उसासे..

Submitted by जो on 10 December, 2010 - 04:54

ढगाळ वातावरण हातात चहाचा गरम प्याला, आणि ऐकावं "मी मज हरपून बसले गं", दुस-या ओळीच्या शेवटी येणाऱ्या "गं" वर एक लांब उसासा टाकावा.. हा उसासा आपलं मन हरपून बसल्याच्या भावनेनं नाही तर आशाच्या कातील आवाजाने मनात उभ्या केलेल्या आपल्या नसलेल्या आणि गाणं म्हणता म्हणता तिच्या झालेल्या श्रीरंगाच्या आठवणीनं...
असे कितीतरी उसासे टाकायला लावणारे आणि आपलं अस्तित्व जाणवून पुढे जाणारे क्षण या सगळ्याच प्रतिभावान व्यक्तींनी मोठ्या ताकदीने उभे केले आहेत... मग आशाचं "तरुण आहे रात्र अजुनी" गाणं असो.. किंवा गुलजारची कुठलीही कविता.. प्रत्येक कलाकृती देवत्व लाभल्यासारखी... ती कलाकृती त्याला निर्माण करणाऱ्यांनी जेवढी जगली त्याहीपेक्षा अधिक त्या कलाकृतींनी तिचा आस्वाद घेणाऱ्यांना जगवलं... प्रत्येक ओळीगणिक, प्रत्येक स्वरागणिक त्या सगळ्याच कलाकृतींनी हृदयाचा ठाव घेतला आणि उसासा टाकायला भाग पाडलं..
असे कित्येक उसासे..
"रातराणीच्या फुलांचा.. गंध तू लुटलास का रे? " म्हणतानाचं आवाजातलं नेमकं मार्दव.. आणि तेवढ्याच एका अनामिक आर्ततेनं म्हटलेलं "सावन के कुछ मिठे मिठे पल रख्खे है".
ह्या सगळ्या ओळी जगली असेल नं आशा?
गुलजार-आशा-आरडी या त्रयीच्या संगमातून तयार झालेली गाणी म्हणजे अगदी अंत.. त्यापुढे अक्षरशः काहीच नाही.. मग "जिंदगी है... बेहने दो.. प्यासी हू मै प्यासी रेहने दो" चा जिंदादिलपणा असो की "रातभर काजल जलें" ची एक बेचैनी ... किंवा " आज भी नं आया कोई" म्हणतानाची आर्तता... सगळंच सगळंच कसं... गगनाला भिडलेलं, उत्तुंग.. मोठं... यासगळ्यावरही एकंच तोकडा उसासा टाकण्याशिवाय आम्हा पामरांकडे काही उपायच नाही..
एखाद्या शांत दुपारी.. गुलजारचं एखादं पुस्तक उगाच हातात घ्यावं... उघडावं कुठलंही पान.. आणि प्रत्येक पानातली प्रत्येक ओळ पुन्हा पुन्हा जगावी... त्याचा आवाज नं ऐकूनही ऐकल्याचा भास व्हावा.. त्याच्या आवाजातला खर्ज पुन्हा पुन्हा अनुभवावा... आणि बस्स... एकच उसासा टाकावा...
"तुम्हारे हाथोंमे मैने अपनी लकीर देखी है सोना" म्हणणारी तुमच्यातली प्रेयसी असो... किंवा "छोटे थे.. मा उपले थापा करती थी" वाचताना उकिडवे बसून आईला गोव-या थापताना पाहिलेली लहानशी मुलगी असो... ह्या स्वतःच्या आयुष्यातल्या भूमिका पुन्हा पुन्हा जगायच्या आणि प्रत्येक उसास्याला एक महत्त्वं प्राप्त करून द्यायचं.. नव्हे आभारच मानायचे... गुलजारच्या निर्मितीवरची शब्दातीत प्रतिक्रिया केवळ एका उसास्याने व्यक्तं करता येते म्हणून..
मनाच्या अगदी विचित्र अश्या अवस्थेत "हाथ छूटे भी तो रिश्ते नही छोडा करते" ऐकताना मनात नक्कीच असं येऊन जातं की असं काहीतरी लिहावं गुलजार ने.. म्हणावं जगजीत ने आणि ऐकावं कुणीही.. काळजात आतवर काहीतरी दुखल्यासारखं होणार हे मात्र नक्की....
"शहद जीने का मिला करता है थोडा थोडा" ऐकत असताना असे कितीतरी मधासारखे क्षण डोळ्यापुढे तरळून जातात जे वाळूसारखे निसटून गेले आहेत खरे पण त्यातली अवीट अशी गोडी अजूनही कायम आहे.. आणि तीच गोडी टिकणार आहे..आयुष्यभर..
या सगळ्या शब्दांचे संदर्भ, त्यांचे अर्थ ज्याचे त्याने वेगवेगळे लावावेत.. अगदी नुकत्याच वयात आलेल्या मुलापासून ते जख्ख म्हाता-या आजी/आजोबांच्या मनात धुडगूस घालून वेळप्रसंगी मन उध्वस्त होईल इतकं त्या प्रत्येक शब्दांचं सामर्थ्य आहे..
"डाका तो नही डाला.. चोरी तो नही की है" हे म्हणावं फक्त गुलाम अलीनेच.... काही उर्दू शब्द नं कळूनही गाणं थेट काळजाला हात घालतं.. यात गायकाला काय समाधान मिळतं देव जाणे पण श्रोता मात्र दारू नं पिताही झिंगल्यासारखा होतो.. ही सगळी जादू शब्दांची, संगीताची, गायकाची की श्रोत्याच्या मनाची.. सगळेच प्रश्न अनुत्तरित.
खरंतर कुठल्याही कलाकृतीच्या निर्मितीमागे निसर्ग ही एक प्रेरणा असू शकते.. जो सगळ्यांसाठीच सारखा आहे.. पण सुरेश भटांनी आपल्या कवितेत गुंफलेली रातराणी बाकी कुणालाही तितक्या प्रेमाने गुंफता आली नाही, किंबहुना माझ्या मनाला तेवढी भिडली नाही यांतच सगळंकाही आलं.. ह्या सगळ्या कलाकारांच्या ठायी असलेली प्रतिभा हेच ते आगळंवेगळं मिश्रण... मिडास टच...
ह्या सगळ्या कलाकृतींची अजून एक खासियत म्हणजे तुमच्या मनस्थितीशी तिचं काही घेणंदेणं नसतं..... अजिबात नाही..
त्या सगळ्यांना फ़क्तं आपल्याला भरभरुन काहीतरी द्यायचं असतं... कधी उद्विग्न मनस्थितीत असताना, ह्या कविता, ही गाणी, थोडक्यात हे एलिमेंट्स... चार शब्द सुचवून जातील नाहीतर डोळ्यात अश्रूंचं एक मोठं तळं तरी करून जातील.. आनंदी असाल.. तर आनंद द्विगुणित करतीलच पण त्या आनंदातही अंतरंगात डोकावून पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करतील..
कदाचित म्हणूनच गुलजार असो, आशा असो, आरडी असो, गुलाम अली, जगजीत किंवा सुरेश भट असो... ह्यांसारख्या प्रतिभा पुन्हा बघणे नाही.... पुन्हा जगणेच नाही..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फार सुंदर लिहिलं आहे...
>>>कदाचित म्हणुनच गुलजार असो, आशा असो, आरडी असो..किंवा सुरेश भट असो...ह्यांसारख्या प्रतिभा पुन्हा बघणे नाही....कदाचित..पुन्हा जगणेच नाही >>>

खरं आहे...हे सगळं आहे म्हणून ह्या जगण्याला एक वेगळा अर्थ आहे...एक वेगळी मिती आहे...!

लेख सुंदर..अगदी माझ्या भावना जशाच्या तशा..

बाय द वे
"आजकल पाव जमींपर नही पडते मेरे" आणि "आपकी बदमाशीयोंके ये नये अंदाज है"("आप की आखो मे कुछ") ही लताची आहेत. आशाची नाहीत.

<< ह्या सगळ्या ओळी जगली असेल नं आशा?>>
"भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लगले
एवढे मी भोगले की मज हसावे लागले" सुरेश भटांच्या या ओळी वाचताना पुढचे काही दिसेनासे झाले तेव्हा कळले की डोळे भरले आहेत......इति आशा.

मस्त लिहिलंय. गुलझार-आशा-आरडी सगळेच अतिशय आवडते !
मनस्मिला अनुमोदन.
अवांतरः " ये कहां आ गए हम.." ह्या गाण्यात लता जेव्हा ' हुई और भी मुलाssयम मेरी शाम ढलते ढलते ' म्हणते,तेव्हा ते ऐकताना प्रत्येकवेळी सांगता न येण्यासारखा आनंद होतो ! खरंच अतीव मुलायम असं काहीतरी मनावर फिरतंय असं वाटतं.

बर्‍याच जणांना गुलझार कळत नाही.. किव येते त्यांची..कुठल्या अनंदाला मुकत आहेत हे लोक ते त्यांना ठाउक ही नाहीये Happy
I love gulzaar!!!
खुप आवडला लेख Happy

एखाद्या शांत दुपारी..गुलजारचं एखादं पुस्तक उगाच हातात घ्यावं...उघडावं कुठलंही पान..आणि प्रत्येक पानातली प्रत्येक ओळ पुन्हा पुन्हा जगावी...त्याचा आवाज नं ऐकुनही ऐकल्याचा भास व्हावा..त्याच्या आवाजातला खर्ज पुन्हा पुन्हा अनुभवावा...आणि बस्स...एकच उसासा टाकावा...

मिडास टच...
>>>> अगदी अगदी... सुरेख लेख..! Happy