कौतुक समारंभ

Submitted by अभय आर्वीकर on 18 December, 2010 - 00:37

माझ्या ब्लॉगला स्टार माझा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर फ़ारच मोठी उपलब्धी आणि तेवढीच डोकेदुखी ठरेल असे दिसते. पुरस्कारामुळे आपले कर्तृत्व इतरांच्या नजरेत भरून ते व्यापकप्रमाणावर अधोरेखीत होत असते. अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची मुसळधार बरसात ही होत असतेच. पण माझ्या बाबतीत हा पुरस्कार मला जरा जास्तच भरभरून देत आहे. गरजेपेक्षा जास्त म्हणा की छप्परफ़ाडून देणे म्हणा असंच काहीसं माझ्या बाबतीत होत आहे. शिवाय पुरस्कार मला काही एकट्याला मिळालेला नाही. मी छत्तीसपैकी एक आहे. पण कदाचित कौतुकाचा वर्षाव माझ्यावर जास्तच होत असावा,असे दिसते. आणि त्याची काही कारणेही आहेत.
सर्वप्रथम मी मायबोलीकर असल्याने मायबोलीवर आणि मी मराठीकर असल्याने मी मराठीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
पुरस्काराच्या यादीत ३-४ वैदर्भीय नावे आहेत पण मी विदर्भातील एकमेव रहिवासी वैदर्भीय असल्याने स्थानीय सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रात ही बातमी अगदी फ़ोटोसहीत झळकली.
इथपर्यंत ठीक होतं पण एकदम सत्कार समारंभ?
होय हे खरे आहे. दिनांक १४ डिसेंबरला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
आपल्याच हाताने आपलाच डमरू वाजवत, आपलेच गुणगाण गात ही बातमी तुमच्याशी शेअर करायचा विचार नव्हता. पण या "सत्कार समारंभाच्या" बातम्याही वृत्तपत्रात झळकायला लागल्या (लोकमत) आणि मित्रमंडळीकडून फ़ोनवर/ईमेलच्या माध्यमातून विचारणा व्हायला लागली आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे सांगणे जड जायला लागले, शिवाय मनातील काही भावना सुद्धा व्यक्त करण्याशिवाय राहावले नाही म्हणून उशिराने का होईना पण ही आगळीक.

Satkar-1-2.jpg

मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, वाचत नाही आणि लिहितही नाही. त्याच अर्थाने शेतकर्‍यांची संघटनाही निरक्षर असते. त्यांच्या कार्याची दखल "बेदखल" असते. लाखो शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला किंवा शांततामय मार्गाने धरणे दिले तरी प्रसार माध्यमात ती न्यूज बनत नाही, किंवा बनली तरी एखाद्या कोपर्‍यात आगपेटीच्या आकारात तिला स्थान मिळत असते. याउलट राजकीय व्यक्ती शिंकली किंवा एखाद्या सेलेब्रिटीच्या पोटात गर्भ वाढत असेल तर भारतीय प्रसार माध्यमांसाठी ती ब्रेकिंग न्यूज ठरत असते, वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने खर्ची पडायला लागतात.
त्या पार्श्वभूमीवर स्टार माझाला दखल घेण्याइतपत मी आंतरजालावर शेतकरी विषयक लेखन केलं, हे सर्वांना फ़ारच सुखावून गेलं असावं. नागपुरच्या भेटीत चटप साहेबांनी माझ्या सत्काराचा विषय काढला तेव्हा मी त्यांना म्हटले की, असं काही करू नये, शक्यतोवर टाळावे. तर ते म्हणाले “आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही तर कुणी करावे.” वर्ध्याच्या मिटींगमध्ये सरोजताई म्हणाल्या. आम्ही सत्कार नाही तर “कौतुक सोहळा” करू. सत्कार काय किंवा कौतुक काय, शब्दामधले फ़रक. त्यामागची भावना आणि प्रेरणा मात्र एकच. सत्कार किंवा कौतुक करू नये असे नाही, पण या निमित्ताने माझ्या समोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न असा की सत्कार कुणी कुणाचा करायचा. आज माझ्या कवितांचे बर्‍यापैकी कौतुक होत आहे. माझ्या लेखनीला पुरस्कार मिळत आहे, मी प्रगल्भ आणि दर्जेदार लेखन करतो हे जवळपास सर्वमान्य होत आहे.
मग हे जर खरे असेल तर, एवढे चांगले लिहिण्याची शक्ती माझ्याकडे आली कुठून? मी वयाच्या विसाव्या वर्षी शेतकरी संघटनेत आलोय. मला माहित आहे की, मी शेतकरी संघटनेत येण्यापुर्वी एक दगड होतो. मी जे काही शिकलो ते शेतकरी संघटनेकडून शिकलो. मी जर आज प्रभावी आणि दर्जेदार काव्य लिहू शकत असेल तर ती बुद्धी मला फ़क्त आणि फ़क्त शेतकरी संघटनेने दिली आहे. शरद जोशींचे ,शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे विचार दर्जेदार होते म्हणून माझ्या लेखनीतले विचार दर्जेदार असावे, हे निर्विवाद सत्य आहे.
मग सत्कार कुणी कुणाचा करायचा? मी शेतकरी संघटनेचे आभार मानायचे की शेतकरी संघटनेने माझा सत्कार करायचा?
दुसरा प्रश्न. आम्ही चळवळीतली माणसं, आंदोलन आमचा पिंड. आजही मला मी कवी आहे याचा जेवढा अभिमान वाटत नाही त्यापेक्षा मी शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक आणि एक आंदोलक आहे, याचा जास्त अभिमान वाटतो. आणि आंदोलकांनी जे काही करायचे ते स्वत:साठी नव्हे तर चळवळीसाठी करायचे असते. जगायचे तर चळवळीसाठी, मरायचे तर चळवळीसाठी हाच आंदोलकांचा धर्म असला पाहिजे. त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्‍यांनी शक्यतो सत्कारापासून वगैरे चार हात लांबच असले पाहिजे हे माझे मत.
तिसरा प्रश्न. या तिसर्‍याप्रश्नामागे इतिहास आहे. शेतकरी संघटनेचा इतिहास असे सांगतो की, मुळातच दगड असलेल्यांना शेतकरी संघटनेने शेंदूर लावून मोठे बनविले. दगदाचा देव बनवला. पण मुळातच दगड असलेले दगड मोठेपण प्राप्त झाल्यावर स्वत:ला शेतकरी संघटना आणि शरद जोशींपेक्षाही मोठे तत्वज्ञानी,राजकारणी समजायला लागले, आणि ज्या संघटनेने त्यांना मोठे बनविले त्या संघटनेशी दगाबाजी करून उठून पळालेत. १९८० ते २०१० या काळातील संघटनेला सोडून गेलेल्यांची यादी बनविली तर ही बाब निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे यापुढे तरी संघटनेने सावधगिरीने पावले टाकली पाहिजेत असे मला वाटते.
मला सध्या एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे. याबाबत मी माझ्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहातील लिहिलेल्या भुमिकेत सविस्तर उहापोह केला आहे.
शेतकरी संघटनेच्या एवढ्या वर्षाच्या प्रवासात एक मुद्दा नेहमीच चर्चीला गेला की, शेतकरी चळवळीला पुरक असं साहित्य का तयार होत नाही. शेतकरी समाजाचं वास्तववादी साहित्य तयार व्हायलाच पाहिजे. हाच प्रश्न बराच काळ सतावत होता आणि आजही सतावतो आहे कारण आपण म्हणतो की वास्तववादी साहित्य तयार व्हायला पाहिजे, पण आम्ही मात्र लिहिणार नाही,मग ते कुणी लिहायचं? तर इतरांनी लिहायचं. मला कायम प्रश्न पडतोय तो असा की आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे भोगलंय, आमची अनुभूती, आमचा विचार पण तो आम्ही नाही लिहिणार, तो इतरांनी लिहावा. हे कसे शक्य आहे? हे शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मीती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढा प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत.
आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. बस्स. ह्या एकाच प्रेरणेपोटी मी हाती लेखनी धरली. आणि कविता लिहायला लागलो.
यानिमित्ताने आपण माझे कौतुक केले, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणुन मी तुमचा खूप खूप आभारी आहे.

गंगाधर मुटे
* * *

सभेत बोलताना अ‍ॅड वामनराव चटप म्हणाले की, एकमेकाच्या सुखदु:खात वाटेकरी व्हावे हा माणसाचा स्वभाव आहे आणि शेतकरी संघटनेचं आपलं हे संयुक्त कुटूंब आहे. आपल्या संयुक्त कुटूंबातल्या एका भावाने एका वेगळ्या क्षेत्रात, संघटनेचं कार्य करता करता, त्याच्या मनातल्या असणार्‍या भावना, मनातल्या कल्पना, त्याच्या मनातल्या भुमिका, शेतकरी संघटनेचं काम हे गद्यातलं असलं तरी पद्यामध्ये मांडून समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे, म्हणून, संघटना ही आपली आई आहे, आणि आईचं काम आहे की लेकराचं कौतुक करावं. म्हणून साहेब स्वत: आज गंगाधरच्या या सत्कार समारंभाला हजर आहेत. ज्याची दखल स्टार टीव्हीच्या चॅनेलने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं त्या तर्‍हेचं कौतुक होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या कुटूंबातल्या माणसाला अवार्ड, पुरस्कार मिळतो तेव्हा आपल्या कुटूंबाचा घटक म्हणून त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं आवश्यक असते. म्हणून आपण हा कौतुक सोहळा साजरा करीत आहोत.

* * *

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग म्हणाले की, गंगाधर मुटेंच्या एका कवितेत गावातला एक शाम्या नावाचा मुलगा बिपाशासाठी मुंबईला लुगडं घेऊन जातो आणि त्या शाम्यात गावरानपणा ठासून भरला आहे. श्याम्यानं तर कहरच केला. इच्चीबैन. आता इच्चीबैन या शब्दात असं काय आहे की ते प्रत्येकाला हसायला लावतं? तर गंगाधर मुटेंच्या शब्दातली ही जादू आहे. या कवितेची ओरिजिनीलीटी काय तर अस्सल गावरानपणा. गंगाधर मुटेंच्या कवितामधून त्यांची अनुभूती अभिव्यक्त झाली आहे. त्यांच्या कवितेचा आवाका मोठा आहे. त्यांनी गझल लिहिली, त्यांनी लावणीपण लिहिली. एक लावणी तर इतकी सुंदर आहे की ती शेतकर्‍याची मुलगी म्हणते की “मला पावसात भिजू द्या.” तिला आता पावसात खेळायचे आहे. तिच्या मैत्रीनी म्हणतात की तिला मनसोक्त नाचू द्या. तिला स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या. तिच्या आनंद घेण्याच्या कक्षा तिला रुंदावू द्या. अडथळे आणू नका. असे ती लावणी सांगते. गंगाधर मुटेंच्या कवितेमध्ये ती सगळी विविधता भरली आहे. त्यांनी असं म्हटलंय की माझ्या आयुष्यात भाकरीचा शोध घेता घेता अर्ध आयुष्य निघून गेले आणि तारुण्यपणात पाहिलेले स्वप्न भाकरीच्या शोधातच उध्वस्त झाले. सुरुवातीला “बरं झाले देवाबाप्पा शरद जोशी भेटले” असे लिहिणार्‍या कवीची मध्यंतरीच्या काळात जणूकाही कविताच करपून गेली होती. मध्ये बराच मोठा अंतराळ गेला, पुन्हा त्यांची कविता बहरून आली आणि ते संघटनेचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांच्या कवितेचं स्टारमाझाने कौतुक केलं आणि त्या निमित्ताने आपण आपल्या परिवारातल्या कार्यकर्‍याचं कौतुक करीत आहो. मा. शरद जोशींनी ज्या दिवशी गंगाधर मुटेंच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली, मला असं वाटतं की यापेक्षा मोठं कौतुक या कवीचं दुसरं कोणतंच असू शकत नाही. आपण पुन्हा एकदा या कवीचं टाळ्या वाजवून जोरदार कौतुक करुया.

* * *
Satkar-4-2.jpg

समारोपीय भाषणात मा. शरद जोशी म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरिता त्यांच्या कौतुकाची काही बैठक झाली, समारंभ झाले असे कधी झाले नाही. कौतुक करावे असे प्रसंग घडले नाहीत असे नाही, पण आपण कुणाचं फ़ारसं कौतुक केलं नाही. अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या तर्‍हेच्या कामगिरीकरिता किंवा कौतुकाकरिता हा सत्कार समारंभ आहे. ज्या क्षेत्रामध्ये मुट्यांना पुरस्कार मिळाला आहे, ते क्षेत्र माझं आहे, हे लक्षात घ्यावे. मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गणकयंत्र विभागाचा प्रमुख होतो.
मी प्रामाणिकपणे सांगतो की, कुणाची सेवा करायची,कुणाची करुणा करायची या भावनेने मी कामाला लागलो नाही. अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशेब करून मी या कामाला लागलो. मी संयुक्त राष्ट्रसंघात राहिलो असतो तर भारताची राजकीय प्रतिष्ठा लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव,सेक्रेटरी जनरल त्याच्या खालोखाल डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदापर्यंत पोचलो असतो. पण मी जेव्हा मनाशी हिशेब केला की हिंदुस्थानातल्या दारिद्र्यनिर्मुलनाचे काम इतकं महत्त्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट,पराजय,अपमान सोसावे लागले तरी सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचीव होण्यापेक्षा या कामामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने, गणिताने मी या कामात पडलेलो आहे. माझ्यामध्ये काव्यशक्ती नाही हा मुद्दा मी वारंवार मांडलेला आहे.
मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथे माहीत नव्हतं. राजीव गांधींनी ते नंतर आणलं. आणि त्यावेळी माझ्याकडे पहिल्यांदा आयको-२ मॉडेल आलं, त्याचा उपयोग करून मी शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, याचं एक सॉफ्टवेअर तयार केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये मी तुम्ही दररोज जे काही कामे करता त्यापैकी कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे, कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे नाहीत, याचं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं होतं. पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा आणि त्यानंतर आपली चूक झाली आणि अजूनही शेतकरी संघटनेचं संकेतस्थळ अजूनही पूर्णं झालेलं नाही. सुरुवात झाली पण त्याला नियमितपणे अपडेटींग करणे शेतकरी संघटनेला फारसं जमलेलं नाही. याउलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी उदा. NGO ज्यामध्ये मेघा पाटकर, वंदना शिवा किंवा सुमन नारायण, यांच्या चळवळींना जनाधार जवळजवळ शून्य असताना, केवळ त्यांनी गणकयंत्राच्या हिशेबाने आपण फार मोठी संघटना आहे, हे दाखवलं. केवळ महसूलखात्याकडून किती शेतकर्‍यांनी आत्महत्यां केली, त्यांची नांवे, परिस्थिती यांची आकडेवारी घेऊन संकेतस्थळं तयार केली आणि मोठीमोठी पारितोषकं मिळवून गेली. आम्ही याबाबतीत फार कमी पडलो. अलीकडे या बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे. म्हात्रे सरांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ई-मेलने पाठवायला सुरुवात केली आहे. आणि अलीकडे या ब्लॉगमध्ये मी निदान दोन नावं घेतो. सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करताहेत. आज ना उद्या त्यांच्या कामालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मी आशा करतो. गंगाधर मुट्यांप्रमाणे ही मंडळीही या क्षेत्रात पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी, कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत होईल अशी मी आशा करायला हरकत नाही.
..............................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
पुठे असेच कार्य आपल्यास्डून घडो ही मनःपुर्वक शूभेच्छा

हार्दिक अभिनंदन. ह्या अत्याधुनिक जगाच्या अमिषाला बळी न पडता, ग्रामिण भागाच्या, शेतीच्या विकासासाठी तूम्ही जे काही व्रत घेतलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्याची जिद्द अन साहित्य संपत्तीचा ठेवा या दोन अनमोल गोष्टी तुमच्याजवळ सदैव राहूदेत हिच शुभेच्छा.

वाट चाल तू सूर्याची,
मागे वळूनी पाहू नको पून्हा,
क्षितीजा मिळेल दिशा ,
पाहूनी तुझ्या पाऊलखुणा... !

अभिनंदन मुटेसाहेब.

तुम्ही कवी आहात यापेक्षाही शेतकी व्यवसायात राहुन तुम्ही इंटरनेटप्रेमी आहात हे मला जास्त कौतुकाचे वाटते. इंटरनेटचा प्रसार या पातळीवर वाढला तर त्याचा फायदा शेतक-यांना होणार. भारतातील इतर शेतकरी काय करताहेत हे जाणण्यासाठी, हवी ती माहिती, हव्या त्या वेळी मिळण्यासाठी इंटरनेटइतके सोपे आणि प्रभावी माध्यम दुसरे नसावे. आणि आता bsnl ने ग्रामिण भागात शहरापेक्षाही कमी दरांमध्ये नेटसेवा उपलब्ध करुन दिली आहे.

तुमचे पुन्हा एकवार अभिनंदन. तुम्हाला चावलेला हा आंतरजाली किडा तुम्ही दुस-यानाही दाखवा आणि त्यांनाही चाववुन घ्यायला भाग पाडा. Happy

<< तुम्हाला चावलेला हा आंतरजाली किडा तुम्ही दुस-यानाही दाखवा आणि त्यांनाही चाववुन घ्यायला भाग पाडा.>>

सत्कार समारंभामुळे शेतकर्‍यांमध्ये इंटरनेट बद्दल कुतूहल निर्माण होवून नव्या पिढीमध्ये जिज्ञासा जागृत होईल, ह्यामुळेच मी या कार्यक्रमाला राजी झालो, नाहीतर मी चक्क नकारच दिला होता. Happy

अभिनंदन! तुम्ही करत असलेल कार्य खूपच महान आहे! मला तुमच्याशी बोलायला आवडेल. वेळ मिळाला तर इमेल करा.

मुटेजी,
मनःपूर्वक अभिनंदन व सलाम.
स्वतःच्या जीवनाबद्दलचे विचार इतके स्वच्छ व स्पष्ट असणं जरा दुर्मिळच !

गंगाधरजी ... मनापासून अभिनंदन... आपल्याला मिळालेला पुरस्कार हा योग्यच आहे...

येत्या रविवारी आपली भेट होईल अशी इच्छा होती परंतु मी कामावर निघून आल्यामुळे ती काही आता शक्य नाही...

आपली भेट लवकरच होईल अशी अशा करतो... पुन्हा एकदा शुभेच्छा...

मला कायम प्रश्न पडतोय तो असा की आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे भोगलंय, आमची अनुभूती, आमचा विचार पण तो आम्ही नाही लिहिणार, तो इतरांनी लिहावा. ....... मनातले बोल्लात .
मुटे साहेब तुमच बिपाशाला लुगड खुप फेमस झाले .

अभिनंदन

मुटेजी,
तुम्ही हे मांडलात ते खुप बरं केलतं !
तुमचं अभिनंदन खुप होणं हे तर अपेक्षितच आहे !
ग्रामीण भागातील एका शेतकरी आणि लढवय्या कवीचा हा सत्कार आहे,हे यात विशेष आहे !
Happy

मुटेजी

अभिनंदन.

ईकडे विदेशात पिकांच्या वाढीबद्द्ल आणि रोगांबद्द्ल बरीचशी माहीती इंटरनेट वर ऊपलव्ध असते.
तुम्हांला दुवे पाठवण्याचा प्रयत्न करीन.

जमल्यास शेतकरी हितासाठी त्याचा वापर करा

मुटेजी

हार्दिक अभिनंदन. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही करत असलेल्या कामाचा अभिमान वाटतो.

सर्वाचे मनःपुर्वक आभार. Happy

सदर कार्यक्रमाची चित्रफ़ित आपणास येथे पाहता येईल.

http://shetkari-sanghatana.blogspot.com/2010/11/blog-post_14.html
किंवा
http://gangadharmute.wordpress.com/vdo/

शेतकरी संघटनेची ही लुळी, कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत होईल अशी मी आशा करायला हरकत नाही.>>>>>>>>

मी हीच आशा करतोय,

मुटेजी, अभिनंदन नि पुढील कार्याला शुभेच्छा !!!

मनःपूर्वक अभिनंदम मुटेजी!
तुमच्या आत्तापर्यंतच्या कार्याला सलाम आणि भावी कार्याला शुभेच्छा!