सुपाएवढ्या काळजाची... साधी-भोळी माणसं :३: प्राचार्या...

Submitted by ह.बा. on 8 November, 2010 - 00:53

*****************************************************

बांधिव कट्टा असलेल्या दीपमाळेसारखा साजरा... सुरक्षीत जन्म प्रत्येकालाच कसा मिळावा? पाया आज्याचा, भिंती बापाच्या अन कळस आपला हे नशीबही भाग्यवंतांनाच मिळत असावं नाही का? कळत्या वयात पहिल्यांदा जेव्हा आपल्या आयुष्याच्या पायाची वाताहत लक्षात आली तेव्हाच आयुष्याची पालखी माणुसकीच्या भरोश्याने जोतिबाच्या सासणकाठीसारखी उंच हवेत फडकावून दिली.... परिस्थीतीच्या तुफान वार्‍यावर अपेक्षांच्या होणार्‍या चिंध्या पकडून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत हेलकावे खात राहिलो... तोल सांभाळायला तोरण्या कुणी धरल्या की नाही याची काळजी कधीच वाटली नाही... बर्‍याच वेळा तोंडावर पडलो... वैतागलो... पण थांबलो नाही. पुन्हा उभा राहिलो... समाजाला... त्यातल्या माणुसकीला मनातल्या मनात विनवत राहिलो. देवावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल पण माणसावर विश्वास ठेवायलाच हवा... माणूसच माणसाचा खरा देव असतो... दुडू-दुडू धावताना धापकन तोंडवर आपटल्यावर धोतराचा सोगा आवरत उठवायला येणारा परका म्हातारा... 'मावशी पाणी देता का?' म्हटल्यावर 'आत ये ना बाळा.. उनात का थांबला' म्हणणारी परकी बाई.... लाखोंच्या गर्दीतही एकमेकाला सावरणारे वारकरी... स्वतः उभा राहून म्हातार्‍या माणसाला बसायला जागा देणारा तरूण... गिर्‍हाईकाच्या काखेचं तान्हं पोर बघून लिमलेटची गोळी देणारा चिक्कु वाणी... असा कितीतरी वेळा माणूस देता होतो... दाता होतो.... त्राता होतो.... देवगुणाचा होतो... देव होतो आणि देत राहतो....

पहिलीपासून आजोळी आज्जीसोबतच राहिलो. सख्खा मामा नाही त्यामुळं घराचा भार आजीवर. दहावी झाल्यावरच शाळा बंद करायला सांगितली. माझ्या सुदैवाने मला मुलाच्या मायेनं विध्यार्थांकडे पाहणारे गुरूजी आणि बाई मिळाल्या. प्राथमिक शाळेतल्या या शिक्षकांनी पुस्तकांच्या मखमली वाटेवरून ज्ञानाच्या रम्य नगरीत मनसोक्त भटकण्याचं व्यसन लावलं होतं. बारावी पर्यंत काम करत इतरांची मदत घेत शिकलो. बारावी पास झालो. आज्जीला सांगितल्यावर तिनं मायेनं जवळ घेतलं आणि म्हणाली...
"कारणापुरती झाली की साळा.... आता बास कर की"
मला तिचा प्रचंड राग आलेला. पण तीचंही बरोबरच होतं. आणि आता मलाही तसच वाटू लागलं होतं. शिक्षण बंद करायचंच ठरलेलं पण ऐन वेळी माझ्या हट्टी मनानं राडा केला...निदान एक वर्ष तरी महाविद्यालयात जाऊन यायचच असं ठरलं आणि आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज कासेगाव मधे बीए च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला.

कॉलेज सुरू झालं... माझ्या वर्गातले नुकतेच बारावीतून पुढे आलेले ते रंगबिरंगी थवे बघितले की आपण अ‍ॅडमिशन घेऊन चूक केली नाही हे मनोमन पटायचं... वातावरण कसं आल्हाददायक होतं... एस्.टी.डी चा तास होता मोरे सर वर्गावर आले... उत्साहाच्या भरात त्यानी देव सोमरस म्हणजेच दारू प्यायचे आणि राम व भावंडांचा जन्म याबाबतीत 'फळे खाऊन कुठे मुले होतात का?' अशी हीन दर्जाची मते मांडली... सवयीप्रमाणे मला टोकाचा राग आला... तडक उठलो आणि लायब्ररीत गेलो. मराठी विश्वकोषाचे खंड मागितले आणि सोमरस म्हणजे काय ते शोधून काढले.
'सोमरस = सोम नावाच्या वनस्पतीपासून हा रस काढला जातो. पुर्वी तो यज्ञात ज्वलनशील व आरोग्यदायी पदार्थ म्हणून वापरला जाई व पिण्यासाठीही वापरला जाई पण त्याचे परिणाम तात्काळ न दिसता बर्‍याच दिवसांनी शरीर बलाढ्य होणे... कांती सतेज होणे... असे दिसतात. आजही ही वनस्पती अफ्रिकेच्या जंगलात मिळते.' सोमरसाची सगळी लक्षणं तुपाशी जुळणारी आहेत. हे लिहून घेतलं आणि दुसर्‍या दिवशी मोरे सर वर्गावर येण्याची वाट बघत बसलो. सर आले...
"सर काल तुम्ही दोन अत्यंत चुकिची विधानं केलीत"
"नाव काय बाळा तुझं?"
"हणमंत शिंदे"
"काय बोललो मी?"
"देव सोमरस म्हणजेच दारू पीत होते आणि फळे खाऊन कुठे मुले होतात का?"
"बर मग तुझ्या ज्ञानाची मुक्ताफळं काय सांगतात?"
"हे वाचा..."
कागद समोर ठेवला... सरांनी तो वाचला... चेहर्‍यावरचा राग स्पष्ट दिसत होता. वर्गात कुजबूज सुरू झाली होती. काहीजणांनी मला वेल डन म्हणून पाठींबाही दिला होता.
"मग काय म्हणनं आहे तुझं?"
"हिंदु दैवतांविषयी बेजबाबदार बोलल्याबद्दल वर्गाची माफी मागावी"
पन्नाशी ओलांडलेल्या त्या माणसाच्या डोळ्यात राग होताच पण माफी मागा म्हणाल्यावर पाणी आल्याचंही मला स्पष्ट दिसलं. सर वर्ग सोडून निघून गेले. मला ओळखणारा एकही विध्यार्थी त्या वर्गात नव्हता पण त्या वेळी सगळे माझ्या जवळ येऊन मला शाबासकी देऊन गेले.
"हणमंत शिंदे?..... मॅडमनी बोलावलय"
प्राचार्या दिपा देशपांडे यांच्याशी ही माझी पहिली भेट. पन्नाशीच्या आसपास, जेमतेम पाच फुट उंची, गोरा रंग, सदैव हसरा चेहरा, किंचीत मोठे वाटणारे डोळे, त्यावर सोनेरी काड्यांचा मोठा चष्मा, पेहरावात साधेपणा, पदाला शोभणारा आत्मविश्वास चेहर्‍यावर स्पष्ट दिसायचा. मी केबीनमधे गेलो...
"काय चाललय? गाव कुठलं तुझं?"
"मालखेड"
"सरांनी माफी मागण्याइतका मोठा झालास का?"
"नाही. त्यानी खूप चुकिची विधानं केली"
"कसली?"
सरांनी त्याना काही सांगितलेलं नव्हतं. मी सारा प्रकार सांगितला. मॅडम काही वेळ शांत राहिल्या.
"तू जा मी बघते"
माझा दाखला हातात दिला जाईल की काय? हा एकच विचार डोक्यात होता. वर्गात पोहोचलो. सगळ्यांना माझ्या चेहर्‍यावर ती भिती दिसली असावी. एकाने वर्गात उभा राहून सगळ्यांना माझ्या बाजूने बोलण्याची विनंती केली. पुढच्याच तासाला प्राचार्या, मोरे सर आणि बाकीचे शिक्षक वर्गात आले.
"माझ्याकडून झालेल्या चुकिबद्दल मी वर्गाची माफी मागतो" एवढ बोलून मोरे सर निघून गेले. नंतर मॅडमनी तासभर सर्वांना समजावले. पोरांनी टाळ्या वाजवून माझं अभिनंदन केलं. नुकत्याच कॉलेजमधे आलेल्या एका विध्यार्थ्यासमोर एका प्राध्यापकाला त्यानी माफी मागायला लावली. आजवर पुस्तकातल्या नायकांनी भरलेल्या माझ्या मनात त्यादिवशी माझ्या सोबत असणार्‍या... मला शिकवणार्‍या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार्‍या एका आदर्शाचा ठसा उमटला....प्राचार्या दिपा देशपांडे.

त्यांचा महानुभव पंथाचा सखोल अभ्यास, ज्ञानेश्वरी, गाथा या विषयांवरची व्याख्यानं असं बरच ऐकण्याचा योग त्यानंतर आला. मराठी विषयाची गोडी अगदी पहिल्यापासून असल्याने त्या माझ्या आवडत्या शिक्षीका होणारच होत्या. आर. आर. पाटील हे मराठीचे दुसरे शिक्षकही अभ्यासू आणि उत्तम वक्ते होते. पण मॅडमचा जो प्रभाव माझ्यावर होता तो इतरांचा नव्हता.

शिक्षक दिनाच्या खळबळजनक भषणानंतर माझ्या वक्तृत्व स्पर्धा सुरू झाल्या. पहिल्या सहा महिन्यात नऊ स्पर्धा जिंकलेल्या. प्रत्येक वेळी कॉलेजचे नाव पेपरात छापून आलेलं. जमलच तर एखादा तास करायचो नाहीतर स्पर्धेची तयारी किंवा स्पर्धेसाठी बाहेरच असायचो. कुणाची कसलीही तक्रार नव्हती.

या दरम्यान स्पर्धांच्या निमित्तानं देशपांडे मॅडमशी खूप चर्चा व्हायची. त्या मला पुस्तकांची नावं सांगायच्या. हे पुस्तक वाचलस का? त्या कादंबरीतला तो प्रसंग तुला भाषणात उदाहरण म्हणून घेता येईल. अशा मार्गदर्शनापासून ते माझा प्रवास खर्च, माझ्या राहण्या जेवणाची सोय सगळ्या गोष्टी त्यानीच पाहिल्या. काही दिवसांनी तर मला आपण त्यांचे विध्यार्थी आहोत याचा विसर पडला. त्यांच्या मुलाशी, अमेयशी ओळख झाली. मी हक्कानं माझ्या अडचणी त्याना सांगू लागलो आणि त्यानाही त्याचा आनंदच व्हायचा. पण एखद्या वेळी मला हे सारं खटकायचही.... स्पर्धा तर माझ्याबरोबर इतरही करतात... प्रश्न पडायचा... नात्याचा ना गोत्याचा ना जातीचा... मग आपल्याला एवढी मदत का?... आजवर मला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही... संतसाहित्याचा प्रगाढ अभ्यास असणार्‍या त्या माऊलिच्या फक्त मेंदूत नव्हे तर मनातही मुक्ताई... जनाई... ज्ञानाई भिनली असावी....'ऐसी कळवळ्याची जाती.... करी लाभावीण प्रीती' हा व्याख्यानाचा विषय त्यांच्या जीवनाची पाऊलवाट झाला असावा... किंवा देवाने आपल्याच आयुष्यात या भल्या माणसांची पेरणी केली असावी... म्हणून तर ती आपल्याला भेटतात... हे आपले माझे अंदाज.

एका सकाळी कॉलेजला पोहोचलो. नेहमी प्रमाणे उशीर झालेला होताच. वर्गात कसं जायचं म्हणून बाहेरच चकरा मारायला लागलो. एवढ्यात दांडे आला. आमच्या कॉलेजचा शिपाई. माझं भाषण झालं की जवळ येऊन तोंडभर कौतूक करायचा. त्याच्या गावातल्या पारायणात मला प्रवचणालाही बोलावलेलं.

"काय दिंडे साहेब काय करताय?"
"म्याडमचं काम हाय... जरा गावात जावन यतो"
"चहा घ्यायचा का?"
"उशीर हुइल"
"नाय होत ओ... चला"
"बरं चला... "

कँटिनमधे गेलो. चहा येईपर्यंत बोलायचंम्हणून मी सहज बोललो

"म्याडम बाकी भन्नाट आपल्या हा?"
"व्हय. माग बॅकिंग नसताना सगळ संभाळायचं मजी..." दिंडे त्याच्या नेहमीच्या आवाजापेक्षा हळू अवाजात बोलत होता.
"बॅकींग नाही?"
"कुणाचं वो असणार.... मिस्टर वारल्याती आणि पोटाला मूल न्हाय"
"अमेय?"
"त्यो दत्तक मुलगा हाय"
या पैकी काहीच मला माहिती नव्हतं. मला माहिती होत्या कुणाच्या अरेरावीला भिक न घालणार्‍या, विध्यार्थ्याशी मैत्रीण होऊन बोलणार्‍या, सदैव हसतमुख, विध्यार्थ्यांना मदत करताना कधिच हात आखडता न घेणार्‍या प्राचार्या. दिंडे बोलत होता म्हणजे ते खरच असणार... आणि ते खरं असेल तर जेमतेम पाच फुटाच्या त्या मुर्तीत तेहतीस कोटी देवांच्या अन्यायाला टक्कर देण्याचं धाडस आहे... दीपा देशपांडे म्हणजे दुखःच्या फुलांना ज्ञानेश्वरीच्या पानात साठवून, ज्ञानदेवाकडून जगण्याचं हसरं तत्वज्ञान विकत घेण्यात यशस्वी झालेली एक आशयघन ओवी आहे...
पण शब्दांच्या झगमगत्या दिव्यांनी मी कितीही सजवल तरी माणूसण झाकणारं कसं? प्राचार्यांच्या खुर्चीतून उठल्यावर एखाद्या क्षणी ती हळवी... प्रेमाला पारखी झालेली सामन्य स्त्री जागी होतचं असेल ना? मग तिच्याही पुढं माणसांची अलोट गर्दी येत असेल... पण करोडोंच्या कोंडाळ्यात आपलं विश्रांतीस्थळ नाही... आपल्याभोवती माणसं खूप आहेत पण आपलं माणूस....?
प्राचार्या होऊन पोरांनी गजबजलेलं एक महाविद्यालय समर्थपणे चालवणं सोपं... पण थकून भागून घरी परतल्यावर घरातल्या जिवघेण्या शांततेत एकटेपणाशी द्यावी लागणारी झुंज कशी जिंकायची?
प्राध्यापकांच्या राजकारणावर नामी ईलाज करायला त्या समर्थ आहेत... पण एखाद्या अपमानाने बांध ओलांडू पाहणारे अश्रूही स्वतःच्याच पदराचा भार होतात तेव्हा स्वतःला आणि दुखःला समजावण्याची शक्ती कशी एकवटायची? आई म्हणून जवळ येणारं मूल आहे, पण पान्हा फुटेल असा ओलावा त्या हाकेत असेलच असं नाही...
केवढ्या भयाण चक्रव्युहात त्या एकट्या लढत आहेत. त्यातून बाहेर येऊन त्यानी माझ्यासारख्या अनेकांना मदतीचा हात दिला पण देखण्या चित्रामागचा नियतीच्या आघातांनी सांडलेल्या अश्रुंनी भिजलेला निष्तेज कागद कुणालाच दाखवला नाही.
आता मी वक्तृत्व स्पर्धांना परि़क्षक म्हणुन जातो. परवा असाच विट्याला गेलेलो. आष्टा कॉलेजचे विध्यार्थी जवळ आले "सर देशपांडे मॅडम तुमची सारखी आठवण काढतात, शेकडो स्पर्धा जिंकल्या आमच्या हणमंतने असं अभिमानानं सांगतात...."
सैतानाच्या खजिन्यातही नसेल एवढ्या दुखःला काळजाच्या कैदेत ठेऊन देवानं दिलेलं ईवलसं हसू माणसांच्या मनात पेरणार्‍या माझ्या प्राचार्या आजही माझी आठवण काढतात हे ऐकूण आठवणींचा एक थवा बेभान होऊन किलबिलत सुटला.... खूप प्रयत्न केला पण मला न जुमानता एक थेंब नजरेसमोर आलेली त्यांची प्रतिमा पुसून गालावर आलाच....

मॅडम तुम्ही दिलेला 'तथास्तू' अजुनही माझ्या पावला पावलावर यश पेरतो आहे...

गुलमोहर: 

.

ह.बा.
कहाणी आवडली !
सुपाएवढ्या काळजाची... साधी-भोळी माणसं हे नाव ही खास वाटलं !
Happy

तशी गावाकडे अजुनही अनेक लोक गावात निस्वार्थीपणाने कामे करताना दिसतात,पण हळुहळु या पैसा आला की मात्र हे चित्र मात्र बदलत आहे !

<<माझ्यासारख्या अनेकांना मदतीचा हात दिला पण देखण्या चित्रामागचा नियतीच्या आघातांनी सांडलेल्या अश्रुंनी भिजलेला निष्तेज कागद कुणालाच दाखवला नाही.>>खुप सुंदर....

उत्तम! सगळंच उत्तम! ती व्यक्ती, तुमचा निर्भीडपणा, लेखनशैली आणि शब्दांची निवड!

अभिनंदन!

अजून असे खूप काही वाचायचे आहे. प्रतीक्षेत आहे.

-'बेफिकीर'!

अतिशय सुंदर लिहीतोस हणम्या तू, अर्थात हे मी सांगायला नको म्हणा, पण तरीही....भविष्यात काहीही झालं तरी थांबू नकोस लिहायचा Happy

हबा.. खरोखर पुढच्या भागाची वाट पाहत होतो. Happy पुन्हा एकदा सुपाएवढ्या काळजाच्या माणसाची ओळख करून दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद. लेका.. सुपाएवढ्या काळजांच्या लोकांविषयी इतकं सुंदर लिहायला खरोखर.. ढगाएवढं काळीज, समिंद्राएवढी माया .. असावी असे माझे मत. Happy ...

सगळे भाग व्यवस्तीत इनफोल्डर करून घेतले. पून्हा पून्हा वाचायला आवडेल असेच आहेत सगळे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

Happy

अप्रतिम मित्रा... सही लिव्हलयस...तुझ्या काळजात कोरलेले हे शब्द आमच्यासमोर मांडतोयस त्याबद्दल खरच धन्यवाद.

खूप प्रयत्न केला पण मला न जुमानता एक थेंब नजरेसमोर आलेली त्यांची प्रतिमा पुसून गालावर आलाच.... >> हि ओळ खुप काही सांगुन जाते ....

वा वा... ह्याच मालिकेतले आधीचे दोन लेख पण असेच मस्त होते.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. आणि लेखाच्या शीर्षकासारखंच साधं लिखाण..

पुन्हा एकदा सुंदर लिखाण ! तुझ्या खास अशा ह्या लेखनशैलीतील ही लेखमालिका छानच बहरलीय !! किप इट अप !

छान लिहिलंय Happy

-----
दीपा देशपांडे म्हणजे दुखःच्या फुलांना ज्ञानेश्वरीच्या पानात साठवून, ज्ञानदेवाकडून जगण्याचं हसरं तत्वज्ञान विकत घेण्यात यशस्वी झालेली एक आशयघन ओवी आहे...

सैतानाच्या खजिन्यातही नसेल एवढ्या दुखःला काळजाच्या कैदेत ठेऊन देवानं दिलेलं ईवलसं हसू माणसांच्या मनात पेरणार्‍या माझ्या प्राचार्या आजही माझी आठवण काढतात हे ऐकूण आठवणींचा एक थवा बेभान होऊन किलबिलत सुटला.... >>>>

ही वाक्यं खूप आवडली.

पहिल्या परिच्छेदातच जिंकलंत. खूप छान लिहीलंय. इतकी समरस झाले होते वाचताना, की शेवटच्या ओळी अंधुक दिसत होत्या...डोळ्यातील पाण्यामुळे.
सुंदर. आणखी लिहा.

हबा, शब्द शब्द वेचून पारिजातकाप्रमाणे हुंगत राहावेत इतकं पवित्र, निर्मळ, पारदर्शक आणि लोभस लिहीता... ही मालिका तर खास झालिये एकदम... नवीन भाग आला की आवर्जून आधीचेही भाग धुंडाळून त्याचेही पारायण करते. लिहीत राहा.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

आष्टा, विटा, सांगली, तुंग, औदुंबर ही नावे आली की कॉलेजच्या आठवणी जाग्या होतात. मी आष्ट्याला डांगे कॉलेजला इंजिनिअरिंगला ३ वर्षे होते...

खूप प्रयत्न केला पण मला न जुमानता एक थेंब नजरेसमोर आलेली त्यांची प्रतिमा पुसून गालावर आलाच.... >>>>>
काही क्षणांपुर्वी हे ही अनुभवले रे............ ! हि तुझ्या लेखणीची ताकद कि त्या मायेचा महिमा .... देव जाणे .........

लेखणीची ताकद >>> शॉल्लिड बोजड शब्द वाटतोय रे!!!

आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनानेच काहिबाही लिहीलं जातं आहे.
सर्वांचा खूप आभारी आहे!!!

ड्रिम्स, तीन वर्ष आष्ट्यात होतीस आणि मला सांगितलही नाहीस?

ह. बा. : मला प्रतिसाद द्यायला शब्दच मिळत नाहियेत
>>आर. आर. पाटील हे मराठीचे दुसरे शिक्षकही अभ्यासू आणि उत्तम वक्ते होते.
हे म्हणजे "आबा" तर नव्हेत?

हे म्हणजे "आबा" तर नव्हेत? >>> नाही हो. ते असते तर मी तालुका राकॉचा सचिव असतो आत्ता.

नक्षी, रुनीजी
प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे!!!

Pages