प्येरनिकि (Polish style Ginger Snap Cookies)

Submitted by तृप्ती आवटी on 7 January, 2011 - 21:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप मध
१ कप ब्राउन शुगर (साधी साखर चालेल)
४ टी स्पू आले पूड
४ टी स्पू दालचिनी पूड
१/२ (अर्धा) टे स्पू बेकिंग सोडा
२५० ग्रॅम बटर (मऊ करुन)
२ अंडी
६ कप गव्हाचे पीठ

क्रमवार पाककृती: 

मध, साखर, आल्याची पूड, दालचिनी पूड हे सर्व एकत्र करुन गरम करुन घ्यावे. गरम करताना हलवत रहावे. चांगले फसफसून वर आले की बाजुला ठेवून थंड करुन घ्यावे. त्या मिश्रणातच बटर घालावे. आता एका वेळी एक अंडे घालत हलवत रहावे. मग साधारण अर्धा कप एका वेळी असे गव्हाचे पीठ घालावे. पीठ घालताना मिश्रण हलवत रहावे. शेवटी सगळा गोळा हातानेच चांगला मळून घ्यावा. पीठाचे एकसारखे गोळे करुन पोळी लाटतो तसे एकसारखे लाटून घ्यावे. साधारण एक ते दीड मि मी जाडी ठेवावी. आता कूकी कटर किंवा शंकरपाळ्याच्या कटरने हव्या त्या आकारात कूकी पाडाव्यात.

अव्हन ३३० फॅ वर गरम करावा. सगळ्या कुकी बेकिंग ट्रे वर मांडून १० ते १५ मिनिटे किंवा अगदी हलक्या सोनेरी रंगावर बेक कराव्यात.

तयार झालेल्या कुकीजः
DSC00555 - Copy.JPG

वाढणी/प्रमाण: 
खूप कूकी होतात :)
अधिक टिपा: 

बटर, अंडी, पीठ घालताना एकीकडे नीट हलवत रहायचे आहे. एग बीटरने चांगले मिळून येतात सर्व घटक.

माहितीचा स्रोत: 
इंस्टंट माहेर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी मस्तच आहे पण मध गरम करुन का वापरु नये हा प्रश्न परत वर आला ह्यामुळे ! Happy आत्ता सर्च देऊन पाहिले. मध गरम करु नये असे काही काही साईट्सवर आहे पण कारण नाही सापडले.
असो. पण ही रेसिपी नक्की करुन बघणार. गव्हाचे पीठ आणि ब्राऊन शुगर असल्याने बर्‍यापैकी हेल्दी Happy
फोटो मस्त आलाय Happy

अंड फेटून घालायचं की नुसतंच फोडून घालायचं?
आल्याचा किस चालेल ना? की सूंठ पूड अपेक्षित आहे?

कृपया लवकर उत्तर द्या, इथे थंडी आहे तोवरच आल्याचा/सुंठीचा वापर करता येईल. उत्तरेकडून येणारे थंड वारे पाकिस्तानाच्या दिशेने वळले की थंडी जाणार आहे तेव्हा मला लवकर मदत करा.
Wink

मंजूडी, सुंठ पावडरच अपेक्षित असावे. अंडे नुसतेच फोडून घालायचे आणि एगबीटरने ढवळत राहायचे. इथे केक करताना बटर आणि साखरेच्या मिश्रणात एकेक अंडे फोडून मिसळत जातात आणि एकीकडे संपूर्ण मिश्रणच फेटत राहतात. अंडी वेगळी फेटून नंतर मिक्स केल्याचे कधी पाहिले नाही Happy
सिंडी एव्हाना झोपली असेल आणि तुला घाई आहे म्हणालीस म्हणून मी उगीच आगाऊपणा करते आहे उत्तर द्यायचा Happy

चांगली कृती. मी केली तर ३ कपाच्या करेन, ६ कपाच्या फारच जास्त होतील.
१-दीड मिमी किंवा भाकरीसारखी जाड पोळी लाटा असे म्हणायचय का तुला? १-दीड सेमी जाड म्हणजे शंकरपाळ्यांइतकी जाड जी बेक केल्याबर अजून फुगेल, फोटोमध्ये कुकीज तेवढ्या जाड दिसत नाहीयेत.

मस्त आहे रेसिपी. मला जिंजरवाली बिस्किटे खुप आवडतात त्यामुळे ही करुन पाहिन. मध गरम करायचा नाही यावर मी ठाम असल्याने मधाच्या जागी काहीतरी दुसरे (फळांचा रस) वापरुन पाहावे लागेल.

संत्र्याचा रस वापरला तर मस्त जिंजर ऑरेंज कुकीज बनतील.

रुनी, केलाय बदल. साधारण ज्वारीच्या भाकरीएवढ्या जाड होतात कुकी.

मंजू, इथे जिंजर पावडर मिळते. त्याची चव सुंठ पावडरीपेक्षा वेगळी लागते पण हरकत नाही सुंठ घालायला.

साधना, थोडं तेल घालावं लागेल की काय हे इथल्या बेकिंग एक्सपर्टसना विचारुन बघ. मध घातला नाही तर कोरड्या भुसभुशीत होतील कुकीज असा माझा अंदाज.

या दिवसात खायला मस्त आहेत या कुकीज. जमलं तर उद्या करते, नायतर मग औरंगाबादला गेल्यावर. (तिथे किती थंडी आहे कोण जाणे, पण तरी कुकीज खाता येतिल.) Happy

मिनोती, सिंडरेला... वेगन जिंजर स्नॅप्स ची ही एखादी रेसिपी काढा ना हुडकून... म्हणजे मलापण खाता येतील! Happy