रत्ननगरी "रत्नागिरी" – (७) कशेळीचा श्री कनकादित्य

Submitted by जिप्सी on 27 December, 2010 - 23:53

=================================================
=================================================
रत्नागिरीच्या आजच्या भटकंतीत आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एकमेव अशा सूर्यनारायणाच्या मंदिराला. सदर फोटो माझ्या दोन वर्षापूर्वीच्या रत्नागिरी भटकंतीतले आहेत. महाराष्ट्रातील एकमेव आणि थोड्याशा अपरीचित अशा श्री कनकादित्याची माहिती व्हावी म्हणुन पुन्हा या चित्रमालिकेत देत आहे.
=================================================

कोकण जसे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते प्रसिद्ध आहे ते तेथील सुबक मंदिरे आणि त्यांच्या गुढरम्य दंतकथांबद्दल. आज आपण भेटणार आहोत अशाच एका सुंदर सूर्यनारायणाच्या मंदिराला. कशेळी गावात असलेल्या श्री कनकादित्याला.

कशेळी गावचे भुषण असलेले श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरिपासून ३२ आणि राजापुरपासून ३५ किमी अंतरावर आहे. आपल्या भारतात फार कमी सूर्यमंदिर आहेत. सौराष्ट्रात प्रभासपट्टण, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या भागात काही सूर्यमंदिर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर तालुक्यातील हे सर्वात मोठे देवालय गावच्या मध्यभागी विस्तिर्ण सपाट प्रदेशात बांधले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे. मंदिरात जी आदित्याची मूर्ती आहे ती सुमारे आठशे वर्षापूर्वी सोमनाथ नजिकच्या सूर्यमंदिरातून आणली गेली आहे.

श्री कनकादित्य

कशेळी गावात या मूर्तीचे आगमन कसे झाले याबद्दल मंदिराच्या पुजारींनी एक दंतकथा सांगितली ती अशी की, काठेवाडीतील वेटावळ बंदरातून एक नावाडी आपला माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता. त्याच्या जहाजामध्ये हि आदित्याची मूर्ती होती. जहाज कशेळी गावच्या समुद्रकिनारी आले असता अचानक थांबले. खूप प्रयत्न केला पण जहाज मागेही जाईना आणि पुढेही जाईना. शेवटी नावाड्याच्या मनात आले कि जहाजात जी आदित्याची मूर्ती आहे तिला इथेच स्थायिक होण्याची इच्छा दिसते. मग त्याने ती मूर्ती कशेळीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका नैसर्गिक गुहेत आणून ठेवली आणि काय आश्चर्य! बंद पडलेले ते जहाज लगेचच चालू झाले. कशेळी गावात पूर्वी कनका नावाची एक थोर सूर्योपासक गणिका राहत होती. एकदा तिच्या स्वप्नात सूर्यनारायणाने येऊन सांगितले की मी समुद्रकिनारी एका गुहेत आहे तु मला गावात नेऊन माझी स्थापना कर. कनकेने हि हकिकत गावात सांगितली. गावकर्‍यांनी समुद्रावर जाऊन शोध घेतला असता आदित्याची हि मूर्ती गुहेत सापडली. पुढे कनकेने गावकर्‍यांच्या मदतीने मंदिर बांधून तीची स्थापना केली. कनकेच्या नावावरुनच या मंदिराला "कनकादित्य" आणि ज्या गुहेत आदित्याची हि मूर्ती सापडली ती गुहा "देवाची खोली" म्हणून ओळखली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातन महत्त्व असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी देशातील विविध भागातून लोक येतात. चारही बाजुला भक्कम चिरेबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात इतर देवदेवतांचीही सुबक मंदिरे आहेत. कोकणातील इतर देवलयाप्रमाणेच श्री कनकादित्यचे मंदिरही कौलारू आहे. मंदिर परिसरातील दीपमाळा, फरसबंदी पटांगण, शांत वातावरण यामुळे मंदिर पाहताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिरात कोरीव कलाकुसर केली असून ते पुराणकालीन आहे. छतावर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून श्री कनकादित्याची मूर्ती हि अतिशय आकर्षक आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून देवस्थानच्या भक्तनिवासात राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.

पन्हाळगडाचा राजा शिलाहार याने कशेळी गावात दररोज बारा ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येनाऱ्या खर्चाकरीता गोविंद भट भागवतांना कशेळी गाव इनाम दिला. त्याबद्दलचा ताम्रपट आजही मंदिरात पाहवयास मिळतो. गोविंद भट श्री कनकादित्याचे पुजारी होते. आजही श्री कनकादित्याच्या पुजेचा मान त्यांच्या घराण्याला दिला जातो. अशा या पुरातन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचे सांगितले जाते. तसेच इतिहासाचार्य राजवाडे, महोपध्याय दत्तो वामन पोतदार, प्राध्यापक गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी यांचीही श्री कनकादित्यावर श्रद्धा होती. दरवर्षी रथसप्तमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाच दिवस साजरा होणार्‍या या उत्सवाच्या काळात कालिकावाडी येथून कालिकादेवीला वाजत गाजत गावात आणून देविचा मुखवटा श्री कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. कालिकादेवीबरोबर आडिवर्‍याची भगवती देवी हि तिची पाठराखीण म्हणून चार दिवस मुक्कामाला येथे येते. उत्सवाच्या काळात किर्तन, प्रवचन, आरती, पालखी याचे आयोजन केले जाते. मंदिराचे कामकाज पाहणारे बारा जणांचे विश्वस्त मंडळ या कार्यक्रमाचे चोख आयोजन करतात.

मंदिर परिसरात असलेली एक बैलगाडी

महाराष्ट्रातील एकमेव अशा या सूर्यनारायणाच्या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या.

जायचे कसेः
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी (३2 किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे, कशेळी (35 किमी)
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

तिथे जागा नसेल तर आबलोली ला सचिन कारेकर यांच्या इथेही चार रूम्स आहेत मस्त आहेत>>>>नीरजा, आबलोली म्हणजे गुहागर तालुक्यातलेच एक गाव ना? जिथुन जयगड बंदराला जाण्याकरीता बोट सुटतात. कार, बाईक्स, बस इ. घेऊन जाता येते. त्यामुळे राई-भातगावचा वळसा कमी होतो.

"मामाचा गाव" अजून एका ठिकाणी आहे, तुरळ येथे. पण माझ्या माहितीप्रमाणे तिथे बहुधा फक्त लहान (शाळकरी वयाच्या) मुलांसाठी कँप असतो उन्हाळी सुट्टीत. तुरळ गाव रत्नागिरीहून निघालं की संगमेश्वर ओलांडल्यावर चिपळूणकडे जाताना लागतं. तुरळ फाटा.
मग तिथूनच जवळ प.पू. गोळवलकर गुरूजींचं जन्मगाव गोळवली पण आहे. (तिथे आता गोशाळा, गोमय्-गोमूत्र प्रॉडक्ट्स, दवाखाना वगैरे गावातल्या लोकांसाठी उपयोगी असे प्रकल्प चालू आहेत.)

नाही रे. आबलोली मधून नाही सुटत लाँची. सुटत असतील तर तिसंग भातगाव हून सुटतात. आबलोली ला खाडी काठ नाहीये. पण भातगाव कडे/ तिसंग भातगाव कडे/ राई-भातगाव पुलाकडे जायचा रस्ता आबलोलीमधून जातो.

मोनाली त्या बांबुने पाणी काढायच्या साधनाला कोटबं म्हणतात.>>>>>>हे त्याचे फोटो. हे फोटो आडिवर्‍याचा महाकाली मंदिरातील आहे.

जिप्सी,
त्या पाणी काढायच्या साधनाला "कोळंबं" असे म्हणतात...... काही ठिकाणी इंतर सुध्दा.....
बांबूचा जो आवाज होतो खाली जाताना त्याला इंतर वाजले असे म्हणतात.
आडिवरे येथील महाकाली मंदिराबरोबरच स्रि शंकरेश्वर आणि श्री कालिका मंदीर अप्रतीम आहे. माझा मामा श्री. हर्डिकर तिथले पुजारी आहेत. आताच ८ दिवस राहून आलो आणी त्यावर लेख लिहिणार एवढ्यात हे वाचनात आले.

कनकादित्याला रथसप्तमी आणि कार्तिकी एकादशीत उत्सव असतो... उत्सवाला पालखी नाचवायचा सोहळा केवळ अप्रतीम.....

आडिवरे आणि कशेळीतील बरेच लोक उत्तम कलाकार आहेत... तिथअली भजने अभंग रागदारीवर आधारीत असतात, चाली तर खूपच सुंदर....... Happy

आताच ८ दिवस राहून आलो आणी त्यावर लेख लिहिणार एवढ्यात हे वाचनात आले.>>>मिलिंद, लिहिना सविस्तर वृतांत. आवडेल वाचायला.

जिप्सी,
रत्नागिरीच्या आजच्या भटकंतीत आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एकमेव अशा सूर्यनारायणाच्या मंदिराला. Uhoh
.........या कशेळीच्या कनकादित्याशिवाय अजुनही सूर्यमंदिरे आहेत, ती खालीलप्रमाणे:
आंबव- आरवली येथील पोंक्षेंचं आदित्यनारायण, कयळघे ता. रत्नागिरी येथील आदित्यनाथ, गावडेगुडे ता. रत्नागिरी येथील आदित्यनाथ, नेवरे येथील श्रीआदित्यनाथ, परुळे ता. वेंगुर्ला येथील श्रीदेवआदिनारायण, आजगांव येथील सूर्यमंदिर. ही सर्व मंदिरे कनकादित्याएवढीच मोठी आहेत. नुकताच परुळ्याला रथसप्तमीच्या उत्सवाला जाऊन आलो. त्यासंबंधी लवकरच टंकतो. याशिवायही महाराष्ट्रातील सर्व पंचायतन मंदिरसमूहांमध्ये सूर्यमंदिर आढळते. खारेपाटणला कधी गेलात तर तिथल्या (बहुतेक विठ्ठल) मंदिराबाहेरील सूर्यमूर्ती जरूर बघा. हरिश्चंद्रगडावरही सप्ताश्वरथारूढ सूर्यमूर्ती आहे. नाशिकलाही रामकुंडाजवळ एक खाजगी मालकीचे सूर्यमंदिर आहे..याशिवाय सातार्डे येथेही सूर्यमंदिर आहे. मुरुड आणि कुर्धे इथेही सूर्यमंदिरे असल्याचे समजते, अधिक माहिती जाणकार देतीलच. पालघरमधील माहिम आगर इथेही दांडेकरांचं सूर्यमंदिर आहे.
मुंबईत माधवबागेजवळ पांजरपोळ लेनमध्ये प्रशस्त सूर्यमंदिर आहे.
............ Happy Happy Happy

वा जिप्सी मस्त प्रची.
जोरदार कोकण ट्रिप केलेली दिसत्ये.

हे फोटो आडिवर्‍याचा महाकाली मंदिरातील आहे. >>> मीही तिथेच पाहिले होते ते.

हे फोटो कसे पाहिले नव्हते? जिप्सीचे प्रचि कायमच सुंदर असतात

नीधप म्हणत आहे ते कोळिसर्याचे लक्ष्मी केशव मंदिर बहुतेक!

हेच ते कशेळीतलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर. (हर्डीकरांचं). नीधप म्हणते हेच असावं.

जिप्सी तुमच्या धाग्यावर माझी रिक्षा.
कशेळीच्या श्री कनकादित्य मंदिरातील विहीर1.jpg3.jpg
आम्ही पावस करून कशेळीला गेलो होतो, तो रस्ता मात्र खूपच कमी रहदारीचा होता.

व्वा! फोटो माहिती मस्तच. Happy
माझ्या नजरेतून हे कस सुटलं? Uhoh (कोकणात राहून पाहिलं नाही कधी :अरेरे:)

धन्यवाद जिस्प्या

कालीकावाडीची कालीका देवी आणि कशेळीतला कनकादित्य हे आमचे कुलदेवी आणि कुलदेव.

कालिकावाडीला गेलं की मुक्कामासाठी हक्काचं घर म्हणजे ह्या भुंग्याच्या मामांचं घर. तेच कालिकादेवीच्या देवळातले पुजारी आहेत.

कनकादित्य आणि कालिकादेवीच्या लग्नाची गोष्ट एकदम बॉलीवुडी आहे. भुंग्याचे आजोबा ती एकदम इंटरेस्टींग पध्दतीने सांगायचे पुर्वी आता मामा सांगतात वारसाहक्काने Happy

कालिका देवी धरून बहुतेक सहा बहिणी. त्यापैकी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती चं देऊळ आडिवरे गावात सुरुवातीलाच आहे.

भगवती ही चौथी बहिण, मग जाखादेवी (हिचं देऊळ कनकादित्याच्या देवळाआधी आहे बहुदा)

ह्या बहिणींपैकी कालिकादेवी ही सोवळ्यातली देवी.

महलक्ष्मी/ महाकाली ह्या कालिकादेवीला जाखादेवी साठी वर संशोधन करायला पाठवतात. पण प्रत्यक्षात कनकादित्य तिलाच आवडतो. तो ही सोवळ्यातला देव. मग त्यांचं लग्न ठरतं. जाखादेवीला आपल्या धाकट्या बहिणीचा खूप राग येतो आणि ती तिचं तोंड न बघण्याची प्रतिज्ञा करते. म्हणून उत्सवाच्या वेळी कालिकादेवीची पालखी येते तेव्हा जाखादेवीच्या देवळाचे दरवाजे बंद ठेवतात.

पण लग्नात मोठी बहिण महाकाली तिला मानाचा सरंजाम पाठवते, भगवती पाठराखण म्हणून जाते.

ह्या लग्न सोहळ्याचं अजून एक वैशिष्ट म्हणजे, मुलाकडच्या म्हणजे कनकादित्याकडच्या मंडळींना वधुकडच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यावा लागतो.

अशी मी ऐकलेली अख्यायिका आहे.

आम्ही गेल्यावर्षी गेलो होतो तेव्हा, आम्ही कालिकावाडीहून आलो आणि कालिकादेवी आमची कुलदेवी आहे हे ऐकल्यावर तिथल्या पुजाऱ्यांनी माझी ओटी भरली, लेकीला पण फ़ळ आणि फ़ूल दिलं. वर म्हणाले व्याह्यांकडून आलात म्हणजे इतका पाहुणचार करायलाच हवा.
उत्सवाच्या काळात यायचं आमंत्रण देखील देऊन ठेवलं. Happy

ही आख्यायिका मला माहितच नव्हती. धारतळयाजवळ भालावली म्हणून गाव आहे. तिथली नवदुर्गा देवी ही देखील आडिवर्‍याच्या महाकालीची बहीण मानतात. या दोन्ही गावांत विवाह, सोयरीक होत नाही कारण दोन्ही गावातले एकमेकांना भाऊ-बहीण लागतात.
एक अजब बंधु-भगिनी भाव Happy

कशेळी माझ्या आईच्या मावशीचे गाव. तिथे जाताना बांध ओलांडून गावात जायच्या आधी एका घराजवळ "रहाट" होता. सकाळी तो रहाट फिरवून बागेला पाणी सोडले जायचे. रहाटाचे एक एक गाडगे भरुन मग रिते होताना बघायला खुप गंमत वाटायची. खुप वर्षे जाणे नाही झाले तिथे. आता रहाट आहे का तिथे?

सुंदर आहेत सगळीच छायाचित्रे. प्रतिसादातली पण. खुप आवडत्या आठवणी जाग्या झाल्या ही छायाचित्रे बघून. त्या ताम्रपटाचेही फोटो काढू देतात, तुम्ही बहुतेक इथे टाकले नसावेत. ते छतावरचे पताका काम किती कौशल्याचं आणि कलात्मक असतं ना? उठावदार रंगसंगती त्या देवळाचे सौंदर्य आणखी खुलवते. कोकणातल्या इतर देवळांच्या मानाने इथे थोडी जास्त वर्दळ असली तरी परिसरातली शांतता मात्र टिकून असते. फार प्रसन्न, स्निग्ध मनःस्थिती होते तिथे गेल्यावर. मी २-३ वेळा गेले, प्रत्येक वेळी तिथून उठू नये हीच भावना होती. एकंदरीतच रत्नागिरी-राजापूरमधला तो सागरी टापू फारच रमणीय आहे.

जिप्सी..
फोटो व वर्णन छानच आहे. श्री. कर्णेश्वर मंदिर संगमेश्वरला आहे. तेथेही एक छोटेसे मंदिर सूर्यनारायणाचे आहे. सूर्यनारायणाच्या मागील बाजूस बारा राशी कोरलेल्या आहेत.
सोबत दोन फोटो जोडत आहे.

DSCN4256.JPGDSCN4254.JPG

कर्णेश्वर मंदिरासाठी खालील लिंक पाहा.
http://www.maayboli.com/node/44763

Pages