्कटुनी, एक बंदिश बहरली,
न गायिलेल्या त्या गीताची, गोडीच न्यारी.

त्रिसप्तकी तान तल्लीन, तूच गाता, तूच श्रोता,
ताल एक, नाद एक, लयीत विलय एक मात्रा.

आज अण्णांच्या निधनाची बातमी आली आणि मला तो प्रसंग, त्या काव्यपंक्ती पुन्हा आठवल्या. 'या सम हा' असं वर्णन ज्याला खर्‍या अर्थानं शोभून दिसावं अशा स्वरभास्कराची स्वर-यात्रा गेले काही दिवस बंद पडली होती, आता जीवनयात्राही संपली.

प्रभाकर [बापू ]करंदीकर

गुलमोहर: