सुपाएवढ्या काळजाची... साधी-भोळी माणसं :४: हिरा कोळीन...

Submitted by ह.बा. on 4 August, 2010 - 00:43

***********************************

"मने.... रांड परकर खाली सोड त्यो... आन लाळ पूसकी सटवे...
घुडी झालीस आजुक जराबी कळना का...."

मनी हवेत हात फिरवायची आणि फक्त ओठ हलवायची....

"काय म्हणलीस? आं? आं? कुत्रे... चांगली हुश्शार झालियास की आं... थांब तुझी चांबडीच लुंबिवते.."

हिरा कोळणीचा हा संवाद आणि मनीच्या पाठीत बसणार्‍या धपाट्यांचं पार्श्वसंगीत, मालखेडकरांच्या सवयीचं झालं होतं... कुणी हसायचं तर कुणी हळहळायचं. 'कुण्या जन्माचं भोग भोगतिया ही हिरी कुणास ठाऊक' म्हणून कुणी देवाला दोष द्यायचा. तर 'नवरा असा उत्तानखाट असल्यावर काय हुनार दुसरं' म्हणत कुणी नवर्‍याला दोष द्यायचं. हिरा मात्र दोष देण्यात वेळ घालवायची नाही... जास्वंदीचं टपोरं फूल आगीत टाकून देव ते जळण्याची वाट पाहत बसलेला पण वेदनेच्या सोंगट्या आपटून संकटांचा सारीपाट जिंकण्याचा मनसुबा असलेल्या विधात्याला या जातिवंत जास्वंदानं उत्तरही असं झणझणीत दिलं की आपल्यासारख्या प्रेक्षकानं देवाशी वैर पत्करून तिच्याच बाजूनं टाळी वाजवावी.

डोक्यावरचे पांढरे केस नेहमी विस्कटलेले, रंग गोरा पान, कपाळाला रुपायाएवढं ठसठशीत कुकु, लेकरांच्या काळजीनं आईचे व्हावेत तसे हळवे डोळे... नेहमीच, हडकुळा देह पण पाठीचा कणा नेहमी ताठ, अंगावरच्या नऊवारीचा पदर निळ्या दोर्‍यानं जोडलेला.

"तायसाब काम हाय का काय?"
"हिरा आगं रानात शेडाभवतचं गवात काडायचं हाय... आज जावन यं."
"जाते की लगीच, राती पैसं दिशिला न्हवं?"
"देते की गं... जा पटदिशी जावन यं"

पवाराची तायसाब हिरबायला काम देते, पन्नास रुपयाचं काम विस रुपयात होऊन जातं.. तायसाब खुश असते पैसे वाचले म्हणून आणि हिराची पैशासोबत रात्रीच्या कोरड्यासाची चिंता मिटते... पैसे घेताना 'तायसाब जरा कोरड्यास.." दोन भाकरी टाकल्या की पोराची आणि मनीची गंडारी होईल, नवर्‍याला आणि हिराला शिळ पाकं असतच. हिरा कामावरून परत येते. तयसाब तिला विस रुपये देतात. सोबत एका चेपक्या जर्मलच्या डिचकीत शीळं कोरड्यास देतात. आभाळाएवढं समाधान घेऊन हिरा पिलांच्या ओढीनं घराकडं धाव घेते. हिराचा दिवस असाच कुणाच्यातरी दारात पसरलेल्या पदरात उगवतो.... आणि कोरड्यासाच्या डिचकीत मावळतो.

चार माणसांचा संसार. नवरा फक्त नावाचा उत्तम, बाकी कामधंदा काही नाही. असलेली जमीन विकून दारूत घालवली आणि बायको पांढर्‍या पायाची म्हणून तिला दोष देत आयुष्य बसून काढलं. सकाळी हरहर महादेव करत सार्‍या देवळातून एक चक्कर टाकायची आणि पोटात शिळं तुकडं घालून बाहेर पडायचं ते रात्री कुणाच्यातरी खांद्यावरूनच परत यायचं. हिरासाठी तो फक्त कपाळ रंगवायचं निमीत्त होता आणि 'मोकळ्या कपाळानं सरणावर निजायची न्हाय म्या' म्हणत ती त्याच्या सगळ्या गरजा निमूट भागवत होती. लग्नानंतर पहिल्याच वर्षी मिनाक्षीचा जन्म झाला. देवानं लक्ष्मी घरात पाठवली. वर्ष झालं पण मनी बोलत नव्हती... उसळत नव्हती... रांगत नव्हती... हाक मारली तरी मनी बघायची नाही... भूक लागली तरी रडायची नाही. आईच्या कुशीत आणि शेणानं सारवलेल्या भुईत तिला काहीच फरक वाटत नव्हता. तोंडातून सतत लाळ येत रहायची. लेकीची आवस्था बघून हिरा हंबरडा फोडून रडायची... वेड्यासारखी तिला छातीशी कवटाळून 'मने बोल की गं माज्याबर...' म्हणत तिच्या प्रतिसादाची वाट बघत रहायची. महादेवाच्या देवळात जाऊन तिला देवासमोर ठेवायची 'तू तरी हाक मार माझ्या बाळाला' म्हणून त्याच्या नावानं बोटं मोडायची... देवरशी झाले दरवेश झाले पण मनीच्या डोळ्यात हिराला तिच्या दुधाची कणव दिसली नाही. कर्ज काढून डॉक्टरच्या दारात गेली. इलाज सुरू झाला आणि वर्षाभरात मनी हालचाल करू लागली, बारीक आवाजतली तिचं विव्हळणं कानावर येऊ लागलं तशी हिराच्या जिवाची काळजी कमी होत गेली...

"डाक्टरसायेब, लय उपकार झालं तुमचं... आता पोरगी पुरी बरी हुईल माजी"
"नाही मावशी, पुर्ण बरी नाही होणार ती पण तिला कळेल हळुहळू सगळं, बोलेल की नाही सांगता यायचं नाही... पण पुर्ण बरी नाहीच होणार"
हिरा क्षणभर कावरी बावरी झाली पण स्वतःला सवरत तिनं तेही स्विकारलं
"पार गप आसण्यापरीस हे बरंच की सायेब... माज्याच कर्माचं भोग म्हणायचं...."
आता मनी अशीच रहाणार हे गृहीत धरूनच तिचा संसार सुरू झाला. पांगुळगाडा धरून मनी चालायला शिकली. गेंगाण्या आवाजात हातवारे करत काहिबाही बोलायला शिकली. तिची भाषा फक्त हिरालाच कळते.
दुसर्‍या वेळी मात्र देवानं हिराच्या पदरात सुखाचं न पेलणारं फळ टाकलं... मनीच्या मागून दोन वर्षांनी जयवंतचा जन्म झाला, पोरगं गुटगुटीत होतं... सारखं किरकीर करायचं... जोर जोरात हात पाय झाडयचं... सगळ्या आळीला जाग यावी एवढ्या मोठ्या आवाजात रडायचं... रडत नसेलच ते... ते गावाला ओरडून सांगत असेल... हिराच्या आसवांना ओंजळ देणारा... तिच्या दुखःना टक्कर देणारा गबरू जयवंता तिच्या कुशीत आलाय. हिरा त्याच्यात बुडून गेली. नवराही खुशीत होता. मनी त्याला मांडीवर घ्यायची पण तिची लाळ अंगावर पडली की पोरगं उसळी मारून खाली पडायचं... मनी न समजणार्‍या भाषेत त्याला शिव्या द्यायची.

नवर्‍याचं दारूचं व्यसन, मनीचं वय, महागाई, पोटाचे हाल, पोराच्या शळेचा खर्च सगळच वाढत गेलं आणि हिराचं काळीज काळजीचा देव्हारा झालं. पदर खोचून हिरा दुप्पट ताकदीन कामाला लागली. दिवसभर भांगलणीला जायचं आणि संध्याकाळी मिस्रीच्या पुढ्या भरायच्या, वाकळा, दुपटी, ताडपदर्‍या, टकुची शिवायची. संसार सावरत होता. नवरा आता काम करणार नाही हे तिला कळालेलं होतं. पण तिनं त्याबद्दल कधी त्रागा केला नाही. जयवंता शाळेत हुशार निघाला. दर वर्षी चांगल्या मार्कानं पास व्हायचा. मास्तर घरी येऊन सांगून गेले, 'हिरामावशी, पोराला शिकीव बरं का... पोरगं हुशार हाय बग'. त्या दिवशी हिरानं पोराची लाल मिरच्या घेऊन दृष्ट काढली. मिरच्या चुलीत टाकून कडाकडा बोट मोडली. त्या मिरच्यांचा ठसका उरात भरून ठेवला... पोरगं शिकून नोकरीला लागत नाही तोवर ती तो ठसका तसाच जपणार होती. त्याला कुणाची दृष्ट लागू देणार नव्हती.

ऐन पुरात नदीकाठचा नाजूक तत्तू भरकन वाहून जावा तसे काबाड कष्टात दिवस निघून गेले... मनी पंधराची झाली... देहाला निसर्गाच्या नियमांनुसार बदलाव लागलं... गरळ्या, गेंगाण्या मनीकडे बघणार्‍या किळसवान्या नजरा बदलतील असं वाटत नव्हतं... पण गिधाडांच्या कुळाला मानवतेचा गंध नसतो... त्यांच्या कत्तलीच कराव्या लागतात... वासराचा हंबरडा ऐकून तो खदखदून हसत होता... सश्यासारखी भित्री, वेडी, भाबडी मनी किंचाळताना तो वासनांध होऊन तिला ओरबाडत होता. आपल्यासोबत काय घडतय याची कल्पना तिला नव्हती... पाटलाच्या रानात जयवंता पळत आला...
"आये मनीला मारलं गुज्या तात्यानं..."
भाबड्या जयवंतानं रडत रडत हिराला सांगीतलं आणि हिरा वार्‍यासारखी पळत सुटली... अर्ध्या अंगावर चादर घेऊन, फाटक्या पोलक्याला लागलेलं रक्त आहे तसं घेऊन आईची वाट बघत मनी अंगणात थांबलेली... बाण लागलेल्या पाडसाकडं बघताना धीर एकवटू शकेल एवढी शक्ती तिच्यात नव्हती... बेशुध्द होऊन हिरा कोसळली... अस्ताव्यस्त कपड्यातली मनी सरपटत येऊन तिच्या गळ्यात पडून ओरडायला लागली...

हिरा शुध्दीवर आली... पण ती जिवंत नव्हती... भांगलणीच्या पातीवर तिला भोवळ यायची. काम सोडून मधेच पळत घरी जायची. कधी कधी तर मनीला सोबत घेऊन कामावर जायची. तिच्याच्याने काम होत नव्हतं. मदत म्हणून लोक तिला कामाला बोलावत होते पण किती दिवस? स्वतःचा तोटा कोण करून घेईल? हिराला काम मिळायचं बंद झालं. घरी हाल सुरू झाले. नवरा काहीच करत नव्हता वर सारखा आ़जारी पडत होता... पोटात दुखतय म्हणून रात्र रात्रभर ओरडत होता. जयवंता दहावीला गेला. शाळेतून पैशासाठी सारखे सांगावे येत होते.
" आये म्या सोडू का शाळा... कामाला जातो म्या"
"नको रं... मी हाय की"
"न्हाय गं माणसं म्हणत्यात तुला काम जमत न्हाय आता... कशाला करती... मी हाय की"
"नको एवडी धाव्वी कर मग बगू"
"पण पैसं भराय लागतीली... मास्तर छडी मारल उद्या"
"उद्या परवा बगते मी..."
बघते म्हणालेली पण हिराच्या समोर काहीच मार्ग नव्हता. आणि तिला उठून कामाला लागावसंही वाटत नव्हतं. दुसर्‍या दिवशी जयवंता शाळेतून आला. लाल डोळे रडल्याचा पुरावा देत होते. जेवताना डाव्या हातानं जेऊ लागला.
"हाताला काय झालं रं?" हिराला अंदाज असून तिनं विचारलं.
"मास्तरनं छडी दिली.... मला सोसत न्हाय मारल्यालं... पण मारूदे, आये तू माझी फी भर मला शिकून नुकरीच करायची हाय. मग बग कसा पैसा मिळीवतो."
हिराच्या काळजातला तो ठसका जागा झाला. ह्या मनीच्या पायात जयव्याचं हाल नको.

रानात जायचं म्हणजे मनीची काळजी होती पण जयवंताची शाळाबी महत्वाची होती. मग तिनं गावात राहुनच काम करायचं ठरवलं...
"तायसाब, सारवून काडायला, शेंगा फोडायला, वाकळा शिवायला घरातली कामं करायला मला बोलवा बरं का... पोरीसाठी घर सोडवना वं... गावात र्‍हाऊन तेवडाच हातभार व्हईल"

बड्या घरच्या बायकांची सोय झाली. पहिल्यापेक्षा हिरा सावरली आहे हेही लोकांच्या लक्षात आलं. ते तिला रानातल्या कामाला बोलावत होते पण ती नकार द्यायची. मनीसारखाच कुणी बघून लग्न होतय का ते ती पाहत होती पण ते अशक्य होतं. लोक पन्नासाचं काम तिच्याकडून विसात करून घेत होते. वर तिला शिळी भाकरी, कोरड्यास जे राहिल ते देत होते. हिरानं खोचलेला पदर काढून तो पसरायला सुरूवात केलेली पण लेकरांच्या सुखापुढं तिचा स्वाभिमान शुन्य होता.

जयवंता दहावी पास झाला. कासेगावला एका कापडाच्या दुकानात नोकरी करून आकरावी करू लागला. हजार रुपये पगार होता. हिराचं घर तेवढ्यात सहज चालंल असतं पण नवर्‍याची दारू, त्याच्या आजाराला दवा द्यायला पैसे हवेच होते. हिरा थांबली नाही मनी आहे तशीच होती....

एका रात्री उत्तमच्या पोटात असह्य वेदना व्हायला लागल्या. गुरासारखा ओरडायला लागला... शेजार्‍यानी कृष्णा चारिटेबलला नेऊन टाकला. पैसा लागणारच होता. हिरा मिळेल ती कामं करू लागली. जयवंता बापाजवळ थांबलेला... चार दिवसांनी हिरा थोडे पैसे जवळ घेऊन दवाखान्यात गेली... कुणाला आत सोडत नव्हते... हिराची काळजी वाढली.
"आये मलाबी आत सोडल्यालं न्हाय... डाक्टरला भेट तू जाऊन" जयवंतानं डोळे पुसत सांगितलं.
हिरा लोकांना विचारत विचारत डाक्टरकडं गेली.
"डाक्टरसायेब कशी हाय तब्बेत ह्यंची"
"मावशी, किती दारू पिलाय हा माणूस?"
"खरं हाय पर आटा आमी तरी काय करणार... आयकलच न्हाय आमचं"
"मी तरी काय करणार... जास्त दिवस नाही जागायचा तो..."
क्षणभर त्या डॉक्टरचा राग आला तिला पण लगेच ती शांतही झाली. एवढी शांत ती आयुष्यात कधीच झाली नव्हती. पैसे जयवंताकडं देऊन ती गावात परतली. आहे तोवर दवापाणी करावं लागणार होतच. कामं सुरू झाली. पण पहिल्यासारखी पदर पसरून नाही. हिरा शांत दिसत होती... समाधानी दिसत होती... पहिल्यापेक्षा कणखर आणि ठाम दिसत होती. मनीच्या हातवार्‍याकडे न बघताच ती तिच्याशी बोलत होती. मनी चिडचिड करत होती... हिरा तिला समजावत होती...
"मने.. रांड परकर सरळ खाली ठेवावा बाय... गराळ पुशीत जा सारखी... कुणाला अंगाला हात लावू द्यायचा न्हाय... कुणी जवळ आलं की वरबडायचं... चावायचं... वरडायचं जोरजोरानं... कळलं का मने? आं... शानं माझ पाडसू गं... यकटं र्‍हाया शिकायचं बरं मने... यकट र्‍हायाचं.... जयवंताला सांभाळायचं, मग तुजी वयनी ईल... माझ्यासारकीच आसलं बग... तिला कळल तुझी भाषा..."
मनी फक्त ऐकत रहायची आणि हिराचं बोलून झालं की तिच्या गळ्यात पडून काहिबाही बडबडायची...
सात दिवस झाले उत्तम दवाखाण्यात होता. हिरा पैसे देऊन आलेली. कामं चालूच होती...
"हिरावंन्स... आज सारवून घिवया का? समद घर सारवुया.. दोनशे रुपय देते"
"व्हय तायसाब.. घिवया की... पैस लागणारच हायती मला..."
"जा मग मनीला घिऊन या... बसल हितच"
"कशाला.... आता र्‍हाती माजी मनी यकटीच... लय धाडशी झालीया"

सारवान सुरू झालं... पाण्यात माती कालवून हिरानं त्यात बोळा भिजवला... वाड्याच्या भल्या दांडग्या भिंतीला उंच लावलेल्या शिडीवर एकेक पायंडा हळूवार चढली... एक पायंडा उत्तमचा... एक पायंडा मनीचा... एक पायंडा जयवंताचा.... एका लयीत तिचा हात भिंतीवरून फिरायला लागला... एक हात उत्तमचा... एक हात मनीचा... एक हात जयवंताचा... "जास्त दिवस नाही जगायचा तो"... मने रांडं यकटी र्‍हायाला शीक बाय.... जयवंताला सांबाळ.. तुजी वयनी ईल बग... माज्यावानीच असलं तिला कळलं तुजी भाषा.... जयव्या सायब हू बाबा... आयच्या कष्टाची जाण ठेवं.... 'जास्त दिवस न्हाय जगायचा तो'... पायाची पकड निसटली... वरच्या पायंड्यावरून कोसळलेली हिरा जमिनीवर येईपर्यंत ओरडलीही नाही... डोक्यातून रक्त आलं... पवाराच्या तायसाब भितीन ओरडत बाहेर पळाल्या... आळित दंगा झाला माणसं गोळा झाली... हिरा उचक्या देत होती... मने.. मने... म्हणत होती. लोक मनीला घेऊन आले... रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई बघून मनीनं हंबरडा फोडला... जन्मापासून निशब्द मनीच्या तोंडुन गावानं "आई" च्या नावाचा हंबरडा ऐकला... पण ती हाक ऐकायला हिरा होती की नाही कुणालाच कळलं नाही.... गेंगाण्या आवाजात मनी तिच्या देहाला कवटाळून 'आंय्येंग्गे...आंय्येंग......आंय्य......' म्हणत होती... हिरा शांत पडलेली... मनीच्या कुशीत आणि शेणानं सारवलेल्या भुईत तिला काहीच फरक वाटत नव्हता. आई बोलत का नाही हे बघून मनी आक्रोश करत होती... वेड्यासारखी तिला छातीशी कवटाळून बोल म्हणत होती... हिरा बोलणार नव्हती, तिच्या कपाळावरचं कुंकू मात्र भलतच टवटवीत झालेलं... 'मोकळ्या कपाळानं सरणावर निजायची न्हाय म्या....'

रस्त्यांला नावं द्यावं असं काही तिनं केलं नाही... कुणि तिचं नाव कुठल्या रस्त्याला दिलही नाही... तिनं देश राखला नाही, दान दिलं नाही, सेवा केली नाही, नेता झाली नाही.... शिखर चढली नाही... मग सुपाएवढ्या काळजाच्या माणसांमधे तिची जागा काय? 'तिनं असं काय केलं की तिच्याबद्दल लिहावं? हे लिहायला नको होतं का? ती खरचं सुपाएवढ्या काळजाची होती का मलाच छोट्या छोट्या गोष्टीत गुंतायची सवय आहे? कहिही कळत नाही... हिरा सामान्य वाटली तर... क्षमस्व!!!

गुलमोहर: 

.

निशब्द...
हबा आजचा भाग अप्रतिम लिव्हलायस... खरच निशब्द झालो बघ...डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या कळलच नाही.

का वाचलं असं झालय मला. नुसतं वाचण्यानच ही अवस्था तर भोगताना केवढ मोठं काळीज लागलं असेल? सुप तर खूपच लहान झालं रे!
डोक नुसतं सुन्न झालय. कायमच डोक्यात रहाणार हे. Sad

मस्त हबा मस्त !

एक खरं सांगु ...वासु बामण अन धना मधे ..त्या व्यक्तींची व्यक्तीचित्र अन तुझी शैली मस्त हातात हात घेवुन चालतीये असं वाटंत होतं ..पण .मॅडम अन हिरा मधे तुझी लेखनशैली जरा पुढे पळतीये असं वाटंलं ... अजुन रंगव रे त्या व्यक्तींचे पैलु ...अजुन खुलव त्यांचे व्यक्तीचित्र ... ... (लेख मोठ्ठे झाले म्हणुन आवडले नाहीत असं कधीच होत नसतं )

मित्र म्हणुन बोललो ...प्रेमळ सल्ला ...टीका म्हणुन घेवु नकोस .

बाकी हे खरंय ...की ही जी माणसं भेटतात त्यांच्या विषयी कितीही लिहिलं तरी आपल्याला जाणवलेले ते भोळे पण व्यक्त करणे अवघडच जाते .....

(अवांतर :माझ्या ओळखीतले हे एक उदाहरण
.......काही वर्षं पुर्वी आमच्या घरी पंढरीनाथ यायचे ..दर सोमवारी ...नाग घेवुन ...मग आम्ही सगळी लहान लहान मुलं ..तो नाग ..मग कसा पकडला ..मग दात काढले का ...मला द्याकी ..वगैरे वैगैरे गप्पा मारत बसायचो ..मग तेही एक एक सांगत बसायचे ..मग त्यांचं गाव ..नाग पकडण्याच्या गोष्टी..गावच्या गोष्टी ...शिकारी ...वगैरे वगैरे ....

आता ह्या मानसाविषयी कितीही लिहिलं तरी मला शब्द अपुरेच पडतील

असो .)

पुलेशु

सर्वांचा खूप खूप आभारी आहे!!!

पंत,
आपण लिहीले आहेत त्यापैकी काही भाग समजला. काही डोक्यावरून गेला. क्षमतेनुसार लिहीण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण वाचता आहात हे बघून बरे वाटले. मार्गदर्शन करता आहात हे वाचून तर आनंद झाला. आपल्या सल्ल्याला टीका समजणार नाही.

आभारी आहे!!!

मनीचं काय झाले पुढे ? >>> आहे गावात. भाऊ सांभाळतो आहे. तब्बेत खूपच खराब झालीये. एक दोन वर्षे राहिली तरी खूप. अशी अवस्था आहे.

Sad काहिच बोलावेसे वाटत नाही आहे..
ह्.बा. एक विचारू का... या सत्यकथा आहे का? म्हणजे तुम्ही या माणसांना ओळखता का?

या सत्यकथा आहे का? म्हणजे तुम्ही या माणसांना ओळखता का?
>>> नक्कीच. वासू बामण आजही आहे. धना तर माझ मित्रच होता. प्राचार्य दिपा देशपांडेना तुम्ही आजही आष्टा कॉलेजवर जाऊन भेटू शकता. मनी आजही गावात आहे. सगळी खरी माणसं आहेत. आपल्या आजुबाजूला लिहीण्यासारखं इतकं आहे की कल्पना वगैरेच्या जास्त भानगडीत पडावच लागत नाही. या कथेत फक्त नावं बदलली आहेत. आणि मला सुचेल तसा शब्दांचा वापर केला आहे. पण यात विषेश काही नाही. या गोष्टी गावोगाव ऐकायला मिळतील.

खुप छान लिहता ओ तुम्ही ... अगदी छोट्या छोट्या गोष्टिंतून खुप काही सांगून जाता...
तुमची लेखनशैली तर अप्रतिम Happy

जुईला अनुमोदन!! खरच या सत्यकथा आहेत का? म्हणजे तुम्ही या माणसांना ओळखता का? ??

सर्वांचा खूप खूप आभारी आहे!!!

वर्षू नीलजी,

याचे उत्तर मी वर दिले आहे. अगदीच खात्री करायची असेल तर सगळे एकदा माझ्या गावी कृषी पर्यटनास जाऊ. काका, मनी तिथे दिसतील. आष्टा कॉलेजला फोन करा आणि देशपांडे मॅडमशी बोला. धना तेवढा गेला आहे.

हबा,

१. हे असे लेख म्हणजे खरे तर समाजकार्यच म्हणायला हवे. खरेखुरे! त्या माणसांच्या महानतेचे काही प्रमाणात मोल तरी तुमच्या प्रतिभेतून करतोय ईश्वर!

२. आणखीन एक सुंदर फूल ओवलेत माळेत!

३. 'ती जिवंत नव्हती' या वाक्याने माझा बराच वेळ गोंधळच झाला होता.

४. खरेखुरे जग निरखले तर कल्पनेतील लिहावेच लागत नाही हे आपले विधान पूर्णपणे मान्य आहे. मी खर्‍याला कल्पनेचा मुलामा देतो. कारण मी जे लिहीतो ते त्या त्या माणसांना त्यांच्याबद्दल लिहीलेले आवडणार नाही. कारण त्यात त्यांचेहॉ दोष दाखवलेले असतात. तुम्ही खरे आहे ते मांडता! कारण तुम्ही लिहीलेले त्या माणसांना नक्कीच आवडेल.

५. वासू बामण आणि प्राचार्यांप्रमाणे आपली प्रभावी शैली या लेखात तितकी प्रभावी मला तरी वाटली नाही. मात्र वासू बामण आणि प्राचार्यांच्या तुलनेत हिरा हे व्यक्तीमत्व या मालिकेत समाविष्ट होण्यास सर्वाधिक पात्र आहे असे मला वाटते.

६. आपण या सर्व मालिकेचे एक पुस्तक केलेत तर फारच सुंदर होईल ते!

७. अजून अनेक व्यक्तीमत्वांच्या वर्णनांच्या प्रतीक्षेत आहे.

८. एवढे सगळे लिहून झाल्यानंतर आणि शेवटी 'हिरा' हे व्यक्तीमत्व डोक्यात घोळत असताना शेवटचा प्रभाव इतकाच राहतो की ...

.... तुमचे मन सुंदर आणि संवेदनशील आहे.. त्याला व्यक्तीकरण करण्याची ओढ आहे हे वाचकांचे सुदैव!

-'बेफिकीर'!

निशब्द...
हबा आजचा भाग अप्रतिम लिव्हलायस... खरच निशब्द झालो बघ...डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या कळलच नाही.

संपुर्ण अनुमोदन.

हिराची झुंज अपुर्ण राहीली असे खुप जाणवतेय. जयवंताचे पुढे काय झाले?

व्यक्तीचित्रण चांगले लिहीलय.
आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक असतात, त्यांच्याबद्दल असे शब्दात उतरवण्याची कला तुमच्याकडे आहे हे खूप चांगलय.

सुरेख लिहिलंय ह. बा.
हे व्यक्तिमत्व कल्पनेने रंगवलेले नसून खरेखुरे असले तरी लेखाचे श्रेय लिहिण्याच्या शैलीलाही आहे.

काय प्रतिक्रीया देऊ तेच समजत नाही आहे. हीरा ला सलाम. जयवंताचं चांगलं झालच असेल. मनीचं पुढे काय झालं हीच काळजी वाटतेय.

फारच सुन्न करणारं आहे सगळं! माझ्या मते शेवटचा पॅरा नको होता.. कारण, त्यात जे लिहीलंय ते सगळं वाचकांपर्यंत लेखातून पोचलेलच आहे.

ती जिवंत नव्हती....ह्या वाक्याने माझाही गोंधळ झाला.
बाकी लेख वाचून नि:शब्द !

Pages