बडी देर भई..!

Submitted by मणिकर्णिका on 1 January, 2011 - 13:02

परवा आनंदी आणि सुब्रतोचा ब्रेक-अप झाला...ऑफ़ीशियली!!
२ वर्षापासूनचं लळत-लोंबत पडलेलं प्रकरण संपलं एकदाचं..आणि मला जी पाचर ठोकली गेली होती ती ही निघाली एकदाची!!
बेसिकली तिच्याहून परस्पर भिन्न अशा सुब्रतोमध्ये तिला काय आवडले कुणास ठाऊक???
म्हणजे त्याचे वाडगाभर भात आणि बरोबर माछेर जॉल फ़न्ना करणारे तोंड पाहून कोणाला काही रोमॅंटीक वाटण्याची सुतराम शक्यता नाही असे मला ठामपणे वाटायचे...पण या बयेला ते क्युट वाटले..
पाच पाच वाट्या दह्या खात ’मोई मिष्टी दोही’ आळवताना त्याचे डोळे लुकलुकायचे ते आवडायचे म्हणे तिला...मी म्हटले घंटा...!
आणखी काय बोलणार???
वेडाचार चालला होता दोन वर्षे..
सुब्रतो, मी, आनंदी आणि विशू ही आमची चौकडी बंगाली वर्गांमधली...
सुब्रतो आम्हाला बंगाली शिकवायला होता.
तसा तो साधारणच होता..टिपीकल बंगाली!!!
वंग पृथांनी...आयांनी..मावशांनी अतिशय लाडावून ठेवलेला पुरुष...ढेरी बाहेर आलेला..
पण त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाशी अतिशय विसंगत होते त्याचे डोळे..
काळेभोर...निर्व्याज तरीही कशाचा ठाव न लागू देणारे...बरंच काही होतं त्या डोळ्यांमध्ये..
गुरुदेवांच्या कविता त्याला मुखोद्गत होत्या. त्या बोलून दाखवताना त्याचे डोळे असे काही लक्खन तेजाळून उठायचे..
आनंदीला तो आनोंदी म्हणायचा...
विशू जाम वैतागायचा..म्हणायचा..."फ़ोफ़्शा...आणखी एकदा म्हणत तिला आनोंदी...नाही चार-पाच बुक्क्यांची नोंद तुझ्या दोंदीवर केली तर बघ.."
त्यावेळी हसून गुळी व्हायची..तो ही विशूच्या शालजोडीवर काही न कळून पोट गदगदवून हसायचा.
आमच्यात पहिला ताण आला ते आनंदीने ती सुब्रतोच्या प्रेमात पडलीये हे आमच्याकडे जाहीर केलं तेव्हापासून..
आम्ही मुळासकट हादरलो.
कुठे आनंदी आणि कुठे सुब्रतो...दोन टोकाची माणसं..
आनंदीसारखी प्रगल्भ आणि स्मार्ट मुलगी गीतांजली पाठ असणं आणि काळेभोर डोळे एवढी पुंजी असलेल्या माणसाच्या प्रेमात पडू शकते हा एक नवीनच साक्षात्कार आम्हाला झाला..
ऑफ़ ऑल द पीपल इन द वर्ल्ड...सुब्रतो???
काय म्हणणार??
"नातं कधीतरी तुटणारच आहे म्हणून जीव लावायचाच नाही" ही लॉजिक कुठल्या हजामाचं आहे??
ते सुब्रतोचं मत होतं....
त्याचा म्हणे अशा नात्यांवर विश्वास नव्ह्ता..कुठलंही नातं काहीतरी मोटीव्हनेच जोडलेलं असतं असा त्याचा ठाम विश्वास होता..आणि या कार्टीला तेच ’तीव्र असे काही जीवघेणे’ वाटलं...
ती आपली त्याच्यात वेडीवाकडी गुंतत गेली..
मी बदलायला लावेन त्याला...असं आम्हाला ठणकाऊन सांगत!
वर्षानुवर्षे मनाशी धरून ठेवलेले समज असे थोडीच ना दूर करता येतात वेडे??
म्हटलं ठिक आहे..
सुब्रतो आणि आनंदीचं काही जमण्यासारखं नाही हे आम्हाला आमच्या पहिल्या मीट मध्येच कळले..
’कोबे सिझलर्स’ मध्ये सुब्रतोने पूर्ण टेबलवर सांडवलेलं उष्टं...तोंडाने येणारा मच्याक मच्याक आवाज..तोंडातला पुरता घास न संपवता तोंडातली शितं उडवत बोलणारा सुब्रतो जाम गिळगिळीत वाटला होता...टिप-टॉप महाराणीसारख्या राहणारया आनंदीपुढे तर फ़ारच...
पण सुब्रतो मुळे ओशाळून येवढुश्शी झालेली आनंदी आम्हाला बिलकुल ओळखीची नव्हती...
हे तिनं कसंतरी पचवून घेतलं असावं..
तिला त्याच्यात नेमकं काय आवडलं हेच तिला डिफ़ाईन करता येत नसावं असं बरयाच वेळा वाटायचं..
तिला एका इंपल्समध्ये काहीतरी आवडून गेलं असावं कदाचित...पण ते ’काहीतरी’ नंतर तिला कधीच सापडलं नाही..
तिने ते शोधायचा खूप प्रयत्न केला...नंतर सरधोपट मार्ग स्वीकारला..
रोमॅंटीक बोलणं तर सोडाच त्याला साधं आनंदी खुलेल असंही बोलता यायचं नाही..
आता असतात अशी माणसं...त्यात काही गैर नाही..पण नेमका तसाच मनुष्य अतिशय रसिक, रोमॅंटीक अशा आनंदीला मिळावा???अह...तो तिने पसंत करावा???
त्याला कधी फ़रक पडायचाच नव्हता पण तिचं चुरमडत जाणं आम्ही दिवसांगणिक पाहत होतो...तिचा आऊट झालेला चेहरा बघून कधी कधी माझं तोंड शिवशिवायचं..पोटात तुटायचं..पण विशूने नेहमी अडवून धरलं..."शी शूड लर्न हर ओन लेसन.."

"मी असाच आहे तुला माहीत होतं..""
"मी नव्हतं सांगीतलं माझ्यावर प्रेम कर म्हणून..आय वॉर्नड यू बीफ़ोर"
"मला एकटं रहायची सवय झालीये आनंदी...माझी मनाची तयारी तीच आहे...व्हाय डू यू वेस्ट युअर टाईम ऍंड माईन टू?"
अशा प्रकारची वाक्यं त्याच्या बोलण्यात वारंवार यायला लागली.
तिला त्याच्यात जे काही आवडले त्यासाठी तिने मनापासून सर्वकाही केले..शेवटी ती एक मनस्वी मुलगी होती...
पण परतून त्याच्याकडून काहीच आले नाही तेव्हा मात्र ती शहाणी झाली..
दोन वर्षाच्या दु:स्वप्नातून एकदाची पडली बाहेर...तिच्याबरोबर मी पण!
आनंदीसारख्या बरयाच मुली असतात ज्या इंपल्सवर जगतात..त्या इंपल्सशी इमान राखत आयुष्यभर झगडत राहतात...त्यांची अर्धी शक्ती जाते झगडण्यात आणि अर्धी स्वत:ला वेडं होण्यापासून वाचवण्यात...
आनंदीसारख्या फ़ार कमी नशिबवान मुली असतात ज्यांना ह्या प्रकारात राम नाही हे तुलनेत फ़ार लवकर कळतं..
मलाही कधीकधी असं वाटतं की हे इंपल्सवर जगणं बिगणं हा शुद्ध येड**पणा आहे...
"मला इंपल्सवर जगणारी माणसं आवडतात" माय बट्ट...!
असं बोलणारा मनुष्य केवळ व.पुं.च्या कथेत भेटतो...आणि हे किती पुस्तकी आहे हे प्रकर्षाने तेव्हाच जाणवतं..
कारण जेव्हा आपल्यासमोर आनंदीसारखं, स्वत:सारखं जितंजागतं उदाहरण असतं तेव्हा ह्या गोष्टी हवा वाटतात..
"मला वाटलं ते मी केलं...मला त्याचे रिग्रेट्स नाहीत...उद्या मी मनाविरुद्ध जगले असं नको वाटायला" हा डायलॉग ’जब वी मेट’ मध्ये कसला भारी वाटतो ना?
रील लाईफ़ सोडून रियल मध्ये आलं की oh please...give me a break!
स्वत:ला सतत तपासत राहिलं पाहिजे...निर्णय जोखून पाहिले पाहिजेत..
क्षणिक उर्मीत मोठे निर्णय घ्यावेसे वाटले..किती अवास्तव आहेत याचा विचार केला पाहिजे..
नाहीतर..
देर भई..बडी देर भई..!

गुलमोहर: 

वाचायला मजा आली. अजून खुलवलेली आवडली असती. शेवटाला उगाच उपदेशात्मक आणि गुंडाळल्यासारखं वाटलं.
पुलेशु.

छानच आहे लिखाण.

हा आधी वाचलेला लेख आहे. कुठे ते आठवत नव्हते.
शोधल्यावर इथे मिळाला. हा तुमचा ब्लॉग आहे?

मस्त लिहीले आहे, आवडले. शेवटचे जरा उपदेशात्मक वाटले तरी ते या गोष्टीवरून लिहीणार्‍या/रीचे स्वतःचे झालेले मत अशा अर्थाने आलेले वाटले, त्यामुळे खटकले नाही.

वा ! क्या बात है ! आयुष्य इंपल्सवर जगता येत नाही. पटेश. पण काही काळ काही क्षण इंपल्सवर जगायला हरकत नसावी.

इंपल्सवर जगणार्‍या माणसांना भौतीकसुख मोहवत नाहीत. त्यांचा गरजा सुध्दा फारच साध्या सुध्या असतात. त्यांना गरज असते फक्त आत्मविश्वासाची.

@नीधप
पटलं.आनंदीची सुब्रतोवर भाळणे आणि नंतरची कुतरओढ वगैरे डिटेल्ड दाखवून दीर्घ कथा वगैरे करता आली असती. पण आता आहे हे असे आहे. Happy

@नितिनचंद्र
हो. अगदी अगदी.
भौतिक सुख आणि इम्पल्सवर जगण्याची नशा यांचं कॉकटेल तरीही भुरळ घालतंच बरयाच लोकांना

@सायो, बिबवा, अंजली
धन्यवाद

@नंद्या
हो. माझाच. Happy
लिखाण तुमच्या लक्षात राहिलेय हे पाहून आनंद वाटला. कोणाचं आहे? हे काय-कधीही शोधून काढताअ येतं.

@फ़ारएण्ड
स्पेशल थॅन्क्स

@राजकाशाना
पात्रे खरी आहेत मग मी माझी निरीक्षणशक्ती जोरदार आहे असं समजते. Happy

@ऋयामभाऊ
कमेंटमध्ये तुमचं नाव वाचलं आणि आता निदान ’करणीबाई’साठी मनाची तयारी असायला हरकत नाही असं वाटलं. पण काहीतरी जुनंच निघालं. हायसं वाटलं. Happy

@श्यामली, रचू, सिंडरेला, अनिल,
सगळ्यांना थॅंक्स

शेवट सोडून बाकी चांगली जमली आहे!! तुझा ब्लॉग मी वाचते नेमाने!!
तुच ती हे मात्र आताच कळतय!! इथे बघून बरं वाटलं!!जपान बीबी वर परत आली नाहीस ते???

@रैना
थॅंक यू. पण खरं सांगायचं झालं तर ही कथा एलाबोरेटली सांगायचं कधी डोक्यात नव्हतं.
आनंदी आणि सुब्रतोत काय झालं असावं? ह्याबद्दल वाचकांना कल्पना करु देण्यात शहाणपणा आहे असं वाटलं, नाहीतर ही स्टिरीयोटाईप झाली असती. वाचकांचं रिलेट होणं जास्त प्रभावी होईल असं मला तेव्हा वाटलं होतं. आजही त्यात फ़रक नाही.

@रोचीन
अगं, सेमिस्टरच्या मध्येच कोर्सला प्रवेश घ्यावा तसं झालं माझं तिथे.
तुम्ही सगळी नेहमीचीच माणसं होतात तिथे. मीच आपली म्यॅडसारखी जॅपनीज प्रार्थना वगैरे म्हणत बसले होते. काही सुधरेचना. मग नंतर आलेच नाही.
मला आपलं वाटत होतं की मायबोलीवर कुणालाच ठाऊक नसेल आपलं लिखाण. म्हणून मी आपले खूप जुने लेख टाकत बसलेय. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा मोठठा पोपट केलात.

अग मी पन आत्ताआत्ताच तीथे यायला लागले आहे!! येत जा , हळुहळु सवय होईल, तु जॅपनीज शिकतेय्स का?? सद्ध्या काय करतेस?? फ्रेंच पण झालंय ना तुझं??
तुझा नक्षलवादावरचा लेख टाक ना इथे!! मस्त चर्चा होईल!!! Happy Wink

मस्त आहे. खूप आवडला.
<<त्यांची अर्धी शक्ती जाते झगडण्यात आणि अर्धी स्वत:ला वेडं होण्यापासून वाचवण्यात...>> अगदी खरंय !

@रोचीन
येईन येईन.
जॅपनीज कामचलाऊ येतं. उद्या उठून तोक्योत आहे असं दिसलं तर अगदीच साईन लॅंगवेज नाही वापरायला लागणार इतपत. मात्र स्क्रिप्टवर काम करतेय. त्याच्या नावाने बोंब आहे.
हो, माझं फ़्रेंच झालंय. ब्लॉगवर वाचलेच असशील तू अनुवाद.

@वर्षू, स्वप्ना
Happy

short ,meaningful and insightful
छानच!!
येऊ द्या
जियो!!
Happy

छान लिहिलंय्..आपल्या जवळच्या लोकांना अशा अनुभवातून जाताना नुसतं पहाणे ही आपल्यासाठीही शिक्षा ठरते बरेचदा Sad

Wonderful ... नीरजाला अनुमोदन.

दोन वर्षाच्या दु:स्वप्नातून एकदाची पडली बाहेर...तिच्याबरोबर मी पण!>> इथेच संपली असती तरी मस्त पंच होता

@मितान, रेव्यु, नताशा
धन्यवाद. Happy

@रूनी पॉटर
थॅंक्स
तुमच्या प्रोफ़ाईल मधलं कुंभारकाम मला भलतंच इंटरेस्टींग वाटलं. मी पण टेराकॉटा चं वर्कशॉप केलंय.

@असामी
हा हा हा!
तिथेच संपवली असती तर तोंड लांब करुन फ़ंडे कोण मारणार?
मी इंजिनीअर झाले नसते तर लंबुळकं तोंड करुन सतत उपदेश करणारी किरीस्ताव पाद्री तरी नक्की झाले असते, असं माझी आई नेहमी म्हणते.

Pages