वरूण, वायवर्णा किंवा पाचुंदा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

माझ्या आजोळी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर गावातून एक शाळी नावाची नदी वाहते, तिच्यावर असलेल्या एकमेव पुलावरून, काहि झाडांचे शेंडे हे असे सुंदर दिसतात.

varuN_shenda.jpg

हा नजारा खरेच खुप देखणा असतो. अगदी नकळत्या वयातही मी हे दृष्य बघत उभा रहात असे. मंद वार्‍यावर हे शेंडे छान झुलत असतात आणि एक मंद सुगंध आसमंतात भरून राहिलेला असतो.
खरेतर लांबून बघितल्यावर हि फ़ुले असतील असे वाटत नाही, झाडाची कोवळी पालवीच असेल असे वाटत राहते. पण झाडाखाली मात्र पाकळ्यांचा आणि पुंकेसराचा सडा असतो.

varuN_ful.jpg

हे त्याचे मोहक फ़ुल. पाकळ्यांचा पोत आणि रंग तर पापण्यानाही सुखावणारा. अस्सल सिल्कमधे कशी शुभ्र छटा मिळत नाही, एखादी ऑफ व्हाईट छटा मिळते, तशी हि छटा. संध्याकाळी जरा आणखीच गडद होते. तहिही ती पिवळी म्हणण्या इतपत गडद होत नाही. ( इथे मला नमूद करावेसे वाटतेय कि आमच्या भागात त्याला पाचुंदा असा शब्द आहे. कदाचित हे त्याचे स्थानिक नाव असावे किंवा वरुण आणि पाचुंदा एकाच कुळातील असावेत. क्रटेव्हा रिलिजिओसा, क्रटेव्हा अडेनसोनी, क्रटेव्हा नुरव्हाला अशी या कुळातील काहि झाडे आहेत, पण त्यातील सुक्ष्म भेद कळण्याइतकी ती विपुल नाहीत.. )

varuN_ful2.jpg

वरूणाला वायवर्ण असेही नाव आहे. बंगालीमधे बरुन आणि त्यावरून इंग्रजीत बर्ना. शास्त्रीय नाव Crataeva tapia
खरे तर भारतात सर्वत्र आढळणारा हा वृक्ष आहे, पण मला खात्री आहे कि आपल्यापैकी बर्‍याच जणानी हा बघितला नसणार, याचे असे भरभरुन फ़ूलणे, काहि दिवसांपुरतेच असते. जंगलात हा अगदी तुरळक दिसतो, पण कोल्हापूरला रंकाळा तलावाजवळ हा आहे.
हा खरे तर धार्मिक वृक्ष म्हणायला हवा. शंकराच्या देवळाजवळ लावला जात असे. उत्तरेकडे याची तशी लागवड होते. मुस्लीम आणि बौद्ध धर्मीय पण या झाडाला प्रार्थनास्थळाजवळ स्थान देतात.

वरुणः शेतपुष्पच तिक्तशाकः कुमारक
श्वेतद्रुमो गन्धवृक्षस्तमालो मारुतापह

अशी याची नावे. याचे आणखीन एक नाव म्हणजे अश्मरिघ्न. अर्थातच मूतखड्यांवर याचा उपयोग होतो. मूळ, साल व पाने औषधात वापरतात. चरबी झडण्यासाठीही याचा उपयोग होतो. लाकूड ठिसूळ असते त्यामुळे त्याचे फारसे उपयोग नाहीत, पण पाने जनावरे आवडीने खातात. फ़ळे पण खातात, पण त्याला खास अशी चव नसते. त्या पिवळसर गराचे डाग मात्र कपड्यावर पडतात. फ़ळे बोरा एवढी असतात.

या झाडाचा फ़ुलोरा देखणा असतोच, पण पाकळ्या गळून गेल्यावर मागे राहिलेला पुषपकोषही सुंदर दिसतो. हिवाळ्यात याची पानगळ होते आणि नवी पालवी आणि मोहोर एकाचवेळी येतात. पाने त्रिदलीय, जवळ जवळ बेलासारखीच असतात, पण या झाडाला बेलाप्रमाणे काटे नसतात.

एकेकाळी परिचीत असणारे असे वृक्ष, आता का दुर्मिळ होत चालले आहेत ?

विषय: 
प्रकार: 

वा!!!! काय देखणे फूल आहे. मस्तच!!
दिनेशदा तुमच्यामुळे विविध झाडांची किती अमूल्य माहिती मिळतेय.

फारच सुंदर माहिती व फोटो. परवाच मलकापुरच्या पुढे अंबा घाटात जशी गुलाबी पिसाची फुले असतात, त्याप्रमाणे पांढरी शुभ्र फुले असलेली झाडे बहरलेली होती. त्याही बाबत फोटो व माहिती असल्यास द्या. वृक्ष मोठा साधारणपणे तीसएक फूट असेल, व फुले तंतुंची व पांढरी होती.

सुंदर, अतिशय सुंदर फुल आणि तेवढेच देखणे झाड. अशी नाजुक फुले एवढ्या मोठ्या वृक्षाला लागतात त्याचे आश्चर्य वाटते.
साधना

आभार निलु, मीना आणि साधना,
मीना, ते झाड बहुतेक शिरिषाचे. त्याबद्दल लिहिले होते मी. फुले हिरवट पांढरी असणार.
साधना, कुठे असा फुलोरा दिसला, तर नक्कि कळव. मी अगदी मोजकी झाडे बघितली आहेत याची.
फुले अगदी नाजूक नसतात. पाकळ्या दोन सेमी लांबीच्या व फुलाचा घेर चार पाच सेमीचा असू शकतो. फुलावर नसेल त्यावेळी बेलाच्याच झाडाचा भास होतो.

झाडाचे नावही फोटोने अगदी समर्पक केले आहे - वरूण. झाडाकडे पाहिल्यावर वाहत्या वरूणाची लगेच जाणिव होते. तुमच्या सगळ्या फोटोंमध्ये मला हाच सगळ्यात जास्त आवडला. झाड कोठे पाहिल्यास नक्किच कळवेन.
साधना.

माझे आज्जी- आजोबा बर्‍याच वर्षांपूर्वी मलकापूरला रहायचे. बाबांचे अनेक ओळखिचे लोक, मित्र अजूनही आहेत तिथे. आम्ही पण लहानपणि २-२ महीने तिकडे जायचो रहायला. पण मला मलकापूर फारसं आठवत नाही. आमचं घर, गोठा अन्धुकसं आठवतं. छान वाटलं त्या गावबद्दल वाचुन.
प्राजक्ता

प्रजा, कित्ती छान. इथे मायबोलीवरच काहिजण आहेत तिथले. मी पुर्वी खुप लिहिले आहे माझ्या आजोळबद्दल. माझे अजुन येणेजाणे असते तिथे. गाव अजुनहि तसेच छान आहे. आता तिथे बघण्यासारख्या अनेक जागा आहेत. अणुस्कुरा घाटात एक धबधबा आहे. पावनखिंड आहेच. विशाळगड आहे.

मलकापूर बाजारात फ्रॅक्चरसाठी जडीबूटी औषध मिळते, असे ऐकून आहे.. औशधाची जुडी मिळते, हे औषध ताजेच घ्यावे लागते. त्यामुळे सात दिवसाचेच मिळते. नंतर पुन्हा नवीन आणावे लागते. १ ते २ महिने औषध घ्यावे लागते असे म्हण्तात. ही नेमकी कोणती वनस्पती आहे?

( मायबोली सर्च मध्ये मलकापूर सर्च केल्यावर हा धागा दिसला. म्हणून इथे लिहिले. ही वनस्पती कोणती, त्याचीही माहिती लिहिल्यास उपयोगी ठरेल.)

मलकापूरच्या एस्टी स्टॅंडच्या बाहेर ज्या चहा, भजी विकणार्‍या गाड्या असत्यात त्यांच्याकडे पानात बांधलेले (साधारण शंकूसारखा आकार असतो ) औषध मिळते. त्यात एकच वनस्पति असते का काहि मिश्रण असते त्याची कल्पना नाही. पण बरीच वर्षे हे औषध तिथे विकायला असते. माझ्या भावाने दुखर्‍या पायासाठी घेतले होते पण काही विशेष आराम पडला नव्हता. (हा केवळ त्याचा अनुभव. कदाचित त्याचे तंत्र, प्रमाण जमले नसेल.)
हाडांच्या दुखण्यासाठी धावड्याचा डिंक चघळायला सांगतात. पण त्याचाही मला अनुभव नाही.

आहाहा..किती नाजूक फूलं आहेत.. आणी रंग माझा खास आवडता.. लहानपणी कुठेतरी भेटल्यासारखा वाटतोय.. खरच दुर्मिळ होत चालली असावीत ही झाडं

शंकुसारखा आकार... बरोबर. तेच औषध. माझ्या एका मित्राने आणले आहे. त्यात कुठल्या तरी एका झाडाची मुळी आहे. अगदी ठिसूळ आहे. हाताने त्याचा भुगा होतो.

जागू असे बरेच (किमान ६० तरी ) छोटे छोटे लेख मी लिहिले होते. जिप्स्याच्या मागे लागून त्याचे संकलन करायचेय.

छान लेख व फोटो! Happy
>>>>>एकेकाळी परिचीत असणारे असे वृक्ष, आता का दुर्मिळ होत चालले आहेत ? <<<
अहो हल्ली की नै, आख्ख्या भिन्तीवर चिकटवायचे वॉलपेपर मिळतात. मग झाडेझुडपे हवित कुणाला? उग्गाच पालापाचोळ्याचा कचरा होतो. कोण झाडत बसणार? नै का?

लिंबुदा तुम्ही म्हणता ते काहिंचे खरच वास्तव झाले आहे.

दिनेशदा जिप्स्या आला की कामाला लागायला हव संकलनाच्या.